परदेस (अनकट व्हर्जन)
लेखनप्रकार
परदेस पुन्हा बघितला तेंव्हा काही गोष्टी नव्याने जाणवल्या, दिसल्या. अन त्या कट करणं अन्यायकारक आहे असं मानून धाग्यात बदल करून हे अनकट व्हर्जन इथे देत आहे.
परदेस !
भारत व अमेरिका या दोन्ही संस्कृतींमधल्या फरकांची ही कहाणी आहे. अमरिश पुरी ३५ वर्षे अमेरिकेत राहून भारतात येतो व आपल्या अमेरिकन मुलासाठी भारतीय सून पसंत करतो. मग त्यातून होणार्या संघर्षाची, किंवा खरे म्हणजे घातलेल्या अनावश्यक घोळाची ही कथा आहे. ३५ वर्षे अमेरिकेत राहून अमरिश पुरीला दोन्ही संस्कृतींची किती चांगली समज आहे हे स्टार्टलाच कळते. आपल्या बरोबर आलेल्या इतर अमेरिकन टुरिस्टांना "In America, love is give-and-take. But in India loving is only giving, giving, giving" असे तो सांगतो. ते टुरिस्टही याचा नक्की अर्थ काय असेल ते जणू एका मिनीटात कळाल्यासारखे "Unbelievable, unbelievable" म्हणत राहतात. नंतर अमरीश पुरी आलोक नाथ च्या फार्म हाउस वर येतो. जुना मित्र वगैरे. महिमा त्याची मुलगी.
तेथे उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे बरीच लहान मुले असतात. इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांना सुट्टी असल्याने महिमाही असते तेथे. हा यत्तेचा अंदाज "तुमच्या कोटाच्या खिशातून एक चिठ्ठी सापडली, व त्यात औषधाच्या गोळ्या एक सकाळी व एक संध्याकाळी..." वगैरे बोलताना ज्या अॅक्शन्स करते त्यावरून आहे. तिला व इतर लहान मुलांना ज्यांच्याशी बोलायचे आहे त्यांना आधी मैलभरावरून हाका मारत पळत यायची आवड असते व एरव्ही 'सिम सिम पोला पोला सिम सिम पोला' हे म्हणायची सवय असते. हे नक्की काय आहे हे त्यांना कोणीही विचारत नाही.
महिमा लगेच त्याच्या पाया पडते. आलोक नाथची इतर मुले ही मुख्य कलाकार नसल्याने त्यांनी पाया नाही पडले तरी चालते. महिमाशी ओळख आलोक नाथ करून देताना अमरिश पुरी आता यापुढे या चित्रपटात पालकांच्या कौतुकमिश्रित नजरेने तिच्याकडे बघायचे आहे की व्हिलनच्या नजरेने हे एकदा 'मोड सेटिंग' करतो आहे असे वाटते. अमरिश पुरीला म्हणे १८ मुले असतात व ११ मुली (अमेरिकेत ३५ वर्षे काय करत होता ही शंका यापुढे येणार नाही). तरीही नंतर अपूर्व बद्दल बोलताना तो "वो मेरा इकलौता बेटा है" म्हणतो. त्याची बाकी मुले व मुली कोठेच दिसत नाहीत.
तेथे तो आलोक नाथ ला सांगतो की आम्ही आमच्या मुलांना वेस्टर्न कल्चरमधे वाढवलेले असल्याने ते आपली संस्कृती विसरले आहेत (येथे एक डूबता सूरज चा डायरेक्शन शॉट). त्यामुळे आम्हाला महिमा सारख्या सुनांची गरज आहे. महिमा ही आदर्श भारतीय नारी असल्याने तिचे नाव गंगा असते. (नशीब हेच प्रतीक पुढे वाढवून शाहरूख चे नाव बंगालचा उपसागर नाही ठेवले). त्यामुळे हे आंतराष्ट्रीय सामाजिक कर्तव्य करणे ही गंगाची जबाबदारी होते.
तिला पसंत करण्यासाठी शाहरूख आणि अपूर्व अग्निहोत्री ही तेथे येतात. आणि मग नुसते दीड दोन तास दोन्हीकडच्या स्टीरीओटाईप्स चे बुडबुडे हवेत उडत असतात. हर वाक्यागणिक "हम (भारतीय) लोग...", "हिन्दुस्थानी सभ्यता मे...", "हमारी संस्कृतीमे..." ने चालू होणारे संवाद इकडून तिकडे जातात. शेवटी तर आता अपूर्व डोक्यावर दोन्ही पंजे उलटे धरून खाली वाकून "प्लीज, प्लीज! I got it! I GOT IT!!" म्हणेल असे वाटले. येथे भारत व अमेरिकेतील लोकांचे एकमेकांबद्दलचे प्राचीन समज वापरले आहेत त्यावरून सुरूवातीला आर्किऑलॉजिकल सोसायटी ऑफ इन्डिया चे आभार का मानले आहेत ते कळते. पण वरचे ते आं.सा.का. निभावण्याची संधी होणारा नवरा केवळ एक कबड्डीची मॅच हरल्याने हुकेल अशी परिस्थिती निर्माण होते. कारण तेथे एक स्वयंवर सारखी सिच्युएशन निर्माण करून जो जिंकेल त्याचे गंगा शी लग्न होईल असे ठरते. मग गंगाला मॅच कोण जिंकणार याची काळजी दिसते, पण दुसरेच लोक आपले लग्न एका कबड्डी मॅचवर ठरवत आहेत याचे तिला काहीच वाटत नाही.
