Skip to main content

सरदारी बेगम -एक संगीतिक सुन्न अनुभव

सरदारी बेगम -एक संगीतिक सुन्न अनुभव

Published on 03/08/2015 - 18:10 प्रकाशित मुखपृष्ठ
सरदारी बेगम बंगलोर मधल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये माझा मित्र , सतीश , राहत आहे. काल त्याला भेटायला गेलो होतो. बंगलोरचे भयाण ट्राफिकमुळे दोन तास लागले. सतीशला बराच वेळ रिसेप्शनमध्ये ताटकळत बसावे लागले. वर्षभराने भेटत होतो त्यामुळे गप्पा लगेच रंगल्या. आमच्या अनेक आवडीनिवडी समान आहेत आणि म्हणून मैत्री २० वर्षे टिकून आहे. भारतीय शास्त्रीय संगीत हा मात्र त्याच्या (कु)चेष्टेचा आणि माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्या पंचतारांकित हॉटेलमध्ये मंद संगीत सुरु होते. गिटार , सतार आणि तबला ह्यांचे फ्युजन ( बहुतेक प्रेम जोसुआचे) ऐकत त्याने आपल्या भारतीय संगीताची ( खरेतर माझी ) मापे काढायला सुरवात केली. “ ही गिटार बघ कशी मस्त आहे , मी तुझी वाट पाहत हेच ऐकत होतो. एकदम फक्कड गिटार वाजवतो आहे हा कलाकार ! नाही तर ते तुमचे बडा आणि छोटा ख्याल ! लवकर सुरूही होत नाहीत आणि थांबत नाहीत.” मला मनातल्या मनात हसू आले आणि त्याला विचारले – आवडले ना तुला हे संगीत? म्हणजे आवडण्यासारखेच आहे ते ! कारण हा जो राग वाजवतो आहे तो “नंद” आहे. सतीश एकदम आश्चर्य चकित झाला. त्याची खात्री पटवण्यासाठी सांगितले की एकदा मनात लाताबैंचे ‘तू जहा जहा चलेगा’ हे मेरा साया मधील गाणे आठव आणि पहा सूर ओळखीचे वाटतात का ते ? ही टेस्ट लागू पडली आणि तो थोडा वरमाला. खरे तर सतीशला गाणे चांगले समजते. उगाच आपल्या संगीताबद्दल त्याचे थोडे पूर्वग्रह आणि थोडे मला चिडवण्याचे समाधान ! तुला मी अजून एक गाणे पाठवतो. ‘कायप्पा’ वरून मी त्याला माझ्या खाजीन्यामधील अनमोल रत्न पाठवले. हे ऐक आणि ते ऐकलेस की तुझा नंद राग पक्का झाला समज ! ‘तू जहा जहा चलेगा’ इतकेच सुंदर असे नंद रागावर आधारित ते गाणे होते – घर नाही हमरे श्याम | वो जाके परदेस विराजे, सुना हमरा धाम || विदुषी आरती अंकलीकर टिकेकर यांनी गायलेला हा नितांत सुंदर नंद त्याला अपेक्षेप्रमाणे आवडला. “कोणता अल्बम आहे ? कुठे सापडले तुला हे गाणे?” सतीशचे कुतूहल. “ अरे हा अल्बम नाही. सरदारी बेगम नावाच्या एका सुमारे २० वर्षापूर्वीच्या सिनेमातले हे गाणे आहे. आज रात्री पहा जमले तर ! सगळी गाणी शास्त्रीय संगीतावर आधारित आहे आणि तुला ती आवडणार नाहीतच पण सिनेमा नक्की आवडेल. कारण ‘सरदारी बेगमचा ‘डायरेक्टर’ तुझा आवडता श्याम बेनेगल आहे. मेहमूद अब्बासी हे आग्र्या मधील प्रतिष्ठित वकील. त्यांना छोटा जब्बार आणि मोठी सरदारी ही मुलगी. सरदारीला गाण्याचे प्रचंड वेड. खानदानी मुस्लिम घरात मुलीने गाणे शिकणे आणि गाणे जवळ जवळ ‘नापाक’. त्यामुळे घरून तिच्या गाणे शिकण्याला तीव्र विरोध ! संगीताचे वेड लागलेली सरदारी बंड करते आणि घर सोडून जाते आणि इद्दनबाई ह्या गायिकेच्या आश्रयाला जाते. सरदारीची गाण्याची तयारी पाहून ती अचंबित होते पण तरीही तिला आश्रय देण्याचे नाकारते. ह्याच इद्दनबाई बाईकडे हेमराज ( अमरीश पुरी ) सरदारीला ऐकतो आणि तिच्या आवाजावर (आणि रूपावर) भाळतो. हेमराज विवाहित आहे आणि त्याच्या पत्नीचा विरोध पत्करून हेमराज सरदारीला आश्रय देतो. हेमराजच्या घरच्या मैफिलीमध्ये सरदारी ‘घर नाही हमरे श्याम ‘ हे गाणे गाते आणि सादिक, हेमराज चा दोस्त, सरदारीकडे आकृष्ठ होतो. दरम्यान हेमराज पासून तिला दिवस जातात आणि हेमराजच्या सरदारी वरच्या प्रमाला ओहोटी लागते. सादिक सरदारीला गरोदर असतानाही स्वीकारतो. पुढे सकीनाचा जन्म होतो आणि सरदारीच्या गाण्याची कीर्ती सर्वदूर पसरते. सिनेमाला हिंदू-मुस्लीम धार्मिक तणावाचीही पार्श्वभूमी आहे आणि सिनेमाची सुरवात दंगलीने होते. सरदारी ला एक दगड लागतो आणि ती मरण पावते. ही बातमी कव्हर करायला तहजीब ही तरुण पत्रकार येते. सरदारीच्या अंत्यसंस्काराच्या वेळी तिला समजते की सरदारी तिची सख्खी आत्त्या आहे. तिची तिच्या आत्याच्या विषयीची सहानुभूती जागी होते आणि ती तिच्या बॉस (आणि प्रियकरसुद्धा) असलेल्या एडिटर चा विरोध पत्करून सरदारी विषयीची अधिक माहिती मिळवत जाते. संपूर्ण सिनेमा हा तहजीबच्या ‘मुलाखतीमधून’ उलगडत जातो. सरदरीचे गाण्यावरचे प्रेम आणि माणूस म्हणून असणाऱ्या मर्यादा कलेकलेने उलगडत जातात. श्याम बेनेगल सारखा प्रतिभावान दिग्दर्शक एका छोट्या कथाबीज असलेल्या विषयामध्ये अत्यंत समर्थपणे प्रत्येक नात्याचे पदर उलगडत नेतो. जब्बार ( सरदारीचा भाऊ ) आणि सरदारी ह्याचे प्रेम आणि आर्थिक बाबी , जब्बार आणि तहजीबमधील बाप मुलीचे संबंध , सकीनाचे अस्फुट प्रेम , तहजीबचे बॉसशी संबध आणि बेबनाव आणि शेवटी सकीना आणि सरदारीचे - आई आणि मुलगी ह्यांच्यामधील सप्रेम खदखद ! बाप मुलगी , स्त्री –पुरुष आकर्षण ह्या विषयांनी सुरवात झालेला सिनेमा मानवीनाते संबंध ह्या गहन विषयाभोवती फिरत संपतो. सिनेमाच्या इतर तांत्रिक बाबी उत्तम आहेत. माझ्या दृष्टीने सिनेमामधली वनराज भाटीया यांचे संगीत आणि गाणी अप्रतिम ! ज्या गण्यामुळे हा सिनेमा वाचकांना पहावयास सुचवतो आहे ते ‘घर नाही हमरे श्याम’ ह्या राग नंद मधील गाण्याचे कौतुक झालेच एकदा आहे. ठुमरी अंगाने गायलेल्या ह्या गाण्यामध्ये समेवर येण्यासाठी जी अप्रतिम मिंड वापरली आहे हे एक सौंदर्यस्थळ आहे . परत परत ऐकावे असे ..... ‘मोरे कान्हा जो आये पलटके’ हे आशा भोसले यांनी गायलेले , उत्तर भारतीय लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीतावर आधारित दुसरे अप्रतिम गाणे. सिनेमा पुढे नेण्यासाठी ह्या गाण्याचा दिग्दर्शकाने मस्त वापर केला आहे. ‘सावरिया देख इस ओर’ हे मिश्रपिलू माधिक गाणे शुभा जोशी ह्यांनी छान गायले आहे. ‘हुजूर इतना अगर हम पर करम करते तो अच्छा था’ ही मांड रागावर आधारित अजून एक सुंदर रचना. सरदारीच्या कारकीर्दीच्या शेवटची सुरवात सुचवणारे हे गाणे. ‘चाहे मार डालो राजा’ हा राग मारुबिहाग वरील मुजरा आशाबाईने गायला आहे. आशा भोसले - सिर्फ नाम काफी है ! ‘चली पिके नगर’ ह्या आरतीजींच्या आर्त भैरवीने ही सिनेमाची सुरेली मैफिल संपते आणि एक संगीतिक सुन्न अनुभव घेतल्याचे समाधान मिळते !!
लेखनप्रकार

