एकलव्याची तिरंदाजी ०९
आजच्या या सुप्रभाती सर्वांना नाताळच्या शुभेच्छा! काल रात्रीच सांटाने लालभडक मोज्यामध्ये माझ्या मुलीसाठी एक गोड फ्रॉक आणि एक सुंदरसे खेळणे आणून ठेवले आहे. Thanks Santa! She really is a sweet girl!! साखरझोपेतून घर जागे व्हायच्या आधी काही आठवणी मनात आल्या त्या निसटून जायच्या आत घाईघाईने येथे मांडतो आहे.
मी किती बरे ख्रिश्चनांच्या सहवासात आलो... म्हटले तर बर्याच. पण तसे बघायचे झाले तर यातील अनेकांना मी ख्रिश्चन म्हणून पाहिलेच नाही. दोस्ती करताना, बरोबरीने काम करताना याचा धर्म कोणता ह्याचा विचारच कधी डोक्यात आला नाही. बहुतेकवेळा समोरच्यानेही तसे कधी जाणवू दिले नाही हेही तितकेच खरे. आज मात्र ३ माणसे जी माझ्या आयुष्यात ख्रिश्चन म्हणून आली आणि माझी म्हणून राहिली त्यांचा धावता उल्लेखमात्र नाताळच्या निमित्याने करणार आहे.
फादर औसे परमपिल
यांची आणि माझी ओळख कशी आणि कोणामुळे झाली हा स्वतंत्र विषय आहे. ते नंतर कधीतरी!
मूळचा केरळचा हा फादर खरोखरच एक अफाट माणूस. परमपिल हे पुणे विद्यापीठाच्या संस्कृत (किंवा भाषाशास्त्र/ व्याकरण असे काहीसे) विभागात काही वर्षांपूर्वी प्राध्यापकपद भूषवित होते. आज आंतरजालावर पुणे विद्यापीठा धुंडाळले पण पत्ता लागला नाही. पण एकेकाळी तासोनतास झालेल्या गप्पांमधून कानावर पडलेली काहीकाही वाक्ये आयुष्यभरासाठी परिणाम करून गेली आहेत. ती सुवचने अशी -
"आय ऍम ऍन इन्डिअन कॅथॉलिक. नॉट अ रोमन कॅथलिक." हे वाक्य एका धार्मिक सभेत बोलल्याबद्दल काही अधिकार परमपिल यांना सोडून द्यावे लागले होते असे ऐकून आहे.
माझ्या पत्नीने (तेव्हा अर्थात आमचे लग्न झालेले नव्हते) केरळात काही वर्षे काढली आहेत. हे समजल्यावर फादर परमपिल यांनी आम्हा दोघांनाही स्वतः खास केरळी स्वयंपाक करून जेवायला बोलावले. मला विचारलेला प्रश्न - "सो डू यू कूक?"... अस्मादिक (हसत हसत) - "नो! नो!! आय ऍम कंप्लिटली आउट ऑफ इट!!!".... काही क्षणांची शांततेनंतर कानावर एकेक करीत आलेले शब्द आदळले - "सो यू नो ओन्लि टू ईट ईट ऑल." त्या शब्दांनी झालेली जखम आजवर भरून निघालेली नाही.
आणखी एका प्रसंगी त्यांनी कोणाला तरी जेवायला बोलाविले आणि ते महाशय आले नाहीत. फोन करून म्हणतात कसे - "हे फादर... आय ऍम व्हेरि सॉरि, बट सिन्स यू आर ऑल बाय युचरसेल्फ लेटस् प्लॅन फॉर सम अदर टाईम." फादर परमपिल - "देअर नो मोअर इन्व्हिटेशन्स फॉर यू. आय कॅन कूक बट आय ऍम नॉट अ कूक." प्रेमळतेचा पुतळा असणार्या फादरकडे नाठाळाच्या माथी काठी हाणण्याचीही तयारी होती. कॉर्पोरेट जगतात वावरताना कित्येक प्रसंगी फादर परमपिल यांचे सडेतोड शब्द कानांत गुंजत असतात.
