✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

२. भानावर येण्यापूर्वी

न
निरन्जनदास यांनी
Mon, 06/29/2015 - 16:22  ·  लेख
लेख
तत्त्वभान १. तत्त्वभानाच्या दिशेने
भानावर येण्यापूर्वी..
- श्रीनिवास हेमाडे      
'जाणीव म्हणजे काय?' हा तात्त्विक प्रश्न आहे. त्याचे तात्त्विक उत्तर शोधताना लक्षात येते की, जाणीव म्हणजे मनुष्याची ज्ञानशास्त्रीय चेतना, आत्मभान. ही अशी जाणीव मनुष्याकडे आहे म्हणून नीतिशास्त्र निर्माण होऊ शकते, 'योग म्हणजे चित्तवृत्तीनिरोधन'याचा अर्थ माणसांना कळू शकतो, धर्म- धर्माज्ञा आणि राज्यघटनाही निर्माण होऊ शकते..
'भान' म्हणजे सावधपण किंवा जाणीव होणे. आकलन, समजणे, शुद्ध येणे हे काही इतर समानार्थी शब्द. भान हा फारसा प्रचलित शब्द नाही. जाणीव हा मात्र अधिक वापरात असलेला शब्द आहे. जाणीव म्हणजे समजूत, ज्ञान.

या लेखात 'जाणीव' ही संज्ञा मराठीतील अथवा कोणत्याही भाषेतील विशिष्ट शब्द म्हणून नाही तर 'एक तात्त्विक संकल्पना' या अर्थाने आणली आहे. 'जाणीव म्हणजे काय?' हा तात्त्विक प्रश्न आहे. तिचे उत्तर मानसशास्त्र, मज्जातंतूशास्त्र इत्यादी विज्ञानशाखांकडून दिले जाते. धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्र तर हा स्वत:चा क्षेत्रसिद्ध अधिकार समजते. उदाहरणार्थ, जाणीव-राणीव-नेणीव किंवा बोध-अबोध मन, इत्यादी. पण तो अर्थ इथे अपेक्षित नाही. प्रश्न तात्त्विक असल्याने उत्तर तात्त्विक शोधण्याचा हा प्रयत्न आहे.

या विश्वाविषयी माणसाला अपार कुतूहल आहे. विश्वाचे निरीक्षण करताना माणसाला दोन गोष्टी ठळकपणे जाणवतात. काही गोष्टी निर्जीव आहेत, तर काही सजीव आहेत. जिवंत असणे ही सजीवता आणि जिवंत नसणे ही निर्जीवता.

माणूस, प्राणी हे सजीव तर दगड, धोंडा निर्जीव. सजीवता ही विशिष्ट घटना आहे. काही वेळा तिची मिसळण झाल्याचे वाटून निर्जीव वस्तूही सजीव असल्याचा भास होतो. रेडिओचा शोध लागला तेव्हा गाणारी बाई आत बसली आहे, यावर अनेकांचा विश्वास होता. रेल्वेचा शोध लागला त्या काळात सुरुवातीला 'हा माणसांना खाऊन टाकणारा राक्षस आहे', असे वाटून रेल्वे ओस पडली होती. वनस्पतींनाही सजीव मानले जाते, पाणी जिवंत समजले जाते. आज संगणकाला 'विचार करणारे यंत्र' हा दर्जा बहाल करण्यात आला आहे. यंत्रमानव, उपमानव या अत्याधुनिक; तर यक्ष, किन्नर या जीवयुक्त मानवाच्या प्राचीन कल्पना आहेत. वनस्पती सृष्टी, पाणी यांना सजीव मानल्यामुळे निसर्गही सजीव बनतो. एवढेच काय, पण अखिल ब्रह्मांडात पृथ्वी हाच एकमेव सजीव ग्रह मानला जातो.
या साऱ्या ठिकाणी सजीवतेचा अर्थ चेतना असणे असा समजला जातो. पण चेतना आणि जाणीव यात फरक करणे गरजेचे आहे. खुर्ची आणि खुर्चीत बसलेला माणूस यात फरक काय? खुर्ची जिवंत नाही, माणूस जिवंत आहे; माणसात चेतना आहे. चेतना ही काय गोष्ट आहे? ती देहाशिवाय स्वतंत्र असणारी की देहाशीच निगडित असणारी गोष्ट आहे? या चेतनेचे स्वरूप काय? बेशुद्ध माणूस आणि मृत माणूस यांच्यात चेतनाचे स्वरूप काय?

