Skip to main content

फणसाची गर्‍या गोट्याची भाजी

लेखक यशोधरा यांनी शुक्रवार, 28/08/2015 10:04 या दिवशी प्रकाशित केले.
लागणारे जिन्नसः कच्चा पण थोडासा जून असा कापा फणस, २-३ ओल्या मिरच्या, १ वाटी खोबरे, १ लहान चमचा हळद, ७-८ काळी मिरी, फोडणीसाठी हिंग, मोहरी, चवीला साखर, मीठ कृती: फणस सोलून व आतील गरे साफ करुन घ्यावेत. गर्‍यांमधील बिया (आठळ्या) काढून त्यांची वरची साले काढून त्यांचे लांबट तुकडे करावेत. फणासाच्या बाहेरील सालीचा आतील भाग काढून त्याचेही लांबट तुकडे करावेत. जरासे चेचावे. गरे लांबट चिरावेत. तेलात हिंग मोहरीची फोडणी करुन त्यात आठळ्यांचे तुकडे व सालीच्या आतल्या भागांचे तुकडे शिजायला घालावे. सोबत थोडे पाणी व हळद घालावी. हे शिजले की त्यात गर्‍यांचे तुकडेही घालावे. चवीला मीठ व साखर घालावी. मिरच्या व मिरी ठेचावी व खोबर्‍यासकट मिक्सरमधून एकदोनदा फिरवून घ्यावी. वाटण फणसाच्या भाजीत घालून भाजी ढवळून घ्यावी व चांगली वाफ आणावी. वरुन खोबरे - कोथिंबीर पेरावी. कारवारी मसाला: १ टेस्पू धणे, १ टीस्पू जिरे व हळद प्रत्येकी, ४-५ लाल सुक्या मिरच्या. १ छोटा कांदा कापून, ६-७ लसूण पाकळ्या, किंचितसे आले, १ वाटी खोबरे चिंचेचा कोळ. मिरची सोडून सर्व मसाला कच्चा वाटायचा. मिरचीची फोडणी व बाकी वर दिल्याप्रमाणेच. हिरवी मिरची, मिरी ऐवजी हे वाटण वापरायचे. phanasa bhajee_cleaned.jpg टीपा: गरे साफ करताना व फणस सोलताना हातांना व विळीला तेल लावून घ्यावे. फोडणीसाठी हिरव्या मिरच्यांऐवजी लाल मिरच्या वापरता येतील. तेह्वा सोबत उडीद डाळही घालता येईल. साखरेऐवजी गूळ घालता येईल. ह्या भाजीत काही जण ओले शेंगदाणे / पावटे/ भिजवलेले हरभरे/ मटार वगैरेही टाकतात. आपापली आवड.

वाचने 28405
प्रतिक्रिया 74

प्रतिक्रिया

कच्चा फणस म्हणजे इथे 'भाजीचा फणस' म्हणून साधारणपणे, सोललेल्या नारळाच्या आकाराचा मिळतो. तोच वापरायचा का?