मधेच तो एक रात्री ग्लासमधे दूध घेउन जाण्याचा पारंपारिक शॉट होतो. (कोण तरूण लोक कधी असे ग्लासभर दूध पितात)? येथे महिमा ते दूध घेउन निघते. तेवढ्यात असे दिसते की अपूर्व त्याच्या खोलीत व्हिडीओ कॅमेरा घेउन काहीतरी रेकॉर्ड करत असतो. (दुसरे कोणी नसते त्या बेडरूम मधे, पण मुळात आपण कशाला खोलात शिरा?) त्यात त्याला स्वतःच्या बेडवर फणा काढून बसलेला नाग दिसतो. तो अमेरिकन असल्याने लगेच त्याला दरदरून घाम फुटतो. मग महिमा तेथे येते. तेथे नाग बघून ती खाली बसून दोन्ही हात त्याच्याकडे बघून जोडते. भावी नवर्याला भेटायच्या रोमँटिक क्षणी सुद्धा तिला साप या गोष्टीची भारताच्या सांस्कृतिक दृष्टीकोनातून मीमांसा करायाच्या आपल्या नैतिक जबाबदारीचे विस्मरण होत नाही. पुन्हा एक "हम लोग साँप को जानवर नही, भगवान मानते है" वाक्य येते. तो साप इच्छाधारी असतो का नाही माहीत नाही. पण आपल्यातून एक सुंदर तरूणी प्रकट करून चार पाच वाईट लोकांचे खून तिच्याकडून पाडण्याएवढा महिमाच्या प्रार्थनेत दम नाही हे लक्षात आल्यावर तो निराश होउन जवळच्या एका कपाटाखाली जातो. साप बेडवरून बाजूच्या कपाटाखाली गेला म्हणजे आता त्या खोलीत झोपायला सेफ झाले ना? अपूर्व ला तरी तसे वाटते.
अपूर्व व महिमा एकमेकांना आवडतात. सगाई च्या गोष्टी सुरू होतात. अपूर्वला घराच्या अंगणात जनावरे आवडणार नाहीत म्हणून शाहरूखने गाई-म्हशी वगैरेंना हलवायला सांगितलेले असते. पण नंतर "हम नये रिश्ते बनाने के लिये पुराने रिश्तोंको नही भूलते" हे शाहरूखला पटवले जाते व जनावरे परत येतात. गाई घरी परत आल्यावर लिटरली त्या गोरज मुहूर्तावर ही सगाई पार पडते. त्या समारंभाला स-गाई नाव तेथूनच पडले असावे.
आता गंगाला अमेरिकेची ओळख होण्यासाठी ती तिकडे येते. येथे अमेरिकन संस्कृतीची सर्व वैगुण्ये आपल्याला दिसतात. अपूर्व सिगरेट व दारू पितो, बार मधे दारू पिउन दंगा करतो. त्याच्या आधीच्या गर्लफ्रेन्ड बरोबर नुसते अफाट फोटो काढतो एवढेच नाही तर ते सहज दिसतील असे ठेवूनही देतो. त्याच्या या कृत्यांमुळे तो गंगाला आवडेनासा होतो. त्याच वेळेस शाहरूख आवडू लागतो.
अपूर्व कोणीतरी मोठा माणूस असतो. इतका की त्याचे घर हॉलीवूड मधे असूनही त्याला 'ओशन व्ह्यू' असतो. त्यांचे लग्न नुसते ठरल्याची न्यूज "लॉस एंजेलिस" शहर के सबसे बडे पेपर न्यू यॉर्क टाईम्स च्या मुखपृष्ठावर येते, पण त्याची एकच कॉपी त्यांना मिळते ("कृपया एकपेक्षा जास्त प्रत मागू नये" अशी पाटी लिहीलेले न्यू.टाईम्सचे कार्यालय नजरेसमोर आले). त्या पेपरच्या त्याच पानात महिमा शाहरूख ला पराठे बांधून देते. नंतर जेव्हा अपूर्व ते पान परत मागतो तेव्हा ते हरवल्याने तो चिडतो, तर बरोब्बर त्याच वेळेला शाहरूख तेथे येतो व सांगतो की हिने मला फ्रेम करायला ते दिले होते. या प्रकाराची तर्कसंगती लावायची म्हणजे - आपल्याला पराठे ज्या कागदात बांधून दिले आहेत त्या कागदाकडे आधी लक्ष गेले पाहिजे. ह्या फोटोची एकच कॉपी उपलब्ध आहे हे ही त्याला माहीत पाहिजे. हॉलीवूड मधे जवळपास कोठेतरी "पेपरवरचे पराठ्यांचे डाग काढून देनार" चे दुकान पाहिजे (इंग्रजी पेपर ३रू, मराठी २.५० ई.). मग हा फोटो सापडत नाही म्हणून अपूर्व आणि महिमा यांत भांडणे होणार हे ही त्याला माहीत पाहिजे व अशा प्रसंगात एकदम एन्ट्री घेता यावी म्हणून त्याला कायम दाराआड उभे राहून त्याची वाट बघावी लागणार. एवढे सगळे न करता तो त्या प्रसंगात एकदम एन्ट्री कशी मारू शकतो हे घईसाहेबांनाच माहीत. एकूणच कोणाच्याही खोलीत, अगदी बेडरूममधे सुद्धा, कोणीही कधीही दार सुद्धा न ठोठावता घुसत असतो.
अपूर्व ची एन्ट्री त्यामानाने साधी. मात्र हावभाव असे की "अच्च्या अच्च्या माना वेळावून बोलते म्हातारी" या पुलंच्या वाक्याची आठवण येते ("संगीत चिवडा"). "गंगा, अमेरिकामे गर्ल फ्रेण्ड्स के साथ ऐसी बाते हो जाती है" या अफलातून जस्टिफिकेशन ची डिलीव्हरी बघा. महिमा या वाक्याच्या कंटेट वर संतापू की प्रेझेण्टेशन वर या संभ्रमात दिसते.
