✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चेतन भगत आणि त्याची पुस्तकं

ब
बोका-ए-आझम यांनी
Sat, 10/25/2014 - 21:57  ·  लेख
लेख
रेल्वे स्टेशनवरची पुस्तकांची दुकानं हा एक वेगळाच प्रकार आहे. नेहमीची वर्तमानपत्रं आणि नियतकालिकांशिवाय इतरही बरीच ' इंटरेस्टिंग ' पुस्तकं तिथे दिसतात. स्पर्धा परीक्षांची पुस्तकं; काॅमिक्स; ' हाऊ टू ' प्रकारातली पुस्तकं; वशीकरण, इंद्रजाल, लाल किताब असले डोक्याला शाॅट असणारे प्रकार; पाककृती; चाणक्यनीती; अकबर-बिरबल वगैरे भरपूर मालमसाला या स्टाॅल्सवर बघायला मिळतो. एकाच ठिकाणी मुन्शी प्रेमचंद आणि सुरेंद्र मोहन पाठक सारख्या दोन टोकाच्या लेखकांच्या कादंब-या तुम्हाला रेल्वे स्टेशन स्टाॅलवरच सापडतील. ज्याला टाईमपास लिटरेचर म्हणून अभिजनवादी नाकं मुरडतात, त्यातलं बहुतांशी वाङ्मय इथे मिळतं. गेली दहा वर्षे चेतन भगत नामक माणसाची पुस्तकं ही या दुकानांमधल्या सर्वात खप असलेल्या पुस्तकांपैकी आहेत. त्याच्या २००४-०५ मध्ये प्रकाशित झालेल्या ' फाइव्ह पाॅइंट समवन ' पासून ते आत्ता आलेल्या ' हाफ गर्लफ्रेंड ' पर्यंत सगळी पुस्तकं या स्टाॅल्सवर मिळतात. शाळा-कॉलेजच्या मुलांना त्याची पुस्तकं आवडतात. ज्यांचं शालेय शिक्षण भारतीय भाषांमध्ये झालेलं आहे अशी बरीचशी मुलं इंग्रजी वाचायला सुरुवात करताना चेतन भगतच्या एखाद्या कादंबरीपासून सुरुवात करतात असं निरीक्षण अाहे. पण त्याच वेळी समीक्षकांची मतं पाहिली तर त्यांनी या पुस्तकांना फाडून खाल्लं आहे. पहिल्या ' फाइव्ह पाॅइंट समवन ' ला समीक्षकांनी थोडा बरा प्रतिसाद दिला होता पण त्याच्यानंतर आलेल्या प्रत्येक पुस्तकावर टीका झालेली आहे. किंबहुना मी एका आंग्लाळलेल्या, उच्चभ्रू, दक्षिण मुंबईतल्या महाविद्यालयात मुलांना बिघडवण्याच्या कामावर होतो (पु.लं.ची क्षमा मागून) तेव्हा माझ्या काही सहका-यांनी या पुस्तकांबद्दल व्यक्त केलेली मतं ऐकूनच मी ती वाचायला सुरुवात केली. सर्वात प्रथम मला जाणवलेली एक गोष्ट म्हणजे त्याची भाषा ही साधीसरळ, फार जास्त अलंकारिक वगैरे नसलेली अशी आहे. कोणालाही पटकन समजण्याएवढी. त्याची पात्रं ही कोणी असामान्य वगैरे नसतात. मध्यमवर्गीयच असतात. त्यांच्या आयुष्यात काही घटना घडतात आणि त्यामुळे त्यांचं आयुष्य बदलतं. बहुतेक वेळा त्याची मुख्य पात्रं ही महाविद्यालयीन तरुण असतात. त्यांची नेहमीच्या वापरातली भाषा चेतन बरोबर पकडतो. काही कादंब-यांमधली त्याची पात्रं ही भारतातल्या काही अत्यंत नावाजलेल्या शिक्षणसंस्थांमधले विद्यार्थी आहेत. तिथलं वातावरण उभं करण्यात तो ब-यापैकी यशस्वी होतो. त्याच्यावर घेतल्या जाणा-या आक्षेपांपैकी एक म्हणजे त्याची प्रत्येक कादंबरी ही प्रथमपुरूषी आहे. प्रत्येक कादंबरीत मी हा निवेदक आहे. काही कादंब-यांमध्ये चेतन स्वतःपण असतो. त्याला निवेदक भेटतो आणि आपली कथा ऐकवतो. स्पष्टपणे सांगायचं तर यात खटकण्यासारखं काय आहे तेच मला अजून कळलेलं नाही. तृतीयपुरूषी निवेदन श्रेष्ठ आणि प्रथमपुरूषी कनिष्ठ असे काही समीक्षकांचे निकष असल्यास मला माहीत नाहीत. दुसरा आक्षेप म्हणजे सेक्स. चेतनच्या प्रत्येक कादंबरीत सेक्सचं वर्णन आहे. मला हाही आक्षेप कळलेला नाही. त्याच्या कादंब-यांमधले नायक-नायिका हे तरुण आहेत, त्यांना एकमेकांविषयी शारीरिक आकर्षण वाटणं स्वाभाविक आहे. कदाचित हा आक्षेप घेणारे आपलं