Skip to main content

मला मिपा का आवडते? उर्फ माझी पण नर्मदा परीक्रमा....

Published on बुधवार, 24/12/2014
यानबूला येण्यापुर्वी, काहीतरी वाचायला हवे म्हणून, जगन्नाथ कुंटे ह्यांची पुस्तके आणली.ती वाचून मला पण नर्मदा परीक्रमा करण्याची इच्छा झाली.मुळात माझा पिंड अध्यात्मिक.पण वेगळा.आमची मुंज पण वेगळी आणि आमचे सत्यनारायण पण वेगळे. मुद्दाम नर्मदाच्या परीक्रमेला कदाचित जाईनही.पण माझ्यासाठी म्हणून देवाने काहीतरी वेगळी व्यवस्था केली असेलच की, विचार करता करता जाणवले की, यस्स्स्स्स्स...माझी नर्मदाच वेगळी. मुळातच माझा स्वभाव स्वच्छंदी आणि बहूदा त्यामुळेच एककल्ली.आंतरजालावर इकडे-तिकडे भटकट असतांना, मराठी संकेत-स्थळांचा शोध लागला. पार मगोगत, उपक्रम करून मी पण इथेच पडीक व्हायचे ठरवले आहे.आपली आपली पथारी पसरायची.चार टोळकी जमवून गप्पांचा फड जमवायचा.बाकी ते काऊ-चिऊचे राजकारण आणि इतर न पटणार्‍या गोष्टी गेल्या खड्ड्यात. इथे परस्परांत वाद-विवाद होणारच आणि ते व्हायलाच पाहिजेत.पण ते वाद जर संवादाकडे जाणार असतील तर फारच उत्तम.इतर आंतर-जालांचे माहीत नाही पण निदान मिपावर तरी वाद-विवाद, संवादाकडे वळतील ह्याची काळजी संपादक घेत असतात. एक-दोन वेळा काही वेडे-वाकडे लिहील्यामुळे मला पण कानकोंडे झाले होते.पण संपादकांनी आणि त्याहीपेक्षा खर्‍या मिपाकरांनी (खरे मिपाकर हे एकच जन्म घेतात, चिकाटीवाल्या मिपाकरांची आम्ही गणना करत नाही.) वेळो-वेळी समजून घेतले. जास्त लिहायची सवय नसल्याने, सुरुवातीला थोडा त्रास पण झाला.त्यावेळी आलेल्या प्रतिसादांनी मन पण थोडे नाराज झाले होते.अशावेळी प्रशांत आणि गणपा ह्यांनी धीर दिला.योग्य शब्दांत चुका सांगीतल्या. पण हळूहळू इथे मित्र मिळाले.किंबहूना ज्यांनी सर्वात जास्त टर उडवली ते तर अधिकच जवळ झाले. एक उदाहरण देतो. माझ्या ह्या लेखात (http://www.misalpav.com/node/20742)माझ्या लेखाची टर खेचणारा यकू पण होता. पुढे तो साल्ला भिXXXट यकू, कधी जिवलग व्यनि मित्र झाला ते समजले पण नाही.पुढे ह्याच यकूने मला हवे असलेले अजुन एक पुस्तक पाठवले.(भेंडी परत एकदा त्या "यकू"च्या आठवणीने अक्षरे धुसर झाली.) त्यानंतर तर मला मिपावर मदत मागायची सवयच लागली. दुबईला जातोय? काढा धागा.आहेत कुंदन शेठ.पहिला कट्टा केला तो ह्या कुंदन बरोबर.कोण कुठला मी....ना ओळख ना पाळख.कुंदन स्वतः घ्यायला आला.