✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

पानिपत

ब
बिपिन कार्यकर्ते यांनी
Wed, 05/20/2015 - 22:45  ·  लेख
लेख
प्रिय अमोल, काही क्षण हे काही विशिष्ट व्यक्तींबरोबरच उपभोगायचे असतात. अन्यथा एक तर ते पूर्ण उत्कटतेने भोगता येत नाहीत किंवा त्यांची थेट माती तरी होते. माझ्याही मनात असे काही क्षण आहेत जे कधी माझ्या वाट्याला आलेच तर त्या वेळी तू बरोबर हवा आहेस. मी रायगडावर महाराजांच्या समाधीसमोर उभा राहीन तर तेव्हा तू तिथे असावास. कधी तोरण्याच्या बिनी दरवाजातून आत शिरेन तर तेव्हा तू बरोबर असावास. एखाद्या माळरानावर किंवा जंगलात नदीच्या किनारी टेंटमध्ये रात्रभर गप्पा मारायचा योग आला तर तो तुझ्याच बरोबर यावा. कॉर्बेटमध्ये किंवा ताडोबात एखादा वाघ सामोरा येईल तर तो थरार अनुभवताना आपण सगळे एकत्र असावे. पानिपतच्या युद्धस्मारकाचे दर्शन घेणे, हा असाच त्या लांबलचक यादीतला एक क्षण. पानिपतात १७६१ सालच्या संक्रांतीच्या दिवशी जे काही घडून गेले, तो आता, म्हणलं तर, इतिहास आहे; म्हणलं तर, अजूनही भळभळणारी जखम आहे. त्यावर आजवर बरंच काही लिहिलं गेलंय. याही पुढे लिहिलं जाईल. (जयंत नारळीकरांनीदेखील त्यांच्या एका विज्ञानकथेत, पानपतावर सदाशिवरावभाऊंना बाण न लागता तर पुढे मराठी राज्याची वाटचाल कशी झाली असती अशी कथा रंगवली आहे!) कोणाचं चुकलं, काय चुकलं वगैरे चर्चा होतील. पण एक सत्य मात्र कधीही पुसलं जाणार नाही. आपल्या घरापासून दूर, परक्या अनोळखी मुलखात छातीत एखादा तीर घेऊन अथवा जिव्हारी लागलेला तरवारीचा घाव सहन करत, घरची आठवण डोळ्यात घेऊन असंख्य वीर मृत्यू पावले. चूक कोण होतं, बरोबर कोण होतं, कोण देशभक्त आणि कोण परके हल्लेखोर हे ज्याने त्याने आपापल्या मगदुराप्रमाणे आणि विचरसरणीप्रमाणे ठरवावं. मरणारा कोणी सातार्‍याकडचा असेल तर कोणी जलालाबादचा असेल. पण तो मेला पानपतावर हे त्यांच्यातलं साम्य मात्र कधीच पुसलं जाणार नाही. मरायच्या आधी ते मराठे, गिलचे, रोहिले, बुंदेले, दुर्राणी, गारदी होते. मरताना मात्र ते सगळे केवळ असहाय, तडफडणारे, पाण्याच्या एका घोटाला मोताद झालेले मानव होते. इतिहासाबद्दल पवित्रे असू शकतील माणसांचे, परंतु जे मेले त्यांच्या ’human story' बद्दल कोणाचंही दुमत असणं शक्य नाही. जेव्हापासून पानिपतला जायचा विषय सुरू झाला तेव्हापासून ’काहीही झालं तरी यु्द्धस्मारक बघायचंच’, असा निश्चयच केला होता. अवांतर वाचन कायमच चालू असतं, त्यानुसार 'आता पानिपतावर काही आहे का?' यावर फार पूर्वीच नेटवर शोधलं होतं. त्यानुसार तिथे अगदी आत्ता आत्ता पर्यंत एक काळा पडलेला आंब्याचा वृक्ष होता हे समजलं होतं. असं म्हणतात की, युदधाच्या धामधुमीत हा आंबा काळा पडला होता. ही दंतकथाच असावी. पण, हा आंबा जिथे होता तिथेच, त्याच विस्तिर्ण मैदानात लढाई झाली होती हे मात्र सत्य आहे. याच झाडावरून, या स्थळाचे नाव ’काला आंब’ असे पडले. काही वर्षांपूर्वी हा ’काला आंब’ जमीनदोस्त झाला. नंतर सरकारने याच जागी एक विस्तिर्ण स्मारक बांधले. तेच हे युद्ध स्मारक. हे स्मारक खुद्द पानिपतातच आहे की थोडे लांब आहे वगैरे काहीच माहिती नव्हती. इथे पोचलो तेव्हा हे ही लक्षात आले की, मी पानिपतपासून १८-२० किलोमीटरवर एका गावात असेन. शिवाय, स्वत:चे हक्काचे वाहनही नसणार होते. त्यामुळे, स्मारकाला भेट देता येईल की नाही याबद्दल धाकधुक वाटू लागली. कसे जमते ते बघू, असा विचार करून स्वस्थ बसलो. एक दोन दिवस गेल्यावर चाचपणी सुरू केली. आमची व्यवस्था ज्याच्या जिम्मे होती त्याच्याकडे हळूच विषय काढला. ’अरे, **जी, वो पानिपतमे एक युद्ध स्मारक है ना? काला आंब कहते है उसे. कितना दूर है?’ ’अरे, सरजी, क्या करियेगा वहां जा के? कुछ नही है वहां. उससे अच्छा की आप कुरूक्षेत्र चले जाइयेगा. पुण्यभी कमा लेंगे! ह्यॅ ह्यॅ ह्यॅ!’ ’अरे ऐसा ना कहियेगा साबजी! मै महाराष्ट्रसे हूं और हमारे लिये वो जगह किसी तिरथसे कम नही!’ माझा फट्टकन आलेला जवाब ऐकून **जी चपापले. (माझ्याजागी तू असतास तर बहुधा पानिपतात अजून एक स्मारक बांधावं लागलं असतं... **जींचं! ;) ) त्यांनी त्यानंतर माझं बोलणं हसण्यावारी नेलं नाही. पहिल्याच रविवारी जावं असा बेत होता. पण गाडी उपलब्ध नव्हती. त्यामुळे तो बेत बारगळला. मग दुसर्‍या रविवारी जमवलंच. मात्र, तडजोड म्हणून बरोबरच्या सहकार्‍यांच्या मताला मान देवून सकाळी कुरूक्षेत्र आणि दुपारी (भर उन्हात) काला आंब असं नियोजन करावं लागलं. काला आंब खुद्द पानिपत गावापासून पाचेक किलोमीटरवर आहे. शेवटपर्यंत चांगली पक्की सडक आहे. स्मारकाच्या आजूबाजूला विरळ वस्ती आहे. स्मारकाची जमिन सोडल्यास शेती आहे सगळीकडे. स्मारक प्रशस्त आहे. सरकारने खरंच खूप उत्तम स्मारक बांधलं आहे आणि देखभालही उत्तम होत असावी असं जाणवलं. स्मारक म्हणजे खरं तर एक खूप मोठं उद्यान आहे. झाडं आहेत, हिरवळ आहे, पाण्याची कारंजी आणि छोटी तळीही आहेत. कारंजी आणि तळी सध्या कोरडी आहेत. पण अधून मधून वापरात असावीत. स्मारकाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आपण आत शिरतो. समोरच पानिपतच्या तिन्ही यु्द्धांबद्दल हिंदी व इंग्रजीत संक्षिप्त माहिती देणारे फलक लावले आहेत. जागा प्रशस्त असल्यामुळे गाड्या पार्क करायला काहीच अडचण नाही. ते फलक बघत आपण पुढे निघतो. ऊन भयानक असल्यामुळे त्रास होत होता. हिरवळ असली तरी, झाडं कमी आहेत आणि चालायच्या मार्गाच्या दुतर्फा नाहीत त्यामुळे स्वत:ला ऊन्हात भाजून घेण्याशिवाय गत्यंतर नव्हते. गाईड किंवा पत्रक असे काही तिथे नाही त्यामुळे स्वत:च शोधत निघालो. थोडा वेळ इकडे तिकडे फिरल्यावर दूरवर एक चबुतरा आणि त्यावर एक स्तंभ दिसला. नेटवर हे दृश्य असंख्यवेळा पाहिल्यामुळे आपल्याला तिथेच जायचं आहे हे लगेच लक्षात आले. त्या रोखाने निघालो. चबुतर्‍यासमोर जाऊन उभा राहिलो. युद्ध याच मैदानात झालं होतं हे नक्की. पण विश्वासराव अगदी याच स्पॉटवर गर्दीत हरवला, याच स्पॉटवर त्याचे पार्थिव मिळाले, या ठिकाणी ’भाऊ’ हत्तीवरून उतरला आणि स्वत: गर्दीत घुसला, नेमक्या याच स्पॉटवर इब्राहिमखान गारदी आपल्या प्राणप्रिय असलेल्या धन्यांचे, विश्वासराव व सदाशिवरावभाऊ यांचे, अंतिम संस्कार विधीपूर्वक स्वतः करत असताना अफगाण सैन्याच्या हाती इथे सापडला (आणि मुस्लिम असूनही मराठ्यांची बाजू घेतली म्हणून आधीच त्याच्यावर राग होता त्यांचा, त्यात परत हे असले धार्मिक कृत्य करत होता काफरांसाठी म्हणून त्याचे अतोनात हाल करून त्याला मारण्यात आले) व या स्पॉटवर त्याला मारण्यात आलं .... असले नेमके तपशील आता फक्त काळाकडेच आहेत. आपण आपल्या डोळ्यांनी ते तपशील स्वत:पुरते बघायचे. आणि अमोल, नेमका इथेच तू हवा होतास. ते तपशील केवळ स्वत: बघायचेच नव्हे, तर इतरांनाही दाखवायचं कसब तुझ्याकडे आहे. मी माझ्यापरीने प्रयत्न केला आणि मला ते बरंचसं जमलं देखील. कडक उन्हाळ्यातली भर माध्याह्नीची वेळ त्यामुळे तिथे आम्ही तिघे (त्यातला मी सोडता बाकीचे दोघे दूर एका झाडाखाली सावली धरून उभे होते), आमचा ड्रायव्हर (जो गाडीतच बसून होता), टाइमपास करत बसलेली गावातली काही चुकार पोरे आणि सावल्या व आडोसा धरून बसलेली दोन जोडपी सोडल्यास देहधारी सृष्टीतील एकही व्यक्ती नव्हती. कानभरून शांतता दाटलेली होती. मी ही थोडा वेळ शांतपणे तिथे उभा राहिलो. माझ्या मोबाईलवर गोविंदाग्रजांनी लिहिलेला ’पानिपताचा फटका’ मुद्दाम कॉपी केला होता. तो एकदा वाचला. त्या सर्वच अनाम वीरांना श्रद्धांजली वाहिली आणि तिथून बाजूला झालो. बाजूलाच काही ठिकाणी युद्धाचे प्रसंग कोरलेले आहेत. पण ते एकंदरीतच तिन्ही युद्धांचे असावेत असे वाटले. एव्हाना बाकीचे लोक बरेच कावले होते. माझ्या वेडगळपणापायी त्यांनी तरी किती सहन करावे? आणि आमच्या ड्रायव्हर साहेबांना पानिपतमध्ये असलेले ’प्रसिद्ध’ बिगबाझार आम्हाला दखवायचे होते व त्याचीच घाई त्यांना झाली होती. (त्यांच्या मते या बिगबाझारमध्ये असलेली ’अपने आप चलनेवाली सीढी (आप बस खडे रहो, खुद आपको उपर या नीचे ले जाती है)’ बघणे अतिशय महत्त्वाचे होते!!!!) त्यामुळे, परत एकदा चबुतर्‍यासमोर उभा राहिलो आणि परत निघालो. अमोल, आपण बरोबर तर जाऊ शकलो नाही पानिपत बघायला. पण परत एकदा जाऊ. यावेळी अजून काही गवसते आहे का ते बघू. जमल्यास ’रोड मराठा’ समाजाशी काही संपर्क करता येईल का ते पाहू. (मला खात्री आहे, सह्याद्रीच्या अनेक डोंगर दर्‍यांमध्ये तझी जशी हक्काची घरं आहेत, तशी पानिपत, करनाल परिसरातही तुझी घरं होतील!) जे मराठे तिथेच लपून राहिले आणि तिथलेच बनले त्यांच्या कथा ऐकायला मिळतात का ते पाहू. हे तरी एकत्रपणे अनुभवायला जमतेय का ते पाहुया! तो पर्यंत हे काही फोटो काढलेत ते बघ. तुझा, बिपिनदा. ता. क. : परतीच्या वाटेत रस्त्यात एक ’रोहिला टायर वर्क्स’ नावाचे दुकान दिसले. त्या ’रोहिल्या’ला या युद्धाबद्दल काय वाटत असेल? एकदा भेटून गप्पा मारल्या पाहिजेत त्याच्याबरोबर. बिपिनदा. ***
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
इतिहास
समाज
प्रवास
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
अनुभव
माहिती

प्रतिक्रिया द्या
33083 वाचन

💬 प्रतिसाद (85)

प्रतिक्रिया

__/\__

श्रीरंग_जोशी
Wed, 05/20/2015 - 23:01 नवीन
अप्रतिम लिहिलंय. या ठिकाणी गेल्यावर मनातल्या भावना शब्दांत उतरवणे हे आव्हान यशस्वीपणे झेललंय. एकाच मैदानात काही तासांत एतक्या माणसांचे (बहुधा १ लक्षाहून अधिक) अनैसर्गिक मृत्यू होण्याचा हा दुर्दैवी विक्रम असावा असे मागे लोकप्रभेतील एका लेखात वाचले होते.
  • Log in or register to post comments

नि:शब्द आहे!

एस
Wed, 05/20/2015 - 23:14 नवीन
नि:शब्द आहे!
  • Log in or register to post comments

वा! बिका..

मयुरा गुप्ते
Wed, 05/20/2015 - 23:15 नवीन
पानिपतची तगमग शब्दां-शब्दा तुन जाणवली. अजुनही पानिपतच्या आठवणींचे कढ येतात,त्याबद्दल वाचवत नाही, खरं खोटं,चुक-बरोबर ह्याच्या परिसीमा ओलांडुन त्या ठीकाणाची सफर घडवुन आणल्याबद्दल बहुत धन्यवाद. -मयुरा.
  • Log in or register to post comments

खूपच छान

विकास
Wed, 05/20/2015 - 23:25 नवीन
याहून अधिक लिहू इच्छित नाही! :)
  • Log in or register to post comments

वा!

पैसा
Wed, 05/20/2015 - 23:30 नवीन
कौरव-पांडव संगर-तांडव द्वापराकाली होय अती, तसे मराठे गिलचे साचे कलीत लढले पानपती.
मराठी माणसाच्या खर्‍या तीर्थक्षेत्राची यात्रा घडली तुला!
  • Log in or register to post comments

पानिपताचा सल हलवून गेला..

सस्नेह
Wed, 05/20/2015 - 23:36 नवीन
पानिपताचा सल हलवून गेला.. पण बिका पुन्हा पूर्ण ताकदीने लिहिते झाले हा पळ सुखवून गेला !!
  • Log in or register to post comments

काय अप्रतिम लिहिले आहे

सानिकास्वप्निल
Wed, 05/20/2015 - 23:57 नवीन
काय अप्रतिम लिहिले आहे ___/\___
  • Log in or register to post comments

सुंदर लिहीले आहे. एकदा भेट

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 05/21/2015 - 00:18 नवीन
सुंदर लिहीले आहे. एकदा भेट द्यायलाच पाहिजे असे ठिकाण.
  • Log in or register to post comments

काय छान लिहिलंय!

आदूबाळ
गुरुवार, 05/21/2015 - 00:55 नवीन
काय छान लिहिलंय! काला आंब स्मारकाचं श्रेय अजित जोशी या पानिपतमध्ये कार्यरत असलेल्या मराठी सनदी अधिकाऱ्याकडे जातं. काही युद्धं टाळणंच योग्य...
  • Log in or register to post comments

आमंत्रण.

चित्रगुप्त
गुरुवार, 05/21/2015 - 01:06 नवीन
पानिपत पासून अवघ्या अडीच तासांच्या अंतरावर गेली पंचवीस वर्षे रहात असूनही तिथे न जाण्यातली चूक आज हा लेख वाचून उमजली, आता नक्की जाणार, आणि जेही मिपाकर पुढे जेंव्हाही तिकडे जाणार असतील, त्या सर्वांना घरी येण्याचे कायमचे आमंत्रण देऊन ठेवतो.
  • Log in or register to post comments

धन्यवाद. आम्ही नक्की येणार

आकाश खोत
गुरुवार, 05/21/2015 - 10:09 नवीन
धन्यवाद. आम्ही नक्की येणार आहोत. कधि ते माहित नाहि. पण नक्की. तेव्हा सम्पर्क साधतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

__/\__

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 05/21/2015 - 01:40 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments

.. !!

सुहास झेले
गुरुवार, 05/21/2015 - 01:49 नवीन
_/|\_ _/|\_ _/|\_
  • Log in or register to post comments

चांगलं काम केलंत ,भिडणारं

कंजूस
गुरुवार, 05/21/2015 - 05:02 नवीन
चांगलं काम केलंत ,भिडणारं लेखन.
  • Log in or register to post comments

अतिशय सुरेख लिहिलय!

दमामि
गुरुवार, 05/21/2015 - 07:16 नवीन
अतिशय सुरेख लिहिलय!
  • Log in or register to post comments

चांगल काम केले!!

जुइ
गुरुवार, 05/21/2015 - 08:26 नवीन
पानिपतच्या लढाई बद्द्ल वाचवत नाही.
  • Log in or register to post comments

बिका

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 05/21/2015 - 08:33 नवीन
छान लिहिलंय. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

बिका..

योगी९००
गुरुवार, 05/21/2015 - 08:45 नवीन
तुमच्या लेखणीमुळे पानिपतला जाऊन आल्याचा अनुभव आला.
  • Log in or register to post comments

अप्रतिम लिहिलंय.स्मारक खरंच

अजया
गुरुवार, 05/21/2015 - 08:50 नवीन
अप्रतिम लिहिलंय.स्मारक खरंच छान ठेवलेलं दिसतंय.नक्कीच जाऊन येणार पानिपताला.माझ्या या मनोरथाचे पानिपत होऊ नये ही इच्छा!
  • Log in or register to post comments

बिपिनदा... _/\_

प्रचेतस
गुरुवार, 05/21/2015 - 09:19 नवीन
बिपिनदा... _/\_
  • Log in or register to post comments

+१

नाखु
गुरुवार, 05/21/2015 - 12:41 नवीन
एकदा अशी लांबची यात्रा काढा आता तुम्हीच. साला जीवनात या दोन ठिकाणी भेट दिलीच पाहिजे असे प्रकर्षाने वाटू लागले आहे. एक पानीपत+ बाजीरावाची समाधी आणि दुसरे अंदमानची सावरकरांची खोली.(बाकी चारी धाम नाही झाले तरी बेहत्तर) नतमस्तक नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

खूप छान लेख...

खटपट्या
गुरुवार, 05/21/2015 - 09:27 नवीन
खूप छान लेख...
  • Log in or register to post comments

वा

खंडेराव
गुरुवार, 05/21/2015 - 09:37 नवीन
मस्त लिहिलेय! पानिपत दर्शन नक्की आता
  • Log in or register to post comments

छान.

आकाश खोत
गुरुवार, 05/21/2015 - 10:07 नवीन
नक्की जाउन नतमस्तक होणार इथे
  • Log in or register to post comments

पानिपत ची लढाई डोळ्यासमोर उभी राहिली ...

स्वीत स्वाति
गुरुवार, 05/21/2015 - 10:13 नवीन
विश्वास पाटील यान्च्या पानिपत पुस्तकातील ....द्रुश्ये समोर आली. स्मारकाची माहिति मस्त योग आला तर नक्की भेट देनार.
  • Log in or register to post comments

वाह!

अनुप ढेरे
गुरुवार, 05/21/2015 - 10:16 नवीन
वाह!
  • Log in or register to post comments

पाणी आलं राव डोक्यात !

उगा काहितरीच
गुरुवार, 05/21/2015 - 10:32 नवीन
पाणी आलं राव डोळ्यात ! अप्रतिम लेखन हेवेसांनलगे .
  • Log in or register to post comments

सुंदर लिहिलं आहे.