तारुण्य विसरले असावेत किंवा आजकालच्या तरुणांमध्ये लैंगिक अनुभव घेण्याचं वय काय आहे हे त्यांना माहीत नसावं. मी माझ्या एका ज्येष्ठ सहकारी प्राध्यापिकेला तिने चेतनला यथेच्छ शिव्या घातल्यावर तो लेखक म्हणून न आवडण्याचं कारण विचारलं. तिने मुख्य कारणं म्हणून जी दोन कारणं सांगितली त्याने मला जी झीट आली, त्यातून मी अजून सावरलेलो नाही. तिच्यामते पहिला आक्षेप हा आहे की त्याची पुस्तकं ही कुठल्याही गंभीर विषयाला हात घालत नाहीत आणि पात्रांच्या आयुष्यातला संघर्ष हा फार वरवरचा आहे. आणि दुसरा आक्षेप - ही पुस्तकं लोकप्रिय आहेत. त्यामुळे त्यांना वाङ्मयीन मूल्य नाही. मी इंग्रजी किंवा मराठी, कोणत्याच वाङमयाचा शास्त्रीय अभ्यास केलेला नाही. समीक्षालेख वाचलेले आहेत. त्यातले बरेचसे न समजल्यामुळे त्या फंदात परत पडलो नाही. पण मला एकच समजतं - कथेच्या किंवा कादंबरीच्या पहिल्या पानापासून जर लेखकाच्या भाषेने तुमच्या मनाचा ताबा घेतला नाही, तर पुढे ती कथा किंवा कादंबरी वाचनीय असण्याची शक्यता फार कमी असते. उदाहरणार्थ श्री.ना.पेंडशांच्या ' रथचक्र ' ची सुरूवात काहीशी अशी आहे (चूभूद्याघ्या) - ' तिच्या पोटात गर्भ वळवळत असताना तो घरातून पळून गेला होता.' ही मनासारखी सुरुवात मिळेपर्यंत आपण कादंबरीला सुरुवात केली नव्हती असं मी खुद्द श्री.नां. च्या तोंडून त्यांच्या मुलाखतीत ऐकलं आहे. इथे कुठलीही तुलना करायची नाही पण वाचनीयता हा चांगल्या लेखनाचा किंवा लेखनाला चांगलं म्हणायचा निकष असायलाच हवा. दोन पानांच्या पलिकडे वाचवता नाही पण लिहिलंय फारच उत्तम - याला काही अर्थ आहे? अजून एक आक्षेप चेतन भगतच्या लिखाणावर हा आहे की तो सगळ्या कादंब-या या पुढे त्यावरून चित्रपट निघेल अशा पद्धतीनेच लिहितो. मला यातही काही तथ्य वाटत नाही. चित्रपट हे अत्यंत ताकदवान माध्यम आहे आणि आजच्या तरूण लेखकांपैकी कितीजणांनी आयुष्यात एकही चित्रपट पाहिलेला नाही? असं कोणीच सापडणार नाही. म्हणजे आज जेव्हा एखादा लेखक लिहायला सुरूवात करतो तेव्हा त्याच्या मनावर चित्रपटांनी केलेला संस्कार पुसून लिहिणं त्याला शक्य आहे का? चेतन हा एक व्यावसायिक लेखक आहे त्यामुळे अमूर्त किंवा अॅबस्ट्रॅक्ट लिहिणं हे त्याच्यासाठी आर्थिक दृष्ट्या तोट्याचंच ठरेल. मुळात त्याच्यासारख्या लेखकाकडून एखाद्या क्लासिकची अपेक्षा ठेवणं हेच मला चुकीचं वाटतं. पाथेर पांचाली आणि आवारा हे वेगळे आणि वेगळ्या हेतूंनी निर्माण केलेले कलाविष्कार आहेत. आणि रसिकांना दोन्हीही आवडू शकतात. अबक हा यरलवश सारखा लिहित नाही म्हणून मला तो आवडत नाही हे म्हणणं, माझ्यामते तरी, हास्यास्पद आहे. असो. या सगळ्या लेखनकामाठीचे प्रयोजन म्हणजे मी आजच हाफ गर्लफ्रेंड ही चेतन भगतची नवी कादंबरी वाचली. नाशिक ते मुंबई या रेल्वेच्या साडेतीन ते चार तासांच्या प्रवासात मी ती अखंड वाचून काढली. मला आवडली. गाडी मुंबईत आल्यावरच माझं लक्ष बाहेर गेलं (विंडो सीट असूनसुद्धा). वाचून झाल्यावर सहज म्हणून मी माझी प्रतिक्रिया मित्रांना आणि ओळखीच्या अनेक वाचकांना सांगितली. त्यावर त्यांनी जे म्हटलं त्यामुळे हा लेख लिहावासा वाटला. मिपावरचे वाचक नक्कीच चोखंदळ आणि साक्षेपी आहेत. त्यांच्या प्रतिक्रिया काय असतील याची मला उत्सुकता आहे.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वाङ्मय
लेखनप्रकार (Writing Type)
मत

प्रतिक्रिया द्या
17268 वाचन

💬 प्रतिसाद (83)

प्रतिक्रिया

चेतन भगत कधीच वाचला नाही.

प्रचेतस
Mon, 10/27/2014 - 09:42 नवीन
चेतन भगत कधीच वाचला नाही. आम्ही आपले गोनीदा, श्री.ना. दळवी, मतकरी, सिडने शेल्डन, ब्राउन, पुझो प्रेमी.
  • Log in or register to post comments

ज्याची त्याची आवड

वेल्लाभट
Mon, 10/27/2014 - 10:24 नवीन
मला त्या लेखकाचं लिखाण मुळीच आवडत नाही. का? काय आवडत नाही? हे सांगत बसण्याचा उद्योग मी करु इच्छित नाही. उगा कीस पाडत बसण्यात अर्थ नाही. सम थिंग्स आर जस्ट फॉर मासेस इतकच.
  • Log in or register to post comments

सम थिंग्स आर जस्ट फॉर मासेस

सतिश गावडे
Mon, 10/27/2014 - 10:28 नवीन
सम थिंग्स आर जस्ट फॉर मासेस इतकच.
कुणीतरी उघडपणे चेतन भगत हा "मास"चा लेखक आहे हे बोलण्याचे धाडस दाखवले. अभिनंदन !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

"मास" चा लेखक म्हणजे

अन्या दातार
Mon, 10/27/2014 - 15:22 नवीन
"मास" चा लेखक म्हणजे जिलब्यापाडू ना रे? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

चेतन भगत न वाचताही तुझी

विश्वनाथ मेहेंदळे
Mon, 10/27/2014 - 23:11 नवीन
चेतन भगत न वाचताही तुझी त्याच्याबद्दलची काहीशी ठाम मते फॉर्म झालेली दिसतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

नाही...

सतिश गावडे
Tue, 10/28/2014 - 09:25 नवीन
चेतन भगतचं लेखन वाचलंच नाही तर मते कशी बनतील? माझं "कुणीतरी उघडपणे चेतन भगत हा मासचा लेखक आहे हे बोलण्याचे धाडस दाखवले. " हे वाक्य उपहासात्मक होतं. वेल्लाभट यांनी ज्या सहजतेने "सम थिंग्स आर जस्ट फॉर मासेस इतकच." असं लिहून ते (म्हणजे वेल्लाभट) "क्लास"मधले आहेत हे सुचवलं त्याने मी अवाक झालो होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

एखादा माणूस मी त्या मास चा

थॉर माणूस
Tue, 10/28/2014 - 10:05 नवीन
एखादा माणूस मी त्या मास चा भाग नाही म्हटलं की लगेच क्लासमधे कसा काय जातो बॉ? का एकापेक्षा जास्त मासेस नसतातच असं तुमचं म्हणणं आहे? चेतन भगत एका विशिष्ट माससाठी लिहीतो आणि त्या बाबतीत तो खूप यशस्वी लेखक आहे. आता हे कुणी म्हणत असेल तर लगेच त्याला क्लास मधे ढकलायची घाई कशाला? तुमच्या मासमधली नसली तरी ती व्यक्ती दुसर्‍या मासमधली असू शकते की... माझ्या मते पाईव्ह पॉइंट समवन नंतरची पुस्तके फार काही खास नव्हती, माझ्या लेखी या पुस्तकांना प्रवासातला पास टाईम यापलीकडे फारशी किंमत नाही. रिव्होल्युशन २०२० तर तद्दन भिकार वाटलं मला. हाफ गर्लफ्रेंड वाचलं नाही अजून, पण फारशा अपेक्षा अशा नाहीतच. त्यामुळे आवर्जुन त्या पुस्तकाच्या वाटेला जाणं वगैरे अवघड आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

ओके. उपरोध कळला नव्हता. बाकी

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 10/30/2014 - 19:57 नवीन
ओके. उपरोध कळला नव्हता. बाकी मुद्दा मान्य :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

@ सम थिंग्स आर जस्ट फॉर मासेस

यसवायजी
Mon, 10/27/2014 - 20:05 नवीन
@ सम थिंग्स आर जस्ट फॉर मासेस >> ख्या ख्या ख्या :)) :)) का हसतोय हे सांगत बसण्याचा उद्योग मी करु इच्छित नाही. उगा कीस पाडत बसण्यात अर्थ नाही.
  • Log in or register to post comments

कुणीतरी उघडपणे चेतन भगत हा

सतिश गावडे
Mon, 10/27/2014 - 20:16 नवीन
कुणीतरी उघडपणे चेतन भगत हा "मास"चा लेखक आहे हे बोलण्याचे धाडस दाखवले तर तुम्ही चक्क ख्या ख्या ख्या करुन हसताय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

आमालाच असं कुटं काय "उघडपणे"

यसवायजी
Mon, 10/27/2014 - 20:31 नवीन
आमालाच असं कुटं काय "उघडपणे" लिवता/सांगता येत न्हाई ह्योच प्राब्लेम हाए. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

बहुदा हे मासेस चं हसणं असावं

वेल्लाभट
Mon, 10/27/2014 - 21:22 नवीन
ख्या ख्या ख्या !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

>>>अबक हा यरलवश सारखा लिहित

थॉर माणूस
Tue, 10/28/2014 - 10:11 नवीन
>>>अबक हा यरलवश सारखा लिहित नाही म्हणून मला तो आवडत नाही हे म्हणणं, माझ्यामते तरी, हास्यास्पद आहे. माझ्यामते याचा अर्थ त्या वाचकाला यरलवशची लेखनशैली किंवा लेखनप्रकार आवडतो आणि अबकच्या लेखनशैली किंवा लेखनप्रकारात "वो बात" नसल्याने त्याला आवडत नाही इतकाच आहे, यात हास्यास्पद काय ते कळले नाही. हे म्हणजे मला चहा आवडतो आणि समोरच्याला चहाऐवजी कॉफी आवडते म्हणून ते हास्यास्पद म्हटल्यासारखं वाटतंय. शेवटी प्रत्येक रसिकाची अभिरुची, प्रगल्भता वेगळी आणि म्हणूनच आवड निवड वेगळी नाही का? त्याची आवड माझ्यासारखी नाही म्हणून तो हास्यास्पद कसे म्हणता येईल?
  • Log in or register to post comments

यात हास्यास्पद हे आहे की मी

बोका-ए-आझम
Tue, 10/28/2014 - 14:08 नवीन
यात हास्यास्पद हे आहे की मी एकाच शैलीला आदर्श समजतो आणि त्याव्यतिरिक्त जे इतर प्रयोग होतात त्यांना तुच्छ समजतो. हे असं समजणं, माझ्या मते, हास्यास्पद आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस

तो एकाच शैलीला आदर्श समजतो हा

थॉर माणूस
Tue, 10/28/2014 - 17:48 नवीन
तो एकाच शैलीला आदर्श समजतो हा निष्कर्ष तुमचा आहे. समोरच्याने तुम्हाला सांगितले की अमुक एकाची शैली त्याला आवडते आणि चेतन भगतची शैली तशी नसल्याने त्याचे लिखाण आवडत नाही तर यावरून तुम्ही कुठल्या कुठे पोहोचलात. आवड आणि आदर्श वेगळे असतात मालको. मला पाणीपुरी आवडते आणि दहीपुरी आवडत नाही असं मी म्हणालो तर पाणीपुरी ही माझ्या दृष्टीने आदर्श चाट डीश आहे असं सांगत फिरणार की काय? :) का तुम्हाला दहीपुरी आवडते म्हणून मी हास्यास्पद ठरणार तुमच्या लॉजिकने? एखाद्या व्यक्तीला एक शैली आवडते (किंवा एक खास शैली आवडत नाही) आणि म्हणून त्याला तुम्हाला आवडणारी गोष्ट आवडत नसेल तर त्यात हास्यास्पद वाटण्यासारखं काहीच नाही. उलट मला आवडतं ते जर इतरांना आवडत नसेल तर ते सगळे हास्यास्पद असं म्हणणं जास्त हट्टीपणाचं (हास्यास्पद म्हणा हवं तर. ;) ) वाटतं. असो, तुम्हाला चेतन भगत आवडतो. मला त्याचं एक पुस्तक बर्‍यापैकी वाटतं आणि कुणाला तो बंडल लेखक वाटतो. माझ्यालेखी तिघेही आपल्या जागी बरोबर आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

कोणाला काय आवडतं हा प्रश्नच

बोका-ए-आझम
Tue, 10/28/2014 - 23:10 नवीन
कोणाला काय आवडतं हा प्रश्नच नाहीये इथे. एखाद्या व्यक्तीचा दुराग्रह हा हास्यास्पद आहे. अर्थात मला आहे. बाकी No accounting for taste.त्यामुळे तुम्ही जे शेवटी म्हणालात ते बरोबर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस

चेतन भगत...

