✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पुस्तक परिचय – आग्र्याहून सुटका भाग १

श
शशिकांत ओक यांनी
Mon, 03/16/2015 - 19:48  ·  लेख
लेख

पुस्तक परिचय – आग्र्याहून सुटका भाग १

लेखकः डॉ अजित प. जोशी, शिवप्रताप प्रकाशन,188/2 शनिवार पेठ, पुणे, किंमत रु. 300

शिवरायांचा आठवावा प्रताप !

आज शिवजयंती निमित्ताने शिवाजीरायांच्या एका महत्वाच्या जीवनप्रसंगावर आधारित पुस्तकाचा परिचय करून देत आहे. 1 वरील चित्रात दाखवलेल्या ऐसपैस बुट्टी-पेटाऱ्यात, शेजारी टोकऱ्यात ढिगाने रचलेल्या लाडू, बर्फी, जिलेबी, इमरतीसारख्या ठिसूळ व नरम मिठायांना 60 -70 किलो वजनांपर्यंत रचून भरता येणार का हे ठरवावे लागेल. चौक्यावर पहारेकऱ्यांना चकवायला खाली लपलेल्या व्यक्तीच्या अंगावर मिठाया ठेवायला हव्यात. अशा पेटाऱ्यांना दोन भोयांनी ते कमीत कमी 7-8 किमी दूर नेताना लागणारा वेळ. भोयांना कटात सहभागी करून कितीवेळ हे निसटणे लपलेले राहणार, वगैरे कसे शक्य आहे याची चिकित्सा करायला हवी. त्यातील त्रुटी पाहता मिठाईच्या पेटाऱ्याची युक्ती फक्त कल्पना होऊ शकते असे लेखकाला वाटते. लेखक, डॉ. अजित प. जोशी आपल्या प्रस्तावनेत म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्फूर्तिदायक जीवनावर आजपर्यंत अनेक छोटे मोठे ग्रंथ लिहिले गेले आहेत. (त्यात) संशोधनात्मक लेखन खूप कमी आहे. आगऱ्याहून सुटका प्रसंगाची उपलब्ध ऐतिहासिक पत्रे, बखरी तसेच शिवाजी महाकाराजींची व्यक्तिरेखा लक्षात घेऊन एक नवी मांडणी प्रस्तूत ग्रंथात केली आहे. त्यामुळे त्याला काही प्रमाणात संशोधन प्रबंधाचे स्वरूप आले आहे. चिकित्सक वाचक तसेच इतिहासाचे अभ्यासक यांना हा ग्रंथ आवडेल असा विश्वास वाटतो. ‘नव्याने जुने शुद्ध करावे’ असा कौटिलिय अर्थशास्त्राच्या 25व्या ‘दुर्गनिवेश’ नावाच्या प्रकरणात उल्लेख आहे. दुर्गनिवेश म्हणजे किल्ल्याची मांडणी. उपलब्ध लेखन सामुग्रीवर आधारित नवीन विचार करून त्याचा नवीन अन्वयार्थ लावून प्रस्तूत ग्रंथात नवीन प्रमेय मांडले आहे. सध्या मान्य असलेल्या मिठाईच्या पेटाऱ्याच्या कथेचे विश्लेषण केले आहे. पुरंदरच्या तहापासून शिवाजीराजे व संभाजीराजे राजगडावर परत येईपर्यंतचा कालखंड विस्तृत पुराव्यांसह सादर केला आहे. शिवाय नेताजी पालकरबद्दल उपलब्ध माहिती परिशिष्ठ 1 मधे दिलेली आहे. नवीन प्रमेय - पेटाऱ्याची कथा आणि तिचा फोलपणा बहुसंख्य इतिहासकारांचे मत शिवाजीमहाराज संभाजीसह औरंगजेबाच्या नजरकैदेतून मिठाईच्या पेटाऱ्यात बसून निसटले असा आहे. याचे कारण बहुतेक सर्व ऐतिहासिक साधनांमधून राजे पेटाऱ्यातून निसटल्याचा उल्लेख आहे. या प्रमेयाच्या विरोधात दुसरे कोणतेच प्रमेय उपलब्ध नसल्यानेही पेटाऱ्याची कथाच जनमानसात मान्य आहे. पेटाऱ्याच्या कथेतील सोपेपणा, साधेपणा, नाट्य तसेच त्यातून दिसणारा मोगल अधिकाऱ्यांचा बावळटपणा यांच्यामुळे कथेस अधिक