Skip to main content

फणसाची गर्‍या गोट्याची भाजी

लेखक यशोधरा यांनी शुक्रवार, 28/08/2015 10:04 या दिवशी प्रकाशित केले.
लागणारे जिन्नसः कच्चा पण थोडासा जून असा कापा फणस, २-३ ओल्या मिरच्या, १ वाटी खोबरे, १ लहान चमचा हळद, ७-८ काळी मिरी, फोडणीसाठी हिंग, मोहरी, चवीला साखर, मीठ कृती: फणस सोलून व आतील गरे साफ करुन घ्यावेत. गर्‍यांमधील बिया (आठळ्या) काढून त्यांची वरची साले काढून त्यांचे लांबट तुकडे करावेत. फणासाच्या बाहेरील सालीचा आतील भाग काढून त्याचेही लांबट तुकडे करावेत. जरासे चेचावे. गरे लांबट चिरावेत. तेलात हिंग मोहरीची फोडणी करुन त्यात आठळ्यांचे तुकडे व सालीच्या आतल्या भागांचे तुकडे शिजायला घालावे. सोबत थोडे पाणी व हळद घालावी. हे शिजले की त्यात गर्‍यांचे तुकडेही घालावे. चवीला मीठ व साखर घालावी. मिरच्या व मिरी ठेचावी व खोबर्‍यासकट मिक्सरमधून एकदोनदा फिरवून घ्यावी. वाटण फणसाच्या भाजीत घालून भाजी ढवळून घ्यावी व चांगली वाफ आणावी. वरुन खोबरे - कोथिंबीर पेरावी. कारवारी मसाला: १ टेस्पू धणे, १ टीस्पू जिरे व हळद प्रत्येकी, ४-५ लाल सुक्या मिरच्या. १ छोटा कांदा कापून, ६-७ लसूण पाकळ्या, किंचितसे आले, १ वाटी खोबरे चिंचेचा कोळ. मिरची सोडून सर्व मसाला कच्चा वाटायचा. मिरचीची फोडणी व बाकी वर दिल्याप्रमाणेच. हिरवी मिरची, मिरी ऐवजी हे वाटण वापरायचे. phanasa bhajee_cleaned.jpg टीपा: गरे साफ करताना व फणस सोलताना हातांना व विळीला तेल लावून घ्यावे. फोडणीसाठी हिरव्या मिरच्यांऐवजी लाल मिरच्या वापरता येतील. तेह्वा सोबत उडीद डाळही घालता येईल. साखरेऐवजी गूळ घालता येईल. ह्या भाजीत काही जण ओले शेंगदाणे / पावटे/ भिजवलेले हरभरे/ मटार वगैरेही टाकतात. आपापली आवड.

वाचने 28405
प्रतिक्रिया 74

प्रतिक्रिया

मस्त पाकृ! आणि फटु तर अप्रतिम आहे!

मस्त ग यशो,फणसाची भाजी जीव कि प्राण.मला अगदी कोवळ्या फणसाची भाजी आवडते.रामनवमीच्या उत्सवाला आजोळी कोणी गेलं की,त्याच्याबरोबर माझी मामी माझ्यासाठी कुवऱ्या पाठवते.थोडे कष्ट घ्यावे लागतात,पण भाजी अहाहा.....आता तुझ्यासारखीही करून पाहीन.

In reply to by नूतन सावंत

मलापण खूप आवडते ताई. :) ही भाजी, केळफुलाची भाजी काळे वाटाणे घालून, कच्च्या केळ्यांची भाजी...

ही फणसाची भाजी, ती काजूगरांची भाजी, ओल्या काजूंची उसळ असल्या खास कोकणी पाककृती आतापर्यंत कधीच खाल्लेल्या नाहीत.