तो ९० च्या दशकात अमेरिकेत काळी हॅट घालून गाडी चालवतो, तीही ओपन कन्व्हर्टिबल. एकूण हे कथानक कोणत्या दशकात घडले याची घईची काहीतरी गडबड दिसते किंवा कॉस्च्युम डिझाईनरने "द अनटचेबल्स" किंवा "मॅड मेन" समोर ठेउन ते डिझाईन केलेले असावेत. अपूर्व भारतात कधीच आलेला नसतो. आणि तरीही अस्खलित हिन्दी बोलत असतो. एवढेच नव्हे तर अमेरिकेतील सर्व लोक, अगदी चायनीज बार ओनर्स सुद्धा हिन्दीच बोलतात. शाहरूख भर तरूणपणी सस्पेंडर्स असलेले फॉर्मल कपडे घालून भारतात आलेला असतो. त्याचे सूट वगैरे सुद्धा कायम वाढत्या अंगाचे असल्यासारखे ढगळ दिसतात. कदाचित अपूर्व आणि शाहरूख दोघांनाही बसतील अशा मधल्या मापाचे बनवले असावेत. गंगाही दिल्ली ते हॉलीवूड विमान प्रवासात सगाईचे सर्व दागिने, भरजरी ड्रेस घालून बसलेली असते. अपूर्व श्रीमंत असल्याने थीम पार्क मधे सुद्धा सूट, टाय घालून फिरतो.
शाहरूख ला नक्की किती कला अवगत आहेत हे मोजणे अवघड आहे. वेगवेगळे डान्सेस, चित्रकला, पियानो व बासरी वाजवणे, मुर्तिकाम करणे (व का कोणास ठाउक त्यांना घूंघट घालून ठेवणे), कबड्डी खेळणे, कार्स रिपेअर करणे हे तर असतेच. पण त्याचे 'आय लव्ह इंडिया' हे गाणेही गाजत असते. त्याबद्दल मुलाखत सुरू असताना किशोरीलालने बोलावले म्हणून शेवटचा प्रश्नही न ऐकता तो लगेच निघतो. मग मात्र घरी जाऊन कपडे वगैरे बदलून त्याला भेटण्याएवढा वेळ असतो.
मधे एकदा शाहरूखचा वाढदिवस येतो. तेथे महिमा त्याला हॅपीबड्डे करायला जाते. ते त्या खत्रूट भावजयीला आवडत नाही. ती तिला म्हणते "दुनिया हस रही है हमपर!" "दुनिया"! यांच्या घराचा परिसर एवढा मोठा असतो की सख्खे शेजारी सुद्धा मैलभर लांब असतील. त्यात "looks like it's somebody's birthday, some lady is singing there. He looks a little big for the balloons and confetti though" असा विचार ते करणार नाहीत. कारण त्यांना दुसरे उद्योग नाहीत. त्यामुळे "अहो तो त्याचा खरा मुलगा नव्हे, मानलेला आहे. आणि ही बघा तेथे जाऊन नाचते आहे स्वतःच्या नवर्याला सोडून. काय बाई यांना स्वतःच्या सुनासुद्धा सांभाळता येत नाहीत. अशा हलक्या लोकांच्या वाढदिवसाला कधी कोणी जातात का? ही ही ही ही" - असे भारतातील समाजाच्या व यांच्या कुटुंबांच्या सखोल माहितीवर आधारित गॉसिप ते करतील. एरव्ही त्यांना सरदार आणि अरब यातील फरक कळत नसला तरी.
लग्नाला काही दिवस अजून बाकी असताना मग अपूर्व आणि गंगा लास वेगास ला जायचे ठरवतात. मग तेथे लग्नाआधीच "जिन्दगी का मजा" घेण्याची मागणी अपूर्व करतो ("बाकी लोग अपनी अपनी रूम मे जिन्दगी का मजा ले रहे है" असा संवाद आहे. हे संवाद बहुधा त्या जीवनाचा आनंद घेण्यासंबंधीच्या एका उत्पादनाची जाहिरात लिहीणार्याने लिहीले असावेत). ती ते साफ नाकारते आणि तेथून पळून जाते. ती पळाली हे कळल्यावर "पोलिस कमिशनर को फोन लगाओ" असे अमरिश पुरी फर्मावतो. पण अमेरिकेत हे पदच आस्तित्त्वात नसल्याने नक्की कोणाला फोन करायचा हे कोणालाच कळाले नसावे. त्यात शाहरूख चे जासूस चारो तरफ फैले हुवे असल्याने ती "वॉटरफ्रण्ट स्टेशन" वर दिसली हे त्याला कळते. जे व्हँकुव्हर मधे आहे, अंतर सुमारे १३०० मैल. आणि कॅनडात. ही पळाली लास वेगास मधून व शाहरूख सॅन फ्रान्सिस्को मधे आहे. मग तो सॅन फ्रान्सिस्कोहून 'वेस्ट कोस्ट एक्सप्रेस' ने तेथे येतो. जी व्हँकूव्हरची "कम्युटर" रेल सर्विस आहे, मुंबईच्या लोकलसारखी. तो जेथे उतरतो तेथेच समोर ती उभी असते.
मग शाहरूख व ती भारतात पळून जातात. फैले हुवे जासूस इंडस्ट्रीमुळे हे ही कोणीतरी प्रत्यक्ष बघते व अपूर्व ला सांगते. आंतरराष्ट्रीय प्रवासास शाहरूख व गंगा ला पासपोर्ट वगैरेंची गरज पडत नाही. कदाचित "हमारे संस्कृती मे पासपोर्ट नही पूछा करते..." वगैरे वाक्ये सुरू झाल्यावर इमिग्रेशन ऑफिसरने "नको नको, त्यापेक्षा तू जा" म्हणून स्वतःची सुटका करून घेतली असेल.
ते भारतात आल्यावर तिच्या घरचे तिलाच दोष देतात. आपल्या वागण्याचे कारण चित्रपट संपेपर्यंत सांगायचे नाही या हट्टामुळे तिचाच दोष आहे असा समज निर्माण होतो. मग शाहरूख ला हाकलून दिले जाते. नंतर गंगा घरातून पळून जाते. काही वेळ आधी निघून गेलेला शाहरूख, नंतर बर्याच वेळाने घरातून पुन्हा पळालेली गंगा, नंतर अमेरिकेतून आलेला अपूर्व आणि इतर रिकामटेकडी मंडळी हे सर्व कोणत्यातरी पुरातन इमारतीत एकाच वेळेला आपोआप येतात. काळ व दिशा यांची कोणतीही बंधने त्यांच्या आड येत नाहीत.
