दुष्काळवाडा......... भाग-२ ढगात अडकला कृत्रिम पाऊस
दुष्काळवाडा.........
भाग-२
ढगात अडकला कृत्रिम पाऊस
काय ढग दाटून आलेत, आज नक्की पाऊस पडणार, असे वाटत असतानाच बॉडी स्प्रेसारखी भुरभुर येऊन जाते. जूनच्या मध्यापासून हा खेळ सुरू आहे. मागील तीन वर्षापासून सुरू झालेला मान्सूनचा हा खेळ पुढची दहा वर्षे असाच सुरू राहणार, हे आता हवामानशास्त्रीय अंदाजानुसार सिद्ध झाले आहे. याला उपाय काय? तर कृत्रिम पाऊस पाडणे हा आशावाद समोर ठेवला गेला, पण त्यासाठीची तयारी करण्यातच मान्सूनचे महत्त्वाचे महिने निघून गेले. तोपर्यंत मराठवाड्यावरील ढगांनी पळ काढला आणि पाऊस पाडणारी संपूर्ण यंत्रणा शोभेची बनून राहिली.
हजारो कोटींची तातडीची मदत जाहीर करण्यापेक्षा कोटीत कृत्रिम पावसाची यंत्रणा उभी राहते. आजचे मरण उद्यावर ढकलण्याचा प्रयत्न म्हणून मायबाप राज्य सरकारने मराठवाड्यासाठी कृत्रिम पावसाचे केंद्र मराठवाड्याला दिले. पाऊस पाडण्याचं नियोजन कृषी राज्यमंत्र्यांनी जाहीर केले. जुलैच्या पहिल्या महिन्यात झालेल्या या घोषणेला प्रत्यक्षात यायला ऑगस्टचा पहिला आठवडाच उजाडला. विमानात मॉडीफिकेशन करण्यात पंधरा दिवस निघून गेले. विमान आले, तर रडार हाँगकाँगमध्ये अडकले. ढगांवर सिल्वर आयोडिनचा मारा करणारे फ्लेअर्स कस्टमने अडवून धरले. सगळी जुळवाजुळव होईपर्यंत पावसाचे ढगही निघून गेले होते. ज्या दिवशी रडार बसले त्या दिवसापासून ढगही गायब झाले आहेत सध्या यंत्रणा आकाशाकडे डोळे लावून बसली आहे.
कृत्रिम पाऊस पडण्याचा प्रयोग हाती घेतला आणि दुष्काळ हटला असे होणार नाही. त्याला हवामानाचा अभ्यास आधी करावा लागेल. ढगात पाणी आहे का हे पाहावे लागेल, पावसाच्या प्रयोगाचा इतिहास तपासावा लागेल. त्यानंतर योग्य वेळी निर्णय घ्यावा लागेल. माशी शिंकते ती येथेच. आजघडीला जगभरातले ४७ देश कृत्रिम पावसाचा प्रयोग करताना दिसतात. आपल्या शेजारच्या चीनमध्येही वारंवार हा प्रयोग केला जातो. २००८ साली बिजिंगमध्ये झालेल्या ऑलिम्पिक सामन्यांपूर्वी हवेतले प्रदूषण कमी करण्यासाठी बिजिंग मध्ये कृत्रिम पाऊस पाडण्यात आला. अगदी धरणातले पाणी कमी झालं तरी चीन कृत्रिम पावसाचे प्रयोग करतो. राज्यात सर्वात आधी साहेबराव पाटील डोणगावकर यांनी ऑगस्ट १९९२ मध्ये कृत्रिम पावसाचा प्रयोग केला होता. त्या वेळी काही भागात पाऊसही पडला होता. नांदेडमध्ये डॉ. राजा मराठे यांनी स्वस्तात कृत्रिम पाऊस पाडण्याचे वरुणयंत्र तयार केले, त्याचा प्रयोग सुजलेगाव येथे झाला. तथापि मोठ्या प्रमाणावर हा प्रयोग राज्यात २००३ साली झाला. ५ कोटी ४० लाख रुपये खर्चून २२ तालुक्यात पावसाच्या सरी पाडण्यात आल्या. त्याच वेळी सरकारने हा प्रयोग कायमस्वरूपी राबवला जाईल, असंही घोषित केलं होतं. त्यासाठी १५ कोटींची तरतूद करण्यात आली. दुसर्या वर्षी चांगला पाऊस पडला आणि त्याच्यात कृत्रिम पावसाची पर्यायी व्यवस्था वाहून गेली. तिची आठवण २०१५मध्येच आली, तीही उशिराने.