उठाव येत असल्याने ती सामान्य जनतेस मान्य झाली असावी. या प्रमेयाला मारक 12 मुद्दे कसे विरोधी ठरता याचे विवेचन लेखनाने सविस्तर केले आहे. त्यातील एक मुद्दा जास्त बिनतोड वाटतो तो असा – पेटाऱ्यात बसणाऱ्या माणसाला अगदी असहाय्यपणे पाय व अंग मुडपून बसावे लागते. अशा अवस्थेत खूप ताकदवाद व लवचिक देहाचा माणूस देखील फार काळ बसून राहू शकणार नाही. दोन-तीन कोस म्हणजे 5-7 मैल (8 ते 10 किमी) चालण्यासाठी सुमारे एक ते दीड तास लागतो. (असा प्रवास पेटाऱ्यांची कावड करून जाताना भोयांच्या चपळ पायगतीचे अंदाज बांधता, प्रत्येक चौकीवर थांबत थांबत 2 पेक्षा जास्त तास तरीही लागतील असे म्हणता येईल. - कंसातील विचार माझे) अशा अवस्थेत बंदिस्त पेटाऱ्यात तलवारी सारखे शस्त्र जवळ बाळगता येत नाही. त्यामुळे पेटाऱ्यातील माणूस संरक्षणासाठी पूर्णपणे बाहेरील माणसांवर अवलंबून असतो. जर सापडले तर शिरच्छेद ठरलेलाच! इतक्या असहाय्य स्थितीत, संपूर्णपणे दुसऱ्यावर अवलंबून, अतिशय सावधपणे सुरक्षित योजना आखणारे शिवाजी महाराज नजरकैदेतून निसटण्याचा धोका पत्करतील असे वाटत नाही. राजांच्या महालापासून ते रस्त्यापर्यंत 5-6 चौक्या पार करायला लागत होत्या. एवढ्या पहाऱ्यातून एकदाही तपासणी न होता एखादा पेटारा डेऱ्यातून बाहेर पडणे शक्य नाही. प्रत्येक पेटाऱ्याची किमान एकदा तपासणी होतच असणाऱ. संशयी औरंगजेबाचे हेर किंवा फौलादखानाचे सैनिक ते पेटारे कुठे, कोणाकडे जातात ते पाहण्यासाठी पाळतीवर असण्याची शक्यता आहे. धूर्त बादशाहाने राज्यांवर पहारा करणाऱ्या सैनिकांना पेटाऱ्याच्या कडक तपासणीचा हुकूम दिलेच असणार. म्हणून मिठाईचे पेटारे तपासणी न होताच राजांच्या डेऱ्याबाहेर पडणे अशक्य आहे. (आणखी एक मला सुचलेला विचार - राजांच्या स्थानबद्धतेत ही मिठाई त्यांच्याकडील स्वयंपाक्यांनी बनवलेली नसावी. ती बाहेरील गावातील नामांकित हलवायांच्या दुकानातून आत मागवली जात असेल. ज्या पेटारा किंवा बुट्ट्याच्या करंडीत वा पेटीत मिठाई आली त्याच पेटीतून ती परत मोठ-मोठ्या सरदार व मानकऱ्यांच्या घरी पोहोचवायला, देण्यास पाठवली जात असेल. मिठाई ही वस्तू ठिसूळ असल्याने त्याची पेटी वा पेटारा जर माणूस बसेल इतक्या मोठ्या आकाराचा व इतका भक्कम तरीही बाहेरून कोणी तलवार खुपसली तर आत आरपार जाईल पण मिठाई शाबूत राहील अशी असायला हवी. अशा करंडीवजा पेटीतून पलायन एक अति धोक्याचा प्रयत्न म्हणून अशक्य वाटतो) काही इतिहासकरांच्या मते शिवाजीमहाराज पेटारे वाहून नेणाऱ्यांच्या वेषात व संभाजीराजे पेटाऱ्यात बसून डेऱ्याभोवतालच्या पहाऱ्यातून निसटले आसावेत. परंतु या प्रकारातही तेवढाच धोका संभवतो. एक वेळी 2-4 भोईच एक पेटारा घेऊन चौकाबाहेर पडू शकतात, पेटाऱ्यांप्रमाणे भोयांचीही कडक तपासणी होत असणार. त्यामुळे एखादा नवा भोई (जो आत आलाच नाही) पहारेकऱ्यांकडून ओळखला जाण्याची शक्यता अधिक आहे. शिवाय