Skip to main content

जातीयेसच तर जा...!!!

लेखक वटवट यांनी गुरुवार, 25/06/2015 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
जातीयेसच तर जा.. पण बरंच काही राहिलंय बघ.. बारमाही ग्रीष्म, भारवाही श्रावण.. अन चुकचुकणारं जग.. अर्ध्यातच थांबू पाहणारी मैफिल.. अर्धवट भैरवी.. लांबलेला मल्हार.. अस्तित्वावरच कोरल्या गेलेल्या तुझ्या खुणा.. काळाचे बदलत जाणारे संदर्भ.. आणि.. सुन्न गंधार .. उतू जाऊ पाहणारे अनावर कढ.. चंद्राचं हितगुज.. चांदण्याचा पसारा.. विस्कटलेला भूतकाळ.. ढासळणारी संध्याकाळ.. घुसमटलेला वारा.. अस्ताव्यस्त रात्र.. अस्वस्थ गात्रं.. उद्ध्वस्त स्वप्ने.. कळ्यांभोवती रेंगाळणारे, प्राक्तनाचे नं सुटलेले उखाणे.. हुळहुळलेले तळे.. तळमळलेले डोळे.. निपचित शांत रान.. खूप आतलं ऐकायला आसुसलेले कान.. अगदी ढवळून निघालेला माझ्या मनाचा तळ.. माझं दार ठोठावत बसलेलं ते वादळ.. नावंही घेत नाहीये, अजून तिथून उठायचं .. थोडं राहिलंय बहुतेक, माझं आभाळ अजून फाटायचं.. . . अजून काय बरं.. अगं ते संध्यारंगात बेमालूम मिसळून आता विरक्तीचा आव आणणारे अश्रू राहिलेच कि.... आणि तिला विसरून कसं चालेल.. अगदी माझ्याही नकळत लागणारी तुझी "उचकी...." एकदाही होऊ दिली नाही चूक.. तिनं मी तुला विसरू देण्याची... आणि दोघांनी मिळून डोळ्याखाली कोरलेल्या लेण्याची.. आणि.. अपूर्ण राहिलेल्या बर्याच कविता.. त्यांचा तर हिशोब कसा मांडू..? आणि त्यातून काळाला निमंत्रणे कशी धाडू..? भूतकाळाला, भविष्यकाळाला आणि वर्तमानाच्या भानाला.. कळ्यांनी उमलून येण्यासाठी गाऊ वाटणारया गाण्याला.. ह्या असल्या ताटकळत्या प्रश्नांना मिळणारी मौनांकित उत्तरं.. आणि मग हळहळती संध्याकाळ आणि तळमळती रात्र.. . . अजून बरंच काही निघेल बरं अगदी काढायचंच म्हटलं तर.. पण मासांत गोंदवलेलं अक्षर नाही खोडता येत, कितीही खोडायचंच म्हटलं तर.. अवघड आहे ह्या सार्यांसोबत धरून राहणं तग...! . . . जातीयेसच तर जा... पण........ बरंच काही राहिलंय बघ..! -चेतन दीक्षित
लेखनविषय:

वाचने 4344
प्रतिक्रिया 29

प्रतिक्रिया

जियो... ! हो हो, जायचं तर जा म्हणावं. आम्ही आमचं पाहून घेऊ. आवडली कविता. (आपल्या नावासहित कविता वाट्सपवर फ़ॉरवर्ड करतो) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डॉक्टरसाहेब तुमचा प्रत्येक प्रतिसाद खूप उत्साह वाढवणारा असतो… खूप खूप आभारी आहे…

"जीवघेण्या " कवीतासाठी मिका-गणेश्याची कटकट होती आता ही "वटवट" !!!! भोगा! मूळ अवांतर : जब्री कवीता अगदी आतून आलेली. पुलेशु मिकाग पंखा नाखु

उतू जाऊ पाहणारे अनावर कढ.. चंद्राचं हितगुज.. चांदण्याचा पसारा.. विस्कटलेला भूतकाळ.. ढासळणारी संध्याकाळ.. घुसमटलेला वारा.. अस्ताव्यस्त रात्र.. अस्वस्थ गात्रं.. उद्ध्वस्त स्वप्ने.. कळ्यांभोवती रेंगाळणारे, प्राक्तनाचे नं सुटलेले उखाणे.. आणि.. अपूर्ण राहिलेल्या बर्याच कविता.. त्यांचा तर हिशोब कसा मांडू..?
पण मासांत गोंदवलेलं अक्षर नाही खोडता येत, कितीही खोडायचंच म्हटलं तर..
हे मस्तच... आवडली.

ह्या वातावरणात फक्त मी आणि मी, निराशा, हातात एक मद्याचा ग्लास, तिची आठौण अन काळीज कुरतडणारी रात्र... जियो... जियो...

ही कविता म्हणजे अरिजित सिंगच्या गाण्यासारखी आहे. आताच माझा बारावा ब्रेकअप झाल्यासारखा फील आला. आता चहा घेऊन यायलाच हवं.

वियोगाचं किंवा निकट भविष्यात जो स्प्ष्ट दिसतोय, अश्या वियोगाचं दु:ख अत्यंत टोकदारपणे जाणवतंय.. आजच गुलजारवर चर्चा आणि 'मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड है'च्या भावार्थाशी जवळ जाणारी ही कवितापण आजच वाचायला मिळावी, हा विलक्षण योगायोग आहे.. ही कविता वाचता-वाचता ५०फक्त ची ही कविता आठवली, आणि खपली निघाली एका जुन्या घावावरची..