http://www.misalpav.com/node/28987
--------------------------
भय आणि प्रणय या सजीवांच्या दोन आदिम प्रेरणा आहेत. खरं तर बाकी सगळ्या प्रेरणांचा त्या स्त्रोत आहेत. आणि आपलं मन या दोन प्रेरणांमधे अविरत दोलायमान आहे.
भय केवळ मृत्यूचं नाही, तर जिथेजिथे आपण जोडलो गेलोत, जिथून आपल्याला आनंद मिळतो, जो आपला आधार आहे, तो तुटण्याचं भय आहे. मग तो सखीचा देह असो, आपला की कुणा जिवलगचा देह असो, त्याच्या विलयाचं भय. नाती, अनुबंध, किंवा मैत्री तुटण्याचं भय. आर्थिक विपन्नतेचं भय किंवा मग स्व-प्रतिमेला तडा जाण्याचं आणि सामाजाच्या अवहेलनचं भय. जोपर्यंत आपण देहात आहोत, तोपर्यंत भय आहे... आणि ते संपत नाही, हा ग्रेसचा काव्यविषय आहे.
प्रणय हा मनाला (आणि शरीराला) लाभलेला अपरिमित आनंदाचा सर्वात गहिरा रंग आहे. अत्यंत उत्कट रतीसंगाच्या तृप्तीनंतर अंतर्तमात एकच भावना उरते की बास, आता हा सगळा सोहळा संपन्न व्हावा... आता मृत्यू यावा! लेट देअर बी अ डीप सायलेंस...आता सगळं शांत व्हावं, आता पुन्हा भयचक्राच्या भोवरा नको.
ग्रेसची कविता, भय आणि प्रणय या दोन चित्तदशातली मनाची आंदोलनं, विविधांगांनी व्यक्त करते.
_________________________________
पहिल्याच ओळीत ग्रेस म्हणतो : `भय इथले संपत नाही,...मज तुझी आठवण येते'
ग्रेस सखीशी मनानं इतका एकरुप आहे की संध्याकाळच्या कातरवेळी, सैरभैर झालेल्या जीवाला आधार म्हणून, तो काय करत असेल तर तीनं दिलेलं गाणं गातो...
`मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते'!
अत्यंत साधे शब्द पण त्यात सखीशी असलेल्या कमालीच्या लोभस अनुबंधानंची अभिव्यक्ती आणि न संपणार्या भयाला हुलकावणी देण्याची किमया. मनाच्या तरलतम अवस्थेत आपण पहिली गोष्ट काय करत असू तर गुणगुणायला लागतो.
सुधीर मोघ्यांनी लिहिलंय :
माझे मन तुझे झाले, तुझे मन माझे झाले,
प्राण प्राण तुझे माझे, प्राण प्राण एक झाले ।
ग्रेसची सखी त्याच्याशी इतकी एकरुप आहे आहे की कातर संध्यासमयी तो तिनं शिकवलेलं गाणं गातो!
पहिल्या दोन ओळीतच ग्रेस (स्वतःच्या) मनाचा सगळा कॅनव्हास ओपन करतो आणि रसिकाला स्वत:शी समचित्त करुन घेतो.
`भय इथले संपत नाही`या ओळीसरशी आपला रोख, सगळं भान हरपून कवितेकडे वळतो. त्या मागोमाग, `मज तुझी आठवण येते' हा दिलासा मिळतो. आणि `मी संध्याकाळी गातो' यानं एक गहिरा महौल तयार करत ग्रेस म्हणतो, `तू मला शिकवली गीते!'
केवळ अप्रतिम शब्द संयोजन आणि लयकारीचा अलौकिक अंदाज. पहिल्या दोन ओळीतच ग्रेस रसिकाचं संपूर्ण अवधान वेधून घेतो आणि नकळत आपण पुढल्या ओळींप्रती उत्सुक होतो.
