Skip to main content

भुलण्याचे वय तुझे... सावर सावर

लेखक धोंडोपंत यांनी मंगळवार, 04/11/2008 02:11 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो, आज अशी एक घटना घडली की हातून एक ’उपदेशात्मक’ कविता लिहून झाली. ही कविता आमच्या अत्यंत आवडत्या छंदात ८/६/८/६ मध्ये लिहिलेली आहे. या छंदाची लय आम्हाला फार फार आवडते. पहा तुम्हाला आवडते का? (लयीत वाचणे सुलभ जाऊन काव्याचा चांगला आस्वाद घेता यावा, म्हणून जिथे पॉझ घ्यायचा तिथे स्वल्पविराम दिला आहे. स्वल्पविरामाला क्षणभर थांबून पुढचे वाचावे.) भुलण्याचे वय तुझे, सावर सावर..... अवखळ नको होऊ, स्वत:ला आवर..... नुकतीच आली तुला, तारूण्याची जाण देहामध्ये गवसली, मोतियाची खाण भुलण्याचे वय तुझे, सावर सावर.......... भरलेल्या कणसाला, पाखरांची भिती हाती आल्या पिकाला गं, जपायचे किती? भुलण्याचे वय तुझे, सावर सावर........... गावातल्या मुलींना का, हडळीचा शाप? केवड्याच्या झाडाखाली, असतोच साप भुलण्याचे वय तुझे, सावर सावर....... उष्टावल्या नैवेद्याने, देवाचाही कोप भांगेसंगे जगते का, तुळशीचे रोप? भुलण्याचे वय तुझे सावर सावर....... बोललो जे काही त्याचा, नको मानू राग थेंब थेंब इंधनाने, भडकते आग भुलण्याचे वय तुझे, सावर सावर....... अवखळ नको होऊ, स्वत:ला आवर..... आपला, (काव्यात्मक) धोंडोपंत
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 5658
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

पंत, भलतीच जबरदस्त कविता लिहिलीत .
उष्टावल्या नैवेद्याने, देवाचाही कोप भांगेसंगे जगते का, तुळशीचे रोप?
ओहोहो... :)
बोललो जे काही त्याचा, नको मानू राग थेंब थेंब इंधनाने, भडकते आग
क्या बात है... मस्त. आपला (जबराट) आजानुकर्ण

उष्टावल्या नैवेद्याने, देवाचाही कोप भांगेसंगे जगते का, तुळशीचे रोप? वावा!!! (तुळशीदास)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

उष्टावल्या नैवेद्याने, देवाचाही कोप भांगेसंगे जगते का, तुळशीचे रोप? एकदम खास!! मुमुक्षु

मस्त कविता!

सुलोचना बाईंच्या आवाजातील गदिमांच्या तुज्या उसाला लागल कोल्हा ची आठवण आली. मूळ जमीन काळं सोनं त्यात नामांकित रुजलं बियाणं तुझा ऊस वाढला जोमानं घाटाघाटानं उभारी धरली पेरपेरांत साखर भरली नाही वाढीस जागा उरली रंग पानांचा हिरवा ओला (लावणी प्रेमी) प्रकाश घाटपांडे-पाटील बेल्हेकर

In reply to by प्रकाश घाटपांडे

नमस्कार प्रकाशराव, अभिप्रायाबद्दल धन्यवाद. एक मूलभूत मुद्दा सांगावासा वाटतो. गदिमांची " तुझ्या ऊसाला लागलं कोल्हा" ही लावणी अप्रतिम आहे. आम्ही त्या लावणीचे दिवाने आहोत. पण गदिमांच्या तुझ्या ऊसाला लागलं कोल्हा ची पार्श्वभूमी , वृत्त आणि विचार संपूर्णपणे भिन्न आहेत. त्यांच्या रचनेत तारूण्याने सळसळलेल्या युवतीचे रसभरीत वर्णन आहे . तिची काळजी करण्यापेक्षा तिच्या सौंदर्याचे वर्णन आणि त्यामुळे तिचे आशिक झालेल्यांची काय अवस्था असेल हे सांगण्याकडे त्यांचा कल आहे. इथे आम्हाला तिच्या तारूण्यामुळे होण्यार्‍या भावी गोष्टींची चिंता वाटते. "इंधनाच्या थेंबा थेंबामुळे आग भडकते" हे ज्वलंत धोकादायक वास्तव तिला कळावे, अशी अपेक्षा आहे. आपला, (सावध) धोंडोपंत आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com (जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)

In reply to by धोंडोपंत

फड सांभाळ तुऱ्याला ग आला तुझ्या ऊसाला लागल कोल्हा "सांभाळ " मध्ये थोडी काळजी घेतल्या सारखे केले आहे ,पण मूळ तुम्ही म्हणता तसे आहे. प्रकाश घाटपांडे

पंत कविता आवड्ली, भावली. परिस्थितीचे वास्तववादी चित्रण. सर्व पालकांनी जरुर वाचावी अशी. हा विषय कसा बोलावा ह्या बाबतीत कायम गोंधळ असतो.

गदिमांची " तुझ्या ऊसाला लागलं कोल्हा" ही लावणी अप्रतिम आहे. आम्ही त्या लावणीचे दिवाने आहोत. पण ही लावणी गदिमा ची आहे या विषयी शंका वाटते मला वाटते ती खेबूडकराची आहे.....जरा शहानिशा केली तर उत्तम..! बाकी कविता फार च अप्रतिम आहे

In reply to by sanjubaba

शहानिशा कसली? १०० टक्के गदिमांचीच आहे. शंकाच नको. हे असलं लिहिणं गदिमाच जाणे. एक शब्द इकडचा तिकडे करता येत नाही गदिमांचा. गदिमांची ताकद आम्ही अजून कोणात पाहिलेली नाही. बाप माणूस. आमचा दंडवत. आपला, (गदिमाभक्त) धोंडोपंत आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com (जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)

In reply to by धोंडोपंत

एक शब्द इकडचा तिकडे करता येत नाही गदिमांचा. गदिमांची ताकद आम्ही अजून कोणात पाहिलेली नाही. बाप माणूस. आमचा दंडवत. गदीमा म्हणजे आपलेही दैवत! मुमुक्षु

In reply to by प्रकाश घाटपांडे

क्या बात है प्रकाशराव, लांब रुंद पिकला बिघा याची कुठवर ठेवशील निगा ? सुरेख वस्तू म्हणजे आवतणं जगा याला कुंपण घालशील किती ? जात चोरांची लई हिकमती आपली आपण धरावी भिती अर्ध्या रात्री घालतील घाला याला म्हणतात गदिमा. धोंडोपंत आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com (जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)

भरलेल्या कणसाला, पाखरांची भिती हाती आल्या पिकाला गं, जपायचे किती? वा वा पंत..! केवळ सुंदर काव्य.. काव्यातील आपला अधिकार वादातीत आहे..! तात्या.

मस्त ! आवडली काव्य रचना आपली ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आपले संकेतस्थळ

पंत, कविता आवडली !!! भरलेल्या कणसाला, पाखरांची भिती हाती आल्या पिकाला गं, जपायचे किती? ओहो, तारुण्याची भानगड लैच मोक्कार असते नाय का ? :) -दिलीप बिरुटे (पंतांचा दोस्त )

बोललो जे काही त्याचा, नको मानू राग थेंब थेंब इंधनाने, भडकते आग वा ! कविता आवडली. --लिखाळ.

धोंडोपंत .. अतिशय सुरेख कविता. गावातल्या मुलींना का, हडळीचा शाप? केवड्याच्या झाडाखाली, असतोच साप खास! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

अप्रतिम! एकेक कडवे/शेर अस्सल आणि कसदार आहे .. खूप खूप आवडली :) -(प्रभावित) ऋषिकेश

उष्टावल्या नैवेद्याने, देवाचाही कोप भांगेसंगे जगते का, तुळशीचे रोप? भुलण्याचे वय तुझे सावर सावर....... बोललो जे काही त्याचा, नको मानू राग थेंब थेंब इंधनाने, भडकते आग सुरेखच रचना! वृत्तबद्ध आणि गेय! :) चतुरंग

धोंडोपंत, आज बर्‍याच दिवसानी आपली रचना वाचायला मिळाली. सुरेख!

कविता छानच आहे .. गावातल्या मुलींना का, हडळीचा शाप? केवड्याच्या झाडाखाली, असतोच साप ... ... या ओळी विशेष आवडल्या .

अप्रतिम! उष्टावल्या नैवेद्याने, देवाचाही कोप भांगेसंगे जगते का, तुळशीचे रोप? क्या बात है!

मस्तच.. भरलेल्या कणसाला, पाखरांची भिती हाती आल्या पिकाला गं, जपायचे किती? व्वा.. मदनबाण..... हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर. बॅ.वि.दा.सावरकर