Skip to main content

ते तिघं !

लेखक चिनार यांनी गुरुवार, 22/01/2015 08:43 या दिवशी प्रकाशित केले.
ते तिघं सध्या आपल्या सगळ्यांच्या घरात धुमाकूळ घालतायेत. त्यांना वेळीच आवरलं नाही तर घरात राहणं मुश्कील होईल. आपल्या कळत-नकळत आपली तुलना सतत त्यांच्याबरोबर होते आहे. आपलं कुटुंबप्रमुख पद त्यांच्यामुळे धोक्यात येऊ शकतं. आणि आपण काहीही केलं तरी त्यांना आता अवरु शकत नाही. ये हमारे बस की बात नही!! आता तुम्ही विचाराल , हे कोण तुर्रमखान ? त्यांची ओळख काय ? त्याचं कर्तुत्व काय ? ओळख म्हणाल तर आपल्या रोजच्या सक्तीच्या पाहण्यातले. कर्तुत्व म्हणाल तर अफ़ाट ! अचाट ! पहिला -- आजीने कष्टाने उभे केलेल्या गृह उद्योगाचा एकमेव वारस आणि मालक असलेला श्री ! (होणार सून मी त्या घरची ) दुसरा -- एका गर्भश्रीमंत घरातली पोरगी पटवण्याचा पराक्रम गाजवलेला राया !! (जावई विकत घेणे आहे ) तिसरा -- गांधीजींची सहनशीलता, टिळकांचा दुर्दम्य आशावाद, श्रावणबाळाइतका आज्ञाधारक इत्यादी गुण पदरी घेऊन साक्षात श्यामच्या आईने सुद्धा जिची ट्युशन लावावी अश्या मातेच्या पोटी जन्मलेला सुपुत्र आदित्य !!! (जुळून येती रेशीमगाठी) आता बोला! आहे का तुमच्यात हिम्मत यांना आवरण्याची ? आहे का तुमच्यात हिम्मत संध्याकाळी ७-१० या वेळात बायकोच्या हातून रिमोट हिसकण्याची ? नाही ना ! मग गप्पं बसा. आणि त्या तिघांच्या पराक्रमाच्या गाथा पहा. घरातल्या वेगवेगळ्या स्वभावाच्या आणि आकाराच्या सहा-सात बायकांच्या कटकटी सांभाळून व्यवसायामध्ये इतकं नेत्रदीपक यश मिळवणं म्हणजे खायचं काम नव्हे. त्यात मधूनच अनेक वर्षांपूर्वी घराबाहेर काढलेला बेवडा काका घरात वापस येतो. मग वाल्याचा वाल्मिकी व्हावा तसं या काकामध्ये आमुलाग्र बदल घडून येतो. या बदलाचा शिल्पकार अर्थातच श्री असतो. काहीही कारण नसताना घर सोडून गेलेले श्री चे वडील काहीही कारण नसताना परत येतात. मग श्री स्वत: ची मानसिक कुचंबणा वैगेरे काहीतरी विसरून हळूहळू वडीलांना स्वीकारतो. हाच श्री स्वत: च्या चुकीचं प्रायश्चीत्त म्हणून घरदार सोडून एका "हौटेल" मध्ये राहून फार हलाखीचे दिवस काढतो. संगणकासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून श्री त्यांचा गृहउद्योग एका नव्या उंचीवर नेउन ठेवतो. आर्थिक मंदी वगैरे शब्द त्याच्या गावीच नाहीयेत.त्याने नवीन उत्पादन बाजारात आणलं रे आणलं की त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळतो. श्री च्या व्यक्तीमत्वाचा आणखी एक पैलू म्हणजे लग्नानंतर सुद्धा त्याचं आपल्या बायकोवर नितांत प्रेम आहे. फक्त त्याच्या बिझी शेड्युलमुळे तो तिला जास्त वेळ देऊ शकत नाही. आता एकचं माणूस कुठेकुठे पुरणार ना ! मधल्या काळात श्री च्या बायकोचा अपघात होऊन तिचा स्मृतीभंश होतो. अशातही श्री खचून जाऊन मालिका बंद पडू देत नही. तर सुरवातीचेच चाळीस पन्नास एपिसोड परत दाखवून बायकोची स्मृती परत आणतो. श्री ची सामाजिक बांधिलकी सुद्धा वाखाणण्याजोगी आहे बरं का ! फावल्या वेळात तो मित्र मैत्रिणींचे लग्न लावून देतो, लहान पोरांचे हरवलेले मायबाप शोधून देतो, सासूबाईंचे नखरे सांभाळतो. थोडक्यात काय तर श्री चं अष्टपैलू व्यक्तीमत्व समजून घ्यायला अजून ५०० एपिसोड तरी नक्कीच बघावे लागतील. तोपर्यन्त आपली खैर नाही. रायाचं कर्तुत्व ऐकून तर तुम्हाला स्वत: ची लाज वाटेल. काहीही करत नसलेल्या रायाला एकेदिवशी अचानक लौटरी लागते. एका गर्भश्रीमंत घरातली मुलगी त्याच्या प्रेमात पडते. यथावकाश (म्हणजे सावकाश पन्नासेक एपिसोड नंतर) त्यांचे लग्न होते.श्रीमंत सासू-सासरे रायाला घरजावई व्हायला सांगतात. पण आपला स्वाभिमानी राय त्यांना ठाम शब्दात नकार देतो. पुढल्या काळात राया स्वत:चा व्यवसाय सुरु करतो ह्या लोकांना व्यवसाय सुरु करताना भांडवल, जागा, परवानग्या असल्या फालतू अडचणींना सामोरं जावं लागत नाही .मनात येईल तेव्हा व्यवसाय सुरु करायचा आणि दोन महिन्यातच त्याची कीर्ती सगळीकडे पसरवायची एवढंच त्यांना माहिती ! श्री आणि रायानी भागीदारीत आखाडी कंपनी सुरु केली ना तर अंबानी आणि अदानीची काही खैर नाही. असो. तर एकेदिवशी नाईलाजाने रायाला घरजावई म्हणून सासू-सासऱ्यांचा घरी जावं लागते. तरीही ना डगमगता राया तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय. त्यात जर त्याला यश आले तर सावरकरांच्या इंग्रजांच्या कैदेतून सुटकेच्या घटनेइतकंच ऐतिहासिक महत्त्व या घटनेला प्राप्त होईल. श्री प्रमाणेच रायाच सुद्धा बायकोवर नितांत प्रेम आहे. ते सिद्ध करण्यासाठी अधुनमधून तो तिला चहा वैगेरे करून देतो. तुम्ही कितीही वेळ घोटला ना तरी तुम्हाला इतका सुंदर चहा जमणार नाही. रायाच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे राया अतिशय शांत आणि संयमी आहे. बहुधा त्याचा हाच गुण बायकांना आवडत असावा. श्री आणि राया यांच्या गाथा ऐकूनच जर तुम्ही थंडे झाले असला तर महात्मा आदित्यच्या तर जवळपासही येऊ नका. हम दिल दे चुके सनम मधल्या आजी देवगणचा वंशज असलेला आदित्य त्याच्या कितीतरी पुढे गेलेला आहे. गंमत अशी आहे की साधारण ज्या लोकांना आपण महात्मा म्हणतो, ते सगळे जन्मानंतर त्यांच्या कर्तुत्वाने महात्मा झाले. आदित्य आईच्या पोटातूनच महात्म्य घेऊन जन्माला आलाय. आदित्य च्या आईचा स्वभाव इतका गोड आहे की तिच्या फक्त सहवासानेच एखाद्याला डायबेटीस होईल. त्यामुळेच आदित्य एक अत्यंत सुस्वभावी मुलगा आहे. लग्नानंतर त्याच्या बायकोने त्याला 'हम दिल आधीचं किसीको दे चुके सनम' असं सांगितल्यावरही तो तिच्यावर चिडला नाही. तिच्यावर नातं स्वीकारण्याची जबरदस्तीही त्यानी केली नाही. याउलट तिला निर्णय घेण्याची मोकळीक दिली. हळूहळू तिला आदित्यचा चांगुलपणा उलगडू लागला. ती त्याला 'तू किती चांगला आहेस रे' असं दर एपिसोड मध्ये तीनदा म्हणायला लागली. तरीसुद्धा आदित्य तिला " मग राहा ना माझ्यासोबत भवाने !' असं एकदाही म्हणाला नाही.शेवटी तिनेच पुढाकार घेऊन प्रेमाच्या सुधारीत आवृत्तीची कबुली दिली. मगच त्यांचा सुखाचा संसार सुरु झाला. पण म्हणून मालिका बंद करण्याइतका आदित्य स्वार्थी नाहीये. तो एक जबाबदार मुलगा,भाऊ,जावई आहे. सगळ्यांच्या घरातल्या सगळ्या समस्या सोडवल्याशिवाय तो शांत बसत नाही. समस्या कमी पडल्याच तर घराबाहेरचं प्रेम प्रकरण सुद्धा तो मार्गी लावून देतो. थोडक्यात म्हणजे श्री,आदित्य,राया ही त्या सर्वशक्तीमान ईश्वराचीच तीन रूपं असल्यासारखी वाटतात. आपल्यासारखे सर्वसामान्य पुरुष त्यांच्यासमोर काय टिकणार ? निदान त्यांची अवतारसमाप्ती होईपर्यन्त आपली धडगत नाही. जास्तीत जास्त आपण सूड म्हणून त्या तिघांना एक शाप देऊ शकतो. "अरे चांडाळान्नो, तुम्हाला सुद्धा रोज ह्याच मालिका बघाव्या लागो रे !!!" --चिनार
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 31992
प्रतिक्रिया 161

