Skip to main content

गावोगावची गंमतीशीर ठिकाणे सांगा...

लेखक योगप्रभू यांनी सोमवार, 14/03/2011 20:51 या दिवशी प्रकाशित केले.
पु. लं नी पूर्वरंग या प्रवास वर्णनात थायलंडमधील जागोजागच्या बुद्धमूर्ती बघून एक टिप्पणी केलीय, की थायलंडमधल्या बुद्धदेवांना आमच्या पुण्यातल्या देवांइतकी लडिवाळ नावे ठेवलेली नाहीत. हे निरीक्षण खरोखर मजेशीर आहे. पुण्यात माती गणपती, मोदी गणपती, हत्ती गणपती, गुपचूप गणपती, भांग्या मारुती, पत्र्या मारुती, डुल्या मारुती, तांबडी जोगेश्वरी, पासोड्या विठोबा, निवडुंग्या विठोबा, खुन्या मुरलीधर अशी मजेशीर नावे आहेत. अशीच काही मजेशीर नावे गावोगावी आढळतात. नाशिकला दुतोंड्या मारुती आहे. नवशा गणपती आहे. बरं हे देवांपुरतेच मर्यादित नाही. 'डॉन ' चित्रपटात किशोरकुमारचे 'इ है बम्बई नगरिया' हे गाणे ऐकताना त्यातही काही मजेशीर उल्लेख आहेत. उदा: मुंबईत चर्चगेट भाग आहे, पण चर्चचा पत्ता नाही. पाणी नसलेला तलाव 'धोबी तलाव' म्हणून ओळखतात. कोल्हापुरात प्रवेशताना एक 'कावळा नाका' आहे. सातार्‍यात पूर्वी विठ्ठल मंदिरासमोर सार्वजनिक नळ होता. त्या स्टॉपला सातारकर अगदी आतापर्यंत 'विठोबाचा नळ' म्हणत. ऐकणार्‍याला हसू येई. सातार्‍यात एक 'वाघाची नळी' म्हणूनही भाग आहे. तर मिपाकरांना माझी नम्र विनंती. असेच गावोगावचे (अर्थातच आपापल्या) आणखी गंमतीशीर भाग सांगणार का? शक्य झाल्यास ते नाव कसे पडले, हेही सांगावे. (उदा : पुण्यात 'गुपचूप गणपती' आहे. म्हणजे हा गणपती गुपचूप बसलेला आहे म्हणून नाही, तर तो ज्या वाड्यात आहे त्याच्या मालकांचे नाव श्री. गुपचूप म्हणून.)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 43883
प्रतिक्रिया 197

प्रतिक्रिया

वांगणी - मुंबई-कसारा लाईनवरील स्टेशन. पूर्वीचे 'वैंगण'- ठाण्यामध्ये १९६५ मध्ये पाचपाखाडी भागात एका कंपनीच्या तलावात सापडलेल्या ताम्रपटात याचा उल्लेख आहे. शके ९६१ अर्थात इंग्रजी वर्ष १०६९ सालचा हा ताम्रपट आहे.

प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम मध्ये ठेवण्यात आलेल्या (ठाण्यात मिळाला होता) ताम्रपटाप्रमाणे (इ.स. १०६९) पहा हि नाव ओळखीची वाटतात का? अंबरवल्ली- अंबरनाथ? करहाटक - कर्जत? आसलग्राम- आसनगाव?

In reply to by सतीश कुडतरकर

करहाटक = कराड असे वाचल्याचे आठवते. शिलाहार राजाचा ताम्रपट आहे का तो?

सीमाभागात बरीचशी गमतीशीर नावे आहेत. नागोबाचे 'पांगीरे': अजून एक पांगीरे नावाचे गाव असल्यामुळे असे नाव आहे. उगम कशात आहे माहित नाही. दगडी शिप्पूर - निपाणीचा तवंदी घाट संपल्यानंतर आजरा/आंबोली रोड ला लागून आहे हे गाव. खूप सारे मोट्ठे दगड दिसतात म्हणून तसे नाव आहे का कल्पना नाही :) हसुरचंपू - बरीच 'हसूर' नावाची गावे जवळपास असल्याने ह्याचा उल्लेख 'चंपू-हसूर' असा सर्रास केला जातो. बेळगाव मध्ये एक प्रसिद्ध मंदिर आहे - 'मिलिट्री महादेव'. कदाचित मिलिटरीच्या एरियात असल्यामुळे असेल. कानडी च्या प्रभावामुळे असेल कदाचित, 'ळ' चा वापर खूप दिसतो: हेब्बाळ, जलद्याळ, मुत्नाळ, औरनाळ, खणदाळ, हाजगोळी, माद्याळ, जरळी, मुगळी, जैन्याळ(माझ्या माहितीप्रमाणे ह्या गावात जैन लोक नाहीत), करड्याळ, बोळावी, बाळेघोल (ही सर्व गावे कोल्हापूर जिल्ह्यात आहेत) निपाणीच्या स्टॅन्डवर जे विक्रेते असतात त्यांची आरोळी अशी असते - "शेंगा, भडंगा, चिप्सा, वेफर्सा…" :) यमक जुळवण्यासाठी 'आ'कार कंटिन्यू केला जातो! इथे 'पुलाव' चा उल्लेख पण 'पुलावा' असा केला जातो. माहित नाही का ते.

In reply to by लई भारी

ळ- अहो खुद्द कोल्हापूरात पण बरीच आहेत- रंकाळा, टाकाळा, नागाळा, पेटाळा, सिद्धाळा...इ.

In reply to by लई भारी

चला बेळग्गं..बेळग्गं, बेळग्गं..बेळग्गं, बेळग्गांवं.. ;) - बर्‍याच गावांची नावे 'ळ'ने संपतात, ती 'हळ्ळी' पासून तयार झालेली असतात. कन्नडमध्ये हळ्ळीचा अर्थ खेडेगाव असा होतो. उदा- मुत्नाळ. मुत्तीन हळ्ळी = मोत्यांचे गाव. (रच्याकने, चंबा मुतनाळ ऐकले असेलच की.) बेडकीहाळ (बेडकी+हळ्ळी), पडलीहाळ, नवलीहाळ, यरनाळ, गावनाळ, हनीमनाळ, सिदनाळ, -- कर्नाटकात (मोस्टली सीमाभागात) अशीही गावे आहेत. ही नावे "ऊरू" म्हणजे गाव पासून तयार झाली आहेत. . (आकड़ा- कन्नड़ उच्चार- गावाचे नाव) १ वंदू वंदूर/वन्नूर (वंदू + ऊरू = वंदूर) २ एरडू यडडूर ३ मुरु मुन्नूर ४ नालकु नांगनुर ५ ऎदु ऐनुरू/अण्णूर ६ आरु ? ७ येळू एळूर ८ एंटू ? ९ वंबत्तू ??

In reply to by यसवायजी

'हळ्ळी' ची माहिती वाचून ज्ञानात भर पडली :) पुढच्या वेळी जरा जास्त कळेल नाव ऐकल्यावर :)

In reply to by यसवायजी

मुतनाळ मागची ही व्युत्पत्ती ठाऊक नव्हती! सहीच. बाकी सीमाभागातलं माहिती नाय पण आरेकेरे म्हणून बेंगळूरूमध्ये एक भाग आहे.

In reply to by बॅटमॅन

"आरे" म्हणजे काय ते पहावे लागेल. केरे म्हणजे तलाव. एखादा तलाव नक्कीच असेल भागात.

अमरावतीत एका एरिया च नाव चक्क "नमुना" असे आहे, तिथे पत्ता सुद्धा "नमुना क्र.४" (गल्ली क्रमांक) वगैरे असतो, शहराच्या मध्यभागी असलेल्या टेकड़ी च नाव मालटेकड़ी असे आहे तर "भाजी मार्केट" नावाची एक आवासीय कॉलोनी सुद्धा आहे (नावांच्या उद्गमाबद्दल काहीही कल्पना नाही), अमरावतीत एक अतिशय प्रसिद्ध तिखट जाळ गिल्ली मिसळ (मिसळीचे वर्हड़ी वर्शन) व इतर नाश्ता विक्री करणारे एक प्रसिद्ध हॉटेल होते त्याचे नाव ते बेसमेंट ला असल्या कारणे "गड्डा" (हिंदी गड्ढा वरुन आलेले खड्डा चे समानार्थी वर्हाड़ी नाव) होते

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

'भाजी मार्केट' - कदाचित तुम्हाला भाजीबाजार या एरियाबाबत सांगायचे असावे. गिली मिसळ तर खाल्ली नाही पण जयस्तंभ चौकातले गिले बडे खाल्ले आहेत १५ वर्षांपूर्वी. अजुन चव तोंडावर आहे :-) . गड्ढा हॉटेलमध्येही खाल्ले आहे. बाकी नमुना एरिया साड्या व चादरींच्या होलसेल दुकानांसाठी प्रसिद्ध आहे. जवाहर गेटजवळ रंगारी गल्ली पण प्रसिद्ध आहे. जुन्या कपड्यांना नवे रंग देऊन मिळतात तिथे.

मारुती जेव्हा द्रोणागिरी घेऊन आकाशमार्गे लंकेस जात होता, तेव्हा त्या पर्वतावरील कनकवल्लि नामक वनस्पती खाली पडली. त्यावरून कणकवली हे नाव आले, ही कथा सदर गावात लोकप्रिय आहे. आता ती वनस्पती कोठे आहे, यावर संशोधन होणे आवश्यक आहे!