Skip to main content

ते तिघं !

लेखक चिनार यांनी गुरुवार, 22/01/2015 08:43 या दिवशी प्रकाशित केले.
ते तिघं सध्या आपल्या सगळ्यांच्या घरात धुमाकूळ घालतायेत. त्यांना वेळीच आवरलं नाही तर घरात राहणं मुश्कील होईल. आपल्या कळत-नकळत आपली तुलना सतत त्यांच्याबरोबर होते आहे. आपलं कुटुंबप्रमुख पद त्यांच्यामुळे धोक्यात येऊ शकतं. आणि आपण काहीही केलं तरी त्यांना आता अवरु शकत नाही. ये हमारे बस की बात नही!! आता तुम्ही विचाराल , हे कोण तुर्रमखान ? त्यांची ओळख काय ? त्याचं कर्तुत्व काय ? ओळख म्हणाल तर आपल्या रोजच्या सक्तीच्या पाहण्यातले. कर्तुत्व म्हणाल तर अफ़ाट ! अचाट ! पहिला -- आजीने कष्टाने उभे केलेल्या गृह उद्योगाचा एकमेव वारस आणि मालक असलेला श्री ! (होणार सून मी त्या घरची ) दुसरा -- एका गर्भश्रीमंत घरातली पोरगी पटवण्याचा पराक्रम गाजवलेला राया !! (जावई विकत घेणे आहे ) तिसरा -- गांधीजींची सहनशीलता, टिळकांचा दुर्दम्य आशावाद, श्रावणबाळाइतका आज्ञाधारक इत्यादी गुण पदरी घेऊन साक्षात श्यामच्या आईने सुद्धा जिची ट्युशन लावावी अश्या मातेच्या पोटी जन्मलेला सुपुत्र आदित्य !!! (जुळून येती रेशीमगाठी) आता बोला! आहे का तुमच्यात हिम्मत यांना आवरण्याची ? आहे का तुमच्यात हिम्मत संध्याकाळी ७-१० या वेळात बायकोच्या हातून रिमोट हिसकण्याची ? नाही ना ! मग गप्पं बसा. आणि त्या तिघांच्या पराक्रमाच्या गाथा पहा. घरातल्या वेगवेगळ्या स्वभावाच्या आणि आकाराच्या सहा-सात बायकांच्या कटकटी सांभाळून व्यवसायामध्ये इतकं नेत्रदीपक यश मिळवणं म्हणजे खायचं काम नव्हे. त्यात मधूनच अनेक वर्षांपूर्वी घराबाहेर काढलेला बेवडा काका घरात वापस येतो. मग वाल्याचा वाल्मिकी व्हावा तसं या काकामध्ये आमुलाग्र बदल घडून येतो. या बदलाचा शिल्पकार अर्थातच श्री असतो. काहीही कारण नसताना घर सोडून गेलेले श्री चे वडील काहीही कारण नसताना परत येतात. मग श्री स्वत: ची मानसिक कुचंबणा वैगेरे काहीतरी विसरून हळूहळू वडीलांना स्वीकारतो. हाच श्री स्वत: च्या चुकीचं प्रायश्चीत्त म्हणून घरदार सोडून एका "हौटेल" मध्ये राहून फार हलाखीचे दिवस काढतो. संगणकासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून श्री त्यांचा गृहउद्योग एका नव्या उंचीवर नेउन ठेवतो. आर्थिक मंदी वगैरे शब्द त्याच्या गावीच नाहीयेत.त्याने नवीन उत्पादन बाजारात आणलं रे आणलं की त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळतो. श्री च्या व्यक्तीमत्वाचा आणखी एक पैलू म्हणजे लग्नानंतर सुद्धा त्याचं आपल्या बायकोवर नितांत प्रेम आहे. फक्त त्याच्या बिझी शेड्युलमुळे तो तिला जास्त वेळ देऊ शकत नाही. आता एकचं माणूस कुठेकुठे पुरणार ना ! मधल्या काळात श्री च्या बायकोचा अपघात होऊन तिचा स्मृतीभंश होतो. अशातही श्री खचून जाऊन मालिका बंद पडू देत नही. तर सुरवातीचेच चाळीस पन्नास एपिसोड परत दाखवून बायकोची स्मृती परत आणतो. श्री ची सामाजिक बांधिलकी सुद्धा वाखाणण्याजोगी आहे बरं का ! फावल्या वेळात तो मित्र मैत्रिणींचे लग्न लावून देतो, लहान पोरांचे हरवलेले मायबाप शोधून देतो, सासूबाईंचे नखरे सांभाळतो. थोडक्यात काय तर श्री चं अष्टपैलू व्यक्तीमत्व समजून घ्यायला अजून ५०० एपिसोड तरी नक्कीच बघावे लागतील. तोपर्यन्त आपली खैर नाही. रायाचं कर्तुत्व ऐकून तर तुम्हाला स्वत: ची लाज वाटेल. काहीही करत नसलेल्या रायाला एकेदिवशी अचानक लौटरी लागते. एका गर्भश्रीमंत घरातली मुलगी त्याच्या प्रेमात पडते. यथावकाश (म्हणजे सावकाश पन्नासेक एपिसोड नंतर) त्यांचे लग्न होते.