Skip to main content

साहित्य संपादकीय आवाहन

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी बुधवार, 15/07/2015 22:37 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर मित्रमैत्रिणींनो,
साहित्य संपादक मंडळाची स्थापना काही विशिष्ट उद्देश डोळ्यासमोर ठेवून करण्यात आलेली आहे. त्यामधले महत्त्वाचे उद्देश म्हणजे नव्या मंडळींना मिसळपाव वर स्वतःचं लेखन करायला प्रोत्साहन देणे आणि त्यासंदर्भात लागेल ती मदत करणे हे होत. इथल्या नव्या आयडींनी मोडकं-तोडकं का होईना पण लेखन करायला सुरुवात करावी अशी अपेक्षा आहे. तुमच्या चुका सुधारून घ्यायला आणि तुम्हाला मदत करायला दोन्ही संपादक मंडळं तयार आहेतच. इथे ह्या धाग्यावर म्हणा किंवा व्यक्तीगत निरोपाने म्हणा तुम्ही मदत मागू शकता. नव्या मिपाकरांना सांगायची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही लोकांसमोर तुमचं साहित्य सादर करायला अजिबात घाबरू किंवा लाजू नका. तुम्ही नवे असाल तेव्हा तुमच्याकडून चुका ह्या होणारंच. ह्याचं चुकांमधून शिकून पुढे अत्यंत उत्तम साहित्य लिहिणारे बरेच मान्यवर आयडी इथे मिपावर किंवा एकूणच मराठी आंतरजालावर लेखन करत असतात. मिपाकर तुमच्या लेखनाचं स्वागत करतीलच. कदाचित तुमच्या सुरुवातीच्या काही लेखांवर टिका होईल, चुकांवर बोट ठेवलं जाईल. थोड्याफार प्रमाणामध्ये रॅगिंगही होईल. त्यामुळे निराश व्हायचं काहीच कारण नाही. लोकं तुम्हाला हळू हळू ओळखायला लागतील, तुमच्या लेखनाची पद्धत किंवा बाज त्यांच्या सवयीचा झाला की हेच लोकं तुमचे जवळचे मित्र बनतील (स्वानुभवाचे बोल. माझं मिपावर झालेलं अलौकिक स्वागत अजून विसरलेलो नाही. तेव्हा राग आलेला, प्रचंड वाईट वाटलेलं पण आता मात्र हे लोकं माझे मित्र बनलेत :) ). सो, लिहिते व्हा. तुमच्या कथा, कविता, प्रवासवर्णनं, पाककृती, अनुभव ह्या सगळ्यांचं मिसळपाववर स्वागतच असेल. काही नियम किंवा मर्यादा मात्र लागू असतील ते म्हणजे लेखन तुमचं स्वतःचं असावं, मोडकं-तोडकं असेल तरी चालेल काही हरकत नाही. अनुवाद करत असाल तर मूळ लेखकाच्या परवानगीशिवाय इथे प्रकाशित करू नका. बुद्धी स्वामित्व ही कायदेशीर बाब असल्याने हा नियम कटाक्षाने पाळा. कुठल्याही जाती-धर्माला दुखावलं जाईल असं लेखन टाळा. समिंग अपः लिहिते व्हा. अधून मधून जागोजागी आपले मिसळपावकरांचे कट्टे होतं असतात त्यांनाही हजेरी लावा. नव्या लोकांशी त्यानिमित्ताने ओळखही होईल :). ह्या लिंकवर तुम्हाला साहित्य संपादकांची नावं कळतीलः साहित्य संपादक जुन्या संपादक मंडळामध्ये काही बदल झालेले होते त्याची यादी मी नीट माहिती घेऊन इथे लिहीनच. इथले बरेच जुने आयडी हल्ली वाचनमात्र असतात असं हल्ली लक्षात आलेलं आहे. पूर्वी अत्यंत चांगलं लेखन करणारे हे लोक्स अचानक लेखनसंन्यासी का झालेत ह्यामागचं कारण जाणून घ्यायला मला नक्की आवडेल. तुमचं साहित्य वाचूनच, तुमच्या मार्गदर्शनाखालीच हौशी नवमिपाकर आणि माझ्यासारखे लोकं शिकतील असं मनापासून वाटतं. त्यामुळे तुम्हीही लिहितं व्हा अशी आग्रहाची विनंती मी करतो. जुन्या लोकांना बहुतांश वेळा मदतीची गरज लागत नाही, पण तरीही अपवादात्मक परिस्थितीमध्ये कोणाला मदत लागल्यास संकोच नं बाळगता मी आणि माझं संपादक मित्रमंडळ हजर आहेच. तुमच्याकडे काही कल्पना असतील तर त्याही ह्या लेखामध्ये प्रतिसादांमधून मांडा. ही कल्पना प्रत्येक वेळी लेखनाशी संलग्न असायलाचं हवी असं नाही. एखादा सामाजिक उपक्रमही यामध्ये येऊ शकतो. नाखु'न'काकांशी मधे बोलताना त्यांनी एक संकल्पना मांडली होती. ती तेच इथे लिहितील अशी अपेक्षा. मिपावर तुम्हाला काही बदल अपेक्षित असतील तर तेही इथे मांडा. काही नवे साहित्यप्रकार मिपावर जोडायच्या विचारामधे सध्या सा.सं. मंडळ आहे. त्यांमध्येही तुमचं योगदान अपेक्षित आहे :) .
कळावे. लोभ असावा. P.S. लेखक/ कवी मंडळींना एक आवाहनः तुमच्या साहित्यामधे अपेक्षित असणारे बदल तुम्ही साहित्य संपादकांना कळवत असताना शक्यतो एकापेक्षा जास्तं संपादकांना कळवणं टाळा. म्हणजे तुमच्या साहित्यामधे अपेक्षित असणारे बदल अत्यंत योग्य पद्धतीने केले जातील. काही वेळेला एकापेक्षा जास्तं संपादक एका धाग्यावर दुरुस्तीचं काम करत असतील तर जो शेवटी धागा प्रकाशित करेल त्याने केलेले बदल फक्त धाग्यामधे दिसतील. पहिल्या संपादकाने बदल करुनही ते धाग्यामधे दिसणार नाहीत. (Too many cooks spoils the dish) असा प्रकार टाळण्यासाठी वरची सुचना करतो आहे. एंजॉय पावसाळा एंजॉय मिपा. :)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 13947
प्रतिक्रिया 97

प्रतिक्रिया

In reply to by आतिवास

प्यारे१ आणि तुमच्या प्रतिसादाला एकत्र च उत्तर देते. धागे दुरुस्त करायची जेंव्हा वेळ येते म्हणजे टंकन चुका, फोटो ची साईझ बदलणे, लेख मालिका असेल तर आधीच्या लेखांचे दुवे देणे, लेखक च कधी प्रतिसादांतुन लेखांत भर घालतात कारण मुळ लेखात ते लिहायचं राहुन गेलेलं असतं, त्या प्रतिसादामधला मजकुर लेखकाला हवं असल्यास मुळ लेखात घालणे, या सगळ्या दुरुस्त्या सा. सं. करतात आणि लेखकाला व्यनि करतात. बर्‍याच नवीन लेखकांना पण आम्ही व्यनि करुन काही गोष्टी सुचवत असतो. सा. सं ची जेंव्हा अधिकृत घोषणा झाली तेंव्हा हे काम सुद्धा त्यात एक होतं आणि त्यानुसार लेखकांना मदत लागली की अथवा आमच्या लक्षात आलं की ते काम केलं जातंय. हे इथे विस्ताराने लिहीते म्हणजे कुणा लेखकाला मदत हवी असल्यास काय करायचे हा प्रश्न पडणार नाही. तो लेख तसा दुरुस्त केला की "updated" दिसतो. इथे आता "updated" म्हणजे प्रतिसाद संपादित नाहीयेत; धाग्यात सुधारणा केल्यात. जेंव्हा स्वतःचे प्रतिसाद कुणी संपादक सुधारतात तेंव्हा तो प्रतिसाद पुन्हा नवीन प्रतिसाद म्हणुन दिसतो. म्हणजे उदाहरणार्थ, धाग्यावर १० प्रतिसाद आहेत, तुम्ही ते वाचले आहेत आणि मग कुणी तरी त्या १० मधला आपला प्रतिसाद सुधारला तर तुम्हाला त्या धाग्यावर एक नवीन प्रतिसाद दिसेल. त्या १ आकड्यावर क्लिक करुन तुम्ही नवीन प्रतिसाद बघायला जाल तर सुधारीत प्रतिसाद दिसेल. updated हे प्रतिसाद सुधारण्यामुळे येत नाही, धागा सुधारण्यामुळे येतं.