मागील वर्षी एलनिनोमुळे पाऊस गायब झाला. एलनिनोसारखाच दुसरा एमजेओ (मेडन, जुलियन, अॅसिलेशन) परिणाम मोसमी पावसामध्ये खंड पाडणार नाही. मेडन आणि जुलियन या शास्त्रज्ञांनी हवेमध्ये लंबकासारखी दोलायमानता निर्माण करणारा हा परिणाम शोधला आहे. एलनिनोमध्ये जसे प्रशांत महासागराचे तापमान वाढल्यामुळे नैऋत्य मोसमी पावसावर त्याचा परिणाम महाराष्ट्रामध्ये व विशेषतः मराठवाड्यामध्ये होतो, तसाच एमजेओमध्ये हिंदी महासागराच्या व प्रशांत महासागराच्या वातावरणाच्या थरामध्ये हवेचे मिश्रण व्हायला सुरुवात होते. त्यामुळे कमी दाबाचा पट्टा तयार होण्याऐवजी वातावरणात हवा पसरायला लागते. याचा कालावधी तीस ते साठ दिवसांचा असल्याने मान्सूनमध्ये घट होत जाणार आहे. पुढेच दहा वर्षे हा परिणाम दिसून येणार असल्याचे ऑस्ट्रेलियन हवामानखात्याने स्पष्ट केले आहे. एप्रिलमध्येच हा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. विषम हवामानाला सामोरे जाण्यासाठी एकच उपाययोजना आपल्याकडे तयार असते ती कृत्रिम पावसाची. तिही योग्य पद्धतीने राबवली जात नाही.
२००३मध्ये तत्कालीन अर्थमंत्री जयंत पाटील यांच्या पुढाकाराने साडेपाच कोटी रुपये खर्च करून झलेल्या कृत्रिम पावसाच्या प्रयोगाने दुष्काळाने होरपळणार्या शेतकर्यांना काही अंशी दिलासा मिळाला. होता. त्याच वर्षी ही यंत्रणा कायमस्वरूपी उभारली गेली असती, तर त्यानंतरच्या सलग दुष्काळात वेळ पडताच तिचा उपयोग झाला असता. पुण्यातील भारतीय उष्णप्रदेशीय हवामानशास्त्र संस्थेने (आयआयटीएमने) देशपातळीवर कृत्रिम पावसाच्या संशोधनाचा प्रकल्प हाती घेतला आहे. तथापि एवढे पुरेसे नाही. मराठवाड्याच्या बाबतीत विचार करायचा असेल, तर येथील कोरड्या हवामानात पाण्याचे होणारे बाष्पीभवनही विचारात घ्यावे लागेल. ८ मिलीमिटर कृत्रिम पाऊस पडला, तर येथे दररोज आठ मिलीमीटर पाण्याचे बाष्पीभवन होते. याचाच अर्थ मराठवाड्यात कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचे गणित खूप आधीपासूनच मांडावे लागेल. आपल्याकडे क्लाऊड फिजिक्स या विषयाकडे गांभीर्याने पाहिलेच जात नाही. ढगांचे पदार्थविज्ञान शिकवणारी ही ज्ञानशाखा मराठवाड्यात विस्तारल्यास आपल्याकडेही चीनसारखे शेकडो प्रशिक्षीत तंत्रज्ञ तयार होऊ शकतील. तथापि निर्णयक्षमतेचा दुष्काळ असताना तंत्रज्ञानाच्या गोष्टी करणेही मोठ्या बाता मारण्यासारखे होईल. आशादायक एकच बाब आहे, ती म्हणजे मराठवाड्यात ही यंत्रणा एकदाची उभी राहिली. पुढील वर्षीतरी तिचा उपयोग करण्याचा निर्णय वेळेवर व्हावा, ही अपेक्षा.
क्रमशः
दुष्काळवाडा.... भाग ३ कोरडवाहू मराठवाड्यात उसाची मिजास
Book traversal links for दुष्काळवाडा......... भाग-२ ढगात अडकला कृत्रिम पाऊस
वर्गीकरण
प्रतिक्रिया
माहिती उत्तम. सरकारी यंत्रणे
शासकीय सुधारणेचा विचार
हा लेख फार छान आहे.
स्वॅप्सबुवा तुमच्या अपेक्षा
इथला भुईमूग तूर अन जोंधळा
दोन्ही प्रतिसादांशी सहमत.
एकंदरीतच पूर्णपणे आपल्याच
कृत्रिम पाऊस
विद्या प्रतिष्ठान, बारामती.
हो
वाचतिये. काही बोलण्यासारखे
वाचतेय.अभ्याचा प्रतिसाद आवडला