येथे चेतना (consciousness) आणि जाणीव (awareness) असा फरक शक्य आहे. मृतात चेतना नसते आणि बेशुद्ध माणसात चेतना असते, पण 'जाणीव' नसते. येथे मृताविषयी विचार करावयाचा नसून जिवंत माणसाविषयी विचार करावयाचा आहे. बेशुद्धावस्थेतील माणसातील चेतना ही 'जीवशास्त्रीय चेतना' आणि शुद्धीवर असलेल्या माणसातील चेतना ही 'ज्ञानशास्त्रीय चेतना' होय. या दुसऱ्या ज्ञानशास्त्रीय चेतनेलाच 'जाणीव' (awareness) म्हणता येईल.

आता, दुसऱ्या चेतनेबद्दल- ज्ञानशास्त्रीय जाणिवेबद्दल अधिक विचार करावा लागेल. बेशुद्धावस्थेत माणसाला कळत नसतेच, पण 'आपल्याला कळत आहे की नाही' हेही त्याला कळत नसते. म्हणून कळणे आणि आपल्याला कळणे, यात फरक करता येतो. या दुसऱ्या गोष्टीलाच बहुधा स्वजाणीव म्हटले जाते. अर्थात प्रत्येक वेळी 'आपल्याला कळत आहे' हे स्पष्टपणे कळलेच पाहिजे, असे नाही. काही वेळेला तरी 'आपल्याला कळत आहे' किंवा 'आपल्याला कळत नाही' हे त्याला नक्कीच कळत असते. हे दुसरे कळणे, हेच माणसाचे मुख्य सामथ्र्य आहे. ते ज्ञानाचे ज्ञान होय. स्वजाणिवेची जाणीव अशी पुढची पायरी असू शकते. .

माणसाची ही ज्ञानशास्त्रीय जाणीवच त्याला आत्मभान देते. 'मी' ज्ञान घेणारा ज्ञाता, ज्ञान निर्माण करणारा निर्माता आणि स्वत: 'मी'च ज्ञानाचा विषय असणारा विषयीही आहे, असे या आत्मभानाचे स्वरूप असते. ही ज्ञानशास्त्रीय जाणीव प्राण्यांमध्ये नसते. प्राणी आणि माणूस यांच्या आहार, निद्रा, भय, मथुन या प्रेरणा सारख्याच असतात. पण प्राण्यांना ज्ञानशास्त्रीय आत्मभान नसते.

काय कळते आहे, यात स्वत:ची जाणीव समाविष्ट असल्याने माणूस 'स्व'चा शोध घेतो. हा 'स्व' म्हणजे भाषिक पातळीवर ज्याला 'मी' म्हटले जाते ते आत्मभान असते. बुद्धिमान प्राणी ते भक्त किंवा 'मी ब्रह्म' हा आत्मभानाचा कल्पनाविस्तार असतो.

आत्मभानाची ही ज्ञानशास्त्रीय जाणीव कोणते मानवी कार्य घडवून आणते? ही जाणीव अनघड, भरड अशा निसर्गातून मानवी जगाची निर्मिती करण्याची प्रेरणा माणसाला देते. हे सामाजिक जग असते. पृथ्वी या खगोलशास्त्रीय जगावर सामाजिक जगाचे आरोपण होते. अन्न, वस्त्र, निवारा, संगीत, साहित्य, सौंदर्य, नीती, तत्त्वज्ञान, धर्म, विज्ञान, तंत्रज्ञान या मानवी निर्मिती रूपात आत्मभानाचे प्रकटीकरण घडते.

