✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

एक पिल्लू: तिचं आणि आमचं....

स
संदीप डांगे यांनी
Sun, 11/01/2015 - 01:52  ·  लेख
लेख
परवा बायको आमच्या छोट्या बाळाला घेऊन शेजारच्या घरी काही कामानिमित्त गेली होती. त्यावेळी तिथल्या आजींनी हिला सहज विचारले, "अगं याची दृष्ट वैगेरे काढतेस की नाही? मला वाटतंय ह्याला जबरी दृष्ट लागली आहे." तेव्हा बायकोनी त्यांना उत्तर दिले की आम्हाला यातलं काही कळत नाही, त्यामुळे आम्ही हे दृष्ट उतरवणे वैगेरे प्रकार करत नाही. तेव्हा त्या आजींनी एक अनुभव सांगितला, तो अक्षरशः चकरावणारा होता.... ते सगळं कुटुंब अंदाजे पंधरा सोळा जण त्यांच्या कुलस्वामिनीच्या दर्शनाला गेले होते, तिथे त्या निसर्गरम्य ठिकाणी काही माकडेही होती. एका उंचशा झाडावर एक माकडीण आपलं पिल्लू सांभाळत बसली होती. ते पिल्लू अगदी हाताच्या पंजाएवढं, नाजुक, चिमुकलं, त्याला ती कसंबसं धरून छोट्याशा फांदीवर तोलून बसली होती. ह्या लोकांनी तिला पाहिले, ते पिल्लू पाहिले. सगळे त्या दृष्याकडे पाहू लागले. ते एवढूसं पिल्लू, एवढ्या उंचीवर ती कशी हाताळत होती याबद्दल सगळ्यांना काळजी वाटू लागली. कुणाच्या तरी तोंडून हे शब्द निघालेच, "अरे ते किती लहानसं पिल्लू आहे. इतक्या वरून पडलं बिडलं तर मरेल..." झालं. हे शब्द तोंडातून बाहेर पडताक्षणीच, त्या माकडीणीने जे केले ते तिथल्या सर्व लोकांना हादरवून गेले. तीने झटकन तिथल्या फांदीची एक काटकी मोडली, त्यावर ती थुंकली, आपल्या पिल्लाभोवती दृष्ट काढल्यासारखी फिरवली आणि ह्या लोकांच्या अंगावर सरळ फेकून मारली...! तिच्या ह्या कृत्याने ही सगळी मंडळी टरकलीच. तेव्हा आजी म्हणाल्या, अगं ते प्राणी असून एवढी काळजी घेतात मुलांची, आपण नको का घ्यायला....? वर घडलेली घटना अजिबात काल्पनिक नाही. आम्ही त्या आजींना आणि सगळ्या घरच्यांना गेले तीन वर्षे ओळखतो. गोष्टी रचून सांगणे, काही तरी पुड्या सोडणे असले प्रकार ते लोक कधीच करत नाहीत. चांगले सुसंस्कृत आणि प्रांजळ स्वभावाची माणसे आहेत. त्यांनी खोटं सांगून त्यांना आमच्यापासून काही फायदा नाही. वाचकांपैकी कुणाला अशा घटनांबद्दल काही माहिती असेल तर नक्की सांगावी. आता अजून एक चमत्कारिक घटना. ही माझ्या घरात घडली असून प्रत्यक्ष अनुभव असल्याने काय खरे काय खोटे मानावे असे झाले आहे. माझा हाच छोटा मुलगा (वय १.५ वर्ष) ऑगस्ट महिन्यापर्यंत चांगला खेळायला, माफक बोलायला लागला होता. त्याचा सतत बाबा, बाबा घोष चालू असे. वेगवेगळ्या आलापीत, लयीत बाबा, दादा, आई असे म्हणणे चालू असे. कोणत्याही वस्तूचे पहिले अक्षर उच्चारायचा, जसे मोबाइल चे मो, पोळीचे पो, इत्यादी. कामवाली मावशी जायला लागली की छान बाय करायचा, ती गेली की "गेयी... गेयी" असे उच्चारायचा. तो प्रीमॅच्युअर असल्याने त्याची वाढ स्लो आहे. म्हणजे नॉर्मल वयाच्या मुलांपेक्षा तो किमान चार महिने मागे आहे. पण सुदृढ आणि स्टेडी ग्रोथ होती. अचानक ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात एकेदिवशी तो बोलायचा बंद झाला. फक्त "ऊं..ऊं..ऊं... " करायचा. फक्त रडायचा. जवळ घेतले की घट्ट चिकटून बसायचा. जरा दूर म्हणज अगदी १०-१२ इंच जरी दूर ठेवले तरी त्याचे डोळे भयानक भीतीने भरून जायचे आणि तो प्रचंड भेसूर, अभद्र आवाजात ओरडायचा. त्या आवाजात रडतांना त्याला आम्ही कधीही ऐकले बघितले नाही. त्याच्या आईजवळ, माझ्याजवळ शांत असायचा. पण घट्ट चिकटून असेल तरच. अन्यथा त्याला जरा म्हणजे अगदी एक सेकंदासाठीही अंगापासून दूर केले की तो तेच अभद्र किंचाळणे, भीतीने थरथरून जाणे, प्रचंड घाबरून जाणे असेच करायचा. आम्ही सुरुवातीचे दोन-तीन दिवस हे सगळे त्या अँगलने बघितलेच नव्हते. त्याचे पोट दुखत नव्हते, इतर काही शारिरिक त्रास नव्हता. कारण तसे असते तर तो शांतच बसला नसता. पण तो शांत बसायचा, तेही घट्ट चिकटून. नेहमी बायको रोज सकाळी साडेसहाला उठते, तेव्हा हे साहेब आईशिवाय सकाळी ११-१२ पर्यंत निवांत झोपायचे. पण त्या नऊ दिवसांत ज्याक्षणी आई त्याच्यापासून फूटभराच्या रेंजमधून बाहेर गेली की त्याक्षणी हा भोकांड पसरत उठून बसायचा. नंतर झोपायचाच नाही. रात्रीही शांत झोपत नव्हता. सतत भीतीचे सावट त्याच्या डोळ्यात दिसायचे. आम्ही दोघेही नुसते गुंतून बसलो होतो. तो एक क्षणही आम्हाला सोडतच नव्हता. सहाव्या सातव्या दिवशी तर अगदी टॉर्चरस झाले होते. ना मी काम करू शकत नव्हतो ना ती. आम्ही आलटून पालटून त्याला घेऊन आपली कामे करत होतो. त्याला मी घेऊन बसायचो जोवर तिचे काम संपत नव्हते. पण त्याला आई दिसली की तो तिच्याकडेच जाण्यासाठी आरडाओरडा करायचा. हे मी इथे लिहितो आहे तेवढे सोपे अजिबात नव्हते. त्या नऊ दिवसांमधे जे भयानक वातावरण आमच्या घरात होते की आम्ही दोघेही वेडे होण्याचा मार्गावर आलो होतो. दिवसभर नुसता चिडचिड, संताप-संताप व्हायचा. त्याचे वजन झपाट्याने कमी झाले. त्याला नेमक्या कोणत्या डॉक्टरकडे न्यावे ह्यावर विचार करत होतो. कामवाली मावशी बोलली, इकडे ह्या मंदीरात घेऊन जा, तिकडे जा वैगेरे. आम्हाला असलं काही पटत नाही. आमच्या शेजारची आजी (ह्या दुसर्‍या) त्यांचे आमचे घर चिकटून आहे. मुलाचे रडणे त्याही ऐकत होत्या. त्यांनाही ते विचित्र वाटत होते. त्यांनी बायकोला जबरदस्तीने एक मंत्र दिला लिहून आणि म्हटले की हा मंत्र म्हण. बहुधा दत्ताचा काहीतरी मंत्र होता. हाच नववा दिवस. त्या दिवशी रात्री साडे-आठ वाजता बायकोने तो कागद हाती घेतला आणि चांगला वीस-पंचवीस ओळींचा मंत्र, म्हणायला सुरुवात केली. फक्त चौथ्या ओळीच्या समाप्तीवरच..... बाळ शांत झाले. त्याने मला मोठ्याने 'बाबा...बाबा' अशी हाक मारली. मी वरच्या बेडरूममधे होतो. गेल्या आठ दिवसांच्या चोविस तासांमधे त्याने एकही शब्द तोंडातून काढला नव्हता. आठ दिवसांनी तो स्पष्ट बाबा बोलला. मी धावत खाली आलो. तुम्ही समजू शकाल की नाही माहित नाही. पण सतत बाबा बाबा जप करणारं बाळ अचानक अबोल होतं आणि जे शब्द ऐकायला तुमचे कान आतुर झालेले असतात. ते शब्द इतक्या भयंकर परिस्थितीतून गेल्यावर कानी पडतात. तेव्हा माझे डोळे निरंतर वाहत होते. आताही आहेत... तो त्याच्या आईपासून चार-पाच फुटांवर एकटा मजेत खेळत होता, बाबा बाबा करत होता. जणू काही कधी घडलेच नाही. माझ्या मुलामधे त्या क्षणी मोड स्वीच केल्यासारखा तो झटक्यातला बदल मी रेकॉर्ड करू शकलो असतो तर तुम्हाला खरंच दाखवू शकलो असतो आम्ही काय चमत्कार पाहिला. इथे तर्क थांबतात. बोलणारे काही बोलू देत. त्यांना तो अनुभव नाही जो मी आठ दिवस गुणिले चोविस तास घेतला आणि मूल असं एका मिनिटात नॉर्मल झालेलं बघितलं. त्याचे डोळ्यातले बदललेले भाव आधीचे मी कधीच विसरू शकणार नाही. जणू त्याला वाटायचं की कुणीतरी त्याला आमच्यापासून दूर नेणार आहे, काहीतरी भयंकर जे मी शब्दात सांगू शकत नाहीये. अजूनही तो पूर्ण नॉर्मल नाही पण ८०-९० टक्के तरी उत्तम आहे. त्याचे शब्द उच्चारणे मात्र फार कमी झाले आहे. ह्या सगळ्या प्रकाराला नजर लागणे, दृष्ट लागणे म्हणतात काय? आम्ही आमच्या ह्या दुसर्‍या मुलाचे कुठलेही संस्कार आजवर केलेले नाहीत. पाचवी पुजली नाही, जावळं काढली नाहीत, कान टोचले नाहीत, कुलदैवतेच्या दर्शनास नेले नाही. अजून बारसं म्हणजे नामकरणही केले नाही. त्याचे नाव असेच घेतो. रूढ अर्थाने बाळासाठी म्हणून जे धार्मिक संस्कार आहेत ते कुठलेही केलेले नाहीत. ह्याबद्दल आम्हाला बर्‍याच जणांनी बरे-वाईट सांगितले आहे. आम्ही मनावर घेत नाही. पण खरंच ह्यामुळे मुलांवर काही परिणाम होतात का? आमच्या जवळच्या नातेवाईकांपैकी एकाशी आमचे विडीओ कॉलिंग झाले, त्यात त्यांनी घर, मुले बघितली. नंतर २४ तासांतच हा प्रकार सुरु झाला. बघा... मन एका वाटेने जायचे ठरवते तर कशाचाही संबंध कशासही जोडू पाहते. हा काय प्रकार आहे राव....? आधुनिक वैद्यकशास्त्रात अशी काही प्रकरणे हाताळली गेली आहेत का? समजा अशा प्रकरणात नेमके कोण्या डॉक्टरकडे जावे, त्यांना नक्की काय सांगावे व ते काय उपचार देऊ शकतात? (वाचकांना विनंती: वरील सर्व घटना शंभर टक्के सत्य आहेत. त्याबद्दल आपण काही मौल्यवान माहिती, सल्ला, अनुभवजन्य ज्ञान देऊ शकत असाल तर आपले स्वागत आहे, निरर्थक वाद टाळल्यास कृपा होईल.)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
संस्कृती
धर्म
समाज
जीवनमान
तंत्र
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
लेख
चौकशी

प्रतिक्रिया द्या
28868 वाचन

💬 प्रतिसाद (91)

प्रतिक्रिया

हम्म... चक्रावून टाकणारा

पद्मावति
Sun, 11/01/2015 - 02:10 नवीन
हम्म... चक्रावून टाकणारा अनुभव आहे. खरोखरंच काही गोष्टी, अनुभव लॉजिक/ तर्काच्या पलीकडच्या असतात.
  • Log in or register to post comments

+१

रातराणी
Sun, 11/01/2015 - 03:15 नवीन
+१ काळजी घ्या! मुलांच्या बाबतीत मन कुठलीही रिस्क नाही घेऊ शकत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति

कोंकणांत असे प्रकार पाहीले आहेत

नेत्रेश
Sun, 11/01/2015 - 04:03 नवीन
दृष्ट लागणे / काढणे, विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत खुप पाहीले आहे.
  • Log in or register to post comments

डॉक्ट रांकडे घेऊन जा, एक

स्रुजा
Sun, 11/01/2015 - 04:39 नवीन
डॉक्ट रांकडे घेऊन जा, एक खात्री करुन घ्या की कोणती शारीरीक अडचण नाहीये ना ज्यामुळे बोलणं कमी झालं. डॉ> म्हणतील असं काही नाही मग हे डोक्यातुन काढुन टाका, रात्री झोपताना चांगलं शास्त्रीय संगीत लावा, तुमच्या घरचं< वातावरण पॉझिटिव असणार प, आता ते तसं ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करा. काही होत नाही आणि काही कुणाची नजर लागत नाही. नेहमीप्क्षा थोडा जास्त खेळायला पाठवा त्याला, थोडे दिवस तुम्ही लांबुन लक्ष द्या, आणि मुलाच्या आत्मविश्वासाला विशेष जोपासा थोडे दिवस, स्वतः च्या ही जोपासा. झटकुन टाका आणि हे विचार. आपण परवानगी दिल्या शिवाय कुठलीही तथाकथित वाईट नजर आपलं काही वाकडं करु शकत नाही हे लक्षात ठेवा.
  • Log in or register to post comments

डॉक्ट रांकडे घेऊन जा, एक

स्रुजा
Sun, 11/01/2015 - 04:46 नवीन
रात्री झोपताना चांगलं शास्त्रीय संगीत लावा, तुमच्या घरचं वातावरण पॉझिटिव असणार च, आता ते तसं ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करा. काही होत नाही आणि काही कुणाची नजर लागत नाही. नेहमीप्क्षा थोडा जास्त खेळायला पाठवा त्याला, थोडे दिवस तुम्ही लांबुन लक्ष द्या, आणि मुलाच्या आत्मविश्वासाला विशेष जोपासा थोडे दिवस, स्वतः च्या ही जोपासा. हे सगळं अशासाठी की तुम्ही काहीच उपाय केले नाहीत असं वाटुन तुम्हाला त्रास नको व्हायला. झटकुन टाका आणि हे विचार. आपण परवानगी दिल्या शिवाय कुठलीही तथाकथित वाईट नजर आपलं काही वाकडं करु शकत नाही हे लक्षात ठेवा.
  • Log in or register to post comments

१००% सहमत

नया है वह
Tue, 11/03/2015 - 16:20 नवीन
आपण परवानगी दिल्या शिवाय कुठलीही तथाकथित वाईट नजर आपलं काही वाकडं करु शकत नाही हे लक्षात ठेवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

हम्म...........अतर्क्य आहे हे

रेवती
Sun, 11/01/2015 - 05:04 नवीन
हम्म...........अतर्क्य आहे हे! ज्याचे त्याचे अनुभव तेवढेच खरे असतात, बाकीच्यांना ते तसेच वाटतात असे नाही. माझ्या मुलानेही एकदा आठ दहा दिवस जेमतेम खाल्ले, न खाल्ले असे केले होते पण तेंव्हा त्याला दात येत होते. हे माहित असतानाही आमची घाबरगुंडी उडाली होती. तुमचे काय झाले असेल याची कल्पना येऊ शकते.
  • Log in or register to post comments

हम्म..

योगी९००
Sun, 11/01/2015 - 07:10 नवीन
चक्रावून टाकणारा अनुभव आहे.एरवी मी या गोष्टींवर विश्वास ठेवणार नाही पण मुलांबाबत काही झाले तर "दृष्ट काढणे" हे करतोच..तेवढेच आमच्या मनाचे समाधान...!! दत्ताचा तो मंत्र आम्हाला कळू शकेल काय?
  • Log in or register to post comments

दत्त मालामंत्र असेल. सर्च

मांत्रिक
Sun, 11/01/2015 - 07:18 नवीन
दत्त मालामंत्र असेल. सर्च मारा नेटवर. खूप ताकदवान मंत्र आहे. नाहीच मिळाला तर नंतर लिंक देईन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

https://www.google.co.in/url

मांत्रिक
Sun, 11/01/2015 - 07:20 नवीन
https://www.google.co.in/url?sa=t&source=web&rct=j&url=http://sanskritdocuments.org/doc_deities_misc/dattamaalaamantra.pdf&ved=0CDEQFjAHahUKEwij79Hzje7IAhWBJaYKHTdAC-Q&usg=AFQjCNEay6Exz4CgItPgy4ak1Q3LXnbMdA
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

मला पाठ होता हा मंत्र . पहिले

उगा काहितरीच
Wed, 11/04/2015 - 16:43 नवीन
मला पाठ होता हा मंत्र . पहिले रोज संध्याकाळी घरातील सर्व लोक एकत्र बसून प्रार्थना व दत्तमाला मंत्र म्हणत असत .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

दत्त या देवतेशी शाकाहार,

मांत्रिक
Sun, 11/01/2015 - 07:24 नवीन
दत्त या देवतेशी शाकाहार, ब्रह्मचर्य, सात्विकता व पावित्र्य या गोष्टी निगडीत असल्याने अनुष्ठानाच्या काळात तरी किमान सावधानता बाळगावी लागते, असे वाचनात आहे. बाकी मी शाक्त असल्याने या बाबतीत ठाम काही सांगू शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

ते दत्त कवच आहे. वेळ मिळाला

संदीप डांगे
Sun, 11/01/2015 - 19:22 नवीन
ते दत्त कवच आहे. वेळ मिळाला की टंकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

मुलांच्या बाबतीत आपण चटकन

इडली डोसा
Sun, 11/01/2015 - 11:11 नवीन
मुलांच्या बाबतीत आपण चटकन हळवे आणि हतबल होतो. माझी मुलगी पावणे दोन वर्षांची असताना अचानक झोपताना बेडरुमच्या दाराकडे बघुन "तो काका नको" "तो काका नको" असं ओरडायला लागली. रात्रीतही किंचाळत ऊठायची. असं तीन चार वेळा झाल्यावर तिच्या डे केअर मध्ये चौकशी केली. तेव्हा त्यांनी सांगितलं की दोन चार दिवसांपुर्वी कोणी तरी सफाई कामगार वर्गाच्या बाहेरुन त्यांच्या वर्गाच्या काचा स्वच्छ करणारा आला होता. त्या माणसाने हूडी घातली होती. त्याला बघुन काव्या खुप घाबरली होती. नंतर खुप दिवस तिला आम्ही समजावत होतो की तो काका तुला हर्ट नाही करणार. आता एक वर्ष झालं या घटनेला अधून मधून ती लोकं साफ सफ़ाईला येत असतात डे केअर मध्ये पण आता ती तेवढी घाबरत नाही. सांगायचा मुद्दा असा की तुमच्या मुलाने ही असा कशाचा तरी धसका घेतला असेल आणि तो घाबरला असेल . आणि कोणत्याही उपायाने का असेना त्याला पुन्हा बरं वाटायला लागलं ते चांगलं झालं. पण तो नक्की कशाला घाबरला वगैरे होता का त्याचाही शोध घ्या म्हणजे पुढच्या वेळी खबरदारी घेता येईल . मंत्राचं वगैरे म्हणाल तर मी रोज मुलीला झोपवताना गणपती अथर्वशीर्ष आणि संकट्नाशन स्तोत्र म्हणते. गणपती हि माझी इष्ट देवता आहे आणि हि दोन्ही स्तोत्रं म्हणुन मला प्रचंड मन:शांती मिळते.
  • Log in or register to post comments

दृष्ट काढावीच. काही गोष्टी

प्यारे१
Sun, 11/01/2015 - 11:24 नवीन
दृष्ट काढावीच. काही गोष्टी मान्य कराव्या लागतात. मोठ्या माणसांना सुद्धा असे प्रकार त्रास देतात. लहानग्यांना पटकन त्रास होतो. ज्या त्या गोष्टीतले जे ते उपचार करुन मोकळं व्हावं त्याला होकारु नये आणि नाकारु देखील नये. का झालं, कुणी केलं, ज्यानं/जिनं केलं त्याला/तिला बघतो हे मुद्दे डोक्यात आणू नयेत. झालं, त्यावर उपाय मिळाला तो केला विषय मिटला.
  • Log in or register to post comments

नजर लागते ह्या गोश्टीवर माझा

अभ्या..
Sun, 11/01/2015 - 12:05 नवीन
नजर लागते ह्या गोश्टीवर माझा विश्वास आहे. बाकी संदीपरावांना आलेला अनुभव जरा इन्स्टंट इफेक्टीव्ह वाटला पण त्यांना आलाय. खरे असणारच.
  • Log in or register to post comments

कुणी काहीही म्हणो, काही

बाबा योगिराज
Sun, 11/01/2015 - 13:03 नवीन
कुणी काहीही म्हणो, काही गोष्टी खरच अतर्क्य असतात. ज्या त्या गोष्टीतले जे ते उपचार करुन मोकळं व्हावं त्याला होकारु नये आणि नाकारु देखील नये. का झालं, कुणी केलं, ज्यानं/जिनं केलं त्याला/तिला बघतो हे मुद्दे डोक्यात आणू नयेत. झालं, त्यावर उपाय मिळाला तो केला विषय मिटला. प्यारे भौ शि सहमत...
  • Log in or register to post comments

पिल्लू!

साती
Sun, 11/01/2015 - 13:55 नवीन
त्या माकडीणीला मराठी उत्तम कळत होतं आणि झाडाच्या शेंड्यावरूनही स्पष्ट ऐकू येत होतं हे पाहून बरं वाटलं. आता - अचानक बोलू शकणारी मुले हळूहळू बोलेनाशी होतात तेव्हा टेंशन येणं सहजिक आहे. त्यातही तुम्ही म्हणताय की बाळ अजूनही पूर्ण नॉर्मल नाही तर त्याला चांगल्या बालरोगत्ज्ज्ञांकडे नेलेले उत्तम. त्यांच्या रेकमेंडेशनने गरज पडल्यास पेडिअ‍ॅट्रिक न्यूरॉलॉजिस्टकडे नेता येईल. बाकी मुलांचे टँट्रम सारखे चालू असतातच.आईवडिलांना बर्‍याचदा सवयीने हे इग्नोअर करता येण्यासारखे आहे की नाही ते समजते. जर मनात जराही किंतु आला तर योग्य त्या डॉक्टरांकडून चेक करून घेणे उत्तम! (हे नसण्याची शक्यता जास्त आहे-पण नॉर्मल हसते खेळते बोलते मुल सडनली शांत अबोल विथड्रॉन होणे ही ऑटिझम किंवा ऑटिझम रिलेटेड डिसऑर्डर्सची / ऑटिझम स्पेक्ट्रमची सुरूवात असू शकते.)
  • Log in or register to post comments

माकडीणीच्या अकलेबाबत शंका ?

प्यारे१
Sun, 11/01/2015 - 17:47 नवीन
माकडीणीच्या अकलेबाबत शंका ? समस्त प्राणिमित्र संघटनेकडून निषेध. सीरियसली प्राण्यांना भाषा समजतात ना? एकाच भवतालामध्ये वाढलेल्या प्राण्यांना ती ती भाषा समजत असावी असं मला वाटतं. घरातला कुत्रा, मांजर सगळं समजतो ना? अर्थात दृष्ट माकडीणीनं काढण्याबाबत साशंकता नक्कीच असणार. इतर उपचाराबद्दल सहमत आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

माकडीणीबद्दलः प्रश्न शब्द वा

संदीप डांगे
Sun, 11/01/2015 - 19:09 नवीन
माकडीणीबद्दलः प्रश्न शब्द वा भाषेचा नाही आहे सातीजी, भाषा ही दुय्यम आहे. आविर्भाव, हातवारे, चेहर्‍याचे भाव यावरून मतितार्थ जाणवतो. फार वर्षांपूर्वी एका दिड वर्षांच्या मुलाने खेळता-भांडता चिडून जाऊन सोबतच्या मुलांना 'जा न बे पोट्ट्या' म्हणजे 'ए भाऊ, डोकं नको खाऊ' हे शब्द अशा आविर्भात ओरडून म्हटले की मी चमकलो. त्या साध्याशा शब्दांच्या ठिकाणी त्याच्या आविर्भावामुळे मला एका अश्लाघ्य शिवीचा प्रत्यय आला. असेच अनुभव इतरांनाही असतीलच. चेहर्‍यावरचे हावभाव प्रत्यक्ष बोललेल्या शब्दांपेक्षा जास्त परिणामकारक ठरतात कधी कधी. शिव्या देण्यामधे योग्य तो आविर्भाव नसेल तर त्या परिणाम साधत नाहीत असं निरिक्षण आहे. मुलाबद्दलः 'ते' सर्व घडण्याआधी सुमारे वीस-पंचवीस दिवस आधी त्याला दात येण्याचा भयंकर त्रास झाला. तेव्हाही त्याचे साधारण असाच रडण्या-चिडण्याचा एपिसोड झाला. दात येत असतांना त्याला शी-ला भयंकर त्रास होत होता. पण तेव्हाचे रडणे आणि हे रडणे यात एक विशेष फरक होता. तेव्हा त्याला डेन्टॉनिक देऊन आराम पडला होता. त्या सर्व काळातही तो पूर्ण नॉर्मल होता. त्या दात येण्याच्या एपिसोड मुळेच आम्हाला सुरुवातीला हेही तसेच काहीसे आहे असे वाटले. पण नंतर त्याचे वेगळेपण जाणवले. एक खबरदारी म्हणून डॉक्टरकडे नेणे हेही योग्यच आहे. प्रतिसाद व मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

तुमचा अनुभव पितरांशी निगडीत असावा

गामा पैलवान
Sun, 11/01/2015 - 14:06 नवीन
संदीप डांगे, तुमचा अनुभव वरपांगी 'नजर लागणे' या प्रकारचा दिसंत असला तरी तो मुळातून एखाद्या पितराचा त्रास असावा असं दिसतंय. दत्ताचं कार्य अतृप्तांना गती देणं आहे. ते काम मंत्राच्या चौथ्या ओळीतच साध्य झालं. तुमच्या किंवा पत्नीच्या पितरांपैकी कोणीतरी मातृसुखाला वंचित झालेला असावा. मुलामार्फत ते सुख भोगायचा त्याचा प्रयत्न असावा असं दिसतंय. जो मंत्र तुम्हाला लाभदायी ठरला त्याची किमान तीन पारायणे (मनात अथवा मोठ्याने) रोज करीत चला म्हणून सुचवेन. बाकी सर्व सांभाळून घेण्यास श्रीदत्तमहाराज समर्थ आहेतंच. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

पैलवान साहेब. मूळ धाग्यात

अभ्या..
Sun, 11/01/2015 - 14:10 नवीन
पैलवान साहेब. मूळ धाग्यात वैयक्तिक अनुभव असला तरी प्रतिसाद ओढायचे पोटेन्शिअल आहेच. तुम्ही नायट्रो बूस्टर लावले. अब क्या. भ्रूम्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

+100

चांदणे संदीप
Sun, 11/01/2015 - 15:22 नवीन
+100
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

+११११११११११११११

बॅटमॅन
Sun, 11/01/2015 - 16:21 नवीन
अगदी अगदी!!!!!! (पथपुटकुळ्या प्रेमी) बॅटमॅन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

पथपुटकुळ्या!! बेक्कार हसतोय.

आदूबाळ
Sun, 11/01/2015 - 18:13 नवीन
पथपुटकुळ्या!! बेक्कार हसतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

=))

अजया
Wed, 11/04/2015 - 21:26 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

लहानपणी दृष्ट काढून घ्यायला

प्रकाश घाटपांडे
Sun, 11/01/2015 - 16:40 नवीन
लहानपणी दृष्ट काढून घ्यायला मला फार आवडायचे.मीठ मोहरी ओवाळून विस्तवावर टाकली की एक दर्प यायचा. तो जेवढा घाण तेवढी दृष्टी पॉवरफूल लागली होती असे समजायचे. मला दृष्ट लागली आहे माझी दृष्ट काढ असे मीच आईला सांगायचो. आजही मला ओवाळून घ्यायला फार आवडते.आमच्या कै. बिट्टू भूभू लाही फार आवडायचे.वाढदिवसाच्या दिवशी आई ओवाळायची तेव्हा बिट्टू पटकन माझ्या शेजारी बसून ओवाळून घ्यायचा. बाकी आपण केलेले उपाय हे वैज्ञानिक दृष्टीकोनात बसणारे नसले तरी त्याने मन शांत व्हायला मदत होते. डोक्यात वळवळणारा किडा शांत होतो. असे माझे निरिक्षण आहे.
  • Log in or register to post comments

सहमत

पैसा
Sun, 11/01/2015 - 16:54 नवीन
बाकी आपण केलेले उपाय हे वैज्ञानिक दृष्टीकोनात बसणारे नसले तरी त्याने मन शांत व्हायला मदत होते. डोक्यात वळवळणारा किडा शांत होतो. असे माझे निरिक्षण आहे.
सहमत आहे. सातीने लिहिल्याप्रमाणे प्रीमॅच्युअर आणि नाजुक बाळ असेल तर सतत डॉक्टरांच्या संपर्कात रहाणे चांगले. एम एम आर ची लस दिल्यानंतर तो बोलायचा बंद झाला असे काही लक्षात आले का? स्वमग्नता एकलकोंडेकर यांच्या लेखाची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

मुलाला एमएमआर दिलेले नाही.

संदीप डांगे
Sun, 11/01/2015 - 19:20 नवीन
मुलाला एमएमआर दिलेले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

+१ अगदी हेच म्हणायला आलतो!

चतुरंग
Sun, 11/01/2015 - 20:35 नवीन
एमेमारची लस दिल्यानंतरचा बदल आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

आमच्याकडे नेमके उलट चालते.

अनिरुद्ध.वैद्य
Sun, 11/01/2015 - 22:35 नवीन
आमच्याकडे नेमके उलट चालते. दृष्ट लागली असेल तर वास मुळीच येत नाही असे मानले जाते. मीठ मिरची प्रत्यक्ष जाळतांना वास न येण्याचे बघितले असल्याने बरेच नवल वाटलेले. मानसिक आधार मिळून जात असेल कदाचित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

डॉक्टरच्या संपर्कात रहा. पण

चैदजा
Sun, 11/01/2015 - 19:33 नवीन
डॉक्टरच्या संपर्कात रहा. पण कुलदैवतेच्या दर्शनास जाऊन या !!!!!
  • Log in or register to post comments

त्या मुलास कसलीतरी भीती बसली

कंजूस
Sun, 11/01/2015 - 19:46 नवीन
त्या मुलास कसलीतरी भीती बसली आहे.रोज "अमुक अमुक ला हाssट करायला आई गेलीय वगैरे सांगितले की भीती खूप कमी होईल. काही नजर लागणे /जादू /मंत्र मारणे वगैरे शंका येत असेल तर फुकट मिळालेल्या संशयित वस्तू फेकून द्या.
  • Log in or register to post comments

असे अनुभव येतात

एक सामान्य मानव
Mon, 11/02/2015 - 10:31 नवीन
माझे बालपण मिरज शहरात गेले. म्हणजे अगदी लहान नसलो तरी १०-१२ वर्षांचा होइपर्यंत तिथे होतो. ब्राह्मणपुरी भागातील जुन्या वाड्यात ताईबाई, किरकिरप्पा असे देव टाइप प्रकार असल्याचे लोक सांगत. तिथे अगदी लहान मुलांना नेल्यावर रडणे, पोट बिघडणे असे त्रास होत. त्यावर जुन्या जाणत्या आजीबाई नारळ वाहणे, ओटी भरणे हे उपाय सांगत. ते केल्यावर बहुदा त्रास बंद होत असे. माझी लहान बहीण तेंव्हा तान्ही होती. तिच्याबद्द्ल असे अनुभव आलेले पाहिले आहेत. बॅटमॅन हे आधिक माहिती देऊ शकतील.
  • Log in or register to post comments

याबद्दल ऐकूनच आहे मोस्टली.

बॅटमॅन
Mon, 11/02/2015 - 11:44 नवीन
याबद्दल ऐकूनच आहे मोस्टली. ब्राह्मणपुरीत न राहिल्याने याबद्दल प्रत्यक्ष अनुभव शून्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक सामान्य मानव

ताईबाईबद्दल माहित नाही पण

रेवती
Wed, 11/04/2015 - 20:49 नवीन
ताईबाईबद्दल माहित नाही पण किरकिरप्पाचे देऊळ मिरजेजवळ आहे. म्हणजे ट्रेनने जावे लागते. लहान मुले किरकिर करत असली किंवा रडूरडू होत असले, झोपत नसली की एकदा किरकिरप्पाच्या देवळात नेऊन आणायची प्रथा खूप पूर्वी होती असे ऐकले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक सामान्य मानव

ताईआई हा खरा शब्द आहे. बहुतेक

मांत्रिक
Wed, 11/04/2015 - 20:52 नवीन
ताईआई हा खरा शब्द आहे. बहुतेक तिय्यम दर्जाची देवता आसावी. तिला पुरणपोळीचा गोड नैवेद्य दाखवतात. साधारण साती आसरासारखे उभे, चपटे ३ किंवा ७ दगड असतात. मी पूजा केली आहे एकदा तासगावातील एका जुन्या घरात. यावर हसू नये. ;) ;) ;) मी मांत्रिकच आहे. असले विषय आवडतातच!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

तिय्यम दर्जा = demigod यक्ष,

मांत्रिक
Wed, 11/04/2015 - 20:57 नवीन
तिय्यम दर्जा = demigod यक्ष, दुष्टग्रह असा अर्थ घ्यावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

कुठे आहे मिरजेजवळ?

बॅटमॅन
गुरुवार, 11/05/2015 - 12:04 नवीन
कुठे आहे मिरजेजवळ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

विचारून सांगेन.

रेवती
Fri, 11/06/2015 - 02:26 नवीन
विचारून सांगेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

नक्की सांगा.

बॅटमॅन
Fri, 11/06/2015 - 11:05 नवीन
नक्की सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

कागवाडजवळ संतूबाई(सटवाई) आहे.

यसवायजी
Fri, 11/06/2015 - 15:36 नवीन
कागवाडजवळ संतूबाई(सटवाई) आहे. इथे लहान मुलांना घेऊन जातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अच्छा तिकडं होय? धन्स बे.

बॅटमॅन
Fri, 11/06/2015 - 17:01 नवीन
अच्छा तिकडं होय? धन्स बे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

स्ट्रेन्ज.

वेल्लाभट
Mon, 11/02/2015 - 10:59 नवीन
स्ट्रेन्ज. पण वर कुणीतरी म्हटल्यप्रमाणे इथे तर्क चालेनासा होतो. आणि प्यारे भाउंशी सहमत की खोलात न जाता सहज सोपा उपाय असेल तर करून मोकळं व्हावं. मनाचं समाधान; बाकी काही नसलं तरी. हे प्रकार ऐकलेले आहेत. विश्वास नाही खरं तर, पण गोष्टी नाकारता न येण्यासारख्या होतात, तेंव्हा एकच वाटतं... स्ट्रेन्ज!
  • Log in or register to post comments

एक जपयंत्र आणा .

_मनश्री_
Mon, 11/02/2015 - 12:09 नवीन
एक जपयंत्र आणा . आमच्याकडे श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र असणारे जपयंत्र आहे चोवीस तास सुरु असते , हलक्या आवाजात कानावर पडत राहते ,त्याने घरात प्रसन्न वाटते मन अगदी शांत राहते तुम्हीही बघा करून हा उपाय , तुळशीबागेत किंवा कुठल्याही पूजासाहित्य मिळणाऱ्या दुकानात मिळते
  • Log in or register to post comments

बरोबर

जातवेद
गुरुवार, 11/05/2015 - 12:20 नवीन
त्याचा चांगला परिणाम होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: _मनश्री_

माकडाच प्रकरण मनातून काढून

दिवाकर कुलकर्णी
Mon, 11/02/2015 - 18:44 नवीन
माकडाच प्रकरण मनातून काढून टाका, त्याचे कांही चाळे असू शकतात ,त्याच्या चाळ्याला, आपण आपल्या मनातला अर्थ देतो, प्रश्न बाळाच्या बरे नसण्याचा , चांगल्या पेडिया याट्रीकला दाखवा, मंत्र जप जाप्य नं ,तुम्हाला बरं वाटेल बाळाला नाही , त्यात अडकून पडू नका , माकडाचा किस्सा पुन्हा कुणाला शेअर करि नका ,हळव्या मनाला अशा गोष्टी लगेच पटतात,बाळाला लवकर बरे वाटूदे ही सदिच्छा , व अनेक आशीर्वाद
  • Log in or register to post comments

+१

असंका
Fri, 11/06/2015 - 17:56 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिवाकर कुलकर्णी

स्त्रोत्र - मंत्राच सामर्थ्य अफाट आहे

काव्यान्जलि
Wed, 11/04/2015 - 14:55 नवीन
स्त्रोत्र - मंत्राच सामर्थ्य अफाट आहे. त्या साठी "सोत्र-मंत्राचे विज्ञान " म्हणून पुस्तक मिळतं. खूप छान आहे ते.
  • Log in or register to post comments

साला एक शंका आहे,

बाबा पाटील
Wed, 11/04/2015 - 20:01 नवीन
झपटाणारी भुते नेहमी,मरि आई,सटवाई,खविस यांचीच का असतात ? ती आईन्स्टाइन्,आयसेनहावर्, दानबो माउली,तुकोबाराया,किंवा शुर विरांची का बरे नसतात, अगदी गेला बाजार पेशवाईतला अतृप्त आत्मा राघोभरारीने पण कुनाला झपटाल्याचे ऐकिवात नाही.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा