पावडर
(ह्या कथेत इंटरनेटच्या एका वेगळ्याच जगाची ओळख करून दिली आहे. ही कथा वाचत राहा, तिचा आनंद घ्या पण चुकूनही ह्या जगाची ओळख स्वत: करून घ्यायचा प्रयत्न करू नका हीच कळकळीची विनंती.)
****************************************************************************
गोष्ट तशी फारशी जुनी नाही. सहा आठ महिन्यांपूर्वी मी माझे गुजरात राजस्थान मधले काम संपवून नुकताच पुण्यात स्थानापन्न झालो होतो. गणपती संपत आले होते, अचानक तेव्हाच एके दिवशी आमचा मोबाईल खणखणला. बघतो तर कश्यप साहेबांचा फोन. कश्यप साहेब गेल्या वर्षीच पुण्याच्या सायबर क्राईमला जॉईन झाले होते. त्यांचे एकूणच ज्ञान, गुन्हा हाताळण्याची पद्धती, स्वभाव ह्या सगळ्याचे आपण एकदम फॅन, त्यामुळे पहिल्या रिंगलाच फोन उचलला.
'सुसकाळ साहेबजी. आमची आठवण कशी काय काढली आज?'
'पुण्यात आहेस?' साहेबांनी विचारले. 'असशील तर ताबडतोब ऑफिसला येऊन भेट. महत्त्वाचे काम आहे.' साहेबांचा सूर ऐकूनच काहीतरी बिनसले असल्याचे लक्षात आले, आणि मी 'पोचतोच अर्ध्या तासात' असे सांगत फोन ठेवला.
साधारण साडेबारा एकच्या सुमाराला साहेबांच्या ऑफिसात पोचलो. 'सणावारी तरी सुखाने मोदक बिदक गिळू देत चला की..' असे ओरडतच मी साहेबांच्या केबिन मध्ये घुसलो आणि एकदम चपापलो. केबिन मध्ये कश्यप साहेबांबरोबरच एक अजून साहेब आणि एक मॅडम बसलेल्या होत्या.
"ये रे टोणग्या.." साहेबांनी सुरुवात तरी खेळीमेळीने केली होती. मी यायच्या आधी बहुदा माझाच विषय चालला असावा कारण बाकीचे दोन लोकं प्रदर्शनातले माहितीपत्रक वाचल्यावरती त्या वस्तूकडे बघतात तसे माझे निरीक्षण करत होते.
"प्रसाद, हे इन्सपेक्टर विजय कसाळकर आणि ह्या इन्स्पेक्टर रीटा गोम्स. दोघेही सध्या स्पेशल ड्यूटीवरती आहेत, आणि तुझ्या मदतीची आवश्यकता आहे. तुझ्याविषयी सगळी माहिती मी त्यांना दिली आहेच. जशी तू अधे मध्ये आम्हाला मदत करतोस, तशी त्यांना पण करावीस असे मला वाटते."
"नमस्कार" मी आपले उगाच माझे संस्कार वगैरे दाखवत दोघांकडे पाहून हात जोडले. "कश्यप काकांनी माझ्या बद्दल काय काय सांगितले आहे मला माहिती नाही, पण मला इंटरनेट, हॅ़किंग किंवा तत्सम क्षेत्रातले संपूर्ण ज्ञान खचीतच नाही. जे थोडेफार आहे, त्याच्या मदतीने शक्य ती मदत मी नक्की करेन."
"धन्यवाद प्रसाद. आम्हाला नक्की तुमच्याकडून काय मदत हवी आहे ते मी सांगायचा प्रयत्न करतो, ते ऐकून तुम्ही तुमचा निर्णय घ्या. अर्थात तुमचा मदतीला नकार असेल, तर इथले झालेले संभाषण तुम्ही बाहेर पडतानाच विसरावेत हे तुम्हाला वेगळे सांगण्याची बहुदा आवश्यकता नसावी. बरोबर?" कसाळकरांनी सुरुवात केली.
"हो मला कल्पना आहे. ह्या आधी मी एक दोन छोट्या प्रकरणात तुमच्या विभागाला मदत केली आहे. त्यामुळे तुम्ही तेवढा विश्वास नक्कीच ठेवू शकता."
"नक्कीच! विश्वासू नसतात तर कश्यप साहेबांनी तुमचे नाव सुचवलेच नसते. पण तरी एकदा खुंट हालवावासा वाटला म्हणून बोललो. राग नका मानू. तर प्रसाद, आम्हाला एक केस संदर्भात तुमची मदत हवी आहे. १५ दिवसांपूर्वी पणजीम जवळच आम्ही एका परदेशी नागरिकाला गर्द विकताना एका तरुणाला पकडले. हा तरुण मूळचा नाशकातला. थर्ड डिग्री लावल्यावरती त्याच्याकडून आम्हाला जी माहिती मिळाली त्या आधारे आम्ही अजून एका माणसाला अटक केली. ह्या अटक केलेल्या माणसाचे नाव बशीर आहे. ह्या बशीरकडे मात्र माहितीचा चांगलाच खजिना हाताला लागला.”
थोडे थांबून साहेबांनी पाणी पिले आणि पुन्हा बोलायला लागले. "ह्या बशीरच्या माहितीनुसार सुमारे साडे सात कोटींचे अंमली पदार्थ पोरबंदर मार्गे मुंबईत उतरवण्यात आले आहेत. ह्यातला चार कोटींपेक्षा जास्तीचा माल एकट्या मुंबईतच विकला गेला, तर उरलेला गोव्यात दाखल झाला आहे. गेल्या पंधरा दिवसात आम्ही अथक प्रयत्न केले, गोव्या बरोबरच मुंबई पोलिसांच्या मदतीने मुंबईत देखील अनेक ठिकाणी धाडी टाकल्या. मात्र एखाद दीड कोटीच्या मालाच्या विक्रीचे हिशेब आणि काही लाख रुपये रोख ह्या शिवाय आमच्या हाताला काहीच लागले नाही. जी माणसे पकडली गेली, ती देखील महत्त्वाची काहीही माहिती देऊ शकली नाहीत. पण ह्या सगळ्या जमा केलेल्या माहितीतून एक महत्त्वाची बातमी अशी मिळाली, की आजकाल जेवढा अंमली माल भारतात दाखल होतो, त्यापैकी फक्त २० ते २५ टक्के माल हा हस्ते-परहस्ते ग्राहकांपर्यंत पोचवला जातो. उरलेला माल इंटरनेटद्वारे खपवला जातो. ऐकूनच आम्हाला धक्का बसला. आम्ही जंग जंग पछाडले, पण आम्हाला एखाद्या ठाम दिशेला नेईल असा कुठलाच पुरावा मिळाला नाही. आम्ही अनेक संशयिताबरोबरच त्यांच्या कॉम्प्युटर्सची देखील झाडाझडती घेतली पण उपयोग शून्य.”
येवढे बोलून कसाळकरांनी अपेक्षेने माझ्याकडे पाहिले. मी चेहऱ्यावर कुठलेच भाव दिसणार नाहीत ह्याची पूर्ण काळजी घेत होतो. कसाळकरांना हळूहळू कुठल्या दिशेला जायचे आहे ते माझ्या चांगले लक्षात येत होते, पण जिथे जाण्याचा रस्ता ते शोधत होते त्या दुनियेत मी वावरून आलो असल्याने पुढचा प्रचंड धोका मला घाम फोडत होता.
कसाळकर थांबताच आता रीटा मॅडमनी चार्ज आपल्याकडे घेतला. "प्रसाद येवढ्या मोठ्या प्रमाणावरती ड्रग्ज विकले जातात तरी कसे, आणि ते देखील कुठलाही सुगावा लागू न देता? हा आमच्या पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे. बरं आमच्या तपासात असेही आढळले आहे, की ह्या मार्गाने फक्त ड्रग्जच नाही, तर शस्त्रास्त्रे आणि सेक्सची देखील धडाक्यात विक्री होते. आणि हेच सगळे खणून काढायला आम्हाला तुमची मदत हवी आहे."
मला ह्याचा अंदाज होताच, त्यामुळे मॅडम बोलेपर्यंत मी माझे उत्तर मनात तयार करायला सुरुवात केली होतीच. त्यांचे बोलणे होताच मी चेहऱ्यावरती गोंधळाचे भाव आणत बोलायला सुरुवात केली, "तुम्ही काय म्हणताय माझ्या अजून लक्षात येत नाहीये. हे सर्व इंटरनेटशी संबंधीत आहे हे कळले पण ह्यात मी काय मदत करणार? कुठला तरी आयपी ट्रेस कर, नायजेरियन फ्रॉड विरुद्ध थोडीफार मदत कर येवढ्यापुरतीच माझी मर्यादा आहे."
"पण पॅपिलॉनकडे अमर्याद ताकद आहे... नाही?" कश्यप साहेब खाडकन बोलले आणि मी चांगलाच सटपटलो. "प्रसाद तुझी सगळी कुंडली मी त्यांना सांगितली आहे. हे बघ, हा प्रश्न तुला वाटतो त्यापेक्षा खूप वेगळा आहे. ह्या सर्व व्यवसायातून मिळणारा पैसा हा अतिरेकी संघटनांकडे रवाना होतो आणि तो भारता विरुद्ध वापरला जातो अशी आमची पक्की खात्री झाली आहे. हे रॅकेट लवकरात लवकर उद्ध्वस्त व्हायलाच हवे. मागच्या महिन्यात फेसबुकवरती कोणालातरी 'झेंडे फडकवण्यापेक्षा देशासाठी काहीतरी करा!' अशी अक्कल शिकवत होतास ना? मग आता तुझ्यासाठी ती वेळ आली आहे, पाठ दाखवू नकोस."
"मला नाही वाटत मला ह्यात काही करता येईल. काका, तुम्हाला तर माहिती आहे, हे सगळे सोडून मला आता एक मोठा काळ उलटला आहे. तंत्र बदलली आहेत, रस्ते बदलले आहेत, नवे नवे ज्ञानी इथे रोज बस्तान बसवत आहेत. मी कसा ह्या सगळ्यातून मार्ग काढणार आहे?"
"उगाच आता कारणे शोधत बसू नकोस. ह्या सगळ्याबद्दल तुला आधी कितपत माहिती आहे ते सांग" कसाळकरांनी दम हाणला.
"माहिती म्हणाल, तर मी तुमच्यापुढे १०० पावले आहे." मी हसून म्हणालो. कसाळकर आणि रीटा मॅडम अविश्वासाने, तर कश्यप 'मला खात्री होती ह्या डांबीस माणसाला थोडी फार माहिती असणारच' अशा कौतुकाने बघायला लागले.
"तुम्ही आम्ही ईमेल, फेसबुक, गूगल अशा अनेक सेवांचा लाभ घेत असतो. आपण ज्याला इंटरनेट म्हणून ओळखतो, त्या व्यासपीठावरती हे सगळे उपलब्ध असते. पण तुम्ही आम्ही ज्याला इंटरनेट म्हणून ओळखतो, त्याच्यापेक्षा तिप्पट मोठे असे एक अजून इंटरनेट अस्तित्वात आहे, ज्याला 'ब्लॅक वेब' अथवा 'डिप वेब' नावाने ओळखले जाते. आपल्या नेहमीच्या ब्राउझर्सनी ना ह्या जगात प्रवेश करता येतो, ना काही सर्फ करता येते. ह्या जगातल्या प्रवेशासाठी ब्राउझर्स पण तेवढीच खास लागतात, जसा की टॉर ब्राउझर. जगातली सगळ्यात जास्ती अनाधिकृत मालाच्या खरेदीची व्हर्च्युअल दुकाने तुम्हाला इथेच आढळतील. ड्रग्ज, शस्त्रास्त्रे, चोरलेली क्रेडिट कार्डस आणि सेक्स सर्व्हिस देखील. इथले व्यवहार चालतात ते बिटकॉईन आणि व्हर्च्युअल मनीच्या आधारे..." मी नकळत बोलायला देखील सुरुवात केली.
************************
(क्रमश:)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
भन्नाट सुरुवात.
वाचत आहे .आता नवीन भाग लवकर
वाह
हॅकर्स अंडरग्राउंड???
हो
पुढील भागाच्या प्रतिक्षेत
जबराट सुरूवात! लई दिवसांनी
पहिल्याच चेंडूवर षटकार. पुढचे
आमचा
हायला प.रा.....
डार्कनेट मिपावर ? क्या बात हय
जबरदस्त सुरुवात!!!
चांगल इंटरेस्टिंग वाचायला
लिव्हा लिव्हा.
वाचतोय. सविस्तर प्रतिक्रिया
परा परा परा.. वेलकम बॅक..
सावधानता बाळगा
पुढचं लिहिलं तर प्रतिक्रिया
हा हा हा
पुढचं लिहिलं तर प्रतिक्रिया देण्यात येईल.एकदम बरोबर.सुरेख
सरसकट नकोच.
सहमत.
असं म्हणा की 'मिपावर ही क्रमशः लिहून पुढील भाग न टाकणार्यांना झोडलं पाहिजे एकदा.१००% सहमत.=)) च्यायला... उगाच मधल्या
अगदी खरं!
अगदी अगदी.
कोण माती? धन्यवाद.
;)
पुभाप्र
मस्त सुरुवात
खरा अनुभव आहे का?
बाकी हो समजा मी अशी साइट
आलात?
पुढचा भाग टाक लवकर.
आधी प्रतिसाद द्यायचा राहून
सुरुवात छान केलीय.
पुभाप्र
पावडर कथेला विलंब