Skip to main content

मी हिंदू आहे म्हणजे नक्की काय आणि कोण आहे? आपल्या हिंदू धर्माचे मुख्य प्रतिनिधी नक्की कोण?

लेखक राजेश कुलकर्णी यांनी शुक्रवार, 20/11/2015 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
मी हिंदू आहे म्हणजे नक्की काय आणि कोण आहे? आपल्या हिंदू धर्माचे मुख्य प्रतिनिधी नक्की कोण? इतर धर्मातील (उदा. बौद्ध, जैन, ख्रिस्ती, मुस्लीम, शीख, बहाई, पारशी) लोकांना त्यांच्या धर्माशी संबंधीत वरील प्रश्नाचे उत्तर देण्यात फार अडचण यायला नको. किंबहुना काही धर्मात थोडीफार तशी परिस्थिती असली तरी त्याचा येथे संबंध लावायला नको. हिंदूंना मात्र लहानपणापासून याबाबतीत स्पष्ट मार्गदर्शन केले जात नाही. मी आतापर्यंत अनेकांना याबाबत विचारलेले आहे. त्यात १) काय फरक पडतो, २) मी द्वैतवाद वा अद्वैतवाद मानतो, ३) मी भगवद्गीता या ग्रंथाचा पूजक, ४) फार तर भगवद्गीतेबरोबर रामायण हाही माझा धर्मग्रंथ, ५) या भूमीत रुजलेला आणि वाढलेला सनातन धर्म, ६) हिंदू धर्माची व्याख्या करता येत नाही यातच त्याचे महानपण-वेगळेपण वगैरे आहे, ७) मी सर्वांना समान मानतो, ८) हिंदुत्व हा धर्म नसून ती एक जीवनशैली आहे अशी विविध उत्तरे मिळतात. अशा मोघम उत्तरांमुळे कोणाही जिज्ञासू व्यक्तीचे समाधान होणे शक्य नाही. उलट असे प्रश्न विचारून धार्मिक बाबतीतील तज्ज्ञ म्हणवणा-या सदर व्यक्ती त्यांना अडचणीत आणणारे प्रश्न विचारले म्हणून नंतर फटकून वागतात किंवा भेटायचे टाळतात. अशा परिस्थितीत येणा-या पिढ्यांना हिंदुत्वाबद्दल अनास्था वाटेल अशी परिस्थिती निर्माण होईल असे वाटत नाही का? वरील मांडणीत जातीव्यवस्थेला (ज्याचे चातुर्वर्ण्य हे गोंडस नाव आजही वापरले जाते आणि क्वचित त्याचे समर्थनही केले जाते) कोठे स्थान आहे याचा सहसा कोणालाच पत्ता लागत नाही. सर्व शंकराचार्यांनी मिळून चातुर्वर्ण्य पद्धत मोडीत काढलेली आहे हे मात्र मधूनमधून ऐकू येते. पुढचा प्रश्न: हिंदू धर्माचे प्रतिनिधी नक्की कोण? शंकराचार्य म्हणावेत तर अतिशय कर्मठ अशी त्यांची प्रतिमा, सामान्य जनतेशी संपर्क शून्य, त्यातही अनेक पीठे आणि श्रेष्ठत्वावरून त्यांच्यामध्येच मधूनमधून होणारे वाद. हे प्रतिनिधी हिंदू समाजातील कोणत्या घटकांचे प्रतिनिधित्व करतात? त्यांच्यात दलित समाजाचे प्रतिनिधित्व करणारा एक जण तरी आहे का? की आरक्षण लागू नसल्यामुळे तेथेही फक्त उच्चवर्णीयांचे वर्चस्व आहे? आणि त्यामुळे समाजातील हे अनेक मोठे घटक या धर्मात सामावलेलेच नाही? कोणाला प्रश्न पडेल निश्चितपणे कोण प्रतिनिधी आहे हे सामान्य हिंदू व्यक्तीला माहीत नसले तर काय फरक पडतो? तर फरक पडतो. हे आजवर कोणाच्या लक्षात आले नाही का? की विविध कारणांनी ‘जैसे थे’ परिस्थिती लादली गेली? जातीपातीमुळे संपूर्ण हिंदू समाज मुळात यांचे प्रतिनिधित्व नाकारतो हे कारण आहे का? धर्माचा इतक्या सहस्त्रकांचा डोलारा केवळ त्याच्या जडत्वामुळे (inertia) चालू आहे का अशी शंका यामुळे वाटते. फरक का पडतो? १) प्रतिनिधित्वाची भूमिका स्पष्ट नसल्यामुळे विविध बाबा-बुवा-महाराज यांचे फावते. प्रसंगी ते विविध अवतार अहेत म्हणून कमकुवत मनाच्या लोकांना आपल्या कच्छपी लावतात. हा प्रकार कल्पनेच्याही बाहेर बोकाळलेला आहे. २) हिंदू धर्मात अनेक पंथ असल्यामुळे विस्कळीतपणा आणखी वाढतो. लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात आहे. तर आम्हाला हिंदू धर्मातून वगळा ही या समाजातील काहींची मागणी मधूनमधून वृत्तपत्रात दिसते. ३) शीख, बौद्ध धर्मीय हेदेखील हिंदूधर्मीयच आहेत असे हिंदू त्या धर्मांच्या पोटच्या जिव्हाळ्यामुळे म्हणतात. परंतु या धर्मांची याबाबतची प्रत्यक्ष भूमिका वेगळी असते. ४) तेहेतीस कोटी देव ही संकल्पनाच मुळात चुकीची आहे असे अनेकदा ऐकतो. कित्येकदा कृष्णाच्या राधा वा गोपींबरोबरच्या शृंगाराचे वर्णन तिखटमीठ लावून सांगितले जाते तर तसे काही नव्हतेच असेही म्हटले जाते. कोणतीच सुसुत्रता नसल्यामुळे धर्म बदनाम होतो, चुकीच्या संकल्पना बोकाळतात. ५) हिंदूह्रदयसम्राट अथवा हिंदू या शब्दाचा समावेश असलेली तत्सम बिरूदे लावून घेऊन काही स्वयंघोषित नेते लोकांचा मानसिक गोंधळ वाढवतात. त्यांचे वा त्याच्या संघटनेचे अनेकदा होत असलेले धर्मविरोधी, झुंडशाहीचे आणि गुन्हेगारी स्वरूपाचे वर्तन पाहून हाच तो हिंदू धर्म का असा काहींचा समज होतो आणि हिंदू धर्माची त्यामुळे बदनामी होते. त्यात काही राजकीय लोकदेखील सामील असल्यामुळे अर्थातच राजकीय कारणांसाठी त्याचा वापर केला जातो. ६) राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या प्रमुख संघटना हिंदूंच्या हिताचे रक्षण करण्याचा दावा करतात. परंतु ती काही धार्मिक संघटना नाही. त्यामुळे त्यांना मोठाच राजकीय विरोध होत असल्यामुळे धर्माच्या पातळीवर हिंदू समाज विभागला जातो. विभिन्न राजकीय विचारसारणी असण्यात काहीच गैर नाही, परंतु त्यामुळे एकाच धर्मातील लोकांचे धृवीकरण होणे योग्य नाही, किंबहुना धर्मासाठी ते धोक्याचे आहे. ७) भगव्या रंगाचा ध्वज वापरून काही राजकीय संघटना/पक्ष लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. भगव्या रंगाचे कपडे घातलेले काही जण वारंवार वादग्रस्त विधाने करतात, त्यामुळे देशातील धार्मिक तेढ वाढते आणि देशाची प्रगती खुंटते.हे लोक खरोखरच हिंदूंचे प्रतिनिधित्व करतात का हे त्यामुळे शोधणे आवश्यक आहे. ८) अगदी अलीकडेच चालू झालेल्या गुढी उभारण्याच्या पद्धतीला धार्मिक स्वरूप देऊन त्याचेही शास्त्र निर्माण करण्यात येते आणि त्यामुळे भोंदूपणा वाढतो. अशा कितीतरी गोष्टी दाखवता येतील. ९) हिंदू धर्मियांमध्येच एकमेकांचा जातीय आणि जातीच्या आधारावरील तुच्छतेने सतत केला जाणारा उल्लेख एके दिवशी कोणते रूद्र रूप धारण करेल याचा नेम नाही. याबाबतील कितीही कायदे केले तरी धार्मिक आणि सामाजिक पातळीवर लोकांची मानसिकता बदलेपर्यंत हा बदल होणे शक्यच नाही. हा धोका असताना दुसरीकडे मात्र धार्मिक पातळीवर याची जबाबदारी कोण घेणार हेच निश्चित करता येत नाही. १०) कोणतीच सुसुत्रता नसलयामुळे आपापल्या जातीपुरत्या संघटना निर्माण केल्या जाऊन धर्म सोयिस्करपणे वा-यावर सोडला जातो. यात जातीय कट्टरपणा वाढीला लागतो हे वेगळे सांगायची गरज नाही. ११) मी वर उल्लेख केल्याप्रमाणे समाजातील विविध घटकांना या प्रतिनिधींमध्ये समाविष्ट केलेच गेलेले नसेल तर आगामी काळात धर्मालाच त्यापासून मोठा धोका निर्माण होऊ शकेल. १२) कोणी हिंदू धर्मातील प्रथांना विरोध करायला गेले तर ते काय सांगतात – का सांगतात, याकडे लक्ष देण्याऐवजी त्यांना इतर धर्मातील विसंगती दाखवण्याची त्यांची हिंमत आहे का असे म्हणून त्यांच्या भुमिकेवर धर्मविरोधी असा ठप्पा मारण्यात येतो. धार्मिक पातळीवर या गोष्टींचा योग्य त्या प्रतिनिधीकडून या बाबतीत काही निर्णय घेता आले तर कितीतरी गोष्टी संघर्षाच्या थराला जाणारच नाहीत. यामुळे समाजातील सौहार्द्रता वाढेल हे सांगायची गरज नाही. १३) धर्माच्या प्रतिनिधित्वाबाबत काहीत निश्चित नसल्यामुळे विविध जातींमधील विविध पातळीवरील राजकीय नेतेच या जातींचे प्रतिनिधित्व करत असल्याचे दाखवून त्यावर आपली राजकीय पोळी भाजून घेतात. अलीकडे जातींच्या आधारावर मागितली जाणारी आरछणे त्यांपैकीच एक. धर्माच्या प्रतिनिधित्वाची संकल्पना निश्चित झाली तर अशा संधीसाधूंना आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे सतत गढूळ होणा-या सामाजिक वातावणाला पायबंद बसेल. १४) आज देशातील मोठी लोकसंख्या धार्मिक जाणीवेच्या बाबतीत खरे तर निद्रिस्त आहे. मग ते सुशिक्षित वा अशिक्षित असोत वा गरीब असो. कारण रोजच्या जीवनसंघर्षातून त्यांना या गोष्टींचा विचार करायला वेळ नाही. पण यातील काही टक्के लोक तरी या गोष्टींचा डोळसपणे विचार करू लागले तर मोठी कठीण परिस्थिती उद्भवेल. आणखी शोधल्यास अशी अनेक कारणे आढळतील. असे झाले तर धर्माचे प्रतिनिधी एक प्रकारचा माफिया निर्माण करतील अथवा आचार-विचार स्वातंत्र्यावर गदा येईल असा समज करून घेण्याचे कारण नाही, कारण देशाची घटना, कायदे यांना यापासून धोका पोहोचणारच नाही. कोणाला या बाबी गांभिर्याने घेणे गरजेचे आहे असे वाटत असेल तर त्यांनी यात जरूर भाग घ्यावा. फक्त त्यात जातीय/धार्मिक आवेश नको. कारण त्यामुळे चांगली चर्चा होऊ शकणार नाही आणि त्याला भलतेच वळण लागेल. शिवाय ज्यांना यातली तळमळ दिसते त्यांनी त्यांच्या परीने विविध पातळींवर या विषय न्यायलादेखील माझी काहीच हरकत नाही. मला याची निकड वाटते. कारण या घडीला मी हिंदू आहे म्हणजे नक्की कोण व काय आहे हे मला सांगता येत नाही. कारण या बाबतीतली स्पष्टताच नाही. मग मी मला हिंदू का म्हणवून घ्यावे? एकविसाव्या शतकात याबाबतीत मोघमपणा परवडणार नाही. कारण वर उल्लेख केलेले धर्माच्या व देशाच्या एकतेला, सामाजिक सौहार्द्रतेला याबाबतच्या अनिश्चिततेमुळे त्यामुळे निर्माण होऊ शकणारे धोके. होऊ शकणारे काय, ते तर आपण रोजच पाहत आहोत. ही पोस्ट चकाट्या पिटणा-यांसाठी नाही. तशी सवय असणा-यांच्या कमेंट्ना उत्तर देण्याची तसदी घेतली जाणार नाही. गांभिर्याने चर्चा करण्याची इच्छा असलेल्यांचे स्वागत व आगाऊ धन्यवाद.

वाचने 28358
प्रतिक्रिया 92

प्रतिक्रिया

खरंतर हिंदू हे चूक, आपला धर्म आहे सिंधू. सिंधू तीरावरी ...वै. काय म्हणता सिंधू पाकिस्तानात आहे ? स्वारी मंग चालू ठीवा हिंदू हिंदू म्हणून... नैतर कट्टर लोक्काना सिंधूस्नान करावे लागेल, गंगास्नान मग दुय्यम ठरेल.

स्वत:ला आणि ईश्वराला जाणून घेण्याची स्वतंत्रता ज्या धर्मात आहे, तो हिंदू धर्म. याच मुळे धार्मिक सहिष्णुता टिकलेली आहे. धर्म हि संकल्पना 'विशिष्ट पूजा पद्धतीवर' आधारित नाही आहे म्हणून काही लोकांना भ्रम होतो. 'विशिष्ट पूजा' पद्धती वर आधारित धर्म आपलीच पूजा पद्धती श्रेष्ठ आणि सर्वांची त्याचे पालन करावे हि अपेक्षा करतात. या वरून अत्यंत हिंसक असे संघर्ष होतात.

माननीय श्री राजेश कुलकर्णी . आपल्याला या धाग्यात्तून नक्की काय सुचवायचे आहे अथवा प्रश्न आहेत ते आकडे टाकून लिहा . चर्चा करु. लेख टाकून लोक तुमच्या लेखाची टरच उडवणार हे धोरण का स्वीकारले ?

In reply to by सुज्ञ

प्रश्न स्पष्टपणे विचारलेलेच आहेत. पहिला भाग: मी हिंदू आहे म्हणजे काय आहे? दुसरा भाग: हिंदू धर्माचे प्रतिनिधी कोण> मला यात भगवे घालणारेच प्रतिनिधी असावेत हे अध्याह्ृत नाही. तिसरा भाग: वरील प्रश्नांची नीट उकल करणे का आवश्यक आहे? तसे न केल्यामुळे काय फरक पडू शकतो, कोणते प्रश्न निर्माण होऊ शकतात. लेख टाकून सारेच टर उडवतील असे मला वाटत नाही. तशी अपेक्षाही नाही.

राकु, एक सल्ला http://www.misalpav.com/node/33755 कालचा हा लेख जरूर वाचा. असे वाटते आहे, की तुम्हाला तुमची अपेक्षित उत्तरे मिळतील.

कुठल्याही प्रश्नाला एकच एक उत्तर असते किंवा असले पाहिजे असा आग्रह सोडल्यास प्रश्नाच्या गाभ्याचे आकलन होण्यास मदत होते.कृष्ण धवल द्वैतात अडकलात की लुप मधे गेलाच म्हणून समजा. असो. मिपाच्या सुरवातीच्या काळात यावर अनुषंगिक बरच यावर लिहिल असल्याने आता कंटाळा येतो. नवनवीन आयडी येत राहतात किती वेळा तेच तेच लिहिणार.

In reply to by प्रकाश घाटपांडे

नवीन आयडी, जुन्याच चर्चा यावर काहीतरी नक्की करता येईल. म्हणजे होत काय की नवीन आयडी पण जुन्याच मुद्द्यांना इथे मांडत राहिले तर रस राहणार नाही. तेव्हा जुन्या चर्चा-धाग्यांमधे त्यांनी पूर्ण वाचन करून नवे मुद्दे मांडले तर मजा येईल. किंवा आपण विचार करतो ते मुद्दे आधीच मांडलेत हे पाहुन नवा आयडी कदाचित तेच ते लिहिणार नाही. काहीतरी विधायक मार्ग काढायला पाहिजे.

आता डी डी एल जे चा सिक्वेल येतो आहे म्हणे. म्हातारा शाहरुख आणि कजोल बघायाला मजा नाही यायची. स्पेक्ट्रे मध्ये मोनिका बेलुच्ची आहे. ५१ वर्षाची. काय सुंदर दिसते अजुन. वयाचा विचार न करता भूमिकेचा विचार करुन अभिनेत्रींना चित्रपटात स्थान देणार्‍या हॉलीवूडला मानाचा मुजरा. पाकिस्तानात मुजरे जोरात चालतात म्हणे. पण मुजरा या मूळ शालीन नृत्यप्रकाराची त्यांनी सध्या विटंबना चालवली आहे. तमाशा चालू आहे नुसता. तमाशावरुन आठवले. मिपावर तरी वेगळे काय होते म्हणा आजकाल? नाव बदलुन चौफुलाव.कॉम का करु नये म्हणतो मी?

या जगात एकच जात आहे - माणुस ! आणि धर्मही एकच - माणुसकी !

मी हिंदू आहे म्हणजे नक्की काय आणि कोण आहे ?
या प्रश्नाचे उत्तर कोणी सहज देऊन जाइल असे वाटत नाही कारण बहुतांश लोकांना मी हिंदु आहे म्हणजे अमुक जातीचा आहे यापलीकडे काहीच विषेश जाण नसते. अन ज्यांना ती असते ते याला अध्यात्मीक बाब ठरवतात धार्मीक नाही. म्हणजे ती जाणीव/ज्ञान फक्त हिंदुत्वापुरती मर्यादीत ते मानत नाहीत.
आपल्या हिंदू धर्माचे मुख्य प्रतिनिधी नक्की कोण?
जिवंत की मृत ?

● "हिंदू" या नावाबद्दल दोन प्रकारची मते आहेत. 1)सिंधू नदीच्या पलीकडे राहणारे(फारश्यांना 'स'च्या जागी'ह' करायची सवय आहे.) 2)फारसी काय अरबी ते माहित नाही,पण त्यांच्या शब्दकोशात म्हणे हिंदू शब्दाचा अर्थ दास/तुच्छ/ चोर/गुलाम/काफिर असा काहितरी आहे. ● मी हिंदू आहे म्हणजे नक्की कोण आहे? या प्रश्नाचे उत्तर एकदम सोपे आहे.इतर धर्मीयांच्या दृष्टीने तुम्ही 'हिंदू' नामक कंपूतील एक व्यक्ती आहात.तुमच्या दृष्टीने तुम्ही कोण आहात? याचे उत्तर तुम्हीच देऊ शकाल. ● आपल्या हिंदू धर्माचे प्रतिनिधी कोण? 1) एक प्रतिनिधी असतो असं काही नाहीये मुळी. ज्याची विचारधारा पटते किंवा लोक ज्याच्याकडे आकर्षिले जातात किंवा ज्याची आदरयुक्त भिती वाटते अश्या व्यक्ती इतरांना पूज्य असतात. 2) बुवा/महाराज, भोंदू फोफावले आहेत हे खरे आहे,त्यामुळे आपणच स्वतःचे प्रतिनिधी आहोत (तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार) ● माझ्या अल्प ज्ञानानुसार सत्य हे आहे कि आपण म्हणजे हा देह नाही मी म्हणजे 'आत्मा' आहे आणि या आत्म्याचे ध्येय एकच आहे ते म्हणजे परमात्म्याशी एकरूप होणे किंवा त्याला जाणणे.आणि हा परमात्मा म्हणजेच सर्वशक्तिमान ईश्वर.तो निराकार आहे,ब्रह्मा विष्णु महेश या कल्पना आहेत.किंवा ही थोर माणसे असतील कदाचित,राम कृष्णाचेही तेच.ही थोर माणसे होऊन गेली ज्यांना परमात्म्याची अनुभूती होती. . . . . आज एवढेच आणखी माहिती हवी असेल तर पुढच्या प्रतिक्रियेत.

त्रयो वेदश्च कर्तारो धूर्त भंड निशाचरो. ( चौथा वेद का सोडला ?

राजेश कुलकर्णी, तुमच्या प्रश्नांची यथामती उत्तरं देतो. या उत्तरांनी माझं समाधान होतं. ही मीच स्वत:साठी शोधली आहेत. माझी उत्तरं ज्याला रुचणार नाहीत त्यांनी कृपया स्वत:ची स्वत:च शोधावीत असा माझा आग्रह आहे. कारण प्रत्यक्ष उत्तरांपेक्षा शोधप्रक्रिया जास्त महत्त्वाची आणि रंजक आहे. १. >> मी हिंदू आहे म्हणजे नक्की काय आणि कोण आहे? माझ्या मते मी हिंदू आहे कारण मी वैदिक परंपरा मानतो. वैदिक परंपरेत अनेक विधाने व महावाक्ये आहेत. त्यातले मला सर्वात अभिनव वाटणारे वाक्य म्हणजे 'एको सत् विप्रा: बहुधा वदन्ति'. अर्थ उघड आहे. सत्य एकंच असून त्याची रूपं मात्र अनेक असतात. जे हिंदू मानतात त्यांची या एकसत्यवचनावर निष्ठा असते. २. >> आपल्या हिंदू धर्माचे मुख्य प्रतिनिधी नक्की कोण? माझ्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा प्रतिनिधी मी स्वत:च आहे. असो. आता तुमच्या शंकांवर यथामती भाष्य करतो. १. >> १) प्रतिनिधित्वाची भूमिका स्पष्ट नसल्यामुळे विविध बाबा-बुवा-महाराज यांचे फावते. इंग्लंडमध्ये (जिथे मी राहतो) ख्रिस्ती प्रतिनिधित्वाची भूमिका सुस्पष्ट असूनही सायकिक बुवाबाजी भरपूर चालते. बुवाबाजीचा धार्मिक वा सांप्रदायिक प्रतिनिधीत्वाशी काडीमात्र संबंध नाही. मात्र असं प्रतिनिधित्व निश्चित झालेलं बरं असतं. २. >> २) हिंदू धर्मात अनेक पंथ असल्यामुळे विस्कळीतपणा आणखी वाढतो. लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात आहे. >> तर आम्हाला हिंदू धर्मातून वगळा ही या समाजातील काहींची मागणी मधूनमधून वृत्तपत्रात दिसते. इस्लाम व ख्रिस्ती धर्मात अनेक पंथ असल्याने त्यांतही विस्कळीतपणा आहे. ३. >> ३) शीख, बौद्ध धर्मीय हेदेखील हिंदूधर्मीयच आहेत असे हिंदू त्या धर्मांच्या पोटच्या जिव्हाळ्यामुळे म्हणतात. >> परंतु या धर्मांची याबाबतची प्रत्यक्ष भूमिका वेगळी असते. असं असलं वा नसलं तरीही हे पंथ वेदप्रामाण्य आणि कर्मसिद्धांत मानणारे आहेत. ४. >> ४) .... कोणतीच सुसुत्रता नसल्यामुळे धर्म बदनाम होतो, चुकीच्या संकल्पना बोकाळतात. संत एकनाथांनी ज्ञानेश्वरीतले प्रक्षेप दूर करून मूळ प्रत सिद्ध केली. धर्माच्या शुद्धीचे कार्य अखंड चालू आहे. गोपींचा शृंगार मूळ महाभारतात नाही. पण कोणाला तो कल्पून काव्ये लिहावीशी वाटली तर बंदी नाही. ५. >> ५) हिंदूह्रदयसम्राट अथवा हिंदू या शब्दाचा समावेश असलेली तत्सम बिरूदे लावून घेऊन काही स्वयंघोषित >> नेते लोकांचा मानसिक गोंधळ वाढवतात. लोकांचा गोंधळ का वाढतो ते माहीत नाही. माझा मात्र गोंधळ कधीच झाला नाही. ५.२ >> त्यांचे वा त्याच्या संघटनेचे अनेकदा होत असलेले धर्मविरोधी, झुंडशाहीचे आणि गुन्हेगारी स्वरूपाचे वर्तन पाहून >> हाच तो हिंदू धर्म का असा काहींचा समज होतो आणि हिंदू धर्माची त्यामुळे बदनामी होते. सहमत. आज स्वत:ला कट्टर हिंदू म्हणवून घेणाऱ्यांना हिंदू धर्माची म्हणजे वैदिक परंपरेची मूलभूत माहितीदेखील नसते. ५.३ >> त्यात काही राजकीय लोकदेखील सामील असल्यामुळे अर्थातच राजकीय कारणांसाठी त्याचा वापर केला जातो. सहमत. ६. >> ६) .... धर्माच्या पातळीवर हिंदू समाज विभागला जातो. विभिन्न राजकीय विचारसारणी असण्यात काहीच गैर नाही, >> परंतु त्यामुळे एकाच धर्मातील लोकांचे धृवीकरण होणे योग्य नाही, .... हिंदूंचं ध्रुवीकरण होतंय की विभाजन? ७. >> ७) भगव्या रंगाचा ध्वज वापरून काही राजकीय संघटना/पक्ष लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. >> भगव्या रंगाचे कपडे घातलेले काही जण वारंवार वादग्रस्त विधाने करतात, त्यामुळे देशातील धार्मिक तेढ वाढते >> आणि देशाची प्रगती खुंटते.हे लोक खरोखरच हिंदूंचे प्रतिनिधित्व करतात का हे त्यामुळे शोधणे आवश्यक आहे. बरोबर आहे. ८. >> ८) अगदी अलीकडेच चालू झालेल्या गुढी उभारण्याच्या पद्धतीला धार्मिक स्वरूप देऊन त्याचेही शास्त्र निर्माण >> करण्यात येते आणि त्यामुळे भोंदूपणा वाढतो. अशा कितीतरी गोष्टी दाखवता येतील. रामायणकाळापासून गुढी उभारण्याचा प्रघात आहे. तो अलीकडेच सुरू झालेला नाही. शिवाय गुढी उभारल्याने भोंदूपणा वाढल्याचा पुरावा नाही. ९. >> ९) हिंदू धर्मियांमध्येच एकमेकांचा जातीय आणि जातीच्या आधारावरील तुच्छतेने सतत केला जाणारा उल्लेख एके >> दिवशी कोणते रूद्र रूप धारण करेल याचा नेम नाही. याबाबतील कितीही कायदे केले तरी धार्मिक आणि सामाजिक >> पातळीवर लोकांची मानसिकता बदलेपर्यंत हा बदल होणे शक्यच नाही. ब्रिगेडी संघटना असं करतात. म्हणून त्यांना चाप लावायला हवा. ९.२ >> हा धोका असताना दुसरीकडे मात्र धार्मिक पातळीवर याची जबाबदारी कोण घेणार हेच निश्चित करता येत नाही. धार्मिक पातळीवर याची जबाबदारी मी घेतली आहे. मी धर्मानुसार आचरण करून ब्रिगेड्यांचा विरोध करायचं ठरवलं आहे. या बाबतीत माझा आदर्श विवेकानंद आहेत. १०. >> १०) कोणतीच सुसुत्रता नसलयामुळे आपापल्या जातीपुरत्या संघटना निर्माण केल्या जाऊन धर्म सोयिस्करपणे >> वा-यावर सोडला जातो. यात जातीय कट्टरपणा वाढीला लागतो हे वेगळे सांगायची गरज नाही. सहमत. ११. >> ११) मी वर उल्लेख केल्याप्रमाणे समाजातील विविध घटकांना या प्रतिनिधींमध्ये समाविष्ट केलेच गेलेले नसेल >> तर आगामी काळात धर्मालाच त्यापासून मोठा धोका निर्माण होऊ शकेल. संभव आहे. मात्र हे प्रतिनिधी कसले ते कृपया स्पष्ट करावे. १२. >> १२) कोणी हिंदू धर्मातील प्रथांना विरोध करायला गेले तर ते काय सांगतात – का सांगतात, याकडे लक्ष देण्याऐवजी >> त्यांना इतर धर्मातील विसंगती दाखवण्याची त्यांची हिंमत आहे का असे म्हणून त्यांच्या भुमिकेवर धर्मविरोधी असा >> ठप्पा मारण्यात येतो. धार्मिक पातळीवर या गोष्टींचा योग्य त्या प्रतिनिधीकडून या बाबतीत काही निर्णय घेता आले >> तर कितीतरी गोष्टी संघर्षाच्या थराला जाणारच नाहीत. यामुळे समाजातील सौहार्द्रता वाढेल हे सांगायची गरज नाही. सहमत. मात्र अनाठायी प्रथांना विरोध करणाऱ्यांनी त्यांचं उद्दिष्ट सरळपणे मांडावं. उगीच पर्यावरण वा स्त्रीपुरुष समानता वगैरे मुद्दे मध्ये आणू नयेत. १३. >> १३) धर्माच्या प्रतिनिधित्वाबाबत काहीत निश्चित नसल्यामुळे विविध जातींमधील विविध पातळीवरील राजकीय >> नेतेच या जातींचे प्रतिनिधित्व करत असल्याचे दाखवून त्यावर आपली राजकीय पोळी भाजून घेतात. अलीकडे >> जातींच्या आधारावर मागितली जाणारी आरछणे त्यांपैकीच एक. धर्माच्या प्रतिनिधित्वाची संकल्पना निश्चित झाली >> तर अशा संधीसाधूंना आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे सतत गढूळ होणा-या सामाजिक वातावणाला पायबंद बसेल. सहमत. म्हणूनच शंकराचार्य हे संबोधन वाट्टेल त्याला मिळू नये. आद्य शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या चार मठांच्या पीठाधीशांनाच केवळ शंकराचार्य म्हणण्यात यावं. १४. >> १४) आज देशातील मोठी लोकसंख्या धार्मिक जाणीवेच्या बाबतीत खरे तर निद्रिस्त आहे. मग ते सुशिक्षित वा >> अशिक्षित असोत वा गरीब असो. कारण रोजच्या जीवनसंघर्षातून त्यांना या गोष्टींचा विचार करायला वेळ नाही. >> पण यातील काही टक्के लोक तरी या गोष्टींचा डोळसपणे विचार करू लागले तर मोठी कठीण परिस्थिती उद्भवेल. असहमत. डोळसपणे विचार केल्यावर कठीण परिस्थिती उद्भवायला नको. ------------------------------------ असो. तुमच्या विचारांवर जसे जमेल तसे भाष्य केले आहे. काही त्रुटी असल्यास कृपया निदर्शनास आणाव्यात. आ.न., -गा.पै.

मी हिंदू आहे म्हणजे नक्की काय आणि कोण आहे?
अस्तित्वाप्रति जिज्ञासेवर आधारीत एका पुरातन जीवनपद्धतीचे फॉलोवर असणे म्हणजे हिंदु असणे.
आपल्या हिंदू धर्माचे मुख्य प्रतिनिधी नक्की कोण?
तसं पाहिलं प्रत्येक व्यक्ती प्रतिनिधीच आहे. एरवी ज्यांचं म्हणणं पटतं असा कुणीही प्रतिनीधी बनतो.बर्‍याचशा इन्स्टीट्युट्स आपापली गटबाजी चालवतात.
हिंदूंना मात्र लहानपणापासून याबाबतीत स्पष्ट मार्गदर्शन केले जात नाही.
हे खरं आहे. आणि त्यामुळी काहि फायदा-नुकसान होतं का हा काहि लोकांसाठी संशोधनाचा विषय आहे.
वरील मांडणीत जातीव्यवस्थेला (ज्याचे चातुर्वर्ण्य हे गोंडस नाव आजही वापरले जाते आणि क्वचित त्याचे समर्थनही केले जाते) कोठे स्थान आहे याचा सहसा कोणालाच पत्ता लागत नाही. सर्व शंकराचार्यांनी मिळून चातुर्वर्ण्य पद्धत मोडीत काढलेली आहे हे मात्र मधूनमधून ऐकू येते.
जातिव्यवस्थेचं मूळ "डिव्हीजन ऑफ लेबर" मधे आहे. मध्ययुगाची सांगता होता होता मानवी जीवनाची जवळपास प्रत्येक बाब धर्मव्यवस्थेच्या आवरणात आलि. सद्य:स्थितीत जातीव्यवस्थेला सत्ताकारण जास्त इन्फ्लुएन्स करतय. १४ मुद्दे आवडले. एकदाका धर्माला व्यवस्थेचं रूप दिलं कि त्यात कुठल्याही इतर व्यवस्थेप्रमाणे अनेक डायनॅमिक्स येतात. ते टाळाता येत नाहि, व टाळणं योग्य पण नाहि.
मला याची निकड वाटते. कारण या घडीला मी हिंदू आहे म्हणजे नक्की कोण व काय आहे हे मला सांगता येत नाही. कारण या बाबतीतली स्पष्टताच नाही. मग मी मला हिंदू का म्हणवून घ्यावे?
'हिंदु' नामक आयडेण्टीटी तुम्हाला कुठे वापरायची आहे ? सकाळी उठुन उगाच स्वतःला हिंदु म्हणुन घ्यायची हौस असेल तर त्याला कुणी आडकाठी करणार नाहि. काहि साधना वगैरे करायची असेल तर त्याचे अनेक पर्याय आहेत. कुठल्या कागदपत्रात धर्म नमुद करायचा असेल तर तिथे कुणी सर्टीफिकेट मागत नाहि. इतर कुणाला तुमचं हिंदुत्वं सिद्ध करायचं असेल तर ते तसंही सरळ तुमच्या छातडात गोळ्या घालतात.
एकविसाव्या शतकात याबाबतीत मोघमपणा परवडणार नाही.कारण वर उल्लेख केलेले धर्माच्या व देशाच्या एकतेला, सामाजिक सौहार्द्रतेला याबाबतच्या अनिश्चिततेमुळे त्यामुळे निर्माण होऊ शकणारे धोके. होऊ शकणारे काय, ते तर आपण रोजच पाहत आहोत.
दुर्दैवाने हि समस्या उग्र होऊ शकते. पण त्यामागे माणासाची रक्तपिपासा आहे, हव्यास आहे. धर्माच्या परिभाषा कितीही दृढ करा, जे प्रॉब्लेम यायचे ते येणारच आहेत. कारण मूळ समस्या धर्माच्या मोघमपणाची नाहि तर माणासाच्या हावरटपणाची आहे. असो.