माझ्या आग्रहाखातर मुद्दाम माझ्यासाठी मेट्रोतून फिरला. यानबूला जातोय? काढा धागा.आहेत अजय इंगळे.इथे आल्या नंतर दुसर्‍या दिवशी स्वतः गाडी घेवून आले.मला आवश्यक असलेली खरेदी करायला मदत केली.कधी फोन केला तर वेळात-वेळ काढून मला भेटायला येतात. मुलाने आकुर्डीच्या इंजिनियरिंग कॉलेजला प्रवेश घेतला आणि आता जागा शोधतोय? काढा धागा.मिपाकर येतातच मदतीला.बरे येतात ते फक्त सल्ले द्यायला.मी सांगतो तेच कर.हीच जागा उत्तम.असे कुणीही म्हणाले नाहीत. मुलाला बाइक हवी आहे? काढला धागा.खुप सल्ले मिळाले.माहिती मिळाली.धर्मराज मुटके ह्यांचे म्हणणे पण पटले.(जाताजाता, बहूदा मुटके साहेबांचेच म्हणणे खरे ठरणार.) मिपाने खरोखर मला काय दिले असेल तर ते माझी मित्र-मंडळींची हौस भागवली.आपला पण एक सुंदर ग्रूप हवा.थोडी चेष्टा-मस्करी, थोडे वाद-विवाद आणि भरपूर खाणे-पिणे करता करता आपले ज्ञान अधिक सम्रुद्ध व्हावे, अशी मनापासून इच्छा होती.पथारी घेवून फिरलो बराच पण स्थिरावलो, स्थिरावलो म्हणण्यापेक्षा पसरली ती इथेच. आपण सगळीच माणसे, पण प्रत्येकजण देवास्वरूप काहीतरी द्यायचा विचार करत असतो. कधी कधी उत्तम विचार मिळतात, तर कधी चविष्ट पाकक्रुती, कधी सुंदर फोटोग्राफी, तर कधी फोटोग्राफी म्हणजे नक्की काय? ते शिकवणारी स्वॅप्स ह्यांची लेखमाल देखील..(अर्थात इतकी सुंदर लेखमाला आमच्या कॅमेराला वाचता येत नसल्याने आम्ही काढलेले फोटो यथातथाच येतात, तो दोष आमचा आहे.सध्या स्वॅप्स आमच्यावर नाराज आहेत.पण भेटलो की मला नक्कीच माफ करतील.प्रायश्र्चित्त म्हणून चिंचेची चटणी आणि बटाटेवडे (चिंचबव) खायला पण तयार आहे.बायकोसाठी दाबेली खाऊ शकतो तर मित्रापुढे "चिंचबव" काय चीज़?) फोटोग्राफी सारखीच, आम्हाला अजिबात न जमणारी, आणखी एक कला म्हणजे चित्रकला.इथे भले-भले चित्रकार (चित्रगुप्त, बबन ताम्बे, ही पटकन आठवलेली नावे)लीलया चित्र काढतात. ते बघून जळजळ न होता, उलट त्यांच्या कलेचे कौतूकच करावेसे वाटते. कधी कंटाळा आलाच तर वाचायला पर्यटन विभाग आहे.त्यात घुसायचे आणि विना तिकीट आणि विना पासपोर्ट सगळीकडे भटकून यायचे. अद्याप माझी नर्मदा परीक्रमा सुरुच आहे, जसे जसे उत्तम अनुभव येतील तसे नक्कीच सांगीन.आमच्या मनांत उत्तम अनुभवच राहतात.वाईट अनुभवांना आम्ही मनांत शिरूच देत नाही. तुर्तास जय मिपा आणि जय खरे मिपाकर......
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचन संख्या 10092
प्रतिक्रिया 71

प्रतिक्रिया

तुमचा मिपावावर प्रेरणादायी वाटतो. मिपाबद्दलच्या तुमच्या भावनांना अनुमोदन.

च्यायला, कोण कुठली मानसं नात्यातली मानसं नाहीत पण मदतीला हजर. म्ज्जाय मिपा म्हणजे. बाकी मिपा मिपा करू नका.मिपाचं काम प्रेयसी सारखं आहे, पहिल्यांदा तीच्या सर्व गोष्टी आवडतात आणि मग तू अशीच वागली, तू अशीच बोलली, तू हे कशाला केलं असं सुरु होतं पण तिच्या सर्व गुण अवगुणासह तिला स्वीकारलं की बस लाईफ बन गयी...! :) च्यायला, या कुंद्यानं तुम्हाला इतका वेळ दिला :( सालं आम्ही वाट्स्पवर काही मेसेज की केला की दहा घंट्याने रिप्लाय करतो, सालं माझ्याच वाटेला वाईट अनुभव आहेत तर.... ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

"पहिल्यांदा तीच्या सर्व गोष्टी आवडतात आणि मग तू अशीच वागली, तू अशीच बोलली, तू हे कशाला केलं असं सुरु होतं......" असेल...असेही असेल... पण आमची आणि मिपाची सुरुवातच भांडणामुळे झालेली, सुरुवातीचे रुसवे-फुगवे, वेळीच दूर झाल्याने आणि पैसा ताई, अपर्णा ताई ह्यांनी समजून घेतल्यामुळे, जास्त दुरावा निर्माण झाला नाही.गणपा आणि प्रशांतने योग्यवेळी मदत केली.धीर दिला. ते म्हणतात ना, मारणार्‍यापेक्षा वाचवणारा जास्त आवडायला लागतो, तसेच झाले. आता तर काय मिपाहीच आमची नर्मदामैय्या असल्याने, आमची समाधी पण इथेच.कदाचित कुणी फुले नाही वाहणार पण निदान कुणी निंदा तरी नक्कीच करणार नाही.शिवाय चुकून माकून कधी वेड्यासारखा वागलो तर, तुम्ही आहातच की कान धरायला. "सालं माझ्याच वाटेला वाईट अनुभव आहेत तर...." पण मला तरी तुमचा दोन्ही वेळा अनुभव उत्तम आला, पहिल्यांदा मुलाच्या प्रवेशाच्या वेळी आणि नंतर आत्ता माझी समजूत घालतांना. @ खटपट्या आणि श्रीरंग, तुमचे पण मिपाबाबतीत उत्तम अनुभव असतील तर लिहा की.एरवी आपण मारामार्‍या करतोच, निदान एखादा धागा तरी, उत्तम अनुभवाचा असावा. नाहीतरी नविन वर्ष येत आहेच.जुनी भांडणे विसरून ह्या नव्या वर्षाचे स्वागत करू या.

In reply to by मुक्त विहारि

कोण पैसा तै, कोण अपर्णा तै, कोण गणपा कोण प्रशांत हे सर्व जालीय भास. आभासी जगात खुप भावनिक गुंता करून ठेवू नये या मताचा मी आहे. सालं रावसाहेब म्हणायचे एकदा नेट डिसकनेक्ट केलं जालीय नातं डिसकनेक्ट. आपलं बा असं आहे. नवीन वर्षाचं स्वागत करू या ! कुठं बसायचं ? :) -दिलीप बिरुटे

In reply to by अद्द्या

रावसाहेब, (उर्फ संजोपराव) साला जिंदादिल माणुस. अतिशय खवट. खवटपणा मान्य, सालं तुमच्या मिसळपाववर शुद्धलेखनाची गोडी एकाला नै. अतिशय पांचट प्रतिसाद लिहिणारे लिहित असतात. आम्ही तुमच्या मिपावर पाय ठेवणार नै. मिपावर तुमचा सतत क्यामेरा. तुम्हाला आमचे रामदास आवडतात. आमचा अमुक धमुक आवडतो, हे चांगले लिहितात, ते चांगले लिहितात, याचंही लेखन छान असतं. सालं तुम्हाला मिपा आवडतं, नै लिहिणारेही खुप आवडतात. पण तुम्हाला आमच्या मिपावर पाय ठेवायचं जिवावर येतं. (नका ठेवू पाय आमचं मिपा बंद थोडी पडलं. ) सालं आम्ही इज्जत केली रावसाहेब तुमच्या जीए.च्या कथांच्या अभ्यासासाची, तुमच्या कल्पक कोट्यांची, अगदी शुद्धलेखनासहित, आम्ही तुमचे सर्व मान अपमान सहन केलेत. आम्ही कडवट बोलतो तुम्हीही कधीही कमी केली नै. सालं तेही दिवस मजेचेच होते. असो, मीस यु. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जरी मी तुम्हाला व्यक्तीगत ओळखत नसलो तरी मी खात्रीपुर्वक सांगतो तुम्ही खोट बोलत आहात यु आर द मोस्ट इमोशनल मॅन मी माइंड रीडर आहे मी गॅरंटी ने सांगु शकतो तुम्ही अस कधीच डिसकनेक्ट करु शकला नाहित आजपर्यंत कोणालाच नाही ये सब बकवास है.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

येतो एकदा औरंगाबादला..... बाकी मुवि काका,माझ्या आठवणी प्रमाणे आपले दोन कट्टे झाले. रॉकींग कट्टा इसरले का , टाकु का फोटो इथे? ;-)

In reply to by कुंदन

आपला पहिला कट्टा एकदम रापचिक होता. खूप दिवसांनी मन मो़कळे झाले होते. त्या रम्य आठवणी परत जाग्या झाल्या....