श्रीमंत सासू-सासरे रायाला घरजावई व्हायला सांगतात. पण आपला स्वाभिमानी राय त्यांना ठाम शब्दात नकार देतो. पुढल्या काळात राया स्वत:चा व्यवसाय सुरु करतो ह्या लोकांना व्यवसाय सुरु करताना भांडवल, जागा, परवानग्या असल्या फालतू अडचणींना सामोरं जावं लागत नाही .मनात येईल तेव्हा व्यवसाय सुरु करायचा आणि दोन महिन्यातच त्याची कीर्ती सगळीकडे पसरवायची एवढंच त्यांना माहिती ! श्री आणि रायानी भागीदारीत आखाडी कंपनी सुरु केली ना तर अंबानी आणि अदानीची काही खैर नाही. असो. तर एकेदिवशी नाईलाजाने रायाला घरजावई म्हणून सासू-सासऱ्यांचा घरी जावं लागते. तरीही ना डगमगता राया तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय. त्यात जर त्याला यश आले तर सावरकरांच्या इंग्रजांच्या कैदेतून सुटकेच्या घटनेइतकंच ऐतिहासिक महत्त्व या घटनेला प्राप्त होईल. श्री प्रमाणेच रायाच सुद्धा बायकोवर नितांत प्रेम आहे. ते सिद्ध करण्यासाठी अधुनमधून तो तिला चहा वैगेरे करून देतो. तुम्ही कितीही वेळ घोटला ना तरी तुम्हाला इतका सुंदर चहा जमणार नाही. रायाच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे राया अतिशय शांत आणि संयमी आहे. बहुधा त्याचा हाच गुण बायकांना आवडत असावा. श्री आणि राया यांच्या गाथा ऐकूनच जर तुम्ही थंडे झाले असला तर महात्मा आदित्यच्या तर जवळपासही येऊ नका. हम दिल दे चुके सनम मधल्या आजी देवगणचा वंशज असलेला आदित्य त्याच्या कितीतरी पुढे गेलेला आहे. गंमत अशी आहे की साधारण ज्या लोकांना आपण महात्मा म्हणतो, ते सगळे जन्मानंतर त्यांच्या कर्तुत्वाने महात्मा झाले. आदित्य आईच्या पोटातूनच महात्म्य घेऊन जन्माला आलाय. आदित्य च्या आईचा स्वभाव इतका गोड आहे की तिच्या फक्त सहवासानेच एखाद्याला डायबेटीस होईल. त्यामुळेच आदित्य एक अत्यंत सुस्वभावी मुलगा आहे. लग्नानंतर त्याच्या बायकोने त्याला 'हम दिल आधीचं किसीको दे चुके सनम' असं सांगितल्यावरही तो तिच्यावर चिडला नाही. तिच्यावर नातं स्वीकारण्याची जबरदस्तीही त्यानी केली नाही. याउलट तिला निर्णय घेण्याची मोकळीक दिली. हळूहळू तिला आदित्यचा चांगुलपणा उलगडू लागला. ती त्याला 'तू किती चांगला आहेस रे' असं दर एपिसोड मध्ये तीनदा म्हणायला लागली. तरीसुद्धा आदित्य तिला " मग राहा ना माझ्यासोबत भवाने !' असं एकदाही म्हणाला नाही.शेवटी तिनेच पुढाकार घेऊन प्रेमाच्या सुधारीत आवृत्तीची कबुली दिली. मगच त्यांचा सुखाचा संसार सुरु झाला. पण म्हणून मालिका बंद करण्याइतका आदित्य स्वार्थी नाहीये. तो एक जबाबदार मुलगा,भाऊ,जावई आहे. सगळ्यांच्या घरातल्या सगळ्या समस्या सोडवल्याशिवाय तो शांत बसत नाही. समस्या कमी पडल्याच तर घराबाहेरचं प्रेम प्रकरण सुद्धा तो मार्गी लावून देतो. थोडक्यात म्हणजे श्री,आदित्य,राया ही त्या सर्वशक्तीमान ईश्वराचीच तीन रूपं असल्यासारखी वाटतात. आपल्यासारखे सर्वसामान्य पुरुष त्यांच्यासमोर काय टिकणार ? निदान त्यांची अवतारसमाप्ती होईपर्यन्त आपली धडगत नाही. जास्तीत जास्त आपण सूड म्हणून त्या तिघांना एक शाप देऊ शकतो. "अरे चांडाळान्नो, तुम्हाला सुद्धा रोज ह्याच मालिका बघाव्या लागो रे !!!" --चिनार
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 31992
प्रतिक्रिया 161

प्रतिक्रिया

श्री च्या व्यक्तीमत्वाचा आणखी एक पैलू म्हणजे लग्नानंतर सुद्धा त्याचं आपल्या बायकोवर नितांत प्रेम आहे.>>> हा खरोखर षटकार आहे राव ;)

तो राया, आयचा - जाम डोक्यात जातो तो.. त्याचं थोबाड असलं शेळपट आहे, मंदसारखा हसत असतो आणि शाळेतल्या गॅदरींग मधे ज्यांना मारून-मुटकून भाग घ्यायला लावला असतो त्यांच्यासारखे डॉयलॉग डिलीवरी करतो @#$#$@#$... आणि तो श्री... नेहमी ढूं*ण आवळून चालत असतो, आणि चेहर्‍यावर तेच भाव - खळखळून जुलाब होत असल्यासारखे. असं वाटतं की जुलाब दाबून धरलेत आणि कॅमेरा दुसर्‍यावर गेला आणि पुन्हा ह्याच्यावर येईपर्यंत हा मोकळा होऊन येतो. जयमल्हार तर दगडच, हाव-भावाने पण आणि डोक्यानेपण (अतिपैलवानाचा गुडघ्यात असतो म्हणतात तसा). सदा-न-कदा त्याला तो प्रधान सल्ले देत असतो नाहीतर बायको डाफरत असते. हा आपला फक्त डोले-शोले दाखवत फिरत असतो - मख्ख. आणि ह्या सगळ्यात, तुम्ही अस्मिता ला... ओह सॉरी 'अस्मिता प्रभाकार अग्नीहोत्री (हग्रीमुत्रि)" ला कसं विसरलात ? आहो बी.बी.सी शेरलॉक च्या तोडीच्या केसेस असतात... शेरलॉक (बेनेडीक्ट) ने जर पाहिलं ना अस्मिता तर तडक तोही शेरलॉक सोडून ट्रासजेंडर होऊन अस्मिता चा रोल काबीज करेल हो... एवढी जबरदस्त आहे आमची अस्मिता.

