Skip to main content

फुलपाखरु

लेखक अरुण मनोहर यांनी बुधवार, 05/11/2008 07:26 या दिवशी प्रकाशित केले.
झुळकी सोबत येई तरंगत रांगोळीची नक्षी दाखवित कुठे चालले, नाही माहित
फुलपाखरु, फुलपाखरु, चला चला रे धरू
बघा कसे ते थोडे दमले पाकळीवरी थकून बसले लिपझिप लिपझिप पंख हलवले
फुलपाखरु, फुलपाखरु, चला चला रे धरू
परागातला मधू चोखते सावध आजूबाजू बघते सुंदर, रंगीत अन् नाजुकते
फुलपाखरु, फुलपाखरु, चला चला रे धरू
हळूच जाउन जवळ पाहिले अलगद बोटांमधे पकडले बाटलीत मग सोडुन दिले
फुलपाखरु, फुलपाखरु, चला चला रे खेळू
कसे बिचारे निपचित पडले रंग पंखांचे बोटांवर आले असेल का ते घाबरलेले?
फुलपाखरु, फुलपाखरु, चला रे सोडून देऊ
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 4001
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

सुंदर बालकविता. आता मुलीला वाचून दाखवेन. येऊ द्यात अजून अशाच बालकविता

अगदी बालकवींची सहजच आठवण व्हावी इतपत सुरेख बोलगीत..! खूप सुंदर वाटलं ही कविता वाचून... :) तात्या.

वा .. कविता छानच आहे.. धरु-खेळू-सोडू हा क्रमही छान :) सुंदर बालकविता आहे.. आवडली. लिपझिप हा शब्द पंखांच्या उघडझापेसाठी आवडला. परागातला मधू चोखते हे मात्र थोडे खटकले. खरेतर फुलपाखरु फुलातला मकरंद घेते. फुलातल्या मधुरसाला मकरंद म्हणतात. मधु म्हटले तरी चालेलसे वाटते. पण तो गोड पदार्थ परागात नसतो. हे आपले मनात आले म्हणून लिहिले..मूळ कवितेच्या गोडव्यामध्ये त्याने काही फरक पडणार नाही. पण निसर्ग कवितेमध्ये चपखल कल्पना आणि शब्द असले तर बरे असे वाटले म्हणून लिहिले. -- लिखाळ.

In reply to by लिखाळ

खर आहे तुमचं. शब्द जरा विचारपूर्वक वापरायला हवे होते. तरिही कविता आवडली म्हणून बरे वाटले.

वेलदोडा, तात्या, लिखाळ, सहज ह्यांचे आभार.

आवडलं, सरळ, साधं, सोपं ...

ही कविता माझ्या मुलीला ऐकविल्यावर अत्यंत निरागसपणे...."अच्चा म्हणजे फुलपाखरु बाटलीत पकडता येते का?" असा प्रश्न विचारल्यावर मी गांगरलो. पण लगेच म्हणालो, "अगं पण बघ ना....बाटलीत पकडल्यावर ते कसे मलुल होते आणि त्याचे रंग उडतात आणि ते मरु सुध्दा शकते....तेव्हा ज्याने कविता केली त्या काकांनी ते सोडुन दिले" असं म्हणल्यावर जरा डोकं ताळ्यावर आलं.... ...नाहीतर उद्यापासुन आमच्या घराभोवतीच्या बागेतल्या फुलपाखरांची खैर नव्हती...पण बाकी कविता उत्तम... -ये.ख. http://sachinparanjpe.wordpress.com

In reply to by येडा खवीस

तुमचा प्रतिसाद वाचून आठवलं. मागे एकदा "बीग फॅट जायंट" ही कादंबरी वाचली. त्यात बीएफजी त्याच्या लहान मुलाला सांगतो- "whatever you do, make sure you avoid contact with human children. Children are the most cruel of the human species." मला वाटते मुलींपेक्षा विषेशतः लहान मुलांसाठी बीएफजीचे हे निरीक्षण चपखल बसते. पण नीट विचार केला तर, मुलामुलींमधली ही कृरता, उत्सुकता आणि ज्ञान मिळवण्याची उर्मी ह्यातून येत असते.

चालीसकट द्या ना. मजा यील.

सुरेख कविता. खूप आवडली.

बालगीत, आवडले.

सर्व रसिकांचे पुन्हा आभार.

कविता आवडली.. मदनबाण..... हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर. बॅ.वि.दा.सावरकर