प्रतिक्रिया

In reply to by टवाळ कार्टा

माझा एक मित्र सांगत होता कि त्याच्या आईने त्याला 'जान्हवीसारखी सुन पाहिजे' म्हणुन सांगितलंय. True Story..

In reply to by जेम्स बॉन्ड ००७

माझ्या वडिलांनी मला "जरा जान्हवीसारखी आज्ञाधारक हो!" असं सांगितलय. एवढं म्हणतायत म्हणून ते नियमीत मालिका पहातात का, तर नाही. कधीतरी काहीतरी पहायचं आणि ते चांगलय म्हणायचं.

In reply to by रेवती

तीचं हसणं; म्हणजे ते अ‍ॅज युज्युअल खिंकाळणं आणि शिवाय जुन्या गोष्टी आठवुन आपल्या बटांना हात लावत चेहर्‍यावर जमेल तेवढे बावळट भाव आणत तोंड वाकडं करणं, हे काहीकाही लोकांना नॅचरल वाटतं हे ऐकुन माझ्या तोंडावर अगदी तस्सेच भाव (कपाळाला हात लावुन, बावळ्ट आणि वाकडं तोंड एटसेटरा) पण अगदी नॅचरली आले होते :)

बापरे.. काय हा जुलूम? रोजच्या रोज ह्या मालिका बघणं किंवा बघायला लागणं म्हणजे खरंच कमाल आहे जुलूमाची.. काही दिवसांपासून 'दुर्वा', 'पुढचं पाऊल' इत्यादी बघाव्या लागताहेत. त्यातही मी मधेच इंग्रजी चॅनेल्स लावतो. देवकृपेने बायकोलापण मराठी सिरीयल्स, मुख्यत्वे रडगाणी आवडत नाहीत..

आभसि जगतातील साध्य गाजत असलेला इनोद एअरपोर्टवर उतरल्या उतरल्या ओबामांचा मोदींना पहिला प्रश्न, " जय मल्हार मालिकेतील म्हाळसाचा टॅब कोणत्या ब्रॅण्डचा आहे?? अमेरिकन सिरीज त्यांचे सीजन ५ ते ७ वर्ष नेमाने पाहणारे जगभरातील प्रेक्षक त्यात भारतीय सुद्धा आले. अश्या लोकांना महिला वर्गासाठी डेलीसोप पाहावे लागतात ह्या बद्दल वाईट वाटते. काही वर्षापूर्वी जेव्हा असंभव जोरात चालले होते तेव्हा भारतात आल्यावर एका परिचिताच्या घरी गेलो होतो. घरातील माउलीने असंभव मालिका कशी आता रंगदार वळणावर आली आहे हे मालिकेच्या ब्रेक मधील जाहिरातीकडे दुर्लक्ष करत मला सांगत होत्या ,आणि त्यांचा अभियांत्रिकी च्या शेवटच्या वर्षाला असणारा मुलगा मात्र ती न पाहता काहीतरी आंजा वर पाहत असतो , त्याच्या खोलीत असे सांगितले , त्या मुलाच्या खोलीत गेल्यावर तो संगणकावर प्रिझनर ब्रेक छ पहिला सिझन पाहत होता. त्याच्या माउलीने Dexter चा एकतरी भाग पहिला असता तर अशी विकृत मालिका माझा मुलगा आवडीने पाहतो ह्या बद्दल त्याची वैद्यकीय तपासणी करण्यास सुद्धा मागे पुढे पहिले नसते, अश्यावेळी नाथा कामत चे वाक्य आठवते तुझे जग वेगळे नि माझे वेगळे

In reply to by निनाद मुक्काम …

ते म्हाळसा कॉश्चुम प्रकरण बरच प्रसिद्ध आहे असं दिसतय. लग्नात कोणती साडी नेसायची वगैरेंवर चर्चा चालू असताना अमक्या तमक्या साडीवर म्हाळसा फ्याशचा ब्रोच चांगला दिसेल असे माझ्या साबांचे म्हणणे पडले. तेथील समस्त महिलावर्गाला समजले. मलाही नंतर समजले. या गोष्टी समजल्याशिवाय राहतात थोड्याच? ;)

In reply to by रेवती

अरे वा!! मिळतात का म्हाळसाचे दागिने?!! कुठे मिळतात म्हणे... प्लिझ जरा सांगा की!! (म्हाळसाचे दागिने पाहण्यासाठी जय मल्हार फॉलो करणारी) पिरा..!! कुच तो येडपटपणा मांगता हय जिंदगी मे..

अजूनही श्री-जान्हवी पुराण संपलेले नाही. तिकडे जयच्या लीला वाढत चालल्या आहेत. लवकरच पुढचा भाग लिहावा लागेल असं दिसतंय.. -- अखिल भारतीय 'होणार सून बंद करा रे' संघटनेचे अध्यक्ष - चिनार

जबरदस्त तुमच्या लेखाशी अगदी १०१% सहमत

लेख आल तेव्हा हे कुणीही माहित नसल्यामुळे वाचला नव्हता, अजूनही श्री-जाह्नवीचे जोक्स सोडून माहित नाहीत, पण वाचायला खूप मजा आली. स्टार प्लस वरच्या मालिकांमधल्या अशा सर्वगुणसंपन्न नायकांसाठी 'डिकरा' हा शब्द मध्ये कुठेतरी वाचण्यात आला होता.

चला... बरीच मंडळी मला विचारतात कि तु टिव्ही शिवाय कसा जगू शकतोस? त्यांना मी हा लेख वाचायला सांगू शकतो. :)

जरा त्या माठ, ठोकळ्यासारखा अभिनय करणाऱ्या जय वर कुणीतरी लिहा की. इतक्या माठ माणसावर २-२ पोरी जीव टाकतात ह्याचे खूप आश्चर्य वाटते.

सध्या झी मराठीवर सुरु असलेल्या मालिकांचा दर्जा बघता (माझी अजूनही यातून सुटका नाही !) या लेखाचा दुसरा भाग लवकरच लिहावा म्हणतो..