Skip to main content

इंदूर - भाग ३ - सराफा

लेखक मोदक यांनी बुधवार, 29/04/2015 20:58 या दिवशी प्रकाशित केले.
इंदूर - भाग १ - पूर्वतयारी आणि पुणे ते शिर्डी इंदूर - भाग २ - रावेरखेडी >>>"भिया फ्रेश हो जाओ, अभी सराफा निकलना है!" भुषणचा भाऊ चेतन टिपीकल इंदोरी भाषेत वदला.... या पूर्वी एकदा कोणतीही माहिती नसताना आपल्या यकुने दिलेल्या सूचनांनुसार सराफा भेट झाली होती. त्यावेळी सराफा भन्नाट आवडला होता. त्यामुळे दिवसभराचा प्रवासाचा शीण विसरून सराफ्याला जाण्यास सज्ज झालो. भुषणच्या घरच्यांसोबत थोड्या गप्पा मारून आम्ही सराफ्याकडे कूच केले. रात्री १०:३० नंतरही सराफा असा फुलला होता.. . . सराफा बाजार हा दिवसा (सोनेचांदीवाल्या) सराफ्यांचा बाजार आहे आणि संध्याकाळी त्यांची दुकाने बंद झाल्यानंतर दुकानांच्या पायर्‍यांवरती खाऊपिवूचे ठेले लागतात . आम्ही सुरूवात गराडू पासून केली . हे एक वाफवलेले कंदमुळ आहे आणि खाण्याच्या आधी तेलात तळून व त्यावर गराडू मसाला घालून देतात. गराडू मसाला चाट मसाल्यापेक्षा फार वेगळ्या चवीचा परंतु एकदम चटकदार प्रकार होता. भुट्टे का कीस.. . गुलाबजाम . "मालपुये" . मूंग दाल हलवा.. . "लच्छेवाली रबडी" . हा एक स्पेशल जिलबीवाला होता... आपण किती लोक आहोत ते पाहून आणि "कितना खाओगे" असे विचारून सर्वांना पुरेशी होईल या आकाराची एकच जिलबी गरमागरम आपल्या समोर करून देत होता. . इंदूरात जावून पानीपतासे कसे चुकवणार... . थोडे थोडे हे सगळे (आणि फोटोत न आलेले समोसे, कचोरी आणि "जोशीजी का दहीबडा") हादडून पोट तुडुंब भरले होते. शेवटी आग्रहाची एक कुल्फी आणि फालूदा झाला.. . या सर्व इंदूरी खासीयत सोबत बाकीही खाद्यपदार्थांचे स्टॉल होतेच.. . . चायनीज, मंचुरीयन, वगैरे वगैरे.. तुडुंब खादाडी करून आणि एक भन्नाट पान खावून रात्री उशीरा घरी परतलो. उद्याचा दिवस संपूर्ण रिकामा होता आणि "आपल्याला दिवसभर कुठे ना कुठे खादाडी करायची आहे!" असे भुषणने बजावून ठेवले होते. सकाळी उठून आवरले व सर्वांसाठी "पोहा जलेबी" आणण्यासाठी चेतन सोबत पुन्हा मार्केटमध्ये आलो.. . "भिया आप कुछ खाते नही हो.. चलो आपको और चीजे खिलवाता हूं" असे म्हणून चेतन दोन तीन ठिकाणी घेवून गेला. त्यामुळे उपवासाची कचोरी आणि साबुदाणा खिचडी ही हादडून झाली. घरी येवून थोडी विश्रांती / गप्पा / कॅरम आणि असे बरेच काही करून एक मस्त झोप काढली. संध्याकाळी पुन्हा सराफ्याला भेट देवून काल आवडलेले प्रकार आणखी एकदा हादडून झाले व एका प्रसिद्ध ठिकाणाहून भरपूर नमकीन्स खरेदी केले.. चॉकलेट शेव, पाईनॅपल शेव, पुदीना बुंदी असे अनेक अनवट प्रकार मिळाले.. नमकीन्सच्या दुकानात गिर्‍हाईकाच्या बाजुने उघडणारे मोठाले ट्रे होते. हवे ते नमकीन चाखा आणि ऑर्डर द्या.. असा प्रकार. . . आजही चेतनने आणखी एका प्रसिद्ध ठिकाणी नेवून एक मस्त पान खाऊ घातले. (कोल्हापूरला "राजाबाळ" कडे एक वाळा फ्लेवरचे हैद्राबादी मसाला पान मिळते. त्याच्यासारखी चव होती!) इंदूरला येताना भूषणच्या डोळ्यात धूळसदृश काहीतरी गेले होते. त्यामुळे तो दिवसभर आय इन्फेक्शनने त्रस्त होता. त्यामुळे मी पुण्याला एकटा गाडी चालवत येणार व तो रविवारी सावकाश बसने येणार असेही ठरले. एक चविष्ट दिवस बघता बघता संपला होता. (क्रमशः)

वाचने 35419
प्रतिक्रिया 88

प्रतिक्रिया

इंदोर मध्ये हलवायाकडे लच्छेवाली रबडी बनवताना पाहिली आहे. मोठ्या लोखंडी कढई मध्ये दुध तांबूस झाल्यांनतर झाऱ्याने घेऊन कढई वरच्या लोखंडी, दुध नसलेल्या, भागावर मारतात .चर्र असा आवाज येउन लच्छी तयार होते. सकाळी फेरफटका मारल्यावर दुध जलेबिचा नास्ता हमखास असायचा. इंदोर सारखे दुकानात मोठ्या परातीत भरून ठेवलेले पोहे ( मुळात मराठी पदार्थ असून ) महाराष्ट्रात दिसत नाहीत . तेथे पोहे त्यांच्यावर शेव पेरुन खातात.

इन्दुरविषयी काही वाचायचे असेल तर अरूण दाते यांचे शुक्रतारा हे आत्मचरित्र वाचा असे सुचवावेसे वाटते. जावेद अख्तर सी के नायडू राहुल द्रविड , लता मंगेशकर ही महान नावे इंदुरास जोडलेली आहेत.

जळ जळ वाढली पोटातलि

आह्ह... मालपुवा आणि रबडी यांचे काँबिनेशन म्हणजे स्वर्गसुख ! एकदा हे काँबिनेशन ट्राय मारुन तर पहाच ! :) माझ्या बायडीला पाणीपुरी खायला घातली होती... ५ वेगवेगळ्या पाण्याच्या पुर्‍या खाउन ती सॉलिड्ड खुश झाली होती... {नमकिन प्रेमी } :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Shakalaka Baby... ;)

एक प्रश्न - गुजरात मध्ये मिळणारा जिराळू आणि इंदोरातला जिरावण हे एकसारखेच मसाले असतात की त्यात काही फरक असतो? (मी दोन्ही टेस्ट केले. साधारण सारखी चव आहे. पण नक्की फरक कळत नाहीये)

मस्त वर्णन आणि फोटो.जुने दिवस आठवले.भरपुर मनसोक्त खादाडि केलीये इंदोरात.सराफा तर खास आवडत.एकतर घराजवळ होत त्यात खाण्यापिण्याची घरात सगळ्यांना आवड.दाल बाटी अप्रतिम चवीची मिळायची इंदोरात. पोहे आणि कचोडि सकाळपासुन मिळायची.सगळ्यात सुंदर कचोडि शाळेच्या कँटीनमधे मिळायची तीहि १ रूपयात. मुख्य म्हणजे शाळेला जायचा रस्ता सराफातुन होता.अर्थात दिवसा तिथे हे स्टॉल नसायचे ते फक्त रात्री.राजवाडा,सराफा,खवा बाजार,कपडा मार्केट असा गजबजाट असलेल्या दुकानातील वस्तु पहात शाळा कधी यायची समजायच नाहि. सराफाच्या अलीकडे एक हलवाइवाला होता.बाहेरच प्रचंड मोठ्या कढईत मसाला दुध आटवत बसलेला असायचा.त्याच्याकडचे गरम दुध अप्रतिम असायच.मोठ्या डावाने ग्लास भरून त्यावर अलगद सुकामेवा पसरलेला वरचा थर पटकन उचलुन दुधावर असा काहि जलद्गतीने घालायचा कि बास. आता जायला हव इंदुरात.सराफासाठी.

रोजच्या धकाधकी आणि कंटाळवाण्या चाकोरीबद्ध आयुष्यामधून थोडा बाहेर पडून जगण्याची खरी लज्जत चाखण्यासाठी भटकंती, खादाडी आणि वाचन याची आवड असणे फार गरजेचे आहे असे मला वाटते. तुम्ही मिळालेला वेळ असे छन्द जोपासण्यासाठी खर्ची घालत आहात हजे बघून बरे वाटले. मला पण माझे जुने दिवस आठवले. फोटो पण मस्त. बाजीरावांच्या समाधीचे दर्शन परत एकदा घडले आणि समाधीची उपेक्षा पाहून पुन्हा खूप वाईट वाटले. सराफा फारच टेम्पटिंग..! शेअरिंग साठी धन्यवाद. अवांतर : लोक पुण्याला खादाडांचे शहर म्हणून का हिणवतात? :-(

काय हे...हपिसात हे तीन्ही भाग वाचले आणि आता कधी जाता येइल हेच चालु झालेय डोक्यात.. असो...अप्रतिम आणि ओघवतं प्रवासवर्णन...फोटो तर क्या बात है !

इंदुरास्नी खादाडी करायला २ वर्षांमागे बाय्डीसंग खास ३ दिवस गेलो होतो पण सेल मध्ये लागलेल्या विमानाचे तिकीट काढून, अपना पलेस मध्ये राहिलो होतो तेव्हा. त्या २/३ दिवसातच आयुष्यातला मोठा (परत व्यवसाय करायचा) निर्णय विचार करून घेतला होता त्यामुळे इंदूर माझ्यासाठी खास आहे. आणि आता काय तो सराफा बाजार देवा पार पोट फुटेस्तोवर हादडले होते आम्ही.