Skip to main content

कट्यार - खरोखर काळजात घुसली

लेखक श्रीरंग यांनी गुरुवार, 12/11/2015 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
"सूर निरागस हो..." शंकर महादेवन यांच्या प्रसन्न स्वराने कट्यार चित्रपटाची सुरुवात होते.. आणि पुढील ३ तास ही सुरेल कथा अक्षरशः गुंतवून ठेवते. सुमारे पन्नास वर्षांपूर्वी पं. जीतेंद्र अभिषेकी, डॉ. वसंतराव देशपांडे, इत्यादी दिग्गजांनी अजरामर केलेल्या या कलाक्रुतीची मोहिनी आजही लोकांच्या मनावर कायम आहेच. सुबोध भावे सरख्या अत्यंत प्रतिभासंपन्न कलाकाराने, तितक्याच ताकदीच्या कलाकारांच्या साथीने, ही कथा चित्रपटरूपात आणून त्यांस अधिकच उंचावर नेऊन ठेवले आहे, असेच म्हणावे लागेल. ब्रिटिशांच्या अमलाखालिल हिंदुस्थानातील विश्रामपूर हे सर्व कलागुणांचा योग्य मानमरातब व कदर करण्यासाठी नावाजलेले संस्थान. सुरांचे अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळखले जाणारे,नम्र स्वभावाचे, मितभाषी पंडित भानुशंकर शास्त्री (शंकर महादेवन), हे तर संस्थानच्या, तिथल्या जनतेच्या गळ्यातले ताईतच. मिरजेतील एका कार्यक्रमाच्या दर्म्यान पंडितजींची भेट आफताब हुसेन, या मनस्वी गायकाशी होते. प्रथम भेटीतच खाँसाहेबांच्या गायनाचे चाहते झालेले पंडितजी, त्यांना विश्रामपुरास येण्याचे आमंत्रण देतात. बेताचीच आर्थिक परिस्थिती असलेले खाँसाहेब राजाश्रय मिळवण्याच्या आशेने विश्रामपुरास येतात खरे, पण राजदरबारातील एका मुकाबल्यात त्यांची गायकी पंडितजीपेक्षा काकणभर कमीच सिद्ध होते. राजगायकाचा किताब, राहण्यास प्रशस्त हवेली, व मानचिन्ह असलेली एक नक्षीदार कट्यार, असे भरघोस इनाम असलेली स्पर्धा हरल्याची खंत घेऊन खाँसाहेब परततात, पण या पराभवाची सल त्यांना स्वस्थ बसू देत नाही. काहीही करून आपल्या घराण्याच्या गायकीचे श्रेश्ठत्व सिद्ध करायचे, व राजगायकाची पदवी मिळवायचीच, या इरेला ते पेटतात. परंतू सलग १४ वर्षं कसोषीचे प्रयत्न करूनही, पंडितजींवर मात करण्यात मात्र त्याना यश काही मिळत नाही. आधिच पराभवाचे शल्य, त्यात बिकट आर्थिक परिस्थितीचे चटके, आणि सततच्या पराभवामुळे होणारी कुचेष्टा, यामुळे, त्यांच्यातिल जिंकण्याची ईर्षा, राक्षसी महत्वाकांक्षेचं रूप घेते, आणि शेवटी, पंडितजींवर कुरघोडी करण्यासाठी त्यांना एक अत्यंत हीन क्रुत्य करण्यास भाग पाडते. गायनस्पर्धेत खाँसाहेब विजयी होतात, राजगायकाचा किताब व हवेली जिंकतात व विजयोन्मादात आकंठ बुडून जातात. पंडितजी मात्र पुरते खचून, विश्रामपूरातून नाहिसे होतात. १४ वर्षांनंतर मिळालेल्या मानसन्मान व ऐश्वर्यामुळे खाँसाहेबांचा अहंकार अधिकच वाढीस लागतो. अशातच आगमन होते सदाशिव (सुबोध भावे) या पंडितजींच्या शिष्याचे. आपल्या गुरुंवर झालेल्या अन्यायाची, त्यांच्या झालेल्या अवहेलनेची कथा ऐकून सदाशिव पेटून उठतो, व थेट खाँसाहेबांची हत्या करण्यासाठी हवेलीवर पोचतो. खाँसाहेबांची कन्या झरीना त्याला अडवते. "हाडामासाच्या माणसाची हत्या कोणीही करू शकतो. पंडितजींवरच्या अन्यायाचा सूड घ्यायचा असेल, तर खाँसाहेबांच्या अहंकाराचा नाश करून दाखव." हे त्याच्या मनावर बिंबवते. सूडाने पेटलेला सदाशिव, खाँसाहेबांच्या गायकीचे श्रेष्ठत्व मोडून काढून त्यांच्या अहंकाराला संपवण्याचा विडा उचलतो. आपल्या गुरुंवरच्या अन्यायाचा सदाशिवने घेतलेला प्रतिशोध, खाँसाहेबांचा चिरडलेला अहंकार .. याची कथा म्हणजे "कट्यार.." पुरुषोत्तम दारव्हेकरांनी लिहिलेल्या नातकाची ही नितांतसुंदर कथा बहुतेकांना ठाउक आहेच. नव्हे, तिचे लाखो चाहते आहेतच. अशात, हे कथानक चित्रपट स्वरूपात आणणं हे एक मोठंच आव्हान असतं (आठवा.. दुनियादारी चित्रपटात मूळ कलाक्रुतीचा केलेला सत्यनाश. असो.).योग्य पटकथा लेखन या बाबतीत सर्वात महत्वाचं. अगदी "मेक ऑर ब्रेक" ठरवणारं. सुबोध भावे आणि टीमने यात चांगलीच बाजी मारलेली आहे. अतिशय ओघवत्या पटकथेमुळे, आणि तितक्याच उत्तम संवादलेखनामुळे, चित्रपट शेवटपर्यंत खिळवून ठेवण्यात १००% यशस्वी ठरतो. कलाकारांची योग्य निवड, ही कट्यारची सर्वात उजवी बाजू. सचिन पिळगावकर, शंकर महादेवन, सुबोध भावेंपासून अमृता खानविलकर, मृण्मयी देशपांडे, साक्षी तन्वर पर्यंत सर्वच कलाकार आपापल्या भूमीकेत अगदी चपखल बसलेत. सचिन पिळगावकरांना मिळालेली ही आजवरची सर्वोत्तम भूमीका असावी. सततच्या पराभवाने खचलेले, ईर्षेने, आसुयेने उद्विग्न, गर्वाने मग्रूर झालेले खाँसाहेब त्यांनी अविस्मरणीय केले आहेत. शंकर महादेवन यांचा पडद्यावरील वावर हा त्यांच्या गायनासारखाच, प्रसन्न, सुखावह. सदाशिवचे पडद्यावर आगमन जरी मध्यांतराच्या थोडेच आधी होत असले, तरी, सुबोध भावे पुरता भाव खाऊन जातो. इतक्या सहजतेने त्याने सदाशिव साकारला आहे, की अभिनय खरोखर खूपच सोप्पा असावा की काय असं क्षणभर वाटतं. बालगंधर्व, लोकमान्य, या पाठोपाठ सदाशिव तितक्याच ताकदीने उभा करणारा सुबोध, आजच्या घडीला मराठी सृष्टीतील सर्वोत्तम अभिनेता असावा यात शंकाच नाही. मूळ नाटकाप्रमाणेच, संगीत हा या चित्रपटाचादेखील आत्मा आहे. पं अभिषेकी, व वसंतराव देशपांडेंच्या मूळ रचना शंकर महादेवन, राहुल देशपांडे, आणि महेश काळे इतके सुंदर गायले आहेत, की एखाद्या सुरेल मैफिलीत बसल्याचा कित्येकदा भास होतो, आणि तशीच दाद प्रेक्षकांतूनही येत राहते. याचबरोबर, शंकर-एहसान-लॉय या त्रयीने रचलेली इतर गाणीही चित्रपतातील मूळ रचनांमध्ये कुठेही विसंगत अथवा अप्रस्तुत वाटत नाहीत इतकी समर्पक. अभिनयाइतकीच दिग्दर्शनातही आपली या क्षेत्रावर मजबूत पकड आहे हे सुबोध भावेने पदार्पणातच दाखवून दिले आहे. ज्यांनी मूळ नाटक पाहिलेले नाही, किंवा जे संगीताचे दर्दी श्रोते नाहीत, अशांनाही कट्यार अतिशय मनोरंजक वाटेल हे निश्चित. मूळ नाटकाच्या, त्या संगीताच्या चाहत्यांसाठी तर ही एक मेजवानीच आहे. अतिशय उच्च निर्मितीमूल्यं, व तंत्रज्ञानाच्या वापरामुळे, चित्रपटाची भव्यता रेखीवपणे साकारली गेली आहे. "झी"चे त्याबद्दल खरोखरच अभिनंदन. दिवाळीच्या मुहूर्तावर, खानमंडळींच्या भव्य बॉलिवुडपटांच्या गर्दीत मराठी निर्मात्यांनी आत्मविश्वासाने टाकलेलं हे धाडसी पाऊल चित्रपतगृहांमध्ये घट्ट रोवलेले राहील, व त्यास प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळेल, यात कोणताच संदेह नाही!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 18575
प्रतिक्रिया 108

प्रतिक्रिया

In reply to by याॅर्कर

भीमसेनजीचा उल्लेख इथे नको...ते गायक होते

In reply to by अत्रन्गि पाउस

भीमसेनजीचा उल्लेख इथे नको...ते गायक होते
"गायकाची" भूमिका वटवण्यासाठी ते हावभाव करावे लागतात. सचिन आणि सुबोध हे सिनेमामध्ये "गायक" आहेत हो......... ते वास्तविक आयुष्यातले सचिन आणि सुबोध आहेत,या पूर्वग्रह दृष्टिने पाहिल्यास त्यांच्या अभिनयाची मजा नाही घेता येणार. त्यांना याआधी कधी पाहिलेच नाही यादृष्टिकोनातून सिनेमा बघा म्हणजे ते खर्या आयुष्यातही गायकच आहेत असे वाटेल.

In reply to by याॅर्कर

अभिनय आहे हे ठौक आहे आणि म्हणूनच ....सचिन प्रत्यक्ष आयुष्यात स्वत;ला गायक समजतात आणि ते निदान तालासुरात गातात ...पिळगावकर घराण्यात बाकीचे सुद्धा गायक आहेत ...त्यामुळे निदान त्यांनी तरी mandrek सारखे हात वारे आवरायला हवे होते ... बाकी भीमसेनांचे गाणे, त्यात ..नेमके पणाची आस होती...तो एक अखंड शोध होता, सुखाच्या अतीव वेदना होत्या ती समाधी होती आणि ह्या सगळ्याचा आणि त्यांचे हाताचे नर्तन चेहेऱ्यावरच्या मुद्रा ह्यात एक प्रमेय होते

In reply to by अत्रन्गि पाउस

पिळगावकर घराण्यात बाकीचे सुद्धा गायक आहेत ...त्यामुळे निदान त्यांनी तरी mandrek सारखे हात वारे आवरायला हवे होते ...
आता तुम्ही पुढचा सिक्वल काढा आणि स्वतः खाँसाहेबांची भूमिका करा.
बाकी भीमसेनांचे गाणे, त्यात ..नेमके पणाची आस होती...तो एक अखंड शोध होता, सुखाच्या अतीव वेदना होत्या ती समाधी होती आणि ह्या सगळ्याचा आणि त्यांचे हाताचे नर्तन चेहेऱ्यावरच्या मुद्रा ह्यात एक प्रमेय होते
काहीही दुमत नाही.

१००% सहमत
वरील प्रतिसाद हाअत्रुप्त यांच्या प्रतिसाद खाली लीहीला होता. तो इथं कसा आला कोणास ठाउक

मी १९७० सालापासून इन्ग्रजी मराठी व हिन्दी मिळून ३५०० इतके चित्रपट पाहिले आहेत. व महाराष्ट्रराज्य नाट्यस्पर्धेच्या माण्डवाखालूनही गेलो आहे. मला नाटक हे माध्यम त्याच्या अनेक मर्यादांमु़ळे आवडलेले नव्हते सबब प्रथमच सांगतो की मला चित्रपट अगदी सर्वार्थाने ( संगीतासह ) नाटकापेक्षा सरस वाटला. काहीसे याचे श्रेय शन्कर एहसान लॉय याना द्यायलाच हवे.हे नाटक मी राहुल देशपांडे १० वर्षाचा छोटा सदाशिव असताना अगदी विगेतून ही पाहिले आहे. मूळ कथेत केलेले बदल स्वाभाविक व कथेला जास्त धार आणणारेच आहेत. या चित्रपटाचा भार संगीताने प्रामुख्याने वाहून नेला आहेच पण सचिन पिळगावकर यानी मिळालेल्या संधीचे सोने केले आहे. संपूर्ण चित्रपटात वेगळाच खर्जाकडे झुकणारा आवाज त्यानी लावला आहे. हा चित्रपट अभिनयात खान साहेबाचा असला तरी सदाशिव ला (भावे ना ) ही उत्तम वाव मिळालाय ! मिरजेचे वातावरण, दरबारातील वातावरण, नदीकाठचे वातावरण यात दिगदर्शकाने कमाल केलीय. संवाद फार सुरेख व अगदी आत पोहोचणारे आहेत. मॄणाल व अमॄताची कामे ही लाजबाब. त्यामाने मूल नाटकापेक्षा बाकेबिहारी कवि हे पात्र इथे नीरस वाटते. गायनामधे सर्वच गायकानी तुफान फटकेबाजी केलीय अर्थात राहुल येक नम्बर. सुरुवातीचे केदार रागातील पारम्पारिक चाल असलेले खासाहेबाच एन्ट्री गीत त्यागोदर भूप रागातील गणेश स्तवन आपली पकड घेते मग किरवानीतील अफाट बंदिश जलद लयकारी व तानबाजीच्या गायकीचे दर्शन घडवते. मनमंदिरा ( बहुतेक तिलक कामोद) हे गीत व त्यावेळचे चित्रिकरण अत्यंत बहारदार आहे. कवाली शिवरंजनी रागातील आहे त्यात सदाशिव उर्दूला जे संस्कॄत मिश्रित हिदीचे उत्तर देतो त्यातील शब्द वर्णनापलिकडचे आहेत. बाकी पुरिया रागातील मुरलीधर शाम तसेच भीमपलासी केदार मालकन्स बहार अशी रंज्कक संगीत माला असलेले घेई छंद सालग वराली रागातील मध्य लय झपतालातील याच गीताचे आगळे स्वरूप मूळ नाटकातील अभिषेकी मौसिकीशी इमान राखणारे असे आहे. पूर्ण चित्रपटात कट्यार कथेचे निवेदन करते तिच्यावरच शेवटची फ्रेम आहे. मी आज रक्ताचा सडा पाडायला दरबारात आलेली शेवटी स्वरांच्या वर्षावात आनंदाने चिम्ब झाले अशा अर्थाची ओळ सात स्वरामधील नादब्रम्हाची जादू अधोरेखित करणारी अशी आहे.महाराष्ट्रात चित्पावन व मुसलमान याना एकत्र नांदवणारे असे जे नादब्रम्ह आहे. त्याचा आस्वाद घेण्यासाठी हा चित्रपट पहावाच.

In reply to by चौकटराजा

श्री . चौकट राजा संपूर्ण प्रतिसादाशी सहमत पण एक गोष्ट खटकली तुमच्या प्रतिसादात तुम्ही शंकर महादेवन यांचा उल्लेख सुद्धा केला नाहीत शंकर एहसान लॉय या त्रिकुटाने अतिशय उत्तम संगीत दिलाय या चित्रपटाला ,शंकर महादेवन यांच गायन उत्कृष्ट आहे आणि पहिल्यांदाच अभिनय करत असूनही खूप छान झालाय शंकर महादेवन यांचा अभिनय

In reply to by चौकटराजा

वाह! माझ्या संगीताच्या तोकड्या ज्ञानामुळे, चित्रपतातील संगीताबद्दल, रागांबद्दल इतकं विस्तृत लिहिता आलं नाही. आपण खूपच सुंदर वर्णन केलेत. धन्यवाद! :)

मला चित्रपट अगदी सर्वार्थाने ( संगीतासह ) नाटकापेक्षा सरस वाटला. काहीसे याचे श्रेय शन्कर एहसान लॉय याना द्यायलाच हवे सॉरी , तुमच्या प्रतिसादातील ' शंकर एहसान लॉय ' यांचा उल्लेख नजरेतून निसटला होता

कट्यारचा निवेदनाचा आवाज कुणाचा आहे ? रीमा लागू?

In reply to by मोगा

हो

बादवे हे परिक्षण लगेच व्हाटसएप वर आलं सुद्धा, अर्थातच श्रीरंगजींना अजिबात श्रेय न देता, त्यांचा साधा नामोल्लेखही न करता ...

मस्त परिक्षण. मला संगीतातले काहीही कळत नाही पण उद्या बघणार आहे. सचिन पिलगावकर यांच्या बद्दल निनाद यांच्याशी सहमत, अतिशय डोक्यात जातात ते.

सचिन पिलगावकर यांच्या बद्दल निनाद यांच्याशी सहमत, अतिशय डोक्यात जातात ते.
ते कसे?हनुमानसारखे सूक्ष्म रूप घेवून?नाकातून?कि कानातून? . . संगीतातले काही कळत नसल्यास ठीक आहे,पण शास्त्रीय संगीत आवडत नसल्यास सिनेमा न पाहणे.

In reply to by याॅर्कर

योर्केर साहेब सिनेमातील गाणी तू नळीवर उपलब्ध आहेत ती पाहून माझे तरी असे मत आहे संगीत ज्याला आवडते त्याने हा सिनेमा पहावा त्यासाठी शास्त्रीय संगीत आवडले पाहिजे असा कायदा नाही. नवीन पिढीला आजच्या तरुण पिढीने आपल्या वाड वडिलांच्या कडून ह्या अजरामर कलाकृतीबद्दल एवढे ऐकले होते की ते स्वतःसोबत नव्या पिढीला सुद्धा दाखवले तर निदान त्यांना चांगले संगीत म्हणजे नक्की काय प्रकार असतो ते तरी कळेल. नाही तर त्यांची नशिबी हनी सिंग कमाल का उसकी चार बॉटल भी कमाल कि अशी अवस्था होईल आपले पंचतारांकित नगरीत स्वागत आहे

In reply to by याॅर्कर

संगीतातले काही कळत नसल्यास ठीक आहे,पण शास्त्रीय संगीत आवडत नसल्यास सिनेमा न पाहणे.
मजेशीर युक्तिवाद. असल्या सॉल्लिड समजुती तुम्ही करून घेतल्यात हे ठीक. पण त्या जाहीरपणे सांगताय सुद्धा? खिखिखि

ही ही ही. अस नाही हो पण त्यांच्या बोलण्यात खुप attitude असतो अस मला आपल् वाटते. आणि नवर्याला आवडते संगीत वैगरे सो त्याच्यासाठी जाणार.

In reply to by त्रिवेणी

सर्वानी कृपा करा नि कलाकार,पात्र व एक व्यक्ति म्हणून नट या तिन्ही ची सर मिसळ करून घोळ घालू नका मंड ळी ! नय्यर,रोशन व सी रामचंद्र तिघेही एकत्र बसून दारू ढोसत असत पण ते सोडून त्यांची निर्मिती ऐका आपल्या मृत्यू पश्चात ही ते नाव टिकवून आहेत.

In reply to by चौकटराजा

.... पण ते सोडून त्यांची निर्मिती ऐका. आपल्या मृत्यू पश्चात ही ते नाव टिकवून आहेत." असेल..असेही असेल.... आजकाल काही सांगता येत नाही.... कदाचित..... काही गहनविचारी नाना, चिऊ-काऊच्या हितोपदेशातल्या गोष्टी, सांगता-सांगता हेवनवासी झाले असतील आणि त्यांची असंख्य पिलावळ, त्यांच्या मोठ्या गाढवकथांना किंवा अजब तर्कशास्त्राला, अद्याप प्रसवत असतीलही.

In reply to by मोगा

खालील वाक्य नीट मन लावून वाचा.... "काही गहनविचारी नाना, चिऊ-काऊच्या हितोपदेशातल्या गोष्टी, सांगता-सांगता हेवनवासी झाले असतील आणि त्यांची असंख्य पिलावळ, त्यांच्या मोठ्या गाढवकथांना किंवा अजब तर्कशास्त्राला, अद्याप प्रसवत असतीलही." वरील वाक्य हे अतिशय साधे वाक्य आहे. अर्थात तरी पण ते जर तुम्हाला लागले असेल तर, कठीण आहे......

चित्रपट टीव्हीवर बघेन, पण सुरत पिया बिन गाणे नाही म्हणल्यावर माझा तरी इंटरेस्ट गेलेला आहे. बाकी शंकरमहादेवन यांचे घेई छंद छानच.

In reply to by आनन्दा

"सुरत पिया" हे गाणे नाही ? आणि "मुरलीधर शाम हे नंदलाला" , "दिन गेले भजनाविन सारे" , "लागी कलेजवा कटार" हि मुळ नाटकातील गाणी सुद्धा नाहित ? अरेरे .. ओह माय गॉड ..

खूप सुंदर परीक्षण. धन्यवाद. मूळ नाटकाविषयी काही माहिती नव्हतं पण तुम्ही करून दिलेल्या इतक्या छान ओळखीमुळे हा चित्रपट नक्की बघणार.

आत्ताच बघितला पिक्चर. आणि आवडला. बाकी महागृन च्या कास्टिंग साठी १०० टक्के दिले.वेगळा अभिनय करावच् लागला नाही महगृणा.

सिरुसेरि, यशोधरा, चौकटराजा यांच्याशी सहमत. माझ्या मते सदाशिव मधील सूडबुद्धी आणि खाँसाहेबांचा अहंकार कथानकास सामान्य सूडकथानक बनवतात. सदाशिव चा एखाद-दुसरा नम्र संवाद त्यास मूळ नाटकातील कलाप्रेमी सदाशिव बनवू शकलेले नाहीत. त्यामुळे चित्रपटाच्या अखेरचे निवेदन (विद्या / कलेला घराण्यात बंद करून ठेवू नये इ.) हुकाल्यासारखे वाटले. हेच निवेदन जेव्हा नाटका अखेरीस सांगितले गेले तेव्हा एकदम चपखल बसले होते. त्याचबरोबर खाँसाहेब एकावेळी केवळ एका भावनेच्या आहारी गेलेले दिसतात - आधी सूड मग अहंकार. हे खाँसाहेब नाटकातील श्रीकृष्णाची मूर्ती हवेलीत ठेवून घेणाऱ्या उदात्त खाँसाहेबांपेक्षा फारच one dimentional झालेत. अर्थात मिळालेल्या भूमिकेचे सचिनने चीज केले आहे, अती-अभिनय जवळपास सर्वत्र टाळला आहे. पहिल्या जुगलबंदीच्या वेळी तर पंडितजींच्या गाण्यानंतर दरबारात पसरलेली शांतता आणि सचिनच्या चेहऱ्यावरील बदलत गेलेले भाव केवळ लाजवाब. कथेच्या या दोन मुख्य पात्रांची उदात्तता अशा प्रकारे हरवलेली वाटली. अर्थात मध्यम बदलामुळे हे झाले असू शकते. चित्रपटाच्या जमेच्या बाजू म्हणजे अतिशय सुंदर सेट्स, योग्य पात्रनिवड, आणि गाण्याची निवड व मांडणी. शंकर महादेवन चे विशेष कौतुक. अभिनयाचा पहिलाच प्रयत्न यशस्वी झाला असं म्हणायला हरकत नाही. मथुरेहून परत येताना नदीकीनारचा सीन उत्तम. चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदर मला सर्वाधिक भीती वाटत होती ती म्हणजे महागुरूंचा अभिनय व नवीन गाणी (जी नाटकात नाहीत) यांची. परंतु दोन्ही खोट्या ठरल्या याचा मला आनंद आहे. नवीन गाणी अतिशय सुंदर प्रकारे कथानकात बसली आहेत. शिवमंदिरातील गाणे मला फ़ारच आवडले. कलाकारांचा प्रत्यक्ष गाण्याचा अभिनय काहीसा चुकल्यासारखा वाटतो एखाद दुसऱ्या ठिकाणी. पण तेवढे नक्कीच दुर्लक्षिता येऊ शकते. एकूणच चित्रपट म्हणून फार सुंदर जमला आहे. प्रत्येकाने आवर्जून पाहावा असा आहे.

Atishay Sundar ParikshaN! Varil sarv pratikriya vachun chitrapaT pahNyachi utsukta vaDhli aahe.

महागुरूंशी वैयक्तिक वैर असल्यासारखं लोकांना बोलताना ऐकून हे पटतं की कलाकाराचं पडद्यावरचं आणि वैयक्तिक आयुष्य वेगळं रहात नाही.

In reply to by वेल्लाभट

जेव्हा कलाकार वैयक्तिक आयुष्य व पडद्यावरिल आयुष्य वेगळं ठेवत नाहीत तेव्हा हे होणारच. जेव्हा कलाकार आपले व्यक्तिगत आयुष्य माध्यमांमधून वेशीवर टांगणार तर लक्तरे तर फाडली जाणारच. मराठीतले कुणाही दिग्गज कलाकारांबद्दल असे वैयक्तिक वैर जनमानसात असल्याचे जाणवत नाही.