सर्वात म्हत्वाचे म्हणजे शिवाजीमहाराजांचे राजबिंडे रूप आणि जरब! ते भोयाच्या वेशात लपून राहणे अशक्य आहे. (‘त्यांना पाहूनच हा माणूस राजाच असला पाहिजे असे वाटते’ असे वर्णन राजस्थानी पत्रात सापडते) निसटण्याच्या तारखेचा घोळ दुसरे असे की शिवाजी महाराज आग्र्याहून कोणत्या दिवशी निसटले याबद्दल ऐतिहासिक कागदात एकमत नाही. मात्र 18 ऑगस्टच्या सकाळी ते दोघेही निसटल्याचे पहाऱ्यावरील सैनिकांच्या लक्षात आले. ही गोष्ट निर्विवाद आहे. शिवाजीमहाराजांची दरबारातील भेट 12 मे 1666 व नंतरची सुटका 18 ऑगस्ट 1666 अशा तारखा पक्क्या आहेत. सध्या मान्य असलेल्या घटनाक्रमानुसार औरंगजेब 18 ऑगस्ट रोजी आपणास दुसऱ्या हवेलीत नेऊन ठार मारणार अशी बातमी समजल्यामुळे शिवाजीमहाराज 17 ऑगस्ट रोजी घाईघाईने आग्र्यातील नजरकैदेतून निसटले, नंतर 25 सप्टेंबर 1666 रोजी सुमारे 25 दिवसात दक्षिणेत 700 मैलावर राजगडाला पोहोचले. शिवाय दक्षिणेत जाण्याआधी त्यांनी संभाजीला मथुरेला म्हणजे आग्ऱ्याच्या उत्तरेला 33 पोहोचवले. म्हणजे त्यांना तसे फक्त 22 -23 दिवसच मिळतात. आग्र्याहून घाईघाईने बाहेर पडण्यामुळे त्यासाठी लागणारे माणसांचे, घोड्यांचे आयोजन, करण्यासाठी राजांकडे वेळ नाही. आणि ते सर्व आयोजन महाराजांनी आधीच करून ठेवले होते असे मानले तर मग औरंगजेबाने मारण्याचा हुकूम काढण्याचा वाट बघत राजे आग्र्यात का थांबले असा प्रश्न निर्माण होतो! पुर्व योजनेचा अभाव, घोड्यांचा वेग व क्षमता, पावसाळ्याचा ऋतु, या गोष्टी लक्षात घेतल्यास आग्रा ते राजगड अंतर घोड्यावरून 22-23 दिवसात पार करणे अशक्य वाटते. राजांनी राजगड ते आग्रा हा लवाजम्यासह जातानाचा प्रवास 5 मार्च ते 11 मे या काळात म्हणजे एकूण 66 दिवसात पुर्ण केला होता. मोजक्या माणसांना बरोबर घेऊन आग्रा ते राजगड हे अंतर (जास्तीत जास्त वेगाने) सुमारे 45 ते 50 दिवसात वेगाने कापणे शक्य आहे. असे लेखक मानतात. या बाबत लेखकाने भांबोरकर भोसल्यांची एकदा दस्तऐवजासाठी व जीव वाचवायसाठी केलेली (सुमारे 200 वर्षांच्या फरकाने घडलेली) घोडदौड सविस्तर निवेदली आहे. ‘त्यात घोड्याला तीव्र गती देऊन कोठेही न थांबता ते रात्रभर चालून (पळवून)18 कोस – 45 मैल – 72 किमी) ते सुरक्षित स्थळी पोहोचले होते असा उल्लेख केला आहे. मात्र त्यानंतर ते (व घोडा?) 3 अतिश्रमाने 3 दिवस जाग्यावर पडून होते.’ असे ही म्हटले आहे. ‘एका दिवसात इतकी दगदग केली की कसे थकायला होते याचे ते प्रतीक आहे. असे 22 - 23 दिवस सतत घोडदौड करणाऱ्या माणसाचे काय हाल होतील याची कल्पना देखील करणे अवघड आहे.’ असे लेखक म्हणतात. मग अशी सर्वमान्य प्रमेये अमान्य होत असतील तर मग लेखकनी नवे प्रमेय ते काय मांडले? याचा आढावा पुढील भाग 2 मधे ....
  • पुस्तक परिचय - आग्र्याहून सुटका भाग 2
  • आग्रऱ्याहून सुटका भाग 3
  • पुस्तक परिचय - आग्र्याहून सुटका भाग अंतिम ४

Book traversal links for पुस्तक परिचय – आग्र्याहून सुटका भाग १

  • पुस्तक परिचय - आग्र्याहून सुटका भाग 2 ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
समीक्षा

प्रतिक्रिया द्या
24892 वाचन

💬 प्रतिसाद (29)

प्रतिक्रिया

श्रीमान योगीच्या प्रस्तावनेत

सौंदाळा
Mon, 03/16/2015 - 20:00 नवीन
श्रीमान योगीच्या प्रस्तावनेत कुरुंदकरांनीदेखिल पेटार्‍याची घटना मान्य केली नाही (चुभुदेघे) महाराजांनी यमुना नदी औरंगजेबाचे शाही परवाने दाखवुन ओलांडल्याचे पुरावे आहेत असेही त्यात लिहिले आहे. पेटार्‍यातुन निसटणे मलातरी पटत नाही. स्वत:च्या अंगकाठीचा, चेहरेपट्टीचा भोई हेरुन त्याला ठार करुन / अडकवुन त्याच्या जागी राजे गेले असावेत का? जाणकरांची मते वाचण्यास उत्सुक.
  • Log in or register to post comments

खरे आहे...

शशिकांत ओक
Mon, 03/16/2015 - 20:14 नवीन
आता पुढील भागांतून डॉ.जोशांच्या मते ते कसे घडले असावे यावर आपले विचार वाचकांनी सादर करावेत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा

+१

एस
Mon, 03/16/2015 - 20:33 नवीन
हेच म्हणायला आलो होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा

प्रश्न

तिमा
Mon, 03/16/2015 - 20:33 नवीन
महाराज कसे निसटले, हा कधीही समाधानकारक उत्तर न मिळालेला प्रश्न आहे. पण रामसिंगने त्यांच्या जीविताची हमी दिली होती. आणि राजपूत कधीही दिलेला शब्द पडू देत नाहीत अशी तेंव्हा ख्याती होती. त्यामुळे त्याने महाराजांना भरीव मदत केलीच असणार! कशी तेच कोडे आहे.
  • Log in or register to post comments

याच विषयावर साप्ताहिक

आदूबाळ
Mon, 03/16/2015 - 21:46 नवीन
याच विषयावर साप्ताहिक सकाळमध्ये पूर्वी लेखमाला क्रमशः प्रसिद्ध होत असे. तेच पुस्तक आहे का हे? कुठे मिळेल?
  • Log in or register to post comments

खरे आहे

शशिकांत ओक
Fri, 03/20/2015 - 16:41 नवीन
लेखकानी तसा उल्लेख पुस्तकातील प्रस्तावनेत केला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

लेखातील मुद्द्यांशी बहुतांशी

प्रचेतस
Mon, 03/16/2015 - 22:16 नवीन
लेखातील मुद्द्यांशी बहुतांशी सहमत. मोंगल अंमलदारांना लाच चारून खुद्द औरंगजेबाच्या शिक्क्यांचे दस्तक मिळवले गेले होते असे कुठेशीक वाचले होते.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

अत्रन्गि पाउस
Mon, 03/16/2015 - 22:16 नवीन
हि चर्चा फारच रोचक होणार ... वैयक्तिक माझ्यामते ... महाराजांच्या संपूर्ण कारकिर्दीत घडलेली सगळ्यात रोमहर्षक घटना ... आग्र्यात बसून १ विणलेले नेटवर्क २ केलेले प्लानिंग ३ प्लानिंग मध्ये - माणसे / लोजीस्तीक्स / पर्यायी योजना / मोहिमेत प्रत्येक माणसाकडे दिलेली जबाबदारी ..त्याने दगाफटका केला तर ..म्हणून ठेवलेली नजर आणि जणूकाही औरंगजेबाने पियर रिव्ह्यू करून फायनल केला असावा असा हा प्रोजेक्ट प्लान .. इतक्या सफाईने केलेली कार्यवाही कि जणू एखादे नाटकच ..सगळे आधीच ठरलेले ... आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे नक्की काय झाले ह्याचा अधिकृत पुरावा कुठेही अगदी 'कणभर' सुद्धा उपलब्ध नाही ... म्हणजे ह्यातील कम्युनिकेशन फक्त तोंडी ...लेखी कुठेही काहीही नाही ... इतका मोठा झोल मी कल्पनाही करू शकत नाही
  • Log in or register to post comments

१. महाराजांना औरंगजेबानेच

काळा पहाड
Tue, 03/17/2015 - 00:43 नवीन
१. महाराजांना औरंगजेबानेच पळायला मुभा दिली असावी का? औरंगजेबाचं महाराजांबरोबर पर्सनल वैर नव्हतं. महाराजांबद्दल विखार होता तो प्रामुख्याने त्याच्या दरबार्‍यांना आणि विशेष करून त्याच्या बहिणीला जिनं 'शिवाला मार' चा धोशा लावला होता. जर महाराजांना मारलं तर दक्खन बंड करून उठेल हे औरंगजेबाला ठाऊक होतं. मराठे आदिलशाही बरोबर मिळाले तर आपण दक्षिणेमधलं आपलं रोवलेलं पावूल पूर्ण गमावून बसू हे ही त्याला ठाऊक असणार. तेव्हा ही एक राजनैतिक चाल होती का? २. रामसिंगनं (आणि पर्यायाने जयसिंगांनी) कुठल्या क्लृप्तीने हे घडवून आणलं असू शकेल का? महाराजांच्या अटकेनंतर जयसिंगांचा (धोका होणार नाही हा) शब्द खाली पडला होता. रामसिंग अस्वस्थ होता. तेव्हा त्यानं पहारेकर्‍यांना विकत घेवून हे घडवून आणलं असू शकेल.
  • Log in or register to post comments

असहमत

बोका-ए-आझम
Tue, 03/17/2015 - 14:38 नवीन
१.महाराजांना नजरकैदेत का ठेवलं मग? तेही कडेकोट पहा-यांमध्ये. २. महाराजांच्या निधनाच्या वेळी (१६८०) औरंगजेब स्वतः मराठेशाही संपवण्यासाठी पूर्ण ताकदीने दक्षिणेत उतरला. एवढंच नाही तर २० वर्षे इथेच राहिला आणि १७०० मध्ये इथेच मरण पावला.मुघल साम्राज्य खिळखिळं होण्याची जी प्रक्रिया होती, तिची सुरूवात इथे झाली. पण औरंगजेबाचं आॅब्सेशन इतकं होतं की त्याच्यासारख्या अदरवाईज व्यवहारी माणसाने इथे व्यवहार पाहिला नाही. त्यामुळे त्याचं महाराजांशी वैयक्तिक शत्रुत्व नव्हतं हे पटत नाही. महाराज त्याच्या बाबतीत नसतील पण तो त्यांचा पराकोटीचा द्वेष करत होता असंच ऐतिहासिक घटना सांगतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

नुसतेच तर्क बर का !

अत्रन्गि पाउस
Tue, 03/17/2015 - 15:55 नवीन
१.महाराजांना नजरकैदेत का ठेवलं मग? तेही कडेकोट पहा-यांमध्ये. अद्दल घडवण्यासाठी : बघा मी तुमचे काय करू शकतो .. इथून पुढे एका मांडलिकासारखेच राहा . जर त्याला महाराजांना मारायचेच होते तर इतके दिवस का घेतले ...आणि आग्र्यात नजरबंद करून निमित्त शोधायचे कारण नव्हते .. आणि एखाद्या बंगाल किंवा अफगाण मोहिमेवर पाठवून परस्पर काटा काढणे जास्त बिनबोभातपणे करता आले असते ... कैदेत ठेवायचे तर एखाद्या अंधारकोठडीत का नव्हते ठेवले ? महाराज म्हणतात आणि तो रोजच्या रोज डझनावारी मिठाईचे पेटारे आत बाहेर जाऊ देतो ?? तेही साधू फकिरांना ? त्याला महाराजांची कोंडीच करायची होती तर त्यांची आर्थिक रसद तोडली असती कि ...किंबहुना तो पर्यंत महाराजांकडची संपत्ती त्याचीच झाली होती (मान्न्द्लिक असल्यामुळे )...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

आपण इतिहासाला कायम एका

काळा पहाड
Wed, 03/18/2015 - 00:14 नवीन
आपण इतिहासाला कायम एका चष्म्यातून पहातो. कारण आपण घडून गेलेल्या घटनांबाबत विचार करतो. आपल्याला एका नायकाला एक ग्रॅन्ड खलनायक पण लागतो. पण त्या वेळच्या लोकांचा विचार करता, त्यांचे विचार काळाबरोबर बदलले असण्याची शक्यता आपण विचारात घेतो का? बादशहाचं आग्रा भेटीचं शाही फर्मान महाराजांनी कित्येक किलोमीटर अनवाणी चालून आणि मग त्याला डोक्यावर धरून आणून स्वीकारलेलं आहे. आपण हे विसरतो की कदाचित महाराजांना किंवा औरंगजेबाला एकमेकाबद्दल जे वाटत होतं ते केवळ राजकारणी दृष्टीने होतं. औरंगजेबासाठी महाराज म्हणजे एक मामुली उत्पात घडवणारे जमीनदार होते. फार फार तर एका सप्तहजारी सरदाराच्या तोलाचे. कारण औरंगजेबाचं साम्राज्य अफाट होतं. तेव्हा त्याच्या दृष्टीने त्यांना चाप लावणं हा एक पहिला उपाय करून पाहूया असा विचार असण्याची शक्यता होती. तोपर्यंत महाराजांनी जो धाक तयार केला होता तो आदिलशाहीला. महाराजांना एक प्यादं म्हणून दक्खनच्या राजकारणात वापरावं असा त्याचा विचार असू शकतो. त्यादृष्टीने तो कदाचित त्यांच्यावर ब्रेन वॉशिंगचा प्रयोग करून त्यांना आपल्या कच्छपी लावावं असा सुद्धा विचार करत असेल. नंतर सुद्धा महाराजांनी त्याला समेटाचं पत्र पाठवलं आहे ("आपली परवानगी न घेता परत आल्याबद्दल क्षमस्व" इत्यादी). सुरवातीला महाराजांनी त्याचा जो मुलूख जिंकलाय तो त्याला चक्क मूर्ख बनवून जिंकलाय. म्हणजे इथला सुभेदार भ्रस्ट आहे आणि त्याला धडा शिकवायचा होता, इथला मुलूख आदिलशाही च्या डोळ्यात भरत होता म्हणून तिथली व्यवस्था लावण्यासाठी ताब्यात घेतला इत्यादी. औरंगजेब तशा अर्थानं मूर्ख नव्हता पण त्यानं सुरवातीला महाराजांकडे दुर्लक्ष केलं. कारण दिल्ली ची व्यवस्था अजून नीट लागायची होती आणि दुसरं म्हणजे त्याला पठाणी टोळ्या पेशावर भागात भयंकर त्रास देत होत्या. त्यामानाने महाराजांचं संकट त्याच्या दृष्टीने क्षुल्लक होतं (निदान त्यावेळी तरी). आपली चूक औरंगजेबाच्या कदाचित नंतर लक्षात आली असेल. आणि तो त्यांच्या (आणि मराठयांच्या बाबतीत जास्त कडवट बनत गेला असेल).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

१००% सहमत.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 03/18/2015 - 00:16 नवीन
१००% सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

कारण दिल्लीची व्यवस्था अजून

शशिकांत ओक
Wed, 03/18/2015 - 01:38 नवीन
कारण दिल्लीची व्यवस्था अजून नीट लागायची होती आणि दुसरं म्हणजे त्याला पठाणी टोळ्या पेशावर भागात भयंकर त्रास देत होत्या. त्यामानाने महाराजांचं संकट त्याच्या दृष्टीने क्षुल्लक होतं (निदान त्यावेळी तरी). आपली चूक औरंगजेबाच्या कदाचित नंतर लक्षात आली असेल. आणि तो त्यांच्या (आणि मराठयांच्या बाबतीत जास्त कडवट बनत गेला असेल).
भावांना व बापाला मारण्याआधी औरंगजेब दक्षिणेचा सुभेदार होता. म्हणजे त्याला मराठ्यांच्या उपद्रवाची पक्की कल्पना होेती. विशेषतः मामा शाहिस्तेखानाला पळवून लावल्यावर आता बंदोबस्त करायलाच हवा असा विचार योग्य वाटतो. सात हजारी मनसबदारी मामुली नव्हती. या पुस्तकात शिवाजी राजे आग्र्याला जायला का तयार झाले या बाबत बरेच विवेचन आहे. पेशावर भागात डोंगराळ भूभाग कोणा एकाची सत्ता म्हणून कधीच नव्हता. विविध जमातींनी वर्चस्वासाठी टोळीयुद्धाने तो प्रदेश (आजही पाकिस्तानाला डोके दुखीच्या फाटाचा प्रदेश व तेंव्हाही) जर्जर होता. बादशहाला ते जाचक या करता होत असे कारण त्याच्या मुळ सैनिकांना घरी परतायला किंवा अन्य कारणांनी अफगाणिस्तान,इराण, तुर्की, उझबेकिस्तानी आदी 'गाववाल्या' सैनिकांना रोखून धरले जायचे, व्यापार करायला येणाऱ्यांच्या वाटा रोखून, येण्याजाण्यात फार मनुष्यहानी होत असे. अकबरापासून तो भाग घ्यायला अनेकांच्या मोहिमा या फसगतीच्या ठरल्या होत्या. त्यापेक्षा सुपीक व हाताळायला सोईचा प्रदेश आपलासा करणे हे त्या महासत्तेला गरजेचे होते. त्यात शिवाजीला आपल्याकडे करून एक कटकट काही काळ तरी थांबवणे किंवा कमी करणे शक्य आहे म्हणून मिर्जांराजेंच्या मागणीचा औरंगजेबाने विचार केला असे लेखक सुचवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

पुभाप्र

सुनील
Tue, 03/17/2015 - 08:47 नवीन
काय पण योगायोग! काल रात्री सेतुमाधवरावांचे पुस्तक बर्‍याच काळाने (५-६ वर्षांनी) वाचायला काढले. आग्र्याहून सटकेचे प्रकरण वाचून, झोपण्यापूर्वी मराठी संस्थळांना धावती भेट देताना, नेमका हा लेख सापडला! माधवरावांच्या मते, पेटार्‍यातून सुटका ही मुद्दाम पसरवलेली अफवा होती (कुणावर बालंट येऊ नये म्हणून). महाराज बहुधा वेशांतर करूनच सुटले असावेत. मात्र परत येताना ते गेल्या मार्गाने न येता पूर्वेकडून आले असावेत. औरंगजेबानेही थोडी आदळ-आपट केली. रामसिंगावर थोडा काळ खप्पा मर्जीदेखिल झाली. परंतु, कुणाला शिक्षा झाल्याचे दिसत नाही. असो. पुभाप्र.
  • Log in or register to post comments

रामसिंगाची पदावनती झाली आणि

मृत्युन्जय
Tue, 03/17/2015 - 16:08 नवीन
रामसिंगाची पदावनती झाली आणि नंतर त्याची पार दूरवर रवानगी केली गेली. मिर्झाराजेंना त्यानंतर काही काळाने औरंगजेबाने विषप्रयोग करुन मारले. हे बघता औरंगजेबाची त्या दोघांवर चांगलीच खफा मर्जी झाली होती हे दिसुन येइल. औरंगजेबानेच शिवाजी महाराजांना सोडले असा एक प्रवाद आहे. पण एकुण त्याने संबंधित व्यक्तींना ज्या शिक्षा केल्या त्या बघता तसे काही वाटत नाही. महाराजांच्य बाबतीत रंग्या थोडा गाफील राहिला आणी तीच चूक त्याला भोवली. संभाजी महाराजांच्या बाबतीत त्याने ती चूक सुधारली असे म्हणायला लागेल. महाराज लोकांना भलीमोठी लाच देउनच सटकले हे सयुक्तिक वाटते. ती चूक रंग्याने संभाजी महाराजांच्या बाबतीत घडु दिली नाही. स्वकीय दगा देतात हे रंग्याला कळल्यावर त्याने संभाजी महाराजांच्या पहार्‍यावर स्वतःचे आप्त न ठेवता संभाजी महाराजांचे आप्तच ठेवले. संभाजी महाराजांना देखील त्यांच्या आप्तांनीच अडकवले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

