परोपकारी गणू
आज गावचा आठवडे बाजार. त्यामुळे सकाळची शाळा आणि दुपारी बारा वाजता सुट्टी. गणूला हा दिवस खूप आवडे. नेहमीप्रमाणे तो शाळेतून बारा वाजता घरी आला. घराला कुलुप होते.आई शेतावर मजूरीसाठी गेली होती आणि अजून तायडी पण शाळेतून आली नव्ह्ती. म्हणून तो घराच्या ओटयावर बसून राहीला. एव्हढयात त्याला शेजारच्या बिन्नूचा रडण्याचा आवाज आला. बिन्नू हा दुसरीत शिकत होता. त्याची आई सहसा कुठे बाहेर जात नव्हती पण आज ती घराला कुलुप लावून बाहेर गेली होती. घर बंद पाहून बिन्नू मोठमोठयाने रडत होता. गणूचा ह्या टिल्लूवर भारी जीव. त्याच्याशी खेळायला त्याला खूप आवडे. आज त्याला रडताना पाहून गणूची कालवाकालव झाली. तो बिन्नूच्या जवळ गेला आणि त्याचे डोळे पुसत आई लवकर येईल अशी समजूत घालू लागला. बिन्नू अजून ओक्साबोक्शी रडायला लागला आणि म्हणू लागला ,"गणूदादा, मला खूप भूक लागलीय ऊं ऊं ऊं..."
गणूला खूप दया आली. त्याला काय करावे सुचेना. तेव्हढयात त्याला आठवले की त्याने एकदा बिन्नूच्या आईला मागचे दार कडीच्या ऐवजी दोरीने बांधून बंद केलेले बघितलेय. मागच्या दाराची क॑डी बरेच दिवस झाले तुटली होती, पण बिन्नूचा बाप एक नंबरचा चिक्कू. पैसे खर्च होतील म्हणून दाराची कडी दुरुस्त करायचे लांबणीवर टाकत होता. त्यामुळे बिन्नूची आई बिचारी दोरी बांधून दार बंद करायची.
गणूने बिन्नूला समजावले, "मी देतो तुला जेवायला. चल माझ्या बरोबर." बिन्नूच्या घराशेजारून बोळ जात होता. गणू बिन्नूला घेऊन त्या बोळातून बिन्नूच्या घराच्या मागच्या बाजूला गेला आणि ताकद लावून दार ढकलू लागला. बराच वेळ दार ढकलल्यानंतर दाराला बांधलेली दोरी तुटली आणि दार उघडले. गणू आणि बिन्नू घरात घुसले. बिन्नूची आई स्वैपाक करून गेलेली दिसत होती. कालवणाचे पातेले चुलीवर होते आणि भाकरीची टोपली पण चुलीजवळच ठेवली होती. गणूने ताट घेतले आणि बिन्नूला जेवायला वाढले. ते पिटुकलं भूक लागल्यामुळे मटामटा जेवायला लागलं. गणू हनुवटीवर हात ठेवून बिन्नूकडे कौतुकाने पहात होता आणि आतून त्यालाही चांगले काम केल्याचे समाधान वाटत होते.
तेव्हढयात पुढच्या दाराचे कुलुप काढल्याचा आवाज झाला आणि बिन्नूची आई दार उघडून घरात आली. मागचे दार उघडे पाहून तिला धक्काच बसला. आत येऊन पहाते तर बिन्नू जेवत होता आणि गणू त्याच्या समोर बसला होता. बिन्नूच्या आईने काही विचारण्याच्या आत गणूने खुलासा केला. " काकू, बिन्नूला खूप भूक लागली होती म्हणून रडत होता. मी त्याला जेवायला वाढले". गणूला वाटले आता बिन्नूची आई खूप कौतुक करेल .
"अरे पण तुम्ही घरात कसे काय घुसलात ?" बिन्नूच्या आईने गणूला विचारले.
"काकू, मला माहीत होते तुम्ही मागच्या दाराला दोरी बांधत होता ते. मी दार ढकलले आणि दार उघडले ",गणू म्हणाला.
"अरे देवा" असे म्हणत बिन्नूची आई मटकन खाली बसली आणि बिन्नूच्या पाठीत धपाटे घालायला लागली. "मुडद्या, तुला एव्हढी कळ काढंना व्हय. मी येणारच होते लगेच. पार खाण्यावाचून जीव चालला होता काय तुझा?"
तिने आता गळा काढायला सुरुवात केली,"अरे देवा, आता एखादया चोरा चिलटाला कळलं तर काय व्हईल. परवा माझं डोरलं तुटलं त्याच्या वाटया डब्यात ठेवल्यात. आता त्या गेल्या तर काय करू? हा माणूस बी असा. दुनियेत असा चिंगूस माणूस पाह्यला नाही. एक कडी त्याच्याच्यानी नीट करता येईना इतक्या दिवस". तिने बिन्नूच्या बापाला चिकटपणाबद्द्ल खूप शिव्या दिल्या. "गण्या, थांब, तुझ्या आईलाच सांगते तू काय उद्देग केला ते." ती गणूला रागाने म्हणाली.नंतर घाईघाईने डबे उचकायला लागली.गणू पार गांगरून गेला आणि तशीच त्याने धूम ठोकली.
संध्याकाळी गणुची आई शेतावरून आल्यानंतर बिन्नूची आई तरातरा आली आणि गणूच्या आईला दुपारची घटना तिखटमीठ लावून सांगितली."गणूची आई,सांगा मी काय करावं बरं? एखाद्या चोरा चिलटाला कळलं तर? आत्ता परवाच डोरल्याच्या वाटया तुटल्या त्या घरात ठेवल्यात..." आणि असं बरंच काय काय बोलली.
गणूची आई शेतावर दिवसभर राबून दमून आली होती. तिचा पारा चढला. बिन्नूची आई गेल्यावर तिने गणूला धपाटे दयायला सुरवात केली. "मुडदया, कुणी सांगितले हे नसते उदयोग?"
"अगं आई पण बिन्नूला खूप भूक लागली होती! का मारतीस मला? " गणू रडतरडत बोलत होता.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मस्त ओ बबनराव!!!
व्वा, सुरेख निरागस "गणुकथा" !
हं खरंच! निरागस गणू! आपण असंच
होतो यातच सगळं कळालं
होतो
यातच सगळं कळालंअनपेक्षित
अगदी क्रौर्य वैगरे
नक्कीच काळजी घेऊ बहुगुणी आणि चौको साहेब .
फारच छान कथा!
बिचारा गणू...!
आई गं..बिचारा.
आवडली...
परोपकारी गणुची कथा आठवली ...
+१ कथेला
सर्व गणूच्या चाहत्यांना धन्यवाद.
एकदम वेगळा विषय.
खरे आहे तुमचे.