निसर्ग, शेती आणि शेतकरी
अलिकडेच मिपावर उंटावरचे शहाणे की सरस्वतीची लेकरं हा लेख वाचला. त्यावर भरपूर प्रतिक्रीयाही आल्या. त्यानिमित्ताने मनात आलेले काही विचार...
शेतकरी हा एक अत्यंत अन्यायग्रस्त घटक अाहे अशी हाकाटी नेहमी एेकू येते़़. त्यात बर्याच प्रमाणात तथ्य आहेही. पण शेतकर्यांकडे परिक्षणाच्या दृष्टीने पाहिले तर बर्याच गोष्टी आश्चर्यकारकरित्या आपल्या समोर येतात. शेतकरी हे पूर्वी आपले व आपल्या कुटुंबाचे पोट प्रथम भरून मगच उरलेल्या उत्पन्नाची विक्री करायचे. त्यामुळे शेती असलेले कुटुंब मुबलक उपलब्धता असलेले व म्हणून सुखवस्तू मानले जायचे. अगदी २०-३० वर्षांपूर्वीही 'उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी' ही म्हण सर्रास वापरली जायची. मग आत्ताच नेमके शेतकरी अडचणीत का आले? नक्की काय झाले? कुठे चुकत गेले? प्रश्न मोठा जटील आहे, त्याला थोडक्यात उत्तर नाही, पण हे काही मुद्दे अन प्रत्यक्ष निरीक्षणे.
१९- २० व्या शतकात़ विज्ञान प्रगत झाले. औद्योगिक क्रांती झाली. नंतर सतत विज्ञानाची घौडदौड सुरूच राहिली व औद्योगिक विकास वाढत गेला. मानवाला त्याचे अनेक फायदेही झाले. एक खास विज्ञाननिष्ठ व औद्योगिक व आर्थिक विकास ज्यामुळे शक्य होतो अशी विचारधारा प्रभावी बनली. तिने अनेक क्षेत्रांना प्रभावित केले. शेती आणि शेतकर्यांवरही याच औद्योगिक विचारधारेचा प्रभाव पडला. कीड कशी मारायची, आपल्या जमीनीतून आधिकाधिक उत्पन्न कसे काढायचे, तिच्यातून जास्तीत जास्त पाणी कसे उपसायचे हाच प्रचार आणि प्रसार सर्वत्र होऊ लागला. जमीन, पाणी, हवा, निसर्ग, एवढेच नव्हे, तर प्राणी ही सगळी आता 'इनपूटस' झाली आणि आर्थिक फायदा हेच एकमात्र 'आउटपुट' मोजले जाऊ लागले. म्हणून या विचारधारेमुळे तोंड सतत बाजाराकडे ठेवावं लागतं. शेतकरी या सगळ्या प्रभावाखाली तेच करतो आहे.
सध्याची जवळजवळ सर्व कृषी विद्यापीठे व तज्ञ शेतीकडे एखाद्या औद्योगिक यंत्रणेप्रमाणे पाहतात. तिकडे जसे गुंतवणूक करून कच्चा माल टाकला, मजूर लावले, की प्रक्रीया करून तयार उत्पादन निघते, तसेच शेतातून निघावे यासाठी संशोधन, विश्लेषण, प्रयत्न करतात. पण शेती ही एक जिवंत गोष्ट आहे. जमीन ही एक जिवंत व्यवस्था आहे, कारण तिच्यात प्रचंड प्रमाणात सूक्ष्मजीव असतात, त्यांचे आरोग्य केवळ आकड्यात सापडत नाही. त्यांची जीवनचक्रे व आपण करत असलेल्या गोष्टींचा त्यांच्यावर होणारा परिणाम याची आपल्याला फार म्हणजे फारच कमी माहिती आहे, याची नम्र जाणीव केवळ अपवादानेच शेतकरी व शेती तज्ञांना आहे. तुंम्ही एक दोन जरी रेडीओ व दूरचित्रवाणीचे कार्यक्रम ऐकले, तर तज्ञ काय सांगतात ते लगेच समजेल. कोणत्या पिकाला कोणते खत घालायचे, कोणत्या कीडीसाठी कोणते औषध फवारायचे, एवढेच सतत ऐकू येते. कंपन्याही आपल्या प्रॉडक्ट्सचे अत्यंत आक्रमक मार्केटींग करत असतात.
यातून नकळत एक शोषण व्यवस्थाच जणू निर्माण झाली. यात पहिले शोषण झाले जमीनीचे. दुसरे पाण्याचे, तिसरे प्राण्यांचे आणि आता तर एकूण परिसंस्थेवरच आजची शेती आक्रमण करू लागली आहे. आज ऊस पिकवून सधन झालेल्या अनेक शेतकर्यांच्या जमीनी सांगली-कोल्हापूरच्या सधन पट्ट्यात क्षारपड झालेल्या आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे वर्षानुवर्षे ऊसाची लागवड व त्यासाठी दिलेले बेसुमार पाणी! ऋषी प्रभाकर यांच्या भाषणात एक वाक्य ऐकले होते: ‘Agriculture is the worst interference with the nature that man has created.’ किती खरं आहे ते! या सगळ्यात शेतकरी केवळ अज्ञानी व निष्पाप राहिला का? का तोही एक शोषक बनूनच या घटकांचे शोषण करत राहिला, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.
आपल्या शेतातून आपल्या गरजा जास्तीत जास्त भागवाव्यात हा शेतीविचार जुना झाला, मागे पडला. आज शेतकर्यांच्या शेतात घरचं धान्य नाही, भाजीपाला नाही, फळं नाहीत अन तेलही नाही. नगदी पिकं आणि एकवर्णी लागवड करून बाजाराकडे तोंड करून बसले आहेत सगळे. आजचे शेतकरी संघटना बांधत आहेत, आंदोलनं करत आहेत पण स्वतं:चं अन्न स्वतःच्या शेतात पिकवतच नाहीत. बाजारपेठेवर भरवसा ठेवायचा, अन आपल्या गरजा भागवण्यासाठी सगळं विकत आणायचं असा मामला. जर शेतकरी बाजारी व्यवस्थेतला अनुभवी, नियंत्रक नाही, तर त्याने सतत बाजारपेठेतून आपल्याला फायदाच होईल ही अपेक्षा बाळगली तर हाती काय लागणार?
एकदा मी एका सेंद्रीय शेती गटाच्या अभ्यास बैठकीला गेलो होतो. तिथे एका सभासदाने अतिशय वेगळा मुद्दा मांडला, तो इथे लिहीण्याचा मोह आवरत नाही. आपण सध्या सगळीकडून स्त्री-भृण हत्त्येविषयी ऐकतो. स्त्री गर्भाची हत्त्या करणारे डॉक्टर हे नराधम आहेत व ती कुटुंबेही अज्ञानातून भयानक अन्याय करत आहेत असे सर्वांनाच वाटते. पण जरा आजूबाजूला आपल्या शेतकरी बांधवांकडे पहा. म्हशीला रेडा झाला अन तो जगला - वाढला असे किती आढळते? त्या सभासदाच्या मते जिवंत म्हशी व रेड्यांचे प्रमाण ९०:१० पेक्षा कमी असावे. तिकडे पुरूष हत्त्या कोण करत आहे? रेडी असेल तर तिला खायला देतात, रेडा असेल तर एक तर तो उपाशी मरतो किंवा त्याला कत्तलखान्याची वाट दाखवली जाते. माणसांनी स्त्री गर्भाबाबत जी संवेदनशीलता दाखवली त्यातली थोडीतरी जनावरांच्या वाट्याला शेतकर्यांकडून येतेय का?
मला हव्या त्या जमीनीच्या तुकड्यावर, मला हवे ते, मला हव्या तितक्या प्रमाणात आणि हव्या त्या गुणवत्तेचे, मला हवे तेंव्हा उगवले पाहिजे, या उद्देशाने केलेले उपदव्याप म्हणजे शेती! म्हणून तो एक निसर्गावर विजय मिळवूनच करता येणारा धंदा आहे, नव्हे जवळजवळ निसर्गविरोधीच म्हटले तरी चालेल. शेवटी यात माणूस म्हणजे शेतकरी खरंच जिंकेल असं वाटतं? याला काही उत्तर आहे काय? हे सगळं इतकं चुकतं गेलंय, तर आता नक्की बरोबर काय? पण अजूनही आशेला जागा आहे. काही अप्रसिद्ध एकांडे शिलेदार अंधाराकडून प्रकाशाकडे चालले आहेत. पुढे कधीतरी त्यांच्याबद्दल.
- स्वधर्म
प्रतिक्रिया
लेख आवडला पण संक्षिप्त वाटला.
धन्यवाद ननि
एक एक मुद्दा घेऊन सविस्तर
‘Agriculture is the worst
बाबा रामदेवांच्या प्रेरणेने
१०० कोटींचा सापऴा
नाहि पटलं.
नक्की काय पटले नाही?
शेतकरी आणि इतर.
माझे दोन पैसे
शोषण
जीवचक्र.