दळींद्रं
तोंडात माणिकचंद रिकामा करुन बब्यानं गस्टेल नेम धरुन रिंगणात फेकला. तशी आदीली रिंगणाभाईर आली. पण गस्टेलबी थोडा रिंगणाला लायनीला शिवत पडला.
"बल्ल्या " उड्या हाणत संत्या, राम्या, आन राजा किंचाळली.
बब्यानं पळतच जाऊन गस्टेल नीट बघितला.
" ये आरं आतच हाय की " चवड्यांवर बसुन बब्या पोरांकडं बघत म्हणाला.
मग संत्यानं एक बारकिशी काटकी घीऊन रिंगणाच्या लायनीवर हळुहळु फिरवली. बाकीची पोरं नीट नजर लावुन बघाय लागली. गस्टेल थोडासा हलला.
"बल्ल्या " पुन्हा एकदा पोरं ऊसळली.
"ये बल्ल्याच झालाय, टाक आजुन येक आदीली" संत्या सुड ऊगवत म्हणाला.
माणिकचंदची पिचकारी मारत बब्यानं खिशात हात घातला. त्याच्या खिशात शंभर गोष्टी. माणिकचंदची आख्खी माळ त्याच्या दोन्ही खिशात भरुन मावायची. बराच वेळ खुसपुस करुन घोळुन घोळुन त्यानं एक आदीली भाईर काढली. ऊभ्या ऊभ्याच त्यानं ती रिंगणात फेकली. सगळं पैसं पुन्हा रिंगणात ठिवुन नवा डाव सुरु झाला.
आता संत्यानं गस्टेल हातात धरला. पोरांनी श्वास रोखुन धरला. संत्याचा गस्टेल एकदम कारी. सप्पय. नेम धरुन त्यानं आज्जाद गस्टेल रिंगणात सोडला. बरोब्बर रुपायावर पडला. त्ये पण रिंगणाच्या आत.
"ठोचळाच मारला की लगा त्वा" राजा हाताची घडी घालत कपाळावर आठ्या पाडत हासतच म्हणाला.
बब्यानं तोंडावर बोटं ठिवुन आजुन एक पिचकारी मारली.
" आपला गस्टेल हाय भाव्वं त्वो" मांडीवर थाप टाकत संत्यानं रुपाया ऊचलला.
"पाच कमी चाळीस, आज वीस रुपय गेलं" विचार करत बब्या मनाशीच म्हणाला. काल तिरट खेळताना तो सत्तर रुपय हारला होता. आन आजच्या रिंगाटात बी त्याला नशीब साथ देत नव्हतं.
डाव संपत आला तरी बब्याला टाकलेली मोज बी परत मिळाली न्हाय.
"चलै आजुन एक डाव खीळु" बब्यानं आजुन एक माणिकचंदची पुडी फोडली.
"बास करय आता, संध्याकाळी यं, घरामागं खीळु" संत्या खिशातला खुर्दा वाजवत म्हणाला.
" आसं कसं?, माझं पैशं गेल्यात, आजुन एक डाव तुला खेळायच लागल " बब्या भाया वर सारत म्हणाला.
"निघ आता" राजानं त्येला बाजुला सारलं. पोरं समदी घराकडं निघुन गेली.
बब्या हिरमुसला. जरा वेळ बसुन गावात गेला. आजपण त्यानं शाळेला दांडी मारली हुती. चौथीच्या वर्गात नापास होत होत त्याला मिसरुडं फुटली हुती.
चौकात त्याला मन्या दिसला. दोघं जिगरी दोस्त. हाणमाच्या हाटीलात भजीपाव हाणुन रॉयल थेटरात दोघबी पिक्चर बघाय गेली. थेटर कसलं पत्र्याची खोलीच ती. मधोमध टिवी ठेऊन व्हि सी आर वर पिक्चर दाखवायचे. सगळेच मिथुनचे. पाच रुपायामध्ये. माणिकचंदच्या पुड्याच्या पुड्या फोडुन दोघबी पिचकाऱ्या मारत सिनेमा बघत बसले. कटाळा आल्यावर मधनचं ऊठुन दोघबी चौकात आली.
" घारापुरीला जायचं कारं जत्रला? यीव तमाशा बघुन" मन्या कॉलर मोकळी सोडत अॅक्शन घेत म्हणाला.
"बापाला कळलं तर गुरावाणी बदडलं, जाऊ आता घरीच" बब्याला त्याचा खवीस बाप आठवला.
" कुंचा पीच्चर बघितला रं फोपलीच्या ?" बाप त्येच्या मागचं ऊभा होता.
बापाला बघुन बब्या घाबरला. मन्या धुम ठोकून कुठं गायब झाला त्याला कळलं पण न्हाय.
पळतच बब्या घरी सुटला.
बापानं बी एम ऐटी काढुन त्याचा पाठलाग सुरु केला. बाप जवळ आला तसा माळ्याच्या शेतात ऊडी घेऊन तो ऊसात पसार झाला.
गाडी वाटला लावुन त्याच्या बापाने दोनचार दगड ऊसात भिरकावले.
" रातच्याला यी घरी, कापुनच टाकतू तुला" रागारागानं दम देऊन बब्याचा बाप पुन्हा गावात गेला.
ढेकळं आणि चिखलात बब्याला काय चालनं हुईना. रडतच तो कसाबसा चालत राहिला. फडातनं भाईर यीवुन पांदीचा रस्ता पकडला. मग पुन्हा वगळीतनं चालत तुकाच्या शेतात शिरला.
मागल्या वेळी जवा बापानं बब्याला तंबाखू खाताना पकडलं तवा त्याला दिवसभर झाडाला बांधुन ठिवलं हुतं. तिरट न रिंगाट खेळताना दिसला तर हाताला घावल ती वस्तु बब्याचा बाप त्याला फेकुन मारायचा. आजतर बापानं थेटरातनं भाईर येताना बघितलं हुतं. बब्या थराथरा कापत चालत राहिला.
हिकडं घरामागं रिंगाट आखुन पोरांचा नवा डाव सुरु झाला.
गस्टेल हातात घीऊन राजानं नेम धरला. सगळ्या पोरांनी श्वास रोखुन धरले. राजानं जसा गस्टेल फेकला तसा भेलकांडत तो पार रिंगणाच्या भाईर जाऊन पडला.
"बल्ल्या" चप्पल हातात घीऊन आन खालुन पॅन्ट दुमडलेला बब्या ऊसाच्या बांधावरनं वरडतचं खाली आला.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
झक्क्कास :)
हाम्गाश्शी.
+११११.
गस्टेल = ढप?
'ढप' हा शब्द बऱ्याच दिवसानी
शब्दार्थ सांगाओ. नायतर सगळ्या
गस्टल = मोठी गोटी, कंचा
अभ्याराजे अत्यंत धन्यवाद,
जबरदस्त
तुमच्या कथा आवडतात. हीसुद्धा
+१
आवडली
लैच भारी. आवडेश
तुमच्या कथा मस्त असतात... खूप
सगळ्यांचे आभार्स !!!
मस्त
आवड्या
मस्त...
मस्त कथा आहे.
जव्हेरभाउ काहीही लिहा..
भाउ एक नम्बर
जव्हेर भौ
+१००
ख्या ख्या ख्या...
मस्त!
जव्हेरगंज भौ.. एक नंबरा लेखन
+ पाहिजे तितके घ्या!
_/\_ भरुन पावलो अस्वस्थामा,
छान प्रतिसाद अस्वस्थामाभाऊ.
अस्वस्थामा यांनी समस्त
जबरी!
आहे ++ १
मस्त! अजून येऊ द्या.
मस्तच!