✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

अफगाणिस्थान..........

ज
जयंत कुलकर्णी यांनी
Fri, 09/05/2014 - 08:51  ·  लेख
लेख
अफगाणिस्थान.......... ब्रिटिशांचे यशस्वी माघार घेतलेले सैन्य.....एकांडा डॉ. ब्रायडॉन. Simple, Free Image and File Hosting at MediaFire जलालाबादच्या ब्रिटिश तळावर राकट चेहऱ्याच्या कर्नल डेनीने सगळ्यात उंच इमारतीवरुन आपली दुर्बिण समोरच्या वैराण प्रदेशावर रोखली व तो प्रदेश काळजीपुर्वक न्याहाळला. दुरवर दिसत असलेल्या डोंगरापर्यंत त्याला काहीच हालचाल दिसली नाही. त्याने एक सुस्कारा सोडला. त्या डोंगराच्या पलिकडे कोठे तरी काबूलवरुन माघार घेणारे ब्रिटिश सैन्य होते. कोठे होते ते ? आलेल्या खबरीनुसार त्या सैन्याने ६ जानेवारी १८४२ रोजी काबूल सोडले होते व अजूनही त्यांचा पत्ता नव्हता. अनुभवी कर्नल डेनीच्या मनात पाल चुकचुकली. त्याच्या मागे उभ्या असलेल्या अधिकाऱ्यांकडे वळून तो म्हणाला, ‘मला काय होणार याची पूर्ण कल्पना आहे. त्या सैन्यातील फक्त एकच माणूस येथे जिवंत पोहोचणार आहे याची मला खात्री आहे आणि तो सुद्धा त्या सैन्याच्या कत्तलीची हकिकत सांगण्यासाठी !’ दुसऱ्या दिवशी कर्नल डेनीचे सैनिक शहराभोवती संरक्षणासाठी खंदक खोदत होते. त्या इमारतीवर काही सैनिक अजूनही टेहळणी करत होते. तेवढ्यात एका सैनिकाला दुरवर एक घोडेस्वार रखडत येताना दिसला. घोडदळाच्या सैनिकांची एक पलटण त्याच्या दौडत त्या एकांड्या घोडेस्वाराकडे गेली. ते बघून कर्नल डेनी म्हणाला, ‘ मी म्हणालो नव्हतो ? निरोप घेऊन एक माणूस जिवंत परत आला आहे !’ त्या सैनिकांनी त्या रक्तबंबाळ घोडेस्वारापाशी पोहोचल्या पोहोचल्या त्याला पहिला प्रश्न केला, ‘बाकीचे सैन्य कुठे आहे ?’ त्या घोडेस्वाराच्या जखमातून रक्तस्त्राव होत होता. त्याच्या मस्तकाचा एक टवका उडालेला दिसत होता. मोठ्या कष्टाने त्याने पुटपुटत उत्तर दिले, ‘ सैन्य ? मी एकटाच आहे ! डॉ. विल्यम ब्रायडॉन ! त्या सैनिकांनी त्याला जखमी डॉक्टरला काळजीपूर्वक आत नेले. ब्रिटिशांच्या १६००० माणसातील हा एकमेव वाचलेला सैनिक होता. त्याची कहाणी ऐकणाऱ्या सैनिकांना व त्यालाही त्यावेळी कल्पना नव्हती की काही सैनिक व ब्रिटिशांची कुटुंबे अफगाणी सैन्याने पकडली आहेत. ब्रायडॉनचा जन्म सैनिकी परंपरा असलेल्या एका स्कॉटिश घराण्यात १८११ साली झाला होता. डॉक्टर झाल्यावर त्याने भारतातील जवळजवळ सत्ताधिश झालेल्या ईस्ट इंडिया कंपनीच्या फौजेत चाकरी पत्करली. साल होते १८३५. चारवर्षे भारतात काढल्यावर त्याला अफगाणी बंडाचा बिमोड करण्यासाठी अफगाणीस्थानला सैन्याबरोबर सर्जन म्हणून जावे लागले. ब्रिटिशांनी रशियाच्या अफगाणिस्थानमधील हस्तक्षेपास उत्तर देण्यासाठी हे सैन्य काबूलवर पाठविले होते. त्या बंडात दारुण पराभव झाल्यावर ब्रिटिश सेना व जनता काबूलवरुन पळत सुटली त्यात डॉक्टर ब्रायडॉनही होता. अफगाण टोळ्यांनी त्यांना एका रात्रीचीही उसंत दिली नव्हती. त्या वैराण प्रदेशात त्यांनी एक एक ब्रिटिश सैनिकाला टिपण्याचा सपाटा लावला होता. त्या माघारीच्या पाचव्या दिवशी ब्रायडॉनला एका अफगाण सैनिकाने घोड्यावरुन खाली खेचले व त्याच्यावर त्याच्या तलवारीने वार केला. नशिबाने त्याने टोपीच्या आत ठेवलेल्या एका मासिकाने त्याला वाचविले. त्याला जमिनीवर फेकून त्याचा घोडा उधळला पण तेवढ्यात एका मरणोन्मुख भारतीय सैनिकाने त्याला त्याचा घोडा देऊ केला. ‘मी मरणार आहे ! माझा घोडा घेऊन येथून पळून जा !’ ब्रायडॉनने त्या सैनिकाला त्याच्या खोगिरावर बसते केले पण त्याची प्राणज्योत केव्हाच मालवली होती. त्याला एक सलाम ठोकून त्या गोळ्यांच्या वर्षावातून ब्रायडॉनने आपला घोडा फेकला. दुसऱ्या दिवशी अफगाण टोळ्यांनी परत त्यांना घेरले. आता त्यांच्याकडे २१६ अधिकारी आणि काही सैनिक उरले होते. त्या लढाईत फक्त वीस अधिकारी वाचले. उरलेल्या पंचवीस मैलात त्यातील फक्त सहाजण उरले. त्यांनी आता सपाट प्रदेशात प्रवेश केला. तेवढ्यात त्यांना काही शेतकरी त्यांच्याकडे येताना दिसले. त्यांच्या हातातील पावाच्या लाद्या बघून त्यांना हायसे वाटते ना वाटते तोच त्यांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. सहापैकी तीन पळून गेले. एकजण तेथेच ठार झाला. ब्रायडॉन व ले. स्टियर घोडे कमकुवत असल्यामुळे मागे राहिले व त्यामुळे वाचले असे म्हणायला हवे. स्टियरचा घोडा कोसळल्यावर त्याने शेवटच्या झुंजीसाठी एका उंचवट्याची वाट धरली व ब्रायडॉनला जलालाबादला सावध करण्याची ओरडून सूचना केली. काही क्षणांनंतर दमछाक झालेल्या ब्रायडॉनला वीसएक अफगाणी टोळीवाल्यांनी गाठले. ते पायी चालले होते. त्यांनी ब्रायडॉनवर दगडफेक केली. ब्रायडॉनने घोड्याचा लगाम दातात धरला व डावीकडे, उजवीकडे तलवार चालवत त्याने त्या गर्दीतून मार्ग काढला. तेवढ्यात एका अफगाण्याने त्याच्यावर बंदुक झाडली. त्या गोळीने त्याच्या तलवारीची छकले उडविली. त्याच्या हातात आता फक्त तिची मुठ उरली. पुढेच त्याला काही घोडेस्वार दिसले. त्याला प्रथम वाटले की ते वाचलेले भारतीय सैनिक आहेत पण त्याच्या दुर्दैवाने ते अफगाणी निघाले. त्याला पाहिल्यावर त्यातील एकजण त्याच्या मागे लागला. त्याने त्याच्या बाकदार तलवारीने ब्रायडॉनवर एक जोरदार वार केला. ब्रायडॉनने तो मोठ्या शर्थीने त्याच्या तलवारीच्या म्यानाने अडविला पण तो घाव त्याच्या डोक्यावर उतरलाच. त्या अफगाणी घोडेस्वाराने मोठ्या त्वेषाने त्याच्यावर चाल केली पण ब्रायडॉनने हाती आलेली तलवारीची मुठ त्याला फेकून मारली. त्या अफगाणानेही ब्रायडॉनवर अजून एक वार केला जो त्याने मोठ्या शिताफीने चुकविला. पण तोही त्याच्या खांद्यावर उतरला. ब्रायडॉन ती तुटकी मुठ उचलायला वाकला ते बघून तो अफगाणी पळून गेला. बहुतेक त्याला ब्रायडॉन त्याचे पिस्तूल काढतोय की काय अशी शंका आली असावी. डोक्यात पडलेले दोन वार, हातावरील तीन जखमा, त्यातून भयंकर रक्तस्त्राव होतोय, मरायला टेकलेले घोडे अशा अवस्थेत डॉ. ब्रायडॉन जलालाबादला पोहोचला खरा पण थोड्याच दिवसात जलालाबादवरही हल्ला झाला...... ब्रिटिशांची अशी अवस्था कोणी केली ? कशी केली ? त्यावेळचे राजकारण काय होते...? याची सविस्तर कहाणी आपण आता बघणार आहोत पुढच्या भागापासून.......... क्रमश: जयंत कुलकर्णी.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
इतिहास
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
35346 वाचन

💬 प्रतिसाद (65)

प्रतिक्रिया

श्री कंजूस,

जयंत कुलकर्णी
Tue, 06/16/2015 - 10:02 नवीन
श्री कंजूस, गुजरात प्रवास वर्णन करायचे ठरविले होते पण प्रवास वर्णन लिहिणे फारच अवघड असते हे लक्षात आल्यामुळे त्यावाटेस परत जाणे नाही. म्हणजे लिहू शकतो आपण पण लिहिल्यावर यात काय विशेष आहे असे वाटत रहाते.... माझा प्रॉब्लेम लक्षात आला असेल. हं....पण अफगाणिस्थानचे वेगळे आहे. ही मालिका मला अजुनही पूर्ण करायची आहे.....आणि करेन....
  • Log in or register to post comments

धन्यवाद जयंत काका. पु.भा.प्र.

खटपट्या
Tue, 06/16/2015 - 10:27 नवीन
धन्यवाद जयंत काका. पु.भा.प्र.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

@ जयंतराव कुलकर्णी यांस......!!!!!

विनोद१८
Tue, 06/16/2015 - 16:18 नवीन
ही मालिका मला अजुनही पूर्ण करायची आहे.....आणि करेन....
या तुमच्या घोषणेबद्दल मनापासुन आनंद व्यक्त करतो व धन्यवाद देतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

जयंत राव,

सुबोध खरे
Tue, 06/16/2015 - 10:27 नवीन
जयंत राव, आपण इतिहासाबद्दल संदर्भ द्यायला पाहिजे सांगणार्या लोकांची मते मला पटत नाहीत. कारण मग तर मला वैद्यकीय बाबींवर काहीच लिहायला नको. कारण कुठलीच गोष्ट माझी स्वयंभू नाही. प्रत्येक गोष्टीला कुठल्यातरी पथ्य पुस्तकाचा किंवा नियतकालिकाचा संदर्भ आहेच. आणि इतकी वर्षे वाचलेले वैद्यकीय ज्ञान कुठून आले हे विचारले तर मला नाही वाटत बहुसंख्य( कि १००%) डॉक्टर हे सांगू शकतील कि ते कुठे वाचले. मग त्यांनी वैद्यकीय ज्ञानावर काही लेख लिहावेत. असो आपला हा लेख मी अगोदर वाचलेला नव्हता. आज तो अवर आला तेंव्हा पुढे काय याची उत्कंठा लागून राहिली आहे. राहिली गोष्ट कुणाच्याही ब्लॉग वर जाऊन वाचायचा माझ्यासारख्या लोकांना कंटाळा असतो. (कारण बरेच ब्लोग हे मी माझे आणि माझ्यासाठी असतात)आणि त्यातून आपल्याला हवा तो लेख शोधुन काढणे कठीण असते आणि तुमचा तेवढा धीरहि( patience) नसतो. तेंव्हा हि मालिका लवकरच लिहायला घ्या ( किंवा ब्लोग वर असेल तर इकडे डकवा) हि तुम्हाला प्रेमाची विनंती. जाता जाता-- काही लोकांनी माझ्या लेखनाला तुलनेत आपल्या पातळीपर्यंत आणले याचा मला अभिमान वाटतो( त्याबद्दल त्यांना धन्यवाद ). परंतु माझी तेवढी लायकी नाही असे मी नम्रपणे सुचवू इच्छितो. (मज पामरासी काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी )
  • Log in or register to post comments

खरेसाहेब,

जयंत कुलकर्णी
Tue, 06/16/2015 - 11:16 नवीन
खरेसाहेब, क्यूं शरमिंदा कर रहे हो......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

मस्त सुरवात आहे.. पुढील भाग

गणेशा
Tue, 06/16/2015 - 11:58 नवीन
मस्त सुरवात आहे.. पुढील भाग केंव्हा वाचायला मिळतील ?
  • Log in or register to post comments

जयंत सर प्लीज हि मालिका सुरु

उदयगिरी
Fri, 06/07/2019 - 13:44 नवीन
जयंत सर प्लीज हि मालिका सुरु करा।
  • Log in or register to post comments

ओहो

जॉनविक्क
Fri, 06/07/2019 - 17:21 नवीन
तसा संबंध नाही परंतु उगाच अक्षय कुमार यांचा केसरी चित्रपट आठवला. अतिशय उत्सुकतावर्धित वळणावर हा भाग लेखक महोदयांनी संपवला आहे. हॅट्स ऑफ !
  • Log in or register to post comments

ह्या लेखाचे पुढील भाग कुठे

प्रसाद_१९८२
Fri, 06/07/2019 - 17:26 नवीन
ह्या लेखाचे पुढील भाग कुठे वाचायला मिळतील ?
  • Log in or register to post comments

Krupayq

diggi12
Wed, 07/10/2019 - 00:34 नवीन
Ya lehacha tumchya blog varil duva (link) dya
  • Log in or register to post comments

जयंत सर प्लीज हि मालिका सुरु

diggi12
Wed, 03/04/2020 - 01:45 नवीन
जयंत सर प्लीज हि मालिका सुरु करा।
  • Log in or register to post comments

पहिला भाग खूप च उत्कंठावर्धक

सुचिता१
Fri, 03/06/2020 - 14:39 नवीन
  • Log in or register to post comments

भारीच....

श्वेता२४
Fri, 03/06/2020 - 15:38 नवीन
हा धागा वर आला ते बरं झालं. पुढील भाग कधी लिहीताय काका?
  • Log in or register to post comments

जयंत सर प्लीज हि मालिका सुरु

diggi12
Sun, 08/22/2021 - 10:15 नवीन
जयंत सर प्लीज हि मालिका सुरु करा।
  • Log in or register to post comments

थरारक आहे डॉ. ब्रायडॉनच्या

चौथा कोनाडा
Mon, 08/23/2021 - 12:47 नवीन
थरारक आहे डॉ. ब्रायडॉनच्या पलायनाची कहाणी !
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा