Skip to main content

अर्थसाक्षरता

मंगळवार, 13/10/2015 या दिवशी प्रकाशित केले.
भाचीला नवी स्कूटर घ्यायची होती. एका शो रूममध्ये गेलो होतो. गाडीची किंमत सांगितली 54851 रुपये, हप्त्याने घेतल्यास रोख रु. 20230 पहिल्यांदा, आणि एकतर 1971चे 24 हप्ते - म्हणजे 47304, एकूण 67534; किंवा 1477चे 36 हप्ते - म्हणजे 53172, एकूण 73402. पहिल्या केसमध्ये वर्षाला फक्त (?) व्याज पडते म्हणे ६५०० रु. तर दुसर्‍या केसमध्ये वर्षाला व्याज पड़ते ६२०० रू. त्यांच्या दॄष्टीने. व्याज होते म्हणे ११.३० किंवा ११.८५ टक्के त्यांच्या दॄष्टीनं ते फक्त होते. इतंकच व्याज कसं होतं सांगा म्हटल्यावर त्या सेल्स गर्लनं आम्हाला, कंपनीनं तसंच सांगितलंय एवढच उत्तर होतं. मी स्वतःच हिशोब केल्यावर माझ्या लक्षात आलं की पहिल्यांदा रोख दिलेली रक्कम त्यांनी सोईस्कररित्या हिशोबात धरली नव्हती. शिवाय दर महिन्याला लोन हप्ता दिल्यामुळं कमी झालेला लोन बँलन्सही त्यांनी विचारता घेतला नव्हता. प्रत्यक्षात लोन अमाउंट होतं केवळ ३४६२१ रु दर महिन्याला हप्त्याने ती फेडत असल्यामुळे निम्मंच क़र्ज़ वापरलं असं होतं. त्यामुळे कर्ज खरं तर फक्त १७३१०रु. होतं, त्यावर हे ६२०० किंवा ६५०० व्याज आकारणार, म्हणजे व्याजाचा दर पडला वर्षाला जवळजवळ ३५ टक्के.. हे सर्व बेहिशोबी होतं. ही सरळसरळ लूट होती. पण अर्थसाक्षरतेच्या अभावामुळे फ़ायनान्स कंपन्यांचं फावतं. हप्त्याने वस्तूच्या भूलभुलैयाख़ाली लोकाना या कंपन्या गंडवतात. गाड्यांच्या त्या शो रूममध्ये एक फायनान्स कंपनी दुकानच मांडून बसली होती. दोघांचं नक्कीच साटंलोटं असणार. शो रूम मालकालाही गाड्या रोखीनं विकण्यात स्वारस्य दिसलं नाही. राजन व्याजाचे दर कमी करतात, इथं आलम दुनिया मात्र बेख़बर असते अशा तर्‍हेने घेतलेली 'प्लेझर' प्लेझरदायी नव्हती, भाचीला मी एक सहकारी बँक गाठून दिली.

वाचने 14171
प्रतिक्रिया 71

प्रतिक्रिया

हे खरे आहे. माझ्या पर्सनल लोनच्या वेळेस मला याचा फटका बसलाच. आता एक एक रुपयाही जपून विचारपूर्वक खर्च करतो.

एव्हडा किचकट विचार कोणी करत नाही , जो करतो त्याला वेड्यात काढतात. गृह कर्ज आणि शिक्षण कर्ज सोडून बाकीची सर्व कर्जे हि हजार वेळा विचार करून घ्यावीत आणि शक्यतो घेऊच नयेत. एक्ष्केल मध्ये लोन amortization नावाची दिफोल्त template येते. ती वापरून आधी नक्की किती पैसे द्याचे ते शोधा कंपनी काय लोन रेट म्हणते ते बघू नका. खरे आकडे कळतात ( आणि डोळे पांढरे पण होतात )

In reply to by बिहाग

एक्सेलमध्ये दोन फंक्शन्स खूपच उपयुक्त असतात-- १. दर महिन्याचा हप्ता किती हे शोधून काढायला PMT हे फंक्शन उपयुक्त असते. समजा कर्ज ५० लाख असेल, कालावधी २५ वर्षे किंवा ३०० महिने असेल आणि वर्षाला व्याजाचा दर ९.५% असेल तर एक्सेलमध्ये पुढील फंक्शन लिहिल्यास दर महिन्याचा हप्ता किती ते एक्सेल आपल्याला सांगेल: =PMT(9.5%/12,300,5000000,0) . या फंक्शनप्रमाणे एक्सेल दर महिन्याला ४३,६८४.८३ रूपये हप्ता पडेल हे सांगेल. खरं तर वर्षाला ९.५% म्हणजे महिन्याला ९.५% भागिले १२ = ०.७९२% इतका रेट पडत नाही तर तो येतो ०.७५९%. पण ०.७९२% लिहिले तरी उत्तर थोडेसेच इकडेतिकडे होईल. २. समजा कर्जाची रक्कम आणि दर महिन्याचा हप्ता माहित असेल तर व्याजाचा दर किती हे शोधून काढायला RATE हे फंक्शन उपयुक्त आहे.समजा कर्ज ५० लाख असेल, कालावधी २५ वर्षे किंवा ३०० महिने असेल आणि दर महिन्याला ४३,६८४.८३ रूपये इतका हप्ता असेल तर =RATE(300,-43684.83,5000000,0) असे लिहिल्यास एक्सेल दर महिन्याचा व्याज दर सांगेल. तो या उदाहरणात दर महिन्याला ०.७९१७% इतका येतो. तो दर महिन्यालाच हवा असेल तर काही प्रश्न नाही पण जर दर वार्षिक हवा असेल तर जो दर येईल त्याला पुढील पोस्ट-प्रोसेसिंग गरजेचे असते. समजा महिन्याचा दर ०.८२% इतका आला. तर वार्षिक दर किती हे काढायला =(1+0.82%)^12-1 असे लिहावे आणि एक्सेलमध्ये सेलचा पर्सेंटेज format करावा. या उदाहरणात एक्सेल आपल्याला वार्षिक व्याजाचा दर १०.३०% आहे असे सांगेल.

In reply to by आदूबाळ

PMT मध्ये रक्कम निगेटिव्ह लिहायला हवी ना?
सवयीने मी एक गोष्ट करतो. आपल्याला पैसे भरायचे असतील तर ते ऋण आणि पैसे मिळणार असतील तर ते धन असे आकडे एक्सेलमध्ये टाकतो. आपण ५० लाख कर्जाऊ घेतले असतील तर आपल्याला सुरवातीला ५० लाख मिळणार म्हणून ते धन लिहिले. एक्सेल PMT या फंक्शनचा वापर करून उत्तर ऋण देईल. म्हणजे आपल्याला दर महिन्याला पैसे भरावे लागणार. तसेच केले पाहिजे असे नाही. PMT मध्ये जर आपल्याला सुरवातीला कर्ज मिळणार म्हणून रक्कम ऋण लिहिली तर PMT उत्तर धन देईल. RATE या फंक्शनमध्ये मात्र आपल्याला दोन्ही गोष्टी-- सुरवातीला मिळालेले कर्ज आणि महिन्याचा हप्ता द्यायच्या असतात.त्यापैकी एक धन आणि दुसरी ऋण नसेल तर एक्सेल एरर देईल. म्हणजे ही गोष्ट अशीच केली पाहिजे असे नाही.मी माझ्या सवयीचा भाग म्हणून त्या प्रकारे ते लिहितो.