लक्षात हे घेतले पाहिजे की, रोज अन्नाची गरज असली तरी प्राणी पाकशास्त्र निर्माण करीत नाहीत, माणूस निर्माण करतो आणि माणूस पाकशास्त्र, कामशास्त्र निर्माण करतो तसा धर्मशास्त्र, धर्मग्रंथही निर्माण करतो. धर्माज्ञाही माणूसच निर्माण करतो, लिखित-अलिखित भाषा माणूसच निर्माण करतो. संयम बाळगण्याची क्षमताही 'माझी'च असते, हेही 'माझे'च भान आहे.

निर्मिती ही आत्मभानाचे आणि संयमाचे निदर्शक आहे, तसे त्या उलट संहार, विध्वंस हे बेभानाचे लक्षण आहे. खगोलीय जगाची निर्मिती आणि तिचा संहार 'मी' करीत नाही, ते 'माझ्या' पलीकडचे आहे; बेभान झालो की सामाजिक जगाचा संहारही 'मी'च करतो. तेव्हा न्याय-अन्याय, पोषण-शोषण, वर्ण-जात-जमात, छळछावण्या, युद्धे, शांतता या साऱ्या व्यवस्था मानवी ज्ञानशास्त्रीय जाणिवेचा आविष्कार आहेत.

आपल्या कृत्याची जाणीव असल्यानेच माणूस एखाद्या कृत्याकडे प्रवृत्त किंवा निवृत्त होतो. जाणिवेचा हा घटकच त्याला आत्मसंयम देतो. पतंजलींनी 'योग म्हणजे चित्तवृत्ती निरोध' असे म्हटले आहे. वनस्पतींमध्ये चित्त (चेतना) असते, प्राण्यांमध्ये चित्तवृत्ती (चेतना आणि विकार) असतात, पण नियंत्रण नसते. माणसात मात्र (चेतना आणि विकार आणि) नियंत्रण असते. ते 'निरोध' या शब्दाने व्यक्त होते. वनस्पतीबाबत निरोधाचा प्रश्न उद्भवत नाही आणि प्राण्यांना निरोधाचे भान नसते. 'निरोधनाचे' भान हे नीतीचे भान असते, ते केवळ माणसात असते. ज्या व्यक्तीत हे 'निरोध' सामथ्र्य विकसित होते, तो योगी, संन्यासी. बौद्ध विचारातही 'दु:खनिरोध' आढळतो, तो याच भानातून.

हे भान विकसित होणे आधुनिक लोकशाही धर्मासाठी अनिवार्य आहे. 'धृ' म्हणजे धारण करणे (धारयति इति धर्म:) म्हणून धर्म म्हणजे लोकधारणा करणारे तत्त्व. लोकशाही हा आजचा धर्म, 'युगधर्म' आहे. संविधान हीच माझी 'धर्माज्ञा' असते. लोकशाही हा अत्याधुनिक, व्यापक, मानवतावादी धर्म आहे. हा धर्म प्रत्येक माणसासह सर्व सजीवांच्या जगण्याचा मूलभूत हक्क बजावण्याची संधी देतो. संविधान ही 'धर्माज्ञा' ताठर, कठोर नाही, ती बदलता येते, दुरुस्त करता येते. नवा नीतीनियम करता येतो. कालबाह्य गोष्टी वगळून ही 'धर्माज्ञा' कालसुसंगत करता येते.

भानावर येण्यापूर्वी या रीतीचे आत्मभान आपण जागे करू शकलो तर आणखी काही गोष्टींचे भान विकसित करणे सहजी जमेल.

लोकसत्तेत ०७ जानेवारी २०१४ रोजी पूर्वप्रकाशित.

Book traversal links for २. भानावर येण्यापूर्वी

  • ‹ १. तत्त्वभानाच्या दिशेने
  • Up
  • तत्त्वभान ३. स्वजाणिवेचे पक्व रूप ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
सद्भावना
लेख
अनुभव
मत
वाद

प्रतिक्रिया द्या
26793 वाचन

💬 प्रतिसाद (70)

प्रतिक्रिया

और आन्दो. वाच्।तोय.

मितभाषी
Wed, 07/08/2015 - 13:49 नवीन
और आन्दो. वाच्।तोय. सन्क्शिप्त वाटले. मोठे भाग टाका.
  • Log in or register to post comments

हं

निरन्जनदास
Wed, 07/08/2015 - 16:15 नवीन
हं, आपण नावच मितभाषी घ्यायचं आणि लोकांना "और आन्दो" म्हणायचं ! मजा करताय राव तुम्ही!!
  • Log in or register to post comments

रचना आपण करतो. "आत्मभान"

मदनबाण
Wed, 07/08/2015 - 16:27 नवीन
रचना आपण करतो. "आत्मभान" आपल्याला असते. हे देहभान असे हवे ? "आत्मभान" हे आत्म्याशी आणि त्या अनुशंगाने परमेश्वराशी असते. मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Zara Zara... :- R H T D M
  • Log in or register to post comments

नाही

निरन्जनदास
Wed, 07/08/2015 - 16:56 नवीन
नाही, देहभान नाही. आत्म याचा अर्थ 'असण्याची जाणीव. याचा आत्म्याशी संबंध नाही. परमेश्वराशी तर नाहीच नाही. तुम्ही आधीचे लेख वाचले आहेत काय ? कृपया वाचा.
  • Log in or register to post comments

आत्म याचा अर्थ 'असण्याची

मदनबाण
गुरुवार, 07/09/2015 - 13:58 नवीन
आत्म याचा अर्थ 'असण्याची जाणीव. याचा आत्म्याशी संबंध नाही. असण्याची जाणीव हे चेतना (consciousness) असल्यामुळे संभव होते ना ? आत्म्या शरीरात असल्यानेच चेतनेचे अस्तिव असते आणि म्हणुनच मनुष्या देहातुन प्राण निघुन गेल्यावरच शरीर संपूर्णपणे अचेतन होते. त्यामुळे असण्याची जाणीव होण्याचा आणि आत्म्याचा संबंध आहे. तुम्ही आधीचे लेख वाचले आहेत काय ? हो... मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Kisi Disco Mein Jayen...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निरन्जनदास

फक्त जाणीव

निरन्जनदास
गुरुवार, 07/09/2015 - 16:29 नवीन
तुम्ही आत्मा आहेच, असे गृहीत धरत आहात. ते गृहीत न धरता चेतनेचे स्पष्टीकरण देता येते का ? हा प्रश्न आहे. पुढील काही लेखात तुमच्या शंकाची उत्तरे मिळू शकतील. थोडी वाट पहावी, ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

मानवेतरांना आत्मभान नाही हे

बॅटमॅन
Wed, 07/08/2015 - 17:07 नवीन
मानवेतरांना आत्मभान नाही हे तरी पूर्णतः सिद्ध कुठं झालंय? यावर कन्क्लूझिव्ह संशोधन माझ्या माहितीप्रमाणे अजून झालेलं नाही.
  • Log in or register to post comments

मानवेतरांना आत्मभान ?!

निरन्जनदास
गुरुवार, 07/09/2015 - 16:33 नवीन
यातला साधा प्रश्न असा आहे की मानवेतरांना आत्मभान आहे की नाही, हे तुम्ही मानव बोलत आहात, मानवेतर नाही. तुमच्या आत्मभानाबद्दल मानवेतर बोलत आहेत का ? नाही ! आत्मभान = ज्ञानात्मक जाणीव हे विसरलो की गडबड होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

तुमच्या आत्मभानाबद्दल मानवेतर

बॅटमॅन
गुरुवार, 07/09/2015 - 16:43 नवीन
तुमच्या आत्मभानाबद्दल मानवेतर बोलत आहेत का ? नाही !
हाउ डू यू नो की ते बोलत नाहीत? मानवेतर सजीवांचे आपसातले जे काही संभाषण/संपर्क साधण्याची पद्धत असते ते मानवाला पूर्णपणे समजले आहे का? जर नसेल तर निव्वळ मानवाला कळत नाही म्हणून काही नाही असे म्हणण्यापैकीच आहे. हा तर मानवकेंद्रित दृष्टिकोन झाला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निरन्जनदास

निव्वळ मानवाला कळत नाही

संदीप डांगे
गुरुवार, 07/09/2015 - 17:03 नवीन
निव्वळ मानवाला कळत नाही म्हणून काही नाही तथाकथित बुद्धीवाद्यांचा असाच दावा असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

आत्मभान = ज्ञानात्मक जाणीव

संदीप डांगे
गुरुवार, 07/09/2015 - 17:06 नवीन
आत्मभान = ज्ञानात्मक जाणीव मानवेतर प्राण्यांना एखाद्या कृतीत धोका आहे हे कळलं तर ते परत तीच चूक करतांना दिसत नाहीत. ही ज्ञानात्मक जाणीव नाही का? मानव अशा चुका वारंवार करतांना दिसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निरन्जनदास

सहमत.

संदीप डांगे
गुरुवार, 07/09/2015 - 16:43 नवीन
सहमत. फक्त मनुष्याला आत्मभान आहे याच्या पुष्ट्यर्थ लेखकांनी दिलेले स्पष्टीकरण पुरेसे नाही. कदाचित मनुष्य ज्या उलाढाली आज करतोय ते पाहून इतर प्राणी मनातल्या मनात हसतही असतील आणि म्हणत असतील की "बाबारे, हे सगळे उद्योग करून झालेत आमचे. शेवटी चार मूळ भावनांपलिकडे काहीच नाही हे आम्हाला कळलंय. म्हणून शांतपणे जगत असतो. सगळे निसर्गनियम व्यवस्थित पाळून. तूच अशांत आहेस कारण तू जस्ट अभीच आया है ज्युनिअर..." आता म्हणा ह्याला काही पुरावा आहे काय? तर असं नाहीये ह्यालाही काही पुरावा नाहीये. मानव स्वतःला सर्वश्रेष्ठ मानत आलाय ते मला कायमच डोक्यात गेलेलं आहे. अरे चार मूळ भावना नियंत्रित करू शकत नाही तो कसा काय सर्वश्रेष्ठ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

काही टिपण्या माझ्याही...

गामा पैलवान
गुरुवार, 07/09/2015 - 20:09 नवीन
निरन्जनदास, आपला लेख व संदेश वाचले. काही विधानांवर चर्चा करेन म्हणतो. १. >> पूर्वमीमांसा या संप्रदायाने ज्ञान अपौरुषेय मानले, त्यावर मूठभरांची मिरास आणली, वेद्वाक्ये सत्य व युक्त >> समजून ज्ञानवंचित समाज निर्माण केला ! पटलं नाही. हा दावा खरा असेल तर भक्तीमार्गी संत सगळ्या सर्वदेशी, सर्वकाळी, सर्वलिंगी, सर्वजात, सर्ववयीन कसे आढळून येतात? ते एका मूठभरांच्या गटात दाखल व्हायला हवेत ना? भक्तिमार्ग वेदविरोधी नाही. २. >> लोकशाही हा आजचा धर्म, 'युगधर्म' आहे. संविधान हीच माझी 'धर्माज्ञा' असते. लोकशाही हा अत्याधुनिक, >> व्यापक, मानवतावादी धर्म आहे. हा धर्म प्रत्येक माणसासह सर्व सजीवांच्या जगण्याचा मूलभूत हक्क बजावण्याची >> संधी देतो. संविधान ही 'धर्माज्ञा' ताठर, कठोर नाही, ती बदलता येते, दुरुस्त करता येते. नवा नीतीनियम करता >> येतो. कालबाह्य गोष्टी वगळून ही 'धर्माज्ञा' कालसुसंगत करता येते. असहमत. भारतीय राज्यघटनेत सामान्य नागरिकांना मार्गदर्शन करणारे काहीही नाही. अपवाद करायचाच झाला तर फक्त ५१ व्या कलमाचा किंचित प्रमाणावर करता येईल. त्यात नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांकडे ढोबळमानाने निर्देश आहे. भारतीय जनमानसास अधिकारांपेक्षा कर्तव्यपूर्ती अधिक महत्वाची वाटते. त्यामुळे उपरोक्त विधान भारताच्या संदर्भात निरर्थक आहे. ३. >> निसर्ग रचना करीत नाहीत, निसर्गात केवळ घटना घडतात. त्यांचा आपण अर्थ लावीत असतो. हे फार धाडसी विधान आहे. सूर्य पृथ्वीपासून १०८ सौरव्यास दूर आहे, तर चंद्र पृथ्वीपासून १०८ चांद्रव्यास दूर आहे. त्यामुळे खग्रास सूर्य्ग्रहानाच्या वेळेस चंद्रबिंब सूर्यबिंबास अचूकपणे झाकतं. आता हे इतकं प्रमाण आपोआप उत्पन्न झालं का? पृथ्वीवरील वातावरणात प्राणवायूचं प्रमाण २०% आहे. ते जरासं वाढून २२% झालं तर वनस्पती उत्स्फूर्तपणे पेट घेतील. हे प्रमाण निसर्गत: आढळून येतं. हेही आपोआप झालं का? या घटनांचा अर्थ काय लावायचा? निसर्ग रचना करतो आहे की नाहीये? ईश्वराने सृष्टी (=निसर्ग) उत्पन्न केली असा लावावा का? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

माणसाला आत्मभान आहे का?

गामा पैलवान
Sat, 07/11/2015 - 18:16 नवीन
निरन्जनदास, >> त्यात कर्त्याला म्हणजे निसर्गाला "आत्मभान" नाही. त्यामुळे त्याला तो काय करीत आहे, हे कळत नाही. एक शंका आहे. मी जे खातो तो आहार माझं शरीर माझी परवानगी न घेता पचवून टाकतं. अन्नपचन ही एक नैसर्गिक क्रिया आहे, बरोबर? ती जिथे होत असते त्या शरीर नामे पिशवीला त्या क्रियेचं भान नाहीये. म्हणजेच मला आत्मभान असलं तरी माझ्या शरीराला मात्र आत्मभान नाही. तर मग मी माझ्या शरीराहून वेगळा मानावा का? तुमची मते ऐकायला आवडतील. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

भूतदयावाद

निरन्जनदास
Mon, 07/13/2015 - 16:24 नवीन
बॅटमॅन आणि संदीप मित्रहो, तुमच्या चर्चेतून सिद्ध होणारी एकच गोष्ट आहे की तुम्ही भूतदयावादी आहात ? तुम्हाला प्राण्यांची काळजी आहे. प्राण्यांच्या वतीने तुम्ही बुद्धिमान मनुष्यप्राणी बोलत आहात. तुमचे दावे 'बोलाची कधी बोलाचाच भात' असे होत आहे. तुमच्याशी स्वतःच्या भावना बोलणारा प्राणी भेटला तर मी त्यास भेटण्यास उत्सुक आहे. तथाकथित, अकथित, कथित, थकीत इत्यादी बुद्धिवाद्याचे सारे प्रकार केवळ माणसाचेच असतात, प्राण्यांचे नाही. अन्न, पाणी आणि लिंगभाव या खेरीज प्राण्यांना जास्त काही नसते. आता, प्राण्यांनाच थेट माझ्याशी बोलू द्या . मग आपण बोलू.
  • Log in or register to post comments

अन्न, पाणी आणि लिंगभाव या

संदीप डांगे
Mon, 07/13/2015 - 16:52 नवीन
अन्न, पाणी आणि लिंगभाव या खेरीज प्राण्यांना जास्त काही नसते. मानवाप्राण्याचा सर्वात मोठा भ्रम तो हाच. आहारनिद्राभयमैथूनच्या पलिकडेही अनेक प्राणी अनेक भावना दाखवतात. माणसांपेक्षा प्राण्यांचे भवतालच्या निसर्गाबद्दलचे ज्ञान कैक पटीने जास्त असते. (भूकंप व सुनामी यापुर्वीचे प्राण्यांचे व्यवहार, योग्य मार्ग शोधत आपल्या मूळ ठिकाणी परतणे, इत्यादी.) प्रत्येक पक्षी-प्राण्याची स्वत:ची एक भाषा असते हे तरी तुम्ही मान्य कराल की नाही? त्यांची भाषा आपल्याला कळत नाही म्हणून त्यांना कसलेच ज्ञान नाही असे म्हणणे ही आत्मप्रौढी झाली. एखादा आदीवासी भले आपल्यासारखी चार बुकं शिकला नसेल पण त्याच्याकडे आपल्यापेक्षा वेगळे ज्ञान खचितच असेल आणि ते आपल्या चार बुकांपेक्षा जास्त मौल्यवान असेल. आपण ज्याप्रकारे व्यवहार करतो तसे व्यवहार न करणार्‍यांना गावंढळ व आडाणी समजणे हे स्वतःला आधुनिक समजणार्‍या माणसाच्या अहंकाराचे प्रथम लक्षण आहे. ज्या पद्धतीने पाश्चात्त्य देशातील पांढर्‍या लोकांना आफ्रीकी वंशाचे लोक हे आपल्याच मनुष्यवंशाचे वाटतच नव्हते, त्याप्रमाणेच इतर श्वापद ही चार भावनांपलिकडे काहीच राखत नाहीत असे मानणे आहे. प्राण्यांनी तुमच्याशी बोलले तरच तुम्हाला त्यांचे काय ज्ञान आहे/नाही हे समजेल असं तुमचं म्हणणं विचित्र आहे असे नम्रपणे नमूद करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निरन्जनदास

+1

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 07/13/2015 - 17:10 नवीन
डांगे सरांचे म्हणणे बरोबर वाटते. विशेषत: प्राणी ज्या शांतपणे मृत्यू ला सामोरे जातात ती शक्ती मिळवण्या साठी मनुष्याला अपार कष्ट करावे लागतात. अजूनहि बरीच उदाहरणे देता येतील मनुष्य हा प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ आहे हा दावा मान्य करता येणार नाही. पैजाराबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

धन्यवाद पैजारबुवा,

संदीप डांगे
Mon, 07/13/2015 - 17:25 नवीन
धन्यवाद पैजारबुवा, मनुष्याने स्वतःच स्वतःला श्रेष्ठ ठरवून, निसर्गापासून वेगळा ठरवून निसर्गातून आपसूक मिळणार्‍या मौल्यवान ज्ञानाला दरवाजे बंद केलेत असं कधी कधी वाटतं. माणसाने आजवर जी काही प्रगती, विकास केलाय तो निसर्गाचेच निरिक्षण करून/त्याची कॉपी मारून केलाय. इतर प्राण्यांना तसे करण्याची काही आवश्यकता वाटली नसावी कारण उपजतच त्यांना मनुष्यापेक्षा जास्त क्षमता निसर्गाने बहाल केल्या आहेत. त्यांचे जगणे मनुष्यप्राण्यापेक्षा नक्कीच मजेदार आहे असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

खालिल वाक्ये आजच्या लोकसत्ता

मराठी_माणूस
Mon, 07/13/2015 - 17:11 नवीन
खालिल वाक्ये आजच्या लोकसत्ता मधील ह्या लेखातील आहेत http://www.loksatta.com/sampadkiya-news/humans-forefathers-1122407/.
टाचणीच्या टोकाएवढा मेंदू असलेली मधमाशी, सांकेतिक नाचातून इतर मधमाशांशी कामापुरता संवाद साधू शकते. कुत्र्याचे घ्राणेंद्रिय माणसाच्या घ्राणेंद्रियाहून अनेक पट सक्षम आहे. माणूस फक्त विशिष्ट कंपनसंख्येचे ध्वनी ऐकू शकतो. वटवाघळाची ही क्षमता माणसापेक्षा किती तरीपट जास्त आहे
  • Log in or register to post comments

चुकीची तुलना

निरन्जनदास
Mon, 07/13/2015 - 20:55 नवीन
माफ करा, पुन्हा तीच चूक घडते आहे. प्राण्यांना भावना आहेत आणि त्यांना भाषा आहे, म्हणून त्यांना संस्कृती निर्माण करता येते, असे नाही. माणसाने संस्कृती निर्माण केली, धर्म, तंत्रज्ञान तत्त्वज्ञान आणि कितीएक विज्ञाने निर्माण केली. साधी गोष्ट सौंदर्यशास्त्र हा भावनांचा आविष्कार आहे आणि भाषाशास्त्र, अर्थनिर्धारणशास्त्र इत्यादी भाषेचे. प्राणी हे करू शकत नाहीत. 'प्रत्येक पक्षी-प्राण्याची स्वत:ची एक भाषा असते' हे विधान वैज्ञानिकदृष्ट्या अवैध आहे. तुम्ही 'प्राण्यांना संवादाची एक त्यांच्यापुरती पद्धती असते' असे म्हणू शकता फार तर. आता, तुम्ही जर असे म्हणाल की त्यांच्यातही ते असतेच, तर बोलणेच खुंटले !! दुसरे, तुम्ही आदिवासी मध्येच कुठून आणले ? ती माणसे आहेत, त्यांच्यात बुद्धिमत्ता आहे. ते विविध प्रकारे व्यक्त करतात, त्यांना कमी लेखणे चूकच आहे. हे, पहा, आपण काय पाहत आहोत; तर एकूण प्राणी जगतात माणूस हा प्राणी वेगळा कसा, का आहे ते ! (त्यात जगातले सगळे आदिवासी येतात ) माणसचे वैशिष्ट्य : बुद्धी, आत्मभान आणि करुणा. हे प्राण्यात नसते, हे कृपया लक्षात घ्या. ते अविकसित आहेत. आजचा सर्वात प्रगत प्राणी केवळ मनुष्य. आता, मराठी माणसाने काय लक्षात घ्यावे ; तर ते हे की पशु-पक्ष्यांना माणसापेक्षा जास्त तीव्र इंद्रिय असेलही. पण माणूस इंद्रियांच्या दृष्टीने पाहता अतिशय मर्यादित आहे. म्हणूनच त्याने इंद्रियांचा विस्तार केला. जसे कि हातोडा हा हाताचा विस्तार आहे, दुर्बीण हा डोळ्याचा , फोन-मोबाईल हा कानाचा इत्यादी. असा विस्तार प्राणी करू शकले का ? विज्ञान-तंत्रज्ञान (इंटरनेट मानवी आहे. प्राणिज नाही. ) हा मानवी ज्ञानाचा, त्याच्या अनंत मर्यादांचा विस्तार आहे. माणूस आपल्या मर्यादांवर मात करण्याचा प्रयत्न करतो. 'मधमाशांशी कामापुरता संवाद साधू शकते' पण कामापुराताच, माणूस बिनकामाचे किती फालतू संवाद करतो ! किती रद्दी निर्माण करतो? शेवटचा मुद्दा प्राणी माझ्याशी बोलले तर त्यांना माझ्या भाषेतच बोलावे लागेल. मी त्यांच्या भाषेत कसा बोलणार? विनोद म्हणून ची ची चू चू ठीक आहे. अर्थात तो विनोदही आपणच करतो. प्राण्याची भाषा ही म्हणजे प्राण्यांची संवादाची रीत त्यांची त्यांच्यापुरती खासगी असते. आणि भाषा खासगी नसते. कोणतीही भाषा जर ती भाषा असेल तर ती सार्वजनिकच असते. म्हणूनच कोणत्याही माणसाला - मराठी माणूस - धरून कोणतीही भाषा शिकता येते. एकजण दुसऱ्याची भाषा शिकू शकतो. प्राणी माणसाची भाषा शिकत नाहीत. ते ध्वनी ओळखतात. आता, कृपया तिन्ही लेख आपण प्रत्येकांनी एकामागे एक असे वाचावेत, सुटे वाचू नयेत. शक्य तो प्रिंट काढून समोर ठेऊन वाचावेत. ही विंनती. आता, आपण पुढील लेखाकडे जाऊ.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा