Skip to main content

नवलकोलची भाजी

लेखक अनन्न्या यांनी रविवार, 07/12/2014 17:23 या दिवशी प्रकाशित केले.
साधारणपणे भात कापणीनंतर कोकणात लाल माठ, मुळा, नवलकोल, गावठी मिरच्या इत्यादी भाज्या लावल्या जातात. याच सिझनला त्या मिळतात. ज्यांनी नवलकोलची भाजी पाहिली नाही, त्यांच्यासाठी हा फोटो आंतरजालावरून साभार. navalcol साहित्यः दोन जुड्या नवलकोल, फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, हळद, दोन/तीन सुक्या लाल मिरच्या, तिखट, मीठ, गूळ, ओले खोबरे(ऐच्छीक). कृती: नवलकोलच्या कांद्यांवरील कोवळी पाने काढून धुऊन बारिक चिरावीत. कुकरला दोन शिट्या करून घ्याव्या. नवलकोलच्या कांद्याची साले काढून आपल्या आवडीप्रमाणे फोडी कराव्या. नेहमीप्रमाणे फोडणी करावी, फोडणीत सुक्या मिरच्या घालाव्या. त्यावर चिरलेल्या फोडी टाकून थोडे पाणी घालून शिजवून घ्याव्या. फोडी शिजल्या की चवीनुसार तिखट, मीठ, गूळ घालावे. शिजलेली पाने मिक्स करावीत. आवडत असल्यास थोडे ओले खोबरे घालावे. गरमागरम पोळीबरोबर भाजी फस्त करावी. या भाजीत फोडीबरोबर पानेही घातल्याने भाजी छान लागते. navalcol

वाचने 31827
प्रतिक्रिया 87

प्रतिक्रिया

छान सोपी पाककृती अनन्न्या.सासुबाई करायच्या हि भा़जी.माझी फारशी करण्यात नाहि.आता या पद्धतीने करून पहाते.

आज नवलकोल अाणलेत.त्याचं काही खरं दिसत नाही.घाबरुन मान टाकुन पडलेत.चांगली झाली भाजी तर लिहिन इथे नाही लिहिलं तर समज वाट लावल्या गेली अाहे ^_~

In reply to by अजया

अशावेळी रस्सा भाजी करायची... रस्सा झणझणीत बनवायचा. हाकानाका...

In reply to by मुक्त विहारि

अर्रर्र !!आमच्यासारख्यांच्या स्वैपाकातले एक शिक्रेट फुटलं !!

In reply to by अजया

अशी अजुन स्वैपाकातली बरीच शिक्रेट आहेत... पण संसार म्हटला की तितके चालायचेच.

अनन्या, आज केलीय ही भाजी. मस्त झालीय. :) अजया... पाककृती उत्तम आहे, तू करणारेस... मग भाजी चविष्ट होण्यावाचून दुसरा क्काही पर्यायच नाही.

आज ह्या पाकृमुळे बर्‍याच भाज्यांच्या, ज्या सध्यातरी आयुष्यातून बाद झाल्याहेत, त्यांच्या आठवणी जाग्या झाल्यात. ह्यातल्या बर्‍याचश्या आता हिवाळ्यातच मिळतात. १. तुरीच्या ओल्या/हिरव्या/कोवळ्या दाण्यांची आमटी. उन्हाळ्यात शेंगदाण्यांची पण करतात. पण ह्या आमटीसोबत भात हादडणे म्हणजे स्वर्गसुख. २. वांग्याची पोपटीचे दाणे घालून केलेली भाजी. झणझणीत आणि मस्त.. ३. वालाच्या शेंगाची सुकी भाजी. ४. ढेमसाची भाजी ५. तोंडल्यांची भाजी ६. काटोल्यांची भाजी.. काटोलं ही एक काटेरी फळभाजी. ७. झुणका / बेसन- मी आमच्याकडे तरी विदर्भात फक्त 'बेसन' हाच शब्द ऐकला होता. 'झुणका' शब्द झुणका-भाकर योजनेनंतरच ऐकला. ह्यात भरपुर कांदे घालून केलेलं बेसन (प्रवासासाठी बेष्ट), टोमॅटो (भेदरं) घालून केलेलं पातळ बेसन (आम्ही सरळ "लंबं बेसन" म्हणायचो, पातळ असल्याने). ह्या 'लंब्या'सोबत भात हादडणे हेपण स्वर्गसुख. आणि ताक घालून केलेलं 'ताकाचं बेसन' असे वेगवेगळे प्रकार आहेत.. पावसाळ्यात शेतात उगवणारी रानभाजी 'चिवळ' घालूनपण बेसन करतात.. असो. आता आठवडाभर गावी आहे. जमेल तेवढया ओरपून घेतो ह्यातल्या काही..