Skip to main content

ते तिघं !

लेखक चिनार यांनी गुरुवार, 22/01/2015 08:43 या दिवशी प्रकाशित केले.
ते तिघं सध्या आपल्या सगळ्यांच्या घरात धुमाकूळ घालतायेत. त्यांना वेळीच आवरलं नाही तर घरात राहणं मुश्कील होईल. आपल्या कळत-नकळत आपली तुलना सतत त्यांच्याबरोबर होते आहे. आपलं कुटुंबप्रमुख पद त्यांच्यामुळे धोक्यात येऊ शकतं. आणि आपण काहीही केलं तरी त्यांना आता अवरु शकत नाही. ये हमारे बस की बात नही!! आता तुम्ही विचाराल , हे कोण तुर्रमखान ? त्यांची ओळख काय ? त्याचं कर्तुत्व काय ? ओळख म्हणाल तर आपल्या रोजच्या सक्तीच्या पाहण्यातले. कर्तुत्व म्हणाल तर अफ़ाट ! अचाट ! पहिला -- आजीने कष्टाने उभे केलेल्या गृह उद्योगाचा एकमेव वारस आणि मालक असलेला श्री ! (होणार सून मी त्या घरची ) दुसरा -- एका गर्भश्रीमंत घरातली पोरगी पटवण्याचा पराक्रम गाजवलेला राया !! (जावई विकत घेणे आहे ) तिसरा -- गांधीजींची सहनशीलता, टिळकांचा दुर्दम्य आशावाद, श्रावणबाळाइतका आज्ञाधारक इत्यादी गुण पदरी घेऊन साक्षात श्यामच्या आईने सुद्धा जिची ट्युशन लावावी अश्या मातेच्या पोटी जन्मलेला सुपुत्र आदित्य !!! (जुळून येती रेशीमगाठी) आता बोला! आहे का तुमच्यात हिम्मत यांना आवरण्याची ? आहे का तुमच्यात हिम्मत संध्याकाळी ७-१० या वेळात बायकोच्या हातून रिमोट हिसकण्याची ? नाही ना ! मग गप्पं बसा. आणि त्या तिघांच्या पराक्रमाच्या गाथा पहा. घरातल्या वेगवेगळ्या स्वभावाच्या आणि आकाराच्या सहा-सात बायकांच्या कटकटी सांभाळून व्यवसायामध्ये इतकं नेत्रदीपक यश मिळवणं म्हणजे खायचं काम नव्हे. त्यात मधूनच अनेक वर्षांपूर्वी घराबाहेर काढलेला बेवडा काका घरात वापस येतो. मग वाल्याचा वाल्मिकी व्हावा तसं या काकामध्ये आमुलाग्र बदल घडून येतो. या बदलाचा शिल्पकार अर्थातच श्री असतो. काहीही कारण नसताना घर सोडून गेलेले श्री चे वडील काहीही कारण नसताना परत येतात. मग श्री स्वत: ची मानसिक कुचंबणा वैगेरे काहीतरी विसरून हळूहळू वडीलांना स्वीकारतो. हाच श्री स्वत: च्या चुकीचं प्रायश्चीत्त म्हणून घरदार सोडून एका "हौटेल" मध्ये राहून फार हलाखीचे दिवस काढतो. संगणकासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून श्री त्यांचा गृहउद्योग एका नव्या उंचीवर नेउन ठेवतो. आर्थिक मंदी वगैरे शब्द त्याच्या गावीच नाहीयेत.त्याने नवीन उत्पादन बाजारात आणलं रे आणलं की त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळतो. श्री च्या व्यक्तीमत्वाचा आणखी एक पैलू म्हणजे लग्नानंतर सुद्धा त्याचं आपल्या बायकोवर नितांत प्रेम आहे. फक्त त्याच्या बिझी शेड्युलमुळे तो तिला जास्त वेळ देऊ शकत नाही. आता एकचं माणूस कुठेकुठे पुरणार ना ! मधल्या काळात श्री च्या बायकोचा अपघात होऊन तिचा स्मृतीभंश होतो. अशातही श्री खचून जाऊन मालिका बंद पडू देत नही. तर सुरवातीचेच चाळीस पन्नास एपिसोड परत दाखवून बायकोची स्मृती परत आणतो. श्री ची सामाजिक बांधिलकी सुद्धा वाखाणण्याजोगी आहे बरं का ! फावल्या वेळात तो मित्र मैत्रिणींचे लग्न लावून देतो, लहान पोरांचे हरवलेले मायबाप शोधून देतो, सासूबाईंचे नखरे सांभाळतो. थोडक्यात काय तर श्री चं अष्टपैलू व्यक्तीमत्व समजून घ्यायला अजून ५०० एपिसोड तरी नक्कीच बघावे लागतील. तोपर्यन्त आपली खैर नाही. रायाचं कर्तुत्व ऐकून तर तुम्हाला स्वत: ची लाज वाटेल. काहीही करत नसलेल्या रायाला एकेदिवशी अचानक लौटरी लागते. एका गर्भश्रीमंत घरातली मुलगी त्याच्या प्रेमात पडते. यथावकाश (म्हणजे सावकाश पन्नासेक एपिसोड नंतर) त्यांचे लग्न होते.श्रीमंत सासू-सासरे रायाला घरजावई व्हायला सांगतात. पण आपला स्वाभिमानी राय त्यांना ठाम शब्दात नकार देतो. पुढल्या काळात राया स्वत:चा व्यवसाय सुरु करतो ह्या लोकांना व्यवसाय सुरु करताना भांडवल, जागा, परवानग्या असल्या फालतू अडचणींना सामोरं जावं लागत नाही .मनात येईल तेव्हा व्यवसाय सुरु करायचा आणि दोन महिन्यातच त्याची कीर्ती सगळीकडे पसरवायची एवढंच त्यांना माहिती ! श्री आणि रायानी भागीदारीत आखाडी कंपनी सुरु केली ना तर अंबानी आणि अदानीची काही खैर नाही. असो. तर एकेदिवशी नाईलाजाने रायाला घरजावई म्हणून सासू-सासऱ्यांचा घरी जावं लागते. तरीही ना डगमगता राया तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय. त्यात जर त्याला यश आले तर सावरकरांच्या इंग्रजांच्या कैदेतून सुटकेच्या घटनेइतकंच ऐतिहासिक महत्त्व या घटनेला प्राप्त होईल. श्री प्रमाणेच रायाच सुद्धा बायकोवर नितांत प्रेम आहे. ते सिद्ध करण्यासाठी अधुनमधून तो तिला चहा वैगेरे करून देतो. तुम्ही कितीही वेळ घोटला ना तरी तुम्हाला इतका सुंदर चहा जमणार नाही. रायाच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे राया अतिशय शांत आणि संयमी आहे. बहुधा त्याचा हाच गुण बायकांना आवडत असावा. श्री आणि राया यांच्या गाथा ऐकूनच जर तुम्ही थंडे झाले असला तर महात्मा आदित्यच्या तर जवळपासही येऊ नका. हम दिल दे चुके सनम मधल्या आजी देवगणचा वंशज असलेला आदित्य त्याच्या कितीतरी पुढे गेलेला आहे. गंमत अशी आहे की साधारण ज्या लोकांना आपण महात्मा म्हणतो, ते सगळे जन्मानंतर त्यांच्या कर्तुत्वाने महात्मा झाले. आदित्य आईच्या पोटातूनच महात्म्य घेऊन जन्माला आलाय. आदित्य च्या आईचा स्वभाव इतका गोड आहे की तिच्या फक्त सहवासानेच एखाद्याला डायबेटीस होईल. त्यामुळेच आदित्य एक अत्यंत सुस्वभावी मुलगा आहे. लग्नानंतर त्याच्या बायकोने त्याला 'हम दिल आधीचं किसीको दे चुके सनम' असं सांगितल्यावरही तो तिच्यावर चिडला नाही. तिच्यावर नातं स्वीकारण्याची जबरदस्तीही त्यानी केली नाही. याउलट तिला निर्णय घेण्याची मोकळीक दिली. हळूहळू तिला आदित्यचा चांगुलपणा उलगडू लागला. ती त्याला 'तू किती चांगला आहेस रे' असं दर एपिसोड मध्ये तीनदा म्हणायला लागली. तरीसुद्धा आदित्य तिला " मग राहा ना माझ्यासोबत भवाने !' असं एकदाही म्हणाला नाही.शेवटी तिनेच पुढाकार घेऊन प्रेमाच्या सुधारीत आवृत्तीची कबुली दिली. मगच त्यांचा सुखाचा संसार सुरु झाला. पण म्हणून मालिका बंद करण्याइतका आदित्य स्वार्थी नाहीये. तो एक जबाबदार मुलगा,भाऊ,जावई आहे. सगळ्यांच्या घरातल्या सगळ्या समस्या सोडवल्याशिवाय तो शांत बसत नाही. समस्या कमी पडल्याच तर घराबाहेरचं प्रेम प्रकरण सुद्धा तो मार्गी लावून देतो. थोडक्यात म्हणजे श्री,आदित्य,राया ही त्या सर्वशक्तीमान ईश्वराचीच तीन रूपं असल्यासारखी वाटतात. आपल्यासारखे सर्वसामान्य पुरुष त्यांच्यासमोर काय टिकणार ? निदान त्यांची अवतारसमाप्ती होईपर्यन्त आपली धडगत नाही. जास्तीत जास्त आपण सूड म्हणून त्या तिघांना एक शाप देऊ शकतो. "अरे चांडाळान्नो, तुम्हाला सुद्धा रोज ह्याच मालिका बघाव्या लागो रे !!!" --चिनार
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 31992
प्रतिक्रिया 161

प्रतिक्रिया

पण मला त्या चौथ्या जय चे अप्रूप वाटते …. एवढ्या मुली त्याच्याशी फ्लर्ट करतात … लाइन मारतात … अगदी त्याच्या बायकोसमोर … पण बायकोला काही वाटतच नाही … उलट ती असू दे म्हणून सर्व सहन करते …. मी एकदा सहज बायकोला म्हणालो ऑफिस मधी एक कलिग माझ्यावर लाईन मारते ( बहुतेक )…. तर तिने त्याच रात्री माझा रीसुमे नोकरि.कॉम वर अपलोड करायला लावला … डोळ्यात पाणी आणलेस रे ….

In reply to by कहर

तुमचं बरोबर आहे. पण माझ्या बायकोला ती मालिका एवढी आवडत नाही. त्यामुळे जय च्या लीला बघण्याच अहोभाग्य मला लाभत नाही. त्यामुळे त्याच्यावर लिहू शकलो नाही

In reply to by कहर

आणखी एक म्हणजे ती आदिती. एवढ्या श्रीमंत घरातली मुलगी, जावेकडून, रजनी नावाच्या जय वर लाईन मारणाऱ्या पोरीकडून सगळं मुकाट ऐकून घेते. जावेच्या घरात गपगुमान कामे करते. अरे काय साळसूदपणाचा कहर!!

In reply to by कपिलमुनी

:)

In reply to by कपिलमुनी

पर्देशस्थ लोकान्ना ह्या मलिका ओनलाईन बघाव्या लागत्तात असे ऐकुन आहे ;)

In reply to by मी-सौरभ

ऑनलाईन आणी कंपलसरी बघायला लागत आहेत असे मोहनरावांच्या वाढलेल्या ज्ञानावरून वाटत आहे

In reply to by कहर

तिसऱ्याच कर्तुत्व वाचल्यानंतर हेच खटकत...जयला कसे विसरले साहेब....अजून आपले खंडेराय व वाल्याचा वाल्मिकी झालेल्या कार्तिकला ( असे हे कन्यादान) पण विसरलात...

In reply to by टवाळ कार्टा

यक्क !! ती त्या श्रीलाच लखलाभ होवो. तिने रोज तासभर वर्कआऊट केला तर कोल्हापुरातल्या आखाड्यातली मल्ल वाटेल ती. प्रिया बापट, उर्मिला कानिटकर, मृण्मयी देशपांडे सारख्या नाजूका एकेकाळी झीवर असायच्या. आता ती मेघना त्यातल्या त्यात बरी आहे.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

बघितले...काह्ही मिळाले नाही...तुमच्याकडे काही असेल तर द्या पाठवून... अवांतर - अश्या विषयांसाठी मिपावर पुरुषांचा वेगळा विभाग नसल्याने माझी पुरुषसुलभ कुचंबणा झाल्यासारखी वाटते :)

In reply to by टवाळ कार्टा

एक प्रेमाचा सल्ला रे बाबा तुला. चुकुन माकुन जान्हवी पटलीचं तुला, तर कानात घालायचे बोळे, चांगुलपणाच्या अतिजेवणानंतर अपचन होउ नये म्हणुन गोळ्या, झालचं तर बसचा महिन्याचा पास, घरात रँडम पोरांसाठी डायपर, सासुबैंना चोरायला वस्तु, सासरेबुवांसाठी ऑपरेशन थिएटर, मेव्हण्यासाठी रेडीमेड बिझनेस वगैरे ची तयारी ठेव. =))

खिक्क =))

मला फक्त चला हवा येऊ द्या आवडते.. भारत गणेशपुरे, भाऊ कदम, कुशल बद्रिके आणि डॉ. निलेश यांच्यामुळे बघणेबल होते. विनोदात तोच तोच पणा असला तरी भाऊ कदम यांच्या काहीश्या निरागसतेने खुपच मजा येते. बाकी मल्हार मार्तंड यांच्या सिरियलचे टायटल साँग खुप आवडते.? या सिरीयल विषयी काय मत आहे?

In reply to by योगी९००

मला फक्त चला हवा येऊ द्या आवडते.. भारत गणेशपुरे, भाऊ कदम, कुशल बद्रिके आणि डॉ. निलेश यांच्यामुळे बघणेबल होते. विनोदात तोच तोच पणा असला तरी भाऊ कदम यांच्या काहीश्या निरागसतेने खुपच मजा येते.
+११११११११११
बाकी मल्हार मार्तंड यांच्या सिरियलचे टायटल साँग खुप आवडते.? या सिरीयल विषयी काय मत आहे?
त्याचे फक्त टायटलसाँगच चांगले आहे ;)

In reply to by टवाळ कार्टा

नै रे बाबा. बाणुवर जीव हाय आपला (म्हणजे माझा) कधीतरी जाता येता दिसतं असते डोळ्याला. तेवढाचं श्रमपरिहार =))

In reply to by योगी९००

सागर कारंडे.. यांचे नाव विसरलो. तो पण खूप मजा आणतो च.ह.ये.द्या मध्ये...!! त्याने नाना पाटेकर समोर त्याचीच नक्कल फार छान उतरवली होती.

In reply to by योगी९००

बाकी मल्हार मार्तंड यांच्या सिरियलचे टायटल साँग खुप आवडते.? या सिरीयल विषयी काय मत आहे?
कुणीतरी झोपडी(?)च्या बाहेर येतं, मग बाणू लचकत झोपडीतून बाहेर येते. ती ती दोघं काहीतरी बोलतात. किंचित टेन्स असतात. दरबारात मार्तंड इकडून तिकडे आणि तिकडून इकडे मान फिरवत मानकऱ्यांचे आइकत असतात. मार्तंड तोंड उघडतील तर कॅमेरा फुटेल अशा भीतीने त्यांना स्वगत बोलण्याची शिक्षा डिरेक्टर ने केलेली असते. मागच्या वर्षभरात हे अवघे तीनच सीन रिपीट मारतात असे वाटत आहे.

माई मोड आॅन: छानच लिहिलं आहेस रे चिना-या!रोजरोज या मालिका बघितल्यामुळेच मला इन्शुलीनचं इंजेक्शन घ्यावं लागतं असं हेही म्हणतात! माई मोड आॅफ.

मी मल्हार मार्तंड यांच्या मालिकेवर भाष्य केले तर लोकांच्या धार्मिक भावना दुखावतील. ज्यांना बघावते त्यांनी बघावं

"अरे चांडाळान्नो, तुम्हाला सुद्धा रोज ह्याच मालिका बघाव्या लागो रे !!!"
का ओ...असा शाप का देताय आम्हा पामरांना =))

In reply to by टवाळ कार्टा

ओह!! मला वाटलं आपल्या मिपाकरांना आहे. बाकी ह्यातल्या एकाही घरात चालु स्थितीमधला टी.व्ही. दिसलेला नाही. नाही म्हणायला मल्हार-मार्तंड मधे आय-पॅड म्हणा किंवा कम्युनिकेटर म्हणा दिसले होते मधे कधीतरी.

"अरे चांडाळान्नो, तुम्हाला सुद्धा रोज ह्याच मालिका बघाव्या लागो रे !!!"
आईशप्पत! असला शाप देता आला तर मी त्यांना असल्या मालिका + त्या पुढचे पाऊल वगैरे दिवसातून ३ वेळेस बघायचा शाप देईन.

इतक्या सुंदर आणि युजर फ्रेंडली मालिकांवर टिका केल्याबद्दल निषेध - विषेतः जान्हवी. वा वा! किती सोपी मालिका! लेखक, दिग्दर्शक वगैरेची गरजच भासत नाही. आपण लहानपणी संध्याकाळी शाळेतून आल्यावर अंगणात जमायचो आणि ठरवायचो आज काय खेळायचं? तस या मालिकेत प्रत्येक भागात पात्र ठरवतात. उदाहरणार्थ एक भाग 'उशीर' वर. किमान ५-७ पात्रे कुठल्याही प्रसंगी उपस्थित असतातच. पहिले पात्रः आज जान्हवी नाही आली अजुन जितकी पात्रे तितक्या वेळा हे वाक्य. दुसरे पात्रे: फोनही केला नाही उशीर होइल म्हणुन. आधी 'हो ना' च्या अ‍ॅडिशनसह सर्व उपस्थित पात्रे हेच वाक्य क्रमाने. मग तिसरे पात्र हातात फोन घेउन : 'फोन लावते तर बंद आहे असे उत्तर येताय' सगळी पात्री क्रमा क्रमाने : 'हो फोनही लागत नाहीये' बघा. चार पाच वाक्ये गुणिले ७-८ माणसे आणि दर वाक्या आधी एकमेकाच्या तोंडाकडे बघणे यात १५ मिनिटे सहज जातात. उरलेला वेळ आधी काय झालं, पुढे काय होणार आहे आणि जाहिराती. झाला एक भाग. आणि समजा पात्र वेळेत सेट वर पोचली नाहीत तर? तर काय - उपस्थित पात्रांपैकी एकाला आढ्याकडे बघत बसवायचं मग उरलेलं काम एडिटरचं. काढा जुनी रिळं आणि दाखवा सेपियामध्ये. बघा किती सोपे आहे. लेखन, पाठांतर झिग्झिग नाही. अशा सहज सुंदर मालिकांवर टिका करणे बरे नाही

कोण बरं हे तिघे ? आम्ही नाही पाहिलं यांना कधी ! ( मराठी सिरीयलद्वेष्टी ) स्नेहांकिता

सगळ्यांच्या घरातल्या सगळ्या समस्या सोडवल्याशिवाय तो शांत बसत नाही. समस्या कमी पडल्याच तर घराबाहेरचं प्रेम प्रकरण सुद्धा तो मार्गी लावून देतो.
हे आवडलंय...

बाहेरच्यांची समस्या फक्त मालिकावाल्यांनाच सोडवता येतात हे खर आहे. घरातल्या समस्यांची उणीव अशा रित्या भरून काढली जाते. वेळेवर संपवल्यामुळे "अग्निहोत्र" मालिकेचा पंखा ( आणि त्या मुळेच एअर टेल कनेक्शन घेऊन पस्तावलेला)

बाकी यावरून आठवलं.. माझा एक मॅनेजर म्हणायचा, तुम्हाला जर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग शिकायचे असेल तर या मालिका बघा.. दिग्दर्शक यामध्ये फक्त क्लासेस तयार करून त्यांचे इन्स्टन्सेस सोडून देतो सिरियलमध्ये. बाके सगळे आपोआप होते..

जबरी उपहास! मजा आली. आमच्याकडे रोज ८ ते ९:३० या वेळात, "होसूमीत्या", "जुयेरे" आणि नंतर "लौआत्रि" या लागोपाठच्या तीन मालिका हाउसफुल्ल होत असल्याने या दीड तासात हॉलमध्ये फिरकायची आम्हाला परवानगी नाही.

In reply to by टवाळ कार्टा

काय करणार? आमच्या सौं. च्या इच्छेविरूद्ध ब्र काढायची आमची प्राज्ञा नाही. :YAHOO:

In reply to by असंका

आयला, असल्या नावाची पण सिरियल आहे का? कमाल आहे ब्वा... उद्या काहीही वाक्य काढून त्याच्या सिरियल बनवतील.. लाईक : आओ बैठो यहा मूझे अ‍ॅसिडीटी हुई यहा से लेफ्ट लेना कैच्या काय...

In reply to by उदय के'सागर

अगदी अगदी... मीही विचार करत होतो की हे लौआत्री काय असावं म्हणून. तुम्ही विचारल्यावर एकदम आपोआप शब्द उमटले मनात. आणि मला स्वत:लाच खरं वाटलं नाही की हे असं नाव असेल. मग आधी गूगल वर सर्च केलं आणि खात्री करून मगच इथे लिहिलं...

In reply to by उदय के'सागर

काल संध्याकाळी ९ च्या सुमारास आमच्या सौ. आमच्या मुलीला सांगत होत्या की "तुला कळलं का, अमृताचा खून झाला ते.". आम्ही दुसर्‍या खोलीत होतो. अमृता नावाची एक महिला आमच्या माहितीतली आहे. त्यामुळे खून झाला हे ऐकल्यावर आम्ही जोरात दचकलो आणि घाईघाईत सौं. ना विचारले की, "काय सांगतेस? अमृताचा खून झाला? शॉकिंग. कधी झाला?". आमच्या सौ. नी अत्यंत त्रासिक आणि केविलवाण्या दृष्टीने आमच्याकडे कटाक्ष टाकून आमच्या बुद्धीची कीव करत सांगितले की "लौआत्रि मधील अमृताचा खून झाला.". हे ऐकल्यावर आमच्या अज्ञानाचे आम्हाला ज्ञान झाले.

ऱोगेर मूर वेर मुलि फिदा होत होत्या असे ऐकले होते , हा जय रोगेर मूर च्या वर आहे , जि याल पहाते ति लगेच फिदा....

In reply to by hemants.gokhale

ऱोगेर मूर वेर मुलि फिदा होत होत्या
रोगेर????? आणी मूर????? शेतातल्या किटकनाशकात पण होमीपाथी आली का?