बाबांचा 'सैगल'
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
माझे मनगट घट्ट पकडून बाबा गर्दीतून वाट काढत भरभर चालत होते. मी रेंगाळतोय असे वाटले की बाबा मला पुढे ओढायचे, त्यांच्या वेगाने मला चालता येत नव्हते, पळावे लागत होते. फोर्टचा परिसर माझ्याकरता जादुनगरीच होती, फुटपाथावरील ते स्टॉल, त्यावरील इलेक्ट्रोनिक वस्तू, कॅमेरे, रिमोटवर चालणारी गाडी,हवेत उडणारे प्लॅस्टिकचे हॅलिकोप्टर,पाण्याच्या टबमध्ये फिरणारी बोट काय बघू नि काय नको अशी माझी अवस्था झाली होती. बाबा जरा हळू चालले असते तर मला प्रत्येक वस्तू नीट बघता आली असती, परंतु बाबाच्या चालण्यावरून त्यांना ह्या गोष्टींमध्ये काही रस होता असे वाटत नव्हते, त्यांची नजर वेगळेच काहीतरी शोधत होते.
बाबा एका कॅसेटच्या स्टॉलजवळ थाबले, क्या चाहिये अंकल? स्टॉलवरील मुलाने विचारले.सैगलचा अल्बम आहे का? बाबांनी मराठीतून विचारले.(बाबा कुठेही हिंदीत बोलत नाही, मराठीतच बोलतात) आहे ना, त्या मुलाने मराठीतून सांंगितले. तीन चार कॅसेट बाबांकडे दिल्या, बाबांनी त्या निरखून बघितल्या, त्या कॅसेट बाबा सैगलच्या होत्या. टीव्हीवर तेव्हा बाबा सैगलने चांगलाच धुमाकूळ घातला होता, मलाही त्याची गाणी आवडायची.घरी गेल्यावर मस्तपैकी 'बाबाची' गाणी मोठ्या आवाजात ऐकायची धमाल नाचायचे असे मनातल्या मनात मांडे खात असताना .. अरे हा सैगल नको, तो जुना सैगल पाहिजे,बाबा म्हणाले. तो मुलगा गोंधळला, जुनावाला सैगल ... असा पुटपुटत खाली वाकला व त्याने एक कॅसेट बाबांसमोर ठेवली. हाच ना? त्या कॅसेटवर कृष्ण धवल रंगात एका माणसाचा फोटो होता, जुन्या काळातला वाटत होता. बाबा जरा वैतागून म्हणाले, नाव तरी नीट वाच की.. हा सैगल नाही, इंग्लिश गायक सीगल आहे हा. आणि मला हिंदी सिनेमातल्या जुन्या सैगलच्या गाण्यांचा अल्बम हवाय... असा अल्बम नाही आला अजून, बाबांच्या हातातून कॅसेट घेत थोड्या नाराजीने तो म्हणाला. अरे है ना अपने पास, तू ये कस्टमरको देख, असे त्याच स्टॉलवरील एक सफेद दाढीवाला वयस्कर माणुस बाबांकडे वळून म्हणाला. थोडावेळ त्याने एका खोक्यात शोधाशोध केले व पाच कॅसेटचा संच बाबांसमोर ठेवला....
माझे बाबा के. एल. सैगलचे भक्त, त्याची गाणी म्हणजे त्यांचा जीव का प्राण. आज त्यांच्या समोर सैगलच्या गाण्यांच्या एक नव्हे तर पाच कॅसेटचा अल्बम होता. बाबांना हाच अल्बम हवा होता, त्या कॅसेटवरील तिरकी टोपी व तलवार मिशीवाल्या सैगलकडे बघून खुश होऊन बाबा म्हणाले. त्या दाढीवाल्या विक्रेत्याच्या चेहऱ्यावरील खुशी बघून मला वाटले, त्या लाकुडतोड्याच्या गोष्टीतील देवासारखा हा दाढीवालापण बाबांना आधी दाखवलेले दोन्हीही अल्बम फुकट देऊन टाकेल,परंतु तसे काही झाले नाही.बाबांनी पैसे विचारले. एका कॅसेटचे १८ रुपये. सगळ्या हव्यात का? दाढिवाल्याने विचारले. १८ रुपये? इतके कमी कसे ? बाबांनी आश्चर्याने विचारले. गेली बारा ते तेरा वर्ष ह्या कॅसेट माझ्याकडे पडून आहेत एकाही गिर्हाइकाने ह्या कॅसेटची विचारणा केली नाही, तुम्ही पहिले आहात विचारणा करणारे. (कॅसेट १९८४ ची होती.) बाबांनी पाचही कॅसेट खरेदी केल्या. बाबांचा व त्या दाढीवाल्या विक्रेत्याचा चेहरा खुशीने फुलला होता.
बाबांचे काम आटोपले होते. बाबा खुशीत रमत गमत फुटपाथावर खरेदी करत होते. स्वतःकरता जुनी मासिके,पुस्तके कि-चेन विकत घेतली. माझ्या बहिणींना पेन व सेंटची बाटली घेतली. माझ्यासाठी सेलवर चालणारी गाडी घेतली. शेवटी कॅनॉनची पावभाजी खावून ठाण्याची लोकल पकडली.
प्रत्येकाला काहितरी वस्तू आणल्यामुळे घरातले सगळे खुश होते. माझ्यासाठी काय आणले? आईने विचारले. आणलय की, पहिले चहा कर मग दाखवतो. आईला सर्व प्रकारच्या संगीताची आवड असल्यामुळे घरात नाट्यसंगीत, जुन्या नव्या हिंदी व मराठी चित्रपटगीतांच्या भरपूर कॅसेट होत्या. किचनमध्ये एक छोटा FM रेडिओ होता, ज्यावर आई स्वयंपाक करताना गाणी ऐकायची. जितुराज हा तिचा आवडता आर.जे. होता. आई किचनमध्ये चहा ठेवायला गेली, बाबांनी बॅगेतून कॅसेट काढल्या व बेडरुममधील टेपमध्ये यातील एक कॅसेट टाकली. शोधून बाबांनी 'ते' गाणे लावले. सैगल गाऊ लागला .. एक बंगला बने न्यारा.... आई किचनमधून कडाडली... पहिले ते गाणे बंद करा. अग तुला जुनी गाणी आवडतात म्हणून तुझ्यासाठी हे सरप्राईज आणले, बाबा गांगरून म्हणाले. आईच्या चिडण्याचे नेमके कारण ना आम्हा भावंडांना कळले ना बाबांना कळले. त्यदिवसापासून ना आईने कधी 'त्या' कॅसेट लावल्या ना बाबांना कधी लावून दिल्या आणि न लावण्याचे कारणही सांगितले नाही.
एवढी शोधाशोध, पायपीट करून मिळवलेल्या कॅसेट बाबांना ऐकायला मिळत नव्हत्या. बाबांनी त्यावर तोडगा काढला. बाजारातून एक हेडफोन आणला व टेपच्या बाजूला बसून सैगल ऐकू लागले. एके दिवशी सैगलचे 'मै क्या जाणू क्या जादू है ... इन दो मतवाले नैनो मै क्या जादू है' हे गाणे गुणगुणत बाबा आईला चिडवण्यासाठी किचनमध्ये गेले ,परंतु हे गाणे ऐकून आई गालातल्या गालात हसली ते पाहून बाबांची भीड चेपली व त्यांनी 'एक बंगला बने न्यारा' हे गाणे म्हणायला सुरवात केली, आईने गरकन मागे वळून बाबांकडे डोळे वटारून बघितले... आणि बाबांनी, 'दो नैना मतवारे तिहारे, हम पर जुल्म करे ... हे गाणे म्हणत किचनमधून पळ काढला.
आज सकाळी लवकर उठून आईची लगबग चालू होती.माझ्या थोरल्या बहिणी तिला पूजेच्या तयारीसाठी मदत करत होत्या. भरजरी शालू व केसात गजरा घालून आई तयार होती. बहिणींच्या सासरच्या कोणालाही आमंत्रण दिले नव्हते.अगदी घरगुती कार्यक्रम होता, आजीआजोबा आईबाबा व आम्ही तीन बहिण भावंडे एवढेच. भाड्याची गाडी करून आम्ही सर्वजण बाबांनी बांधलेल्या नवीन बंगल्याकडे निघालो. घरातील पुरुषवर्गाचा वास्तुशांतीसारख्या गोष्टींवर विश्वास नसल्यामुळे आजी,आई व माझ्या बहिणी गृहप्रवेशाचे सगळे कार्यक्रम पार पाडत होत्या. बाबा व मी घरातील पाण्याच्या टाकीपासून नळापर्यंत सगळे ठिकठाक आहे कि नाही ह्याची खात्री करून घेत होतो.
किचनमध्येच आईसाठी एक छोटेसे देवघर बनवले होते. बाजुलाच शेगडीवर आईने एका छोट्या भांड्यात दुध गरम करायला ठेवले होत ,दुध उतू जावू दिले. बहिणीच्या एका मैत्रिणीने मोबाईलवरून पूजा सांगितली. सगळे आईच्या मनासारखे झाले होते. सर्वांना प्रसाद वाटला. आम्ही सगळे हॉलमध्ये बसलो होतो परंतु आई अधूनमधून किचनमध्ये जायची. ती तेथे जावून काय करते हे बघायला आम्ही गेलो, तर आई डोळे मिटून देवासमोर हात जोडून शांतपणे उभी होती. बाबांनी आम्हाला खुणेनेच शांत रहायला सांगितले व स्वतः वरच्या मजल्यावर जायला निघाले व मोठ्याने गाऊ लागलॆ...'एक बंगला बने न्यारा...... आई ताडकन किचन मधून बाहेर आली, आम्ही घाबरून मागे सरकलो, जुन्या सिनेमातील नायिकांप्रमाणे दरवाजाच्या चौकटीला धरून आई गाऊ लागली... प्रेम नगर मै बनाऊंगी घर में .... प्रेम का आंगन, प्रेम कि छत और प्रेम के होंगे द्वार ... बाबांनी डोक्यावरचे चार केस मागे सारत जिन्यातून मागे वळून बघत... सच हुए सपने तेरे, झूम ले ओ मन मेरे.... हे आईचे आवडते गाणे गायला सुरुवात केली, आणि आईसकट आम्ही सगळ्यांनी 'एका बंगला बना न्यारा' हे गाणे म्हणून खर्या अर्थाने 'वास्तुशांती' केली..
प्रतिक्रिया
:-)
छान! नवीन घराच्या शुभेच्छा!
छान लिहिले आहे :)
आम्ही सगळ्यांनी 'एका बंगला
आम्ही सगळ्यांनी 'एका बंगला
वा! मस्त!
छान लिहिलय.
व्वा.
:) खुप छान लिहिलंय.
मस्त लिहिले आहे. :)
छान लिहिलय!
किती
सैगलचा अलार्म
आवडले...
वावावा!
छान लेख
इथे थांबून आवर्जून
आहाहा.... क्या बात है!
सुंदर लेखन !!
:)
सुंदर नि मार्मिक लिहिलंय ओ
झुळुक
:) भारी.
नविन घरासाठी अभिनंदन
सुरेख लेख. जे. पी. म्हणतात तसे एखादे गाणे आणी आयुष्यातील
सुरेख लिहिलय. आवडले
किती वर्षे
कुंदनलाल सैगल
प्रथम सर्वांचे
मस्तं लिहिलय. खूप गोड आठवण.
छान!
सैगलचा असा अल्बम
खूपच छान!