Skip to main content

दिल्ली मतमोजणीपूर्व धागा

लेखक क्लिंटन यांनी शनिवार, 07/02/2015 23:04 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आजच दिल्ली विधानसभेसाठीचे मतदान पार पडले.मतमोजणी १० फेब्रुवारीला होईल.बहुतांश एक्झिट पोलच्या अंदाजांप्रमाणे आआपला जबरदस्त यश मिळायची शक्यता आहे.एक एक्झिट पोल भाजपला २७ ते ३५ तर आआपला ३१ ते ३९ अशा जागा देत आहे तर अन्य एक एक्झिट पोल भाजपला काठावरचे बहुमत देत आहे.अजून मतमोजणी झालेली नाही तेव्हा प्रत्यक्ष निकाल काहीही लागला तरी दोन्ही परिस्थितीत माझे निकालांनंतरचे मत कसे असेल हे लिहिणे हा या धाग्याचा उद्देश आहे.यापैकी आआप जिंकल्यास माझे मत काय असेल हे या लेखात आणि भाजप जिंकल्यास माझे मत काय असेल हे नंतर प्रतिसादात लिहेन. दोन्ही मला लेखातच लिहायचे होते पण विस्तारभयास्तव ते टाळतो. प्रत्यक्ष मतमोजणीच्या दिवशी शक्य झाल्यास रजा घेऊन निकालांसाठी नवा धागा चालू करेन. कोणत्याही परिस्थितीत अरविंद केजरीवालांनी ज्या हिंमतीने हा सामना लढविला आहे त्याबद्दल ते नक्कीच अभिनंदनास पात्र आहेत.विशेषत: एप्रिल २०१४ मधील लोकसभा निवडणुकांमध्ये आआपचा दिल्लीत मोठा पराभव झाला होता, नंतरच्या काळात अनेक महत्वाचे साथीदार सोडून गेले, योगेन्द्र यादव यांच्याबरोबरही मतभेद आहेत असे चित्र होते आणि मतदानाला १५ दिवस राहिलेले असताना शांती भूषण या आआपच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या महत्वाच्या नेत्याने केजरीवालांनाच बदला अशी मागणी केली या सगळ्या पार्श्वभूमीचा विचार केला तर इतक्या प्रतिकूल परिस्थितीत लढणे ही सोपी गोष्ट नक्कीच नव्हती.तसेच दिल्लीसारख्या राज्यात कॉंग्रेस आणि भाजप अशी दुरंगी लढत काही दशके होत असताना तिसऱ्या पक्षाला चंचूप्रवेश करणेच मुळात कठिण होते.ते त्यांनी केलेच.आणि आता सर्व एक्झिट पोल्स कॉंग्रेसला ५ पेक्षाही कमी जागा देत आहेत (काही शून्य जागा सुध्दा देत आहेत) म्हणजे केजरीवालांनी कॉंग्रेसला दिल्लीतून जवळपास हद्दपार केले आणि परत दिल्लीचे राजकारण दुरंगी केले या दाखविलेल्या हिंमतीबद्दल केजरीवालांना माझ्यासारख्या आआपविरोधकाकडूनही १०० पैकी ११० मार्क. जर आआपला यश मिळाले तर १. आआप: हा विजय नक्कीच आआपसाठी मोठा मनोबल उंचाविणारा असेल.सगळ्यात महत्वाचे म्हणजे जे केंद्रात नरेंद्र मोदींना सामोरे जायला लागणार आहे त्याच गोष्टीला (लोकांच्या आपणच वाढविलेल्या अपेक्षांना सामोरे जाणे) भविष्यात केजरीवालांनाही सामोरे जावे लागणार आहे हे लक्षात घेऊन त्या दृष्टीने कारभार करायला हवा. धरणे धरणे आणि राज्यकारभार या दोन गोष्टींमधला मूलभूत फरक समजून घ्यायला हवा. असे रस्त्यावरचे राजकारण करणे हे बेजबाबदारपणाचे आहे हे नक्कीच लक्षात घ्यायला हवे. तसेच दिल्ली हे अजूनही पूर्ण राज्य नाही आणि दिल्ली सरकारच्या अधिकारांवर मर्यादा आहेत त्या चौकटीतच राहून काम केले पाहिजे.इतर राज्यांप्रमाणे दिल्लीलाही अधिकार द्या ही मागणी रास्त आहे आणि त्यासाठी घटनात्मक मार्ग अवलंबल्यास कोणाचीही हरकत त्याला असेल असे वाटत नाही.पण मागच्या वेळी जो आक्रस्ताळेपणा त्यांनी दाखविला तो हद्दपार करावा ही अपेक्षा नक्कीच आहे.आणि सर्वात महत्वाचे म्हणजे यावेळी स्वबळावर सरकार येणार आहे तर दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अपयश आले तर दोष इतर कोणावरही ढकलता येणार नाही ही परिस्थिती नाकारून चालणार नाही. तसेच दिल्ली म्हणजे सगळा देश नाही हे पण केजरीवालांनी (आणि त्यांच्या समर्थकांनी) लक्षात घ्यायला हवे. दिल्ली हे ९५% पेक्षा जास्त शहरी राज्य आहे.दिल्लीत ज्या मार्गांचा पक्ष वाढवायला उपयोग झाला तेच मार्ग सगळ्या देशात उपयोगी पडणार नाहीत हे लक्षात घेऊन त्या प्रमाणातच अपेक्षा ठेवाव्यात.मागच्या वेळी विधानसभेत यश मिळाल्यानंतर लोकसभेत १०० जागा जिंकणार अशा अपेक्षा, कोणी कोणी तर केजरीवालांना पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरवायला निघाले होते.असल्या अपेक्षा ठेवायला योग्य वातावरण दिल्लीतील विजयामुळे निर्माण होईल असे वाटत नाही. सगळ्यात महत्वाचे म्हणजे केजरीवालांना पक्ष एकत्र ठेवता आला पाहिजे.शेवटी आम आदमी पक्ष म्हणजे ’चळवळ्या’ लोकांचा पक्ष आहे.त्यात विविध मतेमतांतरे असलेल्यांचा समावेश आहे.गेल्या वर्षभरात आपापसातल्या भांडणांचे जाहिर प्रदर्शन इतक्या वेळा आआपने केले होते तरीही त्याकडे दुर्लक्ष करून मतदार केजरीवालांना परत संधी द्यायला तयार झाले असतील तर त्या लोकभावनेवर स्वार होऊन पक्ष एकत्र ठेवणे आणि राज्यकारभार करणे ही कौशल्याची गोष्ट आहे.ती केजरीवालांना साधता यायला हवी. २. भाजप: पक्षासाठी हा पराभव नक्कीच धक्कादायक असेल.विशेषत: २०१४ च्या लोकसभा निवडणुकांनंतर मोदींचा विजयरथ जो चौफेर उधळला होता त्याला अटकाव नक्कीच बसला असे चित्र या पराभवातून उभे राहिल.मतदान व्हायच्याही आधी ही निवडणुक म्हणजे मोदी सरकारवरील सार्वमत नाही अशी पूर्वी कॉंग्रेसचे नेते भाषा करायचे ती भाषा भाजपवाले करत होते ती नक्कीच धक्कादायक आहे.हा पराभव झाल्यास सर्वात पहिल्यांदा मोदी आणि अमित शहांनी त्या पराभवाची जबाबदारी जाहिरपणे स्विकारायला हवी.अन्यथा कॉंग्रेसमध्ये चालायचे तसे-- जिंकल्यास श्रेय गांधी घराण्याचे आणि पराभव झाल्यास दोष इतर कोणाचा अशी परिस्थिती भाजपमध्ये मोदी-शहांच्या नावाने उभी राहिल्यास ते योग्य नाही.असे करणे म्हणजे परिस्थितीपासून दूर पळून आत्मवंचना करणे हा त्याचा अर्थ होईल. सर्वात महत्वाचे म्हणजे हा पराभव नक्की का झाला हे आत्मपरिक्षण करणे योग्य ठरेल.लोकसभेच्या निवडणुकांच्या वेळी लोकांच्या अपेक्षा प्रचंड वाढवून ठेवलेल्या आहेत. त्या अपेक्षा एका रात्रीत पूर्ण होतील अशी कोणाचीच अपेक्षा नाही.पण निदान त्या दिशेने पावले पडत आहेत हे चित्र निदान वरकरणी नाही.धोरणे बनविण्याच्या दृष्टीने पावले पडत असतीलही कदाचित पण अजून ’अच्छे दिन’ अजून आलेले नाहीत तेव्हा लोक कुठे आहेत ’अच्छे दिन’ हा प्रश्न नक्कीच विचारणार आहेत.तेव्हा मतदारांना गृहित धरून चालायचे नाही. मोदींच्या सुदैवाने हा पराभव त्या मानाने कारिकिर्दीत बराच लवकर आलेला असेल.त्यामुळे कारभारात सुधारणा करून त्याची फळे दिसायला पुरेसा वेळ आहे.त्या संधीचा पूर्ण फायदा पक्षाने उठवायला हवा. दिल्लीत पराभव झाला असला तरी आभाळ कोसळलेले नाही.शेवटी दिल्ली म्हणजे लोकसभेत अवघ्या सात जागा असलेले छोटे राज्य आहे.पण या पराभवानंतर कोषात जाऊन यानंतरच्या काळात होणाऱ्या इतर निवडणुकांमध्ये (विशेषत: बिहारमध्ये) पराभव झाल्यास मात्र त्याचे परिणाम नक्कीच वाईट होतील.२०१६ मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये (केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल,आसाम) भाजपला आसाम सोडून इतर राज्यांमध्ये फार चमकदार कामगिरी करता येणे कठिण आहे.तेव्हा बिहारनंतर थेट मार्च २०१७ मध्ये गोवा,पंजाब, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड याच निवडणुका असतील.तेव्हा मधल्या काळात नरेंद्र मोदींची पकड ढिली होत आहे हे चित्र उभे राहणे भाजपला परवडणार नाही. त्या दृष्टीने बिहारमधील निवडणुकांचे महत्व लक्षात यावे. दुसरे म्हणजे दिल्ली भाजप हे एक दुभंगलेले घर गेली कित्येक वर्षे आहे ही परिस्थिती बदलायला हवी. सतत एकमेकांशी भांडणार्‍या स्थानिक नेत्यांना नारळ देऊन मीनाक्षी लेखींसारख्या नव्या नेत्याच्या नेतृत्वाखाली पक्षबांधणी केली तर ते चांगले ठरेल. दुभंगलेले सैन्य घेऊन आयत्या वेळी सेनापती बदलून युध्द जिंकता येत नाही हे भाजपने दिल्लीत १९९८ मध्ये अनुभवले तेच २०१५ मध्ये अनुभवले असे चित्र उभे राहिल.त्या दृष्टीने निदान पुढच्या निवडणुकांसाठी तरी भाजपने आतापासून लोकांसमोर एकजुटीने सामोरे जावे हे इष्ट. ३. कॉंग्रेस: हे निकाल मात्र कॉंग्रेस पक्षाची झोप उडवतील हे नक्कीच.दिल्लीमध्ये ७० पैकी ५ पेक्षा कमी जागा मिळणे म्हणजे पक्षाची मोठीच वाताहत झालेली असेल.पक्षाला राहुल गांधी नवी दिशा देऊ शकणार नाहीत हे परत एकदा सिध्द होईल.अजय माकनसारखा चेहरा पुढे करूनही आणि दिल्लीमध्ये १५ वर्षे काम करूनही इतका मोठा पराभव का पदरी पडला याचे आत्मपरिक्षण करणे नक्कीच गरजेचे असेल.१९७९ ते १९९७ या काळात विरोधी पक्षात असताना इंग्लंडमधील लेबर पक्षाने टोनी ब्लेअर हे नवेच नेतृत्व पुढे आणले आणि मग सलग तीन निवडणुका जिंकल्या होत्या त्याप्रमाणे कॉंग्रेसला नक्कीच स्वत:ला रिइन्व्हेंट करायला हवे.

वाचने 16233
प्रतिक्रिया 107

प्रतिक्रिया

In reply to by जयंत कुलकर्णी

मी कंपन्या असेही म्हटले आहे. मध्यमवर्गाला त्यांचे पैसे देश चालवत नाहीत याची पूर्ण कल्पना आहे/असावी.....

In reply to by जयंत कुलकर्णी

जयंत कुलकर्णींंशी सहमत (तात्विकदृष्ट्या),
टॅक्स पेअर्स अ‍ॅसोसिएशन म्हणजे नक्की कुणाची संघटना ?
फार फार तर "डायरेक्ट टॅक्स पेअर्स अ‍ॅसोसिएशन" म्हणा..

देशाच्या साधन संपत्तीवर पहिला हक्क गरीबांचा असायला हवा हे तत्व चुकीचे असून देशाच्या साधन संपत्तीवर सर्वांचा समान हक्क असावा असे तत्व हवे.

In reply to by सुबोध खरे

देशाची साधन संपत्ती राखण्याची आणि वृध्दींगत करण्याची जबाबदारी नक्की कोणाची? आपली जनता हक्काबद्दल बोलते, जबाबदारी कडे मात्र... :(

In reply to by सुबोध खरे

मी तर म्हणेन साधन सामुग्रीचं रक्षण आणि संवर्धन करणारे प्रथम अधिकारी असायला हवेत. बरेच वेळा गरिब रिमेन्स गरिब बाय चॉईस. मध्यंतरी शेतकामगार मिळत नाहि म्हणुन शेतकर्‍यांची परवड आणि त्याच वेळी हाताला काम नाहि म्हणुन रोजगार हमि योजनेवर करोडो रुपये पाण्यात गेल्याचं उदाहरण कुठेतरी वाचलं होतं (बहुतेक लोकसत्ता). हा ताळमेळ बसवणं खरच गरजेचं आहे.

In reply to by सुबोध खरे

देशाच्या साधन संपत्तीवर पहिला हक्क गरीबांचा असायला हवा हे तत्व चुकीचे असून देशाच्या साधन संपत्तीवर सर्वांचा समान हक्क असावा असे तत्व हवे.
+१. याच्याशी काही प्रमाणात साधर्म्य असलेली माझी एक कॉन्स्पिरसी थिअरी लिहितो. राजकारणी लोक आपली व्होट बॅंक जपायला कुठल्याही थराला जातात हे अनेकदा बघायला मिळाले आहे.एखादा पक्ष गरीबांची बाजू घेतो त्या पक्षाचे हितसंबंध बहुतांश लोक गरीबच असावेत यात गुंतलेले असतात असे म्हणता येईल का? याचे कारण समजा लोकांना श्रीमंत करणे म्हणजे आपल्या हक्काच्या व्होटबॅकवर परिणाम करणे किंवा स्वत:च्या पायावर कुर्‍हाड मारणे.किती पक्ष तसे खरोखरच करू शकतील? दुसरे म्हणजे एकदा एखाद्या पक्षाची एक प्रतिमा झाली की ती बदलणे फार कठिण असते.म्हणजे काहीही झाले तरी भाजप हा हिंदुत्ववादी पक्ष म्हणूनच ओळखला जाईल.वाजपेयी सरकारने राम मंदिराचा मुद्दा एन.डी.ए सरकारच्या कार्यक्रमातून दूर ठेवला तरी सरकारचा छुपा अजेंडा तोच आहे अशा स्वरूपाचेच बोलले जात होते. त्याच न्यायाने एखादा गरीबांची बाजू घेणारा पक्ष असेल तो प्रो-गरीब म्हणूनच ओळखला जाणार. तेव्हा माझा दावा असा की गरीबांची बाजू घेणारा पक्ष हा गरीबी दूर करण्यासाठी फारसा उपयोगी नाही.त्याउलट श्रीमंतांची बाजू घेणाऱ्या पक्षाला आपली व्होट बॅंक वाढवायला अधिकाधिक लोकांना पहिल्यांदा मध्यमवर्गात आणि नंतर श्रीमंत वर्गात आणण्यात इन्सेन्टिव्ह असतो. तेव्हा श्रीमंतांची बाजू घेणारा पक्ष हा अधिक चांगल्या पध्दतीने गरीबीविरूध्द पावले उचलू शकतो अशी माझी कॉन्स्पिरसी थिअरी आहे.

भाजपचा विजय झाला तर तो आम आदमी पक्ष आणि कॉंग्रेस यांच्यापेक्षाही ओपिनिअन पोल आणि एक्झिट पोल वाल्यांचा मोठा पराभव असेल. २००४ मध्ये या पोलवाल्यांना मोठा धक्का बसलाच होता त्याची पुनरावृत्ती होईल आणि स्वत:ची विश्वासार्हता पुनर्स्थापित करण्यासाठी त्यांना अधिक कष्ट घ्यावे लागतील. भाजप भाजपचा विजय झाल्यास मात्र नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा विजयरथ उधळला आहे तो चालूच आहे असे चित्र उभे राहिल.यातून नरेंद्र मोदींचे भारतीय राजकारणातील निर्विवाद स्थान पक्के होईलच. पण त्यात धोका असा की कोणताही समर्थ विरोधी पक्षच न उरल्यामुळे काहीही झाले तरी लोक आपल्यालाच मत देतील ही जी मतदारांना गृहित धरायची प्रवृत्ती काही प्रमाणात पक्षामध्ये दिसत आहे ती वाढीस लागेल.पक्षाच्या आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे देशाच्या आणि देशातील लोकशाहीच्या दृष्टीने हे धोक्याचे असेल. दिल्ली भाजपच्या दृष्टीने महत्वाचे म्हणजे तिथल्या स्वत:ला स्वयंभू समजणाऱ्या नेत्यांना किरण बेदी मुख्यमंत्री झालेल्या आवडतील असे वाटत नाही.मदनलाल खुराणांसारखे सर्वमान्य नेतृत्व दिल्ली भाजपकडे नाही.सगळ्यात महत्वाचे म्हणजे मुख्यमंत्रीपदासाठी पोलिसी खाक्या चालणार नाही तर सर्वांना बरोबर घेऊन, कधी चुचकारत, कधी पडती बाजू घेत पुढे जावे लागेल.ते किरण बेदींना कितपत जमेल हा पण प्रश्न आहेच. दिल्लीत विजय झाल्यास तो विजयही दिल्लीतील भाजप नेतृत्वावर लोकांनी दाखविलेला विश्वास असेल असे म्हणणे नक्कीच जड जाईल. परत एकदा लोकांनी नरेंद्र मोदींच्या नावावर लोकांनी मते दिली म्हणून तो विजय साध्य झाला असेच म्हणायला हवे.पक्षाच्या दिल्लीतील भवितव्याच्या दृष्टीने हे नक्कीच धोकादायक आहे.इतर राज्यांमध्ये भाजपचे खमके आणि जनाधार असलेले नेते आहेत तसे दिल्लीत कोणीच नाही.मदनलाल खुराणांना दिल्ली भाजप नक्कीच मिस करत असेल.भाजपचा विजय झाला तरीही भविष्यात मीनाक्षी लेखी यांना दिल्लीत पुढे आणायला हवे असे मला वाटते.एकतर त्या तरूण आहेत, अभ्यासू आहेत आणि मुख्य म्हणजे शांत आणि समतोल आहेत असे दिसते. याचा फायदा पक्षाने करून घ्यायला हवा. आआप आम आदमी पक्षाचा पराभव झाल्यास मात्र पक्षाच्या अस्तित्वाच्याच दृष्टीने ते धोक्याचे असेल.मुळात पक्षात किती मतभेद आणि भांडणे आहेत हे जगजाहीर आहेच.केजरीवालांनी आपल्या अहंमन्य स्वभावामुळे अनेकांना दुखावले आहेच.आणि असे दुखावल्या जाणाऱ्यांमध्ये शांती भूषण, प्रशांत भूषण या महत्वाच्या पक्ष संस्थापकांचाही समावेश आहे. त्यातून सत्तेचे लोणीसुध्दा नसेल तर अशा दुखावल्या गेलेल्या मंडळींना पक्षाबरोबर राहण्यास काहीच इन्सेन्टिव्ह राहणार नाही.नंतरच्या काळात केजरीवालांनी पक्ष व्यवस्थित सांभाळला नाही तर आआपचा अगदी मनसेसुध्दा होऊ शकतो. कॉंग्रेस कॉंग्रेस पक्षाच्या दृष्टीने भाजपचा दिल्लीतील विजय ही आआपच्या विजयापेक्षा अधिक जास्त वाईट बातमी ठरेल. आआप जिंकला तर निदान विरोधी पक्षाचा विजय झाला आणि महत्वाचे म्हणजे केजरीवाल त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरले की आआपला मिळालेली भाजपविरोधी मते आपल्याकडे परत येतील हा अंदाज कॉंग्रेसचा असेल.भाजपचा विजय झाल्यास ते ही होणार नाही. अनेकदा दिल्ली कॉंग्रेसचे खरोखरच वाईट वाटते.अगदी अलीकडच्या काळापर्यंत १५ वर्षे दिमाखात राज्य करूनही आणि काम करूनही पक्षाची इतकी दयनीय अवस्था का व्हावी?शीला दिक्षित यांनी २०१३ च्या निवडणुकांपूर्वी--’कोण केजरीवाल’? हा खोचक प्रश्न विचारला होता त्याचा पश्चात्ताप त्यांना जन्मभर करावा लागेल असे दिसते.

In reply to by क्लिंटन

विश्लेषण योग्य ... पण पराभुत आपचे विश्लेषण चुकीचे वाटले सत्तेच्या लोण्याची हाव ठेवुन पक्षात येणारे असतील ही, परंतु बरेचसे कार्यकर्ते .. नेते हे आप मध्ये फक्त पदासाठी.. सत्तेच्या लोभा साठी आलेले नाहीत. इतर राजकिय पक्षांप्रमाणेच हे पण असेच असे मत घेवुनच आपण असे बोलु शकतो. आंदोलनातुन मिळालेल्या नेत्यांना फक्त सत्ताकारणाच करावयाचे आहे असे नसते. भांडन कुठल्या पक्षात नसते.. आपचे भांडण सरळ सरळ टीव्ही वरती दिसते.. कारण बाकी पक्षांप्रमाणे स्टेटस साठी आणि पैश्याच्या जोरावर न्युज दाबायला आप ला येत नसेल असे वाटते. आप सत्तेतुन पाय उतार झाल्यावर न्युज चॅनेल कधी त्यांच्याबद्दल चांगले बोललेले मला आठवत नाही. म्हणजे काहीच चांगले न घडवता लोक त्यांना मत देतायेत हे म्हणने चुकीचे आहे. त्यामुळेच वयक्तीक अहं असु शकतो.. बर्याचदा चांगल्या गोष्टींचा अहम पण इतर सहकार्‍यांना योग्य वाटत नाही.. पण मनसे होईल ही गोष्ट चुकीची वाटते.

नेहमी प्रमाणे क्लिन्टन यांचे उत्तम विश्लेषण ! भारतीय लोकशाही प्रबुद्ध होत आअहे असे वाटत असताना राजधानीत मात्र स्वार्थी लोकांची बजबजपुरी आहे असे वाटते. दिल्लिकर अजूनहे स्वतःच्या पलिकडे पहायला तयार नाहीत. भाजपाचा दिल्लितील पराभव हा मोदींच्या धोरणाचा पराभव आहे असे इतक्या लवकर म्हणणे चुकीचे ठरेल .कॉन्ग्रेसने आणि अन्य विरोधी पक्षांनी कितीही ओरड केली तरी मोदिंबाबत लोकांचा भ्रमनिरास झाला आहे असे वाटत नाही. भाजपाचा पराभव हा कदाचित दिल्लीतील लोकांची लोकशाहीची कमी समज, देशाचे काहीही होऊ दे, माझा फायदा झाला पाहीजे ही कोती विचारसरणी , हेच असू शकेल असे वाटते. लोकांना त्यांच्या लायकीप्रमाणेच सरकार मिळते हे पुन्हा एकदा सिद्ध होईल. कसलेही धोरण नसलेला कुत्र्याच्या छत्रीसारखा उगावलेला पक्ष कशाचे कल्याण करु शकेल ? यापेक्षा कॉन्ग्रेस सत्तेवर यायला हवा असे जरूर वाटते आहे. भाजपाला चाप लावायला त्याचे अधिक गरज आहे. ओन सेकन्ड थॉट .. काही साध्या साध्या चुका ज्या भाजपाने केल्या ( हर्षवर्धन डावलणे , निवडणूकांना उशीर करणे , पक्ष बांधणी न करणे ) त्या ही मुद्दामच केल्या की काय असे वाटते . कारण जरी समजा आप आले तरी ते फार काळ कारभार करु शकतील असे वाटत नाही , अश्या वेळी ही संधी कॉन्ग्रेसच्या ऐवजी आप ने घेतेली की एका दगडात दोन पक्षी ! कोन्ग्रेसचे आणखी ह्युमिलेशन होईल आणि आप या निवडणुकीनंतर कायमची संपेल. ( आप राज्यकारभार करु शकणार नाही याची माझ्याप्रमाणे अनेकांना खात्री आहे , भाजपाच्या धुरंधराना हे माहीत नसेल काय ?)

In reply to by विटेकर

भाजपाचा पराभव हा कदाचित दिल्लीतील लोकांची लोकशाहीची कमी समज, देशाचे काहीही होऊ दे, माझा फायदा झाला पाहीजे ही कोती विचारसरणी , हेच असू शकेल असे वाटते. लोकांना त्यांच्या लायकीप्रमाणेच सरकार मिळते हे पुन्हा एकदा सिद्ध होईल. कसलेही धोरण नसलेला कुत्र्याच्या छत्रीसारखा उगावलेला पक्ष कशाचे कल्याण करु शकेल ?
अतिशय चुकीचे मत.. म्हणजे तुमचे असे म्हणणे की दिल्लीतील लोकआंना कमी समज आहे. मात्र भाजप खुप चांगला पक्ष. मला हेच कळत नाही लोक आपल्या म्हणण्याला पटवण्यासाठी दुसर्यांचा असा अनादर का करत असतात, म्हणजे आपल्याला तेव्हडे कळते बाकीच्यांना नाही. असे समजने खुप चुकीचे आहे. आणि दुसर्याला कमी लेखन्याची चुक पुढे खुप महागात पडते.. जसे गेल्या निवडनुकीत आप ला कमी लेखले होते तसे. ---------- दुसरी गोष्ट, चिंचवड मध्ये भाजप निवडुन आला.. का तर अनधिकृत बांधकामे नियमित करुन दिली जातील .. हे सुद्धा वयक्तीक स्वार्थाकडे झुकणारे नाही वाटत का ? नाहितर राष्ट्रवादीच्या आयात उमेदवाराला भाजप ने तिकट दिले होते. अनधिकृत बांधकामांविरोद्धत उत्कृष्ट काम करणार्या श्रीकर परदेशींची उचलबांगडी आणि अश्या लोकांना असल्या अस्वासनां साठी निवदुन देणे हे सुद्दा याच स्वार्थी बजब्जपुरीत येत नाही ही कमाल. असो.. आपणास भाजप कसा योग्य वाटतो ते ठिक पण दुसरे कसे स्वार्थी .. बावळट आणि आपण तेव्हडे चांगले हे चुकीचे आहे. लोकांना योग्य प्रशासन आप देवु शकतील असे वाटले असेन कारण त्यांनी कॉन्ग्रेस आणि भाजपे ची सरकारे पाहिलेली आहेत, भाजप महानगरपालिकेत ही होताच. त्यामुळे त्यांना वेगळा ऑप्शन पाहिजे असेन . बाकी आप कडे धोरणे नाही असे म्हणणे ही योग्य नाही. जर निवडुन आल्यावर ते कळेल . बघु जमले तर धोरणांवर एक धागा यावा लागेल

आपल्या ४९ दिवसाच्या कारकिर्दीत आप ने मतदारांना वीज व पाणी यांच्या वापरात खूप सवलती दिल्या आणि इतर सवलतींची आश्वासने दिलि. त्यामुळे आप चे सरकार आले तर निदान या सवलती पुन्हा मिळतील यांची खात्री असल्याने बहुसंख्य आणि म्हणजेच गरीब वर्गातल्या लोकांनी आप ला मते दिली असावीत.

In reply to by रमेश आठवले

ह्म्म.. कदाचीत असे ही असेन की ह्या बेसिक गोष्टी इअतर कोणी देवु शकले नाहीत आता हे तरी बघु . किंवा उद्योगधंद्यांना पाठपुरवठा करता करता, बेसिक सामान्य लोकांना पाहण्यास इअतर कोणाला वेळच नसेल असे ही वाटले असु शकते ना. गोश्ट तीच असते पण त्याला अनेक कंगोरे असु शकतात. वाजपेयींच्या निवडनुकीवेळेस .. समान नागरी कायदा आणाणर या गोष्टीसाठी मी भाजप ला मत दिले होते. ते तर आले नाहीच , पण नंतर तो मुद्दा पण पुन्हा कधी दिसला नाही. मग माझ्यासारखे नागरीक इतर कोणी त्यांनी दिलेली अश्वासने पाळतील असे वाटुन दुसरीकडे वळतील असे वाटल्याने त्यात वावगे काही नसते. -- लोकांनी फक्त प्रामाणिकतेला मते दिलेली नाहित तसे असते तर मनमोहन सिंग ही पुन्हा देशात सत्तेवर आले असते. लोकांना विश्वास पण वाटावा लागतो आणि तो आप कडे सध्या आहे

अरविंद बद्दल लई काही माहिती आहे जी इथे नाही शेयर करू शकत!!! तरीही आप नको यायला असे मनापासुन वाटते आहे.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

तुमाले कोन इचारुन राह्यते वो बाप्पु, थे "आप"ले दिल्लीकर तं उड्या मारून रायले ना ;)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

अरविंद बद्दल लई काही माहिती आहे जी इथे नाही शेयर करू शकत!!!
सोन्याबापु व्यनि करता काय ? जाणून घ्यायची इच्छा आहे. :)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

लई काही माहिती
अर्र्र्र्र्र्र् !! इलेक्शन अगोदर भाजपाला दिली असती तर आप हारलं असता ! काय राव तुम्ही ! गेला बाजार एका राज्याचे राज्यपालपद घालवलतं !

In reply to by कपिलमुनी

नको हो!!! राज्यपाल पद म्हणजे बिन नखा चा वाघ्या!काय करायचे घेऊन!! आम्ही आपले नोकरच बरे!!! ;)

माझ्या मते, भाजप हरला तरी मोदींनी काळजी करु नये. भाजपकडे चांगला मुख्यमंत्री नसल्यामुळे भाजप हरला आहे. अगदी आत्ता जरी लोकसभेच्या निवडणुका झाल्या तरी दिल्लीत भाजपच्या ६ जागातरी नक्की येतील. लोक फार हुषार आहेत. केंद्रात मोदी आणि राज्यात केजरीवाल असे मत देणारे बरेच आहेत.

In reply to by प्रसाद१९७१

जिंकले तर मोदी आणि हरले तर बेदी ! इथे जिंकायची खात्री नाही म्हणून तर मुख्यम्ण्त्रीपदाचा उमेदवार घोषित केला . या पूर्वी लोकसभेनंतरच्या निवडणूकींमध्ये भाजपाने मुख्यम्ण्त्रीपदाचा उमेदवार घोषित केला नव्हता.

आआपला बहुमत मिळेल, असं सर्व्हे सांगताहेत. मी आआप आणि केजरीवाल ह्यांनी विजयी व्हावं की नको, ह्याबाबतीत संभ्रमात आहे. एकीकडे वाटतं कि त्यांनी बहुमताने जिंकून यावं म्हणजे मग सरकार चालवनं म्हणजे नुस्त्या फुशारक्या मारणं, दुसर्‍यांवर आरोप करणं, तमाशे करणं इतकंच नसून एक 'सिरीअस जॉब' आहे हे कळेल. कदाचित राजनैतिक परिपक्वतापण येईल आणि भारतीय राजकारणाला एक वेगळा आयाम लाभेल. दुसरीकडे त्यांच्या ४९ दिवसांचा तमाशा आठवला कि वाटतं, नको.. बहुमतात आले, तर अजून जास्त माज येईल. "बाकी सगळेच भ्रष्टाचारी"चा मंत्र असल्याने येताजाता अधिकार्‍यांची शरम काढणे, त्यांना टाकून बोलणे आणि एकूणच सावळागोंधळ वाढेल.. मी 'जनरलायझेशन'पासून नेहमीच दूर राहतो, मात्र बर्‍याच आआप समर्थकांची वागणूक मला ह्या पक्षाच्या उथळतेबद्दल आणि त्याच्या अराजकता-प्रेमाची खात्री पटवते. मतदान संपल्यानंतरही, अजूनही २००४च्या शाही इमामनी भाजपाला देऊ केलेल्या पाठींब्याबद्दलच्या बातम्या डकवून दिशाभुल (कुणाची ते तेच जाणोत) करण्याचा प्रयत्न करणारे आआप समर्थक बघितले की किंव वाटते..

पुन्हा त्रिशंकू येइल असे वाटते . कारण भाजपाने भरपूर जोर लावला आहे तिकडे दुर्लक्ष करून चालणार नाही . काँग्रेस आणि इतर पक्ष -अपक्ष किती जागा घेतात यावर बरेच अवल>बून आहे

In reply to by कपिलमुनी

मी निवडणुकांचा अंदाज गेली कित्येक वर्षे व्यक्त करत आहे. माझे अंदाज कधी बरोबर आले तर अनेकदा चुकले.अनेकदा माझ्या अंदाजांमध्ये आणि प्रत्यक्ष निकालात अगदी मोठा फरक होता (जसे २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये झाले). पण तरीही एकंदरीत निवडणुकांच्या कलाच्या बाबतीत मात्र बहुतांश वेळी माझे अंदाज बरोबर ठरले होते.पण यावेळी मात्र मी पूर्णपणे ब्लॅन्क आहे.आआप पुढे असेल असे वाटत असले तरी तो दावा १००% खात्रीने करणे अजूनही जड जात आहे.एखाद वेळेस काही पोल म्हणत आहेत त्याप्रमाणे निवडणुका एकदम एकतर्फी सुध्दा होतील.तरीही निवडणुका एकदम एकतर्फी होतील याची चिन्हे २०१३ मध्ये कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान यात दिसत होती तशी यावेळी दिल्लीत तरी नक्कीच दिसत नाहीत.तेव्हा उद्या खरोखरच इंटरेस्टिंग दिवस असणार आहे.

In reply to by क्लिंटन

क्लिंटन एक सल्ला..... या अशा लेखात (विश्र्लेषण) तुमची कुठलिही इच्छा प्रकट होऊ नये असे वाटते. त्या साठी वेगळा धागा मात्र जरुर काढावा...

In reply to by जयंत कुलकर्णी

धन्यवाद जयंत कुलकर्णी. माझी इच्छा इतर धाग्यात यापूर्वीच प्रकट केली आहे :) आणि माझा अंदाज वर लिहिल्याप्रमाणे असला तरी तो अंदाज व्यक्त करायला लागणारा नेहमीचा कॉन्फिडन्स नाही :( असो. पुढील निवडणुकांच्या वेळी तुमचा सल्ला लक्षात ठेवेनच. भारतात निवडणुकांना काही कमी नाही.दरवर्षी कुठल्यातरी निवडणुका चालू असतातच :)

In reply to by क्लिंटन

येस, आप बद्दल आपली मते टोकाची आहेत .. एकदम वेग वेगळी. परंतु येथीलच नाही, बरेच आधीच्या वेगवेगळ्या धाग्यावरचही तुमची मते आवडतात. त्यामुळे प्रत्येक आपल्या धाग्यांचा रिप्लायकर्ता नसलो तरी एक वाचक आहे. लिहित रहा... आणि एक.. कधी कधी आपण टोकाचा मुद्दा पकडुन बसतो त्यामुळे काही चांगल्या गोष्टी पण आपण त्याच टोकामुळे पाहु शकत नाही असे वाटते.

प्रतिसादाबद्दल आणि प्रतिसाद न वाचताही वाचनमात्र राहिलेल्या सर्वांना धन्यवाद. लवकरच निकालांसाठीचा धागा सुरू करत आहे.उद्या सकाळी जसे कल/निकाल यायला लागतील तसे त्या धाग्यावर पोस्ट करेनच.

प्रत्यक्ष दिल्लीमधे प्रचार काळात असलेल्यांचे मत आप च्या बाबतीत वेगळे आहे. उद्याच्या निकालात ते सर्वाना कळेलच

In reply to by ज्योति अळवणी

प्रत्यक्ष दिल्लीमधे प्रचार काळात असलेल्यांचे मत आप च्या बाबतीत वेगळे आहे. उद्याच्या निकालात ते सर्वाना कळेलच
हो निकालाची अगदी आतुरतेने वाट बघत आहे.इतकी वाट कुठल्याही मतमोजणीच्या दिवसाची बघितलेली नाही--अगदी १६ मे ची सुध्दा.

In reply to by ज्योति अळवणी

आपण ज्योति अळवणी मु.पो. विले पारले आहात का? श्री पराग अळवणी हे तिथले आमदार आहेत. तसे असेल तर आपले विश्लेषण बरेचसे वस्तुस्थितीला धरून असेल म्हणून विचारले. बाकी काही नाही. प्रश्न वैयक्तिक वाटत असेल तर उत्तर नाही दिलेत तरी चालेल.

In reply to by राही

आपण ज्योति अळवणी मु.पो. विले पारले आहात का? श्री पराग अळवणी हे तिथले आमदार आहेत.
अगदी हाच प्रश्न मलाही पडला होता.पण ज्योतीताईंशी ओळख नाही तेव्हा उगीच कशाला विचारा म्हणून तो प्रश्न विचारायचा विचार सोडून दिला होता.

सरकारी नोकरांना प्रचारात भाग घेता येत नाही असे वाचले . मग आपले मंत्री , पंतप्रधान यांना देखील पगार असतो ना ? तरी देखील ते एखाद्या विशिष्ट पक्षाचा प्रचार कसा काय करतात ? हे ( तात्विकदृष्ट्या) चुकीचे आहे का ? @ क्लिंटन , यासंबंधी नियम काय सांगतात हे सांगू शकाल का ?

In reply to by कपिलमुनी

ते सरकारी नोकर नाहीत हो. ते लोक निर्वाचित प्रतिनिधी असल्याने त्यांना पगार नाही "भत्ता" असतो. ते पदावरुन पायउतार झाले की सगळे बंद. आयएएस अधिकारी असलेले त्यांचे सचिव इत्यादि मात्र सरकारी नोकर (त्यांच्याबद्दल हा प्रश्न लागू होईल).

दिल्ली राज्य लहान आहे (पूर्ण राज्याचा दर्जा पण त्याला नाही). केंद्र शासित प्रदेश, महानगरपालिका आणि दिल्ली राज्य सरकार अश्या ३ पातळ्यावर दिल्लीचा कारभार चालतो तरीपण दिल्लीसाठी मोदी /शहा यांनी खूप जोर लावला कारण राज्य लहान असले तरी देशाची राजधानी आणि इथल्या मिडीयामुळे चर्चेत राहते आणि देशभर इथल्या घटनांचा परिणाम पडतो, दखल घेतली जाते (डिसेंबर २०१३ मध्ये भाजपने मप्र, छत्तिसगढ, राजस्थान जिंकले मात्र चर्चा जास्त झाली ती दिल्लीतल्या आपच्या जागांची!). दिल्लीत अपयश आले तर देशभर प्रतिसाद उमटणार आणि लोकसभा २०१४ नंतर उधळलेला वारू रोखला जाणार या भीतीने मोदी/ शहा आणि त्यांची फौज केजरीवर तुटून पडली (खरे तर महाराष्ट्रात त्याला थोडा ब्रेक लागलाच होता मात्र आधी एनसीपीबरोबर मिलीभगत उघड झाल्यावर पब्लिकने केलेल्या छीथुमुळे यांनी सेनेला बरोबर घेवून प्रतिमा सावरण्याचा प्रयत्न केला) . दुसरे असे कि केजरीवाल कसा का असेना प्रामाणिक आहे आणि जिद्दी आहे. शहरी सुशिक्षित मध्यमवर्ग आपकडे खेचला गेला होता, लोकसभेत परत तो भाजपकडे वळाला. मोदींचा कारभार आहे असाच चालत राहिला तर परत हा वर्ग केजरीवालकडे आशेने पाहू शकतो हे भाजपचे चाणक्य जाणून आहेत म्हणून ते आणि त्यांची फौज केजरीला टार्गेट करत आहेत. यांचा प्रचार काय तर मफलरवाला, खुज्लीवाल, अनार्कीस्ट वगैरे वगैरे आणि काही मोदिभक्त फेबुवालवर आप कसा देशद्रोही आहे, आपला मुस्लिम देशातून (पाक, सौदी) फंडिंग होते याच्या 'मनघडंत' कहाण्या रंगवत आहेत. प्रतिस्पर्धी आटोपत नसेल तर हिंदू- मुस्लिम अस ध्रुवीकरण करायची भाजपची जुनीच सवय आहे मात्र केजरीवाल दिल्लीतल्या सर्व समाज घटकांत लोकप्रिय आहे उद्या जर आप बहुमताने जिंकली आणि केजरीवाल मुख्यमंत्री झाला तर तो आपल्याला नडणार हे भाजपेयी जाणून आहेत आणि म्हणून केजरीवर इतके तुटून पडत आहेत.

मुद्दाम आठवण ठेऊन या उमेदवाराची बातमी फॉलो केली, नरेश बालियन हा "आप"चा उमेदवार निवडून आलाच पटाईत साहेबांच्या होर्‍याप्रमाणे, आणि त्याची दिल्ली पोलिस कमिशनरने दोन तास चौकशीही केली आज असं दिसतं. पुढे काय होतं ते पहायला हवं. या 'आप'च्या उडदामाजी काळे किती हे कळायला हवेच. शुक्रवारी म्हणे 'आप'च्या संजय सिंग, आशुतोष आणि आशीष खैतान यांनी याच कमिशनरला भेटून नरेश बालियान याची चौकशी निवडणुकीनंतर करा अशी विनंती केली होती. या सर्वावर (आणि या नवनिर्वाचित आमदारास अटक झाल्यास) अरविंद केजरीवाल, आणि आतापर्यंत मलातरी प्रामाणिक आणि संयमी वाटणारे योगेंद्र यादव, यांची प्रतिक्रिया काय असेल ते नक्कीच लक्ष ठेवण्यासारखं असेल.

दारू जिथून जप्त केलीये, ते गोदाम मुकेश बाल्यान (भाजपाचा कार्यकर्ता) यांचे आहे अशीही एक बातमी आली होती. TOI ने चुकीची बातमी छापल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून Clarification सुद्धा छापले होते. इलेक्शन कमिशननेसुद्धा कुठेही नरेश बाल्यान यांचे नाव घेतल्याचे मला आठवत नाही. I answered all questions I was asked, in future also if I'll be summoned I will extend full cooperation. - Naresh Balyan ‍^ ANI ची बातमी एखाद्या जागी दारू पकडल्या गेली तर स्वतः पोलिस कमिशनर कॅमेर्‍यापुढे येऊन बाईट देतांना आजवर मी तरी पाहिले नव्हते. दिल्ली पोलिस कुणाच्या ऑर्डवर काम करते हे जाणून घेण्यासाठी राज्यघटना वाचण्याचीसुद्धा गरज नाही. त्यामुळे फक्त ‘आप’ च्या उमेदवारावर आरोप का लावल्या गेले असतील हे सहज समजण्यासारखे आहे. कॉंग्रेस-भाजपच्या उमेदवरांचे दारू वाटतांनाचे व्हिडिओ यूट्युबर उपलब्ध आहेत, पण त्याबद्दल कुणी बोलत नाही यातच सगळे आले. समजा चौकशीअंती स्पष्ट झाले की दारू नरेश बाल्यान यांचीच होती, आणि तरीही आम आदमी पार्टी जर तेव्हा त्यांचा बचाव करताना दिसून आली तर ते निषेधार्हच असेल ! आप असा एकमेव पक्ष आहे ज्याला अधिकृत विपक्ष नाही, पण त्यांचे लाखो कार्यकर्तेच त्यांच्यासाठी विपक्षाचे काम करतात. अवांतर - दिल्लीचे सध्याचे पोलिस कमिशनर भिम बस्सी मला निरज कुमार यांच्यासारखेच वाटतात. इंडिया टुडे च्या कार्यक्रमात या निरज कुमारांनी अरविंद केजरीवालची टिंगल उडवतांना स्वतःची पातळी दाखवून दिली होती.