✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

अवजारांप्रति कृतज्ञता

ज
जागु यांनी
Sat, 10/04/2014 - 12:56  ·  लेख
लेख
खालील लेख दिनांक ३ ऑक्टोबर २०१४ रोजी लोकसत्ता-वास्तुरंग पुरवणी मध्ये प्रकाशीत झाला आहे. http://www.loksatta.com/vasturang-news/dasra-1008880/ --------------------------------------------------------------------------------- दसरा म्हणजे मांगल्याचा दिवस. ह्या दिवशी विशेषकरून यंत्रे हत्यारांची पूजा केली जाते. अशीच पूजा शेतकरी कुटुंबे आपल्या शेतीच्या अवजारांची करतात. वर्षभर शेती-मळ्यांसाठी राबणार्‍या अवजारांना दसर्‍याच्या दिवशी घासून पुसून स्वच्छ केले जाते. संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी रांगोळी काढून पाटावर अवजारे ठेवली जातात. त्यात वर्षभर मळ्यांचे पाट खणणारे कुदळ, पिकाव, पाटासाठी किंवा खड्यासाठी खणलेली माती बाजूला सारण्यासाठी वापरण्यात येणारे फावडे, खोल खड्डा खणण्यासाठी उपयोग येणार पार किंवा पारई, मोठी सुकलेली झाडे तोडण्यासाठी व चुलीसाठी लाकडे फोडण्यासाठी लागणारी कुर्‍हाड, झाडांचे डुखण किंवा फांद्या छाटण्यासाठी वापरण्यात येणारा कोयता, आऊत, मोठी कैची, शेतीची पिके आणि गवत कापण्यासाठी उपयोगी खरळ किंवा विळा तसेच नारळ सोलण्याचे यंत्र, घरातील चाकू/सुरी, काती, विळी, कैची अशा विविध अवजारांची ह्या दिवशी पूजा केली जाते. माझ्या माहेरच्या गावात लहानपणापासून ही अवजारे मी आवडीने हाताळली आहेत. काही अवजारांच्या आठवणी अजूनही स्मृतीत आहेत. लहानपणी शेतात मजूर आणि घरच्यांसोबत शेती कापण्यासाठी लुडबुड करायला मला आवडायचे. दुसर्‍यापेक्षा आपण जास्त जलद गतीने शेतातील रोपे कापतोय हे दाखवण्यासाठी ३-४ वेळा हातावर खरळ येऊन दुखापत झालेली आहे आणि त्यापेक्षा त्यानंतरची नकोशी वाटणारी गोष्ट म्हणजे माझे वडील मला त्याच दिवशी धनुर्वाताचे इंजेक्शन द्यायला न्यायचे. पण अशा वेळी माझ्या हेळसांडपणाला दोष न देता हा खरळच बरोबर नाही, त्याची मूठच सैल होती, त्याचे दाते खूपच धारदार आहेत, त्याला बरोबर धारच नव्हती अशी कारणे सांगून बिचार्‍या खरळाला मी दोषी ठरवायचे. पारई तशी जडच असते. पण करांदे, तारले (ताडफळाचे रोपात रूपांतर झाल्यावर जे त्याला खाली मूळ येते ते जवळ जवळ दीड फूट खाली असते) काढण्याची हौस जास्त. करांदे निघायचे पण तारला कधीच माझ्याने निघाला नव्हता. मोठी झाल्यावर पण सुरणापर्यंत झेप गेली पण तारला काढणे खूपच कष्टाचे वाटायचे. त्यात पण एखादा पारईचा घाव करांद्यावर किंवा सुरणावर लागला की स्वतःच्या नेमबाजीचा राग न येता निर्जीव पारईचाच यायचा. कारण त्यामुळे पारई लागलेली तो भाग काळवंडून बिनउपयोगी व्हायचा. ह्याच पारईचा उपयोग सुकलेल्या शेतीची ढेपळे काढण्यासाठी व्हायचा पारईच्या साहाय्याने ढेपळे काढून भाज्या व अबोली, झेंडू, शेवंती सारख्या फुलांचे वाफे हिरवे व रंगीत वाफे डोलायचे. मोठी म्हणजे १६-१७ वर्षांची झाले तेव्हा स्वकष्टाने झेंडूचा वाफा फुलवायची हवा डोक्यात गेली. एक दिवस घरा जवळचीच मोकळी जागा निवडून तिथे कुदळ आणि फावड्याच्या साहाय्याने आळ्या केल्या. पाटाचा मार्ग त्या आळ्यांपर्यंत जुळवला. झेंडूची रोपे लावली आणि काही दिवसांतच गेंदेदार झेंडूची बाग तिथे तयार झाली. ही बाग फुलल्यावर मी मनोमन सुखावले. माझ्यावरच मी खूश झाले. घरातल्या सगळ्याच अवजारांना मी ती कशी चालतात हे कुतूहल म्हणून हाताळायचे. बर्‍याचदा कुर्‍हाड, फावडे, पारई पण नेम चुकल्याने पायावर लागलेली आहे. पण घरी आई-आजी दर दसर्‍याला ह्या अवजारांना स्वच्छ धुऊन पुसून देवखोलीत रांगोळी काढून पाटावर ठेवायच्या. सगळ्या अवजारांना हळद कुंकू, फुले, अक्षता वाहायच्या. समोर दिवा लावायच्या दसर्‍याला लुटले जाणारे सोने म्हणजे आपट्याची फांदी ही ह्यांच्या बरोबर विराजमान असायची. दसर्‍याच्या दिवशी ह्या अवजारांना अडगळीच्या जागेतून देवघरात स्थान मिळायचं. लहान असताना मी घरातल्या मोठ्यांना विचारायचे ह्यांची आपण का पूजा करतो? तेव्हा उत्तर मिळायची "वर्षभर ते आपल्यासाठी राबतात. हा एक दिवस त्यांच्या मानाचा असतो. त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा." लग्न होऊन सासरी आले. सासरी घराच्या आसपास शेती वा वाडी नसल्याने घरात अवजारे तुरळकच होती. पण सासर्‍यांनी राहत्या घरापासून काही अंतरावर वाडी घेतली होती. त्यात एक शेतही होते. तिथे सगळी अवजारे वस्तीला असायची. तिथे नवीन घराचे काम चालू होते. माझ्या नोकरीमुळे माझे तिथे जास्त जाणे होत नसे. लग्नानंतरचा दसरा आला. माझ्या सासरच्या घरात सगळेच सण दिमाखात साजरे होतात. दसराही थाटामाटात साजरा झाला. सोने लुटण्याचा कार्यक्रमही उत्साहात आणि मजेशीर पार पडला. पण दरवर्षी दसर्‍याला सजलेली हत्यारे माझ्या नजरे समोर न आल्याने मन खिन्न झाले होते. त्या अवजारांची मला माहेरच्या माणसांप्रमाणे आठवण आली. दूसर्‍याच वर्षी नवीन घराचे काम होऊन आम्ही वाडीतल्या नवीन घरात राहायला गेलो. तिथे माझी भेट एका पडवीत अवजारांशी झाली आणि आमची पुन्हा गट्टी जमली. नवीन जागेतील नवीन अवजारे मला पाने-फुले फुलवण्यात मदत करू लागली. नवीन घरातला दसर्‍याचा दिवस आला आणि त्या संध्याकाळी माझ्या मनात अवजारांची पूजा करायची आहे हे नवर्‍याला सांगितले. मग नवर्‍याच्या मदतीने सगळी अवजारे स्वच्छ घुवून पुसून देवखोलीत पाटाखाली रांगोळी काढून पाटावर विराजमान केली. माझे दीर-जाऊ, सासू-सासरे सगळेच कौतुकाने चालला प्रकार पाहत होते. माझे सासरे मितभाषी होते पण त्या दिवशी त्यांनी खरी शेतकरीण आहेस म्हणून कौतुक केले ते माझ्यासाठी अविस्मरणीय आहे.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
5490 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

खूप सुंदर लेख...

माम्लेदारचा पन्खा
Sat, 10/04/2014 - 13:47 नवीन
मी वाचलाय.... हाडाच्या शेतकरी आहात खर्या....
  • Log in or register to post comments

मस्तच

कविता१९७८
Sat, 10/04/2014 - 14:11 नवीन
जागु, आम्हाला तुझा अभिमान आहे.
  • Log in or register to post comments

सुंदर लेख, जागु.वाचला होताच

अजया
Sat, 10/04/2014 - 15:16 नवीन
सुंदर लेख, जागु.वाचला होताच.बरं झालं इथे टाकलास.तुला सांगता अालं!!
  • Log in or register to post comments

सुंदर आठवणी.

चित्रगुप्त
Sat, 10/04/2014 - 15:25 नवीन
सुंदर आठवणी. असे काही वाचले, की 'गेले ते दिवस' ही हुरहुर मनात दाटते.
  • Log in or register to post comments

+1

काउबॉय
Tue, 10/07/2014 - 16:15 नवीन
अन ही हुरहुर जर अजुन दाट करायची असेल तर लोकसंस्कृतीच्या पाउलखुणा पुस्तक अवश्य वाचा... मास्टर पिस आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

मस्त लिहीलयस!

अनन्न्या
Sat, 10/04/2014 - 16:22 नवीन
माझ्याकडे ही दरवर्षी शस्त्रपूजा आणि नव्याची पौर्णिमा आठवणीने साजरी करते. आता घरचे धान्य येत नाही, त्यामुळे नव्याची तोरणे विकत आणावी लागतात.
  • Log in or register to post comments

सुरेख लेख...

इशा१२३
Sat, 10/04/2014 - 17:20 नवीन
सुरेख लेख...
  • Log in or register to post comments

छान लेख.वास्तुरंग इथे

जेपी
Sat, 10/04/2014 - 17:50 नवीन
छान लेख.वास्तुरंग इथे लोकसत्ता बरोबर येत नाही त्यामुळे विशेष आभार.
  • Log in or register to post comments

पन्खा, कविता, अजया,

जागु
Tue, 10/07/2014 - 11:54 नवीन
पन्खा, कविता, अजया, चित्रगुप्त, अनन्या, इशा, जेपी धन्यवाद.
  • Log in or register to post comments

छान लेख जागुताई

एस
Tue, 10/07/2014 - 14:41 नवीन
पिकावला इकडे टिकाव असेही म्हणतात. तसेच पार किंवा पारईला पहार म्हणतात. तुम्ही टाकलेल्या छायाचित्रात डावीकडून अनुक्रमे पहिले व दुसरे अवजार. अर्थात हा किंचित भाषाभेद झाला. तुमची शेतीबद्दलची आपुलकी आधीच्या लेखांतूनही जाणवत राहते. तसाच हाही एक अतिशय नॉस्टॅल्जिक करणारा सुंदर लेख..! धन्यवाद! अशाच लिहीत रहा!
  • Log in or register to post comments

जागुताई

सविता००१
Tue, 10/07/2014 - 14:46 नवीन
मस्त गं. मला त्र फावडं सोडल्यास इतर हत्यारांची नावं पण माहीत नव्हती:(
  • Log in or register to post comments

वरच्या प्रतिसादात

सविता००१
Tue, 10/07/2014 - 14:47 नवीन
* तर असे हवे होते. टायपो मिष्टेक .. :(
  • Log in or register to post comments

स्वॅप्स, सविता धन्यवाद.

जागु
Tue, 10/07/2014 - 16:22 नवीन
स्वॅप्स, सविता धन्यवाद. काउबॉय लेखकाचे नाव काय आहे त्या पुस्तकाचे? म्हणजे घेताना बरे पडेल.
  • Log in or register to post comments

पूजा

तिमा
Tue, 10/07/2014 - 18:07 नवीन
शेतकर्‍यांनी वा अन्य कष्टकर्‍यांनी केलेली शस्त्रपूजा खटकत नाही. पण संगणकावर स्वस्तिक काढून त्याची अथवा शास्त्रीय प्रयोगशाळेतील अत्याधुनिक यंत्रांची पूजा करणे हास्यास्पद वाटते.
  • Log in or register to post comments

लेख आवडला....

मुक्त विहारि
Tue, 10/07/2014 - 23:17 नवीन
मस्त...
  • Log in or register to post comments

__/\__

अत्रुप्त आत्मा
Wed, 10/08/2014 - 00:08 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments

मस्त लेख जागु !!

सुहास..
गुरुवार, 10/09/2014 - 14:48 नवीन
मस्त लेख जागु !! ( तु हल्ली मिपाकराच्या रोल मधुन जराशी सुटत चालली आहेस असे वाटते आहे, इकड लिहायला विषय नाहीयेत का ? ) जागुचा पंखा सुहास
  • Log in or register to post comments

सुहास नाही असे काही नाही.

जागु
गुरुवार, 10/09/2014 - 14:57 नवीन
सुहास नाही असे काही नाही. हल्ली खरच खुप बिझी असते. पण आता वेळ मिळेल तसे येणार आहे.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा