Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Sun, 06/14/2015 - 00:06
लेखनविषय (Tags)
धोरण
राजकारण
लेखनप्रकार (Writing Type)
समीक्षा
भारतीय सैन्याने मिएनमारच्या हद्दीतल्या अतिरेकी ठाण्यांवरच्या हल्ल्यांच्या बद्दल अनेक तज्ज्ञ आणि तथाकथित तज्ज्ञांच्या प्रतिक्रिया येत आहेत. हे अपेक्षित आहे. जेवढी निरपेक्ष विश्लेषणे येत आहेत, त्यापेक्षा जास्त (या घटनेच्या दोन्ही बाजूने असलेल्या तज्ञांच्या व्यक्तिगत हितसंबंधांमुळे प्रत्येकाच्या आवडी-उद्येशा-प्रमाणे) तिखटमीठ मिसळलेली विश्लेषणे येत आहेत. हे पण अपेक्षितच आहे. कारण, अश्या प्रकारच्या, अंतिम परिणाम मिळविण्यासाठी नाही तर मुख्यतः संदेश देण्यासाठी केलेल्या कारवाईनंतर, तिचे अपेक्षित परिणाम साधण्यासाठी, कारवाईच्या बाजूला असणार्‍या लोकांनी तसे करणे आवश्यक असते. तर शासनात असलेल्या पक्षाला त्या कारवाईचे श्रेय मिळू नये अशी त्यांच्या विरोधकांची खटपट असते... ही वस्तुस्थिती देशांतर्गत आणि देशाबाहेर दोन्हीकडे आहे. मात्र, असा विरोध करताना देशाचे भलेबुरे नजरेआड करणे हे जगात इतरत्र अभवानेच पहायला मिळते, पण दुर्दैवाने आपल्या देशात हे काही नवे नाही. :( असो. ही त्रोटक पार्श्वभूमी समजावून घेऊन आपण मूळ विषयाकडे वळूया... मिएनमार प्रकारच्या कारवायांच्या मागे, केवळ ज्यांच्यावर कारवाई केली केवळ त्यांनाच नव्हे तर तडक संबंध असलेल्या/नसलेल्यांना इतरांना त्वरित/दूरगामी परिणाम साधणारा संदेश देण्याचा उद्देश असतो. अश्या घटनांतील पूर्ण सत्य जर लगेच बाहेर आले तर ते एक मोठे आंतरराष्ट्रीय आश्चर्य आणि आंतरराष्ट्रीय बावळटपणाचे उत्तम उदाहरण होईल. किंबहुना आंतरराष्ट्रीय राजकारणात "पूर्ण अथवा कायमस्वरूपी सत्य" असे काही नसतेच. असते ते केवळ... (अ) "तत्कालिक उपलब्ध ज्ञान/पुरावे", (आ) त्यावरून केलेले "दुसर्‍याच्या भली-बुरी कारवाई करण्याच्या ताकदीचे आणि इच्छाशक्तीचे अंदाज" आणि (इ) त्यावरून बनवलेले "आपल्या फायद्या-तोट्याचे बोध (परसेप्शन्स)". मिएनमार कारवाईच्या सद्या उपलब्ध असलेल्या माहितीवरून त्यांसंबंधीच्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांचे थोडक्यात सकारण विश्लेषण व निष्कर्ष असे आहेत... . भारताची आंतराष्ट्रीय छबी सुधारली का ? भारतीय सरकारने (अ) ही कारवाई केल्यामुळे, (आ) ती केल्याचे जगासमोर मान्य केल्यामुळे, (इ) ती करण्याचा राजकीय व नैतिक अधिकार असल्याचे ठामपणे सांगितल्याने, (इ) परत गरज पडल्यास भारताच्या "कोणत्याही" सीमेवर अशी कारवाई करायला कचरणार नाही असे ठामपणे सांगितल्याने... भारताची आंतरराष्ट्रीय छबी सुधारली आहे हे न दिसायला एकतर सत्य सांगितले तर काय होईल या विचाराने घाबरगुंडी होणारे सशाचे काळीज असायला हवे अथवा देशाच्या फायद्यापेक्षा वेगळा व्यक्तीगत स्वार्थ डोळ्यासमोर असायला हवा. . सैन्याचे मनोबल वाढले का ? सैन्याचे मनोबल हे केवळ त्याच्या सामरिक ताकदीवर अवलंबून नसते. शत्रूसमोर हात पाठीमागे बांधून गप्प रहायला भाग पडणे हे जगातल्या सर्वात प्रबळ सैन्याचेही मानसिक खच्चीकरण करू शकते. त्यामुळे, भूतपूर्व सैनिक अधिकारी (उघडपणे), सद्या सेवेत असलेले अधिकारी (खाजगीत) आणि अनेक सामरिक तज्ज्ञ समाधान का व्यक्त करत आहेत याचे आश्चर्य वाटायला नको. . शेजारी राष्ट्रांच्या आणि एकंदरीत जगाच्या प्रतिक्रिया काय म्हणतात ? पाकिस्तानचा एक अपेक्षित आक्रस्ताळा अपवाद वगळता आणि कारवाईशी प्रत्यक्ष संबंध असलेल्या मिएनमारची अपेक्षित (याबद्दल पुढे स्वतंत्रपणे येईलच) संयत प्रतिक्रिया सोडता इतर देशांनी काहीही प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे. याचा अर्थ ही कारवाई योग्य आहे हे पाकिस्तान सोडून इतरांना मान्य आहे. तसे नसते तर एका देशाच्या सैन्याने दुसऱ्या देशाची सीमा ओलांडणे याचा अर्थ सैनिकी आक्रमण असा होऊन तो मुद्दा यूनोत "सुओ मोटो (कोणत्याही तक्रारीविना)" दाखल होऊ शकतो. याच कारणासाठी कुवेत, इराक, अफगाणिस्तान, इ युद्धांपूर्वी यूनोमध्ये ठरव करणे आवश्यक झाले होते. चीनने त्या अतिरेक्यांना आपली मदत नव्हती असे (कारण नसताना ?) विधान केले आहे आणि मुख्य म्हणजे काहीही विरोधी बोलणे टाळले आहे. इतर काही नाही तरी या एका गोष्टीचे पाकिस्तानला वैषम्य जरूर वाटले असेल. . जगाला कोणता संदेश गेला ? "भारताकडे आता सबळ सैन्यदलाबरोबरच, ते वापरण्याची इच्छाशक्ती व धमक आहे." हे प्रतिपादन करण्यात भारत यशस्वी झाला आहे. जागतिक राजकारणात दुबळ्यांच्या वाटेला नेहमीच दुर्लक्ष आणि फारतर भीक मिळते... जाणीवपूर्वक मान मिळत नाही, मैत्री तर नाहीच नाही. पुढच्या योग्य कृतींनी सरकार हा फायदा अजून मजबूत करू शकले तर त्याची आंतराष्ट्रीय राजकारणात भारताचे स्थान मजबूत व्हायला आणि पाकिस्तानच्या कारवायांना शह देण्यासाठी नक्कीच मोठी मदत होईल. . सैन्याच्या यशाचा सरकार फायदा घेत आहे का ? ज्याच्या इशाऱ्यावर सैन्याने वागावे असा दंडक आहे, त्या लोकशाही सरकारचा हा नैतिक हक्क असतो. सैन्याला त्याचे योग्य ते श्रेय देऊन सरकारने आपल्या श्रेय आणि उत्तरदायित्वावर हक्क सांगितला तर ते केवळ नैतिकच नव्हे तर आवश्यक आहे... नाहीतर पाकिस्तानसारखेच, भारताच्या निर्वाचित नागरी सरकारचेही सैन्यावर नियंत्रण नाही असा त्याचा अर्थ होईल. "खर्‍या" लोकशाही देशातले सैन्य कोणताही महत्वाचा निर्णय निर्वाचित नागरी सरकारच्या परवानगीशिवाय घेऊ शकत नाही... आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून जाणे ही तर फार टोकाची गोष्ट आहे. त्यामुळे सैन्य कितीही सबळ आणि तयारीचे असले तरी शेवटचा निर्णय आणि त्या निर्णयाच्या अंतिम यशापयशाची जबाबदारी आणि म्हणूनच श्रेय/अपकीर्ती निर्वाचित नागरी सरकारचेच असते... मात्र, प्रत्येक कारवाईचे श्रेय/अपकीर्ती उघडपणे स्वीकारणे/न स्वीकारणे हे त्या सरकारच्या स्वतः आणि देशाबद्दलच्या फायद्या-तोट्याच्या बोधावर (परसेप्शन्स) अवलंबून असते. अतिरेक्यांना आणि बाह्यजगताला संदेश देण्यासाठी केलेल्या या कारवाईच्या संदर्भात ते श्रेय उघडपणे घेणे अत्यंत आवश्यक होते. . भारताने या प्रकरणाची अती जाहिरात केली आहे काय ? वस्तुस्थिती अशी आहे... १. सैन्याच्या संबंधित अधिकाऱ्याने औपचारिक निवेदन केले. २. उपमंत्र्यांनी टीव्हीवर मुलाखतसदृश्य विधान केले. ३. संरक्षणमंत्र्यांनी पत्रकारांशी झालेल्या अनौपचारिक संभाषणात उल्लेख केला. ४. राष्ट्रिय सुरक्षा सलागारांनी निवेदन तर केले नाहीच, पण नुसते अनौपचारिक वक्तव्यही केले नाही. ५. पंतप्रधानांनी निवेदन तर केले नाहीच, पण नुसते अनौपचारिक वक्तव्यही केले नाही. उघड्या डोळ्यांनी मुद्दा समजावून घ्यायचा असल्यास वरच्या वस्तूस्थितीत उत्तर स्पष्ट आहे. याविरुद्ध, ओबामांनी ओसामा प्रकरणात टीव्हीवर प्रत्यक्ष येऊन सर्व "मकार" वापरून भाषण दिले होते हे आठवत असेलच. त्या प्रकारणी अमेरिकेच्या सरकारी आणि विरोधी पक्ष या दोघांनीही त्यांची पाठराखण आणि अभिनंदन केले होते. म्हणूनच अमेरिका अमेरिका आहे आणि भारत भारत आहे. . मुत्सद्देगिरी (Diplomacy) म्हणजे सगळेच गुप्त ठेवणे असे आहे काय ? शत्रूपासून सगळेच गुप्त ठेवून शत्रूला संदेश कसा देणार ? शत्रूला गुप्त खलिता पाठवून ?! कधी तडक तर कधी "लेकी बोले सुने लागे" असे सांगून, तर कधी आपल्या फायदेशीर असत्य पसरवून, शत्रूला सतत गोंधळात म्हणजेच पर्यायाने चिंतेत गुंतवून ठेवून, आपल्या विरुद्धच्या कारवायांसाठी वेळ आणि धैर्य मिळू नये याची तजवीज करणे हे मुत्सद्देगिरीचे एक अत्यंत महत्त्वाचे अंग आहे. भ्रामक नैतिकतेच्या नावाने स्वतःच स्वतःची पाठ थोपटत, अवास्तववादी कल्पना बाळगून, गेले अनेक वर्षे भारताने केवळ पाकिस्तानपुढेच नाही तर सर्व जगापुढे "एक संभाव्यरीत्या (potentially) ताकदवान, पण ताकदीचा उपयोग करण्याची धमक नसलेले आणि खुळ्या नैतिक कल्पना पुढे करून आपल्या भित्रेपणाचे समर्थन करणारे राष्ट्र" अशी छबी निर्माण केली आहे. त्यामुळे भारताने अनेकदा "रणांगणावर कमावले आणि तहात गमावले" ही म्हण सार्थ केली आहे आणि तो अनेकदा अत्यंत लहान आकाराच्या आणि सामरिक दृष्टीने निर्बल देशांपुढे हतबल झालेला आहे. मालदीवमधला सत्तापालट आणि श्रीलंकेने अणुपाणबुड्या आपल्या बंदरात लावण्याची चीनला दिलेली परवानगी या नजिकच्या काळातल्या दोन गोष्टी याचीच उदाहरणे आहेत. ती छबी सुधारणे हे आताच्या सरकारपुढे सर्वात मोठे आव्हान आहे. जशी एखादी बँक गिर्‍हाईकाची आर्थिक (आणि बर्‍याचदा सामाजिक व राजकीय) पत पाहून त्याच्याशी काय आणि कसा व्यवहार करायचा ते ठरवते, तसेच राष्ट्रे इतर राष्ट्रांची आंतरराष्ट्रीय पत (चांगले संबंध ठेवल्यास मिळू शकणारे राजकीय व आर्थिक फायदे आणि/किंवा चांगले संबंध न ठेवल्यास होऊ शकणारे राजकीय व आर्थिक तोटे) ठरवून मगच संबंधाचे स्वरूप ठरवतात. राष्ट्रांच्या बदलत्या पतीनुसार ते संबंध बदलत जातात. या तत्त्वाचे उत्तम उदाहरण म्हणजे तथाकथित ताकदवान भारताला श्रीलंकाच काय पण मालदीव सारख्या नकाश्यावरच्या काही ठिपक्यांना आपल्या बाजूला ठेवणे शक्य झाले नाही. चीनने भारताभोवती मोत्यांची माळ (ऑपरेशन स्ट्रिंग ऑफ पर्ल) आवळून मुसक्या बांधल्या तर मग ना भारत राहील ना त्याची तथाकथित नीतिमत्ता ! श्रीलंकेत नवीन सरकार सत्तेवर येताच (यात भारताचा सहभाग होता हे उघड गुपित आहे) त्याने चीनला अणुपाणबुड्या बंदराला लावण्याची परवानगी रद्द केली; अनेक देश सद्या पाकिस्तानच्या भारताविरुद्धच्या काश्मीरसंबंधी आणि इतर कारणांनी केलेल्या आरडाओरड्याकडे दुर्लक्ष करत आहेत. अमेरिका, युके, ऑस्ट्रेलिया, इ देशांची भारताच्या अणुप्रकल्पांविषयी व संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्याचे कायम सदसत्वाबद्दल सकारात्मक भूमिका घेताना दिसत आहे. ह्या घटना भारताची आंतरराष्ट्रीय छबी सुधारत असल्याची लक्षणे आहेत. या छबीमध्ये मिएनमार प्रकरणाने लक्षणीय भर घातली आहे. . सार्वकालीक जागतीक सत्ये १. माणसे असो किंवा राष्ट्रे... सामर्थ्याला नाही तर सामर्थ्याच्या आपल्यावर होऊ शकणार्‍या विपरित परिणामाला घाबरतात. म्हणूनच... २. आजवरचा मानववंशशास्त्राचा अनुभव हेच सांगतो की, ज्याच्याकडे त्याच्या नीतीचे रक्षण करण्यासाठी ताकद असते आणि त्या ताकदीचा उपयोग करण्याची धमक असते, त्याचीच नीतिमत्ता जिवंत राहते. पूर्णविराम." आणि... ३. शत्रूच्या हृदयात धडकी भरता आली की अर्धे युद्ध जिंकल्यात जमा होते आणि एकही गोळी न झाडता किंवा कमीत कमी रक्तपाताने पुरेसा संदेश पोचवून शत्रूला आपल्या मनासारख्या अटींवर तह करायला भाग पाडणे हाच युद्धातला सर्वोत्तम विजय होय. अधिक माहितीसाठी वाचा: १. सुन त्सू चे आर्ट ऑफ वॉर (ज्याचा चीन अत्यंत कौशल्याने उपयोग करत आहे), २. कौटिल्याचे अर्थशास्त्र (ज्यावर सुन त्सूचे बहुतांश पुस्तक आधारलेले आहे असे म्हणतात, पण ज्याच्याकडे भारताने आतापर्यंत तरी पूर्ण दुर्लक्ष केले आहे). . संदेश योग्य ठिकाणी पोचला का ? मिएनमार सरकारने उडते (low key) निवेदन केले, औपचारिक निषेध केला नाही आणि आंरराष्ट्रिय स्तरावर तक्रार केली नाही. पाकिस्तान सोडून इतर कोणत्याही देशाची विरुद्ध प्रतिक्रिया नाही. या कारवाईवर पाकिस्तानची "आमच्या विरुद्ध असे काही केले तर आम्ही अण्वस्त्रे वापरू" असे म्हणण्यापर्यंत मजल गेली आहे. ही नेहमीचीच रेकॉर्ड वाजवलेली असण्याची जितकी शक्यता आहे तितकेच ते असाहाय्यतेचे लक्षण आहे. भारताच्या इतर कोणत्याही शेजारी देशाला या कारवाई वर अभिप्राय देण्याची गरज भासली नाही. याचा अर्थ बाण जिथे अपेक्षित होता तिथेच बरोबर लागला आहे ! . शेजार्‍याबरोबरच्या (मिएनमारबरोबरच्या) मैत्रिपूर्ण संबंधांनाही धक्का बसला का ? कसा काय बुवा!? मिएनमारने तरी असे काही म्हटलेले नाही! मिएनमारने कोणत्या आंतरराष्ट्रीय व्यासपिठावर हा प्रसंग नेण्याचे जाहीर केलेले नाही. इतकेच काय भारताकडे त्यांच्या राजदूताच्या हाती एखादा निषेधखलिताही पाठविलेला नाही. मिएनमारने काय केले ? तर "आमच्या भूमीवर परदेशी सैन्य आले नव्हते" असे एक अत्यंत सोज्वळ उडते (low key) निवेदन केले आहे. आपला उद्देश साध्य होण्यात मदत करणाऱ्या (एका कराराअन्वये, अतिरेकी त्यांच्या देशात खोलवर पळून जाऊ नये याची सहकार्यपूर्ण खबरदारी मिएनमार सैन्याने घेतली होती असे म्हणतात) देशाला त्याचे अंतर्गत हितसंबंध राखण्यासाठी एवढी सूट नक्कीच आहे ! शिवाय, ही सगळी कारवाई मिएनमारबरोबर काही सलोखापूर्ण सामंजस्य (? करार) असल्याशिवाय शक्य आहे काय ? . परस्परविरोधी वचने, मृत अतिरेक्यांची संख्या, खरे-खोटे फोटो, इ. इ. मूळ संदेश महत्त्वाचा, तो स्पष्टपणे पोचला पाहिजे. बाकी सर्व गोष्टी शत्रूच्या मनात जेवढा जास्त गोंधळ (आणि म्हणून चिंता) निर्माण करणाऱ्या असतिल तेवढे आपल्या जास्त फायद्याचे ! त्याकरिता देशातील अथवा बाहेरील विरोधकांच्या खर्‍या-खोट्या विधानांचा जितका उपयोग होईल तितके ते स्वागतार्हच आहे. . प्रथम आक्रमण न करण्याचे एकतर्फी आश्वासन याला आंतरराष्ट्रीय राजकारणात भोळसटपणा (स्पष्ट शब्दात मूर्खपणा) समजले जाते. आंतरराष्ट्रीय राजकारणात, खर्‍या ताकदीचा सच्चेपणा सांगणे म्हणजे, "वेळ आल्यास... किंबहुना वेळ येण्याचे टाळण्यासाठी... माझ्यात ताकद आहे आणि ती ताकद वापरायची धमक (राजकीय इच्छाशक्ती) आहे" अशी दृढ समजूत शत्रुपक्षाला करून देणे होय. शत्रू ते आपोआप समजून घेईल असा विचार करायला शत्रू काय आपला जिवलग असतो काय? किंबहुना, अशी एकतर्फी बंधने आपण आपल्यावर घालून घेण्याने शत्रुंच्या कारवायांविरुद्ध आपली सामरिक प्रतिक्रिया कशी असेल हे उघड करून शत्रूसमोर आपणच आपले हात पाठीमागे बांधून उभे राहतो. . क्रॉस बॉर्डर गुप्त कारवाया या नेहमीच गुप्त ठेवायच्या असतात... खरेच ? हीच एक क्रॉस बॉर्डर गुप्त कारवाई होती असा समज असेल तर, शुभेच्छा! सतत मिठाची गुळणी घेऊन चूप राहणे नव्हे, तर योग्य जागी संदेश देण्यासाठी कोणती कारवाई उघड करायची आणि कोणती गुप्त ठेवायची हे समजणे म्हणजेच आंतरराष्ट्रीय राजकारणाची उत्तम समज असणे होय! मिएनमार प्रकरणातली महत्त्वाची वस्तुस्थिती अशी आहे की कारवाई एका देशाबरोबर होती आणि संदेश जेवढा उत्तरपूर्वेतल्या अतिरेक्यांना द्यायचा होता तेवढाच तो इतरांनाही (आणि विशेषतः पाकिस्तानला) द्यायचा होता. गुप्तता बाळगून हे साध्य करता आले असते काय ? . असो अशा एका त्रोटक लेखात या विषयाचे गुंतागुंतीचे सर्व पदर उलगडणे शक्य नाही. पण मिएनमार प्रकरणामुळे आणि विषेशतः त्यासंबंधात चाललेल्या गदारोळामुळे मनात आलेले काही विचार इथे खरडले आहेत, इतकेच.
  • Log in or register to post comments
  • 16584 views

प्रतिक्रिया

Submitted by चिनार on Mon, 06/15/2015 - 08:56

In reply to . by hitesh

Permalink

हितेशचं बरोबर आहे ..राहुल

हितेशचं बरोबर आहे ..राहुल गांधींना पंतप्रधान करा..
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Mon, 06/15/2015 - 10:03

In reply to हितेशचं बरोबर आहे ..राहुल by चिनार

Permalink

आणि

हितेश भाईंना त्यांचे (तहहयात) सल्ला गार !!
आता मूळ अवांतर : लेख मुद्देसूद आणि नेटका बांधलेला आहे बर्याच वाचकांना एखादे गाणे अनवट जागा-चीजांसह समजावून सांगावे असाच आहे. वाचक नाखु
  • Log in or register to post comments

Submitted by चिनार on Mon, 06/15/2015 - 12:44

In reply to . by hitesh

Permalink

म्यानमार सरकारने घोषणा करायची

म्यानमार सरकारने घोषणा करायची वाट बघत आहोत आपण ???? ह. ह. पु. वा. ! जय हितेस भाई..जय कोन्ग्रेस..जय राहुल गांधी ..! म्यानमार सरकारने घोषणा केलीच तर ती कशी असेल ह्याचा एक कल्पनाविलास " म्यानमारच्या भूमीवर गेल्या बरेच दिवसांपासून दहशतवाद्यांचा वावर होता. कृपया ते कोण होते ,कुठून आले हे आम्हाला विचारू नका (अं..आम्ही नाही सांगणार जा !). काही दिवस वाट बघितल्यावर आम्हाला त्यांचा कंटाळा आला. आणि आम्ही त्यांना जायला सांगितले. पण ते चक्क नाही म्हणाले हो (अं..आम्ही कट्टी). मग आम्ही भारत दादाला त्यांचे नाव सांगितले. आणि भारत दादाने येउन त्यांना खूप मारले. (ये मज्जा ..!)"
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Mon, 06/15/2015 - 14:35

In reply to म्यानमार सरकारने घोषणा करायची by चिनार

Permalink

अरारारारा, पार बाजार उठवला.

अरारारारा, पार बाजार उठवला.
  • Log in or register to post comments

Submitted by चिनार on Mon, 06/15/2015 - 14:41

In reply to अरारारारा, पार बाजार उठवला. by मृत्युन्जय

Permalink

राहुल गांधी आणि त्याच बौद्धिक

राहुल गांधी आणि त्याच बौद्धिक पातळीचे त्यांचे समर्थक यांना समजेल अश्या भाषेत लिहिण्याचा प्रामाणिक प्रयत्न !
  • Log in or register to post comments

Submitted by एक एकटा एकटाच on Mon, 06/15/2015 - 08:32

Permalink

चांगला लेख आहे.

चांगला लेख आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by hitesh on Mon, 06/15/2015 - 10:17

Permalink

.

यापुर्वीही असे पराक्रम घडले आहेत. http://epaper.loksatta.com/c/5562273
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Mon, 06/15/2015 - 12:35

In reply to . by hitesh

Permalink

हितेश भाऊ

हितेश भाऊ केवळ द्वेष करायचा म्हणून द्वेष करणे सोडून द्या. आणी त्याच त्या दुव्याचे तुणतुणे वाजवणे सोडा. अगोदरच्या सरकारकडून अशी कामे करण्याची परवानगी मिळवण्यासाठी किती मिनतवार्या कराव्या लागत असत हे वरिष्ठ लष्करी अधिकार्यांना माहित आहे. तेंव्हा अगदी नाईलाज म्हणून परवानगी मिळत असे आणी ती सुद्धा बरीच उशिरा.याचवेळेस सरकारने पुढाकार घेऊन( पाय न ओढता) संरक्षण सल्लागारा ना ( डोव्हाल साहेबाना) पुढे पाठवून काम केले. याच कारणासाठी बर्याचशा निवृत्त लष्करप्रमुखांनी मोदी सरकारचे जाहीर अभिनंदन केले आहे. जर आपल्याला त्यांच्या( निवृत्त लष्कर प्रमुख) पेक्षा जास्त ज्ञान माहिती किंवा शहाणपण असेल तर गोष्ट वेगळी. जाता जाता-- हे लष्कर प्रमुख त्या सरकारच्याच काळात बढती मिळवून लष्कर प्रमुख झाले होते. नाहीतर परत तुम्ही म्हणाल त्यांना मोदी साहेबांनी वर चढवले म्हणून ते मोदी साहेबांचे तुणतुणे वाजवताहेत. तुम्हा काळा चष्मा काढलात तरच सूर्यप्रकाश स्वच्च्छ दिसेल अन्यथा काळोखी ठरलेलीच आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Mon, 06/15/2015 - 14:24

In reply to हितेश भाऊ by सुबोध खरे

Permalink

डॉक्टरसाहेब,

डॉक्टरसाहेब, तुम्ही असल्या कचरा प्रतिसादांना का सविस्तर उत्तर देऊन प्रतिवाद करीत आहात ते समजत नाही. वरील प्रतिसाद किंवा इतर काही ठराविक आयडींचे प्रतिसाद हे निव्वळ कचरा असतात. तुम्ही कितीही कंठशोष करून सांगितले तरी अशा पूर्वग्रहदूषित व्यक्ती ते पटवून घेणार नाहीत. अशांकडे संपूर्ण दुर्लक्ष करून त्यांना अनुल्लेखाने मारावे ही विनंती. अवांतर - 'जागो मोहन प्यारे' उपाख्य 'उद्दाम' उपाख्य 'पोटे' हे गजानन विनायक कागलकर या व्यक्तीचे मिपावरील आयडी पूर्वी धारातिर्थी पडले होते. आता म्यानमारमधील कारवाईमुळे 'हितेश' आयडी सुद्धा धारातिर्थी पडलेला दिसतोय. काही दिवसांनी तो नवीन अवतार धारण करून येईलच.
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Mon, 06/15/2015 - 14:38

In reply to डॉक्टरसाहेब, by श्रीगुरुजी

Permalink

हितेशरावांचा वध झाला म्हणायचा

हितेशरावांचा वध झाला म्हणायचा शेवटी. अभिनंदन. हितेशरावांचेच अभिनंदन. आत्महत्या करण्यासाठी ते खुप धडपडत होते बर्‍याच काळापासून पण त्यांना म्हणावी तशी साथ मिळत नवहती, आज अखेर त्यांच्या जालीय वधाचा सुदिन उजाडला म्हणाय्चा
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Mon, 06/15/2015 - 14:54

In reply to हितेशरावांचा वध झाला म्हणायचा by मृत्युन्जय

Permalink

प्राणीसुद्धा आत्महत्या करतात?

प्राणीसुद्धा आत्महत्या करतात?
  • Log in or register to post comments

Submitted by इरसाल on Mon, 06/15/2015 - 15:10

In reply to हितेशरावांचा वध झाला म्हणायचा by मृत्युन्जय

Permalink

नाय हो

हायेत जित्ते दुसर्‍या धाग्यावं मी तेंचा पर्तिदास वाह्च्ला .
  • Log in or register to post comments

Submitted by कहर on Mon, 06/15/2015 - 14:53

In reply to हितेश भाऊ by सुबोध खरे

Permalink

खरे साहेब तुम्ही गांधारीला

खरे साहेब तुम्ही गांधारीला आरसा बघ म्हणालात तर तिचा पहिला प्रश्न 'धृतराष्ट्राने कधी आरसा पाहिला का? ' असाच असणार… त्यामुळे तसे सांगणे म्हणजे आपलाच वेळ फुकट घालवणे … मंत्रात 'नमो' हा शब्द येतो म्हणून हितेशभाऊ हल्ली फक्त 'भगवते वासुदेवाय' एवढाच जप करतात अशी चर्चा ऐकली मी कुठेतरी. पुरावा देत नाही नाहीतर पुन्हा पूर्वीच्या सरकारमध्ये असेच झाल्याची एखादी लिंक धाडून देतील ते
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Mon, 06/15/2015 - 11:09

Permalink

खणखणीत लेख. +

खणखणीत लेख. + १०००००००००००००००००००००००००००००००००००००
  • Log in or register to post comments

Submitted by मोहनराव on Mon, 06/15/2015 - 13:34

In reply to खणखणीत लेख. + by मृत्युन्जय

Permalink

+१

सुंदर अभ्यासपुर्ण विवेचन!
  • Log in or register to post comments

Submitted by चिनार on Mon, 06/15/2015 - 12:33

Permalink

यथायोग्य विवेचन !

यथायोग्य विवेचन ! काका धन्यवाद ..
  • Log in or register to post comments

Submitted by आकाश कंदील on Mon, 06/15/2015 - 12:50

Permalink

उत्कृष्ट

एक्का साहेबांची प्रवास वर्णने जेवढी उत्कृष्ट असतात, तेवढेच आजचे विश्लेषण अतिशय पद्धतशीर, साहेब, आपण तर तुमच्या विचार मांडण्याच्या पद्धतीचे FAN आहोत
  • Log in or register to post comments

Submitted by पुण्याचे वटवाघूळ on Mon, 06/15/2015 - 13:39

Permalink

झोपेचे सोंग घेतलेल्याला उठवता येत नाही

हा लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद इस्पिकराव. म्यानमारमधल्या हल्ल्याया निमित्ताने मोदीविरोधकांची जी बेताल बडबड चालू असते त्याला चोपायचे म्हटले तर मला इतके मुद्देसूद लिहिता येत नाही.आता हा एक लेख दाखवला की माझे काम झाले. म्यान्मार सरकार असा हल्ला झालाच नाही असे म्हणणार यात काहीच विशेष नाही. कोनते सरकार-- हो परदेशी सैनिक आमच्या देशात आले होते आणि त्यांचे काम करून परत गेले आणि आम्ही काही केले नाही असे आपली प्रतिमा डागाळली न जाता मान्य करेल? तरीही म्यानमार सरकारने असे म्ह्टल्यावर अनेक लोक नेमके तेच उचलून मोदी कसे फेकू वगरे म्हणू लागतात तेव्हा त्यांच्या आकलनाची किव करावीशी वाटते. आमचे मिसळपाववरचे जातभाई पण त्यातलेच (वटवाघूळच पण इंग्लिशमधले). काय करणार? झोपलेल्याला उठविता येते पण झोपेचे सोंग घेतलेल्याला उठवता येत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by शशांक कोणो on Mon, 06/15/2015 - 14:09

Permalink

म्यानमार

लेख अगदी मनापासून आवडला. विषयाशी संबंधित जवळपास सगळ्या गोष्टींचा परामर्श घेतला आहे..........
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Mon, 06/15/2015 - 14:21

Permalink

खूप दीवसांनी ईतका समतोल लेख

खूप दीवसांनी ईतका समतोल लेख वाचला. प्रतिवाद करायला मुद्देच ठेवले नाहीत एक्का साहेबांनी. तरी काही रडे लोक सरपटी चेंडू टाकून खेळाची मजा घालवत आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Mon, 06/15/2015 - 14:45

Permalink

माझे मत

या अतिरेक्यांनी १८ जवान मारले. त्या संघटनेला धडा शिकवला. यामुळे भारतीय जवानांचे मनोबल वाढले हे निश्चित ! मारले गेलेले १८ जण त्यांच्यापैकीच कुणाची तरी मुले असतात म्हणून सर्वसामान्य माणसाला पण यामुळे चांगले वाटले. बाकी राजकीय ओकार्‍या, स्टॅटिस्टिक , फायदे तोटे याच्याशी काही देणे घेणे नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by पुण्याचे वटवाघूळ on Mon, 06/15/2015 - 15:00

In reply to माझे मत by कपिलमुनी

Permalink

आश्चर्यकारक

बाकी राजकीय ओकार्‍या, स्टॅटिस्टिक , फायदे तोटे याच्याशी काही देणे घेणे नाही.
खरोखरच? 'ते' पादले तरी 'भक्त' चांगला वास आला असे म्हणतील असे काहीसे तुम्ही मागच्या वर्षी म्हणाला होतात (त्या प्रतिसादाला पंख लागले बहुतेक). जिथेतिथे मोदी दिसणार्‍यांनी राजकीय ओकार्‍यांशी घेणेदेणे नाही असे म्हणणे आश्चर्यकारकच आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Mon, 06/15/2015 - 15:42

In reply to आश्चर्यकारक by पुण्याचे वटवाघूळ

Permalink

आश्चर्यकारकच ?

स्टँप मारायची घाइ कशाला करताय ? इतरत्र एका ठिकाणी मी स्वतः भाजपाला मतदान केले आहे असेही लिहले आहे. पण जिथे मला चुकले असे वाटते तिथे चूक म्हणायचे नाही का ? आता भक्त प्रत्येक गोष्टीचा उदोउदो करतात . उदा : जमीन अधिग्रहणामधल्या 'काही' तरतूदी असतील ,राष्ट्रवादीशी घरोबा असेल किंवा परदेशी जाउन भारताच्या पूर्वसरकारची निंदा असेल , या गोष्टी मला आणि बरेच भाजपासमर्थकांना पटल्या नाहियेत. बाकी आजकाल मोदी म्हणजे संपूर्ण भाजपा , आणि मोदीविरोध म्हणजे देशविरोध असे मानायची फॅशन आली आहे. राजकीय ओकार्‍या या भाजपा , काँग्रेस आणि आप सर्वजणच काढत आहेत. आपल्या देशाचे फार मोठे सुदैव की आपले लष्कर या सर्वांपासून अलिप्त आहे. बाकी भक्तां बद्दल जे म्हणल होता ते मत अजून पक्के झाले आहे आणि भक्तांनी ते सिद्धच केले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Mon, 06/15/2015 - 15:52

In reply to आश्चर्यकारकच ? by कपिलमुनी

Permalink

सोडा ओ मुनीवर..

सोडा ओ मुनीवर.. बिकाऊ मिडीयाच्या तुलनेत कितीतरी सरस पद्धतीने योग्य शब्दात झालेली ही चर्चा बघा.. मला पण आत्ताच सापडली.
  • Log in or register to post comments

Submitted by पुण्याचे वटवाघूळ on Mon, 06/15/2015 - 16:02

In reply to आश्चर्यकारकच ? by कपिलमुनी

Permalink

क्रिया तशी प्रतिक्रिया

बाकी भक्तां बद्दल जे म्हणल होता ते मत अजून पक्के झाले आहे आणि भक्तांनी ते सिद्धच केले आहे.
याला इंग्लिशमध्ये एक छान टर्म आहे-- सेल्फ फुलफिलिंग प्रॉफेसी. म्हणजे मोदी समर्थक असा कोणी नसतोच. जो कोण असेल तो भक्तच असा पूर्वग्रह नक्की करायचा. आणि मग दोनचार मिसळपावकरांनी राष्ट्रवादीशी हातमिळवणी करायचे समर्थन केले असेल तर इतर अनेकांनी त्याला विरोध केला होता याकडे दुर्लक्ष करून 'बघा भक्त कसे करतात' असे म्हणायला आणि ती सेल्फ फुलफिलिंग प्रॉफेसी बघायला तुम्ही वेगळे.आता भक्त आणि परमभक्त अशाच कॅटेगिरी निर्माण केल्या आहेत तुम्ही लोकांनी. आणि वर उल्लेख केलेला प्रतिसाद तुम्ही मागच्या वर्षी दिला होतात त्याविषयी तुमचे काय म्हणणे आहे? म्हणजे तुम्ही मोदींविषयी अशी भाषा वापरायची आणि मोदी समर्थकांनी मात्र सभ्यपणेच वागायचे अशी अपेक्षा असेल तर ती चुकीची आहे. आजही मोदी समर्थकांचा ज्वर वाढलेला दिसतो याचे कारण तथाकथित सेक्युलर लोकांनी कुठलाही पुरावा नसताना १२ वर्षे मोदींविरूध्द कायकाय आकाशपाताळ एक केले होते त्यामागे आहे. ती गोष्ट चुकीची होती असे तुमच्यासारखे लोक मान्य करणारच नाहीत. वाजपेयी पंतप्रधान असतानाही त्यांना विरोध करणारे होते पण ते विरोधकही सभ्यपणे विरोध करत होते. पादणे सारख्या चारचौघांमध्ये वापरायच्या शिष्टाचाराशी विसंगत अशी भाषा वाजपेयींविषयी कुणी केली नव्हती. त्यामुळे वाजपेयी समर्थकही त्यांची पातळी सोडत नसत. पण मोदी हे नाव ऐकल्यावरच ज्यांना कावीळ होते अशांच्या असल्या खालच्या पातळीवरच्या टिकांमुळे मोदी समर्थकही अती करतात. क्रियेला प्रतिक्रिया येणारच हे न्यूटन महाशय ३०० वर्षांपूर्वीच म्हणून गेले आहेत.ही क्रिया १२ वर्षे होतच होती आणि तुमच्यासारखे लोक त्यात भर पाडतात.त्यामुळे प्रतिक्रियाही अधिक प्रमाणात तिखट होणार हे तुम्हाला मान्य केलेच पाहिजे.
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Mon, 06/15/2015 - 16:21

In reply to क्रिया तशी प्रतिक्रिया by पुण्याचे वटवाघूळ

Permalink

सभ्यपणेच ?

मोदी समर्थक सभ्यपणेच वागतात हा सर्वात मोठा गैरसमज आहे. मनमोहन सिंग , सोनिया यांच्या मॉर्फ इमेज पाहिल्या नाहीत का ? आजसुद्धा मोदी समर्थक केजरीवल विषयी काय भाषेत बोलतात, कुठल्या इमेज टाकतात हे आपण सामाजिक संस्थळावर पाहिले नाही का ? वाजपेयींच्या काळात असा विरोध नव्हता. म्हणून न्यूटनचा लॉ सर्वाना लागू होतो . जर मोदी समर्थकांनी पातळी सोडली तर समोरून तसेच उत्तर येणार . तुम्ही माझा प्रतिसाद केवळ सांगितला , पण तो का , कुठे दिला , कोणत्या प्रतिसादावर दिला हे सांगितले नाहीत. फक्त सिलेक्टीव्ह रीडिग केले आहे. मोदी समर्थक आणि भक्त मध्ये एवढाच फरक आहे , की समर्थकाला एखादी गोष्ट पटली नसेल तर तो नाही म्हणतो पण भक्त मात्र माझ्या नेत्याच्या सर्वच गोष्टी कशा योग्य आहेत हे ठासून सांगतो . बाकी,यामध्ये गोध्रा प्रकरण घुसवून आणि माझे त्याबद्दल काय मत असेल हे ठरवून टाकलेत जे वाचून मौज वाटली.
  • Log in or register to post comments

Submitted by पुण्याचे वटवाघूळ on Mon, 06/15/2015 - 16:29

In reply to सभ्यपणेच ? by कपिलमुनी

Permalink

मोदी समर्थक सभ्यपणेच वागतात

मोदी समर्थक सभ्यपणेच वागतात हा सर्वात मोठा गैरसमज आहे.
तोच तर मुद्दा आहे. वाजपेयींच्या काळात सभ्यपणे वागणारे समर्थक आता मोदींच्या काळात पिसाळल्यासारखे का करतात? कारण तुमच्यासारख्या लोकांनीच १२ वर्षात जे आकांडतांडव केले त्यामुळे. म्हणजे तुम्ही कसेही वागणार आणि इतरांनी मात्र सभ्यपणेच वागले पाहिजे ही अपेक्षा करणे चुकीचे आहे. मे २०१४ पासून तुमच्यासारख्या लोकांनी सभ्यपणे टिका केली असती तर कदाचित १२ वर्षांची धग पुढील वर्ष-दोन वर्षात विझायची शक्यता होती. पण तुम्हीच असभ्य टिका मोदींवर चालूच ठेवल्यामुळे हा पोलिटिकल डिस्कोर्स चांगला व्हायची शक्यता अजून धुसर झाली आहे. तेव्हा तुम्ही इतरांकडे एक बोट दाखवता तेव्हा चार बोटे तुमच्याकडेच वळली आहेत (१२ वर्षांपासून) हे लक्षात घ्या.
  • Log in or register to post comments

Submitted by पुण्याचे वटवाघूळ on Mon, 06/15/2015 - 16:31

In reply to मोदी समर्थक सभ्यपणेच वागतात by पुण्याचे वटवाघूळ

Permalink

सवसंपादन

या प्रतिसादाला टायटल द्यायचे विसरल्यामुळे 'मोदी समर्थक सभ्यपणेच वागतात' असे टायटल आले आहे. ते या प्रतिसादात उधृत केलेले पहिले वाक्य आहे हे ध्यानात घ्यावे. मोदी समर्थक सभ्यपणेच वागतात असे मला नक्कीच म्हणायचे नाही.मुद्दा एवढाच की ही प्रतिकिर्या आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Mon, 06/15/2015 - 16:51

In reply to सवसंपादन by पुण्याचे वटवाघूळ

Permalink

आकांडतांडव

तुमच्यासारख्या लोकांनीच १२ वर्षात जे आकांडतांडव
माझे किती प्रतिसाद आहेत जिथे मी मागच्या १२ वर्षाबद्दल आकांडतांडव केला आहे? जिथे मी मोदींना गोध्रा किंवा मुस्लिम दंगलीवरून टारगेट केले आहे ? या धाग्यावर मी भूमी अधिग्रहण विधेयकावर चर्चा केली होती. आणि मुद्दे मांडले होते पण एकही भक्त तिथे आला नाही कारण त्यांना मुद्द्यांवर चर्चाच नको . इतर धाग्यांवर प्रचारकी धुरळा उडवणारे भूमी अधिग्रहणाच्या ३- ४ धाग्यांवर फिरकले सुद्धा नाहीत. मे २०१४ पासून तुमच्यासारख्या लोकांनी सभ्यपणे टिका केली असती तर ?? माझ्यासारख्या लोकांनी म्हणजे ? पक्ष बाजूला राहू देत पण वरती भाजपाच्या लोकांनी सोनिया, तेव्हचे पंप्र जी टीका केली , सध्या केजरीवाल यावर ज्या हीन पातळीने टीका करत आहेत तेवढी पातळी तर नक्कीच गाठली नाहिये. मे २०१४ पासून किंवा प्रचारापासून फेकूगिरी सुरू आहे , माझा वैयक्तिक विरोध हा भाजपा किंवा मोदींना कधीच नाहिये , फक्त या चमकोगिरी आणि फेकूगिरीला आहे. एक नागरीक म्हणून जर काही धोरणे मला जनहितविरोधी वाटली तर त्याला विरोध असणारच . बाकी ह्या धाग्याचे काश्मिर नको . इतरत्र किंवा खफ मध्ये चर्चा करू.
  • Log in or register to post comments

Submitted by पुण्याचे वटवाघूळ on Mon, 06/15/2015 - 17:08

In reply to आकांडतांडव by कपिलमुनी

Permalink

सायकॉलॉजी

माझे किती प्रतिसाद आहेत जिथे मी मागच्या १२ वर्षाबद्दल आकांडतांडव केला आहे?
तुमच्यासारखे लोक हो--- व्यक्तिशः तुम्ही नाही.व्यक्तिशः तुमचा संदर्भ फक्त पादण्यासंदर्भात.
या धाग्यावर मी भूमी अधिग्रहण विधेयकावर चर्चा केली होती. आणि मुद्दे मांडले होते पण एकही भक्त तिथे आला नाही कारण त्यांना मुद्द्यांवर चर्चाच नको . इतर धाग्यांवर प्रचारकी धुरळा उडवणारे भूमी अधिग्रहणाच्या ३- ४ धाग्यांवर फिरकले सुद्धा नाहीत.
याची सायकॉलॉजी मला माहित नाही.पण तुमची इमेज जर मोदीविरोधी अशी असेल तर तुम्ही चालू केलेली चर्चा ही मुद्द्यांवर आधारित असेल याची खात्री अनेक मिपाकरांना वाटली नसेल. जसे तुमच्यासारख्यांना श्रीगुरूजींनी चर्चा सुरू केली तर ती मोदींची स्तुती करायलाच असेल असे वाटत असेल त्याचप्रमाणे तुम्ही चर्चा सुरू केली तर ती नक्की सगळ्या गोष्टींचा साकल्याने विचार व्हावा म्हणून केली असेल असे वाटणार नाही तर ती टिका करायलाच केली आहे असे वाटणार. जर का इस्पिकैका किंवा विकास यांनी चर्चा सुरू केली असती तर मुद्दे तेच असले तरी मिस्ळपावकरांची रिअ‍ॅक्शन वेगळी असती.
  • Log in or register to post comments

Submitted by राघवेंद्र on Mon, 06/15/2015 - 20:57

Permalink

लेख आवडला.

एक्का साहेब लेख आवडला. सं. मं. राजकारणावरिल सर्व प्रतिसाद काढले तर खूप छान होईल.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Tue, 06/16/2015 - 11:59

Permalink

झकास लेख...Forgiving a

झकास लेख... Image removed. Forgiving a Terrorist should be left to the GOD, but fixing their appointment with GOD is entirely our responsibility.” :- Indian Army मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- में गोरी चिट्टी छमिया... ;)
  • Log in or register to post comments

Submitted by बबिता बा on Tue, 06/16/2015 - 13:57

Permalink

मी आले

. छान लेख
  • Log in or register to post comments

Submitted by सचु कुळकर्णी on Sat, 10/08/2016 - 03:15

Permalink

कारण, अश्या प्रकारच्या, अंतिम

कारण, अश्या प्रकारच्या, अंतिम परिणाम मिळविण्यासाठी नाही तर मुख्यतः संदेश देण्यासाठी केलेल्या कारवाईनंतर, तिचे अपेक्षित परिणाम साधण्यासाठी, कारवाईच्या बाजूला असणार्‍या लोकांनी तसे करणे आवश्यक असते. तर शासनात असलेल्या पक्षाला त्या कारवाईचे श्रेय मिळू नये अशी त्यांच्या विरोधकांची खटपट असते... ही वस्तुस्थिती देशांतर्गत आणि देशाबाहेर दोन्हीकडे आहे. मात्र, असा विरोध करताना देशाचे भलेबुरे नजरेआड करणे हे जगात इतरत्र अभवानेच पहायला मिळते, पण दुर्दैवाने आपल्या देशात हे काही नवे नाही. :(
Still the same ! लेख पुन्हा एकदा वाचला ;)
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com