In reply to by उदय के'सागर

रायाबद्दल अगदी सहमत. आणि ती रायबाघन नाकाखालच्या भागाला सौम्य सूज आल्यासारखी दिसते. (बाद्वे - ती शिरल संपणारे असं कळलं) काही (कैच्याकै) ऐकीव माहिती: (१) "होणार सुन्न मी याघर्ची" शिरलची संवादलेखिका मधुगंधा कुलकर्णी म्हणजे "जुळू नये ती रे. गा." मधली मोठ्या भावाची बायको (२) "जुळू नये ती रे. गा." फेम प्राजक्ता माळीचा नवरा म्हणजे जैमल्हारचा नवा हेगडे प्रधान (सौजन्यः मातोश्री)

In reply to by आदूबाळ

"होणार सुन्न मी याघर्ची" शिरलची संवादलेखिका मधुगंधा कुलकर्णी म्हणजे "जुळू नये ती रे. गा." मधली मोठ्या भावाची बायको
ही माहिती अगदी बरोबर आहे. स्वतः मधुगंधाचा लोकसत्ता मधे लेख आला होता त्यात तिने ह्याचा उल्लेख केला होता. आणि ती त्या गुणी परेश मोकाशी पत्नी बरं का (माहित नसल्यास). परेश मोकाशी ची पत्नी म्हंटल्यावर आणि अभिनय पण चांगला करते म्हणून तिच्याबद्दल थोडा आदर वाटला(अगदी गोड गोड किंवा नखरेबाज, अक्रस्ताळा, रडका जो अभिनय बाकी बाया करतात त्या सिरीयल मधे, तसा मधुगंधा फार करत नाही म्हणून चांगला अभिनय). पण जेव्हा हे कळालं की हो.सु.मी.ह्या.घ. ची लेखिका ती आहे... आदर पार कोलमडला.
(२) "जुळू नये ती रे. गा." फेम प्राजक्ता माळीचा नवरा म्हणजे जैमल्हारचा नवा हेगडे प्रधान
हे ही शक्य असेल... कारण प्राजक्ता म्हणे हार्डकोर क्लासिकल डांसर आहे आणि तो प्रधान पण आहे क्लासिकल डांसर...

In reply to by उदय के'सागर

परेश मोकाशी पत्नी बरं का
हे माहीत नव्हतं. बाद्वे - का रे दुरावाचा लेखक अंबर हडप आहे हे श्रेयनामावळीत वाचून वाईट वाटलं. बालक पालक (मूळ एकांकिका) आणि "थरारली वीट" सारखी विस्फोटक, वादग्रस्त एकांकिका लिहिणार्‍या वाघाला हे गवत लिहायला लागलं हे वाईट्च

In reply to by आदूबाळ

अहो प्रविण तरडेंचं ही तेच झालं हो... पुण्यातल्या कॉलेजसला पुरुषोत्तम करंडक मिळवून देणारी नाटकं दिली आणि नुसतं अवॉर्ड /करडंकच नाही पण लोकप्रिय एकांकिका दिल्या. पण नंतर जेव्हा असे गुणी कलाकार पिंजरा, कुंकू सारखे मालिका लिहीतात हे समजलं तेव्हा वाईट वाटलं. (अता पुन्हा नव्याने तरडे साहेब 'क्वालीटी' काम करताहेत हे पाहून छान वाटलं)

In reply to by उदय के'सागर

मला तर त्या रायाच्या सगळ्याच घरच्यांची मजा वाटते... नाही म्हणजे घरातल्या आजीपासून मुलींपर्यंत सगळे एकाच माणसाला राया म्हणत असतील तर किती विचित्र वाटेल ते. :)

छळ आहेत.. छळ... बाकी मेघनाने "प्रेमाच्या सुधारित आवृत्तीची कबुली" खतरनाक पंच!!! एक प्रश्न.. जय मल्हार मध्ये खंडेराय आपले शिवत्व म्हाळसाला देतात ना.. आणि आता मी "सामान्य माणूस" म्हणुन दाग-दागिने काढुन, सेवक सोडुन गेले आहेत ना... मग आता ते जागो जागी "शिवलिंग" कसे स्थापन करत आहेत?

जबरी लिहिलंय.... आमच्या कडे याचे रिपीट एपिसोड्स पण बघितले जातात.

आदित्य नगरकरला काही बोलायचे नाही बरं का ... वा.........

महादेव नावाची सिरियल … सुरुवातीला छान वाटली पण त्यात नंतर तेच तेच राक्षस नवीन नवीन नावाने अवतरीत व्हायला लागले … आणि त्यातही बहुतेक बजेट कमी म्हणून कि काय प्रत्येक राक्षस शिवांश म्हणजे तो रोल पण मोहित रैना करणार …. म्हणजे त्याला महादेवचा अवतार म्हणावे कि राक्षस तेच कळायचे नाहि।… त्या मालिकेत महादेवाणे जसे असुरांचे marathon (WWE च्या भाषेत Royal Rumble Match ) संपवले तशीच ती मालिकाही अचानक मधेच संपवावी लागली …. (२४ वर्षे शिव शंकराचे अखंड स्मरण करणारा आमच्या जवळचा शिवभक्त सुद्धा कंटाळला म्हणे त्या महादेवाला । आता बोला )

जय मल्हार मध्ये असलेला टॅब आणि व्हिडीओ कॉलिंग जबर्‍या ! आता मला कळला देवांना पृथवीकडे लक्ष द्यायला वेळ का नाहिये ते ;)

एवढ्या लोकाना माहिती असलेलं काही मला माहित नसल्याचं दुःख झालंय.बघायला हव्या शिरियली.पण मग पुस्तकं वाचायला वेळ कसा मिळेल? काय विवंचना आहे!

जबरी!! आवडलंय... "अग्निहोत्र" मालिका मस्त होती.

In reply to by कहर

लेखक म्हणून चिन्मय मांडले चांगला असेलही (असंभव आणि अग्निहोत्र दोन्ही मी पाहिल्या नाहीत) पण अभिनय मात्र फार भडक करतो हा माणूस. "तू तिथे मी" सिरीयल मधला त्याचा अभिनय तर फारच अंगावर यायचा (अगदी कधी एखादा एपीसोड काही मिनीटांसाठीही पाहवत नव्ह्ता.. असो, एकदाची संपली - बरं झालं)

In reply to by उदय के'सागर

चिन्मय मांडलेकर अभिनय सुंदर करतो पण भूमिका तशी हवि… त्याचा झेंडा आणि मोर्यातील अभिनय छान आहे… पण डेली सोप "तू ती मी "बद्दल… नो कमेंट्स *secret* :-X :-x X: x: :-# :# :secret:

In reply to by कहर

हो काही ठिकाणी अभिनय छान केलाय खरा. मला त्याचा गजर (गाजर नव्हे) मधला अभिनय पण चांगला वाटला होता.

In reply to by टवाळ कार्टा

यक्स.. जान्हवी लोकांना आवडते :( ... अशक्य किरकिरीत आणि सदैव सर्दी असल्यासारखा आवाज.... चिचूंद्री मेली.....

In reply to by आचारी

मेकअप मुळे असेल.खर्या जाह्नवीचा रंग सावळा आहे.कमाल आहे मेकअप वाल्यांची.रोज एकसारखा मेकअप कसा काय करतात? कोर्टातली घटस्फोटाची केस खरी होती.श्री सुद्धा कंटाळला जाह्नवीला!

जेव्हा मेघना अगदि "ए काय रे आदित्य!!!" हे ईतक्या अति लाडाने बोलते कि जाउन तीला गदागदा हलवाविशी वाटते!!! नाहि म्हणायला "जय हो बाबाजी" मुळे तर फारच करमणूक होते.

In reply to by असंका

ते जो पर्यंत कपाळावरुन (त्यांच्याच) सतत हात फिरवत वर बघत नाहि त्याशीवाय एपीसोड पुर्णच होत नाहि. आता अजून भर म्हणजे चित्रा आणि मनोज पण. चित्रा मान हलवत बोलायला लागली कि वाटतं जाउन सांगावं...बाई जास्त मान हलव्त जाउ नकोस....कटकन मोडेल एखाद दिवशी!!!

हे कमी म्हणून अजून कुठलीतरी निर्बुद्ध मालिका येतेय... कालच ट्रेलर पाहिला. बाबा: माझ्या मुलीवर प्रेम करतोस? मुलगा: नुसतं प्रेम नाही लग्न करणारे तिच्याशी... बाबा: मला तिच्या डोळ्यात पाणी आलेलं चालत नाही मुलगा: मला सुद्धा चालत नाही... वगैरे वगैरे बडबड करुनपण पोरगा हटत नाही म्हटल्यावर बाप हुकमाचा एक्का टाकल्यासारखं विचारतो बापः तिला बापाचं सुख देऊ शकशील? लगेच ती माठ पण बापाकडे कौतुकाने बघते. आँ??? अरे काय चाललंय? पोरीचं लग्न लावताय का तिला दत्तक देताय?

In reply to by थॉर माणूस

मुलाने त्या बापाला विचारयचं...तिला नवर्‍याचं सुख देउ शकाल?

बहुमान माझा. पूस्पुगुच द्या.

In reply to by बॅटमॅन

घ्या वरच्या आजीमधलीच एक....सगळ्या पूस्पुगुच वानीच हायेत!!! :D

आईगग्ग्ग्ग्ग! तीन महिने आधी मी सुखी होते. या पात्रांच्या अस्तित्वाची फारशी जाणीव नव्हती पण आई बाबा आल्यावर आईनं जय मल्हार आणि वरील तीनपैकी दोन (बहुतेक) मालिका बघण्याचा क्रम सुरु केला आणि वैताग आला. आम्ही त्या मालिका विनोदी म्हणून बघू लागलो तशी ती आम्हाला रागीट लूक्स देऊ लागली. ;) त्यातून म्ल्हाराकडे बोट लाखवून नातवाने "तो मॅन असं का करतोय?" असं विचारल्यावर याला देवाचं नाव माहित नाही म्हणून माझा उद्धार झाला रे देवा मल्हारा!

४ करामती टाळकी जमा करा.. टीव्ही म्युट करा.. आणि आपण डायलॉग म्हणायला सुरुवात करा

मस्त चिरफाड! अजून लिहा जयमल्हार बद्दल!

In reply to by जेम्स बॉन्ड ००७

हे जाम भारी आहे. बाकी आमच्या घरात संध्या. या मालिका लावतातच. त्यावेळी टी.व्ही. समोरून गेलेलंही चालत नाही या सिनिअर्स ना. शिवाय झोप येत नाही या कारणास्तव पहाटे पहाटे रिपीट टेलिकास्ट पाहिलं नाही तर पाप लागतं अशी पण भीती वाटते बहुतेक. काय रे बाबा... अक्षरशः वैताग असतो हा. बरं इतकं मनापासून पहातात की बास. आमच्या बाबांचा ग्रूप आहे एक. सगळे सिनिअर्स गप्पा हाणतात संध्याकाळी आणि होम मिनिस्टर च्या वेळी इतकया लगबगीने घरी येतात की हसावं की रडावं ते कळत नाही. संध्या. ७ ते ११ चालू. झी मराठी, ई टिव्ही, स्टार प्रवाह सग्ग्ळ्ळं पहायचंच. :(

In reply to by सविता००१

मुख्य प्रॉब्लेम हा आहे की हे सग्ळे या मालीका "मन लाउन" पहातात आणि त्या मालिकांत त्यांना मठ्ठ्पणा जाणवत नाही

In reply to by टवाळ कार्टा

अगदीच बाडीस. त्यांच्या या मालिका वेडेपणापायी काय करावं कळत नाही. इतर गोष्टी विसरतील वयोपरत्वे पण त्या मूर्ख जान्हवीच्या घरी काय चाल्लय याबद्दल तासंतास बोलतील. कठीण आहे