दुसरं घर पहावं बांधून (पाठपुरावा)
गवि भाऊ,
जवळपास तीनेक वर्षांपूर्वी काढलेल्या धाग्याचा पाठपुरावा आहे हा. त्यावेळी मी पनवेलनजीक एका अनोळखी गावात दुसरं घर बांधायला काढत होतो आणि गावकऱ्यांकडून होणाऱ्या काही अडवणुकींसाठी सल्ला मागण्यासाठी तो निम्नोल्लेखित धागा काढला होता. भरपूर् जणांनी उदंड प्रतिसाद दिले, चिमटे काढले, सल्ले दिले, युक्त्या सांगितल्या, शुभेच्छा दिल्या ... एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढल्या - मजा केली.
http://www.misalpav.com/comment/382942#comment-382942 या तुमच्या टिपणीद्वारे तुम्ही "दुसरे घर ही नापास संकल्पना आहे. ती यशस्वी झाल्याचे माझ्या पहाण्यात नाही; काही वर्षांनी मला तुमचा अनुभव सांगा" अशा अर्थाची सूचना केली होती. त्यानंतर पाताळगंगेतून बरेच पाणी वाहून गेले. रस्ता व माझे घर यांच्या मधे गावातल्या राजकीय धेंडांनी एका गरीब कातकऱ्याला भरीस पाडून माझ्या प्रवेशद्वाराशेजारीच एक ओंगळवाणे झोपडे टाकवले. त्याला बेकायदेशीर घरपट्टीही देववली. आमची लेखी तक्रार दाबून ठेवली. त्या बहाद्दराने तिथे कोंबड्या कापायचा व्यवसाय सुरू केला. ज्यांनी आमचे घर बांधायचे कंत्राट घेतलेले त्यांनी त्याला तिथून काढून द्यायचे काही पैसे मागितले. ते न देता आम्ही पोलिसांकडे गेलो. पोलिसांनी त्याच्या घरात घुसून त्याला व त्याच्या अपरोक्ष त्याच्या बायकोला दमदाटी वगैरे केली. शेवटी तो उठला नाहीच; पण फ़ुकट आमचे नाव खराब झाले इ.इ. तऱ्हा तऱ्हा झाल्या.
एव्हाना घराच्या बांधकामात स्थानिक कसबामुळे राहून गेलेल्या त्रुटी डोके वर काढू लागल्या. दोन पावसाळ्यांत दुरुस्त्या करूनही वेगवेगळ्या ठिकाणांहून येऊन पाण्याची थारोळी फ़रशीवर दिसू लागली. सगळे बीम-बॉटमचे जोड उलगडू लागले. त्या दुरुस्त्या आता आटोक्यात असल्या तरी अजून सुरूच आहेत. त्यानंतर एक चांगलीशी घरफ़ोडीही झाली. पोलिसांनी तंटामुक्त गाव म्हणून गुन्हा नोंदवून घेतला नाही. हे सगळं सगळं निस्तरायला मी तिथे नसतोच. सगळा राडा माझे वडील व पत्नी यांनाच उचलावा लागतो. मग या दुसऱ्या घरावरून मला किती शिव्याशाप, कटकटी ऐकून घ्याव्या लागल्या असतील कल्पना करा. असो. या चोरीत नुकसान काही फ़ार झाले नाही तरी तो टर्निंग पॉइंट ठरला!
बाहेरून घर बऱ्यापैकी दिसत असले तरी घरफ़ोडी केल्यावर आतमधे माल काहीच नाही, म्हणजे हे शेट लोक नाहीत हे आजूबाजूच्या सगळ्यांना पटले. एक सहानुभूतीची भावना निर्माण झाली. आमचे बाबा, माझी पत्नी व मुले तिथे पंधरा एक दिवसांनी जात असल्याने, चार लोकांशी मुद्दाम ओळखी वाढवून हसून बोलत असल्याने, समोरच्या आदीवासी पाड्याला काहीबाही मदत करत असल्याने आमच्याबद्दलचा साशंकपणा, दुरावा कमी होत असल्याचे गावकऱ्यांच्या नजरेतून जाणवत होते.
गावात कातकरी आदीवासी नि मराठे असे दोन मुख्य गट. आम्ही दोघांच्या धुमश्चक्रीत एक प्रकारे सापडलेले. पण पहिल्या वर्षापासूनच दोन्हींकडच्या उत्सवांना, मंदीराला तिथल्या जबाबदार लोकांना भेटून, बोलून मी काही यथाशक्ती मदत सुरू केली होती. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून असेल कदाचित पण वातावरण निवळत असल्याचे काही संकेत मला मिळू लागले. पण वडील उत्साहात असले तरी अद्याप पत्नी व मुले तिथे जाऊन राहण्यासाठी अनुत्सुक असल्याचे पाहून माझी काळजी काही जात नव्हती. डोक्यात तुम्ही दिलेली कमेंट नि या अनुषंगाने लोकसत्तात वाचलेले धोक्याचे इशारे देणारे लेख सतत फ़िरत असत. काही महिन्यांपासून तिथे झाडे लावायला चहू बाजूंनी चांगलीशी सोय करून घेतली, जिथे सतत तण-झाडोरा माजे ती अंगणाची बाजू सरळ पेव्हर ब्लॉक्स टाकून वापरती केली व मुख्य म्हणजे झाडांना फ़क्त पाणी टाकायला एक कातकरी गडी ठेवला. घरात आवडीची झाडं, काही बियाणं, जंतुनाशके इ. येऊन पडले. पाणी देण्या व्यतिरीक्तची कामे रोजंदारीप्रमाणे त्या गड्याकडून करून घेत असल्याने वरकमाईपोटी तोही खुष झाला.
मागल्या दारातली पपई अल्पावधीत फ़ोफ़ावली. आता प्रत्येक ट्रिपमधे उतरवून आणलेले साखरेसारखे गोड फ़ळ शेजाऱ्या पाजाऱ्यांमधे, मित्रमंडळींत चांगलेच लोकप्रिय आहे. गावकऱ्यांची नरमाई व हे व्यवस्थात्मक स्थैर्य यांबरोबरच अंगणात जिवंत झाडे असल्याने आता बायकोला, मुलांना तिथे जाऊन त्यांची काळजी घेण्यात विशेष रस आहे. इतके दिवस हे लोक या घरातून बाहेर पडत नसत. आता गावात जाऊन, आजूबाजूच्या पाड्यांवर जाऊन कैऱ्या पाडून घरी घेऊन येण्यापर्यन्त मुलांचा धीर चेपला आहे. गावातून हमरस्त्याला जाणारी भाजी, मासळी आमच्या घरच्या खरेदीसाठी मिनिटभर दारात थांबते. गावाच्या हनुमान जयंती उत्सवात ‘देशपांडे सरांना’ मंचावर मानाची जागा राखून ठेवण्यात आली व तिथे आमच्या बाबांनी एक छोटेखानी भाषणही केले!
अजूनही ही सुरुवातच आहे, पण आज हे एवढ्या पाल्हाळिकपणे लिहिण्याचे कारण की आमचा प्रवास अपयशाच्या दिशेने चाललेला नाही. नव्या मुंबईतील आमच्या रहात्या घरापासून हे दुसरे घर फ़क्त २५ किमी अंतरावर आहे हा मुद्दा फ़ार महत्वाचा असला तरी माझ्या अनुभवांती सांगतो की काळ हे सर्वावर उत्तम औषध आहे. जोवर परिस्थिती आपल्या अपेक्षेप्रमाणे नियंत्रणात येत नाही तोवर फ़ार न उड्या न मारता योग्य मार्गाने सावकाश पुढेपुढे जात रहावे. कालांतराने गोष्टी जागेवर पडेस्तोवर आपण बऱ्यापैकी प्रगती केलेली असते.
॥ शुभम् भवतु ॥
वर्गीकरण
प्रतिक्रिया
..ग्रेट.खूप आवडला हा अपडेट
वा! अभिनंदन!
मनःपूर्वक अभिनंदन
गावकर्यांतले एक झालात हे फार
वा!!
अभिनंदन!
पैशापेक्षा सध्या वाईट काय - तर जमिनी!
=))
पनवेलनजिक कोणत्या भागातलं
प्लीज् डोण्ट आस्क् -
मी रसायनी भागात सतरा वर्ष
तीन वर्षापूर्वीच्या लेखाचा
आवर्जून दिलेल्या अपडेटचे
मस्त
प्रांजळ
एक सांगु नडायला शिका.
यस सर!
बराच त्रास झालेला दिसतोय
ननिसाहेब
कौन्तेय, मी येते एकदा! :)
आनंदाने ~