In reply to by स्रुजा

प्रतिसादासाठी आभार स्रुजा. बाकी सगळ्या कामासाठी कौतुक आहेच्च. पण >>>> जेंव्हा स्वतःचे प्रतिसाद कुणी संपादक सुधारतात तेंव्हा तो प्रतिसाद पुन्हा नवीन प्रतिसाद म्हणुन दिसतो. हे वर दिलेलं आहे त्याला आक्षेप आहे. निव्वळ सदस्य म्हणून प्रतिसाद देतात ना आणि त्याबाबत थयथयाट सुद्धा करता ना? (हे शब्द ज्येष्ठ आणि श्रेष्ठांचे आहेत) मग संपादन दुसर्‍या संपादकांकडून करवून घ्यावं. यात कमीपणा का वाटतो? चिडचिड का होते? ज्येष्ठांचं आपल्या विचारांवर आणि लिखाणावर प्रभुत्व असतं असावं असं अपेक्शित असताना प्रतिसाद संपादनाची गरज का बरे निर्माण होत असावी? मान्य की चुका होतात आणि त्या दुरुस्त देखील करायला हव्यात पण मग जर तो गैरफायदा नसेल आणि निव्वळ फायदा म्हणुन च वापरला जात असेल तर थोडासा विश्वास मिपासदस्यांवर सुद्धा ठेवा की! त्यांना का या फायद्याचा लाभ देऊ नये? असा साधा सरळ प्रश्न आहे. म्हणणं समजलं असेल असं अपेक्षित आहे.

In reply to by प्यारे१

त्या बाबतीत मुख्य सं. म> शीच बोललेलं बरं. वर आणि इतर अनेक जागी लिहिल्या प्रमाणे सा. सं ना प्रतिसाद संपादित करतात ना पॉलिसी मेकर्स आहेत. सा. सं चं कार्यक्षेत्र वेगळं आहे , वर कॅप्टन नी ते विस्ताराने लिहिलं आहे. त्या व्यतिरिक्त इतर तक्रारींची चर्चा इथे करुन काहीच साध्य होणार नाही. अतिवास आणि तुमच्या प्रतिसादानिमित्त विस्ताराने सांगण्याची कारणे २: १. आता पर्यंत कुणाच्या नजरेतुन सुटलं असेल अथवा प्रक्रिया कळली नसेल तर या निमित्ताने कळावी २. updated हे सा. सं च्या कामाशी संबंधित आहे हे अधोरेखित करणे.

In reply to by बॅटमॅन

भाऊ, तुम्ही लोक नीलकांतवर हल्ले करत आहात हे लक्षात येतंय का? कोणाला कोणते अधिकार द्यायचे हे सर्वस्वी नीलकांतच्या हातात आहे. त्याच्यासारखा समतोल आणि विचारी माणूस एखादी गोष्ट का करतो किंवा का करत नाही याला तसेच कारण असते. निदान त्याच्यावर तरी विश्वास ठेवा.

In reply to by बॅटमॅन

मला त्रास होतो असे कुठे बोलले का मी? चालू द्या तुमचे निरर्थक आत्मरंजन! त्रासापेक्षा मनोरंजन होण्याची शक्यता जास्त आहे इथे!

In reply to by पैसा

मला कसलाही इतिहास (असल्यास) माहिती नाही तरी पण,
तुम्ही लोक नीलकांतवर हल्ले करत आहात हे लक्षात येतंय का?
इथे थोडी असहमती. एक तर हा हल्ला नाही, आक्षेप आहे. ज्यांनी नोंदवलाय त्यांनी जेवढे मांडलेय ते विचारार्ह आहे असे वाटतेय. त्याचबरोबर,
त्याच्यासारखा समतोल आणि विचारी माणूस एखादी गोष्ट का करतो किंवा का करत नाही याला तसेच कारण असते.
असेल की. पण म्हणून नीलकांतने निर्णय घेतल्यास सदस्यांनी आक्षेपदेखील नोंदवू नये काय ? "नोंदवू नये" असे नीलकांतने स्वतः म्हटल्याचे माहित नाही. सदस्यांना स्वसंपादन नाही हे समजू शकतो पण "एका सम्पादकाचा प्रतिसाद बदल करण्याचे अधिकार त्याला स्वत:ला असू नयेत." हा आक्षेप म्हणून तरी मान्य होण्यात काही प्रॉब्लेम नसावा. ह्यात नीलकांतवर हल्ला वगैरे दिसत नाही. आणि गैरसमज नसावा पण संपादकच नव्हे तर नीलकांतदेखील माणूसच आहे आणि चुकू शकतोच की. बाय डिफॉल्ट एखादी गोष्ट संमं ने केलीय अथवा नीलकांतने केलीय म्हणून आक्षेप नोंदवू नये हे पटत नाही.

In reply to by अस्वस्थामा

असेल की. पण म्हणून नीलकांतने निर्णय घेतल्यास सदस्यांनी आक्षेपदेखील नोंदवू नये काय ? "नोंदवू नये" असे नीलकांतने स्वतः म्हटल्याचे माहित नाही. सदस्यांना स्वसंपादन नाही हे समजू शकतो पण "एका सम्पादकाचा प्रतिसाद बदल करण्याचे अधिकार त्याला स्वत:ला असू नयेत." हा आक्षेप म्हणून तरी मान्य होण्यात काही प्रॉब्लेम नसावा. ह्यात नीलकांतवर हल्ला वगैरे दिसत नाही.
पालथा घडा भरायचा सोस लैच बगा तुमास्नी.

In reply to by बॅटमॅन

:))) "पालथा घडा" असं वाटत नै म्हणून लिहिलय राव. (येथील व्यवस्थेवर विश्वास असलेला आणि ते मत बदलण्यास अजून कसलाही अनुभव नसलेला )

In reply to by अस्वस्थामा

पण सदस्यांवर नीलकांतने विश्वास ठेवून बघावा असे म्हणताना "सध्या नीलकांतचा सदस्यांवर विश्वास नाही" असा सरळ अर्थ निघतो. जो त्याच्यावर भरपूर अन्याय करणारा आहे. शिवाय अनेकदा आपण संपादकांची जिरवली असे वाटून जे अनेक सदस्य लिहीत असतात तेव्हा आपण नकळत नीलकांतला अप्रत्यक्ष जबाबदार धरतोय आणि दुखावतोय हे त्यांना समजत नाही. माझा प्रतिसाद केवळ एवढेच सांगण्यासाठी होता, आहे. इतर पालथ्या घड्यांबाबत मला काहीच म्हणायचे नाही. आणि मी आता दगडांवर डोके आपटायचे सोडले आहे. तुम्ही समंजस आहात म्हणून फक्त तुमच्याशी बोलत आहे. नीलकांतकडे जर आक्षेप नोंदवायचे असतील तर त्यासाठी नीलकांतशी थेट बोलावे लागेल. चिमणरावच्या धाग्यावर लिहून काय होणार? तुम्हाला नरेन्द्र मोदीसाहेबांना सल्ले द्यायचे असतील तर पीएमओ ला लिहावे लागेल. मिसळपाव वर लिहून काय होणार आहे?

In reply to by पैसा

अप्रत्यक्ष काय ते सोडून द्या, प्रत्यक्षाचं बोला. इथे एक प्रतिसाद काय लिहिला तर इतका काय त्रास होतोय की डैरेक नीलकांतला मध्ये आणायची गरज वाटतेय?

In reply to by बॅटमॅन

आपले भांडण होते तेव्हा लै मजा येतेच! पण समजून घे रे बाळा, इथे कोणाला कोणते अधिकार द्यावेत किंवा देऊ नयेत हे फक्त आणि फक्त नीलकांत ठरवतो. तेव्हा त्याबद्दल जे काय म्हणायचे असेल ते इथे चिमणरावाला सांगून काय उपयोग आहे? ते आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी होते नाही का? समजतंय का? नैतर जौ दे. मला एका संस्कृत काव्याचे भाषांतर करायचे आहे. तुला काही शब्दांसाठी व्यनि करते थोड्यावेळात.

In reply to by बॅटमॅन

प्यारे आणि बॅटमॅन काका, मालक काम करत नाहीत किंवा अपुरे काम करतात असे तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या आवडीच्या संस्थळांवर तुम्ही का जात नाही? किंवा तुमच्या मित्रांप्रमाणे तुम्हाला आवडेल तसे संस्थळ काढायचा पर्याय तुम्हाला खुला आहेच की!

हा लेख छान उपक्रम सुध्धा छान पण काही भाबड्या शंका १ जे जे गेले त्यामुळे मिपा चे नुकसान झाले आहे हे तत्वत: मान्य आहे का (मी कोणीही आंडू पांडू नाही तर चांगले चांगले लेखक गेले किंवा काही कारणाने कमी केले गेले) २ कुठल्याही लेखावर संपादन / प्रतिक्रियेवर संपादन केल्यावर कारण मीमांसा , मिळू शकेल का ? बदल हा शेवटी स्वत: पासून करावा लागतो :)

In reply to by माझीही शॅम्पेन

शँपेन. रास्तं शंका आहेत. मला आता फक्त एक गोष्ट सांग. जर मी आज एका दिवसामधे २०-२५ धागे संपादित केले तर मला सगळ्यांना पोचपावती देणं शक्य आहे का? राहिली गोष्ट प्रतिक्रिया संपादित किंवा हेवनवासी होण्याची ते अधिकार कुठल्याही सा.सं. ला नाही. हिच गोष्ट संपादकांनाही लागु होते. प्रत्येक उडवलेल्या प्रतिक्रिया/ लेखाला पाच ओळी कारण लिहायचं म्हणलं तरी ते व्यवहार्य असेल का? ह्यावर तुझ्याकडे काही उपाय असेल तर सांग.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

माझे प्रतिसाद जेव्हा जेव्हा संपादित झालेत तेव्हा तेव्हा नीट दोन-चार ओळी का होईना पण कारण दिले गेले होते. आणि तेवढी कर्टसी दाखवली जात असेल तर तक्रारीचे कारण नसावे. (इतरांचा अनुभव माहीत नाही.)

कॅप्टननी हा लेख लेखन संपादक म्हणुन टाकला आहे. काही चांगला मदतीचा हात पुढे केला आहे. असे असता संपादक मंडळाबद्दलच्या कुरबुरी इथे लिहुन लोक या धाग्याची आणि एका चांगल्या उपक्रमाची वाट लावत आहे असे वाटते. हे म्हणजे एखाद्या भाजपा नगरसेवकाने शनिवारवाड्याच्या स्वच्छतेचा मुद्दा उपस्थित केला की "आधी बाबरी मशिदीचे काय झाले ते सांगा" म्हणुन बोंबाबोंब करण्यासारखे आहे.