अघटित योगायोग

शशिकांत ओक
Wed, 03/18/2015 - 23:04 नवीन
कार्ल जुंगने याला सिक्रॉनिसिटी असे नाव दिले आहे असे प्रा. गळतगेंच्या विज्ञान आणि चमत्कार पुस्तकातून वाचायला मिळाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

उत्कंठावर्धक लेख आणि चर्चा

आनंदराव
Tue, 03/17/2015 - 18:03 नवीन
उत्कंठावर्धक लेख आणि चर्चा सुद्धा!
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो

श्रीरंग_जोशी
Tue, 03/17/2015 - 18:04 नवीन
हेच म्हणतो. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदराव

वरील विश्लेषणातून

शशिकांत ओक
Tue, 03/17/2015 - 18:54 नवीन
जे तर्क इथे बांधले जात आहेत त्यांचे निराकरण पुस्तकातील प्रमेयातून मिळते. त्यासाठी पुर्ण पुस्तक वाचायला हवे. परिचय करून देण्यात कदाचित सर्व गोष्टीचा समावेश करता येईल असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments

अवांतर

श्रीनिवास टिळक
गुरुवार, 03/19/2015 - 05:44 नवीन
ओक साहेब आपण लिहिले--‘नव्याने जुने शुद्ध करावे’ असा कौटिलिय अर्थशास्त्राच्या 25व्या ‘दुर्गनिवेश’ नावाच्या प्रकरणात उल्लेख आहे.’ ‘नवेन अनवं शोधयेत’ असे कौटिल्याचे मूळ वचन आहे आणि त्याचा संदर्भ मी बरेच दिवस शोधत होतो. आपण तो अनासायाने मिळवून दिलात त्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

औरंगजेब फार धूर्त होता

कंजूस
गुरुवार, 03/19/2015 - 06:18 नवीन
औरंगजेब फार धूर्त होता रामसिंग वगैरेना दूर करण्यासाठी या {त्यानेच बनवलेल्या }घटनेचा उपयोग करून घेतला असावा काय ?
  • Log in or register to post comments

औरंगजेबाचा धूर्तपणा

शशिकांत ओक
गुरुवार, 03/19/2015 - 09:44 नवीन
आणि रामसिंह, त्यांच्या पिता, मिर्झा राजे जयसिंह व त्यांचे पिता श्री मानसिंहांची मानसिकता उलट्या क्रमाने दुबळी होत गेली. एकाने बहीण देऊन, एकाने ताजमहालाला अर्पण करून तर रामसिंहाने राजांना नजरकैदेत ठेवले जायला कारणी भूत व्हावे. यात औरंगजेबाचा धूर्तपणा होता पण त्या पेक्षा आपल्या स्वाभिमानाची कदर नसल्याने असे घडायला मदत झाली.
  • Log in or register to post comments

एकाने ताजमहालाला अर्पण करून

अत्रन्गि पाउस
गुरुवार, 03/19/2015 - 09:51 नवीन
हे काय ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

ताजमहाल

शशिकांत ओक
Fri, 03/20/2015 - 16:53 नवीन
राजा मानसिंहाच्या नातवाकडून ताज इमारतीला राजा जयसिंह कडून ती कबरीत परावर्तित करायला संधी मिळविली होती.
  • Log in or register to post comments

ताजमहाल

शशिकांत ओक
Fri, 03/20/2015 - 16:54 नवीन
राजा मानसिंहाच्या नातवाकडून ताज इमारतीला राजा जयसिंह कडून ती कबरीत परावर्तित करायला संधी मिळविली होती.
  • Log in or register to post comments

ताजमहाल नव्हे तेजो

खंडेराव
Fri, 03/20/2015 - 18:00 नवीन
महाल का ?
  • Log in or register to post comments

पावन खिंड तीच का?

शशिकांत ओक
Sat, 03/24/2018 - 01:04 नवीन
आग्र्याहून सुटका - नवा प्रकाश - पुस्तक परिचय वरील धाग्याच्या संदर्भात डॉ अजीत जोशींच्या पुस्तकाचा परिचय पुन्हा वर आणला आहे..
  • Log in or register to post comments

हा धागा

शशिकांत ओक
Wed, 12/09/2020 - 07:38 नवीन
नव्याने सादर केला आहे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा