देऊळ, लोकल ट्रेन, चित्रपटगृह आणि माणसं
तीन घटना. तीन बातम्या. आणि तीन प्रकारे वागलेली तिथली माणसं. याबाबत मी गेले तीन दिवस विचार करतोय.
रत्नाकर मतकरींचं एक वाक्य आठवतं, 'माणूस वाईट नसतो; माणसं वाईट असतात.' याबद्दल विचार केला की त्यांचं म्हणणं किती खरं आहे ते जाणवतं. या घटना वृत्तवाहिन्यांनी, वृत्तपत्रांनी पुरेशा चघळल्यात त्यामुळे त्या सगळ्यांना माहित असतीलच. लक्ष देण्यासारखी गोष्ट आहे ती म्हणजे तिथे उपस्थित असलेल्या जनसमुदायाचं वागणं, त्यांचा विचार.
शनिशिंगणापूरला, जिथल्या देवळात स्त्रीयांना प्रवेश निषिद्ध आहे, तिथे एका मुलीने जाऊन तेलाचा अभिषेक केला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. आणि तिथल्या ग्रामस्थांनी वगैरे निषेध बिशेध केला, काय तर म्हणे दुधाचा अभिषेक करून शुद्धिकरण वगैरेही केलं. एका वृत्तवाहिनीवर तिथल्या देवस्थानच्या अधिका-याला दोन प्रश्न केले गेले ज्यांची उत्तरं त्याच्याकडे नव्हती. प्रश्न एक - केला एका स्त्रीने प्रवेश, आणि केला अभिषेक. काय बिघडलं? का करू नये असं? (हा विषय मोठा आहे. माझा आत्ता तो मुद्दा नाही.) प्रश्न दोन - तिथे इतके लोक उपस्थित होते, त्यांनी यावर एका शब्दानेही आक्षेप घेतला नाही. सीसीटीव्ही मॉनिटर होत होता, देवस्थानचे ड्युटीवरचे अधिकारी तिथे होते, त्यांनीही काही म्हटलं नाही. का? आणि आता सगळं झाल्यावर हे फुटेज बाहेर आणून, निषेध वगैरे करून काय हशील?
लोकल ट्रेनची घटना अतिशय दु:खद आहे. भावेश नखाते हा मुलगा डोंबिवलीहून मुंबई सीएसटी कडे जाणा-या ट्रेनमधे चढला, त्याला आत जाता आलं नाही, तो लटकत होता आणि काही वेळाने त्याची पकड सुटली व तो ट्रेनमधून खाली पडून मेला. या गोष्टीचा व्हिडियो; हो व्हिडियो, व्हॉट्सॅप, फेसबुक इत्यादी सर्व ठिकाणी फिरतोय.
तिसरी घटना चित्रपटगृहाची. कुर्ला इथल्या पीव्हीआर चित्रपटगृहात एक कुटुंब चित्रपट बघायला आलं असता चित्रपटाच्या आधी राष्ट्रगीत लागलं तेंव्हा उभं राहिलं नाही. याचा उपस्थित इतर लोकांपैकी काहींना राग आला आणि त्यांनी विरोध केला, भांडण केलं आणि अखेर त्या कुटुंबाला चित्रपटगृहाच्या बाहेर जाण्यास भाग पाडलं. यावर सर्वांनी टाळ्या वाजवून झाल्या घटनेबद्दल सर्वांचं कौतुक केलं. याचाही व्हिडियो फिरतोय.
पहिल्या घटनेत मुळात त्या मुलीची कृती योग्य/अयोग्य हाच प्रश्न असल्याने उपस्थित लोकं संभ्रमित अवस्थेत होती असं माझं मत आहे. एकीकडे कुठेतरी जे होतंय त्यात काहीच चूक असं नाही असं वाटणं, आणि दुसरीकडे हे असं चालत नाही या युगानुयुगे चालत आलेल्या नियमाचा(?) भंग होतोय असं वाटणं या दोन भावनांच्या मधे कुठेतरी ही जनता लटकत होती त्यामुळे त्यांच्याकडून काहीच कृती झाली नसावी. दे वर स्टन्ड.
दुस-या घटनेत 'माणसांचा' राक्षसी चेहरा दिसतो. मी स्वतः अनेकदा बघितलं आहे की एखादी व्यक्ती धावत ट्रेन पकडायचा प्रयत्न करत असेल तर दारात उभी असलेली लोकं हात देऊन वर ओढून घेतात. इथे तसं न होता त्या माणसाचा जीव जाईपर्यंत वेळ गेली. वास्तविक थोडं थोडं सरकून सहज जागा करता आली असती, त्याचा हात धरता आला असता, चेन खेचता आली असती, काहीही करता आलं असतं. पण तसं कुणीही केलं नाही. केलं काय? तर शूटिंग. एखादा माणूस मरणार हे दिसतंय समोर, वाचवणं म्हटलं तर शक्य आहे, असं असताना ही व्यक्ती शूटिंग कसं करू शकते? याबद्दल बोलण्यासाठी सौम्य शब्द माझ्याकडे नाहीत. तेंव्हा असो. पण त्यावरून आठवलं, ती घटना जेंव्हा एक माणूस वाघाच्या चेंबरमधे पडला होता, आणि त्याला वाघ खातो, याचा व्हिडियो फिरला होता. अगदी हीच मानसिकता. मनोरंजन होत असल्यासारखं बघत राहणं.
एक असाच व्हिडियो आला होता, ज्यात एका समुद्रकिना-यावर (भारतात नव्हे) डॉल्फिन्स अचानक लाटेसोबत किना-यावर येऊ लागले आणि त्यांना आत जाण्यास त्रास होत होता. तेंव्हा उपस्थित लोकांनी आपसुक, प्रतिक्षिप्त क्रीया असावी त्याप्रमाणे एक एक करून डॉल्फिन्स ना पुन्हा पाण्यात नेऊन सोडलं. एकाने केल्यावर सर्वांनी तसंच केलं. याचाही व्हिडियो काढणारा माणूस होताच पण किमान समोर घडणारी गोष्ट सकारात्मक होती.
तिस-या घटनेत मात्र कृती दिसते. तीही योग्य म्हणावी अशी. इथेही चित्रपटगृहात राष्ट्रगीत हवंच कशाला? इत्यादी युक्तिवाद करणारे आहेत. पण उपस्थित लोकांनी एक येऊन त्या कुटुंबाच्या कृत्याचा विरोध करत त्यांना बाहेर जायला भाग पाडलं. चांगलं हे की बहुतेक लोकं राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभी राहिली. त्याहून चांगलं की जे योग्य वाटलं त्याचा एकत्र येऊन पुरस्कार केला आणि अयोग्याचा एकत्रपणे विरोध केला. दोनही बाबी आशादायी आहेत. पुढे वृत्तपत्रांनी ते कुटुंब अमूक धर्माचं होतं याच गोष्टीला जास्त महत्व दिलं तो एक वेगळाच मुद्दा आहे.
या तीनही परस्पर भिन्न घटना आहेत. पण माणसं, आणि त्यांचं चमत्कारिक वागणं ही एक सामायिक गोष्ट मला या तीनहीत दिसते. समाज म्हणून आपण इतके निष्क्रीय होऊ शकतो, शिक्षण घेऊनही चुकीच्या, जुन्या समजुतींना कवटाळून राहू शकतो, आणि क्वचित एखाद्या गोष्टीच्या विरोधात टोकाची पण एकत्रित प्रतिक्रियाही देऊ शकतो. ही प्रगतीच्या दृष्टीने फार चांगली लक्षणं नाहीत असं मनापासून वाटतं.
बाकी पुढे चर्चेसाठी निमंत्रण देतोच आहे.
वाचने
4926
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
बाकी पुढे चर्चेसाठी निमंत्रण
फुसके बार ?
तिसरी घटना - त्या टकलू
कायद्यानुसार उभे राहणे
In reply to कायद्यानुसार उभे राहणे by अत्रे
उत्तम माहिती
लोकलची घटना:
In reply to लोकलची घटना: by साधा मुलगा
पण लोकं कसे सांभाळून घेणार?
In reply to पण लोकं कसे सांभाळून घेणार? by गामा पैलवान
सहमत पण तरीही
In reply to सहमत पण तरीही by साधा मुलगा
लवकर निघून , ठाणे लोकल,
In reply to लवकर निघून , ठाणे लोकल, by टवाळ कार्टा
मिळते हो सकाळी लवकर उठून गाडी
या सर्व गर्दीवर उपाय म्हणजे
ते झालच हो साहेब, पण
In reply to ते झालच हो साहेब, पण by साधा मुलगा
+१ सहमत. बाहेरची गर्दी.
लोकसत्तात आज जो अग्रलेख आला