आणखीही बरेच आहे... पण तूर्तास इतकेच.
क्लॉडिअस टौरव
क्लॉडिअस हा माझा मास्टर्सच्या वर्गातील मित्र. पुण्यातील पाषाण रस्त्यावरील लॉयला स्कूलच्या चर्चमध्ये हा ब्रदर या नात्याने राहत असे. अतिशय शार्प ब्रेन आणि भलताच फ्रेंडली. गणित शिकताशिकता हा थिऑलॉजिही शिकत होता... आणि माझेही धडे घ्यायचा असे म्हणायला हरकत नाही. ख्रिश्चॅनिटी त्याने कधी कोणावर लादायचा प्रयत्न केला नाही की आमच्या वादविवादात जाणूनबुजून दोष काढण्याची चढाओढ लागल्याचे कधी आठवत नाही. कोणतीही पार्टी झाली की शेवटपर्यंत आवराआवरीला थांबणार्यांमध्ये क्लॉडिअस अगदी नक्की म्हणजे नक्की असणार याची खात्री बाळगावी. त्याकाळी चालू असणार्या "प्रेमळ त्रिकोण/ चौकोन" यामध्येही क्लॉडिअसवर भरवसा टाकून निरोप एका टोकावरून दुसरीकडे अगदी जपून जात हे आजही आठवते. बारीकसारीक किस्से आणि खोलवर जपलेले क्षण अनेक आहेत पण येथेच थांबतो. इन द एन्ड... आय ओ हिम अ लॉट!
फादर जेम्स्
येथे नावे काल्पनिक आहेत... पण घटना सत्य आहे. तसेच हा प्रसंग माझ्याविषयी नाही पण माझ्या अगदी जवळच्या माणसांविषयी आहे. हर्ष गोखले फादर जेम्सकडून गेले वर्ष - दोन वर्षे ख्रिश्चॅनिटी शिकत आहेत. फादर जेम्सने बाल्टिमोरच्या आपल्या छोट्याश्या गावी थॅक्स-गिव्हिंगला हर्षला मेजवानीला बोलाविले. फादर जेम्सच्या आईने -- ल्युसीने -- बोलण्याच्या ओघात अगदी निरागसतेने (प्लीज टेक माय वर्ड फॉर दॅट!) विचारले - "हर्ष, सो व्हेन आर यू टू गेट बाप्टिमाईजड्?" एकदम पिनड्रॉप सायलेन्स. हर्षच्या डोक्यात धर्म बदलण्याचा विचार इतकाही नाही. फादर जेम्स पोलाईटली सेड - "ल्युसी, हर्ष इ़ज् ऑलरेडी अ ख्रिश्चन दॅन मेनि मोअर आय नो अराऊंड!"
हरवलेली ख्रिश्चन माणसे
आज माझा या तिघांशीही संपर्क तुटला आहे. फादर परमपिल यांच्याशी लवकरच पुन्हा संधान जुळेल अशी आशा आहे. क्लॉडिअस बिहारमध्ये संथाळ भागात आहे असे काही वर्षांपूर्वी कळले होते... कधीतरी अचानक भेट झाली तर खूप बरे होईल. काल्पनिक नव्हे पण खर्या फादर जेम्सचा शोध मात्र लागला आहे असे म्हणायला हरकत नसावी.
आजूबाजूला धर्म विसरलेली धार्मिक माणसे रोज पाहतोच आहे. मीही बर्याचदा त्याच कळपात सामील असतो. गांधीजींने तर म्हटलेच आहे - I like your Christ, I do not like your Christians. Your Christians are so unlike your Christ. आज मला मात्र म्हणावेसे वाटते की आयुष्यात येऊन गेलेली ही काही खरी ख्रिश्चन माणसे मला कदाचित येशू ख्रिस्तापेक्षाही जास्त प्रिय आहेत.
- एकलव्य
वाचने
3505
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर...
अरे वा
खरचं सुरेख..
छान!!! पण
चांगला लेख
लेख
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
अतिशय
सुन्दर
छान
धन्यवाद!
आज मला
लेख आवडला.
अहाहा
माझे ही मित्र..