Skip to main content

"जेसन आणि बोलती बेडकी"

लेखक पदकि यांनी शनिवार, 14/02/2015 05:59 या दिवशी प्रकाशित केले.

सिलिकॉनदरीत/वसे तो जेसन
शिका हा लेसन / तरुणींनो
त्याच्या डोक्यामध्ये / आज्ञावली फक्त
संगणकी रक्त/ खेळतसे
रस्त्याने चालता / एका प्रात:काली
बेडकी बोलली / शेजारून
"अरे राजपुत्रा/ राजकन्या मीही
बेडकाचे देही/ शापग्रस्त
मला उचलून / स्वगृही नेशील
आणिक घेशील / चुंबन ते
प्रगटेल माझे / मानवी शरीर
"कामा" स उशीर / मग नाही
जन्मभर तुझी/ होईन मी कांता
आनंदा अनंता/ मुकू नको "
जेसनने तिला / मग उचलले
आणिक ठेविले / खिशामाजी
घरामध्ये तिला / दिले छोटे घर
खायलाही चार / किडे बिडे
आठवडे झाले/ कित्येक दिसांचे
पण चुंबनाचे / नाव नाही
बेडकी अखेर/ झालीसे हताश
स्वरात निराश / प्रश्न करी
"अरे प्रिय मित्रा/ चुंबनाचे काय
धरिते मी पाय/ आता तुझे.
कर मला पुन्हा/ अरे अहंमन्या
सुंदर ती कन्या/ लवकर
देईन तुजला / असा कामानंद
सोड बाकी छंद / कुचकामी"
ऐका तरुणींनो / काय तो वदला
संगणकामधला / अभियंता
"नव्याने मिळाला / मला हा प्रोजेक्ट
कोटींचे बजेट / डॉलरचे
मरायला इथे/ मला नाही वेळ
चुंबनाचे खेळ / कशासाठी?
किडे बिडे देतो/ सुखामध्ये रहा
समोरचा पहा / टीव्ही सुद्धा"
रागाने मग ती / बेडकीही कापे
आणिक संतापे/ प्रश्न करी
"विवाही जीवन / मनात नव्हते
आणले ते येथे / कशासाठी?"
जेसन वदला / "कारण असे की
बोलती बेडकी /दुजी नसे "
----

काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2645
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

:)))) !!!

काय सुंदर बांधली आहे कविता!

सल्ल्युट भाय! सल्ल्युट!


शालेत जेव्हा /शिके हा जेसन
टाळे तो लेसन / कवितांचे
जाई सर्व इच्छा / लयास त्याच्या
भाषा विषयाच्या /कंटाळून
वाचिता वाटे / उतारा तो गूढ
उठे मस्तकशूल / अर्थापायी
वाचील्या तयाना / जरी तासंतास
अर्थ तो काही / उमगेना
परीक्षे ग्लानी / येई तयांस
स्पष्टीकरणंपाई / संधार्भासाहित
जाळू वाटे मग / भाषेचे पुस्तक
माथी बट्टा जरी / अडाण्याचा
मिपाघरी कविता / सुलभीकरण
एकमेव कारण / कवित्वास माझ्या