Skip to main content

निथ साँग - निंदानालस्तीस मुक्त आणि शिवराळ एस्कीमोंची एक जुगलबंदी गायन-न्याय परंपरा

लेखक माहितगार यांनी शनिवार, 17/01/2015 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
कशावरून कुणाच्या भावना दुखावल्या जातील याचा नेम नसतो म्हणून तर आपण मकर संक्रांतीला तीळगूळ घ्या गोड गोड बोला म्हणतो पण अवघ्या दिड - दोन महिन्यात धूलीवंदन आणि होळी येते आणि मग दिल्या घेतल्या शिव्यांची... मनमोकळी उधळण अधिकृतपणे करता येते. गोडगोड बोला हे कृत्रिम संस्कृतीकरण तर शिव्या देऊन मनमोकळे करणे हे अकृत्रिम आणि नैसर्गीक. हि होळीची शिवराळ परंपरा आपण होळीच्या निमीत्ताने जपतो तशीच एक वेगळी परंपरा एस्कीमो लोक जपतात त्या परंपरेला निथ साँग म्हणतात. एस्कीमोंच्या निथ साँगचे वेगळेपण ? निथ साँग परंपरेची दखल विधी-अनुवंशशास्त्रात (लिगल अँथ्रॉपॉलॉजी) घेतली जाते कारण 'हत्या' हा एक विषय वगळता इतर सर्व तंट्यांचा तक्रारींची दखल म्हणजे केवळ आणि केवळ निथ साँग म्हणजे ज्याच्या/जिच्या विरुद्ध तक्रार आहे त्याला/तिला निथ साँगसाठी तयारी करून आख्ख्या ग्रामसभेसमोर येण्यास सांगणे मग तक्रार असणार्‍या दोन किंवा जेवढ्या असतील तेवढ्या बाजूचे लोक विशेष रचलेल्या गाण्यांमधून एकमेकांची उणी-दुणी, निंदा नालस्ती, अपमान अगदी सर्व प्रकारच्या शिव्यांच्या आंतर्भावासह, कोणत्याही सेंसॉरशीप शिवाय, गावच्या संपूर्ण जनसमुदायापुढे गायन - जुगलबंदीच्या माध्यमातून करतात. जनसमुदाय ज्यांची बाजू पटते त्यांना वा वा करतो ज्यांना सरते शेवटी सर्वाधिक वा वा मिळाली ती बाजू जिंकली. आणि एकमेकांची निथसाँग सभेत झालेली निंदा नालस्ती हिच काय ती शिक्षा. अर्थात एकदा सभा संपली कि एकमेकांशी मिळून मिसळून वागावयाचे असते. तीळगूळ खाणार्‍यांच्या भावना अधिक दुखावतात आणि निथ साँग गाणारे अधिक मोकळेपणाने जगतात तर मग कोणती गोष्ट अधिक योग्य असा प्रश्न पडतो !
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2664
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

हा लेख वाचून एक जपानी सामाजिक प्रयोग आठवला. जपानमध्ये वरिष्ठ-कनिष्ठ उतरंडीला केवळ सामाजिक जीवनातच नव्हे तर कामाच्या ठिकाणीही काटेकोरपणे पाळले जाते. वरिष्ठ अधिकार्‍याची चूक असली अथवा त्याचे वागणे अपमानास्पद असले तरी त्याचा तेथेच मुकाबला करणे जगात कोठेच सहज-सरळ नसते. जपानमधील वरिष्ठ-कनिष्ठ उतरंडीमध्ये ते अशक्यच आहे. त्यामुळे कामगार मनात साठलेला राग घरी घेऊन जातो आणि कुटुंबावर काढतो असे दिसले होते. यावर उपाय म्हणून एका कंपनीने निर्गमनव्दाराजवळ "मॅनेजर" अशी पाटी लावलेला एक पुतळा आणि त्याच्या शेजारी काही बांबू ठेवले. कामगारांना घरी जाण्याअगोदर या पुतळ्याला बांबूने बडवून मग घरी जायला सांगितले. आणि काही काळानंतर केलेल्या निरिक्षणामध्ये कामगारांच्या घरातल्या हिंसक घटनांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे आढळून आले.

माहितगार यांचा लेख आणि इस्पिक एक्का काकांचा प्रतिसाद हे दोन्हीही मस्त!जेवढे तुम्ही निसर्गाच्या जवळ राहता तेवढे क्षुद्रतेपासून मुक्त होता.

लेख आणि एक्का यांचा प्रतिसाद आवडला. मला असे पुतळे बर्‍याच जणांचे हवे आहेत!

In reply to by पैसा

मला असे पुतळे बर्‍याच जणांचे हवे आहेत! मग बनवा पुतळे अंगणात आणि द्या त्यांना सर्व जनतेसमोर बांबूचे फटके. हाकानाका :)

अतिशय मस्त शैलीत एक नेमका प्रश्न !! अंतर्मुख करणारे लेखन! जबरा आवडले! (सालं आमचं डोस्कंच बाद!! आम्हाला इथं बी 'द पर्ज' आठवला :/ )