Skip to main content

"गाथनी होयेत गेsss?"

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 27/08/2015 या दिवशी प्रकाशित केले.
"मला समजलं. तुझ्या डोक्यावरचे केस गेले, तरी तुझा स्वभाव होता तसाच आहे. चल, हातपाय धूवून ये. आपण जेवू या".. इती भाग्यश्री. चेरापुंजीनंतर मला वाटतं कोकणातच इतका पाऊस पडत असावा. कोकणातला पाऊस ज्यांनी पाहिलाय त्यांना मी काय म्हणतो ते कळायला वेळ लागणार नाही. काळाकभिन्न काळोख, काळेकुट्ट ढग, आभाळ आणून दिवस असला तरी घरातले दिवे लावायला भाग पडायचं. त्यातच विजांचा चमचमाट आणि वीज पडल्यावर होणारा कानठळ्य़ा बसणारा कडकडाट. घरातली लहान मुलं तर घाबरून जायची आणि अगदीच लहान असतील तर रडायचीसुद्धा. मला स्वतःला मात्र अशा पावसाच्या दिवसात कोकणात जायला आवडतं. समुद्राचं वातावरण वादळी झाल्याने समुद्रात मास्यांची रापण टाकायला कुणी धजत नाही. त्यामुळे खाडीतल्या माश्यांची आवक वाढते. गुंजूले, शेतकं, काळूंद्री,सुळे असल्या चवदार माश्यांच्या 'गाथनी' करून - माडाच्या झावळ्यातल्या हिराचा वापर करून माश्यांच्या गालफडातून तो हीर ओवून केलेली मास्यांची माळ - दारोदार कोळणी हे मासे विकायला येतात. "गाथनी होयेत गेsss?" असा बाहेरून ओरडलेला आवाज ऐकून, असेल तसं धांव्वत आईकडे जाऊन, "आई, तिख्खट सुकं तिखलं कर गं! अशा पावसात खायला मजा येते बघ." अशी आईकडे केलेली विनवणी आईशिवाय कोण मान्य करणार? "गे माय! इकडे आण बघू तुझ्या गाथनी" असं बाहेर जाऊन कोळणीला ओरडून सांगायला आईच्या परवानगीचीपण वाट पहावी लागत नव्हती. दोन तीन गाथनी विकत घेऊन ते मासे स्वच्छ धुवून चांगली मीठमिरची लावून खोबर्‍याच्या रसात शिजवलेलं जाड चवदार तिखलं आणि जोंधळ्याची गरम गरम भाकरी, मग काय विचारता? जिरेसाळ तांदळाच्या गरम गरम भाताला पण कोण विचारतोय? पण जर का फणसाच्या घोट्या घालून केलेली डाळीची आमटी असेल तर मात्र भात जेवायला मजाच मजा. आता आई कुठे आहे? फक्त तिच्या आठवणी मात्र आहेत. मग एक दिवस ठरवलं, ह्या पावसाळ्यात कोकणात जायचंच. पण कुणाकडे जाणार? मग लक्षात आलं की सावंतवाडीजवळ एका खेड्यात माझी एक बहीण राहायची. सांगायचं म्हणून मामेबहीण पण खरं तर ती सख्या बहिणीसारखीच होती. तिचं खरं नाव भाग्यश्री, पण आम्ही सर्व तिला लहानपणी 'भित्रीभागू' म्हणायचो. सावंतवाडीला सकाळीच आल्यावर तडक मासळी बाजारात गेलो. वेंगुर्ल्याहून मासे घेऊन येणार्‍या गाड्या सकाळी नऊच्या दरम्यान येत्तात. तसाच माल बाजारात रवाना होतो. बाहेर पाऊस फार पडत होता. मासे घेऊन भाग्यश्रीच्या घरी ती जेवण तयार करण्यापूर्वी पोहोचेन किंवा कसं ह्याची उगाचच शंका मनात येत होती. पण रिक्षावाल्याने धीर दिला. "तां आमकां लागलां. तुम्ही आमचे पावणे मां?, तुमच्या बहीणीकडे वेळेवर पोचल्यात म्हणजे झालां मां?" इतकं आश्वासन मिळाल्यावर माझा 'जीव' भाड्यांत पडला. भाग्यश्रीचं घर मंगळोरी कौलांचं होतं. जवळपास पिंपळांची झाडं बरीच होती. घराच्या समोर त्यांच्या भातशेतीचे कुणगे होते. त्या पलीकडे उंच डोंगर होता. कोकणात भरपूर पाऊस पडत असल्याने 'बोडके' डोंगर दिसणं कठीण. डोंगरावर आणि वरती सपाटीवर झाडांचं जंगल असल्याने, वाघ सिंह सोडल्यास रान-डुकरं, ससे आणि रानटी पक्षी दिसायचे. मला पाहून भाग्यश्री आश्चर्यचकित झालीच आणि आनंदीही झाली. कारण मी तिला खूप वर्षांनी पहात होतो. "किती वर्षांनी बाबा तुका आमची आठवण झालीs? ये ये, ह्या पावसान गेले चार दिवस नुसतां धुमशाण घातला." मला पावसाने चिंब भिजलेला पाहून सहानुभूती देत ती मला म्हणाली. "तुला भेटायला आणि तेसुद्धा ह्या पावसाळ्यात यायचं मी ठरवलं होतं. ही माश्यांची पिशवी घे. ह्यात सुळ्याच्या गाथनी आहेत. मस्तपैकी तिखलं कर बघू." असं म्हणून तिच्या घराच्या पडवीतून मी घरात आलो. "गरम गरम चहा कर" असं मी म्हणताच म्हणाली. "अरे ते काय सांगायला हवं? आधी तुझं ह्या टॉवेलने डोकं पूस, केस पूस असं म्हटलं असतं पण तुझ्या डोक्यावर केस कुठे दिसत नाहीत." असं म्हणून हसली. "तुला हसताना पाहून आणि तुझ्या गालावरची खळी पाहून आपल्या लहानपणाची आठवण आली. भित्रीभागू कुठली!" असं मी म्हणताच मला म्हणाली, "आता मी भित्रीभागू राहिली नाही.आता माझ्यात खूप फरक झाला आहे." "तो कसा?" असं मी म्हणताच, "तुला जर दुपारपर्यंत जेवण हवं असेल तर माझ्याबरोबर स्वयंपाकघरात चल.आणि ह्या पाटावर बस.जेवण करता करता मी तुला माझी हकीकत थोडक्यात सांगते" असं म्हणून माझ्या हातात पाट देत हातातली मास्याची पिशवी एका बाईकडे देत तिला म्हणाली, "हे मासे नीट करून मला आणून दे" गरम गरम चहाचा पेला माझ्या हातात देत म्हणाली, "जीवन निर्भय असावं असं मला वाटतं.ज्या अनेक गोष्टी जीवनात असाव्यात असं आपल्याला वाटत असतं, त्यापैकी ही निर्भयता असावी यासाठी मी झटत असते. मी शक्यतो ह्या भयापासून दूरच असते. खासकरून मी मृत्यूला तशी घाबरत नाही. मला असं वाटतं आपल्या मृत्यूनंतरही आपल्यासाठी काहीतरी राखून ठेवलेलं असावं. मला नक्की ते काय आहे हे माहीत नाही, पण तसं असावं असा माझा विचार सांगतो एवढंच. त्या पूर्वानुमानाचं मी पूर्वानुमान करते. आणि त्यासाठी योग यायची वाट पहात आहे. अर्थात सध्यातरी जगून खूप गोष्टी करायच्या आहेत म्हणा. एवढी काही मी म्हातारी झाली नाही." मी म्हणालो, "हे स्थित्यंतर केव्हापासून झालं.? प्रत्येक गोष्टीत तू भीत असायची़स." "माझी स्वतःची ताकद आणि माझ्या मनातला भरवंसा हुडकून काढण्यापूर्वी, तसंच माझा माझ्या मनावर ताबा येण्यापूर्वी गेली वीसएक वर्षं मी भयभीतीतच काढली. आणि त्याची उदाहरणं म्हणजे, अशा काही हास्यास्पद कल्पना, जसं एखादं वादळ येऊन आमच्या घरासमोरचं पिंपळाचं झाड घरावर कोलमडून पडलं तर?, माळ्यावर ठेवलीली पाण्याची टाकी फुटली तर?, कोसळणार्‍या आणि न थांबणार्‍या पावसात आपली गाडी तुंबलेल्या पाण्यात अडकून पडल्यावर दरवाजे न उघडल्यास दरवाजाच्या काचा फोडाव्या लागल्या तर? आणि त्यासाठी मी मोठा हातोडा पण गाडीत सहज मिळेल असा ठेवला होता. भर पावसात घरून निघाल्यावर गाडी जवळच्या नाल्यात घसरून आत गेली तर? अर्थात नाला काही एवढा खोल नव्हता की मी त्यात बुडणार होते. पण ही माझी सर्व भीती काही तर्कसंगत नव्हती. जग बुडती होईल म्हणून मी बरीच वर्ष काळजीत असायची. धान्याची आणि इतर गरजांची मी भरपूर सोय करून ठेवायची. कुणी चोर चिलटा येऊन घर लुटेल म्हणून, शिवाय माझ्या मुलांच्या संरक्षणासाठी म्हणून मी माझ्या नवर्‍याला सांगून लायसन्स काढून एक पिस्तुलपण त्याला ठेवायला सांगितलं होतं. आमच्या घराच्या मागच्या परड्यात भाजी, मिरच्या वगैरेची झाडं लावली होती. वीज गेली तर जेवायला पंचाईत होऊ नये म्हणून मी जळाऊ लाकडांचापण साठा करून ठेवला होता." मला हे ऐकून हसू येतंय हे पाहून, मला भाग्यश्री पुढे म्हणाली, "मी तुला आणखी काही गोष्टी सांगितल्या तर तू पोटभर हसशील." मी भाग्यश्रीला विनोद करीत म्हणालो, "नाही नाही माझं पोट मला तुझ्या मास्यांच्या जेवणाने भरायचं आहे. सांग तू पुढे." "मला आठवतं माझ्या नवर्‍याला आणखी एक टुमदार घर बांधायचं होतं आणि तेसुद्धा आमच्या समोरच्या शेतीच्या मळ्यांच्या पलीकडे दिसणार्‍या डोंगराच्या पायथ्याशी. पुन्हा माझी तर्कसंगती अशी होती की समजा मुसळधार पावसात डोंगरावरून दरड कोसळून आपल्या घरावर पडली तर?" तिला मधेच थांबवीत मी म्हणालो, "ह्यात काही तुझी चूक नाही. कोकणातला पाऊस इतका मुसळधार असतो की हा तुझा विचार मला पटतो. झाडांची मुळं कमकुवत झाली की माती अस्थिर होते आणि दरडपण कोसळते. पण असले हे भीतीचेच विचार तुझ्या मनात येण्याचं कारण काय?" "खरं म्हणजे माझ्या ह्या असल्या प्रकारच्या विचाराचं कारण माझ्या लहानपणी माझ्या एका लांबच्या मामाबरोबरची माझी संगत. माझा हा मामा माझ्यापेक्षा वयाने थोडा मोठा होता. कुठल्याही जोखमीबद्दल तो अतिशयोक्ती करून दाखवायचा, आणि कुठल्याही भयगंडाबद्दल माझं मन उकसायचं काम करायचा. त्यामुळे माझा त्याच्याशी नेहमीच वाद व्हायचा आणि मी भयभीत रहायची. आता मला वाटतं अशा त्याच्या वागण्याने त्याला ते त्याच्या सुरक्षिततेच्या कारणाचं मूळ आहे असं वाटत असावं. खरं म्हणजे त्याला शिकारीची आवड होती. आमच्या डोंगरासमोरच्या जंगलात जाऊन लहानसहान प्राण्याची - ससा, कवडे, रानटी कबुतरं, आणि कधीकधी रानडुकरांच्या शिकारीलापण जायचा. स्वतःला संरक्षक समजायचा, सध्या असलेल्या समाजाचं एक ना एक दिवस पतन होणार आहे असं माथेफिरूसारखं उघड उघड मनोरथ करायाचा. इतर लोकाना सांगायचा की तो चुकीच्या शतकात जन्माला आला आहे. पुरुष पुरुषांसारखे वागायचे त्या शतकात जन्माला यायला हवं होतं अशी इच्छा दाखवायचा. अशा तर्‍हेने त्याला कुठच्याही गोष्टीची अतिशयोक्ती केल्याशिवाय राहवत नव्हतं आणि मला मात्र तो त्याचा नित्याचा डोस देत राहायचा. आणि त्यामुळे त्यातून त्याला जो आनंद व्ह्यायचा ते त्याला तो तसा आहे याचा आनंद होण्यासाठी व्हायचा." "मग तू एवढी धीट कशी आणि केव्हा झालीस?" मी तिला विचारलं. "ह्या अशा काळ्या सावल्यातून बाहेर पडायला मला बराच अवधी लागला. त्यानंतर मी कसल्याच आपत्तीबद्दल किंवा कसल्याच दुर्घटनेबद्दल विचार करायचं सोडून दिलं. आणि त्याचं मुख्य कारण माझा नवरा होता. मला समजावून सांगायला त्याला फार वेळ लागला तरी त्याची त्याबाबतची चिकाटी वाखणण्यासारखी होती. माझी मुलंपण मोठी झाली. त्यांच्याकडून आता मला समजावयाचा डोस मिळत गेला. पण दुःखाची गोष्टी अशी की माझ्या मामाशी, आम्ही प्रयत्न करूनही, कुणी मुलगी लग्नच करीना. आमच्याकडून त्याला बर्‍याच मुली सांगून पाठवल्या,.पण मुलींची मुलाखत घेताना सुद्धा, "माझ्याशीच तुला लग्न करावं असं का वाटतं? तुला माझ्याहीपेक्षा चांगला मुलगा भेटला नाही काय?" असे विचित्र प्रश्न करायचा. मुलींचे बाप कपाळावर हात मारून निघून जायचे. अलीकडेच मला कुणीतरी सांगितलं की त्याच्या डोक्यावर परिणाम झाल्याने सध्या त्याच्यावर उपाय चालू आहेत." भाग्यश्री हे सांगताना थोडी भावूक झाली. मी विषय बदलावा म्हणून तिला म्हणालो, "तू बोलता बोलता केव्हा जेवण केलंस ते कळलं नाही. पण ज्या वेळी तू मासे फोडणीला टाकलेस, त्याचा आवाज ऐकून आणि फोडणीचा वास घेऊन मला परत लहानपणाची माझ्या आईची आठवण आली. "ताट-पाट घ्या रे,जेवण तयार आहे" म्हणून ओरडून सांगायची. बाहेर पाऊस धो धो पडत होता. दिवसाच काळोख झाल्याने भित्रीभागूने दिवे पेटवले. काळाकभिन्न काळोख, काळेकुट्ट ढगांनी आभाळ आणून दिवस असला तरी घरातले दिवे लावायला तिला भाग पडलं. त्यातच विजांचा चमचमाट आणि वीज पडल्यावर होणारा कानठळ्य़ा बसणारा कडकडाट होत होता. मला खूप वर्षानी कोकणात आल्याचा आनंद झाला. "गाथनी होयेत गे?" असा उगाचच आवाज माझ्या कानात घुमत होता. "मला समजलं.तुझ्या डोक्यावरचे केस गेले, तरी तुझा स्वभाव होता तसाच आहे. चल हातपाय धूवून ये आपण जेवू या" मला भाग्यश्री म्हणाली. खरं सांगू , मला भाग्यश्री त्या वेळी माझ्या आईच्या जागीच वाटली. मला भूकही लागली होती आणि मी पडत्या फळाची आज्ञा कशी अव्हेर करीन? श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4471
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

खूपच छान !

आईशप्पथ! अगदी अगदी सुंदर! काय ते कोकणच्या पावसाचं वर्णन! वातावरणनिर्मितीही झक्कासच! भाग्यश्री यांची व्यक्तिरेखाही उत्तम जमलीये. मस्त अनुभव.

सुरेख! वाचून मजा आली. कोकणातल्या पावसाचे वर्णन लाजवाब!

कोकणात जाऊन पोचले. छान उतरले आहे पावसाचे वातावरण

सावंतवाडी जवळचे मळगाव तर नाही न?

छान लिहिता. जोंधळ्याची भाकरी कोकणात म्हणजे कोल्हापुरातून खाली येण्याच्या मार्गावर असणारे गाव वाटले.कुडाळात,फोंडाघाटवगैरे.

सुन्दर लिहिलंय.

आवडलं लिखाण

"धान्याची आणि इतर गरजांची मी भरपूर सोय करून ठेवायची. कुणी चोर चिलटा येऊन घर लुटेल म्हणून, शिवाय माझ्या मुलांच्या संरक्षणासाठी म्हणून मी माझ्या नवर्‍याला सांगून लायसन्स काढून एक पिस्तुलपण त्याला ठेवायला सांगितलं होतं. आमच्या घराच्या मागच्या परड्यात भाजी, मिरच्या वगैरेची झाडं लावली होती. वीज गेली तर जेवायला पंचाईत होऊ नये म्हणून मी जळाऊ लाकडांचापण साठा करून ठेवला होता." -- कोकणातल्या खेडेगावात लायसन्सवाले पिस्तुल? कोकणातल्या खेडेगावात मीर्ची आणी भाजीपाला तर प्रत्येक घरामागे असतो. लाकडेपण साठवलेली असतात. आणी कोकणात कुणी वीजेवर जेवण करत नाही. वीज गेली तरी गॅस, शेगडी स्टोव्ह किंवा चुलीवर जेवण करतात. हा लेख एखद्या परदेशी कथेचा अनुवाद / भारतीय रुपांतर वाटते आहे

संदर्भांची थोडी भेळमिसळ आहे पण गतकाळच्या/बालपण/तरुणपणाच्या आठवणींना उगाचच चुलीवरच्या जेवणाचा वास येत असतो.एकूण मजेदार आहे.

वेंगुर्ल्याची आठवण आली . आता गणपतीचे वेध लागले .:)

सामंतकाका अगदी मनापासून आलेले सुंदर कथन.