✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

घर- घर

च
चिनार यांनी
Mon, 01/05/2015 - 12:14  ·  लेख
लेख
गेल्या काही दिवसांपासून स्वत:साठी घर शोधण्याची मोहीम सुरु आहे. आजकाल घराला 'Flat' असे म्हणतात. पुण्यासारख्या शहरात जर Flat बुक केला असेल तरच त्या माणसाने आयुष्यात काहीतरी मिळवलय असे मानले जाते. कारण भेटणारा प्रत्येक दुसरा माणुस तुम्हाला ' काय, कसे सुरु आहे? ' हे विचारून झाल्यावर 'काय Flat वगैरे बूक केला कि नाही अजुन? 'असा प्रश्न विचारून जातोच.आणि त्याचे उत्तर जर 'हो' असेल तर पहिल्या प्रश्नाच्या उत्तराला काहीही अर्थ उरत नाही. Flat घेतल्यावर माणसाचे 'बरं चाललंय ' हे उत्तर खरं असुच शकत नाही. तो बिचारा ईएमआय आणि डाउन पेमेण्ट या 2 शब्दान्नी पुरता मेटाकुटीला आलेला असतो. जवळपास 20 वर्षांच्या कालावधीनंतर भेटलेल्या एका नातेवाईकाने मला वरील प्रश्न विचारला, त्यावर 'नाही' असे उत्तर ऐकल्यावर ते म्हणाले , "अरे काय अजून किती दिवस भाड्याच्या घरात रहाणार? करा काहीतरी ! " त्यांची ही प्रतिक्रिया ऐकल्यावर माझ्या डोक्यात आलेला सगळ्यात पहिला विचार म्हणजे," मी म्हशीच्या गोठ्यात जरी राहीलो तरी ह्याच्या बापाचं काय जाते? " ते गृहस्थ अजूनही गावात वडिलोपार्जित वाड्यात रहात असल्याचं मला नंतर कळलं ! असो. तर लोकाग्रहास्तव म्हणा किंवा स्वत: ची गरज म्हणा पण आम्ही Flat शोधण्याची मोहीम सुरु केली. थोडीबहुत चौकशी केल्यावर कळलं की साधारण चार माणसांचा महिन्याचा किराणा आणि पेट्रोल च्या खर्चात एक स्क़्वेअर फूट जागा मिळते . ती सुद्धा किराणा, पेट्रोल ज्या ठिकाणी मिळते तिथून ८-१० किलोमीटर दूर !! जसं जसं जवळ येऊ तशी तशी किंमत वाढेल. मग हळुहळु आम्ही बिल्डर्सच्या ऑफिसेस मध्ये जाऊ लागलो. सुरुवातीला काही मोठ्या बिल्डर्स चे ऑफिस बाहेरूनच बघून आत जावं की नाही अशी भीती वाटायची. पण नंतर आम्ही सरावलो. आत गेल्यावर एखादी आकर्षक रिसेप्शनिस्ट मुलगी आपलं स्वागत करते. थोडसं 'हाय - हेलो' करून हळुच आपलं बजेट किती वगैरे ही माहिती काढून घेते. आपल्या बजेट चा आकडा जर कमी असेल (बहुधा असतोच!) तर तिच्या चेहऱ्यावरचे भाव आपोआप बदलतात (मग आपल्याला बसायला सांगून ती निघून जाते. आणि नेमके त्याच दिवशी तिचे सर इतके बिझी असतात की आपल्याला भेटू शकत नाही. मग ती आपल्याला 'प्रोजेक्ट प्लान ' आणि 'कोस्टिंग शीट' देऊन आपली बोळवण करते.). पण चुकून जर आपल्या बजेटचा आकडा तिच्या अपेक्षेप्रमाणे असेल तर लगेच ती सरांना भेटायला आतल्या केबिन मध्ये घेऊन जाते. मग सर बोलायला सुरु करतात. " सर आमचा हा प्रोजेक्ट इतक्या इतक्या एकरांवर पसरलेला आहे. आसपास असं असं निसर्गसौंदर्य आहे. आम्ही अमुक अमुक फेजेस बांधतो आहे .....वगैरे वगैरे " खरं म्हणजे आपल्याला दोनचं गोष्टींमध्ये इंटरेस्ट असतो. घराचा एरिया किती ? भाव किती? पण या गोष्टी सर आपल्याला सगळ्यात शेवटी सांगतात. आणि दोघांचा गुणाकार ऐकू आपण तिथुन निघून जातो. पण काहीही असो , यांच्या सोसायट्यांचे नाव मात्र ऐकण्यासारखे असतात. 'नेस्टोरीया', ,ओनेलीया', 'ग्रेसिया', 'रोझ व्हिला', 'प्रिस्टिन गार्डन' !! नाव ऐकल्यावरच आपण साहेबाच्या देशात आल्यासारखे वाटते. पण मला सांगा नेस्टोरीया धनकवडी ,ओनेलीया हांडेवाडी , ग्रेसिया तळेगाव ढमढेरे , रोझ व्हिला कोंढवा बुद्रुक असे पत्ते साहेबाच्या देशात असतील का हो ? असो. दुसरी ऐकण्यासारखी गोष्ट म्हणजे साइट लोकेशन . ते लोकेशन शहरापासून कितीही लांब असो तरीसुद्धा ते एकतर 'मोस्ट डेव्ह्लप्ड' तरी असतं किंवा 'नेक्स्ट डेस्टीनेशन' तरी असतं. आसपास सगळीकडे जंगल जरी असलं तरी तिथे लवकरच ‘Shopping Mall” किंवा ‘IT Park’ होणार असतो. शिवाय समोर ओसाड पडलेल्या जागेवर एक साठ मीटर रुंद रस्ता मंजूर झालेला असतो. जो एकीकडे विमानतळ आणि दुसरीकडे डायरेक्ट हिंजेवाडीला जाऊन मिळणार असतो. तो रस्ता कोणी मंजूर केला ? कोण बांधणार आहे? कधी बांधणार आहे ? असले मुर्खासारखे प्रश्न विचारायचे नसतात. एक साइट लोकेशन बघायला गेलो असताना मी तिथल्या माणसाला जास्त किमतीचे कारण विचारले. तो म्हणाला ," साहेब इथून हायवे एकदम जवळ आहे ". आता हायवे आणि ते लोकेशन याच्या मधात साधारण तीन डोंगर होते. आणि कच्च्या रस्त्याने हायवे पर्यन्त जायला वीस मिनिटे लागत होती !! बरं समजा लोकेशन हायवे टच जरी असलं तरी त्याचा दैनंदिन जीवनात काय उपयोग असतो ? आपल्या मुलांना जर क्रिकेट खेळायचं असेल तर ते हायवेवर जातील का ? हायवेवरच्या वाहनांचा आवाज आणि उडणारी धूळ यांचा काय उपयोग ? जास्त पैशे नक्के मोजायचे कशासाठी ? सोसायट्यान्मध्ये मिळणाऱ्या ‘Ammenities’ ही आणखी एक मजेदार बाब आहे. प्रत्येकी बारा मजल्यांच्या बावीस इमारती असलेल्या एका लोकेशनवर मी गेलो होतो. तिथे स्विमिंग पूल, जौग्गिंग रुट, गार्डन, जीम इ. सगळ्या ammenities होत्या. मी नं राहवून एक प्रश्न विचारला ," बावीस इमारती बांधल्यावर सुर्य दिसेल का हो ? की त्यासाठी वेगळा ammenity charge द्यावा लागेल ? याशिवाय आपल्या लोकेशन पासून सगळ्याच गोष्टी किती जवळ आहे याचा हिशोब अंतरात नाही तर मिनिटात दिला जातो. दिलेला वेळ हा बहुतेक विमानप्रवासाचा असावा असं माझा अंदाज आहे. उदा. खराडी बायपास ते पुणे स्टेशन हे साधारण १० किमी अंतर १७ मिनिटे असं दाखवलं असते. दिवसातल्या कोणत्याही वेळी हे अंतर १७ मिनिटात पार करता येत नाही. विमानाने बहुधा शक्य असावं. जागेचे दर वाढवण्याचे कारणं तर अनाकलनीय असतात. अक्षरश: "खूप दिवसात भाव वाढवलाच नव्हता म्हणून वाढवला" अशी कारणं सुद्धा सांगण्यात येतात. प्रस्तावित विमानतळ, मेट्रो, आयटी पार्क ह्याच्या नावाखाली भाव वाढवले जातात. आपल्या नातवाच्या लग्नापर्यन्त ते विमानतळ बांधून होत नाही. आणि बांधून झालंच तर नातू विमानात बसून परदेशात स्थायिक व्हायला जातो. मग आयुष्यभर आपण उडणारी विमानं बघायची ! असो. तर घर शोधण्याचं कार्य युद्धपातळीवर सुरु आहे. सगळी गणितं जमून आली तर घर नक्के होईल. मग उरलेलं आयुष्य ईएमआयरुपी गणितं सोडवायची आहेतच !!! -- चिनार
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
24986 वाचन

💬 प्रतिसाद (100)

प्रतिक्रिया

एक अंगठ्याचा नियम :

प्रसाद१९७१
Mon, 01/05/2015 - 12:24 नवीन
एक अंगठ्याचा नियम : तुम्ही सध्या ज्या फ्लॅट मधे भाड्यानी रहात आहात, त्याचे भाडे जेव्हा तोच फ्लॅट विकत घेतलात तर पडणार्‍या EMI च्या अर्ध्यापेक्षा जास्त होइल तेंव्हाच फ्लॅट विकत घेण्याचा विचार करावा. नाहीतर तेच पैसे चांगल्याप्रकारे गुंतवुन ( छोट्या शहरात प्लॉट्,फ्लॅट किंवा शेअर्स ) मजेत रहावे. वाटले तर मार्केट रेट पेक्षा जास्त भाडे देवुन ५ वर्षाचा करार करुन घ्यावा म्हणजे सारखी जागा बदलावी लागणार नाही.
  • Log in or register to post comments

या अंगठ्याच्या नियमामागे काय

आदूबाळ
Mon, 01/05/2015 - 19:41 नवीन
या अंगठ्याच्या नियमामागे काय लॉजिक आहे? (कृ. खवचटपणे विचारतो आहे असं समजू नका. खरोखर उत्सुकता वाटली म्हणून विचारतो आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

जर भाडे EMI च्या अर्ध्या

प्रसाद१९७१
Wed, 01/07/2015 - 13:42 नवीन
जर भाडे EMI च्या अर्ध्या पेक्षा कमी असेल तर उरलेले पैसे दुसरीकडे गुंतवुन लाँगटर्म मधे जास्त NAV होते. तसे ही मालकीच्या फ्लॅट चे मेंटेनन्स आणी सोसायटीचे पैसे हल्ली खुप झाले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

कैच्याकै लॉजिक...

जिन्क्स
Wed, 01/07/2015 - 16:10 नवीन
आहो पण घर हे एक स्थावर माल्मत्ता नसती का? तुम्ही नाही पण उद्या तुमच्या मुलान्नी घर विकायला काढले तर मिळणारी किम्मत ही कोणत्याही गुंतवनुकी पेक्शा जास्तच असणार नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

आहो पण घर हे एक स्थावर

काळा पहाड
Wed, 01/07/2015 - 16:29 नवीन
आहो पण घर हे एक स्थावर माल्मत्ता नसती का? तुम्ही नाही पण उद्या तुमच्या मुलान्नी घर विकायला काढले तर मिळणारी किम्मत ही कोणत्याही गुंतवनुकी पेक्शा जास्तच असणार नाही का?
आहे आहे, बिल्डर लोकान्ला अजूनही भवितव्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जिन्क्स

तर

आदूबाळ
Wed, 01/07/2015 - 19:53 नवीन
तर IF HouseRent less than 0.5*EMI THEN NAV[(0.5*EMI)-HouseRent] > NAVHouseValue at n=(say) 10 years बरोबर आहे का एक्स्प्रेशन? एंपिरिकली तरी सिद्ध करता येतंय का पहातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

मला फार काही कळले नाही, पण हा

प्रसाद१९७१
गुरुवार, 01/08/2015 - 16:49 नवीन
मला फार काही कळले नाही, पण हा प्रॉब्लेम वाटतोय [(0.5*EMI)-HouseRent] च्या ऐवजी [(EMI)-HouseRent] पाहीजे होते. डाव्या बाजुला डाउन पेमेंट पण धरायला पाहीजे. जे पैसे वाचत आहेत (EMI-HouseRent) आणि डाउन पेमेंट वर कमीत कमी एफ्डी इतके तरी व्याज पकडायला पाहीजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

NAVHouseValue काढाल तेंव्हा

प्रसाद१९७१
गुरुवार, 01/08/2015 - 16:50 नवीन
NAVHouseValue काढाल तेंव्हा शिल्लक राहीलेले कर्ज पण घराच्या कीमतीतुन वजा करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

ओके. धन्यवाद!