In reply to by प्रचेतस

तुम्ही वेळेवर चहा नं पाजल्यानं ह्या आनंदास मुकलेला हात. पुढच्या वेळी पेश्शल चहा पाजा बघा फणसाची भाजी, कजुगरांची भाजी, ओल्या काजुंची उसळ वगैरे पाकृ. खायला नाही तरी बघायला तरी मिळतील. हाकानाका. हल्ला व्हायच्या आत पळतो ता. -कॅप्टन रणछोडदास र"न"गाडे-

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

खी खी खी पण चहा पाजत नै हा आक्षेप पुणेकरांवर आहे हो. आपण तर डायहार्ड चिंचवडकर.

In reply to by प्रचेतस

फणसाची भाजी, ती काजूगरांची भाजी, ओल्या काजूंची उसळ अशा क्षुल्लक गोष्टींसाठी कुणाला चहा पाजायचा म्हणजे अतिच आहे. चला, बरी आठवण झाली. आलोच जरा चहा घेऊन!

मी पण:( तुमच्या पाकृ बघून तुमच्याकडेच येऊन ट्रायल घेतली पाहिजे असे वाटतंय!

रेसिपी आणि फोटो दोन्हीही आवडले. नक्कि करून बघते.

कृतीही सोपी आहे. मी ओले शेंगदाणे घालते. माझ्या आवडत्या भाज्यांमधे पहिल्या पाचात आहे फणसाची भाजी. नुसतीही बोलमधे घेऊन खाते. शिल्लक आहे का? येऊ का? :-)

मस्त भाजी ! अवांतर : तयार फणसाच्या भाजलेल्या आठळ्या एक नंबर लागतात :)

आवडती भाजी!! यावर्षी फणस एकदोनदा पाह्यला, नंतर करु म्हणून चालढकल केली. आता इनो घेऊन येतो.

फणसाच्या भाजीची चव एकदोन वेळाच घेतली आहे . त्या वेळी आवडली होती असे आठवते. आता करून बघेन. पा. कृ. साठी धन्यवाद !

वाह! मस्त फोटू व सोपी कृती. तू काळे वाटाणे घातलेस ना ? पण ते वाफेवर सहज शिजत नाहीत ना? मग काय करायचे?

क्या बात यशो. मी हौसेने कॅन्ड कच्चा फणस घेऊन आले आणि त्याचं काय करावं न कळल्याने बिचारा तो डबा वाट बघत कपाटात शांत बसुन आहे. आता वीकांताला करते तुझ्या रेसिपीने.

फणसाची भाजी माझी फार आवडती आहे. सुदैवाने लष्करातून निवृत्त झाल्यावर मुंबईत परत आल्याने गावचा फणस आला कि भाजीचा आनंद लुटता येतो. बायको देशावरची असली तरी आई वरच्या मजल्यावरच राहत असल्याने हमखास गरम गरम भाजी खायला मिळतेच. पण यशोधरा ताई भाजीची पाककृती आणी फोटो( अतिशय सुंदर आहेत च) पण टाकण्याची अत्यंत चुकीची वेळ गाठ्लीत. पुढचे सात महिने तरी फणस मिळण्याची शक्यता नाही तेंव्हा तोंडचे पाणी पुसून टाकावे लागत आहे या बद्दल आपला निषेध

एकदम हटके पाकृ ! माझ्या दारातले कच्चे फणस वार्याने पडलेले मला, भाजी करता येत नाही म्हणून देऊन टाकले गेल्या वर्षी ! बाकी कच्चा फणस म्हणजे श्रावणातलं मटण अं ?

In reply to by यशोधरा

माझ्याकडे हा फणस दिला असता तर बरे झाले असते. फणस पोहोच्वल्याबद्दल फणसाची भाजी मिळाली असती. मी फणसभाजी अमरावतीला कंपनीच्या विभागीय प्रबंधकाचे कृपेने (२०-२२) वर्षांपूर्वी खाल्ली आहे. त्यानंतर काही योग आला नाही खरं! अभामिपा पुणे महानगर कट्टा मित्रमंडळ परस्पर भागवत समीती सभासद.

यशोधरा, डिश मधली फणसाची भाजी पाहून माझ्या आजोळची आठवण आली.

तुकां काय कामधंदो नाय गो? कसले-कसले भाजये टाकतंय! आमच्याकडे एकतर कुयरीचो फणस गांवतां नाय तर एकदम पिको. हो गर्‍या-गोट्याच्या किंवा आनसा-फणसाच्या स्टेजचो गांवणां नाय.... पार्सल कर थोडी भाजी (श्रावणाकारणान तुझ्याकडे सुके बांगडे मागणंय नाय, ते आम्ही आमचें वापरूं!!) :)

कालच पाहिला बाजारात. आम्ही काळे वाटाणे घालून करतो ही भाजी. काय चव आली तोडात. उठा! चला बाजारात!!

इतके दिवस लोक फणस घेऊन जाता येताना दिसले की वाटायचं एवढी चिवचिव का करतात लोक? गरे काढा आणि बाकी फणस फेका. कोकणी लोक पूर्ण फणसाचा वापर कर्तात हे माहिती नव्हतं. पाकृ खाऊन बघण्यात येईल.

In reply to by यशोधरा

करंदी बहुदा एकदम बारीक पांढरी, कोलीम लालसर बहुदा जवळा बोलतात काही जण.. त्यानंतर काड जरा मोठी

In reply to by यशोधरा

नाही थोडेसे मोठे असतात पण सोड्याइतके नाही... काड पण लालसर असते. काड नुसती धुवुन कांदा टोमॅटोवर परतवायची. तिखट मीठ कोकम घालुन मस्त लागते. खरतर हे सगळे लहानपणापसुन एकलेले शब्द आहेत तर तेच आठवतात. सोडे वगैरे कधी खावे लागले नाहीत.. बाकी सगळे ऑप्शनस असताना :) बारा महिने काही ना काही मासे मिळायचेच

In reply to by विशाखा राऊत

सर्वत बारीक कोलीम. दुरुन पाहीला तर मातीचा गोळाच वाटतो. अतिशय निगुतीने चहाच्या गाळणीतून साफ करावा लागतो. कोलमाची पेंड चुलीवर भाजून अप्रतिम लागते. मग जवळा, मग करन्दी, मग कोलंबी. हे सगळे वेगवेगळे प्रकार आहेत.

In reply to by अदि

माझ्या माहितीनुसार, साल काढलेली कोलंबी म्हण्जे सोडे. मग ते ओले असुदे नाहीतर सुके.

वाह!! मस्तचं पाककृती आहे फणसाच्या भाजीची आणि फोटो पण सुरेख!! आम्ही केळफुलात काळे वाटाणे घालतो :)

मस्तच यात आम्ही लसुण आणि काळे वाटाणे घालतो. इतकी आवडते की उप्पीट, पोह्यासारखी नुसतीसुद्धा खातो. बाकी जाणकारांनी असा फणस निवडायच्या काही टीप्स दिल्या तर बरं होईल. सध्या पिंपरी मंडईतुन भाजीवाल्याला विचारुनच फणस घेतो. बर्‍याचदा चांगला असतो पण कधी कधी फणस मोठा असुन खुप पाव असते मग भाजी २ जणांपुरतीच होते बाकिच्यांना आयत्या वेळी दुसरी भाजी करावी लागते. याशिवाय गर्‍याचे फणस असतात ते पुर्ण पिकायच्या आधी उतरवुन त्यातल्या फक्त गर्‍या - गोट्याची भाजी फोडणी, हळद आणि ओलं खोबरं घालुन जबरदस्त लागते.

आवडती भाजी.. आमच्याकडे बिरड्या घालून करतात.. ह्म्म..आता फणसाच्या सिझनला भारत वारी करणे आले.. स्वाती

मस्त मस्त. पण कच्च्या आठळ्या चिरल्या जातात? (जामच अडाणी प्रश्न आहे. पण सांग ना). मी उकडून घेते आधी.