Skip to main content

एका 'कोसला'प्रेमीचे प्रेमप्रत्र

लेखक जव्हेरगंज यांनी मंगळवार, 29/09/2015 00:19 या दिवशी प्रकाशित केले.
(हे विडंबन नव्हे, ही 'कोसला'ला दिलेली एक मन:पुर्वक छोटेखानी सलामी - जव्हेरगंज) ******** प्रती :- शंभरातील एकास... प्रिये मी हा असा उकिडवा बसलोय. तुलाच पत्र लिहीत. बनियन बाहेर वाळत घातलाय. आंघोळ अजुन व्हायची आहे. साबणही संपलाय. तुझी खुप आठवण येते. उदाहरणार्थ बादलीत पाणी वगैरे काढलयं. सकाळी तुला बघितलं. भाजी मंडईत. घासाघीस करत होतीस. गुलाबी परकर पोलकं चांगलं होतं. बरी दिसलीस. मी तिथेच शेजारी ऊभा होतो. उदाहरणार्थ झिपऱ्या वगैरे नीट बांधत जा. परवा मागच्या बाकावर बसणारा प्रभुणे तुझ्याकडे बघत होता. तुला द्यायला त्यानं फुलपण आणलं होतं. मी म्हणालो, ती आपली लाईन आहे. मग टपरीवर नेऊन त्यानं मला चहा पाजला. हे एक थोरच आहे. प्रभुणे येतो अधुनमधुन रुमवर. त्याच्या बापसाने म्हणे दोन लग्न केली होती. दोन बायका एकाच घरात. त्यांची सात आठ पोरबाळं. कुठलंही पोर कुणालाही प्यायचं. याला अजुन माहीतीचं नाही हा नक्की कुठल्या आईचा. ही एक भलतीच गोष्ट झाली. रात्री जेवायला गेलो. मेसमध्ये फीस्ट होती. सुरेश शेजारीच बसला होता. त्याच्या ताटातली दह्याची वाटी मला देत म्हणाला, नुसतचं पाणी आहे. ईथल्या गायी म्हशी आटल्या वाटतं. मी म्हणालो, नंतर सिगरेट पिऊया. उदाहरणार्थ माझी खीरीची वाटी त्याला दिली. सिगारेटीही महाग झाल्यात आजकाल. नाक्यावरुन बीडीचं बंडल आणलं. सुरेश म्हणाला, मला नको. मी म्हणालो, चालतयं. सुरेश निघुन गेला. मग खिडकीपाशी खुर्ची घेऊन बिड्या ओढत बसलो. एक एक करत बंडलच संपवल. टेबलावर एक मुंगळा फिरताना आढळला. हाताने धरत त्याला वहीवर ठेवला. पेनाच्या टोकाने त्याच्याशी खेळत बसलो. एकाएकी हातावरुन सदऱ्याच्या बाहीत शिरला वगैरे. नको तिथे चालला वगैरे. पुन्हा पकडुन वहीवर ठेवला वगैरे. तो आता वहीच्या खाली चालला वगैरे. पुन्हा त्याला पकडलं वगैरे. आता याला कुस्तीसाठी नवीन मुंगळा पकडला पाहीजे वगैरे. सगळ्या खोलीत वगैरे शोधत फिरलो. शेवटी फडताळात वगैरे एक सापडलाच. त्याला वहीवर ठेवायला घेऊन आलो तर हा पहिला गायब. का हाच होता तो. शेवटी त्याला खिडकीबाहेर टाकुन दिलं वगैरे. यातच रात्र गेली. आजही समाजशात्राचा अभ्यास बोंबलला. पहाटे थोडावेळ झोपलो तर सुरेश दारात हजर. बहिणीच्या लग्नाला स्टेशनवर जायचय, तो म्हणाला. अख्खा दिवस मी तारटवल्या डोळ्यांनी घालवला. आता हे खुपच झालं. तू एक काम कर, आधी बी.कॉम वगैरे पुर्ण कर. मंजिरीसोबत जास्त फिरु नकोस. जाम लफडेबाज आहे ती. बाजारात सुधाकर तिला घेऊन फिरत होता. दिवसभर. म्हणजे सिनेमा वगैरे पाहिला दोघांनी. संध्याकाळी किशोर तिच्या रुमवर गेलता. नोटस् वगैरे आणायला. बराच वेळ बाहेर आला नाही असे सुरेश म्हणाला. रात्री मला ती पुलाखालच्या काळोखात बसलेली दिसली. रामदासच्या पुढे. नागवीच. गेल्या महीन्यात ट्रिपला महाबळेश्वरला गेलो होतो. मित्रांबरोबर. महाबळेश्वर एक प्रचंड हिरवगार टेकाड. समोर कायम घोंगावणारा वारा. त्याचा आवाज मनात घुमतो आहे. आणि मी स्पॉटांमागुन स्पॉट पाहतो आहे. एका स्पॉटात भलीमोठी दरी. अक्राळविक्राळ. खालुन थेट शिखराकडे पाहते आहे. काय पाहते आहे? झाडाझुडपांनी फार फार वेढलेली. मध्येच उजाड ओबडधोबड माळरान.त्या बोडक्या माळरानाकडे मी टक लावुन पाहतो आहे. या माळरानावरचं दगडांचा हिशोब मांडलाय. मी पुन्हा खाली पाहतोय. एवढी मोठी दरी नजरेच्या एका टप्प्यात पाहता येत नाही वारंवार डोळे फिरवावे लागतात. अतिशय हिरवळ. आणि गारठा. हा गारठा घोंघावण्याऱ्या वाऱ्यासमवेत झेपावत येतो. आणि मला बधीर करुन जातो. ही बधीरता शब्दात मोजता येणार नाही. मी तसाच पायरीवर बसतो. प्लीज किप मी वॉर्म, माझ्यावर दया कर. ही दरी आपली किव करणार नाही. ही लिक्विड नायट्रोजन पोटात गोठवुन बसली आहे. पुन्हा दुसऱ्या स्पॉटकडे. तशीच भव्य दरी. तिसरीही तशीच. दर स्पॉटवर तेच. एका स्पॉटवर गच्च हिरवळ आहे. मी कितीही आत गेलो तरी संपणार नाही. त्या जंगलात मी इकडे तिकडे फिरलो. ईथे खरच काही नाही. या गारठलेल्या बधीरतेत रोमांचाला सीमा नाही. ईथे तर फक्त एक दिवसाचा खेळ. गेल्या आठवड्यात तुझ्या घरी गेलतो. हात मागायला. तुझा बाप म्हणाला, कामधंदा काय करता, नोकरी वगैरे. मी म्हणालो, गावाकडे शेती आहे, ट्रँक्टर आहे, चार म्हशी आहेत, दुमजली घर आहे. तुझा बाप म्हणाला, असा कसा तुमच्या गळ्यात आम्ही धोंडा बांधायचा. हे थोरच आहे. माझं आयुष्य असं हे खुंटीला बांधलेलं. तुझ्याही प्रेमात पडु वाटलं म्हणुन पडलो. तुला कोणी धोंडा वगैरे म्हटल्यालं आपल्याला नाही आवडणार. तरीही तुझ्याशीच पाट लावणार. उदाहरणार्थ हे चुकच आहे. म्हणजे बरोबर. कळावे शंभरातील दुसरा...

वाचने 11921
प्रतिक्रिया 39

प्रतिक्रिया

कोसला वाचली नाही त्यामुळे लेख डोक्यावरून गेला. बाकी तुमच्या कथेतल्या, लेखातल्या स्त्रीया ह्या व्यभिचारीच का असतात असा सहजच प्रश्न मनात डोकावून जातो.

'कोसला'ही अशीच निरर्थक वाटली होती.

In reply to by एस

अगदी अगदी. कोसला, बेडेकरांची रणांगण ह्या निष्कारण उदो उदो झालेल्या कादंबऱ्या आहेत असे माझे स्पष्ट मत आहे.

In reply to by प्रचेतस

+१ कोसला अर्धवट वाचुन सोडुन दिली होती.

In reply to by अजया

हॅर्टा हॅर्टा त्यापेक्षा अनंत सामंतांची एम् टी आयवा मारू सरस वाटते. कोसलाच्या सांगवीकरपेक्षा लव्हाळीतला सर्वोत्तम सटकर सरस वाटतो. हे ही थोरच. बाकी दर्पणा अगदी मजेत आहे. सारखीच आरशात बघत असते. कल्जी करू नये. :)

In reply to by प्रचेतस

रणांगण आणि सत्तांतर या मराठीतल्या सर्वकाळजबरदस्त (all time great) कादंब-या आहेत. लव्हाळी तर भयावह सुंदर आहे. कोसलाच्या बाबतीत सहमत. अर्थात ती नेमाड्यांची सर्वश्रेष्ठ कादंबरी आहे. बाकीच्या अगदीच फालतू.

In reply to by बोका-ए-आझम

सत्तांतर माडगूळकरांची का? जबरी आहे. अर्थात त्यांच्यावर सत्तांतराच्या बाबतीत कल्पनाचौर्याचा आरोपही झाला होता.

In reply to by प्रचेतस

बाकी आनंद यादवांची नटरंग, उत्तम बंडू तुप्यांची झुलवा आणि राजन गवस यांची चौंडकं या पण बाप कादंब-या आहेत. त्याबद्दल कधीतरी लिहायचंय.

कोसलाचा जो उदोउदो झालाय ते आकलनाच्या बाहेर आहे, मारुतिच्या बेंबित विंचू चावून् फजिता लपवण्यासाठी गारगार वाटत सांगणार्या गोष्टी सारखं ते वाटतं ना शेंडा ना बुडखा ,डझनावारी चिकित्सेची पुस्तकं काही पी एच ड्या कोसलावर,अनेक भाषात भाषातंर काय, साहित्य आकादमिचा पुर्सकार काय,निव्वल बकवास, एका मित्रान कोसला वाचायला दिलं पण अट घातली,एक शेवटपर्यंत सक्तिनं वाचायचं आणि दुसरी अट पुन:परत आणून द्यायचं नाही,असा सूड त्यान घेतला वगैरे वगैरे १००तल्या९९चांहि सूड उगवला गेलाय पण मारुतिची बेंबी दुसरं काय खरं म्हणजे हा शिल्या कढीला उत आहे पण , तुमचं विडबन झकास आज कोसला का आठवली?

In reply to by दिवाकर कुलकर्णी

त्याची कारणं … एकदम वेगळा जॉनर . त्या वेळेच्या तरुणांच्या बोली भाषेत लिहिलेली . साधे विषय . पण धीट मांडणी . मी वाचायला घेतली आणि एका बैठकीत संपवली . समीक्षण करण हा हेतू नाहीये . तुमच्या मताचा ही आदर आहेच . पण कौतुक जरा जास्तच झालंय हे ही खरंच .

In reply to by यमन

सहमत.. कोणत्याही कलाकृतीचे मूल्यमापन त्या काळाच्या कसोटीवर झाले पाहिजे. नाहीतर सगळेच कालबाह्य दिसू लागते.

प्रत्येकामधे एक पांडुरंग सांगवीकर लपलेला असतो. कोणाला तो सापडतो कोणाला नाही. कोसला कदाचित ओव्हररेटेड असेलही पण तरिही भयानक आवडते. हे थोर आहे. बाकी कोसलाकारांचं बाकीचं लेखन कटाक्षानी टाळलय.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

म्याड च आहेस. उदाहरणार्थ २३४८ वेळा सांगायला हवं तुला की थोरपणा वयावर अवलंबून वगैरे नसतो. -सांगवीकर पांडुरंगाभेटी लंपन पै आला

रात्री एक लेख टाकला. तिकडं म्हणाले, अस्सल पेक्षा चोखंदळ वगैरे. ईकडे म्हणाले, अस्सल हेच भंकस वगैरे. कुणी म्हणालं, डोक्यावरुन गेली. दुसरा म्हणाला, अगदी अगदी. तिसरा म्हणाला, सुड वगैरे ऊगवलाय. मग यमन म्हणाला, पुलेशु हे थोरच आहे.

कोसला भयंकर आवडत पुस्तक शैली छान उचललीत भन्नाट विडंबन मजा आ गया एकदा जीए दवणे अस काहीतरी कॉकटेल करुन दाखवा राव मजा येइल

In reply to by पैसा

माघाच्या थंडीतील रमलखुणा वगैरे ? हे थोरच आहे! ;)

In reply to by दिवाकर कुलकर्णी

अरे हो की! मलाही ते वगैरे वगैरे लिहीताना नायगावकरच पुढं दिसले. तसाही दोघांत काही विशेष फरक नाही. उदा. मिश्या वगैरे. सर्व प्रतिसादकांचे आभार!

कोसला स्टाईल आवडली. मात्र कोसला मधे असणारी लेखकाची कुठेच न नेणारी स्थिती तुम्ही दाखवली असती तर उदाहरणार्थ थोर वाटले असते.

कोसलाच्या यशासाठी ? पुलनाहि वेठीला धरलं हेतं त्यांच्याकडून चार ओली लिहुन घेतल्या होत्या,ते असो वगैरे वगैरे , तरुणाईला आकर्षित करणारे असेस दुसरे लेखक भाऊ पाध्ये मला स्वत:ला जास्त भावतात ,दोघेहि थोडे फार समकालिन असावेत त्यांच्या वासुनाका स्टाईलने कोणी लिहू शकेल काय? दोघेहि एकदम भिन्न प्रव्रुत्तीचे त्या उभयतांची तुलना करण्याचा अजिबात हेतु नाही,