याद्या 2121
प्रतिक्रिया 9

छान परीक्षण. खूप आधी बघितला होता. नीट आठवत नाहिये. पुन्हा पाहायला हवा.

सुंदर लिहिलंय. सिनेमा पाहिला आहेच. गाण्यांची श्रवणभक्ती तेव्हा खूप झाली. मात्र आता कुठे संग्रहात नाहीत. युट्यूबवर असतील बहुतेक.

पुण्य: 1 आधीच बेनेगल फ्यान.. त्यात सेमिक्लासिकल मुझिक जेव्हढं(माहीत) आहे, त्याचे तर आम्ही ब्लोअर.. सिनेमा तेंव्हा कळला नव्हता .. अता काही वर्षा पूर्वी समजला. पण गाणि मात्र तेंव्हापासून जी मनाला चिकटून बसली ती अजुन तशीच आहेत.. घीर घीर आई बदरीयां मारी..

सुंदर लेखन आणि चित्रपटाची करुन दिलेली ओळख अतिशय आवडली ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- जाइये आप कहाँ जायेंगे ये नज़र लौट के फिर आयेगी... :- Mere Sanam

https://www.youtube.com/watch?v=OxxOEuR64vw&index=2&list=PL25CFB691C2A99D11 ह्या लिंकवर सरदारी बेगमची सर्व गाणी आहेत. आरती अंकलेकर हे एक अजब रसायन आहे!! https://www.youtube.com/watch?v=AqH-TkK9NSk - आरती अंकलेकर यांचे माझे एक आवडते गाणे. - (सरदारीमय) सोकाजी