सौंदाळा
गुरुवार, 05/21/2015 - 10:34 नवीन
सुंदर लिहिलं आहे. खरच मराठी माणसासाठी पानिपत तीर्थक्षेत्राहुन कमी नाही. एकदा तरी जायची इच्छा आहे. या जमिनीला मानवी रक्ताची चटक लागली होती असे वाटते आणि तिन्ही युद्धात स्वकियांचा पराभव झाला त्यामुळे तर अजुनच अस्वस्थता येते.
जयंत नारळीकरांनीदेखील त्यांच्या एका विज्ञानकथेत, पानपतावर सदाशिवरावभाऊंना बाण न लागता तर पुढे मराठी राज्याची वाटचाल कशी झाली असती अशी कथा रंगवली आहे
ह्या पुस्तकाबद्दल अधिक माहिती मिळेल का?
  • Log in or register to post comments

नारळीकरांच्या ’यक्षांची देणगी

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 05/21/2015 - 12:56 नवीन
नारळीकरांच्या ’यक्षांची देणगी’ मध्ये आहे ती कथा. पानपतावर मराठ्यांचा जय होतो. त्यामुळे ते अधिकाधिक बलवान होत जातात. इंग्रज कधीच शिरजोर होत नाहीत. विसाव्या शतकाच्या शेवटाचा पावशतकात ही कथा घडते. त्यावेळेसही मुंबई इंग्रजांची आणि बाकी सगळीकडे पेशव्यांचे राज्य. हिंदुस्तान अखंडच आहे. पुण्याहून मुंबईला जायला पासपोर्ट तर कराचीला वगैरे जायला थेट ट्रेन्स. असं सगळं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा

'गंगाधरपंतांचे पानिपत' असे या

कहर
गुरुवार, 05/21/2015 - 17:45 नवीन
'गंगाधरपंतांचे पानिपत' असे या कथेचे नाव आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

लिहिलेले आवडले

शेखर काळे
गुरुवार, 05/21/2015 - 10:38 नवीन
आपण भारतिय तसे इतिहासाबद्दल उदासीन असतो. भारतिय सरकारने पानिपतच्या युद्धस्थळी स्मारक ऊभारल्याचे वाचून आनंद झाला. तुम्ही त्या स्थळी गेलात, वाचून छान वाटले. कदाचित हे स्थळ कुठे युरोपात असते, तर तिथे भव्य स्मारक असते. मराठे लढलेल्या पानिपताच्या युद्धाने भारताच्या इतिहासाला कलाटणी मिळाली. या युद्धानंतर हिंदुस्थान परकियांच्या ताब्यात जाण्याची सुरुवात झाली. छान लिहिलत.
  • Log in or register to post comments

अप्रतिम लिहिलंय.

भुमन्यु
गुरुवार, 05/21/2015 - 10:39 नवीन
अप्रतिम लिहिलंय. आजही पानिपताचा उल्लेख वाचला की मराठ्यांच्या कर्तुत्वाची प्रशंसा कराविशी वाटते कुठे पुणे आणि कुठे पानिपत. धन्य ते पेशवे आणि धन्य ते मराठा सैन्य. वाचतांनाच उगिच ओळ आठवुन गेली "भिमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा"
  • Log in or register to post comments

छान लिहिले आहे..

गणेशा
गुरुवार, 05/21/2015 - 10:49 नवीन
छान लिहिले आहे.. अमोल कोण आहे पण ?
  • Log in or register to post comments

+१

मोहनराव
गुरुवार, 05/21/2015 - 16:46 नवीन
अमोल कोण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

सावरकर मात्र

अत्रन्गि पाउस
गुरुवार, 05/21/2015 - 10:57 नवीन
पानिपत हे मराठ्यांच्या पराभवाचे प्रतिक समजत ... त्याचा कोणताही उल्लेख / उदात्तीकरण किंवा गवगवा त्यांना मान्य नव्हता ... युद्धशास्त्रात केलेली घोडचूक समजत ते ...
  • Log in or register to post comments

सावरकरांचा पानिपत वरील लेख

चित्रगुप्त
गुरुवार, 05/21/2015 - 11:42 नवीन
सावरकरांचा पानिपत वरील लेख जालावर उपलब्ध आहे का ? असल्यास दुवा द्यावा. वेगळ्या दृष्टीकोनातून केलेली मीमासा पण वाचली पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस

जालावर नाहीये

अत्रन्गि पाउस
गुरुवार, 05/21/2015 - 16:14 नवीन
सावरकरांशी सुखसंवाद ह्या पुस्तकात त्यांचे हे भाष्य उधृत केलेले आहे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

.

mbhosle
गुरुवार, 05/21/2015 - 10:58 नवीन
खूप छान लेख .
  • Log in or register to post comments

मस्त लेख!

आनंद
गुरुवार, 05/21/2015 - 11:52 नवीन
मस्त लेख! पत्र स्वरुपात लिहल्या मुळे आणखिनच छान. कित्येक वर्षात पत्र वाचल्याचे आठवत नाही.
  • Log in or register to post comments

_/\__/\_

जेपी
गुरुवार, 05/21/2015 - 12:18 नवीन
_/\__/\_
  • Log in or register to post comments

छान लिहिलंय

जगप्रवासी
गुरुवार, 05/21/2015 - 12:37 नवीन
छान लिहिलंय, सौंदाळा जयंत नारळीकर यांनी "यक्षाची देणगी" या पुस्तकात पानिपत युद्धावर कथा लिहिली आहे, छान वाचण्यासारखे पुस्तक आहे, शाळेत असतानाच वाचल होत तेव्हा आवडल म्हणून लगेच खरेदी केल पण काही मित्रांनी वाचायला घेतलं ते परत काही दिल नाही.
  • Log in or register to post comments

१२ जानेवारी २०१३ रोजी इथे

बॅटमॅन
गुरुवार, 05/21/2015 - 13:04 नवीन
१२ जानेवारी २०१३ रोजी इथे गेलो होतो त्याची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

पानिपत

निओ
गुरुवार, 05/21/2015 - 13:21 नवीन
पानिपत वर देह ठेवलेल्या बहाद्दर मराठ्यांना अनेक सलाम . एक प्रश्न, मागे राहिलेल्या मराठ्यांना 'रोड मराठा' का म्हणत असावेत ?
  • Log in or register to post comments

सुंदर लिखाण बिका...!!

मोदक
गुरुवार, 05/21/2015 - 13:49 नवीन
सुंदर लिखाण बिका...!! पानिपताची सैर करवल्याबद्दल धन्यवाद!!
  • Log in or register to post comments

श्रीवर्धनचे पेशवे स्मारक

सिरुसेरि
गुरुवार, 05/21/2015 - 14:04 नवीन
श्रीवर्धनचे पेशवे स्मारक खुपच दुर्लक्षित , उपेक्षित राहिले आहे . त्याची हा लेख वाचुन आठवण आली . दत्ताजी शिंदे , जनकोजी शिंदे यांचे बलीदान , महादजी शिंदे यांच्या कारकिर्दीची सुरुवात , नानासाहेब पेशवे यांचे बंधुशोकाने निधन, व त्यामुळे माधवराव पेशवे यांच्यावर आलेली पेशवेपदाचे जबाबदारी अशा अनेक ईतिहासातील महत्वाच्या घटना पानिपत युद्धामुळे घडल्या आहेत .
  • Log in or register to post comments

श्रीवर्धनचे पेशवे स्मारक ? छे

चैदजा
Sat, 06/13/2015 - 21:03 नवीन
श्रीवर्धनचे पेशवे स्मारक ? छे. ते तर तिथल्या मुलांचे क्रिकेट खेळण्याचे मैदान आहे. याच आठअवड्यात मोठ्या अपेक्षेने गेलो होतो, पण तिथला नजारा पाहुन आत पाऊल ठेवायची हिंमत झाली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि

...

जातीवंत भटका
गुरुवार, 05/21/2015 - 14:32 नवीन
...
  • Log in or register to post comments

!

स्मिता.
गुरुवार, 05/21/2015 - 14:46 नवीन
अतिदीर्घ विश्रांतीनंतर असं काही लिहिणार असाल तर चालेल तुम्ही तशी विश्रांती घेणं!! बाकी लेख आणि त्यातल्या भावनांकरता _/\_
  • Log in or register to post comments

पानिपतच्या युद्धस्मारकाचे

पियुशा
गुरुवार, 05/21/2015 - 15:13 नवीन
पानिपतच्या युद्धस्मारकाचे दर्शन घडविल्याबद्द्ल __/\__
  • Log in or register to post comments

.........पानिपत.........!!!

विनोद१८
गुरुवार, 05/21/2015 - 15:42 नवीन
...अतिशय सुरेख लिहीलय बिपिन कार्यकर्ते, एक मात्र खरे की 'पानिपत म्हणजे महाराष्ट्राच्या जिव्हारी लागलेला घाव '.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा