Skip to main content

रिटर्न गिफ्ट

लेखक रातराणी यांनी रविवार, 28/06/2015 या दिवशी प्रकाशित केले.
आज तोही आला होता त्याच्या आईबरोबर. ठिगळ लावलेला शर्ट आणि मळकी पँट. हॉलमधे एका कोपऱ्यात त्याला बसायची तंबी देवून आई गेली कामाला. इकडेतिकडे भिरभिरनारी नजर त्याची शेवटी बुकशेल्फवर स्थिरावली. मान वाकडी तिकड़ी करून तो पुस्तकांची नाव वाचू लागला. इतका वेळ डायनिंग टेबलवर बसून त्याला न्याहळीत असलेल्या तिला आता खुदकन हसु आलं. "काय रे, कितवीत आहेस?" चपापुन त्यानं उत्तर दिलं.."सहावीत" "पुस्तक वाचणार?" त्याला विचारत ती बुकशेल्फ जवळ गेली. आशाळभूत नजरेनं बघणार्या त्याला एक पुस्तक हातात घेऊन तिनं खुणेनच विचारलं, "हे?" उत्तरादाखल त्यानं मान हलवली आणि हातात पुस्तक येताच जणु काही जगातली सर्वात सुंदर वस्तु मिळाल्यासारखा त्याचा चेहरा खुलला. आईच काम झाल्यावर बाहेर आली तसं त्यानं उठून पुस्तक टेबलवर ठेवलं. "घेऊन जा, वाचून झाल की दे परत." ती म्हणाली. उत्तरादाखल त्यानं नाही म्हणून मान हलवली. ती का रे म्हणेपर्यंत तो आईबरोबर बाहेर गेला देखील. आवडलं नसेल मनाशी म्हणत तिने पुस्तक परत जागच्या जागी ठेवलं.चला त्यानिमित्त तुला हात तरी लागला. एक हात पुस्तकांवर फिरवून ती तिच्या कामात गुंग झाली. नंतर तो पुन्हा पुन्हा येत राहिला. तिनं आता त्याला हवं ते पुस्तक घ्यायची परवानगी दिली. वाचलेलं कळल नाही की तो तिला विचारू लागला. त्याला समजून सांगायला तीही पुन्हा वाचायला लागली. पंधरा दिवसांवर आला तिच्या दर्शनचा वाढदिवस तशी ती तयारीत रमली. त्यादिवशी सगळे खरेदिला बाहेर गेले तेव्हा तिने विषय काढला " ए यावर्षी बुक सेट देवुया का रिटर्न गिफ्ट?" "What? no way mamma! पुस्तक काय आम्हाला कमी आहेत का वाचायला? ऑलरेडी इतका होमवर्क असतो. That will be so uncool!" "Uncool? असाही शब्द आहे? मला not cool माहिती होता. so funny! " " Mamma you are unbelievable! एनीवे पुस्तकं नकोच आपण तो नवीन गेम आलाय ना तोच देवुया रिटर्न गिफ्ट. माझ्या सगळ्या फ्रेंडस कडे ps3 आहे." तिची बाजू घ्यावी म्हणून तिनं नवऱ्याकडे एक करूण कटाक्ष टाकला. त्याने नुसतेच खांदे उडवून पुन्हा फोन मधे डोकं खुपसलं. मित्रांना रिटर्न गिफ्टच्या आडून दर्शनने त्याला गिफ्ट काय हवं हे ही सांगितलच. मोठ्या धूमधडाक्यात बडे झाला. त्यालाही बोलावलं होतच तिने. केक कापला. सगळ्यांनी गिफ्ट दिले. दर्शन आणि त्याचे मित्र दर्शनचा नवा ps3 सेट करण्यात बिजी झाले. तो लांबूनच सगळ पहात होता. त्याची आई कामात होती. त्याची चुळबूळ तिच्या लक्षात आली तशी तिनं एका प्लेटमधे केक घेऊन त्याला दिला. हॉलच्या एका कोपऱ्यात त्यानं तो शांत बसून संपवला. आईला अजून काम होतं म्हणून तो तसाच गुडघ्यावर उजव्या हाताचं कोपर टेकवुन तळहात गालावर ठेवून आईची वाट पहात बसला. तिचं लक्ष गेलं तसं तिनं एक छान चमचमत्या कागदात गुंडाळलेलं रिबीन नी बांधलेलं पूडक त्याच्यासमोर धरलं. तो काही हात पुढे करेना म्हणल्यावर तिनेच त्याचा हात हातात घेऊन ते त्याच्या हातावर ठेवलं आणि म्हणाली,"अरे तुझ्यासाठीच आणलय हे. काही म्हणत नाही आई. मी सांगते." त्याचे डोळे चमकले. हसत हसत त्याने शिस्तीत आधी रिबीन सोडली. मग तो चमचमनारा कागद काढला. आतल्या नव्याकोर्या पुस्तकाच्या कव्हरवर हात फिरवला आणि पहिलं पान उघडून त्यानं ते पुस्तक नाकाजवळ नेलं. खोल श्वास घेतला. ती तिथेच उभी होती. त्यानं वर बघून छान हसला आणि म्हणाला, " thank you!" डोळ्यातलं पाणी मागे सारून ती पुन्हा पाहुन्याच्या सरबराइत मग्न झाली. रात्री उशीरा सगळी मुलं आप आपलं रिटर्न गिफ्ट घेऊन, cool party dude म्हणून घरी परत गेली. त्याच्याही आईने सगळं आवरुन आता येते म्हणाली तशी त्याने पुस्तकांतून डोकं वर काढून पुन्हा ते होतं तसं कागदात गुंडाळल. रिबीन लावली आणि परत तिला देवू लागला. ती म्हणाली, " बाई अहो, त्याच्यासाठी आणलीत ती पुस्तकं. तुम्ही म्हणा बरं असू दे." तशी त्याची आई म्हणाली, " काय सांगू ताई, चार रोज़ झाले घर लय गळतय. नवा पत्रा लागसत्वर आमी समोरच्या दुकानाच्या आडोश्याला झोपतुया. पाऊस आला की पुस्तक भिजल म्हणून पोर रातभर झोपनार नाय. आमचा पत्रा लावून झाला की मी नेते तुमच्याकडण.असू द्या तवर इथंच." जड मनानी तिनं पुस्तक त्याच्याकडून घेतलं. आलेला हुंदका मागे सारून बरं म्हणाली. दार बंद करून अस्ताव्यस्त पडलेल्या गिफ्ट रॅप च्या पसार्यातुन ps3 चा रिमोट हातातच घेऊन झोपलेल्या दर्शनच्या कपाळावर तिनी ओठ टेकवले. कितीतरी वेळ त्याला कुरुवाळत ती बसून राहिली. एकच विचार तिला खात होता, कामवालीच गळनार घर दुरुस्तही होईल पण आपल हे न दिसता गळनार घर कसं दुरुस्त करायच?
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 6410
प्रतिक्रिया 49

प्रतिक्रिया

मस्त..असे म्हणवत नाही ये..पण तुमची लिखाण शैली एकदम उत्तम..!! फार विचार करायला लावणारी गोष्ट..

छान !

पुस्तकांकडे आशाळभूत नजरेने पहाणारी मुले दुर्मिळ झालीत.

समाजात नेहमीच हे एक टोक आणि ते एक टोक असतं. :( -दिलीप बिरुटे

छान कथा.. पण हे
आपल हे न दिसता गळनार घर कसं दुरुस्त करायच?
हे का ते कळलं नाही.. म्हणजे मलापण पुस्तकं वाचायला आवडतं, पण म्हणून पुस्तके न वाचणं, म्हणजे खरंच खंतावण्यासारखी गोष्ट आहे का? की हा 'मटेरीअलिझ्म' वगैरेवर केलेला शेरा आहे?

In reply to by चिगो

एकच विचार तिला खात होता, कामवालीच गळनारं घर कधी दुरुस्तही होईल ? इथेच ही कथा संपायला हवी होती. खंतावण्याची गोष्ट नव्हतीच ती...असो. अवांतर प्रतिसादामुळे लेखिका नाराज होणार नाही, असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अवांतर प्रतिसादामुळे लेखिका नाराज होणार नाही, असे वाटते. >> अजून मी बिगरीतच आहे सर :) नाराज काय व्हायचं?

In reply to by चिगो

मटेरीअलिझ्म! पुस्तकाच्या निमित्त जसा त्याच्याशी संवाद होतोय तसा संवाद तिला वाटतंय आपल्या मुलाशिही व्हावा, पण सगळं त्याला हवं तसं करूनही शेवटी एक thank you देखील वाट्याला न आल्याने ती आतल्या आत रडतीये - हे तिचं घर गळण.

In reply to by रातराणी

ओहो.. असं आहे होय. सॉरी हं! म्हणजे काय आहे की मला खरंच सुचक गोष्टी फार कळत नाही. त्याबाबतीत पारच मद्दड आहे मी. आता शेवट कळला आणि पटला पण.. (संवेदनशुष्क) चिगो

In reply to by रातराणी

सगळं त्याला हवं तसं करूनही शेवटी एक thank you देखील वाट्याला न आल्याने ती आतल्या आत रडतीये - हे तिचं घर गळण. मुलं आईला thank you म्हणतात ? तो कामवालीचा मुलगा तुम्हाला thank you म्हणाला कारण तुम्ही त्याच्या दृष्टीने त्याच्या आईच्या एम्प्लॉयरअया अर्थाने कुणीतरी मोठी व्यक्ती आहात. तो मुलगा कितीही गुणी असला तरी त्याच्या स्वतःच्या आईला thank you म्हणत असेल असे वाटत नाही. थोडक्यात कथेतल्या आईने खंतावुन जाउ नये असे वाटते. तुमची कथा छान जमुन आलीये, आवडली.

In reply to by रातराणी

मनाला भिडणार लिहताहेत, अजुन येऊ द्या... पण गळनार घर कसं दुरुस्त करायच? हे खटकलेच... पहिले तर मला हे PS3 बद्दल आहे असे वाटले.. गेमचे पण क्रेज असते हो त्या वयात.. माझ्याकडे भरपुर पुस्तके होती, पण आई ने कधी गेम घेऊन दिला नाही, म्हणून दुस-याच्या प्ले-स्टेशन कडे आशाळभूत नजतेने बघत दिवस काढलेले... आणि प्रत्येक व्हीडिओ गेम वाइट नसतो आयांना वाटतो तसा.. जेव्हढे चांगले रिसोर्स मॅनेजमेंट “Age of Empires” ने शिकवलेय, तेव्हडे पुस्तकात शिकणे अवघड आहे... तुमचे Thank You चे स्पष्टीकरण तर अजिबात पटले नाही.. कोणती आई मुलांसाठी ही अपेक्षा ठेवते ? म्हणूनच तर आईला श्रेष्ठत्व प्राप्त झालेय ना...आणि मुंलाना ते आज ना उद्या ध्यानात येणारच आहे.. कथेतल्या मुलासाठी आई हे सर्व करणारच हे ग्रुहीत आहे.. जेव्हा अनपेक्षित मिळाले तेव्हाच असतो Thank You.. :) हा बाकी तिच्या नव-याने Thank You म्हणायला हरकत नाही... :) For the Cool Party !

गोष्ट आवडली पण शेवटचा सूचकपणा किंचित फार फेच्ड वाटला.
एकच विचार तिला खात होता, कामवालीच गळनार घर दुरुस्तही होईल पण आपल हे न दिसता गळनार घर कसं दुरुस्त करायच?
हे वाक्य इतके पटले नाही, पण तुमची लेखनशैली छान आहे. अजून लिहा :)

दर्शनला पुस्तकाची आवड नाही हि खंत नसून दुसरे काही तरी अभिप्रेत असावे लेखिकेला …. हे आपले माझे मत हं ….

आहे. आणि अचूक समेवर संपवली आहे.

कथा आवडली.पटली भावली.सुदैवाने माझी मुलगी पुस्तक प्रेमी आहे..अन्यथा मलाही लेखाच्या शेवटाची फिलींग आली असती..शेवटही आवडला.पटला.भावला.

कथा म्हणून आवडली पैजारबुवा,

सर्वांचे आभार :) काहींना शेवट आवडला, काहींना नाही.पण तरीही कथा म्हणून आवडली असे सगळे म्हणत आहेत हेही खुप आहे. एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा द्रुष्टीकोन प्रत्येकाचा वेगळा असू शकतो, मला वाटतं आधी इतक्या वेळा कानावर पडलेल्या या गोष्टीचा खरा अर्थ,महत्व मला आता कळू लागलंय. सगळ्यांच्या प्रतिक्रिया काही न काही शिकवत आहेत. पण जे आतून वाटलं तेच लिहले त्यामुळे मला तरी आता खोदुन खोदुन विचार करून काहीतरी लिहल्यावर जे content फीलिंग येत ते नाही घालवायच. पुढची कथा अजून चांगली लिहायचा प्रयत्न करेन. ती नाही जमली तर त्याच्या पुढची :) (सोडते की काय अशी तुम्हाला)

छान लिहिलंय ..
एकच विचार तिला खात होता, कामवालीच गळनार घर दुरुस्तही होईल पण आपल हे न दिसता गळनार घर कसं दुरुस्त करायच?
या वाक्यासाठी टाळ्या....

छान लिहिलय. व्हिडीयो गेम हा प्रकार आयुष्यात खूप उशिरा आला त्यामुळे वाचनाची गोडी लागली हे विसरु शकत नाही. दूसरे म्हणजे एकदा वाचनाची गोडी लागल्यावर व्हिडीयो गेम ने सुद्धा ती कमी नाही झाली. आता किमान ५-७ वर्षे झाली व्हिडीय्प गेम किंवा कंप्युटर गेम खेळुन. पुस्तकांचे व्यसन मात्र अजुन सुटलेले नाही. पुस्तकांनी जितके भरभरुन दिले तितके व्हिडीयो गेम्स मधुन नक्कीच नाही मिळाले. निर्भेळ आनंद मात्र दोन्हीतही सारखाच,

जुनी पिढी पुस्तकांवर वाढलेली होती. त्यामुळे तो पुस्तकप्रेमी मुलगा त्याना आपला वाटला. त्यांचा स्वतःचा मुलगा वेगळ्या जनरेशनचा असल्याने त्याची पुस्तकाबाबतची नावड पाहुन त्याना वाइइट वाटलं

उगाच अलंकारीक शेवट करायच्या प्रयत्नात शेवटपर्यंत चांगला असलेला लेख 'धट्टी कट्टी गरीबी की लुळी पांगळी श्रीमंती' च्या मार्गाने गेला. शेवटचे वाक्य फारच दवणीय होते.

अशा लेखनाखाली जालावर "दवणीय" वा सिमिलर कॉमेंट्स येणारच याची खात्री ठेवलेली असली, तरीही, रिसेंटली वाचलेला एक व्हॉट्सॅप फॉर्वर्ड इथे टंकायचा मोह आवरता येत नाही. अ : तुझे हॉबीज काय? ब : वाचन. अ : वा! काय वाचतो(ते)स? ब : व्हॉट्सॅप फॉर्वर्ड्स. आजकाल बहुतेक लोकांची अशीच हास्यास्पद परिस्थिती आहे. 'पुस्तके' न 'वाचणे' यात हास्यास्पद काय, असा कुणाचा प्रश्न असेल, तर त्याबद्दल चर्चेस आपली तयारी आहे. पुस्तके न वाचण्यात काहीच गैर नाही असे म्हणणारे किती लोक पुस्तके वाचतच नाहीत, ते पाहणे रोचक ठरेल, अन त्याच वेळी पुस्तके खरेचवाचणार्‍यांनी 'दवणीय' म्हणजे काय याबद्दल माझे प्रबोधन्/उद्बोधन्/अपबोधन जे काय जसे जमेल तसे करावे, ही विनंती. धन्यवाद.

लेख आणि शेवट दोन्ही आवडलं. सध्याच्या मुलांना games आणि TV पुढे दुसरं काही सुचत नाही. पुस्तकं वाचण्यातली मजा पण त्यांना कळणार नाही. Games खेळण्यात आणि TV बघण्यात काही वाईट आहे असं नाही पण त्यामुळे विचारांची कक्षा वाढत नाही. पुस्तक वाचायचं पण वेड असतं पण पुस्तक कधीतरी संपतं आणि आपण त्यातून बाहेर येतो. Video Games म्हणजे भूलभुलैया असतो कि दिवसेंदिवस खेळत राहता येतं आणि त्यातून मिळत काय तर फक्त आज मी X level पार केली हे समाधान? मुलांना virtual reality मध्ये राहण्याची सवय लागते आणि ते धोकादायक आहे. जगात आणी आपल्या आजूबाजूला काय चाललय याची पण जाणीव कमी चाललीये.