फाटकाचं दार हलकेच लोटुन आत शिरलो
तर सगळी बिजागरं, एकसाथ कुरकुरली
इतक्या वर्षानीं आज ह्याला आठवण झाली
माझ्यापासुन दूर होत, जोरात कुजबुजली
माजलेल्या गवताने घुसखोरी केलेल्या अंगणात
किरकिरत तो स्वतःच, स्वता:ला झोके देत होता
"कुठे उलथला होतास? खेळ अर्ध्यातच सोडलास"
पहाताच मला, तारलयीत विचारत होता
माडी चढुन वर गेलो तर माझ्या खोलीतल्या
खिडकीची तावदानं, तावातावानं आदळत होती
अशा कैक सांजा आई ताटकळली होती तिथे
जणू यांचा हिशेबच, उघडझाप करुन देत होती
अचानक छताकडं मान वळवून पाहिले तर
तो म्हातारा वासा, शेवटच्या घटका मोजताना दिसला
ओळख लागताच अगदी बाबांच्या आवाजात म्हणाला
"आता माझ्याच्यानं नाही होत रे!! सांभाळ ह्या घराला!!"
तुझी वाट बघताना, अखेरीस बाबांचा धीर सुटला होता
हे आईने कळवळून सांगुनसुद्धा मला तेव्हा पटलं नाही
कितीही उशीर झाला तरी माझ्यासाठी जागणार्या आईनेही
मग अखेरच्या क्षणी माझ्यासाठी थांबायची तसदी घेतली नाही
उशिरा उमगले, उतारवयात त्यांची फक्त अवहेलनाच झाली
मुजोरपणामुळे माझ्या, भरल्या घरात एकांतवासाची शिक्षा झाली
त्यांच्या आठवणी डोळ्यांत उतरताच, हलकेच जाणवले की.....
ती थकलेली "वास्तु"... आता तिच्या रिकामेपणातही भरुन आली
| लेखनविषय: |
|---|
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त रे...
मस्त रे...
सजीव असो वा निर्जीव, आयुष्याच्या संध्याकाळी अशी अवस्था कुणाच्याच वाट्याला येवू नये राव :(
कविता आवडलीच..
कविता आवडली
येता जाता सतत अशा कितीतरी वास्तू अबोलपणे निष्प्राण होताना पाहते. त्यांचं म्हणणं ऐकायला कोणाजवळ वेळ आहे?
छानच. सगळं डोळ्यासमोर आलं
छानच. सगळं डोळ्यासमोर आलं अगदी.
सुंदर.
सुंदर.
अत्यंत प्रभावी....
एकेकाळी भरलेलं गोकुळ असणार्या एका देखण्या वास्तूला नंतर असच पार मिटून, विझून गेलेलं फार जवळून बघीतलय मी. त्यामुळे तुमच्या कवितेला पूर्णपणे रिलेट करून शकते.
धन्यवाद
सगळ्यांचे मनपुर्वक आभार....
सुरेख लिहिली आहे.
सुरेख लिहिली आहे.
अशीच एक वास्तु डोळ्यासमोर उभी
अशीच एक वास्तु डोळ्यासमोर उभी राह्यली. छान लिहीलंय.
धन्यवाद
आपल्या सगळ्यांचे आभार.
"उशिरा उमगले, उतारवयात
"उशिरा उमगले, उतारवयात त्यांची फक्त अवहेलनाच झाली
मुजोरपणामुळे माझ्या, भरल्या घरात एकांतवासाची शिक्षा झाली"-
डोळ्यात पाणीच आलं. माणासं का अशी दुष्ट होऊ शकतात, कळतच नाही.
लहानपणी त्या मुलाचं सगळं हगलं मुतलेलं, ओकलेलं काढायचं, स्वतःचा घास कमी करून त्याला खाऊ घालायचं, डोळ्यात तेल घालून त्याला जपत जपत मोठं करायचं, आणि मोठेपणी त्यानंच लाथाडून जायचं.
कविता
बादवे, पण कविता खूप झक्कास जमलीय!
मला आवडली खूप!
आवडली म्हणण्यापेक्षा तिनं मला खिन्न केलं असं म्हणणं सयुक्तिक ठरेल.
धन्यवाद भरत.
In reply to कविता by जडभरत
धन्यवाद भरत.
प्रतिक्रियेबद्दल आभार
मस्तच
मस्तच