__________________________________________
`ते झरे चंद्र सजणांचे, ती धरती भगवी माया '
हा अत्यंत व्यक्तिगत पण कमालीचा उत्कट अनुभव आहे. तो प्रत्येकाला असेल असं नाही, पण कल्पना बेभान करणारी आहे.
कधी चांदण्यारात्री, विस्तिर्ण मोकळ्या आकाशाखाली, अत्यंत निर्भयपणे तुम्ही निजला असाल आणि शेजेला सखी असेल तर, चंद्र-चांदण्यांची शीतलता दोन्ही देहात सावकाशपणे भिनायला लागते. या देह व्यापणार्या सुखद शीतलतेला ग्रेसनं कमालीची रुपकात्मकता दिलीये तो म्हणतो, `ते झरे चंद्र सजणांचे '!
आणि त्याहून कमाल म्हणजे देहाप्रती आपली जी अनाम प्रिती आहे तिला, एका क्षणात आसक्ती आणि विरक्तीची रुपकं बहाल करत ग्रेस लिहीतो, `ती धरती भगवी माया'! केवळ कल्लोळ केलायं शब्दांचा आणि अर्थांचा.
मग त्या अनंगरंगातून तो पुन्हा भयावर मात करुन जातो....
`झाडांशी निजलो आपण, झाडात पुन्हा उगवाया '!
माय गॉड, जस्ट इंपॉसिबल! जर ग्रेसनं ही मांडणी इंग्रजीसारख्या, जगातल्या असंख्य रसिकांना समजू शकणार्या भाषेत केली असती, तर आज त्याच्या कवितांची नोंद अजरामर साहित्यात झाली असती.
___________________________________
`तो बोल मंद हळवासा, आयुष्य स्पर्शुनी गेला '
या ओळी तिच्या आवाजाचा गोडवा, तरलतम शब्दात सांगतात. पण ग्रेसची प्रतिभा पुन्हा नवी ऊंची गाठल्याशिवाय राहात नाही!
`सितेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला '
जर आयुष्य विजनवास असेल तर तिचा तो मंद हळवा बोल... राघवाच्या शेल्यासारखा आहे. आणि विजनवासाच्या एकाकीपणात कवीमनानं तो ल्यालेला आहे. ग्रेसच्या रुपकांची बिलोरी दुनिया किती अपूर्व आहे. रसिकाच्या अंतर्तम भावनेला आधारसम असलेल्या राघवाच्या शेल्याला, तो सखीच्या मंद हळव्या स्वराचं रुपक देतो. आणि राघवाचा शेला तरी बाह्य आहे, सखीचा मंद हळवा स्वर अंतर्बाह्य लेऊन, तो न संपणार्या भयाला सहज पेलू पाहातो!
_________________________________________
खरं तर हे गाणं ग्रेसनं आयुष्याच्या संध्याकाळी लिहिलंय आणि त्याची सखी देखिल आता केवळ स्मृतीरुप उरली आहे. कवितेच्या दुसर्या ओळीत येणारी संध्याकाळ, त्याच्या एकाकीपणाची संध्याकाळ आहे आणि त्याची सखी म्हणजे आता, त्याची कविताच आहे!
अत्यंत संवेदनाशिल इंद्रिये, जी व्यक्त जगाच्या बहुविध सौंदर्याला विविधांगांनी स्पर्शायची, ती आता केवळ देहाच्या जर्जरतेची खबर देतायंत.
मिर्झा ग़ालिबचा एक शेर आहे :
गो हाथको जुंबिश नही, आंखोंमे तो दम है,
रहेने दो अभी सागर-ओ-मीना, मेरे आगे |
हातात चषक धरण्याइतकी सुद्धा आता ताकत नाही, पण नजरेतली कामना बर्करार आहे. (सखे), तो मदिरेचा प्याला, असाच माझ्यासमोर राहू दे.
हीच विकलता ग्रेस काय कमालीच्या अंदाजानं बयां करतो पाहा. गा़लिबचा उत्कटता त्याची नशा आहे आणि ग्रेसची नशा त्याचं गाणं आहे, त्याची कविता आहे. तो म्हणतो :
`स्तोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दुःख कुणाचे'
पार स्त्रोतापासून आता दु:खं वर येतायंत, पण ती सुद्धा माझ्या इंद्रियांनी गायलेली दु:खाची गाणीच आहेत!
आणि मग एक क्षणात, ग्रेसची पराकोटीची सौंदर्यदृष्टी सगळा माहौल बदलवून टाकते! सगळा मोहरा पालटवून टाकते. सगळं वातावरण उजागर करुन टाकते. इतक्या विकलतेवर ती अशी काय मात करुन जाते की आपण थक्क होतो.
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे !
त्याच्या मांडणीची नज़ाकत पाहा. ‘भय इथले संपत नाही’ या ओळींनी वाटतं की आता कडेलोट झाला, सर्व शक्यता संपल्या. पण त्याच न संपणार्या भयाला तो अशी कलाटणी देतो:
‘हे सरता संपत नाही’... आणि काय तर, चांदणे तुझ्या स्मरणाचे !
सार्या विमनस्कतेवर, रुपकाचा निव्वळ चंदनलेप!
_______________________
भय इथले संपत नाही…मज तुझी आठवण येते…
मी संध्याकाळी गातो…तू मला शिकविली गीते…
वाचने
15798
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
सही...
प्रयत्न चांगलाय.. पण मला
पिरा, रसग्रहण म्हणजे समीक्षा नाही, ते तटस्थतेनं करणं अशक्य आहे
In reply to प्रयत्न चांगलाय.. पण मला by पिलीयन रायडर
मान्य...
In reply to पिरा, रसग्रहण म्हणजे समीक्षा नाही, ते तटस्थतेनं करणं अशक्य आहे by संजय क्षीरसागर
मी तर कविता आणि गाणं दोन्हीनी भारावून गेलोयं
In reply to मान्य... by पिलीयन रायडर
छान!
आवडल.
अर्थ खुप दिवस शोधत होतो !! धन्यवाद
उत्तम रसग्रहण
एका प्रतिभावंताने त्याच्या
In reply to उत्तम रसग्रहण by सह्यमित्र
एका प्रतिभावंताने त्याच्या
In reply to उत्तम रसग्रहण by सह्यमित्र
अत्यंतिक आभार!
In reply to उत्तम रसग्रहण by सह्यमित्र
अप्रतिम लेख आवडला.
`झाडांशी निजलो आपण, झाडात
आवडीचं गाणं आहे. समिक्षण
कुछ जम्या नहि...
आईची आठवण
ऋणी आहे
दोन वाक्यात कवितेचा नेमका
In reply to ऋणी आहे by मित्रहो
चांगले लिहिलेत
कलेच्या प्रांतात कसला वाद आणि प्रतिवाद?
In reply to चांगले लिहिलेत by vikramaditya
(No subject)
संजय जी अप्रतिम आस्वाद !
मारवाश्री, रसग्रहणाच्या प्रशंसेबद्दल धन्यवाद!
In reply to संजय जी अप्रतिम आस्वाद ! by मारवा
वाह
मनःपूर्वक धन्यवाद!
In reply to वाह by श्रीरंग_जोशी
तेच म्हणतो इतका मर्यादीत अर्थ असेल असे वाटत नाही
हे खासच आहे!
In reply to तेच म्हणतो इतका मर्यादीत अर्थ असेल असे वाटत नाही by मारवा
उदा, औदुंबर या कवितेचा कवि ग्रेस व मे.पु. रेगे या दोघांनी
`औदुंबर' ही पुन्हा एक लँडमार्क कविता आहे
In reply to उदा, औदुंबर या कवितेचा कवि ग्रेस व मे.पु. रेगे या दोघांनी by मारवा
अतिशय सुंदर...
पुनश्च आभार!
In reply to अतिशय सुंदर... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुंदर रसग्रहण सर !