Skip to main content

[शतशब्दकथा] शिवी- भाग २

लेखक शब्दबम्बाळ यांनी सोमवार, 24/08/2015 23:44 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ आजचा दिवस मह्याचा होता. एका साखळीचोराला त्याने पाठलाग करून पकडले होते! कॉलनीमधले सगळेजण मह्याच्याभोवती गोळा होऊन त्या प्रसंगाचं मसालेदार वर्णन त्याच्याकडून ऐकत होते. "मस्त काम केलस रे! पण तो बरा सापडला तुला!" गर्दीतला एक जण म्हणाला. मह्या हसला,"अरे, घाबरून पळत सुटलं होत येड, स्वताच पडलं तोंडावर! वाटेतला दगड दिसलाच नाई आंधळ्याला!" गर्दीत हशा पिकला. मह्यानीपण खुशीत बाजुच्याला टाळी दिली! गर्दीतला तो मात्र चपापला, गर्दीतून सावकाश थोडा बाजूला आला. त्याला कुठेतरी खोल काहीतरी बोचल्यासारखे वाटले. उगीचच त्याने डोळ्यांवरचा चष्मा जागीच असल्याची हाताने चाचपून खात्री केली आणि आपल्या काठीच्या मदतीने रस्त्याचा अंदाज घेत तो सावकाश तिथून चालू लागला. कुठेही न अडखळता… ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- भाग २ त्याच्या आतमध्ये काहीतरी धुमसत होत. हातातली काठी फेकून देऊन जोरात पळत सुटावं असं वाटत होत. पण तो तसे करणार नव्हता, लहानपणी केलेल्या याच चुकीच्या आठवणरूपातला व्रण त्याच्या कपाळावर होता. ती जखम जरी पूर्वीच भरली असली तरी अधून मधून तिच्यावरची खपली निघत होतीच! "फुटपाथ संपला! रस्ता ओलांडायला लागणार! कोणाची तरी मदत मागावी लागणार… पण का? मी खरच एवढा अगतिक आहे? मला काही स्वाभिमान नाही? नाही, तुला कसला आलाय स्वाभिमान? आणि असला तरी कोण विचारणार आहे? तुझ्या नशिबात....." "काका, मी काही मदत करू?" तेवढ्यात एका लहानग्याचा गोड आवाज आला. मनावरचे निराशेचे मळभ दूर होऊ लागले, त्यातून येणारा प्रकाशाचा एक किरण त्याला 'दिसला!'
लेखनविषय:

वाचने 4969
प्रतिक्रिया 24

प्रतिक्रिया

हं! सिंगापुरात एकजण प्रत्येक बसच्या दारात जाऊन ड्रायव्हरला बस नंबर विचारायचा. मी जवळच उभी होते, शेवटी मी येणार्‍या बसचा नंबर म्हणायला सुरवात केली अन तो हसला!! नशिबाने एकाच बस साठी उभे होतो, माझी स्टॉप येइतो मस्त गप्पा हाणल्या!!

दोन्ही भाग छानच !! पूर्वार्धही खूपच परिणामकारक होता,(कथा अंतिम सहामध्ये अपेक्षित होती, असो..)

In reply to by नाखु

धन्यवाद! बाकी त्या "समेवर" वरती आमच्या इथे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि कर्नाटकी संगीत यावर चर्चा झाली. मला फारस काही कळाल नाही हि वेगळी गोष्ट! :)

बाकी मदत करायला जावे आणी जर त्यात कोणी दुखावले गेले [ स्वाभिमान ] तर काय करा म्हणून धास्ती वाटते मदतीचा हात द्यायची.

मनावरचे निराशेचे मळभ दूर होऊ लागले, त्यातून येणारा प्रकाशाचा एक किरण त्याला 'दिसला!'
छान शेवट. आवडला.

+१०० पहिल्या भागात शिवी या नावाचा उलगडा झाला नव्हता पण हे दोन्ही भाग वाचून कळलं..!!