चेतन भगत आणि त्याची पुस्तकं
रेल्वे स्टेशनवरची पुस्तकांची दुकानं हा एक वेगळाच प्रकार आहे. नेहमीची वर्तमानपत्रं आणि नियतकालिकांशिवाय इतरही बरीच ' इंटरेस्टिंग ' पुस्तकं तिथे दिसतात. स्पर्धा परीक्षांची पुस्तकं; काॅमिक्स; ' हाऊ टू ' प्रकारातली पुस्तकं; वशीकरण, इंद्रजाल, लाल किताब असले डोक्याला शाॅट असणारे प्रकार; पाककृती; चाणक्यनीती; अकबर-बिरबल वगैरे भरपूर मालमसाला या स्टाॅल्सवर बघायला मिळतो. एकाच ठिकाणी मुन्शी प्रेमचंद आणि सुरेंद्र मोहन पाठक सारख्या दोन टोकाच्या लेखकांच्या कादंब-या तुम्हाला रेल्वे स्टेशन स्टाॅलवरच सापडतील. ज्याला टाईमपास लिटरेचर म्हणून अभिजनवादी नाकं मुरडतात, त्यातलं बहुतांशी वाङ्मय इथे मिळतं. गेली दहा वर्षे चेतन भगत नामक माणसाची पुस्तकं ही या दुकानांमधल्या सर्वात खप असलेल्या पुस्तकांपैकी आहेत. त्याच्या २००४-०५ मध्ये प्रकाशित झालेल्या ' फाइव्ह पाॅइंट समवन ' पासून ते आत्ता आलेल्या ' हाफ गर्लफ्रेंड ' पर्यंत सगळी पुस्तकं या स्टाॅल्सवर मिळतात.
शाळा-कॉलेजच्या मुलांना त्याची पुस्तकं आवडतात. ज्यांचं शालेय शिक्षण भारतीय भाषांमध्ये झालेलं आहे अशी बरीचशी मुलं इंग्रजी वाचायला सुरुवात करताना चेतन भगतच्या एखाद्या कादंबरीपासून सुरुवात करतात असं निरीक्षण अाहे.
पण त्याच वेळी समीक्षकांची मतं पाहिली तर त्यांनी या पुस्तकांना फाडून खाल्लं आहे. पहिल्या ' फाइव्ह पाॅइंट समवन ' ला समीक्षकांनी थोडा बरा प्रतिसाद दिला होता पण त्याच्यानंतर आलेल्या प्रत्येक पुस्तकावर टीका झालेली आहे. किंबहुना मी एका आंग्लाळलेल्या, उच्चभ्रू, दक्षिण मुंबईतल्या महाविद्यालयात मुलांना बिघडवण्याच्या कामावर होतो (पु.लं.ची क्षमा मागून) तेव्हा माझ्या काही सहका-यांनी या पुस्तकांबद्दल व्यक्त केलेली मतं ऐकूनच मी ती वाचायला सुरुवात केली.
सर्वात प्रथम मला जाणवलेली एक गोष्ट म्हणजे त्याची भाषा ही साधीसरळ, फार जास्त अलंकारिक वगैरे नसलेली अशी आहे. कोणालाही पटकन समजण्याएवढी. त्याची पात्रं ही कोणी असामान्य वगैरे नसतात. मध्यमवर्गीयच असतात. त्यांच्या आयुष्यात काही घटना घडतात आणि त्यामुळे त्यांचं आयुष्य बदलतं. बहुतेक वेळा त्याची मुख्य पात्रं ही महाविद्यालयीन तरुण असतात. त्यांची नेहमीच्या वापरातली भाषा चेतन बरोबर पकडतो. काही कादंब-यांमधली त्याची पात्रं ही भारतातल्या काही अत्यंत नावाजलेल्या शिक्षणसंस्थांमधले विद्यार्थी आहेत. तिथलं वातावरण उभं करण्यात तो ब-यापैकी यशस्वी होतो.
त्याच्यावर घेतल्या जाणा-या आक्षेपांपैकी एक म्हणजे त्याची प्रत्येक कादंबरी ही प्रथमपुरूषी आहे. प्रत्येक कादंबरीत मी हा निवेदक आहे. काही कादंब-यांमध्ये चेतन स्वतःपण असतो. त्याला निवेदक भेटतो आणि आपली कथा ऐकवतो. स्पष्टपणे सांगायचं तर यात खटकण्यासारखं काय आहे तेच मला अजून कळलेलं नाही. तृतीयपुरूषी निवेदन श्रेष्ठ आणि प्रथमपुरूषी कनिष्ठ असे काही समीक्षकांचे निकष असल्यास मला माहीत नाहीत.
दुसरा आक्षेप म्हणजे सेक्स. चेतनच्या प्रत्येक कादंबरीत सेक्सचं वर्णन आहे. मला हाही आक्षेप कळलेला नाही. त्याच्या कादंब-यांमधले नायक-नायिका हे तरुण आहेत, त्यांना एकमेकांविषयी शारीरिक आकर्षण वाटणं स्वाभाविक आहे. कदाचित हा आक्षेप घेणारे आपलं तारुण्य विसरले असावेत किंवा आजकालच्या तरुणांमध्ये लैंगिक अनुभव घेण्याचं वय काय आहे हे त्यांना माहीत नसावं.
मी माझ्या एका ज्येष्ठ सहकारी प्राध्यापिकेला तिने चेतनला यथेच्छ शिव्या घातल्यावर तो लेखक म्हणून न आवडण्याचं कारण विचारलं. तिने मुख्य कारणं म्हणून जी दोन कारणं सांगितली त्याने मला जी झीट आली, त्यातून मी अजून सावरलेलो नाही.
तिच्यामते पहिला आक्षेप हा आहे की त्याची पुस्तकं ही कुठल्याही गंभीर विषयाला हात घालत नाहीत आणि पात्रांच्या आयुष्यातला संघर्ष हा फार वरवरचा आहे. आणि दुसरा आक्षेप - ही पुस्तकं लोकप्रिय आहेत. त्यामुळे त्यांना वाङ्मयीन मूल्य नाही.
मी इंग्रजी किंवा मराठी, कोणत्याच वाङमयाचा शास्त्रीय अभ्यास केलेला नाही. समीक्षालेख वाचलेले आहेत. त्यातले बरेचसे न समजल्यामुळे त्या फंदात परत पडलो नाही. पण मला एकच समजतं - कथेच्या किंवा कादंबरीच्या पहिल्या पानापासून जर लेखकाच्या भाषेने तुमच्या मनाचा ताबा घेतला नाही, तर पुढे ती कथा किंवा कादंबरी वाचनीय असण्याची शक्यता फार कमी असते. उदाहरणार्थ श्री.ना.पेंडशांच्या ' रथचक्र ' ची सुरूवात काहीशी अशी आहे (चूभूद्याघ्या) - ' तिच्या पोटात गर्भ वळवळत असताना तो घरातून पळून गेला होता.' ही मनासारखी सुरुवात मिळेपर्यंत आपण कादंबरीला सुरुवात केली नव्हती असं मी खुद्द श्री.नां. च्या तोंडून त्यांच्या मुलाखतीत ऐकलं आहे.
इथे कुठलीही तुलना करायची नाही पण वाचनीयता हा चांगल्या लेखनाचा किंवा लेखनाला चांगलं म्हणायचा निकष असायलाच हवा. दोन पानांच्या पलिकडे वाचवता नाही पण लिहिलंय फारच उत्तम - याला काही अर्थ आहे?
अजून एक आक्षेप चेतन भगतच्या लिखाणावर हा आहे की तो सगळ्या कादंब-या या पुढे त्यावरून चित्रपट निघेल अशा पद्धतीनेच लिहितो. मला यातही काही तथ्य वाटत नाही. चित्रपट हे अत्यंत ताकदवान माध्यम आहे आणि आजच्या तरूण लेखकांपैकी कितीजणांनी आयुष्यात एकही चित्रपट पाहिलेला नाही? असं कोणीच सापडणार नाही. म्हणजे आज जेव्हा एखादा लेखक लिहायला सुरूवात करतो तेव्हा त्याच्या मनावर चित्रपटांनी केलेला संस्कार पुसून लिहिणं त्याला शक्य आहे का? चेतन हा एक व्यावसायिक लेखक आहे त्यामुळे अमूर्त किंवा अॅबस्ट्रॅक्ट लिहिणं हे त्याच्यासाठी आर्थिक दृष्ट्या तोट्याचंच ठरेल.
मुळात त्याच्यासारख्या लेखकाकडून एखाद्या क्लासिकची अपेक्षा ठेवणं हेच मला चुकीचं वाटतं. पाथेर पांचाली आणि आवारा हे वेगळे आणि वेगळ्या हेतूंनी निर्माण केलेले कलाविष्कार आहेत. आणि रसिकांना दोन्हीही आवडू शकतात. अबक हा यरलवश सारखा लिहित नाही म्हणून मला तो आवडत नाही हे म्हणणं, माझ्यामते तरी, हास्यास्पद आहे.
असो. या सगळ्या लेखनकामाठीचे प्रयोजन म्हणजे मी आजच हाफ गर्लफ्रेंड ही चेतन भगतची नवी कादंबरी वाचली. नाशिक ते मुंबई या रेल्वेच्या साडेतीन ते चार तासांच्या प्रवासात मी ती अखंड वाचून काढली. मला आवडली. गाडी मुंबईत आल्यावरच माझं लक्ष बाहेर गेलं (विंडो सीट असूनसुद्धा). वाचून झाल्यावर सहज म्हणून मी माझी प्रतिक्रिया मित्रांना आणि ओळखीच्या अनेक वाचकांना सांगितली. त्यावर त्यांनी जे म्हटलं त्यामुळे हा लेख लिहावासा वाटला. मिपावरचे वाचक नक्कीच चोखंदळ आणि साक्षेपी आहेत. त्यांच्या प्रतिक्रिया काय असतील याची मला उत्सुकता आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मला एकदा वाचायला नक्की आवडली
छान असतात चेतन भगतची पुस्तक
हाहाहा! मी स्वतः चेतन भगतची
बोकोबा तुझ्या बाबतीत ल्या योगायोगां च आश्चर्य वाटत रे !
आद्य बोका हे आवडलं. डिकन्सला
चेतन भगतने लिहायला सुरुवात
चेतन भगतने लिहायला सुरुवात
सेच "आम्ही चेतन भगत वाचतो"
five point someone भन्नाट आहे
भगतावरचे दोन मुख्य आक्षेप :
ही पुस्तकं लोकप्रिय आहेत.
मी पण हे ऐकल्यावर जो आ वासला
साहित्यिक मूल्यं वगैरे जाऊ
फाईव पॉइंट समवन आवडलंच होतं.
who is this chetan bhagat ?
ए असं नाही हा करायचं !!!
गपं राव रे ! वशाड मेलो.
चेतन भगतची सर्व पुस्तकं मीही
वयाच्या एका टप्प्यावर चेतन
फाइव्ह पॉइंट समवन
आता Five point someone वाचणे
विंजिनेर आहेस ना...फुल्टू
हेची फळ काय मम तपाला...
नको
नक्की कसली भिती वाटते??
चे. भ. माहिती नाही. मात्र मी
"मी माझा... तर माझा कुणाचा"
ते उडनमांडी वाले ना ?
मी म्हणतो, तू जरुर वाच आणि
चेतन भगतचं फक्त FPS आवड्लं ..
साहित्यिक निकष
वरील उत्तम साहीत्या च्या निकषांवर उतरलेली कलाकृती कोणती ?
जोकर इन द पॅक....
जोकर इन द पॅक माहीत नव्हती
@ मारवा...
To kill a mockingbird -
जमल्यास....
शोधतो...
लिंक बद्दल
उदाहरण
चेतन भगतची ३ पुस्तके वाचली...
तसं पाहायला गेलं तर क्लासिक
अगदी अगदी.
शंभरच्या आतबाहेर?
तसं पाहायला गेलं तर क्लासिक
मारवा यांच्या कसोट्यांवर
माझ्या नाही हो त्या कसोट्या विशाखा पाटील यांच्या होत्या
धागा "चेतन भगत आणि त्याची
माझ्या आवडत्या कादंबरीं विषयी लिहीण्याचा मोह आवरत नाही
उतारा योग्य जागी हलवण्यासाठी अनेक धन्यवाद !