ते तसे होवू नये म्हणून तर जसे जमेल तसे कट्टे करतोच की... नाहीतर इस्पिक एक्क्यांच्या आड दडलेला सामान्य माणूस कसा काय दिसला असता? किंवा प्रभाकर दादांच्या आड दडलेला तरूण कसा काय दिसला असता? आणि शिवाय नाही म्हटले तरी लेखनाच्या मागचा माणूस ओळखायला जास्त कष्ट पडत नाहीत.एखाद-दुसरा अपवाद असणारच.एक-दोन नासके आंबे निघाल्यामुळे करंडीला दोष देण्यात काही अर्थ नाही.तितकी मनाची तयारी असेल तरच आंब्याच्या मागे धावावे. नविन वर्षाच्या स्वागताला "संभाजीनगरला" येणे जरा कठीणच आहे. शिवाय फेब्रुवारीतल्या ट्रिपचे पण प्लॅनिंग पुण्यापर्यंत आणि लातूरपर्यंतच आहे. त्यामुळे आपण भेटलो की त्याच दिवशी नविन वर्ष साजरे करू.

जे भेटले ते चांगले वाटले (याचा खरा अर्थ अजून तरी वाईट अनुभव नाही ;) ) जे नाही भेटले ते कधीतरी भेटतील...जे कधीच नाही भेटणार "चिउ-काउ" ...त्यांच्यासाठी "नेट डिसकनेक्ट केलं जालीय नातं डिसकनेक्ट" :D

खूप छान लिहिता मुवि तुम्ही. मग ते "मुलांची शेती" असो, की "छगनलाल". अगदी मनापासून लिहिलेले आणि वाचनीय. हा लेखही सुंदर. तुमच्या मनात आतबाहेर काही फरक नाही हे माहित आहे. तुम्हाला मिपावर काही खटकलं तरी ते सांगण्याची तुमची पद्धतही एकदम अंगावर धावून जाणारी नसते. असेच रहा. आणि माझंही काही चुकलं असं तुम्हाला कधी वाटलं किंवा पटलं नाही तरी संवाद असाच चालू राहू दे.

खूप मस्त लिहिता हो मुवि तुम्ही! अगदी आवडलं आणि पटलंही.

जय मिपा आणि जय खरे मिपाकर......
याला अगदी +१००. आणि मी खरे पण आहे आणि मिपाकरही आहे त्यामुळे हे अधिकच पटण्यासारखे आहे :)

सुंदर लेखन मुवी ! मिपा खरंच मज्जा आहे :) इथे चांगले अनुभवही येतात अन वाईट अनुभवही येतात .... आपण दोन्हीमध्ये साम्यावस्थे राहायला शिकलो की मह मिपावरच्या गप्पा अन नर्मदा परिक्रमा ह्यात काहीच फरक रहाणार नाही :)

आता फेब्रुवारीला भेटूच!

आणी नेटके *ok* *OK* आटोपशीर प्रकटन.


मुविसाहेब, तुमच्यावर नाराज नाही हो आम्ही. ते मनातून काढून टाका. बाकी ते 'चिंचबव' मजेशीर होतं. बटाटेवड्यांसोबत तिखटजाळ मिरच्याच खाल्या जातात आमच्याकडेही. त्या पाकृत चिंच-खजुराची चटणी अशीच अ‍ॅड केली. दुसरं काय सोप्पं आणि मला जमेल असं सापडलं नाही म्हणून. अजून काय! जेवढं जमलं त्याने खुश होऊन स्वतःच्या नव्यानेच शोध लागलेल्या पाकृकौशल्याचा पहिला आविष्कार मिपाकरांसमोर मांडायला किंचित घाई केली. जाऊ द्या. बादवे, तिथं मी लिहिलं होतं की वडे मस्त झाले होते, लगेच फस्त झाले. पण खरंतर ते मला एकट्यालाच खायला लागले, असे झाले होते! :-P त्यामुळे परत काही स्वयंपाकघराच्या वाटेला गेलो नाही! जाणार नाही! (कोणी मिपाकर पुण्यात बटाटेवडे बनवण्याचे क्लासेस घेतात का? परत एकदा खुमखुमी आलीय! :-D) (व्यनिचं उत्तर सावकाशीनं देईन. डोंट वरी.)

In reply to by एस

फेब्रुवारीत पुण्याला येतोय...तुझ्याकडे तर हक्काने येणार.

In reply to by सस्नेह

महा-कट्टा व्हायलाच पाहिजे. आज काढतो धागा. ठिकाण पण बघून ठेवले आहे. ४०-५० माणसांची छान व्यवस्था होइल. मी आणि कंजूस गेलो होतो.

अगदी मनापासून लिहील, आणि आम्हालाही मनापासून आवडल.

मिपाने खरोखर मला काय दिले असेल तर ते माझी मित्र-मंडळींची हौस भागवली.आपला पण एक सुंदर ग्रूप हवा.थोडी चेष्टा-मस्करी, थोडे वाद-विवाद आणि भरपूर खाणे-पिणे करता करता आपले ज्ञान अधिक सम्रुद्ध व्हावे, अशी मनापासून इच्छा होती.पथारी घेवून फिरलो बराच पण स्थिरावलो, स्थिरावलो म्हणण्यापेक्षा पसरली ती इथेच. १००% सहमत मुवी, अगदी माझ्या मनातले शब्द आले आहेत.

मिपावर निरपेक्ष वृत्तीने मदत करणारी खूप जण भेटली . या धाग्याच्या निमित्ताने त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटत आहे . गल्फ जॉब च्य शोधात असताना पेठकर काका, मुवि , कुंदन,मंदार कात्रे यांचे मार्गदर्शन खूप मोलाचे ठरले . काहीही ओळख किंवा आंजावर फार सक्रीय नसताना देखील त्यांनी सर्व माहिती दिली सर्व प्रश्नांना उत्तरे दिली. त्याची मोलाची मदत झाली. डॉ. खरे यांनी सुद्धा माझ्या वडिलांच्या आजारपणामध्ये योग्य मार्गदर्शन केले. गणपा , जागु आणि पेठकर काका यांच्यामुळे कुकिंग टिप्स मिळाल्या आणि लज्जत वाढली . इथे खफवर दंगा करायला ओळ्ख असावेच लागते असे नाही. असे अनेक मित्र मिपाने दिले म्हणून मिपा आवडते.

In reply to by कपिलमुनी

मी कधी मदत केली? मी तर विसरून पण गेलो. कपिलमुनी तर आता कट्टा करायचाच...

ऑफिस मधे कितीहि कामं (??) असली तरी मिपा उघडल्याशीवाय, वाचल्याशीवाय, ईथे मजेशीर प्रतिसाद दिल्या/घेतल्याशीवाय दिवस पुर्ण असा होतच नाहि. बोला मग कधी बसायचं कट्ट्याला?? नंदि पॅलेस वाट बघतय व्बॉ...

माझंही मिपाबद्दलचं मत थोड्याफार फरकाने तुमच्यासारखंच आहे. पण मी असं सेंटी वैगरे लिहायला लागलो तर 'अजि म्या ब्रह्म पाहिले' सारख्या प्रतिक्रिया येतात. मिपाकर्स रॉक* एवढंच म्हणेन!! *या रॉकवर दगड वैगरे सारख्या फालतू कोट्या कोणी करायला येऊ नये, आल्यास आमचे शाब्दिक दगड झेलायची तयारी ठेवावी. ;)

In reply to by समिर२०

मात्र मुवि तुम्ही एकनाथांच्या नंतरचे शांतीब्रम्ह आहात हे ही नाकारुन चालणार नाही. इथल्या एका (अनेक डु आयडी असणार्‍या) माजी आयडीने आपल्यावर गलिच्छ भाषेत चिखलफेक केली तेव्हा तुम्ही त्या चिखलफेकीकडे दुर्लक्ष करुन शांत राहीलात ती कौतुकास्पद बाब आहे. लेखातील मतांशी सहमत आहे. आमचे मिपावर अगदी जिवाभावाचे मित्र आहेत*. केवळ त्यांच्यावरील प्रेमापोटी पुणे ते औरंगाबाद (आणि पुढे अजिंठा लेणी) अशा जाऊन येऊनच्या प्रवासात तिकडच्या दगड धोंडयांमध्ये काडीईतकाही रस नसताना एक हाती कार चालवली होती. अर्थात या प्रवासात मुक्कामाच्या ठिकाणी डॉ बिरुटे नावाचा अवलिया प्रत्यक्ष भेटला. आणि ती केवळ मित्रांसाठी इथवर आलो ही भावनाही गायब झाली. आज कुणी मिपाकर भेटला की मी आवर्जून म्हणतो की पाहूणचार करावा तर बिरुटे सरांनीच. माझ्या म्हणण्याला आमचे नेहमीचे हौशी कलाकार दुजोरा देतीलच. मात्र माझं म्हणणं अनुभवण्यासाठी तुम्हाला औरंगाबादला जावे लागेल. :) सुखावणारी एक बाब म्हणजे चौराकाका, पैसाताई, पेठकर काका, एक्का काका, नाद खुळा काका, चित्रगुप्त काका ही आमच्या आई वडीलांच्या पीढीतील किंवा त्याच्या आसपासची माणसं आमच्याशी मैत्रीच्या नात्याने वागतात, आमची विचारपूस करतात. प्रसंगी वडीलधार्‍यांच्या अधिकाराने दटावतातही. दुसरी मला आनंददायक वाटणारी गोष्ट म्हणजे माझ्या घरी या ना त्या निमित्ताने वीस बावीस मिपाकरांनी हजेरी लावली आहे.पुण्यातील मिपाकरांसोबत यात मुंबईकर, ठाणेकर आणि सोलापूरकरही आहेत. *माझ्या या म्हणण्याला आक्षेप घेणारी शुन्यवादाची पुरस्कर्ती आयडी शुन्यात विलीन झाली आहे.

In reply to by सतिश गावडे

"सुखावणारी एक बाब म्हणजे चौराकाका, पैसाताई, पेठकर काका, एक्का काका, नाद खुळा काका, चित्रगुप्त काका ही आमच्या आई वडीलांच्या पीढीतील किंवा त्याच्या आसपासची माणसं आमच्याशी मैत्रीच्या नात्याने वागतात, आमची विचारपूस करतात. प्रसंगी वडीलधार्‍यांच्या अधिकाराने दटावतातही." आणि माफ पण करतात.

मुवि लेख आवडला. अत्यंत खेळीमेळीचं वातावरण, सर्वप्रकारचे उत्कृष्ट लेख, कविता, मार्मिक कोट्या, कधी हलकेफुलके विनोद, अगदी वादविवाद सुद्धा. आम्ही जरा जास्तच वाद घालतो. पर्सनली देखील घेतो कधी तरी. गुदगुल्याचं रुपांतर ओचकारण्यात होतं हेही ठाऊक आहे. पण ठीक आहे. वर्षाखेरीस सिंहावलोकन करावं म्हणतात. ते तेवढंच महत्त्वाचं ठरतं आणि शब्द वापरताना सिंहासारखं वागण्याची जबाबदारी देखील येते. सिंह नसलो तर सिंह बनावं अशी अपेक्षा देखील असतेच. शक्यतोवर प्रयत्न करुच. बाकी मिपा छान आहे ह्यात वादच नाही. आवडते ह्याबद्दलही आक्षेप नाही. मिपाचे 'कर्ते धर्ते' ह्यांना मिपाबद्दलचा अभिमान किंवा अहंकार सुद्धा आहे. असायलाच हवा. लोकप्रिय असं हे मराठी संस्थळ आहे. मला खटकतं ते एवढंच की खरंच मिपामुळे'च' (इथं कुठलीही सोशल नेटवर्कींग साईट घ्यावी) ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात हे म्हणण्याबाबत. मिपा नसतं तर जमलं नसतं वगैरे काही आहे का? कदाचित अस्थानी असेल पण असं एखाद्या गोष्टीबाबतचं अवलंबित्व कितपत खरं असतं? काही जणांची अवस्था अशी आहे की मिपापूर्वी हे लोक काय करत असावेत असा प्रश्न पडावा. मित्र किंवा मैत्रिणी मिपाकर, सगळ्या गोष्टी मिपापासून सुरु होऊन मिपापाशी संपतात. म्हणजे मिपा नसतं तर आपल्या जीवनात भली मोठी पोकळी वगैरे निर्माण झाली असती काय? (पुन्हा एकदा, मिपा हे फक्त नाव म्हणून घेतोय. चेपु, व्हॉटसअॅप, आणखी कुठली साईट असू शकते) असं असूनही मिपा आवडतं यात शंका नाही. म्हणणारे मिपा आवडत नाही तरी इथे येतात, का येतात कुणास ठाऊक, आमंत्रण दिलेलं का वगैरे म्हणतील बहुतेक. म्हणोत.

In reply to by प्यारे१

"म्हणजे मिपा नसतं तर आपल्या जीवनात भली मोठी पोकळी वगैरे निर्माण झाली असती काय?" तुमचे माहित नाही, पण माझ्या जीवनात तर होती. आणि ती भरून काढण्याचे काम "मिपाने" केले.आपण दोघेही कुटुंबवत्सल आणि बर्‍याच वेळा भारताबाहेर.एकटेपणाचे दू:ख तुम्हाला पण आणि मला देखील. माणुस तसाही कळपाशिवाय रहात नाही.पुर्वीही तेच होते आणि आता पण तेच आहे.माध्यमे बदलतात पण वस्तूस्थिती तीच राहते. पुर्वीच्या काळात एखाद्या राजाच्या सभेत राजनर्तकी, राज कवी, राज गायक इत्यादी कलाकार असायचे.एखाद्या मोठ्या समारंभाला बल्लव पण असायचे.(संदर्भ "चांदोबा".) आता ही तेच आहे. मिपा,माबो,ऐअ ही पण राज्येच आहेत.बघा पटत असेल तर, नाहीतर सोडून द्या. बादवे, तुमच्या बोचकारण्याचा आम्हाला त्रास होत नाही, त्या मागचा स्पर्श आम्हाला माहीत आहे.बिंधास्त बोचकारा.

माझी मराठी आंजा वरील मुशाफिरीला सुरुवात मिपापासुनच झाली. पण मेंबर आय-डी मिळायला फार वेळ लागला. तोपर्य़ंत मी "ऐसी" वर लिहीती झाले. "गमभन" शी जुळवून घेता आलेलं नाही हे मिपावर न लिहीण्याचं अजून एक कारण. तरीही मी मिपाला न नियमितपणे भेट देते. इथले लेख,फोटो,पाकृ,भटकंती म्हणजे मेजवानीच. कधी कधी प्रतिक्रिया दिल्या तरी पूर्ण असं कधी काही लिहीलेलं नाही. पण एक गोष्ट आवर्जून सांगाविशी वाटते. मी काही महीन्यांपूर्वी "टेक्निकल रायटींग" बद्द्ल माहीती विचारण्यासाठी धागा काढला होता. त्याला अनेकांनी प्रतिसाद दिले. खास उल्लेख करण्यासारखं म्हणजे समीरसूर आणि मूवि यांनी आतिशय माहीतीपूर्ण आणि हिंमत वाढवणारे प्रतिसाद दिले. थॅंक्स, मिपा.

आभासी जग नेटवरचे: काही आइडींचे नाव, फोटो काहीच नसते तरी त्यांचे लेखन आवडीने वाचतो.

मला वाटतं की 'कट्टा' माध्यमातून ''आभास'' आणि ''वास्तव'' यांच्यातलं अंतर कमी होतं (जे काही वेळा त्रासदायकही होऊ शकतं!)

In reply to by आतिवास

आणि एखाद दुसर्‍या अपवादापायी, असे नकारार्थी वागणे मला योग्य पण वाटत नाही.

मिपा म्हणजे वाहतं पाणी आहे... जुने जातात आणि नवीन येत रहातात. तसं बघितलं तर नर्मदेची- नदीची उपमा अगदी योग्य आहे. मिपावरच भेटलेले दोघे जण - ज्यांना अजून जाणून घ्यायला मला फारच आवडले असते आता इथे नाहीत. त्यातले एक - शब्दशः नर्मदा परीक्रमा करणारे- सहा सात महिन्यापूर्वी गायब झाले. दुसरे काल परवा.... :-(

In reply to by असंका

काही काही अवतारी बांबांना नर्मदा मैय्या मोक्ष देते, तसेच इथे पण होते. पण त्या चिकाटी मंडळींना मिपा इतके आवडते की परत-परत येतात.