एक होती मुंबई.. ("Mumbai Fables")
पोर्तुगीज व्यापारी लोकांची भारताला सर्वात मोठी देणगी म्हणजे त्यांनी मुंबई शहराचा पाया रचला. ते मुळात सक्तीने धर्मप्रसार करायला आले होते. १५०९ साली फ्रान्सिस्को अल्मेडाने मुंबई बेटावर पहिली धाड घातली आणि स्थानिक लोकांना लुटले. अनेकांना जबरदस्तीने किरिस्तांव केले. पुढे अशाच धाडी पडत गेल्या आणि १५३२ साली नुनो डाकुन्हाने गुजरातच्या सुलतानाला हरवून वसई काबीज केली.
मुंबईची सुरुवात ही अशी झाली.
अमेरिकावासी लेखक ज्ञानप्रकाश यांनी लिहिलेले "Mumbai Fables" हे पुस्तक मायानगरी मुंबईच्या आजपर्यंतच्या प्रवासाचा वेध घेते. इतिहासही किती रोचक, रोमहर्षक आणि वाचनीय असू शकतो याचा धडा म्हणजे हे पुस्तक. मराठी, हिंदी, गुजराती, इंग्रजी असे बहुभाषिक स्रोत वापरून-पडताळून प्रकाश हे मुंबईच्या उगमाला भिडण्याचा (बराचसा यशस्वी) प्रयत्न करतात.
ज्ञानप्रकाश हे रांची शहरात (तेव्हा बिहार आणि आता झारखंड राज्यात) जन्मले. लहानपणापासूनच ते मुंबई शहराच्या सुरस आणि आतिशयोक्तिपूर्ण कथा ऐकत होते. त्यामुळे त्यांच्या मनात मुंबईची जी अद्भुतरम्य कल्पना निर्माण झाली, ती पुढे प्रत्यक्ष मुंबई पाहून, तिथे राहून झाल्यावरही गेली नाही. अशी मुंबईची प्रतिमा मुंबईबाहेर लहान शहरां-गावांत वाढलेल्यांपैकी बहुतेकजण बाळगून असतातच. मनामनात घर केलेल्या या मुंबईच्या जादूचा अर्थ लावण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे.
मुंबईला शून्य प्राचीन इतिहास आहे. मुंबईत एकही मध्ययुगीन इमारत नाही. मुंबई ही भारतात परकीयांची वसाहत होतीच, पण त्याआधी ती मानवाने निसर्गावर विजय मिळवून निर्माण केलेली वसाहत आहे. पोर्तुगीजांनी पुढे ब्रिटिशांना आंदण दिलेले हे शहर, व्यापारी महानगर या स्वरूपातच अस्तित्वात आले. सद्यकालीन राजकारणी काहीही म्हणोत, पण मुंबईचा जन्म हाच मुळी "परप्रांतीयां"मुळे झालेला आहे हे विसरून चालत नाही. त्याकाळीही मुंबईतील मराठी लोकसंख्या ही केवळ ५० टक्क्याच्या आसपास होती. दक्षिणी, मंगलोरी, गुजराती, पारशी, सिंधी, मारवाडी, काश्मिरी, इराणी, मेमन-खोजा, कच्छी, अफगाणी, गोवेकर, पंजाबी, उत्तर भारतीय, युरोपीय, चिनी, अरब हे आणि असे अन्य समुदाय तेव्हाही मुंबईचा भाग बनून राहिलेले होते. अर्थात वसाहतकार गोरे आणि एतद्देशीय काळे यांच्यातला अस्पृश्यतासम फरक हा पदोपदी ठसवला जाई.
बहुरंगी मुंबईला आपापल्या पुस्तकांतून जिवंत करणारे मराठीतील सुर्वे, ढसाळ, पाध्ये किंवा इंग्लिशमध्ये सलमान रश्दी, सुकेतु मेहता हे साहित्यकार आपल्याला परिचयाचे आहेत. पण मुंबईची गाथा पार तिच्या जन्मापासून निरंतर गायली जात आहे. १८७५मधला पोलीस कमिशनर एडवार्ड, तत्कालीन पत्रकार नौरोजी डुमासिया, दिनशॉ वाछा, जेम्स मकलेन, लुईस ब्रॉम्सफील्ड आणि अर्थात गो. ना. माडगावकर यांनी मुंबईवर पुस्तके लिहून ठेवलेली आहेत. बहुतेक सर्व लेखक हे त्याकाळीदेखील मुंबईचा अवाढव्यपणा, गर्दी, जीवनाची गती, वातावरणातील उत्साह, बहुसांस्कृतिक ओळख आणि उघडपणे लक्ष्मीशरण झालेली नीतिमत्ता या गोष्टींनी प्रभावित झालेले दिसतात. पैसा या एकमेव दैवताला पूजणारे हे शहर अखेर याच कारणामुळे दुर्दशेच्या गर्तेत अडकले. कोणत्याही प्रकारचा निखळ आदर्शवाद मुंबईला झेपत नाही. पुढच्या पिढीतील मुल्कराज आनंद, मंटो, इस्मत चुगताई यांच्या मुंबईविषयक लेखनातही हाच सूर उमटतो.
ईस्ट ईंडिया कंपनी ही अफूच्या व्यापारातून अमाप नफा कमवीत होती. हा व्यापार कलकत्त्यात केंद्रित होता. मुंबई बेट हाती आल्यावर ब्रिटिशांनी मध्य आणि पश्चिम भारतातील अफू निर्यातीसाठी मुंबईकडे वळवली आणि या शहराने बाळसे धरायला सुरुवात केली. आज ज्यांचे नाव सन्मानपूर्वक अनेक इमारती-रुग्णालये-उद्यानांना दिले गेले आहे त्या जमशेट जीजीभॉय यांनी आपली संपदा याच अफूच्या धंद्यातूनच कमावली होती हे आज फार कुणाला माहीतच नसेल!
इंग्रजांनी मुंबईत कापडगिरण्याही सुरू केल्या. त्या अहोरात्र चालू लागल्या. त्यासाठी लागणारे स्वस्त आणि मुबलक मनुष्यबळ कोकण आणि देशावरून मिळू लागले. सार्वजनिक वाहतूकव्यवस्था नसल्यामुळे या कामगारांच्या वस्त्या गिरण्यांना खेटून दाटीवाटीने उभ्या राहिल्या. पहिल्या महायुद्धाच्या वेळी कापसाला सोन्याचा भाव आला आणि शहराने कात टाकली.
ज्ञानप्रकाश यांच्या मते, मुंबई शहरातली पराकोटीची धनासक्ती आणि यशासक्ती या दोहोंची उत्तम उदाहरणे म्हणजे अनुक्रमे रेक्लमेशन प्रकल्प (समुद्रभराव) आणि पत्रकार करंजिया यांचे 'ब्लिट्झ' वर्तमानपत्र!
मुंबईतील आजच्या अस्वच्छतेला नाके मुरडणाऱ्यांनी ज्ञानप्रकाश यांच्या पुस्तकातील नरकसदृश गिरणीकामगार वस्त्यांचे आणि त्यातून जन्मलेल्या १८९६ सालच्या भयानक प्लेगचे वर्णन मुळातून वाचावे! यां वस्त्यांना 'चाळ' हे नाव पडलेले होते. सुरुवातीला सरकारने अनिच्छुकपणे या वस्त्या सुधारण्याचे थातुरमातुर प्रयत्न केले. वरळीच्या डबासदृश बी.डी.डी. चाळी सरकारने याच काळात बांधल्या. पण शहराचे आमूलाग्र परिवर्तन करायचे असेल तर समुद्रात रेक्लमेशन करून तिथे शिस्तबद्ध कामगारवस्त्या उभाराव्यात ही कल्पना जोर धरू लागली. ब्रिटिशकाळातच त्यावर काम सुरू झाले.
पण धनासक्त मुंबईला असले निरिच्छ समाजकार्य पटणे शक्यच नव्हते. रेक्लमेशनने निर्माण केलेल्या जमिनीवर गिरणी कामगारांच्या बकाल, रोगट वस्त्यांचे योजनाबद्ध पुनर्वसन करावे या मूळ कल्पनेला मध्येच संपूर्ण तिलांजली दिली गेली. त्या जागी मरीन ड्राईव्ह आणि कफ परेड निर्माण झाले. ब्रिटिश सरकारने लठ्ठ नफा घेऊन तिथे धनाढ्यांना वसवले.
हे गुलामीचे फळ म्हणावे तर तेही खरे नाही. कारण स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही याचीच पुनरावृत्ती झाली. प्रगतीशील महाराष्ट्राच्या लोककल्याणकारी सरकारनेही मरीन ड्राईव्हच्या दुसऱ्या टोकाचे रेक्लमेशन गब्बर बिल्डरांना गगनचुंबी इमारती बांधण्यासाठी विकले. या भागाला सरकारने नरिमन पॉईंट असे नाव दिले हा एक क्रूर विनोदच! कारण खुर्शीद नरिमन यांनी एकेकाळी ब्रिटिश सरकारच्या स्वार्थी, नफेखोर रेक्लमेशन योजनेविरोधात न्यायालयात जवळजवळ एकाकी अशी झुंज दिली होती.
ज्ञानप्रकाश हे या काळाची कथा वस्तुनिष्ठ शैलीत मांडतात. रेक्लमेशन हे अखेर श्रीमंतांच्या घशात गेले हे खरे. पण मुंबईची ओळख जगभर नावारूपाला आली तीही याच काळात. नावाजलेल्या वास्तुशास्त्रज्ञांनी आणि व्यापाऱ्यांनी मुंबईत दिमाखदार इमारती (खाजगी तसेच सार्वजनिकही) बांधल्या. खंबाटा यांचे एरॉस थिएटर, फ्रामजी सिधवा यांचे रीगल आणि हॉलीवूडच्या एम.जी.एम. स्टुडिओवाल्यांनी बांधलेले मेट्रो, ही सर्व याच १९३० च्या दशकातली. टाटांचे ताज हॉटेल त्याआधीच उभे राहिलेले होते.
नेराळे यांनी गिरणी कामगारांच्या घटकाभर विरंगुळ्यासाठी हनुमान तमाशा थिएटर बांधले तेही याच काळात. (आज अस्तित्वात आहे का ते?). दादासाहेब फाळक्यांचा पहिला चित्रपट १९१३ साली आला. १९३०च्या दशकात हिंदी चित्रपट उद्योगाची खरी वाढ सुरू झाली.
ज्ञानप्रकाश वारंवार प्रतिपादन करतात की गरीब आणि श्रीमंत यांच्यातील भयानक तफावत आणि परिणामस्वरूप मुंबई शहराला आलेली कायमस्वरूपी गलिच्छ अवकळा ही तेव्हापासून आजतागायत तशीच आहेत. याचा दोष सोयीस्करपणे गरिबांवर ढकलण्याची दुटप्पी मध्यमवर्गीय समाजप्रवृत्तीही बदललेली नाही. वास्तविक बकाल बेकायदा झोपडपट्ट्या हे गरिबांचे नव्हे तर उद्दाम, नफेखोर भांडवलशाहीचे पाप आहे.
दुसरे उदाहरण ब्लिट्झचे. संपूर्णपणे शहरी आणि वाचकशरण तोंडवळा असलेले हे भारतातील पहिले वर्तमानपत्र. आज ते जीवित नाही, पण मिरर आणि मिड-डे ही त्याचीच बाळे. खप वाढवण्यासाठी काहीही छापले तरी ते क्षम्यच असते, ही खास मुंबईची अशी बेफिकीर, न-नैतिक विचारसरणी बाळगून बी.के. करंजिया यांनी हे पत्र एकहाती चालवले. नानावती खटल्याच्या काळात ब्लिट्झच्या प्रती चक्क काळ्या बाजारात विकल्या जात. करंजिया यांनी ब्लिट्झच्या कार्यालयात पाटी लावली होती: "इथे नोकरी करण्यासाठी माथेफिरू असायलाच हवं असं नाही, पण असलात तर बरं होईल!"
इथून पुढे मार्क्सवाद-समाजवाद यांचा प्रवेश, कामगारांचा लढा, मराठी माणसाच्या मानसिक असुरक्षिततेचे राजकारण, शिवसेनेचा जन्म, राजकीय पक्षाला एक विचारसरणी म्हणून असावी लागते या संकल्पनेलाच फाट्यावर मारून तिने केलेली जमावखोर दंडुकेशाहीची सुरुवात, कृष्णा देसाई खून खटला, गिरणी संपाची शोकांतिका, त्यातून अटळपणे झालेला धार्मिक उन्मादाचा शिरकाव, आणि गुन्हेगारी अधोजगताने शहराचा घेतलेला कब्जा हा सारा आलेख ज्ञानप्रकाश अचूकपणे मांडतात (मराठी वाचकांना तो आधीच परिचित आहे). एवढेच नव्हे तर या इतिहासक्रमाची अतूट नाळ मुंबई शहराच्या धनोपासक प्रवृत्तीशी कशी जोडलेली आहे याचेही विवेचन करतात. विशेष सांगण्यासारखी बाब म्हणजे हिंदीभाषिक लेखक-पत्रकारांच्या मनात सेनास्टाईल 'मराठी माणूस' राजकारणाबद्दल जो एक कायमचा असा आकस दिसत असतो (रास्त की अवाजवी हा निराळा मुद्दा) त्याचा लवलेश प्रकाश यांच्या लिखाणात आढळत नाही.
धारावी हे नाव घेताच मध्यमवर्गीय आणि श्रीमंत यांच्या मुखावर स्पष्ट नाराजी उमटत असते. पण धारावी हे अविरत उद्यमरत असलेले एक छोटेखानी गतिशील शहरच आहे. उद्याचा दिवस हा नक्की आजच्याहून चांगला असेल या अभंग आशेवर इथे असंख्य 'उद्योजक' नवनव्या वस्तू बनवून, आकर्षक वेष्टनांत बांधून लोकल ट्रेनमध्ये किंवा सिग्नलवर पायपीट करत विकतात.
पुस्तकाच्या एका भागात ज्ञानप्रकाश मुंबईतून प्रकाशित होणाऱ्या हिंदीभाषिक 'डोगा कॉमिक्स'मधून दिसणारी बदलती मुंबई या विषयावर लिहितात. या कॉमिक्सचा आणि माझा अजिबात परिचय नसल्यामुळे मी काहीश्या त्रयस्थपणेच तो वाचून संपवला.
मुंबईबद्दल लेखकाला असलेली ओढ आणि तिला मिळालेली सखोल अभ्यासाची जोड या पुस्तकाच्या पानापानात जाणवते.
(टीप: या पुस्तकाच्या काही भागाचा आधार घेऊन दिग्दर्शक अनुराग कश्यप याने 'बॉम्बे व्हेल्वेट' हा चित्रपट काढला आहे)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
उत्तम पुस्तकपरिचय. 'मुंबई
फार दिवस झाले.
मॅक्सिमम सिटी
.
छान आहे परिचय!
लेखन आवडले. :)
परिचय आवडला, वाचायला हवं!!
मुंबै मराठी माणसाचीच हा एक
तस बघायला गेलं तर कोणतच शहर
उल्लेखित शहरांमधे लुंगी हटाव
हम्म
मध्यमवर्गीयांचा गैरसमज म्हणजे काय?
वा! मद्रास कलकत्यात रामराज्यच
.
मुंबईचं वेगळं आहे.
मुंबई मराठी माणसाचीच हा गैरसमज नाही
लेख चांगलाच पण
+१
अगदी अगदी
हो
सहमत.
किंचित दुरुस्ती
अरे वा. हा शब्द माहित नव्हता.
छान
माई अराजकीय धाग्यांवर फारशा
अरे वा, माई!! नाना कसे आहेत?
नाना खपले म्हणतात ना!!!
.
परिचय आवडला, वाचायला हवं!!
वाचायला हवं.....
होय
हनुमान थिएटर लालबागच का?
तेच ते..
पुस्तक घेउन वाचावेसे वाटत आहे
हम्म यामुळेच मुंभाय आवडत नाय.
त्याआधी ती मानवाने निसर्गावर
.
पुस्तक वाचले आहे.
चांगला
शिवसेना = राजकीय पक्ष .... ?
निवडणूक चिन्ह घेऊन निवडणुका
निवडणुका लढवणे म्हणजे राजकीय पक्ष असणे नव्हे.
माझ्यामते तुम्ही राजकिय पक्ष
Sad but true
धागालेखक वा वाचकांनी हा
सहमत
+१
आपला प्रतिसाद वाचला ....
मी शिवसैनिक आहे.
. हेही माहीत असु द्या.