आदूबाळ
गुरुवार, 01/08/2015 - 16:53 नवीन
ओके. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

हे काय आहे ते कोणी सांगेल काय

टवाळ कार्टा
गुरुवार, 01/08/2015 - 17:03 नवीन
हे काय आहे ते कोणी सांगेल काय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

छान !

विटेकर
Mon, 01/05/2015 - 12:34 नवीन
सुरेख लिहिलयं, तुमची मलमळ समजली. हल्ली पुण्यात घर घेणे अतिशय जिकिरिचे झाले आहे. ज्या आय टी वाळ्यांनी पुणे महाग केले त्यांनाच ते आता परवडनासे झाले आहे. मला नेहमी प्रश्न पडतो. शिक्षक, कंडक्टर, पोलिस, कारकून हे उभ्या आयुष्यात घर घेऊ शकतील का ? ते कसे जगत अस्तील पुण्यात ?
  • Log in or register to post comments

हल्ली पुण्यात घर घेणे अतिशय जिकिरिचे झाले आहे....

मुक्त विहारि
Mon, 01/05/2015 - 12:57 नवीन
पुण्यातच नाही तर, इतर शहरांत पण वेगळी परीस्थिती नसावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

पोलिस ? कारकून

कपिलमुनी
Mon, 01/05/2015 - 13:38 नवीन
यांचे कारनामे माहित नाहीत का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

शिवाय शिक्षकांनाही कमी समजू

नगरीनिरंजन
Mon, 01/05/2015 - 17:11 नवीन
शिवाय शिक्षकांनाही कमी समजू नका. सहावा वेतन आयोग लागू झाल्यानंतर अनेकांनी "गुंतवणूक" केली आहे. शिवाय बर्‍याच जणांच्या खाजगी शिकवण्या चालू असतात म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

+१

नाखु
Mon, 01/05/2015 - 17:18 नवीन
शिक्षक, कंडक्टर, पोलिस, कारकून हे उभ्या आयुष्यात घर घेऊ शकतील का ? शिक्षक, कंडक्टर, हेच दोन "उभे" आयुष्य वाले आहेत.कंडक्टर अजून नोकरीतच कायम नसल्याने (पीएम्पीएल) कायमवाले घर कसे घेणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

काहीही!

बोका-ए-आझम
Wed, 01/07/2015 - 10:59 नवीन
तुम्ही जे सहावा वेतन आयोग लागू झालेले शिक्षक म्हणताय ते अनुदानित शाळा आणि महाविद्यालयांत अनुदानित विभागांमध्ये शिकवतात. त्यांची संख्या पूर्ण मुंबईत जेमतेम १०,००० असेल. बाकी बहुसंख्य शिक्षक हे कंत्राटी किंवा तासाच्या हिशोबाने आहेत. त्यांना कितीच्या व्हाऊचरवर सही करावी लागते आणि हातात किती मिळतात हे तुम्हाला माहीत आहे का? अभ्यास वाढवा जरा. उगाचच मतांच्या पिंका टाकू नका. शिवाय शिक्षकांना मिळाले चांगले पगार, तर बिघडलं कुठे? जर चांगले पगार मिळतील तरच चांगले लोक या क्षेत्रात येतील. If you pay peanuts, you will get only monkeys.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

नगं. आधीच तिथं गाळ भरलाय. या

काळा पहाड
Wed, 01/07/2015 - 13:46 नवीन
नगं. आधीच तिथं गाळ भरलाय. या तथाकथित शिक्षकांना साधे बँकेचे फॉर्म भरता येत नाहीत. साध्या साध्या संकल्पना माहीत नाहीत आणि त्या चांगल्या प्रकारे समजावता येणं तर दूरच. बहुतांशी शिक्षक हे पोपटपंची करून पास झालेले आहेत आणि त्यांना जगात कशा प्रकारे शिकवलं जातं याचा गंध सुद्धा नाहीये. साधं उदाहरण देतो. गणितामधलं लिमिट म्हणजे काय, ते का आस्तित्वात आलं, त्याचा उपयोग कुठे होतो, निसर्गात त्याची कोणती कोणती उदाहरणे आहेत हे किती गणिताच्या शिक्षकांना माहीत आहे? सरळ फॉर्म्युले सांगायचे आणि ते घालून गणितं सोडवायला सुरवात करायची. बाकी या शिक्षकांना किती पगार मिळतो आणि किती मिळत नाही ते ते आणि त्यांना पगार देणार घेणारे बघून घेतीलच. समाजाचा संबंध फक्त चांगलं शिक्षण घेण्याशी आहे. ते तर यांना देता येत नाहीए. समाजाची जबाबदारी आहे का या पढतमूर्खांना पोसण्याची? त्यांना चांगले पगार मिळाले तर त्यांची संशोधन वगैरे करण्याची मानसिकता होणार आहे का? कारण अनुदानित विभागांमध्य काम करणारे शिक्षक पण त्याच क्वालिटीचे आहेत. सध्यातरी एक करता येईल. कॅट, आयाआयटी मध्ये मुलं ज्या प्रमाणात पास होतील, त्या प्रमाणात यांचा पगार ठरवता येईल. मुलांना जितके जास्त मार्क तितका जास्त बोनस. एकही मुलगा पास झाला नाही तर पगार नाही, जावून भीक मागणे. (संपादित)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

शिक्षकांविषयी तुच्छता का?

बोका-ए-आझम
Wed, 01/07/2015 - 14:10 नवीन
या तथाकथित शिक्षकांना - असे किती शिक्षक पाहिलेत आपण? किती शिक्षकांना बँकांचे फाॅर्म भरता येत नाहीत? नक्की संख्या कळेल का? अनुदानित विभागात काम करणा-या शिक्षकांचा दर्जा - कुठले निकष वापरून हा दर्जा ठरवलात आपण? दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षक या व्यवसायाबद्दल तुमच्या मनात प्रचंड तुच्छता भरली आहे असं दिसतं. पण तुम्ही इथे जे तारे तोडत आहात - त्यासाठीची किमान अक्षरओळख आणि शब्दांची ओळख ही त्याच शिक्षकांनी करुन दिलेली आहे हे लक्षात ठेवा आणि त्याबद्दल कृतज्ञ राहा. जर ते नसते तर तुम्हाला-आम्हाला भीकच मागावी लागली असती. तेव्हा उगाचच मनाला येईल ते काहीतरी बोलून वादाची पातळी घसरवू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

बोकासाहेब आत्ता जन्माला आलो

काळा पहाड
Wed, 01/07/2015 - 14:26 नवीन
बोकासाहेब आत्ता जन्माला आलो का मी? दहावी, बारावी, ग्रॅज्युएशन, पोस्टग्रॅज्युएशन या सर्व टप्प्यांवर शिक्षक दिसतात की नाही? बाकी हा फॉर्म माझ्या ग्रॅज्युएशनच्या शिक्षकांना भरता येत नसल्याचं याची देही याची डोळा पाहिलेलं आहे. माझ्या एका पोस्ट ग्रॅज्युएशनच्या शिक्षकाची मुलींशी जवळीकींमुळे (आणि त्यांना दारू पाजल्यामुळे) बदली झाल्याचंही माहीती आहे. पोस्ट ग्रॅज्युएशनला शिकवणार्‍या शिक्षकांना एक वही घेवून येवून त्या नोट्स उतरवून काढण्याचा एकमेव उद्योग विद्यार्थ्यांना देताना पाहिला आहे. काही अपवाद सोडता (उदा: माझे मराठीचे पाटील नावाचे शिक्षक ज्यांनी मराठी हा एक आनंददायक अनुभव बनवला होता) हे असंच होतं. बाकी किमान अक्षरओळखीबद्दल. एकदा नीट ठरवा की शिक्षण व्यवसाय हा धंदा आहे की सर्व्हिस. जर सर्व्हिस असेल तर लहानग्यांना वर्षाला ३५००० रुपये फी घेण्याचं काय कारण आहे? जर धंदा असेल तर नक्की कोणत्या उपकाराबद्दल बोलतोय आपण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

शिक्षण व्यवसाय हा धंदा आहे की सर्व्हिस?

मुक्त विहारि
Wed, 01/07/2015 - 14:59 नवीन
ह्या ह्या ह्या... पालकांकडून पैसे घ्यायचे असतील तर, धंदा आणि शासना कडून अनुदान घ्यायचे असेल तर, समाज सेवा.... असे मला वाटते, माझे मत चुकीचे ठरल्यास, मतपरीवर्तन केल्या जाईल. आजची स्वाक्षरी : काळानुरुप स्व-बदल हा अत्यावश्यक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

सर्वात पहिली गोष्ट म्हणजे

बोका-ए-आझम
Wed, 01/07/2015 - 15:05 नवीन
सर्वात पहिली गोष्ट म्हणजे काही शिक्षक तुम्ही म्हणता तसे असतील पण सरसकटपणे सगळ्या शिक्षकांना बोलायची काय गरज आहे? म्हणूनच मी प्रश्न विचारलाय की असे किती शिक्षक पाहिलेत आपण? चांगले आणि वाईट लोक सगळीकडे असतात. त्यामुळे त्या व्यवसायाला बोलण्याचं काही कारण नाही. वर्षाला ₹३५,००० फी घेण्याबद्दल जर तुम्ही बोलत असाल तर महागाई सगळीकडे वाढलेली आहेच. जर सरकार शाळांना किंवा महाविद्यालयांना अनुदान देत नसेल तर जो खर्च आहे त्यासाठी पैसे आणायचे कुठून? जे लोक शाळा या ना त्या कारणाने पैसे उकळतात असं म्हणतात त्यांनी त्यांच्या स्वतःच्या कंपन्या (मालकीच्या किंवा काम करत असलेल्या) तसं करत नाहीत का हे एकदा तपासून पाहावं. आणि उपकारांबद्दल म्हणालात तर हा प्रत्येकाच्या मनोवृत्तीचा भाग आहे. साधा सरळ हिशोब आहे - जर आज एखादा विद्यार्थी अभियांत्रिकी पदवीच्या जोरावर नोकरी मिळवत असेल तर त्याला ₹३ ते ३.५ लाख एवढा वार्षिक पगार मिळतो. त्याच विद्यार्थ्याला MBA केल्यावर ₹८ ते १० लाख एवढा पगार मिळतो. त्याला त्या पात्रतेपर्यंत पोचवणा-या शिक्षकाला किती मिळतात? जे ज्ञान शिक्षक विद्यार्थ्याला देतात त्या ज्ञानाच्या जोरावर तो विद्यार्थी किती कमावतो आणि त्या शिक्षकाला किती मिळतात याचा हिशोब केलात तर शिक्षकांचं शोषण होतंय असंच म्हणावं लागेल. शेवटी त्याला उपकार म्हणायचं की नाही हा प्रत्येकाच्या मनोवृत्तीचा प्रश्न आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

"₹" कसे टायपले ते सांगू शकाल

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 01/07/2015 - 15:08 नवीन
"₹" कसे टायपले ते सांगू शकाल का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

जस्ट मराठी

बोका-ए-आझम
Wed, 01/07/2015 - 18:42 नवीन
जस्ट मराठी नावाचं एक अॅप आहे. ते डाऊनलोड केल्यावर मराठी आणि इंग्रजी असे दोन्ही कीबोर्ड मिळतात. त्यात मिळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

आणि मी म्हणतोय की बहुतांशी

काळा पहाड
Wed, 01/07/2015 - 15:58 नवीन
आणि मी म्हणतोय की बहुतांशी शिक्षक हे पोपटपंची करूनच शिक्षक झाले आहेत. मी तुम्हाला फक्त वानगी दाखल उदाहरणं दिली जे अप्रामाणिक होते. पण जे प्रामाणिकपणे शिकवायचे ते प्रामाणिक पण अकार्यक्षम शिक्षक होते. आणि ज्या गोष्टी मी नंतर शिकलो त्या मला आधी मी पास होवून सुद्धा ठावूकच नव्हत्या. आणि यासाठी मी किती तरी उदाहरणे देवू शकतो. खरं तर असं आहे की शिक्षकांना (आणि बर्‍याच इतर जणांना सुद्धा) पाट्या टाकायच्या असतात, सेवा केली असं दाखवायचं असतं आणि सातवा वेतन आयोग सुद्धा हवा असतो. ज्ञान, संशोधन वगैरे गेलं तेल लावत. बाकी तुम्ही आता इतका पगार आणि तितका पगार सांगताय. पगार हा फक्त क्षमतेवर नाही तर क्षमता + जबाबदारीवर दिला जातो. हे जे विद्द्यर्थी आहेत ते त्यांच्या कंपनीसाठी एक ठराविक जबाबदारी उचलणार आहेत. अशी काय जबाबदारी शिक्षक उचलतात हो? सगळे विद्द्यार्थी नापास झाले तरी शिक्षकांना पगार मिळातोच ना? पगार जास्त द्यायला ना नाही पण त्यांनीही सर्व विद्यार्थ्यांना पडणार्‍या मार्कांची गॅरंटी घ्यावी. ती पण नाही, ज्ञान पण नाही, तास पण जास्त नकोत, घरी शिकवण्या पण करणार, जास्त पैसे मिळत नसल्यामुळं पेपर पण कसे तरी तपासणार आणि वर त्यांचं शोषण होतंय होय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

अच्छा! म्हणजे विद्यार्थी

बोका-ए-आझम
Wed, 01/07/2015 - 18:32 नवीन
अच्छा! म्हणजे विद्यार्थी परिक्षेत काही का करेना, जाणूनबुजून किंवा नकळत चूक करणार आणि त्याची जबाबदारी शिक्षकाची? जगातल्या कुठल्या व्यवसायात विक्रेता हा ग्राहकाच्या वागणुकीबद्दल जबाबदार धरला जातो? नशीब तुमच्यासारखे लोक या देशाचं धोरण ठरवत नाहीयेत नाहीतर एखाद्याने वकिली शिकून गुन्हा केला तर काय त्याला कायदा शिकवणा-यांना शिक्षा करणार? आणि विद्यार्थी पास होवो किंवा नापास, ते परीक्षेवर अवलंबून असतं. शिक्षकाला मेहनत तेवढीच घ्यावी लागते. आणि शोषण तर होतं आहेच. विद्यार्थ्याची निवड कंपनी करते कारण त्याने काही एक चांगला Performance दिलेला आहे. ती सगळी प्रक्रिया शिक्षकच सांभाळतात. जाऊ दे. तुमच्या लक्षात ते येणार नाही. त्यासाठी एक किमान बुद्धिमत्ता आणि संवेदनशीलता लागते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

सगळे शिक्षक किंवा सगळे सरकारी

नगरीनिरंजन
Wed, 01/07/2015 - 19:31 नवीन
सगळे शिक्षक किंवा सगळे सरकारी अधिकारी किंवा सगळे आयटीवाले किंवा सगळे एनाराय सारखे असतात असे कोणाचेच म्हणणे नाही. शिक्षकांबद्दल आकस नाही पण काही गोष्टी पाहिल्यात त्यावर सविस्तर लिहीन लवकरच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

नशीब तुमच्यासारखे लोक या

काळा पहाड
Wed, 01/07/2015 - 19:38 नवीन
नशीब तुमच्यासारखे लोक या देशाचं धोरण ठरवत नाहीयेत
जाऊ दे. तुमच्या लक्षात ते येणार नाही. त्यासाठी एक किमान बुद्धिमत्ता आणि संवेदनशीलता लागते.
माझी बुद्धीमत्ता आणि संवेदनशीलता हा सर्वस्वी माझ्या काळजीचा विषय आहे. मी तुमच्या पर्सनल गोष्टींवर टीका केलेली नाही. तुम्हाला हे संभाषण पर्सनल करण्यात काय रस आहे मला माहिती नाही.
अच्छा! म्हणजे विद्यार्थी परिक्षेत काही का करेना, जाणूनबुजून किंवा नकळत चूक करणार आणि त्याची जबाबदारी शिक्षकाची? जगातल्या कुठल्या व्यवसायात विक्रेता हा ग्राहकाच्या वागणुकीबद्दल जबाबदार धरला जातो?
एखाद्याने वकिली शिकून गुन्हा केला तर काय त्याला कायदा शिकवणा-यांना शिक्षा करणार?
थोडक्यात शिक्षक हा विक्रेता आहे आणि विद्यार्थी ग्राहक आहे हे तुम्हाला मान्य आहे. जर विक्रेता चांगली सर्व्हिस देत नसेल तर ग्राहक त्याचे पैसे परत मागू शकतो. जाणूनबुजून स्वतःच नुकसान करण्यात ग्राहकाला रस असेल असं मला वाटत नाही, निदान असा ग्राहक मी तरी पाहिलेला नाही. जर शिक्षकांच्या अकार्यक्षमतेमुळे विद्द्यार्थ्याला पुरेसं ज्ञान मिळत नसेल तर विद्यार्थ्यानं काय करावं? बरं हे इव्हॅल्युएशन दहावीनंतर होत असल्यामुळं पैसे परत घेतले तरी विद्यार्थ्याचं नुकसान झालंच ना? ते पैसे घेवून परत येणार आहे का? मी घेतलेला टीव्ही नीट चालत नसेल तर ती जबाबदारी माझी असते की टीव्ही कंपनीची? अशा वेळी जबाबदारी शिक्षकांनी घ्यायलाच हवी. आणि ती घ्यायची नसेल तर मग त्यांचा पगार सुद्धा कमीच असणार. त्यात विशेष काय आहे?
शिक्षकाला मेहनत तेवढीच घ्यावी लागते.
शिक्षक दिवसाचे किती तास घेतात? ८ तास? नक्कीच नाही. त्यांना १, २ किंवा जास्तीत जास्त ३ तास तेही ४५ मिनिटांचे घ्यावे लागतात. मेहनत जास्त कशी?
आणि शोषण तर होतं आहेच.
जगात हजारो कामगार आहेत. तेही स्किल्ड असतात. त्यांना यापेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागते आणि त्यांचं पण तथाकथित शोषण होतं. याचं कारण हेच आहे की कामगारांना जबाबदारी नसते. मॅनेजरला ती असते. पगार आणि प्रमोशन या जबाबदारी बरोबर येणार्‍या गोष्टी आहेत.
ती सगळी प्रक्रिया शिक्षकच सांभाळतात.
फुकट करतात का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

@काळा पहाड, तुमच्या वरील

हाडक्या
Wed, 01/07/2015 - 20:37 नवीन
@काळा पहाड, तुमच्या वरील प्रतिसादास तीव्र आक्षेप. स्वतःचा मुद्दा खरा करण्यासाठी शिक्षकी पेशाची इतकी लाज काढण्याची काही गरज नाही.काही लोक चुकारपणा करत असतील पण म्हणून त्या व्यवसायास आणि तो करणार्‍या सगळ्यांनाच तुम्ही जसे तोलता आहात ते काही पटत नाही.
शिक्षक दिवसाचे किती तास घेतात? ८ तास? नक्कीच नाही. त्यांना १, २ किंवा जास्तीत जास्त ३ तास तेही ४५ मिनिटांचे घ्यावे लागतात. मेहनत जास्त कशी?
तुम्हाला शिक्षकी पेशाबद्दल किती अगाध माहीती आहे ते कळतंय इथे (जास्त काही बोललं तर परत म्हणाल पर्सनल बोलतोय). पण असा बहुतेक जनतेचाही दृष्टीकोन असेल तर त्या शाळा आणि तिथल्या पोरांचे देवच भले करो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

शिक्षकी पेशाची इतकी लाज

काळा पहाड
Wed, 01/07/2015 - 23:06 नवीन
शिक्षकी पेशाची इतकी लाज काढण्याची काही गरज नाही
पेशा कसला? अहो हा धंदा आहे ना? बोकासाहेबांनी तर ते कबूलच केलंय. आपण सरकारी नोकर, बिल्डर, राजकारणी यांची जमेल तिथे लाज काढतोच ना? शिक्षक का वेगळा आहे ते सांगाल?
तुम्हाला शिक्षकी पेशाबद्दल किती अगाध माहीती आहे ते कळतंय इथे (जास्त काही बोललं तर परत म्हणाल पर्सनल बोलतोय).
नसेल कदाचित. तुम्ही सांगा ना किती खपतात आपले शिक्षक ते. कारण मुद्दा इथे असा आहे की शिक्षकांना उच्च वेतन का मिळत नाहिये. आता असा मुद्दा आल्यावर त्याचा प्रतिवाद करायला नको?
पण असा बहुतेक जनतेचाही दृष्टीकोन असेल तर त्या शाळा आणि तिथल्या पोरांचे देवच भले करो..
जर रिझल्ट्स मिळाले नाही तर बहुतेक जनतेचा असाच दृष्टीकोन असेल हे पक्कं समजा. आम्ही पैसे मोजतो, चिंचोके नाही. त्यानंतरही इथेच ड्रेस विकत घ्या, डोनेशन द्या वगैरे नखरे आहेतच. शहरांमधलं शिक्षण एका मुलासाठी वर्षाला ५०,००० रुपयांच्या घरात गेलंय. जनता हे निमूटपणे सहन करते कारण १. त्यांना पर्याय नाही २. त्यांची एकजूट नाही आणि ३. या शाळा उच्च रिझल्ट्स देतील असं लोकांना वाटतं. तसं जर झालं नाही, तर लोक काय करतील असं वाटतं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

बोकासाहेब म्हणजे बायबल नव्हे

हाडक्या
गुरुवार, 01/08/2015 - 16:25 नवीन
बोकासाहेब म्हणजे बायबल नव्हे की न्यायमूर्ती की जे म्हणाले म्हणून तुम्हे तुमची विवेक-बुद्धी बाजूला टाकून काहीही बोलावे. दुसरी गोष्ट, जरी डॉक्टर, शिक्षक (मी यापैकी कोणीही नाही) हे व्यवसाय (पेशा/धंदा काहीही म्हणा) आहेत तरी त्यांचा लोकांच्या आयुष्याशी थेट संबंध येत असल्याने त्यांना समाजात एक आदरयुक्त स्थान (तशीच हेटाळणी पण) मिळते. तेही बाजूला ठेवले तरी तुम्ही जेव्हा "धंदा" असा उल्लेख करताय तो अतिशय वाईट अशा वेगळ्या "context"मध्ये करताय म्हणून निषेध नोंदवला.
आम्ही पैसे मोजतो, चिंचोके नाही. त्यानंतरही इथेच ड्रेस विकत घ्या, डोनेशन द्या वगैरे नखरे आहेतच. शहरांमधलं शिक्षण एका मुलासाठी वर्षाला ५०,००० रुपयांच्या घरात गेलंय. जनता हे निमूटपणे सहन करते कारण १. त्यांना पर्याय नाही २. त्यांची एकजूट नाही आणि ३. या शाळा उच्च रिझल्ट्स देतील असं लोकांना वाटतं.
तुमच्या असल्या पूर्वग्रहदूषित बोलण्याचं कारण कळालं. यापुढे तुम्हाला काही सांगण्यात अथवा याविषयी चर्चा करण्यात काही हशील नाही हेदेखील समजलं. तेव्हा चालू द्या. बादवे, रेल्वेच्या समस्यांसाठी नेहमी मोटरमनला धरणारे (आणि मारणारे) पब्लिक पाहीले की यामुळेच आश्चर्य (कीवदेखील) वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

नकारात्मक विचार

बोका-ए-आझम
Wed, 01/07/2015 - 21:42 नवीन
काळा पहाड - Wed, 07/01/2015 - 13:28 मलाही असंच वाटत होतं. ते आता कन्फर्म झालं. हीच घाण आता इथे येवून इथल्या लोकांचे शेजारी बनणार आहेत. सरकारी नोकर असलेला माणूस मरत असला तरी त्याला पाणी देवू नये असं पर्सनल मत आहे. >>>>> @काळापहाड तुम्हाला काहीतरी मानसिक प्राॅब्लेम आहे काय? शिक्षकांवर तुमचा राग - का, तर म्हणे पाट्या टाकतात आणि जबाबदारी घेत नाहीत. तुमच्याकडे पगार मागायला येतात का? आणि आता सरकारी नोकरांवर? मान्य आहे, सरकारी नोकर हा कुणाच्या फारशा आदराचा विषय नाही पण अशी भाषा? एवढी नकारात्मक वृत्ती तुमच्यात का आली ते एकदा सांगा म्हणजे आम्ही " अरेरे! बिच्चारा काळापहाड! " म्हणायला मोकळे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

भडकमकर मास्तर

बोका-ए-आझम
Wed, 01/07/2015 - 21:52 नवीन
जुन्या मिपाकरांना भडकमकर मास्तरांची ' एका छिद्रान्वेषी वैतागसम्राटाची डायरी ' आठवत असेल. रोल माॅडेल म्हणून कोणाला घेतलं होतं ते समजलं! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

तुम्हाला काहीतरी मानसिक

काळा पहाड
Wed, 01/07/2015 - 22:56 नवीन
तुम्हाला काहीतरी मानसिक प्राॅब्लेम आहे काय?
जुन्या मिपाकरांना भडकमकर मास्तरांची ' एका छिद्रान्वेषी वैतागसम्राटाची डायरी ' आठवत असेल. रोल माॅडेल म्हणून कोणाला घेतलं होतं ते समजलं!
बोकासाहेब महोदय, पुन्हा एकदा सांगतो की माझा मुद्दा हा एका तर्कावर आधारलेला आहे. त्याला तर्कानं उत्तर द्यायचं सोडून तुम्ही माझ्यावर पर्सनल हल्ले करत आहात. तेव्हा मी कितीही मुद्दे लिहिले तरी त्याला तुम्ही जर अशी गचाळ उत्तरं देणार असाल तर मी मुद्दे मांडण्यात काहीच अर्थ नाही, नाही का? की मी एखाद्या दुखर्‍या नसेवर हात ठेवलाय?
एवढी नकारात्मक वृत्ती तुमच्यात का आली ते एकदा सांगा
अजून नकारात्मक वृत्ती आलिये कुठे? ती आली असती तर मी इथे तुमच्याशी वाद घालत बसलो असतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

तुमचा मुद्दा तर्कावर आधारलेला

बोका-ए-आझम
Wed, 01/07/2015 - 23:51 नवीन
तुमचा मुद्दा तर्कावर आधारलेला आहे - हे तुमचं मत आहे. ज्याला तुम्ही तर्क म्हणताय त्यालाच मी तुमची नकारात्मक विचारसरणी म्हणतोय. शिक्षक, सरकारी नोकर यांच्याबद्दल तुमच्या भावना या अत्यंत आक्षेपार्ह आहेत अाणि त्याला तर्क म्हणणं यासारखी दुसरी तर्कदुष्टता नसेल. मला या क्षणी राग नाही, कीव येतेय तुमच्या विचारांबद्दल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

पिंकावरुन हि बातमी आठवली

मार्मिक गोडसे
Wed, 01/07/2015 - 14:52 नवीन
http://www.nydailynews.com/news/world/porn-star-sacked-teacher-appeals-ruling-article-1.2057136
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

आता विषय निघालाच आहे तर मराठी

खटपट्या
Wed, 01/07/2015 - 23:00 नवीन
आता विषय निघालाच आहे तर मराठी शाळांची आर्थीक परीस्थीती कशी आहे त्याविषयी थोडेसे. ठाण्यातील एका जुन्या मराठी शाळेत मित्राची मुलगी आहे. एका विद्यार्थ्याची फी वर्षाला १००० रू आहे. ही फी वाढवण्यासाठी पालक सभा घेणेत आली होती त्यात बहुसंख्य पालकांअचा फी वाढीस विरोध होता. वाढता विरोध पाहता शाळाचालकांनी वार्षिक जमाखर्चच पालकांसमोर ठेवला तो असा होता. शाळेत एकूण मुले = २०००. प्रत्येक मुलाकडून फी येते रू १००० वर्षिक. एकूण वार्षिक आवक = २० लाख. यात २० शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा पगार, विज बील, पाणी बील. ईतर शैक्षणीक साहीत्याचा खर्च, साफसफाई आणी ईतर खर्च कसे करणार. शाळेत येणारी बहूतेक मुले ही झोपडपट्टीत राहणारी. बहुतेक पालकांचा पगार १५ ते २० हजार. त्यात मराठी शाळेत कमी होत जाणारे प्रवेश. शाळेला अनुदान नाही. नवीन प्रवेश घेताना १०००० रू देणगी मिळते. शिक्षकांना कमी पगार मिळण्याची बरीच कारणे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

धन्यवाद !!

चिनार
Wed, 01/07/2015 - 15:27 नवीन
धन्यवाद !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

अहो

मनिमौ
Mon, 01/05/2015 - 12:50 नवीन
हलली आय टी वाल्यांना पण नाही परवडत. सुरूवातीला पगार कमीच असतो 15 _ 25 हजार रुपये. कंपनी बदलली तर जरा जास्त. एकटे राहणे परवडत नाही. भाडे मिनिमम 5000 मे खाणे 3500 होटल, ऑफिस ) मोबाईल बिल आणी बाकी खचॆ यात संपतात.कसे जमणार. का
  • Log in or register to post comments

हिंजेवाडी नाही हो...हिंजवडी

प्रभो
Mon, 01/05/2015 - 13:13 नवीन
हिंजेवाडी नाही हो...हिंजवडी :)
  • Log in or register to post comments

घर - घर

कपिलमुनी
Mon, 01/05/2015 - 13:40 नवीन
सध्या माझी पण अशीच घर घर चालू आहे . लोका एवढे पैसे आणतात कुठुन हा ( खरोखरच) प्रश्न पडतो ! आजकाल डोणजे पासून शिरवळ आणि पौड ,उरवडे , वाडे बोल्हाई , चिखली , कामशेत , आणि हिंजवडीच्या मागे तर कुठेही डोंगरात प्रोजेक्ट्स चालू आहेत.
  • Log in or register to post comments

बेक्कर

चिरोटा
Mon, 01/05/2015 - 14:55 नवीन
सध्या फ्लॅट्स जास्त खपत नसल्याने बिल्डरांची बूच बसली आहे.वर म्हंटल्याप्रमाणे प्रोजेक्ट्सची नावे मस्त असतात- एकदम युरोपियन्स्टाईल- व्हेनेझिया,गॅलेरिया,नॅपा व्हॅली,एल्डोरा.. किंवा एकदम अस्सल जुनी भारतिय- <बिल्डरचे नाव> प्राकृती,व्रूण्दावन वगैरे. आजुबाजुला एखादा पडिक तलाव,तळे असेल तर मग <बिल्डरचे नाव> लेक व्यु.. वगैरे. पूर्वी बेंगळूर्मध्ये एक फ्लॅट बघायला शहराच्या बाहेर गेलो होतो. शहरापासून २५ कि.मी. लांब प्रोजे़क्ट होता.येळहांका येथे. पण भाव मात्र शहराचेच. कारण विचारले- इकडून एयर फोर्स स्टेशन जवळ आहे.शिवाय नविन एयर पोर्ट पण जवळ आहे."मग त्याचा मला काय फायदा? मी पायलट नाही किंवा कुठल्या विमान कंपनीत पण नाही." त्याने मुंबई,दिल्लीची उदाहरणे दिली. जिकडे एयरपोर्ट असतात तेथे कधीना कधी भाव वाढतातच. तेव्हा आता फ्लॅट घेतलात तर तो नंतर जास्त किंमतीने विका.
  • Log in or register to post comments

सध्या फ्लॅट्स जास्त खपत

नगरीनिरंजन
Mon, 01/05/2015 - 17:33 नवीन
सध्या फ्लॅट्स जास्त खपत नसल्याने बिल्डरांची बूच बसली आहे.
नवे फ्लॅट्स न विकलेले किती आहेत याची आकडेवारी कुठे मिळू शकेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

फक्त

चिरोटा
Mon, 01/05/2015 - 20:52 नवीन
ह्या बातम्या अधून्मधून येत असतात पण पाचव्या किंवा सहाव्या पानावर कोपर्यात!!त्यानंतर लगेच २/३ दिवसांत '७०-८० लाखाचे फ्लॅट्स पण कसे विकले जात आहेत'ह्यावर पहिल्या पानावर बातम्या येतात.त्याला जॉन लॅसल वगैरे मोठ्या एजंटांनी दुजोरा दिलेला असतो.. बेंगळूरमध्ये तरी फ्लॅट्स(५० लाखावरचे) जास्त खपत नाही आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

बिल्डर्स चे ऑफिस , फ्लॅट्च्या प्रोजेक्ट्सची नावे युरोपियन्स्टाईल

सिरुसेरि
Mon, 01/05/2015 - 15:52 नवीन
बिल्डर्स ची ऑफिसेस ,फ्लॅट्च्या प्रोजेक्ट्सची नावे युरोपियन्स्टाईल असतात . तसेच , त्यांच्या जाहीरतींच्या पोस्टर्स , होर्डींगस वरचे लोकही युरोपियन नाहीतर देशी युरोपियन वाटतात. थोडक्यात काय , तर , सर्व सामान्य लोकांसाठी हे प्रोजेक्ट्स नाहीत असेच बिल्डर्सना सुचवायचे असते .
  • Log in or register to post comments

जाहिरतीचे

चिरोटा
Mon, 01/05/2015 - 16:08 नवीन
जाहिरातीचे पेपर्स मस्त असतात.बर्याचश्या चित्रात एक तोकडे कपडे घातलेली सोनेरी केसांची तरूणी कुत्रा घेऊन रस्ता क्रॉस करत असते. तिच्या मागून दोन गोंडस मुले शाळेत जात असतात.थोडे पुढे एक सुटाबुटातला बॅग घेतलेला तरूण बिल्डिंगमध्ये शिरत असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि

रिसेलचा घ्या

स्वधर्म
Mon, 01/05/2015 - 15:52 नवीन
तो नविन पेक्षा बराच कमी किमतीत मिळतो आणि ताबाही पटकन. सगळ्या गोष्टी पारखल्या जाऊ शकतात. फक्त एंजंट नामक प्राण्यापासून सावध. अनेक प्रॉपर्टी बाबतची संकेतस्थळे आहेत. स्पॅम मेलचा थोडा त्रास होतो. सकाळ इतर बाबतीत भुक्कड पेपर असला, तरी घरांच्य छोट्या जाहीराती बघा. बिल्डर नावाच्या जमातीशी संपर्क कमीत कमी असावा. रिसेलचा प्लॅट घेणारा, - स्वधर्म
  • Log in or register to post comments

मित्रांबरोबर पिंपळे सौदागर

सौंदाळा
Mon, 01/05/2015 - 16:11 नवीन
मित्रांबरोबर पिंपळे सौदागर नामक एरियात ३ वर्षापुर्वी पहिल्यांदा गेलो होतो. सरः गार्डन व्ह्यु फ्लॅट असेल तर ५० रु / चौ.फुट जास्त होतील. हा ५ बिल्डिंगचा प्लॅन बघा, हि फ्लॅट शिल्लक असलेली शीट बघा आणि सांगा. मित्राचे बजेट लईच टाईट होते. मग आम्ही प्लॅन निरखुन बघुन गार्डन व्ह्यु नसलेल्या एका फ्लॅट वर बोट ठेवले. सर : याचे ५० रु / चौ.फुट जास्त होतील, हा गार्डन व्ह्यु आहे. आम्ही : गार्डन कुठे दिसतय इथुन? सर : हे काय किचनच्या खिडकीतुन दिसतय की. आम्ही : ?? परत प्लॅन मधे डोके खुपसले, मित्राने ५ मिन. डोके घालुन अजुन एका फ्लॅट्वर बोट ठेवले. सर म्हणायच्या आधी मीच म्हणालो अरे हा पण गार्डन व्ह्यु आहे. मित्र (रागाने माझ्याकडे बघत) : कसे काय? मी : हे काय संडासाच्या खिडकीतुन गार्डन दिसतय की. मित्र : खी: खी: सर : ?? खुन्नस मी मोबाईल कानाला लावुन बाहेर फरार. टीपः मित्राने शेवटी तोच फ्लॅट (संडासाच्या खिडकीतुन गार्डन व्ह्यु वाला) फायनल करुन विकत घेतला.
  • Log in or register to post comments

हहपुवा

कपिलमुनी
Mon, 01/05/2015 - 16:44 नवीन
*lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा

मी : हे काय संडासाच्या

शिद
Mon, 01/05/2015 - 17:03 नवीन
मी : हे काय संडासाच्या खिडकीतुन गार्डन दिसतय की.
*lol* हं, मात्र बसल्यानंतर गार्डन व्ह्यू होणार नसल्यामूळे त्या फ्लॅटचा ५० रु/चौ.फुट जास्त भाव नसेल कदाचीत. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा

(No subject)

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 01/07/2015 - 14:35 नवीन
+D हं, मात्र बसल्यानंतर गार्डन व्ह्यू होणार नसल्यामूळे त्या व्ह्यूसाठी मिपावरच्या एका प्रस्थापित कवीच्या कविता चाळा... :) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा