Skip to main content

नवा पाहुणा - शिक्रा (इंडियन स्पॅरो हॉक)

लेखक सर्वसाक्षी यांनी सोमवार, 16/11/2015 23:17 या दिवशी प्रकाशित केले.
गेले पाचेक महिने घरा मागच्या हिरवाईत पोपट वगळता सामसूम होती. उरली ती कावळ्यांची कावकाव. नतदृष्ट कावळ्यांनी आसपासच्या झाडात तीन चार घरटी बांधली आणि त्यांच्या उपद्रवाला कंटाळुन खंड्या, हळ्द्या, दयाळ, बुलबुल, कोतवाल, तांबट, नर्तक, सनबर्डस वगैरे मंडळी दूर गेली. पोपट मात्र कावळ्यांना पुरून उरत होते आणि धिटाईनं वावरत होते. हळुहळु कावळ्यांची पिल्लं बहुधा मोठी होउन उडू लागली असावीत कारण वावर जरा कमी झालेला दिसला. साधारण महिन्या दिड महिन्यापूर्वी अचानक या जुन्या पाहुण्यांची चाहुल लागली आणि आनंद झाला. रविवारी सकाळी चहा आणि वर्तमानपत्रांचा आस्वाद घेता घेता मधेच कठड्याशी जायचं, टेहळणी करायची, काही टिपण्याजोगं दिसलं तर कॅमेरा उचलायचा हा माझा नित्याचा उद्योग. अचानक लांबवर पसरलेल्या तारेवर खंड्या दिसला आणि मी खुष झालो. पाठोपाठ तांबटानं हजेरी लावली. एकदा कोतवालानं दर्शन दिलं. सनबर्ड, हळद्या यांचा वावर दिसला मात्र ते कॅमेर्‍याच्या पल्ल्यापलिकडे लांब होते. काल असाच रमत गमत तिसरा चहा घेता घेता कठड्यावर रेललो आणि समोर शेकटाच्या शेंड्यावर जरा खालच्या अंगाला एक करडा तपकिरी मोठा पक्षी दिसला. घाइघाईनं मी कॅमेरा उचलला. किरण साधताच त्या रुबाबदार पक्ष्याचं दर्शन झालं. हे प्रकरण शिकारी पक्ष्यांपैकी हे नक्की पण घार की ससाणा वर्गीय हे समजत नव्हतं. मात्र तो पक्षी - बहुधा पूर्ण वाढ न झालेलं ते पिल्लु फार देखणं आणि रुबाबदार होतं. एखाद्या राजाच्या रुबाबात तो पक्षी एका पायाच्या नख्यांनी फांदीची मजबूत पकड घेत दुसरा पाय फक्त पंजा समोर उभा धरुन आणि बाकी पाय पोटात घेउन अवलोकनात दंग होता. ताठ मान, बाकदार चोच, बळकट पिवळाधमक पंजा मऊसुत लालसर तपकिरी आणि पांढरी पिसं, पट्टेरी शेपूट आणि पाहणार्‍याची नजर खिळवुन ठेवणारे पिवळ्सर हिरवे डोळे. एखाद्या कमांडोच्या थाटात सावधपणे सर्वत्र नजर फिरवताना अधुन मधुन पंख किंचित बाहेर काढणं, पिसांत चोच खुपसणं चालु होतं. हे महाशय यायच्या आधी काही वेळापूर्वी त्याच झाडावर पोपट आपापल्या फांद्यांच्या टोकावर जागा धरुन बसले होते आणि एका फांदीच्या टोकावर बसलेल्या बुल्बुलाला सतावत होते. तो बुलबुल अखेर तिथुन उडाला. मग त्याच जागी तांबटाच पिल्लू आलं, त्याला हुसकुन झालं. मात्र हे महाशय अवतरले आणि पोपटांची बोलती बंद झाली. चाँक चाँक चीर्र्र असे आवाज करत बहुतेक पोपट उडाले. मग तो देखणा पक्षी शांतपणे बराच वेळ तिथे बसून होता. सर्व परिसराची पाहणी करुन झाली, पिसं साफ करुन झाली, पंख हलवुन झाले. सकाळ्पासून मंद असलेलं उन जरा प्रखर झालं, आणि शेकटाच्या छोट्याच्या फांदीनं जणु त्याच्या डोक्यावर छत्र धरलं आणि त्या कोवळ्या पानांच्या सावल्यांनी त्याच्या डोक्यावरच्या मूळच्या नक्षीत भर घातली. त्याची लहर फिरली तशी त्याने क्षणात पंख मोकळे केले आणि एक झेप घेत तो पलिकडच्या झाडाच्या दाट फांदीत सूर मारत तो गायब झाला. तो असेतो पर्यंत मी त्याच्या अधिकाधिक छबी टिपायचा प्रयत्न केला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 चित्रण झालं. मी आत वळणार इतक्यात मला वर उजवीकडे बसलेल्या मित्राची जाणीव झाली. तो बारीक नजरेनं माझ्यावर लक्ष्य ठेवून होता. बहुधा नवे पक्षी दिसल्यावर मी त्याला न टिपल्याचा त्याला राग आला असावा. 11
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 8658
प्रतिक्रिया 31

प्रतिक्रिया

माझ्या खिडकीत आणि तुमच्या खिडकीतलं अंतर फार तर पाचशे मिटरचं आहे पण मला अजून कावळेच दिसतायत.

चहाला या. पाखरं पाहु.

साधारण नोव्हेंबरापासून शिक्रा दिसू लागतो. छान फोटो मिळाले आहेत.मुख्य म्हणजे समोरून आहेत खालून /वरून नाहीत.याटाइपचे पक्षी ओळखण्यासाठी पोट आणि गळा, छातीवरच्या रेघा उभ्या/आडव्या कशा आहेत ते स्पष्ट दिसते आहे.

उन्हाचा ताव अगदी नेमका आहे त्यामुळे झगझगीतपणाने होणारा ग्लेअरचा त्रास चित्रात होत नाहीये. शांत सौम्य चित्रे आली आहेत. फार सुंदर! __/\__

जरब!! विलक्षण जरब शिस्त अन आवेश दिसतो ह्या नजरेत भूल पाडणारी नजर म्हणूनच कदाचित नौदलाच्या हेलीकॉप्टर तळाचे नाव ही सार्थपणे आईएनएस शिकरा ठेवले असावे काय?

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

अगोदर असलेल्या आय एन एस कुंजाली चे नंतर द्विभाजन झाले आणि शिक्रा आणि कुंजली असे दोन तळ निर्माण झाले. https://en.wikipedia.org/wiki/INS_Shikra http://indiannavy.nic.in/about-indian-navy/ins-kunjali

सुंदर छायाचित्रे. एकदा देवगिरीवर ह्या पक्ष्याचे छायाचित्र घेता आले होते. a

In reply to by मीता

हा नर शिक्रा आहे. सर्वसाक्षींच्या धाग्यातल्या फोटोत आहे ती बहुधा मादी आहे. नर शिक्रा किंवा अ‍ॅक्सिपिटर हा राखाडी रंगाचा असतो, तर मादी ही तपकिरी असते. ताम्हिणी अभयारण्यातल्या जंगलात एकदा नर व मादी शिक्रा जोडीने एका कबुतराचा पाठलाग करतानाचा थरार पाहायला मिळाला होता. ते कबुतर वाचले आणि शिक्राची जोडी हात चोळीत परत आली.

कसला रुबाबदार, देखणा पक्षी आहे!

मस्त फोटो! स्वाती

बीयुटीफुल.

आणि समर्पक वर्णन.. शुक (अगदी) शुक शुक केल्या सारखा पाहतोय !!!

धागानायकाची अदाकारी काय टिपली आहे. केवळ अप्रतिम.