पिलीयन रायडर
Tue, 10/28/2014 - 13:45 नवीन
चेतन भगत... अगदीच सुमार लेखक आहे.. दिवाळीत टाईमपास म्हणुन "हाफ गर्लफ्रेंड" वाचलं... किती ते रटाळ आणि फिल्मी पुस्तक.. एकतर पात्र निर्मिती वगैरे काही नाहिच.. पात्राविषयी माहिती म्हणजे नायिकेने काय कपडे घातले आहेत ह्याची "प्रत्येक प्रसंगात" वर्णनं.. "तिने गुलाबी टॉप आणि निळी जीन्स घातली होती..".. "तिने अमुक कानातले आणि टमुक घातलं होतं.." अशी असंख्य वर्णंन आहेत.. कशाला नक्की? (मागे ते वन नाईट.. वाचलं होतं त्यातही हाच फालतुपणा होता.. कोण कुठल्या स्टॉपला गाडीत बसलं आणि जर ती मुलगी असेल तर तिनी काय घातलं होतं..) वाचकाच्या नजरे समोर कथा जिवंत उभी राहिली पाहिजे म्हणजे अगदी कपड्याच्या रंगा सकट असं बहुदा त्याला वाटत असावं.. बरं ते ही असो.. नायक आणि नायिकेच्या वागण्याची काही कारणमीमांसा? (जर पुस्तक वाचायचं असेल तर इथुन पुढे वाचु नका.) नायिकेच्या वडिलांनी बहुदा तिला लहानपणी काही त्रास दिलेला असतो ज्यामुळे ती नायकाला शाररिक जवळीक करु देत नसते... साधारणपणे अशा केस मध्ये मुलींना एकंदरीतच पुरुषांची..विशेष करुन स्पर्शाची घृणा वाटायला लागते.. म्हणुन ती तसं वागत असेल असं म्हणावं तर ही पोरगी हिरोच्या गळ्यात पडणार.. भर कॉलेज मध्ये मांडीवर डोकं ठेवुन झोपणार.. त्याच्या हॉस्टेलवर चोरुन येऊन तोकड्या कपड्यात त्याच्या बेडवर लोळणार.. मग तो बाजुला येऊन झोपला तर त्याला अंगावर हात पाय टाकु देणार.. पण इथुन पुढे मात्र त्यानी "कंट्रोल" करावं अशी हिची अपेक्षा... आणि हो.. इतकं मोकळं वागुन.. पुन्हा अगदी जीवाभावाच्या गप्पा मारुनही.. "आपल्यात 'तसं' काहीच नाही हं.." अशी लडिवाळ सुचना पण करणार.. दिल्लीतले हाय फाय लोक असे असतात का? असतीलही.. माझ्या सारख्या डाऊनमार्केट व्यक्तीला हे वागणं अतर्क्य वाटलं... हिरो तरी काय.. एकाच विचारानी पछाडलेला... ते ही असोच... भाषा... सुमार... साहित्यमुल्य... रियली??? कथा.. फिल्मी... शेवट.. अतिफिल्मी... म्ह्णजे जर हिरो तिला शोधाय्ला ३ महिन्यासाठी अमेरिकेत गेलाय तर शेवटच्या दिवसापर्यंत ती ह्याला न सापडणं... मग अगदी शेवटच्या १ तासात अनंत अडथळे पार करत तिच्या समोर "एंट्री" मारणं... शेवटी स्वतःच्या मुला समोर डायलॉग मारुन पुस्तक संपवणं... आणि सगळ्यात डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे कथेत स्वतःला घुसवणं.. नायकानी लेखकाला "चेतन सर.. तुम्ही खुप चांगलं लिहीता म्हणुन माझी गर्लफ्रेंड मला तुमची पुस्तकं वाचुन दाखवायची (माझं इंग्लिश सुधारायला!!!!!)" असं म्हणणं....काय बोलावं आता... किती किती न काय काय सांगु... शेवटची ३०-४० पानं शेवटी वैतागुन पळवली... थोडक्यात ही सुद्धा एक बॉलवुड पिक्चरची स्क्रिप्ट तयार आहे... अगदी टायटलसह...
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

थॉर माणूस
Tue, 10/28/2014 - 14:03 नवीन
चला, माझा वेळ वाया जाण्यापासून वाचवलात. आता कुणी स्वतःहून दिलं तरी वाचायच्या फंदात पडणार नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

पिराताई, नाही नाही म्हणता

बोका-ए-आझम
Tue, 10/28/2014 - 14:57 नवीन
पिराताई, नाही नाही म्हणता तुमच्या बरंच लक्षात आहे की पुस्तक! म्हणजे नकारात्मक दृष्टीने का होईना, लेखकाचा उद्देश साध्य झाला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

लक्षात आहे की पुस्तक म्हणजे?

पिलीयन रायडर
Tue, 10/28/2014 - 15:01 नवीन
लक्षात आहे की पुस्तक म्हणजे? वाचलय म्हणजे लक्षात रहाणार्च ना.. आणि अगदी ३ च दिवसा पुर्वी वाचलय... फाइअव पॉइंट समवन आवडलं होतं.. पण लक्षात नाही फारसं आता...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

मस्त प्रतिसाद

नंदन
Wed, 10/29/2014 - 04:47 नवीन
म्ह्णजे जर हिरो तिला शोधाय्ला ३ महिन्यासाठी अमेरिकेत गेलाय तर शेवटच्या दिवसापर्यंत ती ह्याला न सापडणं... मग अगदी शेवटच्या १ तासात अनंत अडथळे पार करत तिच्या समोर "एंट्री" मारणं... शेवटी स्वतःच्या मुला समोर डायलॉग मारुन पुस्तक संपवणं... आणि सगळ्यात डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे कथेत स्वतःला घुसवणं..
सुभाष घईकाका आठवले :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

त्यालाच साध्यासरळ शब्दांत

बोका-ए-आझम
Tue, 10/28/2014 - 15:07 नवीन
त्यालाच साध्यासरळ शब्दांत लेखकाचा प्रभाव म्हणतात!विशेष म्हणजे जे तुम्हाला आवडलं होतं ते आठवत नाही आणि जे आठवतंय ते आवडलेलं नाही! हे जरा विचित्रच आहे, नाही?
  • Log in or register to post comments

बरोबर.. लेखकाचा प्रभावच...

पिलीयन रायडर
Tue, 10/28/2014 - 15:51 नवीन
बरोबर.. लेखकाचा प्रभावच... एक पुस्तक २ दिवसापुर्वी वाचलय आणि दुसरं अनेक वर्षांपुर्वी ह्या गोष्टीचा काही संबंध नाही...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

मी त्याची आतापर्यंत ३-४

मोहनराव
Tue, 10/28/2014 - 17:54 नवीन
मी त्याची आतापर्यंत ३-४ पुस्तके वाचली आहेत. साहित्यिक मुल्य वगैरे शोधायच्या भानगडीत न पडता वाचुन तात्पुरता आनंद घेतला. तो तरुण लोकांची नस पकडून लिहितो असे मला वाटते
  • Log in or register to post comments

ती नस डोक्यातली असावी.

आदूबाळ
Tue, 10/28/2014 - 18:29 नवीन
ती नस डोक्यातली असावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

तो तरुण लोकांची नस पकडून

चिनार
Tue, 11/04/2014 - 17:39 नवीन
तो तरुण लोकांची नस पकडून लिहितो असे मला वाटते मला वाटते , चेतन भगतच्या मते तरुणांची नस फक्त कमरेखालीच असते !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

चेतन भगत जे लिहितो त्याला नस

बॅटमॅन
Wed, 11/05/2014 - 15:26 नवीन
चेतन भगत जे लिहितो त्याला नस पकडणं म्हणत असतील तर नसबंदी व्हायला पाहिजे एव्हाना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार

पहिली दोन पुस्तके ठीक आहेत. ३

मोदक
Tue, 10/28/2014 - 20:03 नवीन
पहिली दोन पुस्तके ठीक आहेत. ३ मिस्टेक्स नंतर त्याची पुस्तक वाचले गेले नाही. मात्र इंग्रजी सुधारण्यासाठी त्याची पुस्तके अनेकजणांना सुचवली आहेत. अवांतर - मॅनेजमेंट सेशन द्यायला एकदा हाफिसने याला बोलावला होता. "मी परराज्यातील बायकोसाठी घरी कशी निगोसिएशन्स केली" या विषयावर कंटाळा आणवला. बहुदा त्या दरम्यान एकदा हर्षा भोगलेने आम्हाला मॅनेजमेंट आणि टीमवर्कचे ज्ञान दिले असल्याने लोकांच्या अपेक्षा वाढून भ्रमनिरास झाला असावा* *तळटीपा १) हर्षा भोगले आणि चेतन भगत दोहोंमध्ये फरक आहे हे सपशेल मान्य. मात्र हाफिसातले अशा सेशनचे स्वरूप "वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांकडून मॅनेजमेंट आणि टीमवर्क बाबत ट्रेनींग घेणे" असे होते. २) दोघांच्याही प्रेझेंटेशनमध्ये जमीन आस्मानाचा फरक होता.
  • Log in or register to post comments

चेतन भगतचे ट्विट छान असतात...

सुहास झेले
Wed, 10/29/2014 - 15:42 नवीन
चेतन भगतचे ट्विट छान असतात... टाईम्समधला कॉलम पण कधीकधी (?) वाचनीय असतो. धन्यवाद !!
  • Log in or register to post comments

चला, बरं झालं, चेतन भगतलाच लिहिण्याचा कंटाळा आला...

विशाखा पाटील
गुरुवार, 10/30/2014 - 09:45 नवीन
http://www.deccanchronicle.com/141029/lifestyle-booksart/article/break-writing-chetan-bhagat-talks-fashion-style
  • Log in or register to post comments

चे.भ..

चिगो
गुरुवार, 10/30/2014 - 13:04 नवीन
चे.भ.चं फापॉस हे मला त्यावेळी आवडलं होतं. तेच " वनाअ‍ॅकॉसें" आणि "टू स्टेट्स" बद्दल.. त्याची पुस्तकं टाईमपाससाठी असतात आणि ती तशीच वाचावी.. उअगाच "हे आहे का त्यात" आणि "ते आहे का त्यात" विचारत बसण्यात अर्थ नाही. ही पुस्तके त्यानी कॉलेजातल्या पोरांसाठी, खासकरुन ज्यांना नवीनच इंग्रजी "साहीत्याची" खाज सुटायला लागलीय, त्यांना टार्गेट करुन लिहीली जातात, असे मला वाटते. म्हणूनच त्यांची किंमतपण शंभराच्या आतबाहेरच असते, एखाद्या बर्गरइतकी.. सुरुवातीची दोन-तीन पुस्तके वाचल्यानंतर तोचतोपना आणि वाढता रटाळपणा ह्यापायी त्याची पुस्तके आता वाचत नाही.. तेच त्याच्या "यशा"पासून प्रेरणा घेऊन लिहीणार्‍या नवतरुण कोवळ्या, आंग्लाळलेल्या, कॉलेजिएट, आयटीयन नवलेखकांबद्दल.. मला जास्त डोक्यात जातो तो चे.भ.नी स्वतःला अत्यंत विचारी असल्याच्या साक्षात्कारातून सुरु केलेला शहाणपणा.. वैचारीकतेची परिपक्वता नसलेली त्याची बाष्फळ बडबड एकदा ऐकायला मिळाली आणि का हा माणुस आपल्या डोक्यावर आणि स्वतःच्या पायांवर धोंडा मारुन घेतोय, हेच कळेना..
  • Log in or register to post comments

पूर्ण सहमत !!!

चिनार
Tue, 11/04/2014 - 17:35 नवीन
मला जास्त डोक्यात जातो तो चे.भ.नी स्वतःला अत्यंत विचारी असल्याच्या साक्षात्कारातून सुरु केलेला शहाणपणा.. वैचारीकतेची परिपक्वता नसलेली त्याची बाष्फळ बडबड एकदा ऐकायला मिळाली आणि का हा माणुस आपल्या डोक्यावर आणि स्वतःच्या पायांवर धोंडा मारुन घेतोय, हेच कळेना.. पूर्ण सहमत !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

चेतन भगतचे आधी 'फाईव्ह पॉईंट

श्रीगुरुजी
गुरुवार, 11/06/2014 - 14:44 नवीन
चेतन भगतचे आधी 'फाईव्ह पॉईंट समवन' वाचले होते. ते बरे वाटले. नंतर '३ मिस्टेक्स इन माय लाईफ' वाचले. ते अत्यंत भिकार होते. त्याची कथा एखाद्या थर्ड ग्रेड हिंदी चित्रपटाच्या कथेपेक्षाही जास्त वाईट होती. त्यानंतर त्याचे एकही पुस्तक वाचलेले नाही.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा