Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Sat, 09/12/2015 - 01:39
लेखनविषय (Tags)
विज्ञान
लेखनप्रकार (Writing Type)
बातमी

(सूचना : या लेखातली सर्व चित्रे आंतरजालावरील वेगवेगळ्या स्रोतातून साभार घेतलेली आहेत)

आतापर्यंत, म्हणजे अगदी गेल्या काही आठवड्यांपर्यंत सबळ शास्त्रीय पुराव्यांनी मान्य असलेली मानवाची कुळकथा आपण इथे पाहिली होती. अर्थातच ही Australopithecus afarense या आदिमानवापासून पासून ते Homo sapiens sapiens या आजच्या आधुनिक मानवापर्यंतची कुळकथा लक्ष-दशलक्ष वर्षांच्या मोजमापाने मोजली जाते. याचा स्पष्ट अर्थ असा या कथेत बरेच आतापर्यंत न सापडल्यामुळे गाळलेले दुवे आहेत. त्या कालखंडातील Homo नावाच्या कुटुंबाचा Homo habilis पासून सुरू झालेला एकूण भाग अंदाजे २० लाख वर्षांचा आहे ! या कुटुंबातल्या Homo ergaster (१५ लाख वर्षांपूर्वी); Homo heidelbergensis (५ लाख वर्षांपूर्वी) आणि Homo neanderthalensis (२ लाख वर्षांपासून ते ३०,००० वर्षांपूर्वीपर्यंत) याच्याबद्दल आपल्याला बर्‍यापैकी माहिती आहे (निदान, आपला तसा आतापर्यंतचा समज आहे :) ). मात्र या सर्व Homo कुटुंबातील इतर सभासदांपेक्षा आपण Homo sapiens sapiens इतके वेगळे आहोत की या सर्व नातेवाईकांशी आपण कसे जोडलेले आहोत याबद्दल आपले ज्ञान १००% खात्रीचे नाही तर केवळ सैद्धांतिक आहे. म्हणजेच आपल्याला इतरांशी जोडणारे अनेक दुवे/साखळ्या अजून नक्की माहीत झालेल्या नाहीत. हा इतिहास अनेक दशलक्ष वर्षांच्या मोठ्या कालखंडावर विखुरलेला असल्याने, त्यातील बरेच पुरावे निसर्गाच्या आघातांनी पुसून गेले आहेत किंवा अस्पष्ट झालेले आहेत. याशिवाय, इतक्या मोठ्या पृथ्वीतलावर इटुकल्या मानवाचे लक्षावधी वर्षांच्या नैसर्गिक आघातांनी मोडतोड झालेले, सांदीकोपर्‍यात लपून बसलेले, पिटुकले अवशेष कुठे असतील हे सांगणे म्हणजे गवताच्या गंजीत लपलेली सुईच्या जागेचा अंदाज बांधण्यापेक्षा अनेक पटीने जास्त कठीण आहे हे सांगायला नकोच. या पार्श्वभूमीवर, जेव्हा जेव्हा अपघाताने मानववंशातील नातेसंबंधातली एखादी कडी सापडते तेव्हा तिचे महत्त्व लक्षात येणे कर्मकठीण असते. असेच काहीसे २०१३ मध्ये झाले. दक्षिण आफ्रिकेतील जोहानेसबर्ग येथील विटवॉटर्सरँड (Witwatersrand) विद्यापीठातल्या ली बर्गर नावाच्या प्रोफेसरच्या घरी एका रात्री एक हौशी गुहा धुंडाळत फिरणारा (amateur caver) भूगर्भशास्त्रज्ञ त्याला सापडलेला जबड्याच्या जीवाश्माचा (fossil jawbone) तुकडा घेऊन आला. बर्गर नॅशनल जिओग्राफिकचा Explorer-in-Residence आहे. त्याने याआधी २००८ मध्ये Australopithecus sediba ही प्रजाती शोधून काढलेली आहे. हा जीवाश्म महत्त्वाचा आहे असा बर्गरचा प्राथमिक अंदाज होता. परंतू तो इवलासा तुकडा मानवाच्या जीवनकथेत मोठे मानाचे स्थान मिळवेल आणि त्याचबरोबर मानवाच्या इतिहासाबद्दल अजून काही प्रश्न निर्माण करेल असे त्याला वाटले नव्हते. जोहानेसबर्गच्या जवळ असलेल्या रायझिंग स्टार नावाच्या गुहेत (Rising Star Cave) तो जीवाश्माचा तुकडा मिळाला होता. ही गुहा असलेला भाग पुरातन मानवी अवशेषांनी इतकी समृद्ध आहे की त्याला "Cradle of Humankind world heritage" असे ओळखले जाते. त्या गुहेतील अवशेषांवर दोन वर्षे केलेल्या संशोधनाच्या आधारे बर्गरच्या संघाने मानवाच्या Homo कुटुंबातील एक नवीन प्रजाती शोधून काढल्याचा दावा केला आहे. त्यांनी या प्रजातीला होमो नालेदी (Homo naledi) असे नाव दिले आहे.

 रायझिंग स्टार गुहेची जागा

. रायझिंग स्टार गुहा लांबलचक असून तिच्यामध्ये अनेक कक्ष आहेत. त्यांना जोडणारे मार्ग काही ठिकाणी केवळ सात इंच (१७-१८ सेमी) रुंद आकाराचे आहेत. अर्थातच या गुहेतले अवशेष शोधणे आणि त्यांना जमा करून बाहेर आणणे हे बरेच धोकादायक काम आहे.

 रायझिंग स्टार गुहेचे मानचित्र

. हे खास काम करण्यासाठी बर्गरने सामाजिक माध्यमांच्या मदतीने सडपातळ शरीरयष्टीच्या "भूगर्भातल्या आकाशवीरांसाठी (underground astronauts)" जाहिरात दिली. आलेल्या अर्जदारांतून आवश्यक संशोधनाबद्दल माहिती असलेल्या आणि गुहेच्या सात इंची मार्गांतून जाऊ शकणार्‍या लहान चणीच्या सहा तरुणींची निवड केली गेली...

 "भूगर्भातल्या अवकाशवीर" तरुणी

.

 "भूगर्भातल्या अवकाशवीर" काम करताना

. त्याच्या शरीरयष्टीमुळे बर्गर स्वतः चिंचोळ्या जागांतून गुहेच्या शेवटपर्यंत जाऊ शकत नव्हता. पण इथे आधुनिक तंत्रज्ञान कामी आले ! रियल टाइम मॉनिटर्स वापरून तो सतत या संशोधनाचे मार्गदर्शन करत होता. हा प्रकल्प नोव्हेंबर २०१३ पासून मार्च २०१४ पर्यंत चालू होता. गुहेच्या तोंडापासून ९० मीटर आत आणि जमिनीखाली ३० मीटर असलेल्या एका कक्षात बालके आणि तरुण व वृद्ध, पुरुष व स्त्रियांच्या हाडांचे जवळ जवळ १५०० अवशेष सापडले. आतापर्यंत १५ वेगवेगळ्या व्यक्तींची हाडे वेगळी केली गेली आहेत. पण ही केवळ सुरुवात आहे आणि अधिक हाडे सापडण्याची खात्री संशोधकांना आहे. कक्षात विखुरलेल्या जीवाश्मांवर पाय न देता ते गोळा करणे हेच संशोधकांपुढे सर्वात मोठे आव्हान होते/आहे...

 गुहेत सापडलेल्या जीवाश्मांपैकी काही

. या अवशेषांवर मृत्युपूर्वी हल्ला झाला असल्याच्या अथवा अपघाताच्या खुणा सापडत नाहीत. त्याअर्थी ते नैसर्गिक कारणांनी अथवा आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींचे अवशेष असावेत. एकाच ठिकाणी याप्रकारचे इतके अवशेष असल्याने, बर्गर गटाच्या मताने हा कक्ष मृतांच्या शरीरांना ठेवण्यासाठी / पुरण्यासाठी वापरली जाणारी जागा (burial ground) आहे. मृतांसाठी अशी प्रथा केवळ आधुनिक होमो प्रजातीतच सापडते. या अर्थाने, ही प्रजाती इतर मानवांच्यापेक्षा जास्त विकसित आणि म्हणून आधुनिक मानवाच्या अधिक जवळची आहे. आतापर्यंत सापडलेले सर्वात जुने थडगे १,००,००० (एक लाख) वर्षे जुने आहे. या नवीन अवशेषांचे वय ठरवण्याचे काम सुरू आहे. ते एक लाखापेक्षा जास्त असेल की कमी याकडे शास्त्रीय जगत कुतूहलाने लक्ष ठेवून आहे. होमो नालेदी प्रजातीचे महत्वाचे गुणधर्म खालीलप्रमाणे होते: १. मेंदू ५६० घन सेमी म्हणजे आधुनिक मानवाच्या मेंदूच्या निम्म्यापेक्षा लहान आकाराचा होता.

  होमो नालेदी कवटी आणि तिची आधुनिक मानवी कवटीशी तुलना

. २. दात आणि जबड्यांचा आकार सुरुवातीच्या आदिमानवांच्या जवळपास होता.

 होमो नालेदी जबडा

. ३. उंची आधुनिक मानवापेक्षा कमी म्हणजे साधारण ५ फूट होती. ४. पायांची रचना आधुनिक मानवाच्या पायांशी मिळतीजुळती आणि ताठ उभे राहून दूरवरचे अंतर चालून जावू शकेल अशी होती. ५. हातांची रचना आधुनिक मानवाच्या हातांसारखी, अवजार (tool) बनवणे व उंचीवर चढणे यासारख्या कामाला योग्य होती. ६. टोळीच्या मृत सभासदांच्या शरीराची विल्हेवाट लावण्यासाठी निवडलेली खोलवरची आणि जाण्यास कठीण जागा पाहता; या कामासाठी खूप विचारपूर्वक श्रम करून धोका पत्करण्याइतकी प्रथा विकसित झाली होती असे म्हणता येते. थोडक्यात, या प्रजातीमध्ये अगदी सुरुवातीच्या आदिमानवापासून आधुनिक मानवापर्यंतच्या गुणधर्मांची सरमिसळ आहे. आतापर्यंत केवळ आधुनिक मानवातच असलेले काही गुणधर्मही या प्रजातीत दिसून येतात. बर्गर गटाने केलेले दावे जर अधिक संशोधनाने सिद्ध झाले तर ही प्रजाती आतापर्यंत न सापडलेली "आदिमानव आणि आधुनिक मानवाला जोडणारी एक कडी" होईल. असे झाले तर हा मानवंशशास्त्रातला एक फार मोठा पडाव ठरेल. तर भेटा आपल्या पूर्वजांच्या चुलत कुटुंबातील एका व्यक्तीला...

 जीवाश्मांवरून बनवलेला होमो नालेदीचा अर्धपुतळा

================================================================== संदर्भः Homo naledi: New species of human ancestor discovered in South Africa http://edition.cnn.com/2015/09/10/africa/homo-naledi-human-relative-species/ Homo naledi: New species of ancient human discovered, claim scientists http://www.theguardian.com/science/2015/sep/10/new-species-of-ancient-human-discovered-claim-scientists Fossil first: Homo naledi may have buried its dead http://timesofindia.indiatimes.com/world/rest-of-world/Fossil-firstHomo-naledi-may-have-buried-its-dead/articleshow/48902221.cms Homo naledi https://en.wikipedia.org/wiki/Homo_naledi ==================================================================
  • Log in or register to post comments
  • 19207 views

प्रतिक्रिया

Submitted by पिशी अबोली on Tue, 09/15/2015 - 16:21

Permalink

फार आवडला लेख. अजून माहिती

फार आवडला लेख. अजून माहिती येईल तशी प्लीज लिहा. वाचायला खूप आवडेल. हाडं म्हणजे गुलाबाची फुलं आणि बरियल साईट्स गुलाबाचे ताटवे वाटणार्‍या लोकांमध्ये राहणारी, पिशी.
  • Log in or register to post comments

Submitted by शेखरमोघे on Wed, 09/16/2015 - 02:13

Permalink

खूप छान, माहितीपूर्ण आणि

खूप छान, माहितीपूर्ण आणि विविध अन्गाने लिहिलेला लेख आवडला. फोटो न दिसण्यावरचा उपायही अनायासे कळला.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Wed, 09/16/2015 - 02:21

Permalink

नेहमीप्रमाणे अभ्यासपूर्ण लेख

नेहमीप्रमाणे अभ्यासपूर्ण लेख. लेखाबाबत वरील प्रतिसादांत मांडल्या गेलेल्या विचारांशी सहमत.
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Wed, 09/16/2015 - 15:08

In reply to नेहमीप्रमाणे अभ्यासपूर्ण लेख by श्रीरंग_जोशी

Permalink

अभ्यासोनि प्रकटावे...

नेहमीप्रमाणे अभ्यासपूर्ण लेख. लेखाबाबत वरील प्रतिसादांत मांडल्या गेलेल्या विचारांशी सहमत.
सहमत आहे. शिवाय माहितीचे संकलन, आकलन, सोप्या शब्दांत आणि वाचनीय सादरीकरण, आणि ते वेळोवेळी अद्ययावत करण्याची घेतलेली दक्षता - हे सारे टप्पेही अनुकरणीय!
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Wed, 09/16/2015 - 17:34

Permalink

सर्व वाचकांचे आणि

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे अनेकानेक धन्यवाद ! या शोधाबद्दल इतक्या जणांनी दाखवलेल्या कुतुहलामुळे मिपावर घाईघाईने हा लेख टाकल्याचे चीज झाले असेच म्हणावेसे वाटते. या मानववंशशास्त्रात मैलाचा दगड ठरू शकणार्‍या संशोधनाच्या निष्कर्षांकडे शास्त्रिय जगताचे लक्ष लागले आहे. नालेदीचा कालखंड आणि त्यामुळे त्याचे समवयस्क असलेल्या/नसलेल्या इतर आदिमानव/मानव प्रजातींच्या कालखंडांच्या अभ्यासावरून एकूणच मानवाच्या उत्क्रांतीबद्दलच्या आपल्या सद्यकल्पनांना बरेच धक्के बसणार असेच दिसते आहे. या कारणाने नालेदी प्रजातिचा शोध "शतकातला एक" ठरण्याची शक्यता आहे.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com