Skip to main content

ति, तेव अण म्या..

लेखक आनंद कांबीकर यांनी गुरुवार, 05/11/2015 00:23 या दिवशी प्रकाशित केले.
सगळी मागल्या वर्सातुन फुढं आलेली, म्या एकटाच् नवा. त्याहीच्यात मिसळा मनलं त् म्या खेड्यातला, सुतच् जमाना. वर्गात कई उल्हासच् राइला नवता, पर एकदा तिला हसताना पाइलं अन् सगळा अंगच् नाचू लागला. ति साऱ्या नसाहितातून व्हावू लागली. मागल्या बाकावर बसून, हाताचा कोपाकरुण बोटाच्या सांदीतून तिला टापू लागलो. ति गदगदून हसायची न् म्या खुश व्हायचो. मजाच मजा यायाची. एकदा ति खेटुण गेली अन् म्या अंगाला माराइचा फवाराच् ईकत आणला. दिसभर एकटाच तिच्या मागणं फिरायचु. कदीच्याला बी तिच्यावरच् नजर लावून बसायचो. ति रोज चोरून मह्याकडच् बघायची पर हळू हळू ध्यानात आलं, ति माह्या शेजारी बसणाऱ्या विश्याला चोरून पायची. तेव दिसला कि पोरी तिला कोपरं हानायच्या. पोटात आग आग व्हायला लागली. विश्या दिसला कि दगुड उचलायचा इच्चार मनात यायला लागला. पर इलाज नवता. तेव गाडी घीऊन येणारा वर्गात एकटाच. तेव किरकेट बी खेळायचा सारे पोरं पोरी त्याच्यावर जाम खुश. एकदा विश्यान् ग्राउंड मदी गाडी घातली अन गोल चकरा हानल्या. ति खुळ्यागत त्याच्याकडं पाह्त बसली. तव्हा डोकं खनकलं. सुन्याच्या दप्तरातून करकटक काढलं अन् लपत लपत विश्याच्या गाडीच्या दुंही टायरातून हवा काढली. वर्ग सूटल्यावर तेव गाडी ढकलत निगाला, ति पोरिहिच्या घोळक्यातून त्वांड पाडून पाहत हुती अन् म्या लपून मजा घेत हुतु. त्या दिशी लए आनंद झाला. म्या तिच्यावर जिव ओवळायचो अन ति त्या फुगीर विश्यावर. पर दोघायचं अजुन जमलं नवतं. दोघ्ं बी एकमेकाईला नुसतं चोरून पायचे. अजुन पक्क झालं नव्हतं. पर मनी त्याहीच्ं पक्क करायच्या इराद्यात हुती, दोघायच्या मदी सारखी लुडबुडायचि. 'ति' लाजायचि पर मनी विश्यासंगट बडबड करायची, 'ति' ला विश्याच्या नावानं हाकांमारुन मोठ्यांन् खिदळायाचि. मनीचं पारगांवच्या रम्यासंग चालु हुतं. म्या मनी वर ध्यान ठीवायला चालु केलं. एकबार शेवटचा पीरियड संपल्यावर सगळी पळाली. मनी एकटीच वर्गात थांबली. म्या चुपचाप बाजूच्या वर्गात जाउन बसलू. रम्या वर्गात घुसला, त्यानी आतून दार लावलं. मनी अन तेव दोघच् आंत. म्या हळूच भायरून कड़ी घातली. पळतच खाली आलू अन् "वरच्या मजल्यावरच्या २०१बी वर्गात पिसाळं कुत्रं शिरलय. म्या कड़ी घालून आलू. तुमि जा लवकर" असं शिपयाला सांगून टाकलं. शिपाई अजुन दोन शिपइं, मोठी काठी अन चार दोन धीट पोराइला घेऊन वर गेला. म्या पळून आलू. रातच्याला मेसवर दोन चपात्या जादा खाल्ल्या. सगलिकड़ं बोभाटा झाला. मनीचं कॉलिजात येणं बंद झालं, म्या जाम खुश. मनी हुती मनुन ति जास्तीची हिम्मत करायची, अता उलशिक निवाळ्ली. मंग माही हिम्मत व्हाढली. एकदा तिला लेडीज हतरुमाल दिला, तिना वापस दिला. मनलं पिरेम हळू हळू हुईल्. चार दिसान् मेकपचा डबा दिला, तिना वाकडं थुबाड करुण तेव बी मागं दिला. एकदा विश्या नवा कोरा पेन पाकीटात घालून घिउन आला अन तिला गिफ्ट द्यायच्या हिंदनानं भायर थांबला. म्या दप्तरात काचाचा ताजम्हल आणलेला. वर्गात घुसून तिच्या म्हवरं ठीवला. ति चवताळली. महल घिउन मह्या मागन् आली. विश्या सुन्याबर लांब हुबा, म्या सुन्याला आवाज दिला तस्स दोघायनि माहयाकड़ं पायलं. तिना ताजम्हाल् माह्या हातात ठीवला. "पुन्हा कई देशिल त् मुस्काटच् फोडिल" मनली. ति वर्गात घुसली. सुन्या अन विश्याला कई ऐकायला गेलं नवतं. म्या जवळ जाउन त्याहिला महल दाखिला अन जोरात "यार ति पोरगी म्हागच लागलिया. सारखं कई न कई आणून देती" मनलं. सुन्याच्या खांद्यावर हात टाकून बोलत हुतो तवा म्या तिरप्या नजरानं पाइलं. विश्यान् हातातल्या पेणाचे टुकड़े केले अन तेव गाड़ीकडं निघुन गेला.
लेखनविषय:

वाचने 6788
प्रतिक्रिया 39

प्रतिक्रिया

सुंदर लिहता हो तुम्ही.... अजून येऊद्या. जव्हेरगंज आणि तुम्ही गावाकडची झुळूक आणली राव मिपावर... (आधीच्या वादळांबद्दल आपल्याले काय मैत नै बाप्पा - एक नवाट मिपाकर)

डोकेबाज बेणं दिसतय.. आवडली कथा.

In reply to by टवाळ कार्टा

उदात्तीकरण कुठे दिसला ओ ह्यात ? साधी सरळ कथा आहे .कॅरेक्टरमध्ये थोडा गावाकडंचा कावेबाजपणा आहे एवढाच !

In reply to by कपिलमुनी

१. पोरीला पटवण्यासाठी स्वतः काही न करता दुस्र्याला त्रास देणे २. पोरीने स्पष्टपणे नकारघंटा वाजवल्यावर परत परत लाळघोटेपणाने तिच्याकडे जाणे

In reply to by कपिलमुनी

प्रेमात आणि युद्धात सारे क्षम्य असते
रिंकू पाटील टैप केसेस सुध्धा याच वाक्याच्या य्झ पणामुळे होतात रे
एकदा आश्रमात शिक्षणासाठी ये ;)
प्रॅक्टिकल्स अस्तील तरच विचार केला जैल ... त्यात सुध्ध सुध्धा सामानाची सोय आश्रमाने केल्यास नक्की येईन ;)

In reply to by टवाळ कार्टा

@टक्या , हातरुमाल ,मेकअप चा डब्बा , वर्तुन ताजमहाल देऊन प्रयत्न केलाय् न इंप्रेश करण्याचा अस काय म्हणतो रे काही केल नाही नीट वाच न,काही पोर तर धागा पण काढ़तात " सुन्दर मुलीला कसे पटवावे " म्हणून याद करो कुच्छ :प =))

In reply to by कपिलमुनी

विश्याबद्दल सहानुभुती निर्माण झाली आणी मि बद्दल तिरस्कार. कदाचित लेखकाचा हाही हेतु असु शकतो. म्हणजे उद्या कोणी दुर्योधनाच्या नजरेतुन महाभारत लिहिले तर त्याला तकलादु म्हणता येईल का?

जाम आवडली!

पिच्चरात रजनीअण्णा करतात त्या करामती आपण जशा बघतो, तसे वाचायचे. उगाच चिरफाड न करता. आणि जीवनही तसेच जगावे. पिच्चर बघत असल्यासारखे. उगा त्रास करून न घेता. लई मजा येते मग, स्वत:ची गोची झाली, तरिही.

असल्यांना आमच्या शाळेत मस्त शब्द होता - जळकुटे! बाकी कथा भारी. अजून येऊ द्या!