In reply to by gogglya

मलाही हेच जाणून घ्यायचे आहे. (शाळेत द.सा.द.शे. कडे लक्ष दिले असते तर ही वेळ आली नसती, पण असो!) मलाही अशी शंका येतीये की पहिल्या वर्षी दरमहा दिल्या गेल्या हप्याने दुस-या वर्षी जी व्याचाची रक्कम शिल्लक असेल त्यावरच तो व्याजदर लावला गेला पाहिजे. (खूपच अडाणी मत मांडले असल्यास किमान पळण्याची तरी संधी द्यावी ही णम्र विनंती!) गणीत-बिनीत इल्ले येणारा Sandy

In reply to by चांदणे संदीप

समजा १०० रुपये वर्षाच्या सुरुवातीची बाकी आहे. परतफेड करत करत वर्षाच्या शेवटी समजा बाकी शून्य राहिली. मग वर्षभर आपण किती रक्कम वापरलीत ? यासाठी सुरुवातीची बाकी आणि शेवटची बाकी या दोन संख्यांची सरासरी काढून ती रक्कम आपण वर्षभर वापरली असं गृहित धरू शकतो. म्हणून शंभरच्या निम्मी म्हणजे पन्नास रुपये एवढी रक्कम आपण एक वर्षभर वापरली असं म्हणता येतं... पण जर वर्षाअखेरची बाकी रक्कम शून्य असेल तरच अशी सरळ निम्मी रक्कम ही सरासरीएवढी येइल. वर्षाअखेरची बाकी समजा पन्नास असेल, तर शंभर आणि पन्नासची सरासरी घ्यावी लागेल - जी काही शंभरच्या निम्मी असणार नाही. हे सगळे जर व्याजदर दसा (दसादशे मधला) मध्ये हवा असेल, तरच लागू आहे.
मलाही अशी शंका येतीये की पहिल्या वर्षी दरमहा दिल्या गेल्या हप्याने दुस-या वर्षी जी व्याचाची रक्कम शिल्लक असेल त्यावरच तो व्याजदर लावला गेला पाहिजे.
इ एम आय पद्धतीने परतफेड करत असल्यास - व्याज दर महिन्याला जेवढे लावले जाते, तेवढी रक्कम दर महिन्याला वसूलच केली जाते. जोवर हप्ता थकत नाही, तोवर व्याजावर व्याज चढत नाही. दर महिन्याला आपण जो हप्ता भरता, त्यात व्याज आणि मुद्दल अशा दोन्ही रकमा असतात. व्याज हे त्या महिन्याच्या सुरुवातीली जी बाकी होती, त्यावरचे एका महिन्याचे व्याज असते. हप्त्याच्या रकमेतून हे व्याज वजा जाता जी रक्कम शिल्लक असते, ती मुद्दलापोटी वळती होते आणि 'बाकी'ची नवीन रक्कम मिळते. पुढील महिन्याचे व्याज, हे या नवीन बाकी रकमेवरच लागणार असते. महिन्यागणिक हप्त्यातील व्याजाची रक्कम कमी होत जाते, आणि मुद्दलाची रक्कम वाढत रहाते. हप्ता कायम एकसारखा रहातो.

अर्थसाक्षर असणे खूपच महत्वाचे आहे. नाहीतर बॅंका, विमा कंपन्या आणि इतर ठिकाणचे लोक हातोहात शेंड्या लावू शकतात. २०१० च्या सुमारास हायेस्ट एन.ए.व्ही ची खात्री देणाऱ्या पॉलिसीचा सुळसुळाट झाला होता.म्हणजे २० वर्षे जर पॉलिसीची मुदत असेल तर त्या २० वर्षात सर्वाधिक एन.ए.व्ही (मग ते २०१० ते २०३० या काळात कधीही आले असू दे) प्रमाणे शेवटी प्रत्येक युनिटला एन.ए.व्ही मिळणार असा प्रकार होता.असे कंपनीने खरोखरच केले आणि लोकांचे पैसे सगळे इक्विटीमध्ये टाकले असतील तर कंपनीला प्रचंड मोठ्या तोट्याला सामोरे जावे लागायची शक्यता असल्यामुळे लोकांचे बरेचसे पैसे सरळ कमी रिटर्न देणाऱ्या सरकारी बॉंडमध्ये या कंपन्यांनी टाकले. म्हणजे मुळात रिटर्न मिळणार ७-८%. त्यात ३-४% यांचे चार्जेस.त्यातून इफेक्टिव्ह रिटर्न अवघा ४-५%. त्यापेक्षा साधे बॅंकेत फिक्स्ड डिपॉझिट केले तरी त्यापेक्षा अधिक चांगले रिटर्न मिळाले असते. २००५-०६ पासून युलिप पॉलिसी बाजारात आल्या.सुरवातीच्या काळात पहिल्या तीन वर्षांत गुंतवणुकदारांनी गुंतवलेल्या वार्षिक रकमेच्या तब्बल २०-२५% रक्कम पॉलिसी ऍडमिनिस्ट्रेशन चार्जेस म्हणून या कंपन्यांनी खाल्ली होती. त्यामुळे अशा पॉलिसीचा ब्रेक-इव्हन यायलाच पाचेक वर्षे लागत. अशा लोकांचे बोलणे इतके मिठास असते की काही विचारू नका.हातोहात खोटे बोलणे त्यांना कसे जमते याचेच आश्चर्य वाटते.मी २००८ मध्ये अर्थसाक्षर नव्हतो.त्यावेळी अशीच एक पॉलिसी माझ्या गळ्यात एकानी मारली होती.वार्षिक प्रिमिअम २० हजार रूपये.आणि ५ वर्षांनी जितके युनिट जमले असतील त्याच्या १२.५% युनिट बोनस म्हणून देणार असे सांगितले होते.मला वाटले होते की लाखभर रूपयाच्या १२.५% म्हणजे किमान १२५०० रूपयांचे युनिट मला मिळतील. पण कुठचे काय. १२.५% युनिट कंपनीने मला २०१३ मध्ये दिले पण ते तोपर्यंत जमलेल्या युनिटच्या १२.५% नव्हे तर वार्षिक प्रिमिअम २० हजार रूपयांच्या १२.५% म्हणजे अडीच हजार रूपयांत येतील तितके युनिट!! असे मिससेलिंग इतक्या प्रमाणात झाले आहे की देशातील सगळ्या गुंतवणुकदारांच्या मिससेल करून गळ्यात मारलेल्या पॉलिसी एकत्र केल्या आणि त्यात गुंतवणुकदारांचे नुकसान झाले त्याचा आकडा बघितला तर तो आणखी एखादा टू-जी स्पेक्ट्रम घोटाळा होईल!! ही अतिशयोक्ती असेलही पण सांगायचा मुद्दा म्हणजे असे मिससेलिंग मोठ्या प्रमाणावर चालत आले आहे आणि अजूनही चालते. हे सगळे एजंट कुठलीही पॉलिसी गळ्यात मारताना नेहमी म्हणतात की तुम्हाला या पॉलिसीमधून ८० सी मधून टॅक्स बेनिफिट मिळेल. पण लक्षात घ्यायचा मुद्दा म्हणजे ८० सी मधून दोन वर्षांपूर्वीपर्यंत १ लाख आणि आता १.५ लाख इतकेच डिडक्शन मिळू शकते.आणि त्यात पगारामधून कापल्या जाणाऱ्या पी.एफ चा, पी.पी.एफ चा आणि अशा गोष्टींचा समावेश असतो. त्या मानाने १.५ लाख ही रक्कम बरीच कमी आहे.त्यामुळे ती अशा पॉलिसी न घेताही अर्ध्यापेक्षा जास्त आरामात संपते.तेव्हा अशी पॉलिसी टॅक्स बेनिफिटसाठी घेतली तरी आपल्या अपेक्षेपेक्षा बहुतांश वेळा बराच कमी बेनिफिट मिळतो. असे अनेक प्रकार आहेत. याविषयी लिहावे तितके थोडेच आहे. हे का घडते? कारण बॅंकेतल्या कर्मचाऱ्यांना प्रत्येकाला क्रॉससेलचे टारगेट दिलेले असते.ते टारगेट पूर्ण करण्यासाठी ते वाटेल त्या गोष्टी लोकांच्या गळ्यात बांधतात.विमा कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांनाही अशीच टारगेट असतात.हे लोक त्यांचे टारगेट पूर्ण करण्यासाठी हजारवेळा फोन करतात. लोचटपणा तर काही विचारूच नका.त्यापेक्षा मांजरेही कमी लोचट असतील. माझ्या आईच्या गळ्यात सांगलीतल्या बॅंकेतल्या मंडळींनी अशा अनेक गोष्टी मारल्या.हा प्रकार लक्षात येताच मी आईला सांगितले की आपण नक्की काय विकत घेत आहोत हे समजत नसेल तर त्या भानगडीत पडू नकोस. सरळ बॅंकेत एफ.डी कर. मागे एकदा मी घरी गेलो होतो.मी येणार हे कळताच चारचार वेळा माझ्या आईला त्यांच्याकडून फोन गेले. म्हणजे गळ्यात काहीतरी बांधायला एक बकरा येणार असे त्यांना कदाचित वाटले असावे.माझी बस लेट होऊन मी सकाळी साडेआठच्या सुमारास घरी पोहोचतो तर अर्ध्या तासात मंडळी नवी काहीतरी पॉलिसी घेऊन घरी हजरही झाली. आता बोला. अमेरिकेत असताना ऍमवेवाल्यांनी पिच्छा सोडला नव्हता. आणि आता हे असे काहीतरी गळ्यात बांधणारे लोक पिच्छा सोडत नाहीत!!

In reply to by गॅरी ट्रुमन

असलं काय लिहत जा की राव... राजकारण, बिजकारण कितीही कुटलं तरी हाती काय लागत नाय डोक्याचं भजं होण्यापरिस... असले दोनचार ज्ञानामृताचे थेम्ब कैकांची आयुष्यं सरळ करून जाऊ शकतात.. नैका...?

पर्सनल लोन शक्यतो टाळावेच. गाड़ी, घोड़ा, टीव्ही सुलभ किंवा असुलभ कसल्याही हप्त्यावर घेताना दहा वेळा विचार करावा. गृहकर्ज भरपूर घ्यावं आणि पटकन repay करता आलं तर करावं (1 ते 3 वर्षाच्या काळात) अन्यथा चालू ठेवावं, नवं कर्ज काढण्यासाठी कर्ज काढेपर्यंत. सध्या नकोच. फ़क्त गृह कर्जाच्या हप्त्या व्यतिरिक्त अधिक रक्कम असली तर एखाद्या सहकारी बॅंकेत किंवा चांगल्या पतसंस्थेत ठेवावी जिथे थोडेफार व्याज मिळू शकते (तशी शक्यता फार कमी आहे सध्या) एफ डी स्वरुपात. शेयर मार्केट वगैरे झेपत असेल तरच. - धागा चालू राहून अधिक चांगल्या प्रतिसादांच्या प्रतिक्षेत. ट्रूमनभौ चा प्रतिसाद अभ्यासपूर्ण असतो, म्हात्रे साहेबांचे लेख परफेक्ट असतात, मिकाच्या कविता, जयन्तरावांच्या कथामालिका, बोक्याचे अनुवाद क्लास असतात हे आता आम्ही लिहित नसतो. ते बाय डिफ़ॉल्ट आहे.

इतका excel ,वगैरे घोळ का घालता आहात ? हिशोब सरळ आहे.वीस हजार भरल्यावर उरलेले पस्तीसएक हजार भरायचे आहेत ते तुम्ही कर्ज म्हणून घेतलेत.चोवीस हप्त्यात म्हणजे दोन वर्षांसाठी. किती परत करायचे आहेत तर रुपये सत्तेचाळीस हजार म्हणजे बारा हजार रु व्याज पडलं. पस्तीस हजार रु दहा टक्के व्याजाने एक वर्ष घेतल्यास साडेतीन हजार आणि वीस टक्कयाने सात हजार व्याज होईल.दोन वर्षांचे सात आणि चौदा हजार होतात.याचा अर्थ अठरा ते वीस टक्क्यांच्या आसपास व्याज पडलं.हा तोंडी ढोफळ हिशोब झाला.

In reply to by कंजूस

नाही कंजुसकाका, वर क्लिंटन यांनी सांगितलेल्या पध्दतीने व्याज काढले तरव्याजाचा दर २४ महिन्यांसाठी दरमहा २.६६% इतका येतो म्हणजे वार्षिक ३१.९७% आणि ३६ महिन्यंसाठि तोच दर दरमहा २.५३% येतो म्हणजे वार्षिक ३०.३८% पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

vareela प्रतिसाद लिहिताना मी २.६६% गुणिले १२ असे करुन व्याजाचा दर ३१.९७% असा काढला होता. जर क्लिंटन यांनी दिलेला दुसरा फॉर्म्युला वापरला =(1+RATE(36,-1477,34621,0))^12-१ तर तोच दर ३५.९९% इतका दिसतो आहे. या दुसर्या फॉरम्यूल्याचे लॉजिक मला अजून निटसे समजले नाही. क्लिंटनसर मदत करा. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

या दुसर्या फॉरम्यूल्याचे लॉजिक मला अजून निटसे समजले नाही. क्लिंटनसर मदत करा.
समजा महिन्याला १% इतका दर असेल तर वर्षाच्या सुरवातीला गुंतवलेले १०० रूपयांची रास १०० गुणिले (१.०१)^१२ = ११२.६८ रूपये इतकी येईल. म्हणजे महिन्याला १% दर याचाच अर्थ वर्षाला इफेक्टिव्हली १२.६८% व्याजाचा दर पडेल.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

(क्लिंटन सरांचा आज्ञाधारक विद्यार्थी) पैजारबुवा,
बापरे घाबरायलाच झाले की :)

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

नाही हो बुवा...त्यांची पद्धत पण बरोबर आहे. फक्त ते सरासरी काढायची राहिली त्यांची- जे मुळ लेखात केलेलेच आहे. त्यांनी पस्तीस हजारवरच सगळे व्याज लागले असं गृहित धरलंय. परतफेड होत गेल्याने, व्याज पस्तीसहजारवर न काढता सतराहजार पाचशेवर काढायला हवं. २४ हप्ते- दहा टक्क्याने एक वर्षासाठी - १७५०; २०% ने- ३५००, ३०% ते ५२५० - २ वर्षासाठी त्याच्या दुप्प्ट- १०,५०० म्हणजे ३१.९७% च्या पुष्कळ जवळ गेले बघा. हे ढोबळ हिशेब आहेत- तोंडी करता येतात आणि निर्णय घेण्यासाठी पुरेसे आहेत.

मी स्वतःच हिशोब केल्यावर माझ्या लक्षात आलं की पहिल्यांदा रोख दिलेली रक्कम त्यांनी सोईस्कररित्या हिशोबात धरली नव्हती. ते ठीक आहे कारण जेवढी रक्कम तुम्ही कर्जावू घेतली तेवढ्याच रकमेचा विचार व्हायला हवा. शिवाय दर महिन्याला लोन हप्ता दिल्यामुळं कमी झालेला लोन बँलन्सही त्यांनी विचारता घेतला नव्हता. मला वाटते ते FLAT RATE प्रकारचे व्याज असावे. REDUCING (MONTHLY QTLY ANNUALLY ) असेल तर त्या प्रकारात मुद्दल कमी होवून उरलेल्या मुदतीवर व्याज आकारले जाते. तेव्हा कर्ज घेतांना हा कर्ज कोणत्या प्रकारचे आहे. हे विचारावे. ( FLAT RATE / REDICING ). सहसा कर्ज दात्या कंपनीच्या पोलिसी प्रमाणे flat प्रकारच्या कर्ज प्रकारावर मुदती आधी कर्ज फेडले तरी संपूर्ण मुद्तीवरील व्याजाची आकारणी होतेच त्यामुळे मुद्तिआअधि कर्ज फेडण्यात काहीच हशील नसतो. अश्या ( flat ) प्रकारची कर्जे देताना कंपनी फारशी कागद पत्रे , जमीनदार इ. मागत नाही. त्यामुळे जर एकाद्याने कर्ज फेडले नाही तर वाहन उचलून परत आणून ते विकून कर्जाची रक्कम वळती करून घेण्याची त्यांची पद्धत आणि ताकत असते. आणि आपण देत असलेल्या कार्चाचे आणि परत फेडीचे मॉडेल त्यांनी त्या प्रकारेच केलेले असते. त्यामुळे आपल्याकडे कागदपत्रे व्यवस्थित असतील तर अश्या खाजगी कंपन्यांकडून कर्ज न घेणे कधीही सोयीस्कर आणि शहाणपणाचे.

२००११ मध्ये मी एक पर्सनल लोन घेतले होते. बँकेने १८% व्याजदर सांगितला. २,२३,००० ची सँक्शन्ड रक्कम होती. हातात २,१२,००० आले. ३६ महिन्यांसाठी मासिक ९५८६ परतफेड होती. . मी त्यावेळी पैशाच्या व्यवहाराच्या बाबतीत गा ढ व होतो. कुठेतरी चुकले असे वाटते. कारण बँकेच्या लोन अकाउंट डीटेल्समधे रेट ऑफ इन्टरेस्ट ३०.+ असं काहितरी दाखवत होतं असं आठवतं. जाणकार विश्लेषण करतील का माझ्या गा ढ व पणाचं... प्लीज...?

गृह कर्जाच्या मासिक हप्त्याचे विश्लेषण. मी २००४ साली घरासाठी एच डी एफ सी कडून १० % दराने १५ लाख गृह कर्ज घेतले त्याचा हप्ता १४००० महिना आहे. पहिला हप्ता गेला तेंव्हा त्यात मुद्दल १५०० रुपये आणि व्याज १२५०० गेले हे पाहून मी अस्व्स्थ झालो होतो.आणि माझे कर्ज १४,९८,५००/- बाकी होते. माझा सिव्हिल इंजिनियर मित्र म्हणाला. तुझ्या १५ लाखाचे १० टक्क्याने व्याज १५०,००० होते म्हणजे महिन्याला १२५०० होते. एच डी एफ सी काही तुझ्या बापाची कंपनी नाही तेंव्हा ते व्याज घेणारच. पुढच्या महिन्यात १४,९८,५०० रुपये मुद्दलाचे व्याज घेणार आणि उरलेले पैसे मुद्दलातून कमी होणार. हा असा हिशेब आहे. एच डी एफ सी हि गृह कर्ज वितरणातील अग्रेसर कंपनी आहे आणि त्यांचे व्यवहार बर्यापैकी पारदर्शक आहेत. शिवाय घराची कागदपत्रे पूर्ण असल्याशिवाय ते एखाद्या प्रकल्पासाठी कर्ज देत नाहीत आणि या बाबत ते अतिशय काटेकोर आहेत.( आय सी आय सी आय सारख्या इतर संस्था या बाबत ढिसाळ आहेत त्यामुळे प्रकल्प रखडला तर तुम्ही लटकता पण "कर्ज वसुलीबाबत" मात्र ते फार जागरूक आहेत) त्यामुळे एखाद्या प्रकल्पात पैसे गुंतवायचे असतील तर त्याला एच डी एफ सी चे कर्ज मंजूर आहे का ते पहा आणि पुढे जा असा सल्ला बरेच सिव्हील इंजिनियर देतात.

In reply to by सुबोध खरे

sbi हि HDFC पेक्षा जास्त चिकित्सा करते पण शेवटी हे सगळे लोक तुमची कर्जे परत करण्याची कुवत बघतात तेव्हा त्यांचावर अवलंबून राहण्या पेक्षा वकीला कडून आपण स्वतः कागद पत्रे तपासावीत हे सगळ्यात उत्तम

In reply to by सुबोध खरे

खरे साहेब, तुमच म्हणण बर्‍याच अंशी बरोबर आहे. पण बिहाग म्हणतात त्याप्रमाणे शेवटी हे सगळे लोक तुमची कर्जे परत करण्याची कुवत बघतात आणि त्यावरुनच कर्ज मंजुर करतात. पण जर बँकेच्या approval वरुन काही ठरवायचे असेल तर त्यातल्या त्यात SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, या कर्ज देतांना अत्यंत नालायक (पक्षी चांगल्या) अशा बँक आहेत ज्या खुप जास्त चौकशी करतात. HDFC ची process त्या मानाने सोपी आहे. मात्र एकदा कर्ज मंजुर केल्यावर SBI काहिही त्रास देत नाही. व्याज दर अगदी इमाने-इतबारे कमी (किंवा जास्त) करते. हे HDFC बाबत लागु होत नाही. कारण ती बँक नाही. ती Housing Finance Company आहे. त्यामुळे ती RBI ने सांगितल्याबरोबर व्याजदर कमी करत नाही. त्यांना ते बंधनकारकही नाही. आणि बर्‍याच वेळा HDFC processing fee घेते जी SBI मधे नसते. ---- (एक पस्तावलेला HDFC होम लोन ग्राहक) कानडा

In reply to by कानडा

HDFC चं माहिती नाही पण SBI सारख्या बँका भरपूर कागदपत्रे मागतात पण नंतर यांचे छुपे चार्जेस काही नसतात. उलट ICICI सारख्या बँकांबरोबर डील करताना खात्री करून घ्यावी. कर्जे गळ्यात मारेपर्यंत यांचे प्रतिनिधी तुम्हाला बँकेचे तोंड पण पाहू देत नाहीत इतकी उत्तम सर्व्हिस देतात पण नंतर छुपे चार्जेस इ. बरेच असतात. जसे पूर्वी ICICI मुदत पूर्व कर्ज परतावा/ पूर्तीवर २% चार्ज लावत होती आताचे माहिती नाही. चुकून तुमच्या हप्त्याची तारीख चुकली तर ३००-५०० रु दंड आकारत होती. तेव्हा या गोष्टी स्पष्टपणे विचारून घ्याव्यात. BoM चं माझा अनुभव थोडा विचित्र आहे. २०१० साली त्यांनी कर्ज देताना घराचे मोर्गेज रजिस्ट्रेशन करावे लागेल हे सांगितले नव्हते आणि त्याचा खर्चही मला सांगितला नव्हता. खरेतर घराच्या किमतीच्या ५०% रक्कमच मी कर्ज म्हणून घेत होतो मुळ कागदपत्रे बँकेकडेच राहणार होती तरीसुद्धा कर्ज मंजूर झाल्यानंतर ऐन डिस्बर्स्मेण्ट च्या वेळी हा मुद्दा लावून धरला. बरीच वादावादी झाली पण इलाज नव्हता. ICICI सारख्या बँका याची मागणी करत नाहीत घराची/ कर्जाची रक्कम मोठी असते तेव्हा हा एक चांगल्यापैकी खर्च असतो.

In reply to by सुबोध खरे

बघतात. SBI चे कर्ज मंजूरीचे निकष HDFC पेक्षाही जास्त कडक आहेत. पण त्याचाच दूसरा अर्थ असा होतो की तुमची मालमत्ता पुर्णपणे निर्धोक आहे. माझ्या स्वतःच्या फ्लॅट साठी कर्ज घेताना हा अनुभव आला.

In reply to by सुबोध खरे

पहिला हप्ता गेला तेंव्हा त्यात मुद्दल १५०० रुपये आणि व्याज १२५०० गेले हे पाहून मी अस्व्स्थ झालो होतो.आणि माझे कर्ज १४,९८,५००/- बाकी होते. अगदी खरं आहे. म्हणून "amortization schedule " पाहणे गरजेचे असते. वरील उदाहरणाचा विचार केला तर थोडी काटकसर करून २०-२२००० रुपये कर्ज खाती जास्तीचे भरले म्हणजे तर आपले १२-१५ हप्ते वाचले! म्हणजेच त्या हप्त्यांवरील बँकेला जाणारे व्याज वाचले. कारण ते पैसे थेट मुद्दलातून वजा होत असतात. यात आपला फायदा आणि बँकेचा तोटा आहे. कदाचित म्हणूनच बर्याच बॅंका आजकाल हे देण्यासाठी काही तरी कारणे सांगून टाळाटाळ करत असतात. आपल्याला ते excel वापरून सहज काढता येत किंवा amortization schedule calculator online उपलब्ध आहेत. मी २००२ मध्ये गृह कर्ज घेतलं होतं तेव्हा हे schedule बघून कसे पैसे भरले तर किती हप्ते वाचतील याची नोंद करून ठेवली होती. पहिल्या काही वर्षात मुद्दल जास्ती असल्याने व्याज जास्ती असते त्यामुळे इ एम आय मधला व्याजाचा भाग जास्ती असतो.

In reply to by दत्ता जोशी

amortization schedule ह्याबद्दल तुम्ही किंवा क्लिंटन लिहु शकाल का? वेगळा लेखच लिहा कुणीतरी गृहकर्ज ह्या विषयावर..

In reply to by पिलीयन रायडर

पिराताई,२५ वर्षांच्या अ‍ॅमोरटायझेशनची एक्सेल शीट https://drive.google.com/file/d/0B6zmjn8OL9vnSE9LZkxlb1h4d1k/view?usp=s… वर अपलोड केली आहे. ती या लिंकवर क्लिक करून डाऊनलोड करून घ्या. सध्या ५० लाख कर्ज, ९.५% व्याजाचा दर आणि २५ वर्षे असे इनपुट दिले आहेत. ते बदलल्यास एक्सेल शीट त्या आकड्यांप्रमाणे आकडेमोड करून देईल. एच-९ ते पी-२१ या सेल्समध्ये व्याजाचे विविध दर आणि विविध कालावधी असल्यास ई.एम.आय कसा बदलेल ते दिले आहे. उदाहरणार्थ २५ वर्षे आणि ९.५% दराला ५० लाखासाठी ई.एम.आय येतो ४३,६८४.८३ रूपये. पण जर कर्जाचा कालावधी १८ वर्षे आणि दर १०% असेल तर ई.एम.आय ४९,९९२.१८ रूपयांवर जाईल. कर्ज नव्या बँकेत शीफ्ट करायचे असेल तर दर महिन्याला किती ई.एम.आय कमी पडेल यासाठी हे टेबल हॅन्डी होईल. ही एक्सेल शीट लिंक असलेला/ली कोणीही डाऊनलोड करून घेऊ शकेल.

In reply to by सुबोध खरे

मी मागच्या वर्षी स्टेट बॅंकेचे कर्ज त्यांच्या मॅक्सगेन योजनेखाली घेतले. याचा मुख्य फायदा हा, की तुंम्हाला तुमच्या कर्ज खात्यात त्या वेळेच्या देय हप्त्यापेक्षा जास्त रक्कम टाकता येते व कधीही काढता येते. कर्ज खाते हे बचत खात्यासारखेच वापरता येते. त्याचे चेकबुकही मिळते. त्यामुळे कर्ज खात्यात जो वजा बॅलन्स असेल, त्यावरच व्याज लागते. अशा प्रकारे जी रक्कम तुमच्या सेव्हिंग खात्यात ४% व्याज देणार होती, तीच रक्कम तुमच्या मॅक्सगेन खात्यात ९ ते १०% टक्के व्याजाची रक्कम कमी करते.

In reply to by स्वधर्म

याच्याबरोबरच SBI ला सामान्य बचत खात्याबरोबर अधिकची रक्कम आपसुक FD मध्ये वर्ग होण्याची सुविधा देखील आहे. ठराविक दिवसांनंतर पैसे तिकडे जमा होतात. जितके दिवस पैसे बाजूला पडतात त्यावर 8% प्रतिवर्ष व्याज आहे. हे पैसे देखील लागतील तसे काढता येतात. बचत खात्याच्याच डेबिट कार्ड चेकबुक वगैरे वापरून खात्यातलं खातं असा प्रकार म्हणायला हरकत नाही.

In reply to by स्वधर्म

ही योजना खरंच खुप चांगली आहे. एक प्रश्न:- सध्या माझे लोम HDFC चे आहे. SBI ला कर्ज शिफ्ट करण्यासाठी सगळ्या प्रोसेसीम्गची फिस २५-३० हजार तरी पडेल असे वाटतेय. इकडे HDFC १०-१२ हजार टाकले तर ९.९ चा व्याजदर ९.६५ करुन देतेय. तर शिफ्टींगच्या भानगडीत न पडता जसे पैसे जमतील ते कर्ज फेडत जावे की एकदा काय तो त्रास सहन करुन मॅक्सगेन करुन घ्यावे? (खरं तर एक प्रोसेसिंगचा त्रास सोडता मॅक्सगेन जास्त चांगलाच पर्याय आहे... पण पुढे SBI काही कटकटी करते का? कारण जनरल अनुभव हा आहे की SBI चा कारभार फार ढिसाळ आहे.. )

In reply to by पिलीयन रायडर

पिरा ताई, HDFC मधे ९.९ चा ९.६५ बदल करु नका. ते १ नोव्हेंबर पासुन आपोआप होईल. तुमचे HDFC लोन चे ऑनलाईन अ‍ॅक्सेस असेल तर ते तुम्हाला Interest Rate Changes या मेन्यु मधे दिसेल. --- कानडा

In reply to by कानडा

हो, मी ते पाहिले. तिथे गंमतशीर माहिती दिसत आहे. पुढचा रेट चेंज जानेवारि २०१६ मध्ये ९.६५ होइल असे आत्तापर्यंतच्या रेट्सच्या तक्त्याखाली दिसत आहे. पण अजुन एका टॅबमध्ये (बहुदा Conversion) १२ हजार की काहीतरी रक्कम भरा आणि ९.६५ रेट करुन घ्या असेही लिहीले आहे. जर आपोआप होणारच आहे तर पैसे घालुन का करुन घ्या हे मला कळाले नाही. पण समजा आपोआप रेट ९.६५ झाला तरीही मॅक्सगेन लाँगटर्म मध्ये फायदेशीर आहे. त्यात पैसे खात्यात ठेवले की लोन कमी केल्यासारखे पण होते आणि पैसे हवे तेव्हा वापरायला काढताही येतात, त्यामुळे इमर्जन्सीला टेन्शन नाही. शिवाय नेहमी नेहमी आपण लोन जादाचे पैसे घालुन फेडत बसत नाही. मोठ्या रक्कमेची वाट पहातो. त्यापेक्षा हातात येईल तसे पैसे मॅक्सगेनमध्ये टाकत राहुन लोन कमी करत जाणे फायद्याचे आहे. (थोडे कष्ट घेऊन करावंच बहुदा हे काम....)

In reply to by पिलीयन रायडर

हम्म. तुम्हाला जानेवारी ला रेट चेंज दिसतोय म्हणजे तुमचे ट्रिमेस्टर कॅलेंडर ईअर प्रमाणे आहे. माझे Oct ला संपते म्हणुन मला नोव्हेंबर पासुन नविन रेट लागु होईल. पण मी वरच्या पोस्ट मधे म्हटल्या प्रमाणे SBI should always be preferred over HDFC or any other home loan agency. मॅक्सगेन तर फायद्याची आहेच पण SBI चा रेट सुद्धा कायम HDFC ईतका किंवा त्यापेक्शा कमीच असेल. आता तो ९.५५ आहे HDFC चा ९.६५. जर घर आणि लोन तुमच्या नावावर असेल तर तुम्हाला ०.०५% अजुन कमी रेट लागेल दोन्हीकडे. त्यासाठी मात्र HDFC मधे processing fee द्यावी लागते. SBI ला लोन टेकओव्हर केले तर जो २५-३० हजार खर्च येतो त्यात ते होम इनश्युरंस सुद्धा देतात. तसेच जर तुमचा प्रोजेक्ट SBI approved असेल तर जवळपास ४००० रू. या फी मधुन कमी होतात. जर तुम्ही लोन transfer केलेच तर तुमचा अनुभव मिपा वर नक्की शेअर करा. मलाही करायचे आहे पण आता काही कारणास्तव करु शकत नाहिये पण शक्य होईल तेव्हा नक्की करणार आहे. --- कानडा

In reply to by कानडा

मी माहिती काढली तेव्हा मला ही चेकलिस्ट दिली. मी कागदपत्र गोळाही केले पण काही कारणास्तव आम्ही पुढे प्रोसेस करु शकलो नाही. समजा केलं तर नक्की कळवेन. STATE BANK OF INDIA CHECK LIST FOR HOUSING LOAN A. DOCUMENTS TO BE SUBMITTED ALONG WITH LOAN APPLICATION FOR SALARIED EMPLOYEE: 1. Last 3 months’ salary slips / certificate 2. Form 16 & Income Tax (IT) returns for last two financial years 3. Appointment Letter, Confirmation Letter & Latest CTC Letter 4. Bank Statement where salary is credited for last six months 5. Proof of residence ( telephone bill / electricity bill / passport/ Employer Letter ) 6. Proof of identity (Pan Card / Passport / driving license / Voter’s ID ) 7. Bank statement of loan accounts, if any, for the last one year FOR SELF EMPLOYED / PROFESSIONALS: 1. Last three years’ balance sheet and acknowledged copies of IT returns 2. Photo copies of IT challans 3. Bank statement for one year 4. Proof of residence (Telephone Bill / Electricity bill / passport / credit card bill ) 5. Proof of identity ( Pan Card / Passport / driving licence / Voter’s ID ) 6. Bank statement of loan accounts, if any, for last one year 1. Passport and Valid visa stamped thereon 2. Valid work permit 3. Employment contract with English translation duly attested by consulate/our foreign 4. Latest Salary slips / certificate for 6 months duly verified by any of above authorities 5. Statement of account where salary is credited for the last six months 6. Statement of loan accounts, if any, for the last one year 7. Form 16, IT returns for the last two financial years,& W2 form B. PROPERTY RELATED DOCUMENTS:  Copy of Sale Deed / Agreement to sell, Index II, Registration Receipt  Copy of Approved Plan of proposed construction / house / flat  Letter of Allotment cum NOC from builder / Society in Bank’s format  Permission for construction / Commencement certificate from municipal authorities  Non Agriculture (NA) order from Collector  Copy of Search Report of Builder’s Advocate  Copy of Development Agreement  Copy of Power of attorney given to builder by landlord  Copy of Power of attorney given by builder’s firm to its representative to sign the agreement correspondent/State Bank Branch/Embassy. If it is in English duly verified with originals by any of these authorities ADDITIONAL DOCUMENTS REQUIRED WHEN OLD PROPERTY IS BEING PURCHASED 1) All the original agreements with receipts and Index II in the series 2) Possession Letter, Completion Letter, Tax Paid Receipt, Latest Light Bill. 3) Society Reg.Copy, Share Certificate & Soc.NOC as per Bank format. TAKE OVER: DOCUMENTS REQUIRED FROM BANK: 3) Loan account statement CHARGES / EXPENSES REQUIRED TO BE INCURRED BY APPLICANT: 1) Advocate Fee Rs. 4000/- a cheque to be issued favoring 2) Valuation Fee, only in case of old property and new loans of Rs. 20 lacs and above, Rs.845/-. 3) Processing Fee: 0.25 % of Loan Amount up to 25 lac & above 6500/- up to 75 lac. 4) Property Insurance for 20 years from SBI General Insurance Co.Ltd. (Mandatory), @ 5) Home Loan Insurance from SBI LIFE for insuring Home Loan amount 6) Equitable Mortgage Stamp Duty – 0.2 % of Sanctioned Loan amount 7) Other Stamp Duty, etc. Rs.1000/- approx. 8) Rs.1300/- for registering mortgage Rs.546/- approx. per lac on cost of agreement (One Time Premium).

In reply to by पिलीयन रायडर

या लिस्ट साठी धन्यवाद. यातील जी ४०००/- अ‍ॅड्व्होकेट फी आहे ती SBI approved project साठी लागत नाही. Property Insurance compulsary आहे. पण जर तुम्ही आधीच घेतला असेल (कदाचीत HDFC कडुन) तर तो जुनाही चालतो. Home loan insurance compulsary नाही. ते लोन देतांना कितीही म्हटले तरी (तुम्हाला नको असल्यास) ते घेऊ नका. बर्‍याच वेळा लोन processing fee waive-off offer केलेली असते. ते ही बघा. --- कानडा

In reply to by कानडा

लोन इन्शुरन्स केला नाही तरी किमान लोन अमाऊंटच्या रकमेचा टर्म इन्शुरन्स काढून घ्यावा असं वाटतं.

In reply to by कानडा

Property Insurance आणि Home loan insurance ह्यात नक्की फरक काय आहे. HDFC ने एक अत्यंत महागडा insurance गळ्यात मारला आहेच. पण तो फक्त ५ वर्षाचा आहे, आता संपेलच २ वर्षात.

In reply to by पिलीयन रायडर

Property insurance म्हणजे तुमच्या घराचा (घर, त्यातील सामान, वगैरे) insurance. Home loan insurance म्हणजे तुम्हाला काही झाल्यास तुमच्या नावावरचे लोन कोण फेडणार? म्हणुन तुमच्या नावाने कर्ज काढायचे, त्याला होम लोन शी लिंक करायचे. In case of your unfortunate demise, त्या insurance मधुन मिळणार्‍या रकमेतुन आधी होम लोन चुकते केले जाईल आणि ऊर्वरीत रक्कम तुमच्या वारसाला मिळेल. घरही कर्जमुक्त होईल. पण मला मुळात Insurance for savings हे पटत नसल्यामुळे माझ्या प्रचंड मागे लागुनही मी HDFC चा "तो" insurance घेतला नव्हता. Unfortunately, हा तुमच्या गळ्यात मारलेला insurance SBI ला compulsary म्हणुन नकोय. Property insurance त्यांना compulsary हवाय. HDFC तुम्हाला property insurance बद्दल बोललेही नसेल कारण त्याचा खुप कमी premium असतो तो ही one time. त्यामुळे ते विकण्यात त्यांना (एजंट लोकांना) जास्त फायदा नसतो. वर प्यारे१ म्हणतात त्याप्रमाणे Home Loan amount चा (खरतर आपल्या वार्षीक ऊत्पन्नाच्या १० ते २० पट रकमेचा) Term Insurance जरुर असावा. --- कानडा

In reply to by कानडा

धन्यवाद! हेच स्पष्टीकरण हवं होतं. खरं तर होम लोन इन्शुरन्सचं प्रीमियम बँकेने भरायला हवं. कारण बँक लाभार्थी आहे हे एक कारण, आणि मुख्यतः बँकेची जोखीम कमी होते आहे. (महाराष्ट्र बँक स्वतः प्रीमियम भरते.)

In reply to by पिलीयन रायडर

आणि अजुन एक, तुमचा insurance ५ वर्षाचा नसेल. Premium paying term ५ वर्ष असेल. Insurance cover जास्त असेल. --- कानडा

In reply to by कानडा

थांबा थांबा.. मी काहीतरी घोळ घालतेय मग.. १ लाख रुपये , होम लोनच्या रकमेतच अ‍ॅड करुन हा इन्शुरन्स काढला आहे. (थोडक्यात आम्ही त्या लाख रुपयांवर सुद्धा व्याज भरलं.. ) त्यात हे कव्हर्ड आहे १. भुकंप वगैरे नैसर्गिक आपत्ती २. क्रिटिकल इलनेस ३. आमची नोकरी गेल्यास ३ हप्ते इन्शुरन्स मधुन भरणार. ४. बहुदा चोरी हे मला आठवतय.. पण मला चेक करावं लागेल. आणि ५ वर्षाचा काय घोळ आहे ते ही..

In reply to by पिलीयन रायडर

सध्या माझे लोम HDFC चे आहे. SBI ला कर्ज शिफ्ट करण्यासाठी सगळ्या प्रोसेसीम्गची फिस २५-३० हजार तरी पडेल असे वाटतेय.
माझ्या मित्राने मागच्या महिन्यातच गृहकर्ज SBI ला शिफ्ट केले. SBI ची स्किम चालु असल्यामुळे काहीही प्रोसेसिंग फी नव्हती. सध्या पण ही स्कीम चालु आहे का चेक करा. तरीपण लोन अ‍ॅग्रीमेंट, वकील, प्रॉपर्टी इन्स्शुरन्स वगैरे खर्च असतातच SBI चा सध्याचा व्याजदर ९.३५% आणि जर अ‍ॅग्रीमेंट्वर स्त्रीचे नाव पहिले असेल तर ९.३०% आहे. जेव्हा RBI व्याजदर करते तेव्हा SBI व्याजदर कमी करण्यात सर्वात जास्त तत्परता दाखवते. शिवाय कर्जदाराच्या असहायतेचा फायदा घेऊन पॉलिसी, क्रेडीट कार्ड गळ्यात मारायचे प्रकार करत नाही.
पुढे SBI काही कटकटी करते का
SBI चा मला उत्तम अनुभव आहे पण कधीकधी जर बँकेकडुन काही चुक झाली तर निस्तरताना नाकी नऊ येतात. जनरली हे प्रोब्लेम कर्ज शिफ्ट होताना किंवा पहिला हफ्ता जाताना होते. एकदा पहिला हफ्ता गेला (गाडी धक्क्याला लागली) की काही प्रोब्लेम नाही, बचत खाते SBI मधे असेल तर maxgain खाते त्याला लिंक करुन ऑनलाइन बँकींग्द्वारे २४ x ७ पैसे इकडुन तिकडे टाकता येतात.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

SBI चा सध्याचा व्याजदर ९.३५% आणि जर अ‍ॅग्रीमेंट्वर स्त्रीचे नाव पहिले असेल तर ९.३०% आहे.
SBI चा बेस रेट ९.३५% आहे. होम लोन चा रेट ९.५५ (९.५०) आहे.
जेव्हा RBI व्याजदर करते तेव्हा SBI व्याजदर कमी करण्यात सर्वात जास्त तत्परता दाखवते.
बरोबर.
शिवाय कर्जदाराच्या असहायतेचा फायदा घेऊन पॉलिसी, क्रेडीट कार्ड गळ्यात मारायचे प्रकार करत नाही.
हे मात्र तितकेसे खरे नाही. मी होम लोन तर नाही पण कार लोन SBI कडुन घेतलय. त्यावेळी आधी माझ्याकडुन १. एक सेव्हिंग अकाऊंट ओपन करुन घेतले. २. क्रेडिट कार्ड गळ्यात बांधले. ३. Property insurance साठी खुप मागे लागले. ४. Property insurance नकोच म्हटल्यावर मग ईतर प्रकारचे ईंशुरंस प्रॉडक्ट्स साठी खुप मागे लागले. पहिले दोन मला हवेच होते म्हणुन मी भाव खाऊन करून घेतले. आधी भाव खाण्याचा फायदा हा की माझे अकाऊंट ५ मिनिटात तर कार्ड application पुढच्या ५ मिनिटात झाले. माझ्याकडे कागदपत्रांच्या कॉपीज नव्हत्या तर त्या त्यांनीच काढुन घेतल्या. नंतर मात्र अशी सर्व्हीस SBI मधे मिळत नाही. BTW, माझा कार लोन चा रेट ९.७५% झाला आहे जो एक वर्षापुर्वी घेतांना १०.५०% होता. यासाठी काहिही फी दिलेली नाही. --- कानडा

In reply to by पिलीयन रायडर

सध्या माझे लोम HDFC चे आहे. SBI ला कर्ज शिफ्ट करण्यासाठी सगळ्या प्रोसेसीम्गची फिस २५-३० हजार तरी पडेल असे वाटतेय. इकडे HDFC १०-१२ हजार टाकले तर ९.९ चा व्याजदर ९.६५ करुन देतेय.
पिरा, माझेही HDFC चेच लोन आहे आणि मलाही याबद्दल सांगितले होते. मला SBI ला कर्ज शिफ्ट करणे सध्या शक्य नसल्याने याची चौकशी केली असता त्यांनी सांगितले की वेरिएबल व्याज दर हा वेरिएबल असाच आहे (म्हणजे दर ३ महिन्यांनी अपडेट होणार असा) पण नवीन अग्रीमेंटअद्वारे तुमचे हप्ते कमी होतात आणि इफेक्टीव व्याज दर कमी बसतो. म्हणजे असं की व्याजदर ९.९% असेल आणि तो ९.६% जानेवारीमध्येच होईल पण आता टोटल हप्ते समजा २०० होते ते १८० झाले. अजून टेक्निकल माहिती माझ्याकडे दिलेल्या इमेलमध्ये सविस्तर आहे की ज्यामुळे मी हे एग्रीमेंट करायला तयार झालो. आत्ता हाती असलेल्या पत्रात खालील मजकूर आहे, कोणाला जास्त माहित असल्यास मलाही सांगा. loan converted From : Housing Loan-variable rate-monthly rest (with 3 monthly interest rate revision cycle) spread of MINUS 6.00% over RPLR To: housing loan-variable rate-monthly rest (with 3 monthly interest rate revision cycle) spread of MINUS 6.65% over RPLR

In reply to by अस्वस्थामा

म्हणाजे थोडक्यात सेम रेट फक्त ३ महिने आधी करुन घेतला असंच ना? सौंदाळा, आता जरा काढते माहिती... करायला हवं हे काम..

In reply to by पिलीयन रायडर

थोडक्यात : नाही. HDFC चा जो रेट असतो तो Base Rate+spread असा असतो. रेट आपोआप ३ महिन्यांनी revise होतो. पण spread बदलुन घ्यायचा असेल तर processing fee compulsary घेतात. मार्च पर्यंत माझा spread -6.75 होता. तो मी एप्रिल मधे फी भरून ६ करुन घेतला. SBI चा होम लोन रेट ९.५५ (महिलांसाठी ९.५) आहे. ९.३५ हा त्यांचा बेस रेट आहे. --- कानडा

In reply to by कानडा

हे स्प्रेड बद्दल मी अनेकदा ऐकलय नवर्‍याकडुन पण लक्ष न दिल्याने काहिही समजले नाही. कुणीतरी हे ही समजावुन सांगा!

In reply to by पिलीयन रायडर

स्प्रेड समजावण्याईतक ज्ञान मला नाही पण खालच्या लिंक वाचुन समजू शकता. http://www.nitinbhatia.in/home-loan/floating-home-loan-bplr-vs-base-rat… BTW, जर तुम्ही फी देऊन रेट कमी करायचा ऑप्शन वापरणार असाल तर Women Power scheme बद्दल नक्की माहिती काढा आणि कदाचित त्याच फी मधे ते जर करुन मिळाले तर करुन घ्या म्हणजे तुम्हाला ०.०५% कमी रेट लागेल. The above ROI is applicable for cases where a woman is an owner/co-owner and an applicant/co-applicant to the loan. All loans at the sole discretion of HDFC Ltd. अवांतर (मनातल्या मनात)
हे स्प्रेड बद्दल मी अनेकदा ऐकलय नवर्‍याकडुन पण लक्ष न दिल्याने काहिही समजले नाही.
हे भगवान!!! पिरा ताई हे काय बोलुन गेल्या. याचा अर्थ हा की नवरे जसे बायकोच बोलण (सगळच) काही ऐकत नाहीत (रेफरंस : छि_ _ धागा) तसच बायकासुध्दा नवर्‍यांच काही (सगळच) ऐकत नाहित. [डोळा मारा ची smiley (ही कशी टाकायची हो???)]

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

माझा SBI Home Loan चा इन पर्टीक्युलर स्वतःचा अनुभव नाही. मी फक्त बातम्या आणि SBI च्या वेबसाईट वरुन माहिती घेतली होती. SBI च्या साईट ची ही लिंकः https://www.sbi.co.in/portal/web/interest-rates/home-loans-interest-rat… --- कानडा

जर थोडी जोखिम घ्यायची तयारी असेल तर म्युच्युअल फड व शेअर्स चा पर्याय आहेच. पण त्यात जाणकाराच्या सल्ल्याबरोबर स्वताचाहि थोडा अभ्यास हवा.पण त्यातल्या त्यात सेफ़ गेम म्हणजे म्युच्युअल फंड.सिस्टेमँटीक इन्वेस्टमेंट प्लान किंवा SIP चांगला,या मध्ये मार्केट च्या प्रत्येक अवस्थेत(तेजी वा मंदी )गुंतवणूक होते,जी दीर्घ मुदतीत फायदेशीर ठरू शकते नियम ७२ चा गुंतवणूकीचा मूलमंत्र आहे.मिळणार्या व्याजाच्या आंकड्याने ७२ ला भागल्यास , रक्कम कधी दुप्पट होईल ते कळते. मुद्दल वाढवत राहाणे (ग्रोथ) हे गुंतवणूकीचे उद्दिष्ट असले पाहिजे. रक्कम स्वस्थ पाडून ठेवणे उदा. घरी,लॉकर मध्ये किंवा सेंव्हिग खात्यात या सारखी मोठी चूक नाही.डेड इन्व्हेस्टमेट टाळून पैशाला अॉलवेज ऑन द टोज् ठेवलं पाहिजे . Created using Quillpad Touch Sent from my iPad

एक प्रश्न : कृपया जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा. होम लोन हे जास्त मुदतीचे असणे चांगले कि लवकर फेडलेले चांगले? १. लोन रेट हा कायम एफ.डी. रेट पेक्षा जास्त असणार त्यामुळे लोन सुरु ठेऊन वाचलेले पैसे एफ.डी. मधे ठेवणे फायद्याचे नाही. तसेच एफ.डी. च्या ईंटरेस्ट वर टॅक्स देखील लागणार. पण Mutual fund वगैरे सारखी गुंतवणुक करुन जास्त फायदा मिळु शकतो. २. पण होम लोन असतांना ईन्कम टॅक्स वर दोन सवलती मिळतातः (अ) ८०C अंतर्गत १.५ लाख पर्यंत, (आ) २,००,०००/- पर्यंत च्या होम लोन व्याजावर (जवळपास २२,००० ते ६६,००० रू वर्षाला वाचतील). ८०C तर ईतर मार्गांनी सहज पूर्ण होते पण दुसर्या सवलतीसाठी काही ऑप्शन आहे का? --- कानडा

In reply to by कानडा

कानडा साहेब ८० C या कलमाखाली तुम्हाला १.५ लाखापर्यंत कराची वजावट मिळते. जर तुमचा कराचा दर ३० % असेल (म्हणजे उत्पन्न १० लाखाच्या वर असेल) आणी कर्जाच्या व्याजाचा दर ९ टक्के असेल तर तुम्हाला त्यातून ३० % करा वजावट म्हणजे २. ७ % कमी होतात. म्हणजेच तुम्हाला कर्ज हे ६. ३% ने मिळते. थोडक्यात दीड लाख व्याज आणी २०,०००/- मुद्दल यावर कर वाचतो. १,७०,०००/- रुपये हा आपला वर्षीक हप्ता असेल तर त्यातून तुम्हाला ५१ हजार रुपये कर वाचतो. किंवा १४१६६ रुपये महीना हप्ता असेल तर त्यातील ४२५० रुपये वाचतात. म्हणजे आपल्याला ९९१६ रुपये हप्ता पडतो. माझ्या १५ लाखाच्या कर्जाचा हिशेब हा असा होता. माझा साधा हिशेब हा होता जर मला कुणी ६. ३ टक्क्याने कर्ज देत आहे तर ते मी खिशातील पैसे भरून कशाला फेडू. अतिरिक्त पैसे मी शेअर बाजारात टाकून त्यातून मी साधारण १५ टक्क्याने करमुक्त उत्पन्न कमावले आहे. म्हणजे माझा नक्त नफा ८.७ % आहे तर मी कर्ज मुदती अगोदर का फेडू?

In reply to by सुबोध खरे

खरे साहेब, कृपया मला साहेब म्हणु नका. मी काही ईतका मोठा नाही. (मी मात्र तुम्हाला म्हणणार कारण तुम्ही तेव्हडे मोठे आहात हे मला ज्ञात आहे).
जर तुमचा कराचा दर ३० % असेल (म्हणजे उत्पन्न १० लाखाच्या वर असेल) आणी कर्जाच्या व्याजाचा दर ९ टक्के असेल तर तुम्हाला त्यातून ३० % करा वजावट म्हणजे २. ७ % कमी होतात. म्हणजेच तुम्हाला कर्ज हे ६. ३% ने मिळते.
हे मला लक्षात आले नाही. तरी ओव्हरऑल लक्षात आले आहे की गृह कर्ज सुरु ठेऊन ईतर गुंतवणुकीतुन जास्त फायदा मिळु शकतो. (आता शेअर बाजारात खरच व्यवस्थीत अभ्यास करुन इनव्हेस्ट करावेच लागेल). प्रतीसादाबद्दल धन्यवाद. --- कानडा

In reply to by कानडा

जर तुमचे वार्षिक गृह कर्ज व्याज हे १.५ लाखाच्या आत असेल आणि तुमचा कडे प्राप्तीकर वजा करून ६.३ पेक्षा पेक्षा जास्त उत्पन्न देणारा खात्रीशीर मार्ग असेल तर गृह कर्ज चालू ठेवा. नाहीतर फेडा. माझा अनुभव आसे सांगतो कि पहिले ३ ४ वर्ष व्याज हे बहुतांशी १.५ लाख पेक्षा जास्त जाते , त्यामुळे पहिली ३-४ वर्षे शक्य तेवढे प्रीपेमेंत करवे , नंतर व्याज १.५ चा जवळ आले कि ( दुसर्या घराचा मोह न करता ) मग मार्केट मध्ये पैसे टाकावेत.

=PMT(9.5%/12,300,5000000,0) फोर्मुल्या ला एर्रर का येते आहे?