शेवटी सर्व उघडकीला येते. सर्व म्हणजे ते जिंदगी का मजा प्रकरण. पण यामुळे गंगाने अमेरिकेतून थेट भारतात पळून येणे हे योग्य ठरते. मग शेवटी तिचे शाहरूखशीच लग्न ठरून हा चित्रपट संपतो आणि दोन्ही संस्कृती सुटकेचा निश्वास टाकतात.
एक ब्लूपरः आता या वेगळ्या ब्लूपर ची काय गरज आहे असे आपल्याला वाटेल. पण ते ही आहे. अमरिश पुरी शाह रूख ला दुसरीकडे जायला सांगत असल्याच्या शॉट मधे मागे एक फ्रेम आहे. क्लिंटन व अमरिश पुरी हात मिळवताना. ते नीट बघितले तर लक्षात येते की भलत्याच दोन माणसांच्या फोटोवर क्लिंटन व पुरीसाहेबांचे चेहरे चिकटवले आहेत. आणि ब्लूपर ऑन ब्लूपर हा की हा फोटो फक्त समोरच्या शॉट मधे दिसतो, त्याच चर्चेच्या बाजूने घेतलेल्या शॉट मधे तो कोठेच दिसत नाही.
वाचने
25881
वाचनखूण
प्रतिक्रिया
71
हे इतकं सगळं घडतं या चित्रपटात? :O
मग दरवर्षी स्वातंत्र्यदिनाला हा चित्रपट का बरं दाखवतात? देशभक्तीचं काय असं चित्रण आहे या चित्रपटात? :? या पैलूवरही प्रकाश टाका जरा! ;)
परीक्षण झकास! पण फक्त चौकारच मारल्यासारखे वाटले.. षटकारही हाणता येऊ शकले असते असे वाटून गेले.. :)
In reply to हे इतकं सगळं घडतं या by मेघवेडा
यांत संस्कृती-संस्कृती खेळताना 'आय लव्ह माय इंडीया' असं गाणं असल्याने हा चित्रपट 'महान देशभक्तीपर' या कॅटेगिरीत मोडतो; म्हणून स्वातंत्रदिनाच्या पूर्वसंध्येला दाखवतात..
आयायायाया!!! 'मनमुराद ठासणे' म्हणजे काय ते या परीक्षणावरून कळते आहे. :-)
-असुर
In reply to आयायायाया!!! by असुर
+१
हहपुवा!!!!
सुभाष घईच्या चित्रपटांच्या आतड्या-पोतड्या (पक्षी: कोथळा) यापेक्षाही चांगल्या बाहेर काढता येतील पण हे ही वाईट नाही. ;)
यापुढे,
कर्मा,
हिरो,
कर्ज,
किस्ना वगैरे वगैरे सगळे येऊ द्या!
एक से एक भयानक चित्रपट आहेत.
In reply to घई by प्रियाली
अमितभ चा गन्गा जमुना सर्स्वति अस त्रिवेणि सन्गम एक चित्र्पट हुन गेला .. त्यावर लिवा ..
वेड्यासारखा हसत होतो. फार एंड ! अहो काय हो हे ! घईसाहेबानी आपले श्राद्ध करायला लावले असेल हे वाचून ! "भलतेसलते आटोमेटीक"" विनोदी आहे हो हे !
हिंदी चित्रपटांमधे पहिल्या फ्रेमपासून अखेरपर्यंत जे शेणाचे गोळे टाकलेले असतात त्यांवरच्या संतापावर हे असले लेख म्हणजे अक्सीर इलाज आहे. जियो !
फारएन्डच्या चित्रपट परीक्षणाचे आपण फ्यान आहोत ! अति-टुकार चित्रपटांमधे किती मनोरंजन मूल्य असते, हे फारएन्डच्या समीक्षेमुळे कळून येते.
अंमळ बारा वर्षे उशीरा आलेले परीक्षण जाम आवडले.
आमची पुढची फर्माईश- "प्रिन्स"
प्लीज, आमच्यासाठी एवढे कराच ! ;)
In reply to जबरी. by ज्ञानेश...
हे "प्रिन्स" प्रकर्ण म्हणजे शम्मीकपूरचे की अलिकडच्या कुठल्या सिनेमाचे ?
अवांतर : फारएंड यानी दर आठवड्याला परदेस सारख्या एकेक "क्लासिक्"वर लिहिण्याची फार्फार गरज आहे. ;-)
In reply to "प्रिन्स" by मुक्तसुनीत
हे नवीन प्रिन्स म्हणजे विवेक ओबेरॉयचे पाप आहे. त्यातल्या चित्रफितींचे दुवे इथे देऊ नाही शकत. ;)
In reply to हे नवीन प्रिन्स म्हणजे विवेक by बिपिन कार्यकर्ते
पण हा 'प्रिन्स' अगदीच 'परदेस'पेक्षा बरा आहे असं म्हणायची वेळ या चिरफाडीमुळे आली आहे. किमान मॉर्फिंग असेल तर ते तरी बरं केलेलं आहे, शिवाय उगाच संस्कृतीचे ढोस नाही पाजलेले!
फारएन्ड, लै लै लै बेक्कार हाणला आहेत. पोलिस कमिशनर, फोटो फ्रेम, अपूर्व अग्निहोत्रीचे कपडे ... एकदम झक्कास टोले आहेत. तरी त्यात महिमा-अमरीशने 'आय लव्ह माय इंडीया' गाणं म्हणणं, सोनू निगमने मायकल जॅक्सनची स्टाईल उचलत म्हटलेलं 'दिल, दिवाना दिल' गाणं जे शारूकच्या तोंडी आहे, त्याची का नाही हो वासलात लावलीत.
नाईन्टीजचे सगळे टुक्कार पिच्चर तुमच्या यादीत टाकाच हो.
चित्रपट परिक्षण खुप जास्त आवडले..
आणि परिक्षणाचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे आज वर न पाहिलेला चित्रपटाचा शेवट समजला
कसे काय पुर्ण पिक्चर पाहु शकतात माहित नाही.
आयला हा पिक्चर माझ्याकडुन बघायचा राहुनच गेला होता. खुपच ईनोदी वाटतो हा चित्रपट.
लै भारी परीक्षण!! ;)
शाहरुखला बंगालचा उपसागर इथे मी ठ्या करुन हासलो राव! लै बेक्कार उपमा!!! हा हा हा!! =))
(हा चित्रपट बघायचे अपूर्व धाडस मी दाखवलेले आहे त्याबद्दल आता मला माझीच पाठ थोपटून घ्यावीशी वाटते आहे! ;) )
(धाडसी परदेसी)चतुरंग
अरेरे!!! मी उगाचच पहिला नाही हा पिच्चर...इतका विनोदी असेल हे अपेक्षितच नव्हते..
ह ह पु वा झाली. शोमनगिरीच्या नावाखाली काहीही चालते. साल्यांनी लॉस एंजेलिस सांगून शुटिंग घेतले आहे व्हॅन्कुव्हरला.एयर इंडियाने एक फुकटात जाहिरात करुन घेतली आहे- to feel the air of India, fly by air India असा काहितरी डायलॉग आहे.
मस्त परिक्षण, जरा किस्ना आणि यांदे ही पहा हो..
का? का? का?
मी हा सिनेमा का पाहिला?
परिक्षण भारी लिहिलय!
मा. श्री. श्री. प. पू. सुभाषरावचंद्र घईंना घाईघाईने पाठवण्याजोगं आहे.;)
आमल्या,
खासच आहे लेख :)
>> (नशीब हेच प्रतीक पुढे वाढवून शाहरूख चे नाव बंगालचा उपसागर नाही ठेवले)
>> मग गंगाला मॅच कोण जिंकणार याची काळजी दिसते, पण दुसरेच लोक आपले लग्न एका कबड्डी मॅचवर ठरवत आहेत याचे तिला काहीच वाटत नाही.
>> कोण तरूण लोक कधी असे ग्लासभर दूध पितात
>> हॉलीवूड मधे जवळपास कोठेतरी "पेपरवरचे पराठ्यांचे डाग काढून देनार" चे दुकान पाहिजे
>> हे संवाद बहुधा त्या जीवनाचा आनंद घेण्यासंबंधीच्या एका उत्पादनाची जाहिरात लिहीणार्याने लिहीले असावेत
हसून हसून फुटलो ना लेका !
शाहरूख भर तरूणपणी सस्पेंडर्स असलेले फॉर्मल कपडे घालून भारतात आलेला असतो. त्याचे सूट वगैरे सुद्धा कायम वाढत्या अंगाचे असल्यासारखे ढगळ दिसतात. कदाचित अपूर्व आणि शाहरूख दोघांनाही बसतील अशा मधल्या मापाचे बनवले असावेत.खो..खो...ख्या...ख्या...खी..खी...खोक्..खोक्..खोक्क खोळ्खोक... जाम फुटलो.. शाहरुखचे दिवाना मध्येही असेच कपडे होते(आठवा..कैसी दिवानगी ये..मधले शाहरुखचे आणि दिव्या भारतीचे ठुमके.).कदाचित इंडस्ट्रीत पुढे स्ट्रगल करावे लागेल तेव्हा सारखे सारखे कपडे का शिवा ह्याच उद्देश्यातुन वाढत्या अंगाचे कपडे शिवले असावेत. गंगा आणि बंगालचा उपसागर ही भन्नाट... आता ह्या परिक्षणामुळे परदेस पुन्हा एकदा बघावा लागणार..नव्या दृष्टीकोनातुन ...एक अतिकॉमेडी चित्रपट म्हणुन..
आयायायाया.... आता रात्रभर एकटाच वेड्यासारखा हसणार आहे...
लैच ठासून माराता ब्वॉ तुम्ही...
हेहेहे..मस्त आहे परिक्षण
असले चित्रपट मी बघत नाही त्यामुळे काय गमावले हे कळले !
ओह.. हे वाचले नव्हते मी फारेंड!
बंगालचा उपसागर मॅक्स सही आहे !! :)))
एका उद्दात्त आणि भारतीय संस्क्रूतीवर आधारीत असलेल्या महान चित्रपटावर केलेली टिका पाहून मन विषण्ण झाले.
शो-मन (स्वयंघोषित) श्री. सुभाष घई यांनी जीवापाड मेहनत घेऊन बनवलेल्या अशा चित्रपटामुळे देशाविषयीचे प्रेम किती उफळून येते याची बिलकुल कल्पना दुसर्या टोकाच्या लोकांना आलेली दिसत नाही. या अशा सुंदर चित्रपटाचा प्रभाव म्हणून म्हणा किंवा आणि काय म्हणा..त्यानंतर मी श्री. सुभाष घई यांचे पुढील चित्रपट (किसना, ताल) अजून पाहिलेले नाहीत...
बाकी या चित्रपटातच महिमा जरा बरी दिसली.. नंतर कोठे गेली कोणास ठाऊक..
घई यांचे हीरो, आणि ताल हे एवढे दोनच चित्रपट पाहिले असतील, पण तेवढेच बास झाले.
परिक्षण मात्र झकास.
'परदेस' आत्तापर्यंत न पाहिल्याचा घोर पश्चात्ताप झाला! फर्मास लेख. आवडलेली वाक्यं उद्धृत करायला गेलो तर निम्म्याहून अधिक लेख पुन्हा प्रतिक्रियेत द्यावा लागेल :), पण "ते टुरिस्टही हे म्हणजे याचा नक्की अर्थ काय असेल ते जणू एका मिनीटात कळाल्यासारखे "Unbelievable, unbelievable" म्हणत राहतात" हा शीन एकदम डोळ्यासमोर आला आणि फु ट लो! याला कॉम्पिटिशनच द्यायची झाली तर 'दिलवाले दुल्हनिया...' मध्ये (पुन्हा) अमरीश पुरीच "इस चिठ्ठीसे पंजाब की मिट्टी की सुगंध आ रही है" छापाचा ड्वायलाक टाकतो, तो शीन.
In reply to अरेरे by नंदन
'दिलवाले दुल्हनिया...' मध्ये (पुन्हा) अमरीश पुरीच "इस चिठ्ठीसे पंजाब की मिट्टी की सुगंध आ रही है" छापाचा ड्वायलाक टाकतो, तो शीन.मलाही अगदी हाच शीन आठवला. ;) आणि ओम शांती ओम मधला "वाह! क्या अॅक्टींग कर रहा है|", "वाह! क्या अॅक्टींग कर रहा है|" म्हणणारं ऑडियन्स आठवलं. उद्या परदेस आणि दिलवाले या दोन्ही फिल्मच्या शीन्सची अदलाबदल केली तर चित्रपटात काही घोळ आहे का ते समजणारही नाही.
हा हा!! लहानपणापासून पिक्चरची आवड कधी लागलीच नाही पण त्यामुळे असे इनोदी पिक्चर गमावल्याचं लै दु:ख होतया.
परीक्षण क-ह-र आहे कहर!!!
काय लिव्हलयं! 'पाहीला नाही आहे पण परदेस' सिनेमा इतका ढासू विनोदी आहे हे आज कळले.
साष्टांग नमस्काराची स्मायली!>
वर कोणीतरी म्हणल्याप्रमाणे दर एक / दोन आठवड्याला तुमच्याकडून परिक्षण हवेच!
परीक्षण लईच भारी!
स्वाती
घरातील सीनिअर मंडळी कधीकधी सिनेपरिक्षणाबद्दल बोलताना मार्मिकच्या "शुद्ध निषाद" यांची आठवण काढून मनमुराद हसत असत. आम्हाला ते परिक्षण "पुस्तक रूपात" उपलब्ध नसल्यामुळे जास्त माहिती नाही. पण आज श्री.फारएंडनी "परदेसा"ची जी अस्सल "देसी" चिरफाड केली ती वाचून मोह होत आहे की, आमच्या घरातील त्या ग्रुपला लिखाणाचा हा धारदार कोयता दिलाच पाहिजे, भले त्यांनी घईंच्या "मुक्ता आर्टस" वर कधी दहाची नोट टाकली असेल वा नसेल.
तो "नागाचा" सीन तर मेंदू कपाटात ठेवूनच चित्रीत करण्यात आला असणार. स्थळ, काळ, घटना, समाज रचना यांच्यासंदर्भात किमान काहीतरी तार्किक संगती असली पाहिजे हे घईंना कुणी सांगेल याची सुतराम शक्यता नाही.
लै भारी फारएंडा!
आयला 'आय लव्ह माय इंडीया' म्हटल्याने देश प्रेम व्यक्त होते माहितीच नव्हते.
प्रियाली ताई लिस्ट मध्ये " युवराज " लिहायचा राहिला आहे.
तसं पण काही चित्रपट मेंदू कपाटात ठेवून बघायचे असतात त्या पैकी हा एक
लै भारी! डोक्यात जाणार्या सारुकच्या अनेक शिणुम्यांच्या शिरोमणी शिणुम्यावर अंशतः सूड उगवल्याचं समाधान दिलंत.
सारुक आणि महिमेच्या अभिनया(?)वर अजून दोन चार चौके-छक्के मारले असते तर आणखी बरं वाटलं असतं.
फारएंडभाऊ,
तुम्हाला या चित्रपटातली रूपकं समजली नाहीत म्हणून त्याची खिल्ली उडवणं योग्य नाही. घईसाहेबांनी एक महान कलाकृती तुमच्या समोर ठेवली, आणि तुम्ही त्यांचे ऋणी व्हायच्या ऐवजी त्यांच्या गगनाला गवसणी घालू पहाणाऱ्या चित्रपटाला नावं ठेवत आहात. दुर्दैवाने इतर अनेक दिग्गजही त्यात सामील झालेले दिसतात. इतका वेळ गप्प बसलो होतो पण आता राहावत नाही.
भारतीय व अनिवासी भारतीय हे सरळसरळ संस्कृतीचं भान ठेवणारे व विसरलेले यांचं प्रतीक आहे. यातून सद्यस्थितीतल्या सामाजिक घटनांवर टिप्पणी केलेली आहे. गंगा ही मराठी अस्मितेचं प्रतीक आहे. त्या मराठी अस्मितेला धरून राहाणारा शाहरुख हे मनसेचं प्रतीक. तर ती एके काळी आपली मानणारे, व आता मोठ्या स्वप्नांमागे धावणारा अमरीश पुरी हे शिवसेनेचं प्रतीक. तिला पाहून अपूर्वच्या पलंगावर डोलणारा नाग निर्माण होतो. इतकी धीट लैंगिक प्रतिमा वापरून, मराठी अस्मितेविषयी पुन्हा आकर्षण निर्माण झालं असं घईंना सुचवायचं आहे.
पेपरातला फोटो हे प्रसिद्धी माध्यमांच्या वापराचं प्रतीक, कमिशनर को फोन लगाव हे सत्तेचं प्रतीक, आणि पेपरात गुंडाळलेले पराठे हे एकाच वेळी प्रसिद्धी माध्यमांना पत्रावळी सारखी वागणुक देण्याचं, पण त्याहीपेक्षा उत्तर भारतीयांचं प्रतीक आहे. एकदा कथा सांगायची झाली की मग बाकी तांत्रिक बाबींना त्यांनी फाट्यावर मारलेलं आहे. संदेशासाठी आकारबंध वाकवलेला आहे. त्यामुळे अचानक शाहरुख अचानक कसा येतो वगैरे बाबी गौण ठरतात. पासपोर्टचा अभाव हेही प्रतीकात्मकच असावं - आपल्याच देशाला जायला कसला आलाय पासपोर्ट?
या सर्वांवर घईंनी टिप्पणी त्या घटना घडायच्या आधीच केल्या हे त्यांच्या द्रष्टेपणाचं लक्षण. त्यांच्यासारख्या महान कलाकारांकडे दुर्लक्ष करणारं जग आसपास आहे हे पाहून दुःख होतं.
In reply to रूपकं.... by राजेश घासकडवी
ओय्य... आधी लेख वाचून फुटलो. आता हा प्रतिसाद वाचून.
आ व रा!!!
In reply to ओय्य by श्रावण मोडक
श्रामोंशी बाडिस..
घासुगुर्जी.. तिरकं म्हणजे किती तिरकं लिवायचं हो.
In reply to ओय्य by श्रावण मोडक
लेख वाचून फुटलो होतोच आता हा प्रतिसाद वाचून फुटलो !
In reply to ओय्य by श्रावण मोडक
आधी लेख वाचून फुटलो. आता हा प्रतिसाद वाचून.
श्रामोंशी सहमत. गुर्जी जियो!
In reply to ओय्य by श्रावण मोडक
श्रामोंशी बाडिस! खतरनाक प्रतिसाद :)
In reply to रूपकं.... by राजेश घासकडवी
च्यायला . जर मूळ लेख वाचल्यावर घईंचाजीव थोडाफार वाचला असेल . तर हा प्रतिसाद पाहीन नक्कीच जाइल . .
=]]]]
आजचा दिवस धन्य जाहला! लेखकाच्या आणि प्रतिसादकांच्या प्रतिभेला त्रिवार वंदन!
काय हे अधपतन !! आपल्या थोर संस्कृतीवर असे शिंतोडे उडवताना बघून मन उद्विग्न झाल. सुभाष घाई आणि सारूक खान यांनी हे वाचले तर त्यांच्या मनावर किती खोलवर आघात होतील याची थोडीतरी जाण लेखकांनी ठेवायला पाहिजे होती
.
शेवटी कितीही झालं तरी वयाने ते ज्येष्ठ आहेत. आणि आपल्या महान भारतीय संस्कृतीत हे शोभून दिसत नाही.
हे परीक्षण वाचून त्यांनी पुन्हा नवीन चित्रपट काढायचा प्रयत्न केल्यास आपल्याला किती अघोर अत्याचारास सामोरे जावे लागेल?
:) :) :)
धन्यवाद सर्वांना प्रतिक्रियांबद्दल! मजा आली.
मिपावरचं एक से एक दर्जेदार विनोदी लेखन एका नॉन मिपाकरास दाखवायचं म्हणून शोध (शोध नाहीच खरं तर, माहीत होतं कुणाचे धागे शोधायचेत) करायला बसलो. तुमच्या लेखनातून हा धागा काढला. आणि वेड्ड्ड्यासारखा हसतोय वाचून. टेक अ बो !
पिक्चरची इतकी भनाट विनोदी ओळख मला कुठेही वाचायला मिळालेली नाही तुमच्या लेखनाशिवाय.
कडक ! _/\_
ते जिंदगीच्या मजा घेण्याच्या प्रकरणातलं अपुर्वचे एकच अर्ग्युमेंट अगदी पहिल्यांपासुन पटलं अन डोक्यात बसलं होतं... हर चिज पे दाबाके रखते है इंडीयामे (आपली संस्कृती महान दुसरं काय...). सेक्स के नामपे भी दबाके रखते है सबको, लेकीन बच्चे पैदा करनेमे मात्र आप लोगोने वर्ल्ड रिकॉर्ड कायम किया है...
काय परिक्षण्...काय ढासु प्रतिसाद..
हसुन मेले.
-मयुरा.
अनकट व्हर्जन अजूनच भारी !
परदेस बद्दल काही चांगले -- परदेसच्या आधीचे सुभाष घईंचे खुप गाजावाजा / पुर्वप्रसिध्दी झालेले १,२ सिनेमे फ्लॉप झाले होते . त्यामुळे सुभाष घईंनी एक वेगळी खेळी म्हणुन परदेस हा खुप शांतपणे कसलाही गाजावाजा / पुर्वप्रसिध्दी न करता रिलीज केला . अचानक सिनेमाग्रुहात आलेल्या , चांगली स्टारकास्ट असलेल्या या सिनेमामुळे लोकांचे कुतुहल चाळवले गेले व त्यांनी हळुहळु चांगला प्रतिसाद दिला. मिडियानेही या शांत पद्धतीचे कौतुक केले . या सिनेमातील फोटोग्राफी हि अत्यंत उत्तम होती (भारत व अमेरिका दर्शन ) . कबीरलाल या नावाजलेल्या कॅमेरामनचे काम हे सर्वांनाच खुप आवडले. नेहमीचे लक्ष्मीकांत-प्यारेलाल हे संगीतकार न घेता , नदीम श्रवण यांचे संगीत दिले गेले . त्यामुळे सुभाष घईंच्या या सिनेमाला एक वेगळेपण आले. उत्तम गीत , संगीत , न्रुत्य याबरोबरच यातील गाण्यांचे चित्रिकरण हे खुप आधुनिक व चांगल्या प्रकारे केले गेले - ( ये दिल दिवाना , नही होना था , दो दिल मिल रहे है , जरा तसबीरसे तु ). सर्वात शेवट्च्या सीन मध्ये शाहरुख खानला मारहाण होते व त्याच्या नाका तोंडातुन रक्त वाहु लागते हे बघुन स्त्री वर्गाचीही सहानुभुती या सिनेमाला मिळाली . या सिनेमामुळे पालक आपल्या मुलीला अमेरिकेचे स्थळ आले तरी थोडे जागरुक राहु लागले .
धन्यवाद वेल्लाभट इथे संपादित करून दिल्याबद्दल.
लोकहो - प्रतिक्रियांबद्दल धन्यावाद. हा चित्रपट मधे एक दोन वेळा पुन्हा पाहिला तेव्हा सापडलेले नवीन 'मटेरियल' वरती अॅड केले आहे. आधी वाचलेल्यांना कळावे म्हणून ते बोल्ड अक्षरात आहे.
In reply to धन्यवाद by फारएन्ड
फुटलो हसुन हसुन
आता नविन लिहायला मनावर घ्या की
क लिवलय, क लिवलय.
हा चित्रपट सुरुवातीपासून शेवटपर्यंत नीटपणे एकदाही पाहिला नाही. बहुधा शेवट पाहिलाच नाहीये. आता एकदा निवांत बसून पाहतोच ;-) .
अ फा ट लिहिलंय. हहपुवा.
मजा आली वाचून.
फारेण्ड गुर्जी, साक्षात दंडवत स्वीकारावा.
एक शंका: दूध घेऊन जाण्याचा सीन शिणुमात लास वेगस च्या आधी आहे का नंतर ? परीक्षणात तो आधी आलाय, म्हणून इचारलं.
दुसरी शंका: ते दूध ती, नागालाच का नाही पाजत ? त्यामुळे तर भारतीय संस्कृती चा उर उचंबळून आला असता.
तक्रार: लोकांच्या ली फरमाईशी पेंडिंग आहेत. त्या कधी पूर्ण करणार ?
पिक्चर बघता का ऑडिट काढता बे???
एकेक पंच लैच बेक्कार.
परदेस च्या त्या lightboy ला पण लाज वाटेल आपण हे असलं बनवायला मदत केली म्हणून!
पिक्चर बघता का ऑडिट काढता बे???
एकेक पंच लैच बेक्कार.
परदेस च्या त्या lightboy ला पण लाज वाटेल आपण हे असलं बनवायला मदत केली म्हणून!
पिक्चर बघता का ऑडिट काढता बे???
एकेक पंच लैच बेक्कार.
परदेस च्या त्या lightboy ला पण लाज वाटेल आपण हे असलं बनवायला मदत केली म्हणून!
In reply to पिक्चर बघता का ऑडिट काढता बे? by प्यारे१
कृपया जास्तीचे प्रतिसाद उडवावेत(जुन्या किंवा नव्या सम्पादकांना आमच्याकडून मिळालेल्या या जास्तीच्या कामाबद्दल तहे दिल से माफी)
हसून हसून पोट दुखतय....
तुमचं परीक्षण वाचूनच सुभाष घईंच्या दिग्दर्शन कारकीर्दीचा दी एन्ड झाला बहुतेक!
काय १-१ पंचेस...
फुटलो वाचुन...
सुरुवात इथुन झाली...
अमरिश पुरी आता यापुढे या चित्रपटात पालकांच्या कौतुकमिश्रित नजरेने तिच्याकडे बघायचे आहे की व्हिलनच्या नजरेने हे एकदा 'मोड सेटिंग' करतो आहे असे वाटते.
:D :D झकास जबरी परीक्षण!
ओ दादा, तुम्ही परत लिहायला लागा ना अशी परीक्षण. full स्ट्रेसबस्टर आहे एकदम.
हा हा हा. तुमचं परीक्षण वाचून विकीवरचा प्लॉट वाचला. तो वाचतानाही हेच आठवून हसू येत होतं. (खरं तर तोही काहीसा उपरोधिक अंगाने लिहिलाय की काय अशी दाट शंका येतेय मला..)
हे परीक्षण पण भारीच आहे :=)
चांगला वाटलेला हो लहानपणी ! आता यामुळे कॉमेडी वाटतो आहे. सिम सिम पोला पोला लॉल
ती "वॉटरफ्रण्ट स्टेशन" वर दिसली हे त्याला कळते. जे व्हँकुव्हर मधे आहे, अंतर सुमारे १३०० मैल. आणि कॅनडात.
एक तांत्रिक माहिती
बरेच हॉलिवूड चे चित्रपट कॅनडात चित्रित होतात कारण स्वस्त पडते आणि काही शहरे अमेरिकेतील म्हणून खपू शकतात ! घई बाबानी पण बहुतेक तसेच केले असणार ! पण ते करताना हा घोळ घातला आणि तुमि लै माप काढली आणि आम्ही हसून फुटलो
🤣 🤣 🤣 🤣 🤣 🤣 🤣 🤣 🤣
परदेस रचती पाया नमस्ते लंडन कळस असे काहीसे आमचे मानणे असल्यामुळे, नमस्ते लंडन ह्या सिनेमावर एक उत्तम परीक्षण लिहावे ही विनंती सर. पंजाबात असेपर्यंत नॉर्मल असलेला अक्की बाबा इंग्लंडात गेल्याबरोबर केस लाल करून इंग्रज का होऊ पाहतो अन स्वतःच्या पत्नीच्या साखरपुड्याची तयारी कशी करतो त्यावर तुमच्या शैलीतले लेखन वाचायला आवडेल.
फारएन्ड शेठ, तुमचे लेख जेवताना वाचायचं म्हणजे रिस्की काम आहे...!! लय बेकार ठसका लागला हे वाचून :-))
कदाचित "हमारे संस्कृती मे पासपोर्ट नही पूछा करते..." वगैरे वाक्ये सुरू झाल्यावर इमिग्रेशन ऑफिसरने "नको नको, त्यापेक्षा तू जा" म्हणून स्वतःची सुटका करून घेतली असेल.
:-))
हे इतकं सगळं घडतं या